मी यंगेज आहे


आमचे गाव जरी मागासलेले असले तरी तिथे शाळा, कॉलेज, थेटर, मॉल अशा करमणुकीच्या ठिकाणांची काहीच कमी नाही. नाना आणि मी एकाच वर्गात होतो शाळेच्या पहिलीपासुन. तसा नाना अभ्यासात काही फार हुशार होता अशातली बात
नाही. पण लेकाचा बरोबर पास व्हायचा. काय असेल ते असो. तो कधी नापास झाला नाही, त्यामुळे तो मठ्ठ आहे असा पुरावा कधीच मिळाला नाही. त्यामुळे त्याला सगळे हुशार समजायचे. आणि त्याच्या बिनबोभाट काही काही हिकमती चालु
रहायच्या. पुढे कॉलेजात गेल्यावर तर काय आणखीनच मजा!

मुलांचे लक्ष कॉलेजमधल्या तासापेक्षा कुठे आणि का असते हे जगजाहीर आहे. आणि ते लक्षात घेवुनच मुली पण तासाला बसण्याचा वेडेपणा करत नाहीत. आणि तरीही जे बसतात त्यांचा तासाला शिकण्यापेक्षा वेगळाच उद्देश असतो. नाना
पण याला अपवाद नव्हता. कट्यावर टोळक्यात बसुन पाखरे न्याहाळण्याचा त्याचा उद्योग आमच्या कॉलेजमधे वर्ल्ड फेमस होता. त्यामुळे काही जण त्याला आदराने डॉ सलीम अली असे म्हणत असत. आमच्या गृपमधे कुणालाही काहीही मदत
करण्यास नाना एकदम तयार.

आंद्या (आनंद) एकदा प्रेमात पडला. पडला कसला हो.. चांगलाच धडपडला. अरे, सांगायचे राहिले.. आंद्या, संत्या, मी, नाना अशी आमची चांडाळचौकडी. संत्या म्हणजे संतोष. याला चारोळी करायचा फार षौक. साधे बोलणे पण चारोळीतच. आंद्या म्हणजे मुलखाचा आळशी. पण अगदी सरळ मार्गाने चालणारा. इतका सरळ की कधी कधी समोर माणसे उभी असली तरी हा सरळ चालत जावुन धडकणार. बोलायला एकदम भारी, पण कृतीची वेळ आली की तोफेत पाणी. तर आंद्या एके
दिवशी, कॅन्टीनमधुन येतांना (त्याच्या मते) चुकुन एका कोमलांगीवर धडकला. तुमचे डोळे फुटले का इथपासुन सुरु झालेला दुहेरी सामना अखेरीस आज मी कॉफी पाजतो, उद्या तु पाज इथपर्यत येवुन एकेरीत बरोबरीत सुटला. आंद्या हवेवर
तरंगत, पायाने समोर येईल ती वस्तु लाथाडत कट्यात दाखल झाला.

नाना, नेहमीप्रमाणे इकडे बघ, तिकडे बघ करत करत आंद्याला म्हणाला 'मग कधी प्रपोज मारतोस?'

आंद्या नेहमी प्रमाणे हडबडला आणि म्हणाला 'कुणाला? काय?'

'त्या डावाला' नानाच्या द‍ृष्टीने प्रत्येक पोरगी डाव

'छे छे.. तसे काही नाही'

'मग बापाचे पैसे काय वर आले.. कॉफी पाजतोस तिला.. च्यायला चौघात एक सिगारेट कधी घेतली नाहीस तु.'

'तसे नाही रे नाना..'

'मग?'

'अरे आपण विचारले आणि तिने नाही म्हटले तर..'

'ती नाही म्हणणारच नाही..'

'पण म्हटले तर...'

'अरे सांगितले ना... ती नाही म्हणणारच नाही..'

'का?'

'ती कुणालाच नाही म्हणत नाही.' नाना आभाळात पहात बोलला.

नंतर चार दिवस आंद्या आलाच नाही.

शेवटी नानाच म्हणाला, 'चला रे जरा आंद्याला पाहुन येवु. गचकला असेल तर जेवण तरी मिळेल'. असा नाना. एवढे असुनही कधी नापास झाला नाही. म्हणुन हुशार. आणि म्हणुनच मी जरी दिवसरात्र त्याच्याबरोबर असलो तरी घरच्यांना
काही आक्षेप नसे. तर मंडळी, असा हा नाना आमच्या सोबत दरदिवशी नित्यनियमाने लेक्चरला दांड्या मारणारा अचानक अतिउत्साही, तर कधी खिन्न दिसु लागला. दोन कश मारल्यावर सिगारेट पुढच्याला द्यायची हा अलिखित नियम
धुडकावुन मधुनच सगळी सिगारेट स्वतःच संपवु लागला. मोकळा कधी बोलायचा नाही, कधी कधी अचानक लेक्चरलाच बसायला लागला. चक्क दाढी व्यवस्थित करुन कपडे नीट घालु लागला. आंद्याचे आता टाळकेच फिरले. एक दिवस आंद्याने घेतला नानाला कोप-यात आणि जी चंपी चालु केली. दोस्ती तोडायची धमकी दिली आणि मग आम्हाला कळले लफडे काय झाले ते.

आंद्या सुन्न मनाने कट्यावर आला आणि बोलला.. अरे नानाला प्रेमरोग झाला.

मग मात्र आम्ही उडालो. उसळलो. गरम झालो. बोंबललो. कोकललो. माणुस जे काही करु शकेल ते सगळे केले. चिकनचिल्ली खावुन गार झालो. आमचा संताप पोटात गेला आणि मग आम्ही आमची प्रचंड अशी सहानुभुती का काय असते ना ती नानाला दिली. त्यामुळे त्याला बीलाचा अजिबात भार वाटला नाही.

आता मात्र आम्ही एकदम रणनीती आखली. आंद्या डिटेल माहिती आणणार होता. संत्या स्पेशल चारोळ्या लिहिणार होता. मी काहि सेटींग लावता येईल का ते पहाणे आणि नानाला त्याचा सिगारेटचा खुराक वेळेवर पोहोचवण्याची मोठी
जबाबदारी उचलली होती. अशी वाटणी झाल्यावर जोपर्यत मोहीम फत्ते होत नाही तोपर्यत कुणीही दांडी मारायची नाही हे नक्की झाले. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागले. नाना आणि मी सिगारेटी फस्त करत राहिलो.

चार पाच दिवस झाले आणि आमच्या मोहिमेला यश मिळेल असे वाटु लागले. कॉलेज सुटले. आंद्याने आणि संत्याने तिला आणि तिच्या मैत्रीणीला गप्पात गुंतवले. नाना तिथे आला आणि आम्ही जरा दुर गेलो. नानाने पाहुन स्मित
हास्य केले. आणि असाईनमेंट झाली का असा असंबंद्ध प्रश्न विचारला. अजुन काही झाली नाही, असे तिच्या मैत्रिणीने सांगितले. आता काय बोलावे, असा प्रश्न पडलेल्या नानाने परत स्मित हास्य केले. छान खळी पडते तुमच्या
गालाला असे म्हणुन मैत्रीण आणि ती पसार झाल्या. नंतर दिवसभर नाना तणतणत होता आणि आम्ही खळ्या मोजत होतो.

संत्याने, रिमभर कागद फाडुन दोन डझन कविता बनवल्या होत्या. सिच्युएशन तयार होत नसेल तर क्रिएट करत होतो. पण ती समोर आली की नानाला काय व्हायचे ते त्यालाच माहित. सगळ मुसळ केरात. घोडे गधडे शेवटी थकुन गेले. पण हा ढिम्म. शेवटी नेहमी प्रमाणे आंद्याने दणका देण्याची गोष्ट करताच दुस-या दिवशी नानाने तिला एकटीला गाठले. धीर करुन तिला कॅन्टीनला घेवुन गेला. आम्ही मागचे पुढचे बाकडे धरुन बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा
झाल्यावर आमच्या वटारलेल्या डोळ्यांकडे पाहुन, नानाने 'माझे प्रेम मान्य करशील का?' असे विचारले.

खाडकन उत्तर आले 'मी यंगेज आहे.'

ठॉक. नाना कोसळला.

गाडीवर बसवुन बारमधे नेला, बील आम्ही कॉन्ट्री भरले. आमच्या बेचाळीस कुळांचा उद्धार झाला. आंद्याने नीट माहीती आणली नाही म्हणुन त्याला झाप झाप झापला. आंद्या मुकाट बसला होता. सांगेल कुणाला? ती वेळ दुःखाची होती.
वादाची नव्हती. अखेरीस यापुढे कोणत्याही डावावर लाईन मारायची नाही असा ठराव एकमताने संमत झाला.

बरीच वर्षे झाली, आंद्या आणि संत्या वेगवेगळ्या दिशेला गेले. नाना आणि मी कधी कधी बसतो निवांत आणि जुन्या आठवणी काढतो.

एके दिवशी परिचितांच्या लग्नाला गेलो होतो तिथे ती दिसली. तिनेच ओळख दाखवली. लहान मुल कडेवर होते. गप्पा मारायला लागली. कॉलेजपेक्षा आता तिची भाषा फार सुधारली होती. मराठी आणि इंग्रजी पण. निघता निघता नानाचा विषय निघालाच.

आसपास कुणी ओळखीचे नाही हे पाहुन तिने विचारले 'नाना कसा आहे?'

'मजेत.'

'हं. तुला माहीत आहे ना? नानाने मला विचारले होते'

'हो. आम्हीच त्याला भरीस घातले होते तुला विचारायला'

'पण नंतर त्याने माझ्याशी संबंधच तोडला. बोलला पण नाही. बोलायला गेले की तुसड्यासारखा वागायचा. चार पाच वेळेला झाल्यावर मी पण मग नाद सोडला'

'आता तु एंगेज आहेस असे स्पष्ट सांगितल्यावर कशाला तो तुला भाव देईल...'

'काय? एंगेज? अरे देवा! अरे मी त्याला यंग एज म्हणजे मी अजुन लहान आहे असे म्हटले होते'

'नानाचे इंग्लिश जरा कच्चेच आहे पहिल्यापासुन.' एवढे बोलुन मी सटकलो.

***

नानाला काही ही हकिगत मी सांगितली नाही. कारण तो आणि मी भेटतो ते फक्त बारमधे. आणि बारमधे नानाला मराठीत बोललेले चालत नाही. त्याच्याबरोबर राहुन माझे इंग्लिशपण जरा कच्चे आहे असे मला वाटायला लागले आहे. या वयात
अजुन एखादा घोळ त्याला काय अन मला काय जरा त्रासदायकच होईल. नाही का?

No votes yet

बिपिन कार्यकर्ते's picture
पुनर्वाचनात पण मजा आली...

पुनर्वाचनात पण मजा आली...


छोटा डॉन's picture
+१

बिकाशी सहमत.
मज्जा आली वाचताना असेच म्हणतो.

बाकी हा लेख नान्याचाच आहे ह्याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही.
आजकाल ई-मेल्सवर काय फिरावे ह्याचा काही ताळतंत्रच राहिला नाही. असो.


संग्राम's picture
असेच म्हणतो

असेच म्हणतो


दिपक's picture
+१

सहमत.


चुचु's picture
(विषय दिलेला नाही)

Laughing out loud


जयपाल's picture
खतरनाक, जबरदस्त , एकदम सह्ह्ही

सांगलीतल्या नाकयावरच्या आठवणी जाग्या केल्यास. तोंडात मावा भरलेला दिप्या असच म्हणायचा
"पप्या ते बघालायस का? स्वाभावन लै चांगल हाय बर का............कुणाला न्हाई म्हनत न्हाई" haahaa


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

प्यारे's picture
(विषय दिलेला नाही)

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

झकासराव's picture
हाय्ला!! कित्येक दिवसापुर्वी

हाय्ला!!
कित्येक दिवसापुर्वी हा लेख मेलवर आला होता. अर्थातच लेखकाच नाव नव्हतच.
त्यावेळी हा लेख भारी आहे हे लेखकाला कस सांगाव हे कळाल नाही.

अवलिया भारी लिहिलय रे. हास्य


श्रीकांत१९'s picture
व्हेरी हेवी....

अवलिया,
व्हेरी हेवी राय्टींग बघा. म्हंजे लई भारी लिखाण !!

श्रीकांत
वाकींग यॅण्ड टाकिंग यींग्लिश इज ए व्हेरी फन्नी ल्यांग्वेज.


राजे's picture
लै भारी रे !

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

लै भारी रे !


विजुभाऊ's picture
मस्त रे नान्या झकास

मस्त रे नान्या
झकास


आयूष्यात नक्की काय कमी पडले ते कळण्यासाठी काय काय मिळवले/मिळाले ते मोजून पहावे....

प्रभो's picture
येस्स येस्स येस्स... झकास

येस्स येस्स येस्स...

झकास नानाष्टाईल लेख...


धमाल मुलगा's picture
>>ती कुणालाच नाही म्हणत

>>ती कुणालाच नाही म्हणत नाही.' नाना आभाळात पहात बोलला.
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
च्यामायची 'सदा सुहागन' कुठली!

>>'नानाचे इंग्लिश जरा कच्चेच आहे पहिल्यापासुन.' एवढे बोलुन मी सटकलो.
इच्चिभनं....जरा सलीम अलीगिरी कमी करुन शेक्सपियरकडं लक्ष दिलं असतं तर?
कदाचित "उ.न.क." आधीच स्थापन झाली असती ना Big smile


राजे's picture
+ १ शब्दा शब्दाला सहमत.

+ १

शब्दा शब्दाला सहमत.


स्नेहाराणी's picture
+२

मस्तच लिहलयं...!


आदि's picture
+१

+१
Laughing out loud Big smile


पाषाणभेद's picture
जबरा!

जबरा!


------------------
मी मराठी! जय मराठी!!
माझी जालवही

खलबत्ता's picture
नाद खुळा..

नाद खुळा लेख. डोळे (हसुन हसुन) पाणावले.
लय म्हंता लय भारी...


देवबाबु's picture
लै भारी.. अफलातुन

लै भारी..
अफलातुन पंचेस..
डॉ.सलिम अली..,कोमलांगी..,बिलाचा भार..,खळी..,४२कुळांचा उध्दार्..,अन् शेवटी 'अरे देवा.. यंग एज...'हा हा हा...
ह. ह. पु.


किशोर's picture
जबरदस्त रे .. लै भारी जमलय

जबरदस्त रे .. लै भारी जमलय Laughing out loud Laughing out loud