भ्याड कोण?

0
0

"ह्यालो ... हां .. बोल रे ... काय म्हणतोस?" इति मी.
"अरे यार सहजंच लावला तुला. बिझी आहेस काय?" ... इति माझा सो कॉल्ड मित्र.
मी परत - "नाही रे!!! ... मी कसला बिझी राहणार. मी रिकामाच असतो( मोस्टली ). बोल काय म्हणतोस??"
तो - "अरे यार .. झालं यार?"
मी - (आता झालं म्हणजे काय झालं बाबा? ह्या विचारात) "काय झालं?"
तो - "झालं ना ... ब्रेकअप!" (सूर अगदीच निराश बरं का!)
मी - (हात्तीच्या! ब्रेकअपचं झालंय ना ... बरंय ... मला तर वाटलं भलतंच काही झालंय कि काय!) "काय सांगतोस!! .. कधी?"
तो - "झालेत रे २ आठवडे. मी साला त्या *%&#%* ला सोडणार नाहीये. मी काय काय स्वप्नं बघितली होती यार. आणि ती?? म्हणे तर घरचे नाही ऐकतील. थांबायला हवे आपण. एकतर म्हणे माझ्या दादाचं लग्न व्हायचंय, मी तसाही लव्ह म्यारेज केलं तर त्याच्या लग्नात विघ्न यायचा, आणि त्यातही आपलं इंटर-रिलीजन. शक्यच नाही. ... शक्यच नाही? ... शक्यच नव्हतं तर कशाला हितके दिवस नाटकं केलीत सोबत? म्हणे घरचे नाही ऐकतील! .... आणि मी साला माझ्या घरी हिला घेऊन गेलो होतो त्याचं काय? .... तिला तर असल्या शिव्या द्यायची इच्छा होतेय ना ... तुला सांगतो ती $&$^%& .... तिच्या तर आयुष्याची मी %#^%& "
मी - "अरे शांत शांत .... झालं ना आता? गेली ना ती? ... तशीही मला ती निघून जाणारीच वाटत होती ... जाऊ दे आता ... विसर तिला ... "
... तसंही असल्या लफड्यात पडायचा आता आपल्याला इंटरेस्ट नाही. मुलगी हि जोवर निव्वळ मैत्रीण असते तोवर ठीक असतं. जिथे तिला माझ्यात, किंवा मला तिच्यात इंटरेस्ट तयार झाला कि बिनसतं सारं. काय आहे ... जिला माझ्या इंटरेस्ट असतो, तिच्या पासून मी जरा लांबच राहतो(कारण मला तिच्यात इंटरेस्ट नसतो ना ... ) ... आणि मला जिच्यात असतो तिच्या जवळ जायची हिम्मत आपल्यात नसते. त्यामुळे मैत्री होणं दोन्ही ठिकाणी शक्य नसतं. आणि जर चुकून दोघांना एकमेकांत इंटरेस्ट असला आणि त्याहून भारी चुकून ते आम्हाला समजलं तर वाटोळं झालंच म्हणून समजा आयुष्याचं!! ... त्यामुळे अश्या गोष्टींपासून दूर राहायचं हेच आपलं तत्व. माझ्या त्या मित्राला हेच समजवून सांगितलं नि मी फोन ठेवला.

काही दिवसांनी ...
मी - "ह्यालो ... हां .. बोल रे ... काय म्हणतोस?"
परत तोच - "अरे आज बोललो तिच्याशी ... झापलं तिला चांगलं! ... धमकी पण दिली तिला"
मी - "धमकी!!??? .... कसली? ... आणि तिने कशाला कॉल टाकलेला तुला??"
तो - "अरे मीच केला होता ... दुसरा धरलाय तिने कुणी ... आपल्याकडून नाही होत पाहणं ... धमकावलं तिला चांगलंच ... सांगितलं दूर राहायला तिला ... चांगलीच फाटली होती तिची!"
मी - ( आता काय हे नवीन, तिने दुसरा धरला काय .. अन तिसरा धरला काय ... ह्याला काय करायचं? ... हे जरा अति झालं ...) "असो झालं ते झालं ... आता तरी झालं का तुझं डोकं शांत?"
तो - ''हो रे ... आता बरं वाटतंय ... आणि मी ऐकलं ती जॉब चेंज करायचा विचार करतेय ... इन फ्याक्ट शहरच बदलायचा विचार करतेय आता. तिला एकदा परत धमकावतो. म्हणजे नक्कीच जाईल ती इथून नि शांत होईल मी"
मी - (मायला हे तर खरंच अति होतंय ... हा तर माजलाच जणू आता तर ... ) "एकदा ठीक आहे यार ... परत पुन्हा कशाला तीच चूक करतोय तू?"
तो - "कि कुठे चुकतोय?"
मी - "तिला स्वताहून फोन केलास. तेच मुळात चुकीचं. ती जशी पण होती. निघून गेली होती ना तुझ्या आयुष्यातून. तू कशाला परत फोन केलास तिला?"
तो - "अरे पण कुणी आपली वाजवून जाईल आणि आपण परत उत्तर नाही द्यायचं हा भित्रेपणा नाही का? ... मी नाही जाऊ देऊ शकत असं कुणाला!"
मी - "अरे पण हा शुद्ध गुंड पणा झाला ना .... "
वगैरे ...
वगैरे ...
.....

ह्यानंतरही आमचं बरंच बोलणं झालं. दोघांपैकी कोण चूक, कोण बरोबर ह्याचा विचार करीत नाही मी. पण मला कुठेतरी त्या मुलीची कीव येते. आणि माझ्या मित्राचा तेव्हढाच राग. पण शेवटी तोच माझा मित्र . त्यामुळे माझ्या कडून जमेल तेव्हढा माझा दृष्टीकोन मी त्याच्या पुढे ठेवला. पण शेवटी तो माझाच दृष्टीकोन होता. त्याचा नव्हता. त्याने पुढे काय केलं ते ठाऊक नाहीये मला. मी विचारलं देखील नाही. पण ह्या संभाषणामुळे मनात विचारांचं कल्लोळ माजलं मात्र. बरेच प्रश्न आलेत मनात.

१. कारण काहीही असो कुणी आपली वाजवून गेलं आणि आपण परत उत्तर नाही दिलं हा खरंच भित्रेपणा आहे का?
२. वादात जर कुणी नरमती बाजू घेतली तर तो खरंच पळपुटा का?
३. जे झालं ते झाल्यानंतर, आपला वेळ घेऊन, स्वतःला सावरून, परत पलटून वार करणं हा खरा भ्याडपणा नव्हे का?
४. माझ्या मित्राच्या बाबतीत तरी बाकी लोकं त्याच्या बद्दल काय विचार करतील हा विचार करीत होता तो. खरंच लोकं असाच विचार करतात का? असतील तर तो बरोबर का चूक? आणि करत जरी असले तरी ह्याने(किंवा इतर कुणीही) ते इतके मनावर घ्यायला हवे का?

तुमचे विचार येतील हि अपेक्षा करतो.