बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

8
0

१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली .
दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली . मशीदीच्या वळचणीत भरणार्‍या मदरशात अरबी शिकवणारा नविन मास्तर आला.
मग उशीरानी का होईना हळूहळू दुबईच्या वार्‍याची झुळुक भटाब्राह्मणांच्या वाड्यांवर पण आली. आयटीआय मधून टर्नर -फिटर झालेली खरे खांबेट्यांची मुलं दुबईला गेली .
दुबईच्या पैशानी उंच वाटणारं आकाश हाताशी आलं . इंदीराजींची गरीबी हटाव मोहीम राबवूनही गरीबी हटली नाही पण या नव्या श्रम संस्कृतीनी घरावरचं खचत आलेलं आढं पुन्हा उंचावलं . तशी या दरम्यान पूर्वेकडे हाँगकाँग सिंगापूरची हवा पण जोरात होती पण दुबईसारखी मागणी तिकडे नव्हती .तिकडे स्वस्त चिनी कामगार उपलब्ध होते. अतीपूर्वेच्या आघाडीवर सामसूमच होती.
हिंदी -उर्दु बोलणारे मुस्लीम आखाताकडे आणि तैवान चिन कोरीयाचे श्रमबळ हॉगकाँग सिंगापूरकडे . धर्म आणि भाषेच्या वळणानी मनुष्यबळाचे होणार्‍या स्थलांतराचा हा उत्तम नमुना होता.
आखातात गेलेली सगळी मुलं येताना तीन वस्तू आठवणीने आणायची. बोस्कीचं झुळझुळतं कापडं -इंटीमेट स्प्रे आणि सोनीच्या सी -९० च्या कॅसेट. या तिन्ही वस्तू म्हणजे नव श्रीमंताची स्टेटस सिंबॉल . श्रम संस्कृतीचं फॅशन स्टेटमेंट.
कॅसेट आल्या .कॅसेट भरण्याची दुकानं आली. आपसात आवडणार्‍या गाण्यांची देवघेव व्हायला लागली . मग डुप्लिकेट सोनीच्या कॅसेटी आल्या .नल्ला कॅसेटीतून टेप भसाभसा बाहेर पडून टेपरेकॉर्डरच्या हेडला फास लावायची .कॅसेट असली -नकली समजणार्‍याकडे पोरं भक्तीभावानी बघायला लागली . हळूहळू सी ९० जाऊन टीडीकेच्या कॅसेटी आल्या. टीडीके नल्ला मिळायच्या नाहीत म्हणून त्यांचा भाव जास्त असायचा .
काही वर्षानी जंबो रोल भारतात कट व्हायला लागले आणि वर्शन रेकॉर्डींगची एक नवीनच कहाणी सुरु झाली.
पांढरं स्वच्छ झुळझु़ळीत बोस्कीचं कापड खरं म्हणजे कोरीयात तयार व्हायचं पण आपल्याकडे आलं दुबईमार्गे. बोस्की म्हणजे शॅटुंग सिल्कचाच एक प्रकार . पण शॅटुंग खरखरीत आणि जाड असतं बोस्की हलकं आणि पूर्णपणे मानवनिर्मीत धाग्यातून बनवलेलं .त्यामुळे डागळलं तरी थोडासा साबण लावला की परत टवटवीत स्वच्छ दिसायला लागायचं . त्या कपड्याची क्रेझ बरेच दिवस टिकली . हे नाव विस्मरणातही गेलं असतं पण लोकांनी त्यांच्या पॉमेरीयन कुत्र्यांची (मुलींचीही) नाव बोस्की ठेवायला सुरुवात केली आणि बोस्की कायमचं लक्षात राहीलं.पण हळूहळू बोस्कीच्या कापडाची नवाई संपली इंटीमेट चा सुगंधही कंटाळवाणा झाला.
दुबईच्या वार्‍याचा जोर कमी झाला आणि सिलीकॉन वॅलीचे वारे वहायला लागले .
दुबईच्या वार्‍यानी श्रमजीवींचा उध्दार केला आणि सिलीकॉन वॅलीनी बुध्दीजीवींचा .
जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .
एव्हरी अंडरडॉग हॅज हि़ज डे.

{आज दुपारी लोकप्रभामध्ये हा}

आज दुपारी लोकप्रभामध्ये हा लेख वाचला होता.
बाबा असते तर त्यांनी सांगितले असते या कापडाबद्दल नक्कीच हास्य


Hope is a good thing...

{मजेशीर माहीती}

मजेशीर माहीती, निरिक्षण आहे.
आम्ही कधीच न ऐकलेली.

{+१}

+१

{लोकप्रभात हा लेख वाचला होता.}

लोकप्रभात हा लेख वाचला होता. आवडला.

{नवीन माहिती कळाली.}

नवीन माहिती कळाली.

{खूप काहीतरी सांगायच असताना}

खूप काहीतरी सांगायच असताना बोलणा-याने अचानक गप्प व्हाव तस वाटल .. लेख अगदी अचानक संपला ..

{आजच घरी फोन करून खात्री करून}

आजच घरी फोन करून खात्री करून घेतली wink
सी ९० च्या कॅसेट आहेत अजून जुन्या घरात पडलेल्या.
गाणी भरून देण्याचा धंदा लहान मामाने चालू केला होता, पुर्ण चिक्कोडी, रायबाग पंचक्रोशीत त्यावेळी एकमेव दुकान.


Hope is a good thing...