कथा एका प्रवासाची........ भाग ३.

0
0

भाग १ येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7144

भाग २ येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7186
------------------------------------------------------------------------

शमीच्या नविन आयुष्याचा आज पहिला दिवस. खुप खुश होती ती, कारण ज्याच्यावर तीने मनापासून प्रेम केलं त्याच्याचबरोबर ती आज तिच्या नविन संसाराची सुरुवात करणार होती. ती सकाळी लवकर उठुन तयार झाली. शैलेश अजूनही झोपलेलाच होता. शमीने बाहेर येऊन आधी देवपूजा केली, सासू-सासर्यांच्या पाया पडली आणि किचनमध्ये गेली नाश्त्याची तयारी करायला. सासूही तिला मदत करायला तिच्या मागे गेली. दोघींनी मिळून छानसा नाश्ता बनवला. ११ वाजत आले होते, एव्हाना सगळी पाहुणे मंडळी पण आवरुन तयार बसलेली. शैलेश आल्यावर सगळ्यांनी हसत्-खेळत नाश्ता केला. नातेवाईकही खुश होते नवीन सुनेवर. सगळे गप्पा मारत बसलेले, नवीन जोडप्याची थट्टामस्करी करत होते. त्यातच हनिमूनचा विषय निघाला.

"काय रे? कुठं नेतोएस आमच्या सुनेला फिरायला?" मामाने विचारलं.
"मामा, सिमला-कुलु-मनालीचं बुकींग केलय, उद्या संध्याकाळची ट्रेन आहे." इती शैलेश.
"चांगलं केलस. मग आता जायच्या तयारीला लागा. उद्या उठुन घाई नको." मामा.
"हो" म्हणून दोघंही आत पळाले.

"आम्ही कीनई एका माणसावर फार रागावलोय." इती शमी.
"का बरं?"
"कारण त्याने एक फार मोठ्ठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली, आम्हाला सुगावा पण लागू दिला नाही म्हणून."
शैलेशने तिला कवेत घेऊन विचारलं, "असं का? आता आमच्या राणीसाहेबांना इतका राग आलाय आणि त्यांना आमचा plan सुदधा आवडलेला नाहिए तर मग मी तो cancel करतो."
"नाही cancel कशाला करायला हवा? मी असं थोडच म्हणाले?"
"अच्छा...आता जायचं ठरवलच आहे तर मग packing करायला घ्या. आपल्याकडे वेळ फारच थोडा आहे."
"ह्म्म.... पण आमच्या रागाची भरपाई मात्र तुम्हाला करावी लागेल हं!"
"राणीसरकार आधी सिमल्याला पोहोचुयात तरी; मग सगळ्याचीच भरपाई करेन."
"ईश्श..." शमी चक्क लाजली होती.

सकाळ पासून सगळ्यांच्या सूचनांचा भाडिमार चालू होता दोघांवर. अनोळखी जागी जाताय, सांभाळून रहा, माहित नसलेल्या जागी एकटेच फिरायला जाऊ नका, काहीबाही खाऊन तब्येत बिघडवून घेऊ नका....एक ना अनेक.
दोघंही आपली हो-हो करत होती. रात्रीची ट्रेन होती म्हणून संध्याकाळीच शमी आणि शैलेश बाहेर पडले. वेळेत रेल्वेस्टेशनवर पोहोचले. ट्रेनही वेळेवर होती. त्यांचं रिझर्वेशन 1st class AC चं होतं; म्हणजे प्रवास शांतपणे होणार होता. दोघ एकमेकांबरोबर २ वर्ष एकत्र होती, पण तरीही त्यांच्या नात्यात कधीच अवाजवी मोकळेपणा आलेला नव्हता वा शमीने तो येऊन दिला नव्हता. तेव्हा ते फक्त प्रियकर-प्रेयसी होते आणि आता त्यांच्या नात्याने पूर्णपणे नविन रुप घेतलं होतं. दोघांमध्येही एक थोडासा अवघडलेपणा होता. त्यामुळे अजूनही दोघं अगदी मोकळेपणाने चर्चा करत नव्हते आणि हेच अवघडलेपण ह्या १० दिवसात दूर होणार होतं.

सिमल्यातलं हॉटेल शमीच्या अपेक्षेपेक्षा खूप छान होतं. तिथे पोहोचल्यावर ते दोघं फ्रेश झाले तोपर्यंत साईट्सीईंगसाठी हॉटेलची गाडी आली. दिवसभर भटकल्यानंतर ते हॉटेलवर परत आले, तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. ते आधी जेवले आणि मग वर जायला निघाले. तेव्हा काउंटरवरच्या माणसाने त्यांना request केली की अजून १०-१५ मिनीटे खालीच थांबा. त्यांना त्यात काही वावगं वाटलं नाही. दोघेही मस्त गार्ड्नमध्ये गप्पा मारत फेर्या मारु लागले. अर्ध्यातासाने ते चावी घ्यायला परत आले तोवर त्यांची रुम रेडी झाली होती.

दरवाजा उघडायच्या आधी शैलेशने शमीच्या डोळ्यावर रुमाल बांधला आणि म्हणाला,"तुझ्यासाठी एक सरप्राईझ आहे."
आत गेल्यावर एक मंदसा सुगंध शमीला जाणवला. त्या सुवासानेच तिचं चित्त प्रफुल्लित झालं. तिने डोळ्यावरचा रुमाल काढला आणि ती पहातच राहिली. क्षणभर शमीला वाटलं ती एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आली आहे. रुममध्ये सगळीकडे सेंटेड मेणबत्त्या लावल्या होत्या, त्यांचा मंद दरवळ पसरला होता. वेगवेगळ्या फुलांची रचना केली होती. बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांनी "I Love U" लिहिलं होतं. सगळं कसं अगदी चित्रातल्यासारखं भासत होतं. तीने ह्यासगळयाची कल्पनादेखिल केली नव्हती. तीला तर स्वर्ग धरतीवर आल्यागत भासत होता.

"अगं अशी काय पाहतेस? कसं वाटलं सरप्राईझ?"
"Thank You for making my day" आणि शमीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
"day नाही night म्हण." शमी परत लाजली. शैलेशने हलकेच तिला उचलले आणि बेडवर ठेवले. नंतर त्यांच्यातला सगळा अवघडलेपणा दूर झाला. दुधात साखर विरघळावी तसे ते एकमेकात विरघळून गेले. तीने मनापासून शैलेशला आपलसं केलं आणि स्वतःचं आयुष्य बांधून टाकलं त्याच्याभोवती. ती रात्र शमीच्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणिय रात्र ठरली. पण तीला माहित नव्हतं की ह्याचं आठवणींवर तीला पुढचं आयुष्य काढावं लागेल...

आल्यादिवसापासून ते खुप फिरले, नवीन्-नवीन जागा पाहिल्या, खुपसे फोटो काढले, खरेदी केली आणि एकमेकांवर भरभरु प्रेम केलं; १० दिवस कसे भुर्रकन उडून गेले त्यांना समजलेही नाही. परत आल्यावरही २-३ दिवस ते सगळ्या नातेवाईकांडे भेट देऊन येण्यात busy होते. १५ दिवसांची सुट्टी आता एका दिवसावर आली होती. उद्यापासून कामावर परत जायचं होतं.

रात्री शमीने विषय काढला. ती म्हणाली," शैलू, आता आपलं लग्न झालय आणि आपण दोघांनी एकाच ऑफिसमधे काम करणं मला पटत नाहिए. तेव्हा मी विचार करते आहे की दुसरीकडे ट्राय करावं."
"का? असं का म्हणतेस तू? उलट किती चांगलं आहे ना आपण दिवसभर सुद्धा एकत्र असू."
"म्हणूनच सांगतेय. आपण घरी एकत्र असणार, ऑफिसमध्ये एकत्र असणार, मग थोडेदिवसांनी असं होणार कि आपल्याकडे बोलायला काही विषयच नसणार."
"नाही गं, असं काही होणार नाहिए. आपण व्यवस्थित manage करु."
"नाही करु शकणार आपण. माझ्या मैत्रिणीचं उदाहरण आहे माझ्यासमोर आणि आपल्या नात्याचही तेच होऊ नये असं मला वाटतय. ट्राय करायला काय हरकत आहे? मला काही लगेच उद्या नवीन नोकरी मिळणार आहे का?"
"ठिक आहे. तुला वाटतय की तुझा निर्णय योग्य आहे तर माझं काहिच म्हणणं नाही."

दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये सगळ्या मैत्रिणींनी तिला हैराण केलं चिडवून-चिडवून. शैलेशलाही त्याच्या मित्रांनी सोडलं नव्हतं काही. लंच टाईम मध्येतर सगळ्यांनी खुप खेचली दोघांची. तो दिवसतर असाच थटटा-मस्करीत निघून गेला.
मग रोजचं रुटिन चालू झालं. शमीची सकाळ आधी नाश्ता, मग डब्याची तयारी करण्यातच निघून जायची. ऑफिसची घाई व्हायला लागली, कारण इतकं सगळं काम ती प्रथमच करीत होती. झाली सवय हळू-हळू. पण ह्या सगळ्यात झालं काय, तर रोज एकत्र बाहेर पडणारे दोघं आता वेगवेगळ्या वेळी निघू लागले. शमीसाठी शैलेश तयारी करुन थांबून रहायचा आणि हिची कामं काही संपायचं नावच घ्यायची नाहीत. त्यामुळे शैलेशला उशीर व्हायला लागला. एक्-दोनदा manager कडून सुनावणी झाल्यावर मात्र त्याला उशीरा जाणं परवडणारं नव्हत. त्याला वेळच्यावेळी ऑफिसमध्ये पोहोचायलाच लागायचं. पण शमीचं काही असं नव्हत. उशीरा गेलं तरी त्यावेळेनंतरचे ९ तास भरायचे हा मात्र नियम. उशीरा गेलं की उशीरा निघणं हे ओघाने आलच. त्यामुळे त्यांनी असं एकमेकांसाठी थांबण आता कमीच केलं होतं. ऑफिसमध्येही त्यांच्याकडे बोलायला वेगळं काहीच नसायचं. ५-६ महिने असेच गेले.

एके दिवशी शैलेशने त्याच्या मित्रांना घरी जेवायला बोलावलं होतं. शमीनेही खूप मेहेनत करुन बरेचसे पदार्थ बनवले होते. सगळ्या मित्रांना जेवण फार आवडले. त्यांनी शमीची स्तुतीही केली, पण एका मित्राला मात्र शैलेशची मस्करी करायची लहर आली. त्याने उगाच म्हटलं,"शैलेश, तू तर वहिनींची फारच तारीफ करत असतोस बुवा. मला तर आजच्या जेवणात काहीच खास नाही वाटलं. साधच तर होतं." शमी तिथेच उभी होती. शैलेश मात्र बडबडत होता. "माझ्या मित्रांच्या पुढ्यात तू मला मान खाली घालायला लावलीस. तुझ्यामुळे माझा ४ लोकात अपमान झाला. तुला जमणार नव्हतं तर मला आधीच सांगायचं होतस. पण तुला माझा अपमान करायचा होता ना." वगैरे-वगैरे आणि तिला काही कळायच्या आतच खाडकन् आवाज झाला. तीच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. ती कोलमडून खाली पडली. त्याच्या मित्रांनाही काही समजले नाही की शैलेशला इतकं चिडायला काय झालं? ते शैलेशला आवरायचा प्रयत्न करत होते पण तो खुप चिडला होता. त्यांनाही आवरता आवरत नव्ह्ता. मग तेही तिथून निघाले. पण शमीसाठी त्यांना फार वाईट वाटत होतं. तीची काहीच चूक नसताना तीला हे सहन करावं लागलं होतं.
भानावर आल्यावर शमीला जाणवलं काय झालय ते. तीलाही झाल्याप्रकाराचा प्रचंड राग आलेला.

"मगाशी जे तू वागलास ते योग्य होतं का?" शमी झालेल्या अपमानाने थरथरत उभी होती.
"मला नाही माहित. मला तेव्हा राग आलेला, म्हणून मी फक्त react केलं."
"अश्याप्रकारे? तेही माझी काहीच चूक नसताना तू माझ्यावर हात उचलास."
"तर काय झालं? तू बायको आहेस माझी....लग्नाची. मला हक्क आहे तुझ्यावर हात उचलण्याचा आणि मी काहीच चुकीचं वागलो नाहिए."
शमी एकदम स्तब्ध झाली. तिच्यासाठी शैलेशचं हे रुप नविनच होतं.....एकदम अनपेक्षित. तीला काहीच सुचेना.
तीने फोन उचलला आणि आईला फोन लावला. तितक्यात शैलेशने ते पाहिलं आणि झपकन उठून तिच्या हातातला फोन खेचून घेतला.
"आईला लावतेस फोन? कशाला? त्यांना सांगायला की मी तुला मारलं? काय करणार आहेत ते? आणि माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय सर्वस्वी तुझा होता, त्यांचा नव्हता. काही गरज नाहीए असं काही करण्याची. झाला तेव्हढा तमाशा बास झाला. जा...जाऊन झोप गप्प."

शमीच्या सगळ्या जाणिवा थिजून गेल्या होत्या. तीला काही उमजतच नव्हतं की शैलेश असं का वागला? तिच्या डोळ्यात पाणी ठरत नव्हतं. प्रथमच तीचा कुणी इतका अपमान केला होता. तीला आतून कसंतरीच होत होतं. रडून्-रडून डोळे लाल झालेले. रात्री खुप उशीरा शैलेश बेडरुममध्ये आला. एव्हाना त्याचा राग बहुतेक थंड झालेला असावा. तो येऊन तिच्या जवळ बसला. तीच्या डोक्यावरुन हात फिरवू लागला. ती जागीच होती, पण शांतपणे पडून राहिली. ती लक्ष देत नाहिए बघीतल्यावर अचानक शैलेश रडू लागला. तीची माफी मागू लागला. तिच्या हाता-पाया पडू लागला. जवळ-जवळ तासभर त्याचं नाट्क चालू होतं. तीला कळेना काय करावं. शेवटी व्हायचं तेच झालं शमीनेच माघार घेतली. शैलेशने मोठ्या टेचात तीला वचन दिलं की परत कधीच असं काही होणार नाही.

शमीला हे नव्हतं माहित की यापुढे तीच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय आणि अजून किती अन् काय काय सहन करायचं आहे.........एका आधांतरीच्या प्रवासाला आज सुरुवात झाली होती.............

{वेगवान भाग आहेत. आवडलं.}

1

वेगवान भाग आहेत. आवडलं. पटापटा पुढचे भाग टाकत चला. उत्कंठा वाढलीये.

{शमी... ची कथा वाचतो}

2

शमी... ची कथा वाचतो आहे.
पुढील भाग?