जिंदगीसे छुटकारा - २ (अंतिम)

0
0

भाग १ - http://mimarathi.net/node/857

मीना पहिल्यांदा मला भेटली तेव्हा जेमतेम १६-१७ वर्षांची होती. ती कुणाची कोण ते कुणालाच माहिती नाही, बहुतेक तिला पण आठवत नसावं. ती मुळात रस्त्यावरची भटकी (होमलेस). पायाला चक्कर लागल्यासारखं भटकता भटकता एक दिवस रेल्वे स्टेशनावर पोहोचली अन तिथंच स्थिरावली. रेल्वे स्टेशनवरचा शेवटचा प्लॅटफॉर्म तिचं घर झालं. तिच्यासारखीच तीस चाळीस मुलं मुली तिथं होती त्यांच्यात ती रमली.

इतर मुलांबरोबर ती पण रेल्वेगाड्यांमधे जाऊन पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, जुने पेपर वगैरे भंगार गोळा करणं, प्रवाशांना छोट्या स्टेशनवर गाडी थांबलेली असताना पटकन पळत जाऊन प्लॅटफॉर्मवरच्या फेरीवाल्यांकडुन पेयं, खाद्य पदार्थ वगैरे आणुन देणं, झालंच तर रेल्वेचे डबे झाडणं वगैरे कामं करु लागली. त्याबदल्यात कुणी तिला एक-दोन रुपये देई, झालंच तर कुणी उरलेलं अन्न देई. पैसे बहुतेक जवळ टिकत नसत. बहुतेक सगळ्या मोठ्या स्टेशनांवर दादा लोक असतात, ते अश्या मुलांकडचे पैसे हिसकावुन घेतात. त्यातुन उरलेच तर पोलिस पकडतात अन रिमांड होमला पाठवतात त्यातुन सुटण्याकरता खर्ची पडतात.

असं तिचं आयुष्य सुरु झालं. मी कामानिमित्त रेल्वे स्टेशनला जाई तेव्हा तिथल्या मुलांना चहा-पाव देत असे. त्यामुळे तिथली मुलं ओळखीची झाली होती. बर्‍याचदा ती मला या गाडीत चोरी झाली आहे, त्या गाडीवर दरोडा पडला अश्या बातम्या पण देत. अश्याच एका सफरींमधे मीनाची अन माझी गाठ पडली अन नंतर पुन्हा पुन्हा पडत गेली.

पण त्यानंतर काही दिवसांनी मला मीना दिसली अश्रफच्या गाडीवर. अश्रफ मुळचा बुधवारातला. त्याची आई तिथंच धंदा करता करता खपली होती. अश्रफ पहिल्यांदा मला तिथंच भेटला होता. तो तिथंच फुटपाथवर चपला विकायचा. नंतर त्यानं पैसे साठवुन एक हातगाडी घेतली अन स्टेशन भागात धंदा करायला लागला होता. त्याच्या गाडीवर मी मीनाला अश्रफ बरोबर पाहिलं. "अरे मीना! तु यहां क्या कर रही है," मी विचारलं अन तिनं लाजुन मान खाली घातली.

"भैय्या हम शादी करनेवाले है," अश्रफ म्हणाला होता. त्याचा फुललेला चेहरा, मीनाचे सलज्ज भाव सगळं बघुन खुप बरं वाटलं होतं तेव्हा. महिन्याभरानं दोघांनी शादी केली - सकाळी मशीदीत जाऊन कबुलाकबुली करुन अन दुपारी देवळात एकमेकांना हार घालुन तेव्हा पण मी तिथंच होतो. त्यानंतर त्यांना मुलगी झाली तेव्हा पण मी त्यांच्याबरोबर होतो अन त्यानंतर दोन एक वर्षांनी आज मीना परत माझ्यासमोर ही अशी उभी होती... हडकलेली, खंगलेली, रोगट दिसणारी, धंद्याला उभी.

बरेच प्रश्नचिन्ह डोक्यात होती. सरळ मीनाला गाडीवर घेतलं अन स्टेशनवर गेलो. तिथं चहा पीता पीता तिला मोकळं केलं अन सगळं उलगडत गेलं. मुलगी झाल्यानंतर अश्रफ सारखा आजारी पडायला लागला होता. अचानक खंगायला लागला होता. शेवटी मीनानं त्याला ससुनमधे नेलं होतं अन बर्‍याच तपासण्या झाल्यावर त्याच्या आजाराचं निदान झालं होतं - तो पॉझिटीव्ह होता. डॉक्टरांनी त्याला जेमतेम वर्षभर आयुष्य असेल असं सांगीतलं होतं पण डॉक्टरांचा अंदाज चुकला होता. अश्रफ त्यानंतर जेमतेम आठ-नऊ महिने जगला आणि त्यानं जगाचा निरोप घेतला होता.

अश्रफ गेल्यामुळं मीना अन तिची मुलगी परत उघड्यावर आले होते. महिनाभर मीनानं कसाबसा काढला होता पण त्यानंतर जवळचे सगळे पैसे संपले अन भाड्याचं घर सोडायची वेळ आली होती. घराशिवाय रहाणं काय असतं हे चांगलंच अनुभवलेल्या मीनाला तिच्या मुलीला तेच आयुष्य द्यायचं नव्हतं अन म्हणुनच शेजारच्या फमिदाच्या बरोबर तिनं पण रोज धंद्याला उभं रहायला सुरुवात केली होती.

हे ऐकलं अन सुन्न झालो क्षणभर. भानावर आलो तेव्हा पहिला प्रश्न डोक्यात आला की अश्रफ जर पॉझिटीव्ह होता तर मीना अन त्यांची मुलगी पण असु शकतील. क्षणात निर्णय घेतला अन तिला म्हणलं चल बरोबर. तिच्या घरी गेलो, मुलीला बरोबर घेतलं अन तसाच परत ससुनला आणलं. तिथल्या एका डॉक्टर मित्राशी बोललो अन रातोरात त्यांना अ‍ॅडमिट केलं.

दोन दिवसांनी डॉक्टर मित्राशी परत बोललो तेव्हा त्यानं ती भयानक बातमी दिली. मीना पण पॉझिटीव्ह होती पण सुदैवानं तिची मुलगी लागण होण्यापासुन बचावली होती. डॉक्टर मित्रानं मीनाची अर्ली स्टेज असल्याचं सांगुन दिलासा दिला अन तिला ट्रिटमेंट करेन असं आश्वासन पण दिलं. नंतर परत मीनाशी बोललो. ती हमसुन हमसुन रडली. बरंच समजावलं पण ती कोलमडुन पडलेली होती. "अब मेरी बच्ची कैसे जियेगी," एव्हढच ती परत परत विचारत होती.

अन दोन दिवसांनी कळलं, येरवड्याला एका बाईनं मुलीचा खुन करुन आत्महत्या केल्याचं. धास्तावुन मी मीनाच्या घरी धाव घेतली अन ती कुशंका खरी ठरली. ती बाई म्हणजे मीनाच होती. मुलीच्या अंधार्‍या भवितव्याला धास्तावुन तिनं मुलीचा सुरी भोसकुन खुन केला होता अन त्यानंतर फास घेऊन स्वतः पण आत्महत्या केली होती. बातमी कळल्यावर अश्रफचे बुधवारातले मित्र, मीनाचे स्टेशनवरचे मित्र-मैत्रिणी धावले, त्यांनीच अंत्यविधी केले. मी मात्र सुन्नपणे वावरत होतो.

मीनाचे अंत्यविधी सुरु होते तेव्हा अश्रफच्या आईची धंद्यातली मैत्रिण चन्नम्मा माझ्याजवळ आली. थकलेल्या चन्नम्मानं माझ्या पाठीवर हात ठेवला अन म्हणाली, "बेटा गम मत कर. गम करनेसे जो गया वो तो नही आएगा. यही होना था हो गया." मी तिला विचारलं ती एव्हढ्या शांतपणे हे सगळं कसं स्वीकारु शकते त्यावर ती उत्तरली, "बेटा जब हम जैसी औरते धंदेमे आती है तब हमारे सब संगी साथी छुट जाते है. और तब दो ही साथी रहते है - एक होती है बेबसी और दुसरी होती है बीमारी. बुढापेसे तो हम मरते नही. बीमारीसे सही लेकिन जब मरते है तब जिंदगीसे छुटकारा तो मिल जाता है."

{प्रतिक्रिया सुद्धा देणं कठीण}

प्रतिक्रिया सुद्धा देणं कठीण होतंय Sad

{चन्नमा}

चन्नमा बरच काही सांगुन गेली. जीवनाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{:(}

इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

Sad छ्या! सकाळी सकाळी वाचायलाच नको होते.. खूप खिन्नता आली.. असो.
लेखन नेहमीप्रमाणे प्रभावी

-ऋ


-ऋ

{+}

सहमत... असं म्हणतानाही थोडा हादरलोच!!!

{इतकेच मला जाताना, सरणावर कळले}

इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

या ओळीही आज सकाळीच वाचल्या होत्या.. नि नंतर हे!!!

Sad

चटका लावून गेली मीनाची व्यथा.............

{(विषय दिलेला नाही)}

Sad

{पुणेरी}

"बीमारीसे सही लेकिन जब मरते है तब जिंदगीसे छुटकारा तो मिल जाता है." या ओळीने ......भो़कं,भोकं पाडली ह्रिदयाला.

भिमराव पांचाळेंच्या गझल मधील एक शेर आठवला

हासण्याचा खुळा प्रयास नको
आसवांना उगाच त्रास नको
मॄत्यु जामीन होऊनी यावा
जिवनाचा तुरुंग वास नको


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{काय लिहाव...}

सुन्न करणारं....

{सकाळीच मन सुन्न झाले.}

Stare सकाळीच मन सुन्न झाले.

{(विषय दिलेला नाही)}

Sad

{ जिंदगीसे छुटकारा तो मिल जाता है}

खरं आहे...

{अर्रं !}

अर्रं !
Sad


Hope is a good thing...

{:(}

सुन्न!

{आजचा दिवस सेंटिमेट होण्याचा}

आजचा दिवस सेंटिमेट होण्याचा दिवस आहे असे वाटते.
एकदम तीन चार लेख मनाला लागून गेले.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{एक होती है बेबसी और दुसरी}

एक होती है बेबसी और दुसरी होती है बीमारी. बुढापेसे तो हम मरते नही. बीमारीसे सही लेकिन जब मरते है तब जिंदगीसे छुटकारा तो मिल जाता है."

फॉर सम लाईफ ईज नथिंग बट हेल !!

{बुढापेसे तो हम मरते नही.}

बुढापेसे तो हम मरते नही. बीमारीसे सही लेकिन जब मरते है तब जिंदगीसे छुटकारा तो मिल जाता है."

काय बोलणार???
सुन्न...


-निखिल

{सुन्न. सुन्न. सुन्न..}

सुन्न. सुन्न. सुन्न..
Sad


-पुण्याचे पेशवे

{.}

.

{:(}

{(विषय दिलेला नाही)}

Sad

{...}

...
प्रसन्ना लिहिता रहा रे बाबा. हे सगळं उरावर घेऊन बसशील तर वेडा होशील माणसा.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{हे सगळं उरावर घेऊन बसशील तर}

हे सगळं उरावर घेऊन बसशील तर वेडा होशील माणसा.

नाही... अगदीच नाही... भेटतो ना आम्ही सगळे पूनमवर रेग्युलरली... तेव्हा ३ डाऊन नंतर ऐकतो आम्ही बरंच काही... खूप आहे आत मधे...

{>>>तेव्हा ३ डाऊन नंतर ऐकतो}

>>>तेव्हा ३ डाऊन नंतर ऐकतो आम्ही बरंच काही... खूप आहे आत मधे...

हॅ हॅ हॅ !

wink


Hope is a good thing...

{बर्‍याच आजोबांच्या कथा आहेत.....}

बिका अन बाकीचे सगळे मित्र मला सिद्धहस्त मराठी लेखक बनवणार बहुतेक लिहायला लावुन एकामागोमाग एक कथा!

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{लिवाच}

आमच्या सारख्या ए सी त गुबगुबीत कोचावर बसून तो आणि तीच्या, ढगांच्या, पावसांच्या, झाडांच्या पानांच्या गुळगुळीत कविता लिहून एकमेकांच्या 'प्रतिभे'ची प्रशंसा करणार्‍यांना हे ही वाचू दे की. म्हणजे आम्ही वाचूच असे नाही, पण 'डोळ्यात पाणी आणलंस' अशी प्रतिक्रिया नक्की देऊ, क्काय?


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{ह्म्म्म...}

सुटली बिचारी!
असंच म्हणायचं, नाहीतर काय?

मीना पॉझिटिव्ह..म्हणजे जाणार होतीच. अर्ली स्टेज वगैरे डॉक्टरी भाषा हो...पदरात एक पोर, नवरा मेलेला, दोन वेळच्या जेवणासाठी रोज कुणा ना कुणाची 'दुल्हन' बनायची वेळ...औषधांचा खर्च कुठुन भागणार?

बरं, पोटी ती कोवळी पोर, मुलगा असता तर आणखी काही करता आलंही असतं, पण पोरीच्या जातीला 'सिग्नल' आणि 'प्लॅटफॉर्म' धडपणे जगु देतील? तेही संरक्षणाचं कवच असलेली आई अशी जर्जर होऊन बसल्यावर?

अकाली जाण्याचं दु:ख शतशः मान्य! पण निदान दोघी मायलेकी, एकदाच्याच गेल्या.. रोजच्या मरणातुन सुटल्या! Sad

{(विषय दिलेला नाही)}

Sad

{...}

Sad

{पुणेरी तुमचे असे अनुभव एक}

Sad

पुणेरी तुमचे असे अनुभव एक वेगळ जग दाखवतात.

{वाचून मन हेलावून गेलं......}

वाचून मन हेलावून गेलं. बर्याचदा आपण ईतरांचे असे अनुभव वाचतो वा एकतो तेव्हा खुप हेलावून जायला होतं. पण जे लोकं अशा प्रसंगातून जात असतील त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल नाही? ते कोणत्या हिमतीवर अशा प्रसंगाना तोंड देत असतील. आपण फक्त प्रतिक्रिया देऊ शकतो....बस...बाकी काही नाही. खुप वाईट वाटतं अशावेळी.


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{प्रतिसादासाठी शब्द सुचत नाही}

प्रतिसादासाठी शब्द सुचत नाही आहेत.