THE FATE !!

0
0

तो दिवस तसा सामान्यच होता, अगदी माझ्या बंगलोर वास्तव्यातल्या रोजच्या दिनक्रमासारखा! जवळ-पास सिंगल बॅचलर्स लाईफ!! रूम वर सकाळी सुमारे ११ च्या सुमारास उठायचे, ११. ४५ पर्यंत फ्रेश व्हायचे, काहीतरी पोटात ढकलायला बनवायचे, खायचे आणि निघायचे. जाताना टपरीवर चहा-सिगरेट मारायचा, चालत-चालत ई-सिटीस्थित प्रशस्त इन्फोसिसच्या गेट न. सहा पर्यंत पोहोचायचे, आपल्या क्यूबिकल ला एकदा पोचलो की काम, सोशल नेटवर्किंग च्या साईट्स आणि ब्रेक घेत आपली ८ वाजेपर्यंतची शिफ्ट संपवायची. मग शांतपणे ईसिटीतच आपल्याकडील देशी दारूच्या दुकानासारख्या दिसणार्‍या बार मध्ये एखादी क्वार्टर घेत बसायचे, काही मोडक्या तोडक्या कन्नड-हिंदी भाषेत गप्पा टाकायच्या, काही गाणे ऐकायचे, काही फोना-फोनी आणी जाताना आणखी एक पार्सल घ्यायची, जेवण बनवीत, काही लॅपीवर गाणे ऐकता-ऐकता, खात -पीत झोपून जायचे..... पुन्हा सकाळी ११ च्या सुमारास....

पण त्या दिवशी संध्याकाळी सात पासून च काहीतरी बिनसले आहे असे वाटत होते. नेमके काय तेच कळत नव्हते. घरी फोन करून सगळे काही ठीक असल्याची खात्री करून घेतली, मनाला शांत करण्यासाठी एव्हढे पुरेसे होते.
सरते शेवटी ऑफिसमधून सगळे काही बंद करून (मनातले विचार सुद्धा) माझी पावले बार च्या दिशेने निघाली. बारमध्ये शिरताना मी आज काहीतरी वेगळेच पाहिले. या बार बाहेर एक साधारण पन्नाशीचा वृद्ध माणूस काही फळे विक्रीला घेऊन बसायचा. स्वच्छ पांढरी लुंगी, त्यावर तितकाच, अगदी मिल्की व्हाईट म्हणावा असा सदरा, आकडेबाज पांढर्‍या फटक मिशा आणि तितक्याच शुभ्र भुवया. कपाळावर भगवं गंध! मी नेहमी आत शिरताना एखादा पेरू वा कैरी चकण्याला म्हणून खरेदी करत असे. तो आधी प्रसन्नचित्त मुद्रेने माझ्याकडे पाहत असे, जे काही मी खरेदी केले त्याबरोबर मिठाची पुडी बांधून देत असे, पैसे घेताना त्याची हास्य मुद्रा माझे नेहमी लक्ष वेधून घेत असे, जणू कोणीतरी आपल्याला ग्रॅन्ड वेलकम केले आहे........ लक्षवेधी हास्य... लक्षवेधी!

आजही त्याने लक्ष वेधून घेतले..... पण वेगळ्या कारणासाठी.... तो आज आडवा पडलेला होता, त्याचे तोंड उघडे होते आणि जरा लाळ बाहेर आल्यासारखी दिसत होती. हालचाली अजिबात नव्हत्या, डोळे निश्चल होते. माझी दारू ची तलफ भागवायचा आवेग म्हणा किंवा त्या क्षणी मला त्याचे तसे पडणे, झोप लागणे, पिऊन पडणे वाटले असावे म्हणून मी दुर्लक्ष करीत थेट आत शिरलो. शुक्रवार संध्याकाळचा रिलॅक्सनेस होता. खांद्यावरची बॅग काढून बाजूला ठेवली. दारू मागविली. प्रत्येक घोटाबरोबर मेंदू मोकळा होत होता. सिगारेटचा कश न कश कैफ वाढवायला मदत करत होता, डोळे आणि हालचाली मंदावत चालल्या होत्या. साडे-दहाच्या सुमारास मी शेवटचा पेग भरला. सिप मारण्याच्या आधी एक पार्सल मागविली. दरवाज्यापाशी रोजच्या प्रमाणे बार बंद करण्याची तंबी देण्याकरता आणि स्वतःचा कोटा घेण्याकरता दोन कॉन्स्टेबल उभे होते.

सिप संपवून मी बाहेर आलो. पुन्हा त्याच्याकडे लक्ष गेले. थबकलो! तो तसाच पडून होता. कॉन्स्टेबल ने हिंदी ची चिरफाड करत वेटरला, मला उद्देशून 'काय झाले' विचारले. मी खाली वाकून त्याच्या नाकापाशी बोट नेले, मग आधी माने पाशी नंतर हाताची नस चेक केली. खाडकन नशा उतरली !! मला त्याची धक-धक च जाणवेना. वेटर ने पाहिले, त्याने तेच केले. तो निष्प्राण होता, मेला होता. दोन तास... की त्या आधीच..... माझ्या डोळ्यात पाणी तरळून गेले, कॉन्स्टेबल ने कन्फर्म केले. ही वॉज डेड!!

दोन क्षण काही सुचलेच नाही, ना इतर कोणाला ना मला, कोण आहे? कुठला आहे? काहीच माहीत नाही? बरं संबंध ही नाही. एका त्या स्मितहास्यापलीकडे मी त्याला ओळखत नाही. आणि तो मला ओळख दाखविण्याच्या पलीकडे निघून गेलेला. कॉन्स्टेबल नशेत, ड्यूटीवर! त्याचा चेहरा वैतागलेला. शेवटी अ‍ॅम्बुलन्स आणायचे कोणीतरी सुचविले, भाषेची अडचण, वेटर मंडळी काही तेलगू, काही तमीळ, कॉन्स्टेबल कन्नड, मी त्यांच्यामध्ये मराठी, थांबायला कारण नाही, निघायसाठी मानसिक तयारी नाही. कॉन्स्टेबल ने पंचनाम्याचे नाव काढले आणि बरीच मंडळी पसार!

कॉन्स्टेबल ने बार पाशी केलेला पंचनामा हातात दिला. आमच्या सह्या, नाव, फोन नं टिपून घेतला. प्रेत ऍम्ब्युलन्स मध्ये चढविले आणि रवाना झाली, सवयीनुसार घरी गेलो, पार्सल संपविता-संपविता आणि विचार करता-करता कधी झोप लागली ते कळला नाही. खरंच! कळलं नाही.... शनिवार-रविवार कसा गेला ते ही कळले नाही... सोमवार. मंगळवार.. बुधवार... कसा गेला कळले नाही.... गुरुवारी मात्र बर्‍याच लिंक लागत गेल्या.

गुरुवारी तीनच्या सुमारास माझा मोबाईल व्हायब्रेट झाला. उचलल्या वर, पहिले काही क्षण त्या आवाजाचा अर्थच लागेना, भाषा च निराळी! त्याची इंग्रजी माझ्या डोक्यावरून चालली होती. आणि माझी त्याच्या डोक्यावरून, डोके फिरायच्या आधी त्याने ' तेलगू, तेलगू ' असे उच्चारले आणि मी सरळ फोन माझ्या कलिगच्या हातात दिला. फोन झाल्यावर कलिग ने शांतपण मला स्मोकिंग झोन ला नेले. तिथे.........

त्याची बॉडी क्लेम करायला कोणी आले नाही, तू जबाबदारी घे, असाही दारू इ. इ. ला किती पैसे घालवितोस. ती बॉडी मेडिकल कॉलेज ला गेली की पुन्हा चिरफाड, जस्ट ट्राय!! नकार देण्यासारखे काही कारण नव्हते, शुक्रवारी चारच्या सुमारास सरकारी इस्पितळातील सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर, अंत्यसंस्काराला जास्त माणसे नव्हती; नसायचीच! वेटर ने च सारे काही केले, मी फक्त खर्च करण्यापुरता... तिथे त्याच्याविषयी अजून माहिती मिळाली. हा वृद्ध ई-सिटी पासून २०-२५ मिनिटांच्या अंतरावर एका जुनाट मंदिरात राहत असे, त्या मंदिराला वर्दळ नव्हतीच अशी, शिवाय हा तिथे फक्त रात्री झोपण्यापुरताच जात असे, मात्र त्याच भागात एक विशाल, भारतातील सर्वात मोठा असा एक फळ-विक्री बाजार आहे, तिथे तो दिवसभर पडेल ते काम करत असे, राहिलेली फळे तो विक्रीस आणत असे. म्हणजे उरली-सुरली फळे मी किंवा इतर गिर्‍हाईक त्याच्याकडून विकत घेत असू, क्षणभर मला त्याचा राग आल्याशिवाय राहिला नाही......

पण सर्वात महत्त्वाची माहिती मात्र अशी होती, मृत्यू-पश्चात तपासणीत,(त्यादिवशी घाई गडबडीत कॉन्स्टेबलचे लक्ष गेले नाही.) त्याच्या शर्ट च्या खिशात एक तेलगू भाषेत लिहिलेला पत्ता होता, फक्त पत्ता! त्या पत्त्यावर आधी तार केली गेली, त्याला काही रिस्पॉन्स आला नाही. मग राज्य पोलिसांची मदत घेऊन चौकशी केली गेली, बॉडी क्लेम करण्याच्या बाबतीत त्या पत्त्यावर कोणीच पॉझिटिव्ह नव्हते. सरते शेवटी जी काही सरकारी प्रोसेस असते, ती करण्याची ठरविले, पण त्या आधी मला फोन करून एक चान्स घ्यावा असे त्या कॉन्स्टेबल ला वाटले.

अस्थिकलश घेऊन मी रूमवर परतलो, त्याचे एक कारण म्हणजे इस्पितळात आणि अंत्यसंस्काराला खूप वेळ लागला, परतायलाच रात्र झाली, आणि दुसरे म्हणजे मी आठवड्याभरातच पुण्याला निघणार होतो. एकदा लोहगांव ला पोचलो की तिथून इंद्रायणी किंवा तुळापुर लांब नाही, तो अस्थि-कलश रूम वर व्यवस्थित ठेवलेला होता.... पाच दिवसांनी... म्हणजे बरोबर मंगळवारी... तब्येत बरी नसल्याने मी रूम वरून च काम करत होतो. वर्किंग फ्रॉम होम! रिलॅक्स होतो... सुमारे संध्याकाळी सहा च्या सुमारास माझा रूम चा दरवाजा ठोठावला गेला.

पाच जण होते, एक जोडपे, तो वेटर, कॉन्स्टेबल आणि ईरण्णा ( मराठी सकट सार्‍या दाक्षिणात्य थोड्याफार अवगत असलेला आणि मला ती रूम घेऊन देणार एजंट ), जोडप्यामधील स्त्री ने सरळ हुंदके द्यायलाच सुरुवात केली. तासाभरात रूमवर झालेल्या त्या संभाषणात मला सरते शेवटी जी हकीकत कळली ती अशी होती.....

तो वृद्ध आंध्र-प्रदेशातील एका कोपर्‍यावरच्या गावातील सधन शेतकरी होता, चार मुले आणि तीन मुली असा भरला परिवार, बायको वारलेली!! एकत्र कुटुंबं !!! गावामध्ये एक आदरणीय व्यक्तीमत्व, शेती मोठी असल्याने मजुरांचा राबता असायचा, शिक्षण जेमतेमच, घरात सर्वांचे ही तसेच, मुले झाल्यावर, इतर शेती विकत घेऊन शेती वाढवलेली, या गावात एक दिवस " एड्स जन-जागरण " मोहिमेच्या अंतर्गत, रक्त तपासणी झाली. वृद्ध पॉझिटिव्ह निघाला. आणि तिथेच सारे बिघडले, त्याला घरच्यांनी वेगळं काढायला सुरुवात केली, टॉवेल, अंघोळ, कपडे, वेगळी खोली, आणि एक दिवस कहर झाला. नातवांशी खेळयला मनाई केली गेली. दुखी झालेल्या त्या वृद्धाने विचार केला, महिना-पंधरा दिवसात त्याचीच एक खोली विकली, मिळालेला जो काही पैसा होता तो घेऊन तो निघून आला, (अर्थात, ई-सिटीत यायला त्याला बराच कालावधी लागला असणार हे माझे मत! )
मी त्या जोडप्याला अस्थी घेऊन जा अशी विनंती केली, पण त्यांनी साफ नकार दिला. म्हणे मुलगी अस्थी-विसर्जन करू शकत नाही, म्हटले मुले आहेत ना अजून गावात, तरी ही नकार च......

सरते शेवटी मीच पुण्यात आल्यावर त्या तुळापुर ला त्रिवेणीत विसर्जित केल्या...... मित्राने विचारले " कोण गेलं होते रे ? ".... मी बराच वेळ विचार करुन ही उत्तर देवु शकलो नाही...........................

( जाता-जाता : घटनेनंतर साधारण तीन-चार महिन्यांनी, त्याच वेटर ने त्याच जुनाट मंदीराच्या देणगी-पेटीत तीन साडे तीन लाख रु सापडल्याचे सांगीतले. )

{नि:शब्द....}

1

नि:शब्द....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

{खरंच शब्द नाहीत...}

2

खरंच शब्द नाहीत... Stare


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{सुन्न}

3

Sad


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{(विषय दिलेला नाही)}

4

Sad

{भयंकर...}

5

भयंकर...

{सुन्न}

6

सुन्न केलस... ( लिखाण आवडल )

खरच ह्या प्रसंगाचे आपण साक्षीदार असाल तर तुम्ही खुपच पुण्याच काम केल. सलाम


कळावे,
___मनस्वी राजन

अनुभव… क्षण वेचलेले…

{सहमत...}

7

heart touching story.... Sad


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{....}

8

नि:शब्द...!

Sad

{मुजरा सरकार !!}

9

मुजरा सरकार !!


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{सुन्न }

10

सुन्न करणारा अनुभव.

{आम्ही सर्वसामान्य भित्रे मध्यमवर्गीय}

11

असं कोणी पडलेलं दिसलं तर त्याला काय झालंय हे पहायला पुढे जाऊ ही शक्यता फार कमी. पोलीस बिलिस दिसले की मागच्या मागे पळ काढणारे. तू त्या म्हातार्‍याचे सगळे अंत्यसंस्कार पुरे केलेस, तेही कोणत्याच अपेक्षेविना, ग्रेट आहेस!


-----------------------------------------------------------------------------------------------------------

चिंगी

{सुन्न !}

12

सुन्न !


सही कशाला घ्याची !!

{शंभर धागे..}

13

.......शंभर धागे दु:खाचे!! या ओळींचा अर्थ समजावा अशी हकीगत लिहिलीस, कोणा अपरिचिताचा मुलगा झालास, मित्रा, तुला सलाम !!

{नि:शब्द...! काय बोलावे हेच }

14

नि:शब्द...! काय बोलावे हेच सुचत नाहीये

{सुन्न करणारा अनुभव!}

15

सुन्न करणारा अनुभव!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{हळवे करुन टाकलेस रे सुहास}

16

सुहास मित्रा,

हेलावून सोडले रे पार या अनुभवाने. सुन्न झालो. नि:शब्द झालो....

बंगळूरात पुन्हा आलास की नक्की भेट ... तुझ्या शब्दांत हा अनुभव ऐकून पुन्हा सुन्न होईन म्हणतो.

काय पण लोक असतात. एडस हा संसर्ग जन्य नाहिये हे माहिती असून सुद्धा....????
निदान मेल्यावर तरी... ...
पण नाहीच Sad

त्या गृहस्थाचे करोडो आशिर्वाद तुला मिळाले असतील रे सुहास.
तू माझा मित्र आहेस याचा मला अभिमान आहे.


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{सुन्न करणारं लिखाण}

17

सुन्न करणारं लिखाण Sad

{खरंच नि:शब्द करून टाकणारी}

18

खरंच नि:शब्द करून टाकणारी घटना ...
त्या घटनेचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहात...........सलाम आपल्याला

{अरे मन हेलावून गेलं हे}

19

अरे मन हेलावून गेलं हे वाचून.. Sad

- पिंगू

{नि:शब्द !!}

20

नि:शब्द


वैशाली ओटवणेकर
********************************************
जिस जगह पे ख़तम सबकी बात होती है.. Party
उस जगह से हमारी शुरुआत होती है.. Wave

{सु शिंच्या दुनियादारीतला एम}

21

सु शिंच्या दुनियादारीतला एम के श्रोत्री आठवला.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते