काय म्हणता, तुम्ही देव पाहिला नाही ?

0
0
देवाशप्पथ ( पक्षी : सचिनशप्पथ ) सांगतो काल सकाळी उठल्यावर कालचा दिवस खुप भारी असेल असे अजिबात वाटले नव्हते, त्यात देवदर्शन होईल असे तर अजिबातच वाटले नव्हते. संध्याकाळच्या ५.३० ची वेळ, नेहमीप्रमाणे गडबडीत सर्व आवरुन घरी पळायच्या गतीतली आमची सवय. कामे फ़टाफ़ट उरकणे चालु होते, एका मित्राचा फ़ोन आला, तो नुकताच खाली कॊफ़ी प्यायच्या निमित्ताने ( पोरी पहायला ) गेला होता. तो म्हणत होता पटकन खाली ये, एक भारी घटना घडते आहे व ती पहायला भाग्य लागते.
जास्त आढेवेढे न घेता आम्ही हातातले काम सोडुन खाली मॊलमध्ये गेलो.

आणि काय सांगु दोस्तहो, काल चक्क देव पहायला मिळाला.
अगदी नक्की, तो देवच होता, त्याशिवाय काय अशा अचाट लीला तो इतक्या लिलया करु शकत होता.
ह्या देवाचे मायंदळ भक्त जमले होते दर्शनासाठी, जोरदार जयघोष चालु होता व देव आपल्या भक्तांना क्षणाक्षणाला काहीतरी नविन देऊन खुष करत होता.
शंकाच नाही, देवच होता तो.


काय म्हणता ?
देव कसा दिसतो ? तो कसा बोलतो ? तो कसा चालतो ? तो काय करतो ?
काय म्हणता ?
तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?


अगदी जुनी घटना आहे पहा, काळ होता १९८८ चा, मुंबईच्या आझाद मैदानावर एका १४ वर्षाच्या तरुणाच्या रुपाने एका क्रिकेटमधल्या चमत्काराने ... छे छे देवानेच अवतार घेतला होता. त्याने व त्याच्या एका शाळकरी सोबत्याने मिळुन ह्या मैदानावर ६६४ धावांची रास रचली होती व ती ही नाबाद. भल्याभल्यांच्या तोंडात बोट घालायला लावणारी ही घटना होती व देवाच्या भावी चमत्कारांची ही फ़क्त एक झलक होती.
काय सांगता ? तुम्हाला आठवत नाही कोण होता तो ?
हे पहा जरा शेजारी कोण आहे ते ...




ही घटना आहे डिसेंबर १९८९, सियालकोट पाकिस्तान मधली एक कसोटी. १६ वर्षाचं एक कोवळं पोरं मैदानावर उतरतं. बेभान आणि टारगट पब्लिकची "दुध पिता बच्चा ... घर जा" नारेबाजी चालु, ह्या पोराचा त्याला खणखणीत फ़लंदाजीद्वारे तडाखेबंद प्रतिसाद. महान गोलंदाज अब्लुद कादिरचे ह्या पोराला उचकावणे व त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये ह्या मात्र १६ वर्षाच्या पोराने त्याला खणखणीत असे ४ षटकार आणि १ चौकार लगावणे.
काय म्हणता ? कोण होता तो मुलगा ?
अहो काय सांगु, सैतानांच्या असल्या गदारोळात धिरोदत्तपणे आपल्या टिमच्या मागे उभा राहणारा तो १६ वर्षाचा कोवळा मुलगा एक देवच होता.




सन १९९०, ऒगस्टचा महिना, भारताचा इंग्लड दौरा व त्यातली एक महत्वाची कसोटी. भारताच्या इनिंगची दुसरी वेळ, बरीच पडझड झालेली, भारत अलमोस्ट पराभवाच्या छायेत. एक पोरगा पुन्हा एकदा अफ़ाट धैर्याने एका भिंतीसारखा खेळपट्टीवर उभा राहतो व आपल्या नाबाद ११९ रनांच्या जोरावर भारताचा नक्की असलेला पराभव टाळुन कसोटी अनिर्णीत ठेऊन भारताची शान राखतो.
आख्ख्या गोकुळाचा डोलारा आपल्या बोटावर सावरणा-या भगवान कॄष्णासारखाच ह्या पोराचा करिष्मा !
आपल्या साथिदारांच्या मदतीसाठी धावुन येणारा व आख्खा डोलारा सावरणारा हा पोरगा देवासमच नव्हता का ?




नोव्हेंबर १९९३ मधल्या हिरोकपच्या पहिल्या सेमीफ़ायनलची गोष्ट, जवळजवळ ८० हजार प्रे़क्षकांसमोर भारत आणि द्क्षिण आफ़्रिकेची लढत, आफ़्रिकेला हव्या आहेत शेवटच्या शटकात ६ धावा त्या सामना जिंकुन दिमाखात फ़ायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. कर्णधार अझरुद्दिन समोर यक्षप्रश्न ! संघात कपिल, प्रभाकर, कुंबळे, जवागल श्रीनाथसारखे दिग्गज गोलंदाज, चेंडु दिला जातो एका नवख्या बदली गोलंदाजाकडे. ना ह्याचा विकेट घेण्याबाबतचा दबदबा वा धावा रोखण्याचा लौकिक. पण एक महान आश्चर्य घडते, आफ़्रिकेला ह्या नवख्या गोलंदाजाच्या ६ चेंडुत केवळ ३ धावा काढता येतात व सामना भारत खिषात टाकतो.
कोण होता हा बदली जादुगर गोलंदाज ?
कुरुक्षेत्रावर कौशल्याने आपल्या रथाचे सारथ्य करुन पार्थाला योग्य त्या वेळेस योग्य त्या ठिकाणी न्हेण्या-या भगवान श्रीकॄष्णासारखेच कौशल्य ह्या बदली गोलंदाजाने त्या वेळी दाखवुन आपल्या संघाची नाव एकदम व्यवस्थितपणे किना-याला लावली ना ?




फ़ेब-मार्च १९९६ चा मोसम, वेळ होती ती वर्ल्डकपची. कौरवांच्या लक्ष लक्ष सेनेत अनिर्बंध संचार करणा-या, जो समोर येईल त्याला आपल्या अतुलनीय आणि नेत्रदिपक पराक्रमाने नेस्तनाबुद करणा-या, अपराजीत अशा अर्जुनाप्रमाणे क्रिकेटमधल्या एका योद्ध्याचा धुमाकुळ आख्ख्या स्पर्धेत चालु होता. कोणत्याच संघाच्या कोणत्याच कर्णधाराचे डावपेच त्याला रोखण्यात यशस्वी झाले नव्हते, त्याच्याकडुन अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातुन निघणा-या अगणित बाणासारखीच धावांची बरसात चालु होती व त्याखाली कित्येक गोलंदाजांची कत्तल घडत होती. २ शतके आणि ३ अर्ध शतकांच्या मदतीने त्या शुर वीराने ८७.१६ च्या सरासरीने ५२३ धावांचा पाऊस ह्या स्पर्धेत पाडला.
दैवातीत कार्यच हे, यासम हाच !




सन १९९८, मार्च महिना. जगजेत्ता ऒस्ट्रेलिया संघ भारतात आपल्या विजयाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन आला होता, त्यांना रोखण्यात आत्तापर्यंत कोणत्याच क्रिकेट साम्राज्याला यश आले नव्हते, जिकडे हे जातील तिकडे समोरच्या संघाने त्यांना ’शरणचिठ्ठी’ लिहुन दिलेली असते. मात्र भारतात त्यांचे साफ़ पानीपत होते व कांगारु खालमानेने परत जातात, टेस्टमॆचमध्ये त्यांचा २-१ असा सरळ पराभव झालेला असतो. जरी ही मालिका हरभजनसिंगच्या जादुई फ़िरकीमुळे गाजली असली तरी फ़लंदाजीत एक सुर्य अखंड मालिकाभर तळपत होता. १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक ह्यांच्या मदतीने त्याने कांगारुंच्या नाकात दम आणला होता.




ह्यावेळची युद्धभुमी होती ती म्हणजे क्रिकेटची पंढरी, काशी, मक्का, मदिना जे काही पवित्र असेल ते असे इंग्लंड, काळ होता १९९९ च्या विश्वचषकाचा.
ह्यावेळची एक उल्लेखनीय घटना म्हणजे ह्या दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले असताना वैयक्तिक दु:ख स्वत:पुरते वैयक्तिकच ठेवुन संघासाठी पुढच्या सामन्यात शतक झळकावले व त्यानंतर हे शतक आभाळाकडे बघत आपल्या वडिलांना अर्पण केले. देवाशप्पथ सांगतो त्या दिवशी अनेक रसिक त्याच्या बरोबरीने २ थेंब का होईना जरुर रडले असतील.
हाच सिलसिला त्याने पुढच्या २००३ च्या आफ्रिकेच्या वर्ल्ड कपमध्येही चालु ठेवला.
ह्यावेळी त्याने तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ६७३ धावांची रास रचली, भारताला फायनलमध्ये घेऊन गेला व ऑस्ट्रेलिया स्पर्धा जिंकुनही ह्याने "मालिकावीराचा पुरस्कार" आपल्या खिषात घातला




कसोटीत सर्वाधीक धावांचे आधी १३००० मग १४००० त्यानंतर आता १५००० धावा असे स्वत:चेच विक्रम मोडत राहणारा हा आमचा देव, कसोटीमध्ये सर्वाधिक अशा ४७ सेंच्यु-या झळकावणारा हा आमचा हिरो, २० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत १६६ कसोटी सामने खेळुन ५०+ ची अविश्वसनीय सरासरी असणारा हा फ़लंदाजांचा फ़लंदाज, ४४२ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात खेळल्याची ह्याच्य नावावर नोंद, त्यातली सलग १८५ सामन्यांमध्ये विना विश्रांती खेळण्याचा भीमपराक्रम, एक दिवसीय सामन्यांमध्ये ४६ शतकांच्या जोरावर ४५+ च्या सरासरीने १७००० ह्य्न अधिक धावांची रास, २ वेळा संघाचे नेतॄत्व कठिण वेळी संभाळण्याची कामगिरी, केवळ चौकारांच्या मदतीने शतक करण्याची जादुई कामगिरी ( एका सामन्यात २५ चौकार ) , ६१ वेळा सामनावीर आणि १५ वेळा मालिकावीर ठरण्याचा झंझावत, सौरव गांगुलीसोबत ६२७१ रनांच्या भागिदारीचा अशक्यप्राय विश्वविक्रम, २ पद्म पुरस्कार १ अर्जुन पुरस्कार १ विस्डेनचा सन्मान आणि राजीव गांधी खेलरत्न सन्मान अशा अनेक सन्मानांची रास, सभ्य माणसांच्या क्रिकेट खेळामधला सर्वात सभ्य माणुस अशी ख्याती ...
किती लिहायचे आणि किती वगळायचे ?


पण काल एक आश्चर्य घडले, असे कधी झाले नव्हते आणि असे कधी होणार नाही. हे मर्त्य मानवाचे कामच नव्हे, अशा कामगिरीसाठी काही दैवी शक्ती हव्यात अशी एक समजुत.
एका एकदिवसीय सामन्यात १४७ चेंडुंच्या मोबदल्यात २०० नाबाद धावांचा विश्वविक्रम....
जे स्वप्नातली पाहिले नव्हते ते याची देही याची डोळा अनुभवायास मिळाले.
भरुन पावलो, धन्य झालो !
आमच्या पुढच्या पिढीला "आम्ही सचिनची एक दिवसीय सामन्यामधली डब्बल सेंच्युरी पाहिली" ही आठवण सांगत आम्ही आयुष्यभर सुखी राहु ...!!!
"झाले बहु, होतील ही बहु,परंतु यासम हाच !!! "




आणि काय म्हणता ?
एवढे समळे पाहुन तुम्ही म्हणता तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?
आम्ही काल देव पाहिला व त्याच्या दैवी चमत्काराने आम्ही भरुन पावलो, ह्या क्रिकेटप्रेमी जन्माचे सार्थक झाले !
वि.सु. : सर्व प्रतिमा आणि सांखिकी आंतरजालावरुन साभार .....

{मस्त..}

लेख आवडला, कालपासून एक खूप जुनी आठवण ताजी झाली आहे.. ठाण्याला बर्‍याच वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेवला रमाकांत देसाई बेनिफिट म्याच होती. ती पहायला आम्ही गेलो होतो, तिकिटं पॅव्हिलियनच्या अगदी जवळची होती, सुनील गावसकर आणि संदीप पाटीलला पहायचं मेन आकर्षण होतं. सचिन आणि विनोद कांबळी सुध्दा त्या सामन्यात दणकून खेळले होते आणि हे ते बरं का, शारदाश्रम वाले.. अशी चर्चा होती... अगदी हाताच्या अंतरावर सचिनला पाहिले ,त्याच्याशी मस्त खेळलास, मजा आली असं आम्ही बोल्लोही पण त्यावेळी जवळ क्यामेराही नव्हता आणि ऑटोग्राफ वगैरे घेण्याचं काही सुचलं नाही... सुचलं नाही पेक्षा तेव्हा तो इतका मोठ्ठा होईल असं डोक्यातच आलं नाही, त्यामुळे कोणीच त्याची ऑटोग्राफ घेतली नाही... अजून पश्चात्ताप होतो आहे त्याचा..
स्वाती

{मस्त... !!!}

मस्त... !!!

{सुरेख लेखण .. आणि त्याहुन}

सुरेख लेखण .. आणि त्याहुन सुरेख मांडणी.. जियो डाण जियो !!

कधी तरी आमच्या आवडत्या सौरव गांगुली बद्दलही असाच ल्योख येऊन द्या हास्य

गरिबांचा सचिन तेंडुलकर = सेहवाग हास्य

{नतद्रष्ट}

तो फक्त स्वःत करता खेळतो म्हणणारे महाभाग आहेत की.
असो.
मस्त लेख.

{मस्तच जमलाय लेख.. यासाठीच}

मस्तच जमलाय लेख..
यासाठीच आम्ही म्हणतो... वायदेआझम लिहिते व्हा... हास्य
लेखन, मांडणी.. गाभा.. नि सचिनच्या आठवणी..!!!! भट्टी झकास जमून आलीय!!!!

जाता जाता...आपला देव त्याच्या बाबांची कविता वाचून दाखवताना.. दुवा

{डॉणराव डॉणराव... काल पासुन}

डॉणराव डॉणराव...
काल पासुन असा लेख लिहायचे मनात होते..
पण साला वेळ्च नाही जमली...
सचिनच्या टॉप टेन शतकांबद्दल
लेख मांडणी कंटेट म्हणजे
ज ब र द स्त


-निखिल

{देवाऽऽऽ....}

तोडलंस रे....जिंकलंस..जिंकलस!!!

{डॉन्या डॉन्या.... लेका ! लै}

डॉन्या डॉन्या.... लेका !

लै भारी रे.... डोळ्यात कधी पाणी तराळले कळलेच नाही हास्य

मस्त लिहले आहेस.....

देव म्हणजे हाच !

बाकी दुसरा असणे शक्य नाही ...


Hope is a good thing...

{डॉन्या एकच}

डॉन्या एकच शब्द
............खल्लास.....

{मस्त लेख ..}

झाले बहु , होतील बहु ..परंतु या सम हाच ...
@ डॉन्राव ...
थोडी दुरुस्ती ...
१९९९ चा मालिकावीर , लान्स क्लुसनर होता आणि भारत २००३ मध्ये फायनलमध्ये पोहोचला ..

{बरोबर आहे}

संग्राम, तुझे बरोबर आहे.

लिहण्यातली ( नेहमीची ) गडबड आणि किंचितसा निष्काळजीपणा ह्यामुळे तपशीलात काही अक्षम्य चुका झाल्या होत्या.
त्या सावरण्याचा नादत अजुन गोंधळ झाला.

असो, आता दुरुस्ती केली आहे शक्य तितकी.
आभारी आहे योग्य माहितीसाठी.

ह्य निमित्ताने घडलेल्या चुकांबद्दल मी दिलगीर आहे असे समस्त वाचकांना मी कळवु इच्छितो. Sad

- ( दिलगीर ) छोटा डॉन

{लेख लै म्हणजे लै भारी झालाय}

लेख लै म्हणजे लै भारी झालाय डॉन्राव!
अजून लिही ह्या देवा बद्दल... वाचावे, ऐकावे, बघावे तेवढे थोडेच!!

-अनामिक

{अक्षरशः शब्द अन शब्द सहमत आहे}

अक्षरशः शब्द अन शब्द सहमत आहे !


Hope is a good thing...

{लेख}

लेख मस्तच.

पण ...

ह्यावेळची युद्धभुमी होती ती म्हणजे क्रिकेटची पंढरी, काशी, मक्का, मदिना जे काही पवित्र असेल ते असे इंग्लंड, काळ होता १९९९ च्या विश्वचषकाचा. ह्या महानायकाने आपल्या बॆटचे असे काही पाणी प्रतिस्पर्धी संघाला दाखवले की त्याच्या एकुण धावांच्या जोरावर भारत फ़ायनलला कधी आला ते कुणालाच समजले नाही

इथे काहितरी लोचा आहे. २००३ च्या वर्ल्ड्कप बद्दल लिहायच असावं

{+१}

सहमत आहे.
माझी चुक झाली.

मला आधी त्याच्या वर्ल्ड कपच्या मालिकावीर ह्याबद्दलच लिहायचे होते पण त्यात गडबडीने किंवा निष्काळजीपणे म्हणा मी चुकुन तो २००३ चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये झाला असे लिहले व त्या अनुषंगाने त्याचे वडिलांच्या निधनाची घटना अनावधाने त्यात नोंदवीली गेली.
आता शक्य ती दुरुस्ती केली आहे.

झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व !

{झाले}

झाले बहु, होतील ही बहु,परंतु यासम हाच !!!

हे मात्र वादलेस

{ह्म्म}

भावना पोहोचल्या पण देव कशाला म्हणालात? ते देखील डान्राव तुम्ही???

असो ते चॅपेल बंधू काय म्हणाले हो? का लपले आहेत? २००७ मधे

जबरदस्त खेळाडू व महान व्यक्ती!

{+१}

>>> असो ते चॅपेल बंधू काय म्हणाले हो? का लपले आहेत
--- चार वर्षांपूर्वी मुखपृष्ठावर Endulkar? असा मथळा छापणार्‍या टॅब्लॉईड ऑफ इंडियातली उतू जाणारी स्तुती पाहूनही अशीच माफक करमणूक झाली. बाकी संकेतस्थळे असोत वा टॅब्लॉईड्स (दोघांत फारसा फरक नाही असे काही लोक म्हणतील, पण तो भाग अलाहिदा) यांचे धोरणात 'अबाऊट टर्न' करण्याचे आणि काही घडलेच नाही असे भासवण्याचे कौशल्य दूध डोळे मिटून पिणार्‍या मांजरालाही शरम आणील असेच wink

{मी बघतॉय हां!}

नंदन, तू आजकाल संधी मिळेल तेव्हा नख्यांना धार काढत असतोस! wink

(बेशरम)चतुरंग

{"बेशरम = वाघनख" का हो}

"बेशरम = वाघनख" का हो रंगाशेठ??

{काही जुने}

{सर्वांच्या भावना अगदी बरोबर}

सर्वांच्या भावना अगदी बरोबर शब्दात मांडल्यास!!

{मस्त }

लेख मस्त जमलाय. आवडला.

{सचिन बॅटींग करायला लागला की}

सचिन बॅटींग करायला लागला की बॅटींगही फार सोपी वाटायला लागते.

डान्राव, लेख उत्तम जमला आहे.

{सु रे ख ले ख न !}

सु रे ख ले ख न !

{डाणोजीराव}

अजी म्या ब्रम्ह पाहीले. लेख आवडला भौ. मस्त लिवलय.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{सचिनच्या बॅटिंगवर हर्ष}

सचिनच्या बॅटिंगवर हर्ष भोगलेचं एक वाक्य आठवलं
Sachin going for a run after that shot is like picasso asking a penny for his sketch!

{मस्त!}

Grade Grade Grade Grade Grade Grade Grade Grade Grade
लेखन आणि देवापुढे Grade


-ऋ

{छोट्या (पक्षी : डॉनराव)}

लेख एकदम दिलसे झालाय! अगदी उत्स्फूर्त. छान वाटतं वाचायला.

{एकदम चौक्कस लिखाण रे}

एकदम चौक्कस लिखाण रे डॉन्या...

एक संदर्भ .....सच्यानी २०० केले ते २४ फेब्रुवारीला, आणी वीस वर्षापुर्वी त्याच दिवशी ..त्याच्या शालेय कारकिर्दीत त्यानी आणी कांबळीने ६५० रन्स केले होते....तीन दिवस खेळत होते .....

{डॉन्या मेरे दिलकी बात तुने}

डॉन्या मेरे दिलकी बात तुने कागज पे उतार दी wink

अ प्र ति म लेखन भौ.

{सुंदर लेख}

खुपच छान...ऑसमच लेख!!

आमच्या डिलिंग मध्ये झालेला टाळ्यांचा कडकडाट अजुन ऐकु येत आहे...ऑसमच.... हास्य


राधा
Grade Innocent Quest

||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||

{चांगला लेख..}

भावना मस्त ..
लेख वाचून मजा आली...
शेजारी जोडलेली छायाचित्रेही उत्तम.. तपशीलातल्या काही चुका वरती आहेतच.. आम्हाला अजून सापडलेल्या काही मिष्टेक्स...

टेस्टमॆचमध्ये त्यांचा २-१ असा सरळ पराभव झालेला असतो. जरी ही मालिका हरभजनसिंगच्या जादुई फ़िरकीमुळे गाजली असली तरी फ़लंदाजीत एक सुर्य अखंड मालिकाभर तळपत होता. १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक ह्यांच्या मदतीने त्याने कांगारुंच्या नाकात दम आणला होता.

१.१९९८ ची सीरीज हरभजनच्या फ़िरकीमुळे गाजली नव्हती... ती २००१ ची सीरीज...
१९९८ च्या सीरीजपर्यंत सचिनने टेस्टमध्ये द्विशतक केलेले नव्हते.... सचिनची टोटल ४ द्विशतके, ऒस्ट्रेलियाविरुद्ध त्यातले एक.. ते सिडनीत केलेले.. नाबाद २४१
सचिनने १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक असा स्कोअर ऒस्ट्रेलियाविरुद्धच्या कोणत्याही सीरीजमध्ये केला नाही..

{आयचा घो ...}

आयचा घो ह्या "क्रिक इंफो" वाल्यांच्या...
त्यांचा डेटा मोस्ट रिलायबल म्हणुन मी रेफरंसला घेतला ...

२. १९९८ च्या सीरीजपर्यंत सचिनने टेस्टमध्ये द्विशतक केलेले नव्हते.... सचिनची टोटल ४ द्विशतके, ऒस्ट्रेलियाविरुद्ध त्यातले एक.. ते सिडनीत केलेले.. नाबाद २४१
सचिनने १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक असा स्कोअर ऒस्ट्रेलियाविरुद्धच्या कोणत्याही सीरीजमध्ये केला नाही.

असो.
आता हे वाचा ...
February-March, 1998
His finest series
Gets his maiden first-class double-hundred and two hundreds and a fifty in three Tests against Australia. India win the home-series 2-1.
आता बोला ?
मी ह्याचाच संदर्भ घेतला आणि तोंडघाशी पडलो हो.
ते वेबपेज हे आहे ...
http://www.cricinfo.com/india/content/player/35320.html?index=timeline

बाकी भज्जी बद्दल जरा गल्लत झाली माझी.

पण जाता जाता ह्या क्रिक इंफोवाल्यांच्या आयचा घो ...!!!

- संतप्त ( छोटा डॉन )

{प्रथम श्रेणी}

क्रिकइन्फो वाले बरोबर आहेत हो, डॉण्राव. साहेबांनी मुंबईतर्फे खेळताना (रणजी विजेते वि. पाहुणा संघ असा सराव सामना) १९२ चेंडूत २०४ धावा ठोकल्या होत्या. म्हणून त्यांनी पहिल्या श्रेणीच्या सामन्यातले द्विशतक म्हटले आहे. दुर्दैवाने त्याची क्षणचित्रं कुठे उपलब्ध नाहीत, पण लै धुतलं होतं वॉर्नला. लेगस्टंपच्या बाहेर गार्ड घेऊन हातभर वळणारे लेगब्रेक मिड-ऑन वरून प्रेक्षकांत फेकून देण्याची सुरुवात तिथेच झाली प्रथम हास्य

{:)}

जेष्ठ माहितीकोष 'नंदनोक्लिपेडिया'चे आभार...
मला खरोखर ही माहिती नव्हती.

स्वगतः डानुरंगा तु जे काही केलेस त्यालाच "हाराकिरी" म्हनतात का रे क्रिकेटच्या भाषेत ? wink

{आयला रणजी सरावसामना धरायचा}

आयला रणजी सरावसामना धरायचा होय?
हां..
मग बरोबर आहे,,
मुंबई सराव सामना... द्विशतक, चेन्नई पहिली टेस्ट ४ आणि १५५, कोलकाता दुसरी टेस्ट क्विक हाफ सेन्चुरी, ( ही म्याच डावाने जिंकलो होतो), आणि बेंगलोर तिसरी टेस्ट १७७ ( ही म्याच हरलो..त्यात मार्क वॉ लै खेळला, आणि क्यास्प्रोविच ने विकेटा काढल्या आपल्या पुष्कळ ..आणि म्यान ऑफ द म्याच होता).. म्हणजे दोन शतकं क द्विशतक आणि क अर्धशतक झालं..,

{मस्त लिहिले आहे रे डान्या..}

मस्त लिहिले आहे रे डान्या..