छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर
आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.
'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.
या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
"समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.
"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही" असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात "शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे"
शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात - "परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"
एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात - "औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ......"
जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की "औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!"
"साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे"
पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत."पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?" असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.
अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.
त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.
छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"
गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.
जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात - "शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे" याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे.
सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (माझ्या मते अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.
काही मित्रांनी दादोजी व रामदास यांच्याबद्दल असे का लिहिले याबद्दल पृच्छ केली म्हणून थोडक्यात काही लिंक्स देतो आहे. मटात काही संशोधकांची चर्चा झाली त्यातून यावर प्रकाश पडेल
श्री. संजय सोनवणी यांचा इतिहास संशोधक श्री. गजानन मेहेंदळे यांची मते खोडणारा लेख
मेहेंदळेंऐवजी श्री. कस्तुरे यांनी सोनवणींना दिलेले उत्तर
कस्तुरेंनी पुरावे न देता हे उत्तर दिले होते याचा परामर्श घेणारा श्री. संजय सोनवणी यांचा लेख
छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.
नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.
नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य हे पुस्तक मी घेतले आहे. तुम्ही घेणार का?
.jpg)
{सागर भाऊ, पुस्तक वाचणार आहे}
सागर भाऊ,
पुस्तक वाचणार आहे मी
तुम्ही 'शोध शिव समाधीचा' हे पुस्तक वाचले आहे का? गोपाळ चांदोरकर यांनी लिहलेले ? असेल तर त्या विषयी देखील लिहा.
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{पाठवून द्या}
तुम्ही 'शोध शिव समाधीचा' हे पुस्तक वाचले आहे का? गोपाळ चांदोरकर यांनी लिहलेले ?
मिळत नाही हो वैनी हे पुस्तक आता
तुमच्याकडे असेल तर राजेंकडे पाठवून द्या. येणारच आहेत ते बंगळूरात. मग वाचून नक्की लिहिन
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{उत्तम परिक्षण. जे नरहर}
उत्तम परिक्षण. जे नरहर कुरुंदकर मला माहित आहेत ते दादोजी वा रामदासांबाबत उडते विधाने करणार नाहीत्...ती त्यांची मते असती तर त्यांनी सखोल विश्लेशन नक्कीच केले असते. त्यामुळे मुळ आव्रुत्तीसुद्धा वाचायला हवी असे मला वाटते. असो. नरहर कुरुंदकरांसारख्या वस्तुनिष्ठ विचारवंताला विनम्र श्रद्धांजली. खरे तर कुरुंदकर संप्रदाय पुढे गेला असता तर आज महाराष्ट्रातील अनेक निरर्थक वादळे थांबली असती.
{संजय सर, तुमच्या सारख्या}
संजय सर,
तुमच्या सारख्या इतिहास संशोधकांनी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत समोर आलेले निष्कर्ष परखडपणे मांडले आहेत. जनसामान्यांना कायम सत्याकडे जाण्यासाठी अशा गोष्टी नक्कीच प्रेरित करत असतात. मी लिहिलेला कुरुंदकरांच्या पुस्तकाचा हा परिचय हे त्याचेच आऊटपूट समजायला हरकत नाही.
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{खरे तर कुरुंदकर संप्रदाय पुढे गेला असता तर आज महाराष्ट्रातील अने}
खरे तर कुरुंदकर संप्रदाय पुढे गेला असता तर आज महाराष्ट्रातील अनेक निरर्थक वादळे थांबली असती.
या वाक्यावर अशोकभाऊंनी षटकार मारलेला आहेच. हे वाक्य म्हंजे संजय साहेबांचे शाहकार ठरावे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{जीवनरहस्य}
"...तर आज महाराष्ट्रातील अनेक निरर्थक वादळे थांबली असती."
~ संजयजींच्या या रोखठोक मताशी सहमत. पण सांप्रत देशी झाले आहे असे की "शिवाजी" हे नाव दीडदमडीच्या (सर्वपक्षीय) राजकारण्यांनी एक हक्काचे आणि चलनी नाणे म्हणून वापरात आणले, असे आणले की ज्यामुळे सर्वसामान्यांच्या असलेल्या/नसलेल्या अहंकाराला "स्वाभिमान' या नावाने फुंकर घालता येते. "शिवाजी महाराज की जय" अशी एखाद्या दारुबाज मस्तवाल गल्लीपेंढारी पुढार्याने जरी घोषणा दिली की मग त्याने टाकलेली धूळ आम्ही डोक्यावर घेतो. त्या घोषणेनंतर आंधळेपणाने त्याची बिनकामाची आणि टाळ्याखावू वाक्ये वेदवाक्य म्हणून पवित्र मानतो. हा सारा परिणाम त्या नावाने व्यक्तिगत लाभदायक वादळे उठविण्याच्या प्रवृत्तीचा. संधीसाधू त्या सुसाट झोताच्या साहाय्याने आपले अंतस्थ स्वार्थ थेट तृप्त करतात याकडे 'मतदार' नावाची रयत लक्ष देत नाही, याचा पुरेपूर फायदा घेणार्यांचा इतिहास खरेतर फार जुनाच आहे. अगदी कै.नरहर कुरुंदकरांनाही जाणवला होता.
सागरने केलेले हे सुंदर परिक्षण केवळ कुरुंदकरांच्या समर्थ लेखणीची आणि त्यांच्या विचारांची क्षमता दाखविते असे नसून 'शिवाजी' या नावाला 'देव' न मानता त्याने आपल्या अल्पशा अशा कारकिर्दीत 'सुमंगल राज्य' इथे अंमलात आणण्यासाठी एक 'व्यक्ती' म्हणून कसे कार्य केले याचा लेखाजोखा कुरुंदकरांनी घेतल्याची जाणीव होते.
"सातत्याने संघर्ष" हे मराठा साम्राज्याचे एक नैसर्गिक लक्षण झाल्याचा इतिहास झाला होता. रोजचा उगवता सूर्य पाहायचा तो तलवार लढाईसाठी तयार ठेवूनच तर मावळता पाहताना त्या तलवारीवर उमटलेले शत्रूचे वा स्वकीयाच्या रक्ताचे डाग पुसत असतानाच. अशा स्थितीत शारीरिक क्षमतेचा र्हास होणे वा ती क्षीण होत जाणे क्रमप्राप्त असते. परंतु अशा जीवघेण्या अवस्थेतही मराठा समाजाची चेतना अभंग ठेवण्याचे काम 'शिवाजी' या जादूने भरलेल्या नावाने केली. कुरुंदकरांना अपेक्षित आहे ती शिवाजीची ही प्रतिमा, जी भाकडकथांच्या जंजाळात सापडू देऊ नये, तसेच त्या नावाने लोकांना सदासर्वकाळ 'खुळे' मानून त्यांच्या भावना स्वतःच्या स्वार्थाच्या चुलीत घालू नयेत.
असो. पुस्तकाचे शीर्षकच मुळी 'जीवन-रहस्य' असे असल्याने नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या ज्येष्ठाने त्या रहस्याचा यथार्थ मागोवा घेतला असणार हे सागरचे परिक्षण सांगतेच.
अशोक पाटील
{अशोक काका, कुरुंदकरांवर असे}
अशोक काका,
कुरुंदकरांवर असे अधिकाराने तुमच्यासारखाच दर्दी वाचक लिहू शकतो.
तुमच्या प्रतिसादातील प्रत्येक मताशी सहमत.
दुर्दैवाने कुरुंदकरांची पुस्तके आता मिळत नाहीत
मी शिवरात्र, मनुस्मृती इत्यादी ग्रंथांचा शोध घेतला. पण यश नाही. प्रती संपून दशके झालीत
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{कुरुंदकरांवर असे अधिकाराने तुमच्यासारखाच दर्दी वाचक लिहू शकतो}
कुरुंदकरांवर असे अधिकाराने तुमच्यासारखाच दर्दी वाचक लिहू शकतो
"पहले आप" "पहले आप" मे गाडी निकल जायेगी.
दोस्तानु, दोघांनी ही लिहा हो. पण कुरुंदकरांबाबत लिहा. आग्रहाची विनंती.
त्याबदल्यात मी भांडणवादा बाबत दोन मोठ्ठे लेख लिहिन. मग तर झालं !!!
-------
बाकी कुरुंदकर व G L S Shackle हे या एका बाबतीत सम-नशीबी/कमनशीबी आहेत. दोघेही अत्यंत गुणी, बुद्धीवंत, मूलभूत विचार करणारे व इतरही अनेक गुण असलेले. व दोघांचीही पुस्तके मिळणे दुरापास्त.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{नरहर कुरुंदकर}
ओके गब्बरभाऊ आणि सागरबाबा ~ डन !
त्या विलक्षण प्रतिभा असलेल्या व्यक्तिमत्वावर लिहिण्याची माझी पात्रता निश्चितच नाही, तरीही त्या निमित्ताने का होईना परत त्यांच्या पुस्तकातून आणि अन्य लिखाणाच्या माध्यमातून त्यांचा मागोवा घेऊन एकप्रकारे आदरच प्रकट करण्याची संधीच आहे असे समजून मी इथे जरूर लिहितो.
अशोक पाटील
{वाट पाहतो आहे साहबा लवकर}
वाट पाहतो आहे साहबा
लवकर येऊ द्या.
Hope is a good thing...
{धन्यवाद}
धन्यवाद अशोकभाऊ.
आमचे आणखी एक मित्र मीम वर आहेत ... त्यांनीही कुरुंदकरांवर लिहिण्याचे कबूल केले आहे. व त्यांच्याही लेखाची वाट पाहत आहे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{कोण, कौन, व्हू ?}
अरेच्या !! कोण, कौन, व्हू ? रमताराम मे बी ?
तसे असेल तर मग दोघादोघांनी एकाच विषयावर लिहिणे बरोबर नाही. तुमचे मित्र लिहित असतील तर लेट हिम डु सो, आय वुईल कीप माय कॉन्स्ट्रेशन ऑन अवर डीअर जी.ए.कुलकर्णी.
अशोक पाटील
{जी.ए.कुलकर्णी}
ते सध्या जी.ए.कुलकर्णी सायबांवरती लिहितायत.
त्यामुळे अशोकभाऊ, तुम्ही कुरुंदकरांवर लिहाच.
----
कुरुंदकरांवर लिहिल्या गेलेल्या पहिल्या** ३ लेखांच्या (लेखक भिन्न असायला हवेत.) लेखकांना माझ्यातर्फे पुण्यातल्या एखाद्या चविष्ट चमचमीत जेवण देणार्या हॉटेल मधे (अर्थातच ओली) पार्टी.
हॉटेल तुम्ही निवडायचे. डिश तुम्ही निवडायच्या. बिल मी देणार.
** Starting from Today (१४ फेब्रु २०१२).
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{कधी येऊ पार्टीला?}
गब्बरभौ,
पहिला लेख लिहून मीच सुरुवात केली आहे. तेव्हा माझी खुर्ची पक्की समजायला हरकत नाही
(कधी नव्हे ते स्वतः घुसखोरी करतो आहे )
बाकी अशोककाका यांचीही खुर्ची पक्की आहे. कारण लवकरच ते कुरुंदकरांवर लेख टाकतील.
तिसरी खुर्ची कोण पटकावतो हा मजेशीर मुद्दा असेन
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{अशोक काका वाट पाहतो आहे}
कुरुंदकरांवर तुम्ही लिहिणार म्हणजे मजा येणार
आतुरतेने तुमच्या लेखाची वाट पाहतो आहे काका
खूप खूप धन्यवाद
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{वाचायलाच हवे या लिस्ट मध्ये}
वाचायलाच हवे या लिस्ट मध्ये पुस्तक टाकले आहे
वाचून सांगतो रे.
Hope is a good thing...
{उत्तम पुस्तक परिक्षण. पण हे}
उत्तम पुस्तक परिक्षण.
पण हे पुस्तक परिक्षण विभागामध्ये का नाही आहे?
{झकास}
सुरेख रे सागर. कुरुंदकरांचा 'शिवाजीराजांचे पराभव' हा प्रस्तावनात्मक लेख (मूळ ऐसपैस पसरलेल्या कादंबरीपेक्षा तेवढी प्रस्तावनाच वाचावी हे आपले आमचे मत.
) आवर्जून वाचण्याजोगा.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{छान परिक्षण सागर भाऊजी}
छान परिक्षण सागर भाऊजी
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{श्रीमानयोगीच ना? }
पसरलेल्या कादंबरीपेक्षा तेवढी प्रस्तावनाच वाचावी
गुरुजी हा उल्लेख नक्कीच श्रीमानयोगी कादंबरीबद्दल आहे
अगदी खरे आहे. कुरुंदकरांची प्रस्तावना एकदम वास्तवाची जाण करुन देते
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{मूळ ऐसपैस पसरलेल्या कादंबरीपेक्षा तेवढी प्रस्तावनाच वाचावी हे आप}
मूळ ऐसपैस पसरलेल्या कादंबरीपेक्षा तेवढी प्रस्तावनाच वाचावी हे आपले आमचे मत.
@ररा, तुम्ही कादंबरी बद्दल लिहिलेत पण आमचे मामाश्री सुद्धा रणजित देसाईंच्या बद्दल फारसे चांगले मत बाळगून नव्हते. माझ्या वाचनाच्या निवडीवर (खरंतर वाचनाच्या एकंदर डायरेक्शनवर) मामाश्रींचा प्रभाव होता.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{ऐसपैसमागील रहस्य}
गब्बरभाऊ ~
त्या 'ऐसपैस" पसरलेल्या कादंबरीला तसे रुपडे येण्याचे श्रेय जाते ते प्रकाशक रा.ज.देशमुख याना. स्व.बाळासाहेब देसाई यानी रणजित देसाईंच्याकडे स्वामीच्या लक्षणीय यशानंतर 'आता शंभरएक पानांची मुलासाठी म्हणून का होईना तू शिवाजी महाराजांच्यावर लिही" असा वडिलकीच्या नात्याने आग्रह धरला होता, जो देसाई यानी कबूल केला. आता त्याकाळी रणजित देसाई हे प्रकाशकांच्या दृष्टीने खणखणीत बंदा रुपया [आज तो मान विश्वास पाटील यांच्याकडे आहे] आणि जहागिरदार देशमुख यानी रणजितला गढीवर बडदास्तात ठेवून त्याना [पक्षी राजेदेशमुखांना] हवी तशी ऐसपैस अशी ती कादंबरी लिहून घेतली आणि तरीही अपेक्षेइतक्या पानांची संख्या होईना म्हणून "कल्पने"च्या लाटकरांकडून टाईप वाढवून घेतला आणि 'योगी' ला गलेलठ्ठ बनविले.
फार चित्तरकथा आहेत प्रकाशन वारुळात.
अशोक पाटील
{बाळासाहेब देसाई?}
बाळासाहेब देसाई म्हंजे मरळी साखर कारखान्याचे प्रवर्तक? लोकनेते ? करारी नेते ?
आमचे तीर्थरूप त्यांच्याबद्दल फार आदराने बोलतात.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{लोकनेते}
येप्प !! महाराष्ट्र राज्याचे ते शिक्षणमंत्री तर होतेच पण यशवंतराव चव्हाणांचे उजवे हात म्हणूनही ओळखले जात. वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील मंत्रीमंडळातील ते क्रमांक दोनचे मंत्री होते. मूळचे पाटण [सातारा] असले तरी कोल्हापूरवर त्यांचे फार प्रेम. त्यांच्या दोन्ही मुलांचे कायमचे वास्तव्याचे आणि व्यवसायाचे ठिकाण आता कोल्हापूर हेच आहे.
कोल्हापूरातच "शिवाजी विद्यापीठ" व्हावे यासाठी त्यानी आपल्या शिक्षणमंत्री पदाच्या कारकिर्दीत घेतलेला निर्णय आणि तो अंमलात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच त्यांच्या काळात सुरू झालेली 'इ.बी.सी.' ची सवलत क्रांतिकारी पावले ठरली. पाटण मतदारसंघातून ते कधीही पराभूत झाले नाहीत. पुढे त्यांच्या जागी त्यांचे नातू शंभूराजे देसाई एकदा शिवसेनेच्या तिकिटीवर आमदार म्हणून निवडून आले; पण मागील निवडणूकीत [२००९] कॉन्ग्रेस उमेदवाराने (विक्रमसिंह पाटणकर) त्यांचा पराभव केला. असो.
"लोकनेते" ही पदवी आचार्य अत्रे यानी बाळासाहेबांना [खरे नाव 'दौलतराव'] प्रदान केली होती.
अशोक पाटील
{सुंदर परिक्षण ! नक्की वाचेन}
सुंदर परिक्षण ! नक्की वाचेन हे पुस्तक...' महापुरुषांचा पराभव हे त्यांचे अनुयायीच करतात' हे मत छ. शिवाजीराजांच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होत आहे असे वाटते.
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{आवर्जून वाचावे असे पुस्तक}
@राजे @भुत्या @स्वामीजी
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. नक्की वाचा.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{वंटास}
सागरभाऊ,
तुमचा लेख (परिक्षण) म्हंजे वंटास.
कुरुंदकरांवर लिहा ना आणखी - अशी विनंती करतो. त्यांच्याबद्दल फार गूढ आकर्षण आहे मला.
- ग
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{अशोककाका आणि ररा समर्थ आहेत}
गब्बरभौ,
कुरुंदकरांवर लिहिण्याची माझी सध्या तरी पात्रता नाही.
तीच मोठी मेजवानी आहे. आणि अशोक काकांनी कुरुंदकरांवर लिव्हलं की त्या धाग्यावर ररा गुरुजींचे कसे भरभरुन प्रतिसाद येतात बघा , दोन कुरुंदकरप्रेमींच्या मंथनातून आपल्याला अमृत गावतं ते बघाच
अशोक काका लिहिताहेत ना..
तोच एकदम मनमुराद आनंद असेल बघा. कुरुंदकरांवर लिहायला मला अजून कैक वर्षे त्यांचा अभ्यास करायचा आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{सुरेख! कुरुंदकरांवर प्रकाश}
सुरेख!
कुरुंदकरांवर प्रकाश टाकणारे अजून लेखन मीमवर यावे ही इच्छा.
करतो. करेन. व करेगें
{काहीही असो, आम्हाला शिवाजी}
काहीही असो, आम्हाला शिवाजी महाराजांच्या जिवनातील नाट्यमय आणि रोमांचकारी घटना फार फार आवडतात.
पुस्तक परिचय सुंदर आहेच.
शिवाजी महाराजांचा त्रिवार विजय असो!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{कुरुंदकरांसारखेच मला}
कुरुंदकरांसारखेच मला ज्यांच्या विचारांबद्दल आकर्षण आहे आणि आदर वाटतो असे आणखी दोन लेखक म्हणजे पु.ग.सहस्रबुद्धे आणि वि.का. राजवाडे. त्यांच्या पुस्तकांबद्दल कोणी (अर्थात जाणकारांनी) लिहिले तर ती एक मेजवानी ठरेल.
{पु ग}
ररांनी लेख लिहिलेला आहेच - http://www.mimarathi.net/node/3354
-----
अवांतर - पु ग सहस्त्रबुद्धे यांच्याबाबत आमचे मामाश्री आदराने बोलायचे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{कुरुंदकरांवरचा अप्रतिम लेख}
नरहर कुरुंदकरांवर एक अप्रतिम लेख सापडला आहे
हा तो लेख
कुरुंदकर प्रेमींनी तो अवश्य वाचावा असा माझा आग्रह आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{मस्त}
एकदा वाचून झाला आहे. दुसर्यांदा वाचणार आहे. मस्त लेख. खालील वाक्य एकदम आवडले -
आम्हाला विद्वत्तेचा आदर असतो. फक्त ती विद्वत्ता आम्हाला हवी तशी बोलावी अशी आमची मागणी असते. जोवर ती तशी बोलते तोवर आम्ही तिची महत्ता सांगणार. जेव्हा तिचे निष्कर्ष आमच्या आवडीतून वेगळे येतील तेव्हा ती प्रथम दुर्लक्षिणार आणि सोयीची नसेल तर आम्ही ती तुडविणार.
तुस्सी ग्रेट हो सागरभाऊ.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{खरचं अप्रतिम आहे रे हा}
खरचं अप्रतिम आहे रे हा लेख.
लेखकाला शोधतो आहे, मीमवर घेऊन यावे म्हणतो आहे.
Hope is a good thing...
{नक्की घेऊन या }
मोठे व्यक्तीमत्त्व आहे.
जमले तर नक्की घेऊन या त्यांना मीम वर.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{शॉल्लेट हे राव.....}
शॉल्लेट हे राव.....
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{‘गुरुजी’ म्हणून मराठवाडाभर}
‘गुरुजी’ म्हणून मराठवाडाभर प्रसिद्ध असलेले अष्टपैलू आणि स्वकर्तृत्वाने संपन्न असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य नरहर कुरुंदकर. एक आदर्श शिक्षक, प्राचार्य, विचारवंत, संशोधक, समीक्षक, व्याख्याते, लेखक, मार्गदर्शक अशा विविध भूमिकांमधून आयुष्यभर त्यांनी समाजमनाला योग्य दिशा देण्याचे काम केले. आचार्य कुरुंदकरांना कोणत्याही विषयाचे वावडे नव्हते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून ते फ्रॉईडच्या मनोविश्लेषणापर्यंत आणि शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानापासून ते मार्क्सवादापर्यंत सर्वच विषयांवर त्यांचे असाधारण प्रभुत्व होते.
यांच्यावर एक छान व उत्तम लेख मनसेच्या संकेतस्थळावर येथे आहे.
करतो. करेन. व करेगें