http://mimarathi.net/node/952
गेले दोन दिवस पहात होतो, आमचे डायव्हर साहेब, एकदम जवान, आधी बस चालवायचे असे त्याच्या गप्पांमधुन कळले होते, त्यामुळे असेल कदाचित पण गाडी चालवतांना अतिशय सावध, उगाच ओव्हरटेकिंग साठी मरमर अजिबात नाही अन रस्ता मोकळा असला की सुसाट पळवणार. तर अशा आमच्या डायव्हरसाहेबांना गेले दोन दिवस मोबाइल वर फोन आला की ते हळू आवाजात बोलायला लागायचे व माझ्या कपाळावर आठया बघुन मग "मै बाद मे फोन करता हु" म्हणायचे. मी एकदोनदा सांगितले कि बाबा गाडी चालवतांना मोबाइल वर बोलु नको, घाट वगैरे असतांना तर मुळीच नको.
त्यालाही ते पटायचे पण तेव्हड्यापुरतेच. शेवटी एकदा डायव्हर सायबांनी आपली मजबुरी उघड केली. आमच्या डायव्हर साहेबांनी नुकतेच म्हणजे आम्ही डलहौसीला पोचलो त्या दिवशीच एका सोणी कुडीशी रजिस्टर मॅरेज केले होते
, ते ही तिला घरुन पळवून नेउन! तिच्या घरच्यांचा आपल्या बिरादरीतला नाही म्हणून विरोध! याने दोन वर्ष अर्ज विनंत्या वगैरे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे मार्ग वापरुन पाहिले शेवटी धमक्या वगैरे सुरु झाल्यावर सरळ हे पाउल उचलले, करा लेको काय करायचे ते. कोर्टात जाता? जा, हाणामार्या करायच्या तर माझी पण डायव्हर/ मे़क्यानिक मित्रांची तयारी आहे. अशी सगळी चित्तरकथा ऐकल्यावर मी म्हटले बाबा हवे तर तु बाजुला थांब, बोलुन घे, मग पुढे जाऊ. वेळ लागला तरी हरकत नाही,पण गाडी चालवतांना मोबाइलवर बोलू नको. माझी सौ. मला नंतर म्हणाली "त्याचे मोबाइल वरचे बोलणे ऐकून मला वाटतच होते की असे काहीतरी असणारच" बायकांना हे कसे काय कळते बॉ?
बायकांचा सिक्स्थ सेन्स म्हणतात तो हाच का?
तर असे हे आमचे डायव्हर साहेब बराच आग्रह केल्यावर आमच्या सोबत एक फोटो काढायला तयार झाले.

तो गॉगल घालून चिरंजीवांच्या डावीकडे बसलेला इसम म्हणजे मी बर का, नाही तर मलाच ड्रायव्हर समजाल
सोणी कुडी ला पळवुन वगैरे नेण्याचे माझे दिवस कधीच मागे पडलेत आता!!

हा फोटो काढला ती जागा म्हणजे काला टॉप या भागातले गेस्ट हाउस!
.
.
कालाटॉप असे नाव पडण्याचे कारण म्हणजे इथले अतिशय घनदाट जंगल. जमीनीवर सूर्यप्रकाशही पोहचत नाही. अशा जमीनीला संस्कृत मधे "असूर्यपश्या"(सूर्य जिला पाहू शकत नाही ) असे सुंदर नाव आहे.

सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे थंडी चांगलीच वाजत होती, काही झाडे फारच प्रचंड होती.असेच हे एक झाड!

डलहौसी परिसरात हिमाचल पर्यटन खात्याने बरीच मेहनत घेतलेली दिसून येते. मुख्य रस्ते लष्कराच्या ताब्यात असल्याने चांगले आहेत, जिथून चांगली निसर्गदृष्ये दिसतात त्या त्या ठिकाणी कठडे बांधून घुमट्या उभारल्या आहेत, लोक आपोआप थांबतात. बाजुच्या टपर्यांवर गरम गरम चहा
कॉफी मिळते, निसर्ग सानिध्यात त्याचा आस्वाद काही औरच! अशाच एका ठिकाणचे हे दृष्य!

.
.
.
आम्ही लोक खुशीत वगैरे असलो तर आम्हाला सुपरमॅन सारखे उडताही येते बर का, ही अजिबात ट्रिक फोटोग्राफी वगैरे नाही.

(अगदी सोप्पय हो, एक्,दोन्,तीन म्हणायचे, उडी मारायची कि क्लिक!! उडा सुपरमॅनसारखे.)
इंग्रज अमदानीत लॉर्ड डलहौसी ने या प्रदेशाचे सामरिक महत्व ओळखून येथे सैन्याची छावणी उभारली म्हणून त्याचे नाव या जागेला पडले, आता येथे भारताच्या लष्कराचे मोठे ठाणे आहे तसेच वायूसेनेचे ही एक शक्तीशाली रडार स्टेशन आहे. ही जागा अशी आहे की चीन व पाकिस्तान च्या सरह्द्दी येथून जवळ आहेत. भारतीयांच्या साठी आणखी एक महत्वाचे म्हणजे या ठिकाणाशी निगडीत असलेली नेताजींची आठवण ! सुभाषबाबूंना इंग्रजांनी कलकत्त्याला कैदेत टाकल्या नंतर त्यांची प्रकृती फारच खराब झाली. त्यांचे काही बरे वाईट झाले तर मोठा जनक्षोभ उसळेल व परिस्थिती हाताबाहेर जाइल या भयाने त्यांना नंतर मुक्त केले. पण तब्येतीचे जे नुकसान झाले ते झालेच. त्यांचे मित्र असलेले डॉ. गंगोपाध्याय (जर मला नीट स्मरत असेल तर) त्यांना आग्रह करून आपल्या डलहौसी च्या बंगल्या वर हवापालट म्हणून राहण्यास घेऊन गेले. येथे एक विहीर आहे जिचे पाणी औषधी गुणधर्म असलेले आहे म्हणतात. सुभाषबाबू त्या रस्त्याने फिरायला जात व या विहीरीच्या पाण्याने आपली तहान भागवीत. लवकरच त्यांची तब्येत चांगली सुधारली. आता त्या विहीरीला "सुभाष बावली"असे नाव आहे. आम्ही तिथे पोचलो तो अंधार पडला त्या मुळे फोटो काढता आले नाही.
नंतरच्या दिवशी सकाळी धरमशाला येथे जायला निघालो. सकाळी ६ ला निघालो ते साधारण साडेनऊला पोचलो. धरमशाला व मॅक्लिओडगंज ही जुळी गावे मधे फक्त १०-१५ कि.मी. चे अंतर पण सगळी चढण अन घाट आहे. त्या रस्त्याने मग नड्डी टॉप ला गेलो.
अत्युत्तरस्यां दिशी देवतात्मा|| हिमालयो नाम नगाधिराजः || ( अति उत्तर दिशेला देवतांचा आत्माच जणू असा तो हिमालय नावाचा पर्वतराज!)असे ज्याचे वर्णन केले आहे त्या हिमालयाची भव्यता इथे बघायला मिळते. तीन पर्वतरांगापैकी एकीवरच झाडे वाढली आहेत कारण बाकी दोन अधिक उंच असल्याने जवळ जवळ वर्षभर हिमाच्छादितच असतात.हिमालयात पर्वतरांगेच्या उंची नुसार जंगलातील झाडे ही वेगळी दिसुन येतात. एका मागे एक व एकी पेक्षा दुसरी उंच अशा तीन पर्वत रांगा कॅमेरात पकडायच्या तर तुमच्या जवळ फोटोग्राफीचे विषेश कौशल्य हवे. मी माझ्या परीने केलेला हा प्रयत्न.

आणि हा माझ्या मुलाने केलेला
खरे तर या फोटोमधल्या कठड्या मागे एक सुंदर तलाव आहे पण आम्ही गेलो तेव्हा तो तलाव आटला होता अन गाळाची माती बुलडोझर ने काढणे सुरु होते. 

मॅक्लिओडगंज चे हे चर्च जवळचे स्मारक एका इंग्रज अधिकार्याच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ बांधले.

चर्च साधेसेच आहे पण त्या आवारा मधे असणार्या झाडांवर असणार्या वेलींवर उन्हे पडून तयार झालेला हा उनसावलीचा खेळ फार सुंदर होता, मला जमला तसा मी टिपला.

चहाच्या मळ्यात पहाण्यासारखे काय आहे? हा आमच्या डायवरसाहेबांना पडलेला प्रश्न अनेकांना पडला असावा कारण आम्ही जायचे म्हणजे जायचेच म्हटल्यावर तिथे गेलो तर तेव्हा तिथे आमच्या शिवाय कोणीही नव्हते.

वेगवेगळ्या दर्जाचा चहा विकणार्या या चहावाल्याशिवाय तिथे काळे कुत्रेही नव्हते.

आप हमे चाय बनाके पिला नही सकते? असे विचारले तर तो म्हणाला नही बाबूजी, क्या करे बहुतही कम लोग यहा आते है. चहाच्या मळ्यात बसून गरमागरम चहा पिण्याचे आमचे स्वप्न स्वप्नच राहिले.पण या मळ्यात लोक फार न येण्या मुळे तिथे तर्हेतर्हेचे पक्षी मात्र भरपूर होते. अर्थात त्यांचे फोटो काढणे हे येरागबाळाचे काम नोहे हे मला लवकरच कळून आले, मुलगा मात्र लाँगशॉट मधे का होइना एका पक्षाला टिपण्यात यशस्वी झाला.
मॅक्लिओड्गंज येथील दलाइ लामांच्या मठाचे वर्णन केले नाही तर अर्थातच हे प्रवासवर्णन अपुरे राहील. बाहेरून एखाद्या बहुमजली भल्यामोठ्या अपार्ट्मेंट सारखी ही इमारत आतून मात्र अतिशय विस्तीर्ण आहे. बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी इथे अनेक देशांमधून अभ्यासक साधक येऊन राहतात. खरे सांगायचे तर परदेशी नागरिकच जास्त दिसत होते. भरपूर गर्दी असूनही अतिशय शांतता होती. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता होती.

या भगवान बुद्धाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर माझ्या भारतीय मनाला जो अनुभव आला तो मला नीटसा शब्दांमधे मांडता येत नाहीये. पण काही क्षण सारे काही विसरलो होतो हे खरे. "धर्मग्रंथांमधे लिहिले आहे म्हणून नाही, मी सांगतो म्हणूनही नाही तर स्वतःच्या बुद्धीने विचार कर, ज्ञानाचा अनुभव घे" असा अर्थ असलेला भगवान बुद्धाचा उपदेश सांगणारा श्लोक तिथे नुकताच वाचला होता. त्याचा अगदी थोडासा अर्थ तिथे मला उमगला असे म्हणता येइल. बाजुलाच तिथे भगवान गौतम बुद्धाच्या संस्कृत व पाली भाषे मधील उपदेशांचे तिबेटी भाषेत अनुवादित केलेले ग्रंथ (जवळजवळ १००-२०० तरी असावेत) एकावर एक नीट रचून ठेवले होते.
शेजारीच अवलोकितेश्वर आणि आचार्य पद्मसंभव या तंत्रमार्गाने साधना केलेल्या अधिकारी महापुरुषाची मूर्ती होती. मी फोटो काढायला अन तेथील लोखंडी जाळी त्या लोकांनी बंद करायला एकच गाठ पडली. दर्शनेच्छू लोकांची गर्दीही नेमकी तेव्हाच वाढली. केवळ मला नीट फोटो काढता यावा या साठी त्यांच्या दर्शनात व्यत्यय येणे मला ठीक वाटले नाही. म्हणून लोकांना बाजु व्हा व जाळी उघडा असे काही बोललो नाही. या दोन्ही मूर्ती बघण्या सारख्या आहेत. पण त्यांच्या बद्द्ल, त्या वेगवेगळ्या प्रतिकात्मक अलंकारादी चित्रविचित्र वस्तूंच्या बद्द्ल सांगायचे तर कोणी तरी त्या पंथाचे, तत्वज्ञानाचा मूर्तीशास्त्राचा अभ्यास असणारा कोणी तरी हवा, मला तिथे कोणी असा भेटला नाही.

भोवताल सगळी कडे तिबेटी शैलीची चित्रे, भली मोठी कापडी तोरणे यांची सजावट होती.


अन प्रदक्षिणा मार्गावर असे रोलर वर फिरणारे दंडगोल, त्यावर मंत्र कोरलेले आहेत, जेवढ्यांदा ते फिरतील तेव्हढा मंत्र जपला असे मानतात.एक एक पद्धती आपल्या आपल्या.

समोर सभामंडपात अभ्यासक ग्रंथांचे वाचन करत होते. ध्यानस्थ बसलेल्या या साधकाची छ्बी टिपण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. त्याचे ध्यान भंग होउ नये याकरता फ्लॅश बंद ठेवून मी हा फोटो काढला.

मठाबाहेर मिळणारे व्हेज मोमो खायचे राहुन गेलं बघा. भूखेसे भजन नाही होत गोपाला.!!
परत येतानाच्या दोन दिवसांमधे देवींच्या पाच विख्यात मंदीरांमधे दर्शन घेतले, चामुण्डा, कांगडादेवी, ज्वालाजी (ज्वालामुखी), नयनादेवी, व चिन्तपूर्णी (ही वैष्णोदेवीची बहिण मानली जाते.) ज्वालाजी इथे देवीचे ज्वालारूप दर्शन आहे. मूर्ती वगैरे नाही. गोरक्षनाथ तपस्या करीत असतांना देवी प्रकट झाली, प्रसन्न होउन काय वर हवा विचारले असता गोरक्षनाथ म्हणाले माते भूक लागली आहे, तू मला खिचडी बनवून खायला दे, पहिले काही भिक्षा मागून आणतो तो वर थांब, असे बोलून निघाले पण भक्तांच्या कल्याणासाठी देवीने तेथेच थांबावे म्हणून परतले नाही देवी स्वयंपाकासाठी पेटवलेल्या अग्नी रुपाने आजही तिथे भक्तांना दर्शन देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. एका कुण्डात नैसर्गिक वायूची असेल पण ज्योत चहू बाजूने प्रखर जळत असते. शंकराच्या तांडवा पासुन जगाला वाचवण्या करता विष्णूनी सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे केलेले तुकडे जिथे जिथे पडले तेथे शक्तीपीठे निर्माण झाली त्या पैकी ज्वालामुखी ला सतीची जीभ व नयना देवी इथे सतीचे डोळे पडले असे सांगतात. या पैकी अनेक जागी फोटो काढायला मनाइ होती त्या मुळे मोजकेच फोटो काढता आले.
हे कांगडा मंदीर. या मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे कळसांच्या रचनेत हिंदू-मुस्लिम- व शीख स्थापत्यशैलीचा साधलेला सुंदर संगम! आपल्या भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे प्रतीकच जणू.

ज्वालाजी परीसर.


ज्वालाजी येथील ज्योत पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न अकबराच्या सैन्याने केला असता मोठा अग्नीप्रलय झाला. तेव्हा अकबराने क्षमा मागण्या करता देवीला वाहीलेले सवा मण सोन्याचे छ्त्र तिथे बघायला मिळते.
इच्छापूर्ती साठी नवस बोलणारे भाविक मंदिरां जवळच्या झाडाला देवीला वाहीलेली चुनरी बांधतात व बहुधा नंतर इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा येउन सोडतात.
मी निरिक्षण केलेली आणखी एक विषेश गोष्ट म्हणजे या सर्व देवस्थानी शीख बांधव हिंदूंबरोबर अतिशय श्रद्धेने येतात, जय मातादी चा गजर करतांना नेतृत्व आपोआप त्यांच्या कडे गेलेले असते. ज्वालाजी येथे तर अनवाणी पायी चालत डोक्यावर पेटवलेला अग्नी घेउन व्रतपूर्ती साठी पायी आलेले अनेक शीख बंधू मी पाहिले. त्या सार्यांच्या चेहर्या वरील भक्तिभाव इतका सुंदर होता की मी त्यांचा फोटो काढायला हवा होता असे आज राहुन राहुन वाटते पण ते फार भरभर चालत होते त्या मुळे शक्य नव्हते. संस्कृतीच्या या भावबंधानी शीख समाज हिंदू समाजाशी आजही घट्ट बांधला आहे. एके काळी ज्याने पंजाबात थैमान घातले होते तो दहशतवाद, सुवर्णमंदीरावर झालेलं ऑपरेशन ब्ल्यु स्टार, नंतर झालेली इंदिराजींची हत्या, व त्या नंतर झालेले निरपराध शीखांचे नृशंस हत्याकांड या सार्या कटू घटना ही हे बंध तोडू शकल्या नाहीयेत. ही आजच्या परिस्थिती मधे मोठी धीर देणारी गोष्ट आहे.
परतीच्या रस्त्यावर हा कांगडा किल्ला ही होता पण वेळ कमी होता त्या मुळे पाहता आला नाही दुरुनच एक फोटो घेउन समाधान मानले.

रात्रीचा चिंतपूर्णी चा मुक्कम आटोपून सकाळी भल्या पहाटे देवीचे दर्शन घेतले व नंतर ड्रायव्हर ने आम्हाला पठाणकोट रेल्वे स्टेशन ला सोडले. जी पहिले आली त्या पॅसेंजरने जम्मु गाठले. संध्याकाळी कडक सुरक्षा असलेल्या रघुनाथ मंदीरात रामरायाचे दर्शन घेतले. या मंदीरात एवढी प्रसन्नता जाणवली की आम्हाला आपोआपच त्या संध्याकाळच्या वेळी रामरक्षा म्हणावीशी वाटली. लाउडस्पीकर वर रामचरितमानस वाचन करणारे कथावाचक माइक सुरुच ठेउन कुठेसे गेले होते. आमची रामरक्षा सर्व मंदीर परिसरात ऐकू आली. लोक आम्हा तिघांकडे कुतुहलाने पहात होते.
रात्री सरस्वतीधाम मधे विश्रांती घेउन दुसर्या दिवशी आरामात उठलो, सकाळी साडेदहाचे विमान पकडले व चार वाजता आपली मुंबई.
मला विचाराल तर हिमालयाची आपली एक खास जादूच आहे. त्यात हिमाचल ही तर देवभूमी मानली जाते, सर्वत्र देवभूमी हिमाचल मे आपका स्वागत असे फलक दिसतात. नीरव शांतता सर्वत्र अनुभवण्यास मिळते. मनाला एक तर्हेची भूल पडते. उगाच नाही साधक लोक हिमालयात जाउन साधना वगैरे करत. आकाश मंडप|| पृथ्वी आसन|| रमे तेथे मन... तुकोबा आठवतातच बघा.
(समाप्त).
मस्त लिहिलीत लेखमाला!
समर्पक शब्दांचा वापर अन बरोबर सुंदर छायाचित्रे यामुळे स्वतःच फिरुन आल्याचा प्रत्यय आला.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सहमत
+१
खरच एक फेरफटका मारल्या सारख वाटतय
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
+१
मस्त ...
उ त्त म ! ! ! तुम्ही लिहित
उ त्त म ! ! ! तुम्ही लिहित रहा....
अतिशय रसाळ.. खूप आवडलं.
अतिशय रसाळ..
खूप आवडलं.
- प्राजु
उत्तम
वर्णन आणि छायाचित्रं सुरेखच. संपूर्ण लेखमाला आवडली. 'असूर्यपश्या' हे नावही मस्तच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख
लेखमाला आवडली. ब्लॅक फोरेस्ट (हो तेच ते केकचे नाव असलेले) = असूर्यपश्या
छान!
हा भागही आवडला,
डलहौसीची परत एकदा मनाने ट्रीप झाली.
स्वाती
उत्तम लेखमाला.. चारही
उत्तम लेखमाला..
चारही भागातुन.. तुमच्या वर्णना मुले स्वता:चा सफर केली असे वाटायला लागले आहे.
तुमच्या कडुन अश्याच नव्या लेखमालांचीही अपेक्षा.
-निखिल
सुंदर फोटो आणि वर्णन.
सुंदर फोटो आणि वर्णन.
मस्त
मस्त
सुंदर लेखन आणि जोडीला उत्तम
सुंदर लेखन आणि जोडीला उत्तम प्रकाशचित्रं यामुळे एकंदर लेखमाला फार प्रभावी झाली आहे.
घर बसल्या बसल्या मस्त पर्यट्न झालं.
श्रिकांतराव लिहिते रहा....
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
आभार..
या प्रवास वर्णनाच्या चारही भागाना प्रतिसाद देउन मला लिहिते ठेवणार्या सर्वांचे आभार.
सह्हीच!
मस्त सफर घडवलीत तुमच्यासोबत!
गप्पा मारल्यासारखी साधीसोपी लेखनशैली आणि मस्त फोटो... बहार आली बुवा!!
अवांतरः सायेब, चिरंजिवांचा क्यामेर्यावरचा हात लै साफ दिसतोय! हौशी फोटोग्राफीचा यकांदा कलास लाउन द्या लेकराला
तोच विचार करतोय
तोच विचार करतोय, उन्हाळ्याच्या सुट्टी मधे त्याच्या आई ला वेड लागायचच बाकी राहातं.
हा हा हा....आहे कला, तर
हा हा हा....आहे कला, तर फुलवलेली उत्तम!