"चॅक्क! त्यो न्हाई देत. शेतीचा टुकडा लिव्हुन मागतो चारचव्वल मागिटले तरी." धायगुडे हताशपणे म्हणाला.
"जाव द्या! हुईल काय व्हायचं त्ये. काडतो कायतरी युगत." असं म्हणुन तो परत कान खाजवत सुन्नपणे बसला.
----------------------------------------------------------------------------------------------
रात्री पडल्यापडल्या डोक्यात चक्रं चालुच होती..कुणाकडुन काय मदत मिळंल का, कुठं जावं, कुणाला मागावं ह्याची चाचपणी करता करता अचानक तुकामामाचं नाव आठवलं.तुकामामा तसा सख्खा नाही, पण बंड्यावर त्याचा भारी जीव. तुकामामाच कायतरी मदत करेल ह्या विचाराच्या समाधानात धायगुड्या उद्याच मामाकडं जाऊ म्हणत झोपुन गेला.
दुसर्या दिवशी येरवाळीच सगळी कामं आटपून बंड्या दुधेबावीला तुकामामाकडं जाऊन थडकला. अवचितच बंड्याला आलेला बहुन तुकामामा जरा गडबडला..
"आरं ये ये ये...कसा हैस रं लेकरा?, आसा आवचितच आलासा, काय समदं बरं हाय न्हवं?" मामानं सरबत्ती सुरु केली. तसा हाश्शहुश्श करत धोतराच्या सोग्यानं घाम पुसत पडवीलाच टेकून बंड्या जरा हसला.. "आरं हो हो हो...मला आत तरी यिऊ देशीला का न्हाई? समदं बैजवार हाय बघ, नगं घाबरु!" असा धीर देत सप्पय बसला.
चहापाणी झाल्यावर इकडतिकडच्या गप्पा करता करता, बंड्यानं मुद्द्याला हात घातला, "मामा, वाईच जरा नड व्हती..काय दोनेक हजाराची जुळनी व्हईल का?" असं म्हणुन सगळा पाढा वाचला.
तुकामामा येरबाडलाच.. म्हणला, "गड्या, तु बी असा टाईम काडून आलायसा! ह्या साली पावसानं कशी वढ दिलीया पघतुयास न्हवं? त्यात सुंद्रीचं सनवार करायचं, जावयबाप्पू येनार म्होरच्या म्हैन्यात..गाठीच्या सगळ्या पत्त्या त्यातच उडनार की रं!"
असं म्हणल्यावर बंड्याचा चेहरा काळवंडलाच.."मग न्हाई होत म्हन्तासा?"
तुकामामालाही जरा गलबलल्यागत झालं. तंबाखू मळतामळता विचार केला अन म्हणला,"बंड्या, आसं कर, ही आपली दुभती बांडी गाय जांभुळगावच्या बाजारात काढून टाक. काय यील तो पैका ठिव तुझ्याकडं. जमल तसं आपन परतीचं बघु! काय?"
च्च...पिचकारी मारुन मान हलवत बंड्या म्हणाला, "काय मामा, आरं घरचं धन त्ये! आसं बाजारात कसं काडायचं? आन काडायचंच तर तुज्या गायीपरास माझी शेरडं इकतो की रं! इतका कशाला रं जीव लावतु मला? र्हाव दे, मी आणि कुठं जुळणी व्हती का बघतु." असं म्हणुन तो उठलाच. मामाच्या पाया पडायला लागला, तसं मामा म्हणाला, "आरं, आलाय तसा र्हा की रं, आत्ता कुटं उनाचं निगालास? चल जेवायला बसु.."
"नगं मामा..ज्येवायला यीन नंतर कदी. सद्या जरा ह्या जुळनीचाच घोर लागलाय! तेच बघतु जरा काय जमतंय का." म्हणुन निरोप घेऊन बंड्या निघाला.
गावाकडं परत येता येता डोकं भिरभिरायला लागलं तसं वाटेत नदीकाठी थांबून त्यानं जरा तोंड खंगाळलं, हातपाय धुतलं तसं गार पाण्यानं जरा बरं वाटलं. तिथंच एका झाडाच्या सावलीत बंड्या सैलावला. हाताला चाळा म्हणुन आसपासचे खडे नदीत मारतामारता विचार चालु होतेच...तेव्हढ्यात एकदम 'बऽऽम्म भोले...' असा आवाज ऐकुन तो दचकला. कोण वराडलं म्हणुन वळुन पाह्यलं तर रीपेवरच्या झाडीच्या सावलीत एक बैरागी ठाणं जमवुन बसला होता.. "बच्चा, दगड संपायचं न्हाईत, का नदी भरुन जायची न्हाई! चिंता काय अशी सुटती का? " असं बैराग्यानं म्हणल्याबरोबर बंड्या बुड झटकत उठलाच... हात जोडुन साधुबाबापाशी गेला. त्याला नमस्कार करुन बसता बसता सोबतच्या कुबडी कमंडलुलाही हात जोडुन घेतले आन तिथंच बुवाच्या पायाशी आलकट पालकट घालुन बसला.
साधु म्हणाला, "आव बच्चा..आशी चिंता करुन ती सुटती का? शांत हो बेटा.. घे प्रसाद घे!" असं म्हणुन झोळीतुन मळकटलेला खोबर्याचा एक तुकडा त्यानं बंड्याच्या हातावर ठेवला.
सदर्याला खोबरं पुसुन ते तोंडात टाकत बंड्या बोलता झाला, "काय करु म्हाराज, सगळीकडनं धडका मारुन पाह्यलो की..रस्तंच घावंनात आता!"
"बऽऽम्म भोले....देवाला शरन जा बच्चा! तुजी नड दूर व्हायाच पायजे."
"पन कसं म्हाराज? द्येव बी गरीबाचा न्हाई र्हायला.."
"खामोऽश..द्येवावर इश्वास ठिवावा मान्सानं. भलंच होतंय बाबा!" असं म्हणुन साधुनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "पैका काय येतो न जातो...द्येव मत्वाचा. पैकाच पायजे न्हवं तुला? "
"व्हय की जी.." असं म्हणुन धायगुड्यानं सगळी रामकहाणी साधुला ऐकवली. तसं साधुबाबा दाढीवरुन हात फिरवत हसला, आणि म्हणाला, "मी हाय ना? नगं भिऊ आता! सगळं येवस्तित करुन दिल्याबिगर मी शांत न्हाय बसायचु!"
"कसं म्हाराज?" बंड्या म्हणला.
"तुजा इश्वास हाय? तर आपुन तोडगा काडू..दशरत राजाच्या पुत्रकामेश्टी यज्ञापरास म्होटा तोडगा काडू.." साधु बोलला.
बंड्या उतावळाच झाला...दोन्ही हातानं तोंडात मारुन घेत म्हणाला, "चुकलं म्हाराज,चुकलं माजं. द्येवाला रागाच्या भरात वाकुडवंगाळ बोल्लो! काय कराय पायजे?"
साधु मंद हसत म्हणाला, "हा घ्ये माजा कमंडलु..जा जरा पानी भरुन आन."
लगोलग कमंडलु उचलुन धायगुड्यानं नदीकडं धाव घेतली. चांगला खंगाळुन, मग पाणी भरुन आणलं, साधुच्या पायाशी कमंडलु ठेवत पुन्हा नमस्कार करुन सप्पय बसला.
साधुनं चुळकाभर पाणी हातात घेतलं आणि मंत्र पुटपुटत शिंपडायला सुरुवात केली..म्हणाला, "बच्चा, आज सातीआसरा तुज्यावर खुश हैत दिसतंय. तुला मदत कराया त्यांनी मला आत्ता इनंती क्येली. अन भेट बी धाडली..ही घ्ये!"असं म्हणुन हवेतुन हात फिरवत शंभराची नोट काढुन बंड्याच्या हातावर टेकवली.
बुवा भलताच पावरबाज दिसतोय, डायरेक शंभराची पत्ती हवेतुन काढली असा विचार करुन बंड्या साधुच्या पायावरच लोटांगण घालुन पडला, म्हणाला "म्हाराज, काय तुमी म्हनाल तसं करु.. तोडगा काडा, लै उपकार व्हत्याल"
मंद हसत साधु म्हणाला, "आरं तुलाच मदत करायला भोलेनाथानं मला हितं धाडलं असनार! मग त्याबिगर मी कसा जानार हितुन? बरं, तोडगा करायचा तर जरा खर्च व्हनार, तुज्या घरातच मला यावं लागंल..दोन म्हैन्याचं व्रत करावं लागंल..जमत आसलं तर सांग!"
डॉक्टरच्या बोडक्यावर ढीगभर पैसा ओतण्यापेक्षा देवदेवस्कीला असा किती खर्च होईल हा विचार करुन बंड्या गडबडीतच म्हणला, "द्येवाचं काम, त्याला कशाला न्हाई म्हनु? चालतंय की..जमवु आपुन! चला म्हाराज, आसंच चला घरला, आजच सुरु करु द्येवद्येव."
तसं साधुबाबा पुन्हा दाढीवरुन हात फिरवत हसला. म्हणला, "आशी घाई करुन उपेग न्हाई बच्चा! उद्याचा दिवस चांगला हाय. मी उद्या दुपारी येतो तुझ्या घरी."
कसनुसं तोंड करत बंड्या म्हणाला,"आसं म्हंता? बरं तसं करु...उद्या ज्येवायच्या टायमाआधी गाडी जोडुन येतोच बगा तुमास्नी न्ह्यायला! हितंच आसशीला न्हवं?"
साधुनं मान डोलावत पुन्हा एकदा बम्म भोले केलं आणि हवेतुन चार चिमट्या अंगारा काढून बंड्याच्या हातावर ठेवला..म्हणला, "जा बच्चा! काय काळजी करु नको. आज दिवेलागनीला हा अंगारा घरात सगळ्यांना लाव...पोटुशी हाय तिच्या पोटावर बी लाव! भोलेनाथाला समद्यांची चिंता!!! जा आता...मला समाधी लाऊ दे!"
पुन्हा एकदा लोटांगण घालुन बंड्या खुशीतच घराकडं निघाला.
जाताजाता जांभुळगावाकडं वाट वाकडी करुन बाजारातनं शेवपापडी, थोडा म्हैसुरपाक बांधुन घेतला, आन आनंदात भर दुपारचंच नवटाकभर मारुन मग घरी गेला. आणलेलं सामान घरात देऊन पडवीतुनच गुरकावला..."उद्याधरनं आपल्याकडं सादुम्हाराज येनार हैत. दोन म्हैनं द्येवद्येव करायचंय, घर जरा आवरुन सारवुन ठिवा. आमची लाज नगा काढूसा!" आणि तिथंच गपगार झोपुन गेला.
संध्याकाळी रिवाजाप्रमाणं सगळी मंडळी एकेक करुन पारावर जमली. जो तो आपला धायगुड्याकडं बघतच बसला...गडी काल र्हिंदिसा चेहरा करुन बसला व्हता, आन आज मस कंट्री संत्र्याचं भपकारं सोडत लावण्या गुणगुणत बसलाय! कुणाला काही कळंनासंच झालं.
भैर्यानं त्याच्या पाठीत एक गुच्ची टाकली आणि म्हणाला, "काय रं भाड्या, काल यवडा रडत व्हतास आन आज ल्येका दिवसाचंच इमान हुन आलायसा! काय कुटल्या झागीरदारानं तुला दत्ताक घ्येटला का काय रं?"
तसं पाठ चोळत धायगुड्या म्हणला, "झागीरदाराचं काय कवतिक? भोलेबाबा म्हाराजानं किरपा क्येली आमच्यावर!"
"म्हंजी रं?" तान्या पुढं सरकुन विचारता झाला.
मग बंड्यानं सगळी कहाणी बैजवार तिखटमीठ लाऊन सांगितली. म्हाराजानं कसं हवेतुन थोरली नोट काडुन दिली..जाताना कसा आंगारा दिला सगळं सांगुन झालं.
ऐकता ऐकता तान्याच्या तोंडाचा वासलेला आ तसाच र्हायला..तोंडात जाणारं चिलट थुंकत तो म्हणाला, "आगागागागागा...भलताच पावरबाज दिसतोय गडी! आख्खी थोरली नोट काडली? पोचल्याला बुवा दिसतुया गड्या!"
आता तान्यानं कौतुक केलं म्हणल्यावर त्याला आडवं लावलंच पाहिजे ह्या नियमानं भैर्यानं हात उडवले, "आरं ह्याट्ट! भुरटं आसंल कुनीतरी!"
जन्यानं विचारलं, "आरं पन शंबराची नोट? ती रं कुटुन काडणार अशी हवेतुन?"
भैर्यालाही खरं म्हणजे पटत होतं, पण तान्याला आडवं लावलं पाहिजे म्हणुन तो बोलला होता.
अशीच उलटसुलट चर्चा पार वाढूळ रंगत गेली. शेवटी, आपापल्या अडचणी बंड्याचा वशिला लाऊन म्हाराजाकडुन दूर करुन घेऊ असं ठरवून बैठक मोडली.
धायगुड्या घरात उद्याची तयारी करायला सांगुन, लवकरच जेवुन गुडुप झोपला. बाकीच्यांच्या डोक्यातही साधुम्हाराज पक्का बसला होता. आपापल्या घरी जाताना ज्याच्यात्याच्या नजरेसमोर हवेत तरंगणार्या नोटा दिसत होत्या. कुणाचं काय तर कुणाचं काय अडलेलं काम ह्या पावरबाज बुवाकडुन कसं करुन घ्यावं ह्या तंद्रीतच सगळ्यांची रात्र सरु लागली.
--------------------------------------------------------------------------------------------
क्रमशः
{घ्या!!!! आहेच का पुन्हा अजून}
घ्या!!!! आहेच का पुन्हा अजून क्रमशः!!!!
आता पुढच्या भागासाठी किती दिवस वाट पाहायला लावणार आहेस???
{पुढे??}
चौथ्या भागाची 'शिकार' करू नका नाहीतर सगळं मुसळ 'माती'त जायचं!
{आणि आमचा अद्भुत खेळात अंत}
आणि आमचा अद्भुत खेळात अंत व्हायचा!!! क्काय???
{धम्या भाड्या टाक बे लवकर}
धम्या भाड्या टाक बे लवकर पुढचा भाग....
मस्त जमलय हा पण
{लै भारी रे लिहीले}
लै भारी रे लिहीले आहेस.
ग्रामीण कथेचा बाज व लेखन स्टाईल खरोखर बेस्ट.
जसा कामातून वेळ मिळेल असा काढ व लिहीत राहा वाचतो आहे..
राजे.
Hope is a good thing...
{धमाल सर ... धमाल सर ... लेखणी}
धमाल सर ... धमाल सर ... लेखणी अशी म्यान करुन नका ठेवत जाऊ ..
जबरा रे
{झक्कास}
मस्त जमलाय भाग.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{धम्या ल्येका, आजकाल माझंबी}
धम्या ल्येका, आजकाल माझंबी खिसं कोनीतरी कापल्यागत झालंया पग. इड्या फुकून फुकून उडालेल्या चिनग्यांनी घोतराचा पार इस्कूट केलाया आन नविन कापडं तर सोड पन साधी गाय छाप पन घेन्याची पत राहीली नाही पग आजकाल. कारभारनीची कायबाय घ्यायाची टकळी कायम सुरू र्हातीया. पोरांच्या शाळंत काय बाय मागत्यात तवा लय लाज वाटती आपली. सालं मरूस्तवर मजूरी करूनशान देकील सावकाराकडं हात पसराया लागतो. आन त्यो सुक्काळीचा तर हाय त्या जमिनीच्या तुकड्याक नजर लावून बशेल हाय.
काय कर्नार सांग गड्या तू? नाय म्हंजे तुझी त्या गोसावड्याशी लय वळख झालेली दिसतीया. तवा तू कायतरी झेंगाट करूनशान आपलं बी पैशाचं काम करूं दे ना. नाय म्हनू नगो. एकाच पारावरती बसनारी दोस्त मंडली आपन सारी. काय? लक्षात ठिव. आन साधू म्हाराजांना बी माझ्यावाला दंडवत सांग.
बाकी काय तंबाकू आसल तर डब्बल घे बाबा. त्यांड लय कडूजार झालंया.
(आन बाकी गोश्टीत काय ससपेन आसलं तर त्या हनम्याला आजाबात सांगू नगं. लय बाराचं हाय त्ये. सत्रा ठिकानी त्यांड वाजवत जाईल त्ये. आन साधूबाबांची पंचाईत करूं टाकलं.)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{व्वा!!}
मस्त जमला आहे पुढचा भाग कधी बरं?
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
{मस्त रे ..}
आता पुढच्या भागाची जास्त वाट बघायला लावू नका
{लिव्हा...लिव्हा....लिव्हा...!}
ग्रामीण कथेचा बाज अगदी अगदी जमलाय.
लिहा, पूढचा भाग पटकन लिहा...!
{आंगाश्शी}
आता कशे लिवते झाले मालक. लवकर लिवा. शंबराची नोट नी उदी हिते चिमित्कार सप्पला न्हाय न्हवं. मग आता बुवा आलाय म्हंजी चिमित्काराला आदार जाला.
>>"हा घ्ये माजा कमंडलु..जा जरा पानी भरुन आन.
का रं बाबा. सादुबाबाला सोत्ताला भरता येत न्हाय व्हय. आन् तो आदी रिकामा कसा काय क्येला त्येनं, नक्की काय क्येलं?
>>"खामोऽश..द्येवावर इश्वास ठिवावा मान्सानं. भलंच होतंय बाबा!" ...
सादुबाबा काय सत्रुघन सिन्नाचा शिष्य हाय काय रे? 'अबे खामोश'.
>>भलताच पावरबाज दिसतोय गडी!
वार्यावरची वरात नंतर बर्याच दिवसांनी ऐकला हा शद्ब. पावरबाज!!!!!!!!!!!. लै भारी.
आता चला पटापट मालक. चालते व्हा...
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{आता काय नवा चिमित्कार करावा}
आता काय नवा चिमित्कार करावा बर म्हंजे हे बेनं फुडचा भाग लौकर ल्हिल
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{तेला }
पोकलवाडीत न्ह्याचा आनी पोकल बांबुचे फटके द्याचे. मग लिवन तो जट किनी.
धमु हा भाग देखिल मस्त जमवलायस
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{ज्जे बात !! येउ दे पुढचे भाग}
ज्जे बात !!
येउ दे पुढचे भाग आता पटापटा. आज संध्याकाळी २ भाग येउ देत.
{चांगलं चाल्लंय}
हं चांगलं चाल्लंय.. मदी मदी येळ काडून फुडचं लिवा की राव.. वाचतोय
-ऋ
-ऋ
{लय भारी}
लय भारी
{वाचतोय...}
वाचतोय...