ड - डलहौसीचा...(१)
चंबा येथील विष्णू मंदीर पाहून झाल्या वर जरा तिथला बाजार फिरायला निघालो. सौ. ला अर्थातच एकदम उत्साही वाटू लागले. चिरंजीव लगेच कंटाळले, (शेवटी काहीही झाले तरी माझाच मुलगा तो !!
) त्याला म्हटले चल काहीतरी खाऊ या. फिरता फिरता एक गाडीवाला इडिलिंबू- मोसंबी-संत्र यांच्या एकत्रीकरणातून तयार झाली असावी अशी फळे विकतांना दिसला.त्याला विचारले
" ये कौनसा फल है भाई? "
"गलकल !"
" क्या भाव दिया?"
तर म्हणाला "ये बेचने के लिये नही ये तो निचोडने के लिये है."
मी विचारले "तो फिर बेचते क्या हो? " त्यावर तो म्हणाला ये कचालू है ना इस पर निचोडके खाते है. पाच रुपिया प्लेट ! कितने प्लेट दू?"
"देदो एकही, पहले खाके तो देखू कैसा लगता है?"
मग ते उकडलेले कचालू त्याने सपासप कापले व दोन वडाच्या पानांच्या द्रोणात घेऊन त्यावर आमचूर, पुदिन्याची वाळवलेली पूड मीठ अन आणखी दोन-तीन मसाले भुरकवले वर मस्त पैकी ते गलकल पिळून लिजिये साहब म्हणत खायला दिले.
आणि मग मी एक आयडिया केली. चिरंजीवांकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत स्वतःच गलकल-कचालू मिटक्या मारत खायला सुरुवात केली. मला पक्के ठाऊक होते की जर मी त्याला हे खा म्हटले असते तर नको, यक्! ( कार्टा लई च कार्टून पाहतो, कोणते बरे ते? हा ते शिंचे "शिनचॅन", त्याचा इफेक्ट हा!! ) इत्यादि सुरु झाले असते. उकडलेले रताळे+बटाटा+ अळकुड्या असे काहीसे लागणार ते कचालू वर भुरकवलेल्या पुदीना वगैरे मसाला अन गलकल पिळल्या मुळे जामच चटकदार लागत होते. रागरंग बघुन मुलगा हळूच म्हणाला "मला पण दे ना, ए आई, हा बाबा बघ एकटा एकटा खातो." मग त्याने एक फोड खाल्ली मात्र, अन सगळी प्लेट आपणच फस्त केली. मग सौ. आणि माझ्या साठी आणखी दोन प्लेट घेतल्या. गलकल के कचालू एवढे चटकदार होते की खाण्याच्या नादात त्याचा फोटो काढावा असे लक्षातच राहीले नाही.
खाऊन झाल्यावर एका दुकानात त्या प्रसिद्ध "चंबा रुमालांची" सहज चौकशी केली. दुकानदाराने ३फूट बाय ३फूट असे रेशमी रुमाल दाखवले, सुरेख रंगसगती व हिमाचल मधील पारंपारीक चंबा शैली मधे रेशमानी भरतकाम केलेले (रासलीला- राधाकृष्ण वगैरे) ते रुमाल बरेच महाग होते. रू २००० पासुन पुढे!!
"बडे बडे लोग ये रुमाल लेके जाते है और फ्रेम करके बंगले मे लगाते है साहब, आप भी लिजिये." दुकानदाराने माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकली व मला बडा आदमी बनवण्याचा प्रयत्न केला. पण "अभी नही भाई , अभी मै बडा आदमी नही बना " असे म्हणून मी निघालो व चंबाच्या राजाने जतन केलेले संग्रहालय पहायला तेथे जाऊन पोचलो.
उत्खननात मिळालेले शिलालेख, भग्न मूर्ती, होत्याच पण विषेश उल्लेख करावा तो तिथल्या चित्रांचा.
चंबा, मधुबनी, पालमपूर शैलीची ती चित्रं खरेच फार सुंदर आहेत. (अजुन एक दोन शैली आहेत मी विसरलो. चित्रकलेतील जाणकार मी म करांना विनंती की या शैलींच्या चित्रांचे नमुने जालावर कुठे असतील तर प्रतिसादात दुवे द्यावे.) एका चित्रामधे बालकृष्ण आपल्या गोप सवंगड्यां बरोबर लपाछ्पी खेळतोय असे होते. कृष्णावर राज्य! अन गोप सवंगडी कोणी झाडा आड कोणी कुठे कोणी कुठे असे लपलेले आहेत.त्यांच्या चेहर्यावर खट्याळ भाव अन कोणीच सापडत नाही म्हणून कृष्ण वैतागलेला!
फोटो काढायला इथेही मनाई होती
.
संग्रहालय पाहून झाल्यावर परतीच्या वाटेवर पून्हा रावी नदीचा साथ होताच. भूक लागली होती. नदी काठी बसुनच मस्तपैकी भरपूर असली घी घातलेले पराठे हाणले. परत एकदा बॅकवॉटर चे एक मस्त दर्शन झाले.

चंबाहून परतीच्या वाटेला लागलो. उन्हे उतरू लागली तसा गारवा वाढायला लागला. रस्त्यालगत भात शेती दिसत होती. भात तयार होउन कापणीला आले होते. उतरत्या उन्हात डोंगर उतारावर होणार्या भातशेतीचे हे एक दृष्य. मला फोटोग्राफी जेमतेमच येते, नाही तर हे आणखी सुंदर आले असते. फोटोशॉप तज्ञ मी म.कर मंडळी तुमचा हात चालवा बघू अन प्रतिसादा मधे टाका सर्वांसाठी.

परतीच्या वाटेवर डायवर साहेबांना च्या प्यावासा वाटला, मी तर काय च्या प्यायला तयारच होतो थंडीच तशी मस्त होती ना. डायवर साहेब म्हणाले देवी मंदीर के पास लेंगे. पण देवी मंदीर वेगळेच होते. या फोटोत दिसतेय तसे.

तिसर्या दिवशी जरा लवकर उठलो, डायवर साहेबांनी आज जरा जास्त पॉइंट दाखवायचे ठरवले होते. त्या नुसार पहिले चर्च पहायला गेलो. तिथे सकाळची शाळा भरली होती, थोडे उशीरा येणारे विद्यार्थी व त्यांना सोडायला आलेले पालक फादर ना गुड्मॉर्निंग करत होते, तेही खोटे खोटे रागावत मुलांना आत घेत होते. आम्हीही एक गुडमॉर्निंग ठोकला व चर्च पाहायला आत घुसलो. पानगळीच्या मोसमात गेलो असल्यामुळे नैसर्गिक रित्या फुललेली फुले आम्हाला कुठेच दिसली नाहीत
पण चर्च च्या आवारात छान बाग होती. मुलगा मला फोटो काढू दे म्हणून मागे लागला होता, म्हटले काढ या फुलांचे फोटो.
हे काही त्याने काढलेले फोटो.



चर्च पाहून आम्ही निघालो अन सामोरी आली ती "ग्रीन व्हॅली"!! अगदी नावाप्रमाणेच हिरवीगार!! सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे दृष्य आणखीच छान दिसत होते. बर्फाच्छादित पर्वतांची रांग इथे पहिल्यांदा दिसली, अगदी लांबवर.

डोंगरउतारावर भाताची शेते या रस्त्यावरही होती.

या सगळ्याच परिसरात धूळ जवळ जवळ नाहीच. आकाश कसे निळेभोर दिसते. सूर्यप्रकाश मात्र फार डोळ्यांवर येतो.गॉगल हवाच, त्वचाही लगेच रापते.
मग आले ते जगदंबे मंदीर! नीरव शांतता, मधूनच कुणा भाविकाने केलेला घंटानाद अन तो ऐकायला समोर उभा साक्षात भगवान शिवशंकर!


खजियार हे डलहौसी जवळचे सर्वात सुंदर गाव. खरेतर एक दिवस तरी तिथे जाउन राहायला हवे.
आता फार अंतर नाही राहिले. आपणही तिथे पोहचू. लवकरच.
क्रमशः
जबरदस्त ...
फार छान फोटो आणि तितकेच सुंदर वर्णन ...
जायलाच हव एकदा ...
वा वा
छान वर्णन आहे. वाचतो आहे. तेवढाच तुमच्याबरोबर आभासी प्रवास
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
जितके छान फोटो तवढच मस्त
जितके छान फोटो तवढच मस्त वर्णन..
मझा आ गया|
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
सुंदर. पहिला भाग वाचायचा
सुंदर. पहिला भाग वाचायचा राहिला होता तो ही वाचला.
वर्णनही मस्त चटपटीत!
मस्त सुरु आहे.
मस्त सुरु आहे.
सुरेख..
वर्णन सुरेख, आवडले..
स्वाती
वर्णन व फोटो ........... लै
वर्णन व फोटो ........... लै भारी राव.... आवडले बघा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
दोन्ही भाग वाचले.. वर्णण मस्त
दोन्ही भाग वाचले..
वर्णण मस्त चालु आहे..
तसेच काही फोटो क्लासच...
ह्या लेखातला पहिला फोटो आवडला...
पुढचा भाग लवकर टाका
-निखिल
सुंदर... खूप मजा आली असेल ना?
सुंदर... खूप मजा आली असेल ना? लिहिताही छान...
ते बॅकवॉटरचे फोटो छानच...
पुढील भाग ???
पुढील भाग ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बैलाला पराणी....
टाकतो, लवकरच टाकतो, संपादकांनीच आता बैलाला पराणी टोचली आहे
, न लिहून जातो कुठे? घेतलाय लिहायला.
मस्त....
श्रीकांतराव,
मस्तच सहल चालु आहे. आवडला, हा ही भाग आवडला
बाकी, तुमच्या चिरंजीवांची कॅमेर्यावर अंमळ हुकुमत दिसते, मॅक्रो वगैरे सेट करुन फुलाचा क्लोज अप काढलाय वाटतं.
>>"मला पण दे ना, ए आई, हा बाबा बघ एकटा एकटा खातो."

>>पारंपारीक चंबा शैली मधे रेशमानी भरतकाम केलेले (रासलीला- राधाकृष्ण वगैरे) ते रुमाल बरेच महाग होते. रू २००० पासुन पुढे!!
अगाबाबो....रुमाल दोन हजारापासुन पुढे??? काय सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम करतात काय?
आपल्या मराठी पैठणी सारखे
आपल्या मराठी पैठणी सारखे सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम जरी करत नसले तरी आपल्या देशातल्या पारंपारिक कलेचा नमुना म्हणून ते चंबा रुमाल अनमोल आहेत. शेवटी अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच संस्कृती घडत असते, खरे की नाही?
नक्कीच!!
माझा हेतु त्या गोष्टीला वाईट म्हणण्याचा अजिबात नाही. फिकीर नॉट!
ही तर खरीखुरी कलाकृती! नो प्रॉब्लेमो स्सार!
फक्त एक बाब आहे, पर्यटन क्षेत्री हल्ली अव्वाच्या सव्वा किंमती आकारल्या जातात, पण तीच वस्तु त्या नाव झालेल्या गावापेक्षा थोडं आडबाजूला पाहिलं तर बर्यापैकी स्वस्तात मिळते.
असो,
मोठमोठे लोक फ्रेमा करुन घरात लावणार म्हणल्यावर काय राव, संस्कृतीचा ठेवा नसलेल्या वाकडातिकडा घोडा, त्याच्या पोटात पंजा वगैरे गोष्टीही लाखलाखभरात खपतातच की
मस्त.
मस्त आहे फोटो आणि वर्णनही.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.