सल (भाग २ )

"पाव्हण, तुमच्या मनात इज्जतीचा आणि नावाचा खडा घोळायला लागलाय, पहिली ती भीती थुंकून टाका.. आव खाया-पियाची आबाळ व्हायला लागलीय, अजुन तर बरच आयुष्य निघायचंय, तरणबांड गडी हाये तुम्ही. आमच ऐका, तुम्ही लगीन कराच "

भाग १ पासून पुढे...

"तुम्ही लगीन कराच" ह्या शेवटच्या वाक्याने मी बसल्या जागेवरच थिजलो. उपस्थित मंडळींनी पाटलांच्या दुस-या लग्नांचा घाट घातला होता. पाटील काही ह्या गोष्टीला संमती द्यायला तयार नव्हते. सरपंचांनी मला विचारल, "काय वाटत सर तुम्हाला ?"

"परिस्थितीला जे आवश्यक आहे ते कराव. पाटलांनाच त्यांचे प्रश्न व्यवस्थित माहीत असतील. त्यांनाच निर्णय घेऊ देत" मी हे बोलत असताना आतल्या खोलीतल्या उंब-यावर धैर्यशील उभे राहुन माझं बोलणं ऐकत होता.

एक वयस्क अचानक बोलायला लागला, "पाटील गड्यांच्या बायकांच्या जीवावर की[ती दिस संसार करणार ?, अहो घरात बाई माणुस पायजेच. लोक नाव ठेवत्याल.. काय-बाय बोलत्याल त्या पेक्षा दुसर लग्न करा. आव! तुम्ही कुळातून पाटील. पाटलांच्यात होत्यातच की दोन-तीन लग्न. काय इभ्रत जात नाय. तुम्ही आमच ऐका आम्ही तुमच्या भल्यासाठीच बोलतोय. आव स्वतःच नाय पण पोराच इचार करा. त्याला नको व्हय आई आणायला"

पाटील स्वत:च्या पायाकडे पहात बसले होते. एक-एकजण बाजू मांडत होता. पाटलांना दुसरे लग्न करायला भाग पाडत होता. शेवटी पाटलांनी दुसरे लग्न करायला परवानगी दिली. पण काही अटी घातल्या.

"मुलगी आमच्याच जातीतली पायजे, गरिबाघरची, तरुण वयात विधवा झालेली असली तरी चालल. लग्न मुलीच्या गावाला एखाद्या मंदिरात करायच. माझ्या गावात मी लग्न करणार नाय. पोरीला कुळाची रीत माहीत पायजे"

सगळ्यांनी पाटलांच्या अटी मान्य केल्या. धैर्यशीलच्या मामाने दोन आठवड्यातच पाटलांच्या अटी पुर्ण करेल अशा मुलीच स्थळ आणल. मुलगी त्यांच्यात जातीतली त्याच तालुक्यातील होती. परिस्थिती जेमतेमच होती. तिचं सुद्धा दुसर लग्न होत. तिच्या पहिल्या लग्नातच तिचं लग्न देण्या-घेण्या वरुण मोडल होत. लग्नाच्या मांडवातून मुलगी पुन्हा माहेरी आली होती. लग्न मोडून सात वर्ष झाली पण तीच दुसर लग्न झालं नव्हत. पाटलांबरोबर काही आप्तेष्ट आणि मी मुलीच्या गावी गेलो. धैर्यशीलला पाटलांनी जाणून-बुजून बरोबर घेतले नव्हते. त्यांच्याच गावातल्या मंदिरात पाटलांचे लग्न लावल. पाटलांनी आपल्या दुस-या बायकोच नाव बदलले आणि नवीन नाव ठेवल 'कमल' अर्थात कमलाबाई. वाड्याच्या नवीन पाटलीन बाई.

पाटलांच्या दुस-या लग्नामुळे थोडी गावात कुजबुज चालू झाली पण ती सगळी खालच्या आवाजात. नंतर ती कुजबुज सुद्धा बुजून गेली. पाटलांचा संसार पुन्हा उभा रहायला लागला. कमलाबाईंनी चांगल जमवून घेतल सगळ्यांबरोबर. ज्या गोष्टी पाटलांची पहीली बायको करायची त्या सगळ्या गोष्टी कमलाबाई करत होत्या. पाटलांनी त्यांना सगळ्या सूचना दिल्या होत्या. मुळात कमलाबाई होत्याच खूप समंजस. धर्यशील घरातल्या व्यापापेक्षा गावातल्या तरुण मुलांबरोबर रमायला लागला. थोडक्यात कमी वयातच आपल तरुण नेतृत्व तयार करत होता. एक नवीन ताकद पाटलांच्या घरात वाढत होती.

पाटलांना जसं दुस-यांदा पती होन टाळता आल नाही तसेच त्यांना पुन्हा बाप होणं सुद्धा टाळता नाही आले. दुस-या लग्नाला दीड वर्ष झाली असतील तेव्हांच पाटलांना त्यांच्या दुस-या बायकोपासून मुलगा झाला. 'मनोहर' नाव त्याच. हाच मनोहर माझा सर्वात लाडका विद्यार्थी झाला. पाटलांच्या वाड्यात दरवर्षी काहीना काही घडत होत. मनोहरच्या जन्माने धैर्यशील मात्र थोडा त्रागा करत होता. मनोहरचा जन्म झाला तेंव्हा धैर्यशीलच वय १८ वर्ष होत. येवढं मोठं अंतर म्हणजे सामाजिक कुचंबणा हे कळण्याइतपत त्याच वय झालं होत. घरामधे त्याचे आई बरोबर आणि बाळा बरोबरचा संवाद अगदीच तुसड्या पद्धतीचा होता. चीड-चीड करणे, उलटे बोलणे ,लहान-सहान गोष्टींवरून भांडण करणे हे सगळ धैर्यशील करत होता. पण हे सगळ पाटलांच्या नकळत. कमलाबाई मात्र नेहमी धैर्यशीलला घाबरून असतं. स्वतःच्या लहान बाळाला त्याच्यापासून नेहमी लांब ठेवत. कधी कधी पाटलाकडेच तक्रार सुद्धा करत पण पाटलाकडे धैर्यशीलला सजवण्यासाठी शब्द नव्हते.

माझ लग्न झाल मी माझ्या बायकोसह पाटलांच्या वाड्यातल्या खोलीत संसार थाटला. पाटलांना खुप वेळा माझ्याकडून खोलीच भाडे घ्या असा आग्रह करायचो पण पाटील हे कोणाच्या ऐकण्यातले नव्हते. भाड्याचा विषय काढला की पाटील म्हणायचे ,"सर तुम्हाला बरच काम करायच माझं. तव्हाच करू सगळा हिशोब" पाटील कधीकधी वेगळच बोलायचे. त्यांचा अर्थ आणि संदर्भ मला ब-याच वेळा लागत नव्हता.

माझा संसार पाटलांच्याच वाड्यात सुखाने चालू होता. माझ्या बायकोच आणि पाटलीणबाईंच चांगलं जमायच. याच स्नेहातून मनोहर रोज बराच वेळ आमच्याच घरात असायचा. खूप लळा लागला होता आम्हाला मनोहरचा. वाड्यात जसा जसा मनोहर वाढत होता त्याच वेगात धैर्यशील जास्तच कठोर आणि बेदरकार होत चालला होता. पाटलीण बाई धैर्यशीलमुळे जास्तच खंगत चालल्या होत्या आणि पाटलांचा वाड्यामधला वचक आणि ताकद कमी होत चालली होती. दिवसातला बराच वेळ मनोहर आमच्याच घरात राहू लागला. मनोहरच शाळेत जायचे वय होत आल होत आणि धैर्यशीलच लग्नाचं वय होत आल होत. दोन भावांमध्ये हे वयाच अंतर पाटलांना नक्कीच बोचत होत. पण आयुष्यातल्या खूप प्रश्नांच उत्तर हे फक्त येणा-या काळा कडेच असतं म्हणून पाटील सुद्धा शांतच रहात होते आणि ह्या प्रश्नावर ते कोणाशी बोलू सुद्धा शकले नसते.

मनोहर बालवाडीतन पहिलीला आला. मी रोज संध्याकाळी अभ्यास घेत होतो. त्याची सवयच लागली होती आम्हाला. तसंही आम्हाला अपत्य प्राप्तीचे सुख नव्हते बहुतेक. धैर्यशील घरातली खूप लहान-सहान काम याच वयात मनोहरला सांगत असे. जस त्याला प्यायला पाणी देणे, त्याची मोटार सायकल साफ करणे, तो समोर असला की शांत एका जागेवर बसून रहाणे,खेळत असला तर अक्षरशः चार दोन सनसनीत चापट्या मारणे. त्याच्या मारण्याने मनोहर रडायला लागला की पाटलीण बाई पळत येऊन भेदरलेल्या नजरेने धैर्यशीलकडे पहात मनोहरला आतल्या खोली मधे घेऊन जात असत. कधी कधी त्यांचासुद्धा संयम तुटत असे आणि त्याचा राग त्या मनोहरला मारूनच शांत करत. अशा वेळेस मी नाहीतर माझी बायको मनोहरला आमच्या घरात आणायचो. त्याला शांत करणे, जेवायला घालणे मग त्याला झोपवून त्याच्या आईच्या ताब्यात द्यायचो.

मनोहर आता ४थ्या इयत्तेत होता आणि धैर्यशीलच २५ वय झाल होत. मनोहर खूपच हुशार होता आणि माझ्याकडेच जास्त वेळ असल्या कारणाने त्याचा अभ्यास सुद्धा चांगला होत होता. धैर्यशीलसाठी आता वाड्यावर स्थळ येऊ लागली होती. धैर्यशीलने वडलांची सगळी काम स्वतः बघायला सुरूवात केली होती. आर्थिक परिस्थितीमधे धैर्यशीलने चांगलीच सुधारणा केली होती. दारात दोन ट्रॅक्टर उभे होते. कामगारांची संख्या वाढली होती. स्वतःच गुळाच गु-हाळ होत, स्वतःकडे दुध संघाची शाखा होती. पारंपारिक शेती ऐवजी नवीन पद्धतीने तो शेती करत होता. वाड्यातील असणारे गड्यांचे संसार खाली करून त्या खोल्यांमधे धान्याचे गोदाम त्याने केल होत. पाटलांच्या प्रेमामुळे मला मात्र त्याने खोली सोडायला नाही लावली पण सगळा व्यवहार त्याच्याच हातात असल्यामुळे भाडे मात्र चालू झालं होत.पाटलांची भूमिका मात्र फक्त बघ्याची होती.धैर्यशील्च्या २६व्या वर्षी त्याच लग्न झाल.

धैर्यशीलच्या लग्नाला वाडा पुर्ण लाईटच्या माळांनी सजवला होता. अमाप पैसा दोन्हीकडच्या लोकांनी लग्नात खर्च केला. जवळच्याच गावातल्या तालेवार पाटलाची मुलगीच धैर्यशीलची बायको आणि पाटलांची सून झाली होती. पण येणारी सून पाटलीनबाईंची सून होईल का? मनोहरची वहिनी होईल का? हा प्रश्न मला पडला होता आणि हाच प्रश्न पाटलांना सुद्धा पडला असेल. लग्नाच्या रात्री गावात धैर्यशीलने स्थापन केलेल्या तरूण मंडळाने मोठी वरात काढली. मोठा ब्यांड बाजा, मोठमोठ्या आवाजाचे ध्वनिक्षेपक,रथ आणि सगळ्यांना बेभान होउन नाचवण्यासाठी दारूची व्यवस्था करण्यात आली होती. गावामधे वरात चालू असताना वाड्यात पाटलीणबाई सूनबाईंच्या स्वागताची तयारी करत होत्या आणि मनोहर वाड्यातला चौक झाडून घेत होता. लहानग्या मनोहरला अस राबताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आले त्याच्याकडे जायला निघालो तर तिथेच एका कोप-यात पाटील खुर्चीवर बसलेले दिसले. त्यांना असं उदास बसलेल पाहिल आणि मला जास्तच वाईट वाटल. पाटलांनी मला त्यांच्या जवळ बोलावल आणि म्हणाले,

"सर!, माझी सुद्धा मिरवणूक काढली होती गावान. पण माझ्या पैश्यांनी नाय.. गावच्या पैश्यांनी. आमच्या पोराने आज वरात काढलीया. स्वतःच्या लग्नाचं कौतुक करतोया. दारू पिऊन, धिंगाणा घालत सगळ्यांनी वाड्या पर्यंत यायची परंपरा नाय ह्या वाड्याची"

पाटील स्वतःशीच बोलत आतल्या खोलीमधे निघून गेले. मी लगेच मनोहरकडे गेलो. त्याच काम झालं होत. थकला होता बराच. मी त्याला विचारल,"मनोहर वरातीत गेला नाही नाचायला"

"गेलो होतो सुरूवातीला, पण दादा म्हणाला वरातीत थांबू नको. घरी जाऊन आवराआवर कर",मनोहर.

क्रमशः...

{कथा सुंदरपणे आकार घेते आहे!}

कथा सुंदरपणे आकार घेते आहे! हास्य


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{छान चाललीए कथा.....}

छान चाललीए कथा.....


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{छान.}

वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत.


"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

{धन्यवाद}

धन्स यारो..... हास्य


कळावे,
___मनस्वी राजन

अनुभव… क्षण वेचलेले…

{केवढासा भाग हा? फटाफट लिही}

angery केवढासा भाग हा?

फटाफट लिही नाही तर.............. आम्ही वाट बघतो, दुसरे काय करू शकतो शकतो...


something terribly wrong with this country, isn't there?

{टाकतो.. टाकतो.. लवकरच टाकतो..}

टाकतो.. टाकतो.. लवकरच टाकतो..


कळावे,
___मनस्वी राजन

अनुभव… क्षण वेचलेले…

{(विषय दिलेला नाही)}

Crying


something terribly wrong with this country, isn't there?