आई.. आणि आठवणीतील गाणी!!!....३

0
0

या चटोर शब्दावरून आणखी आठवलं... शाळेत असताना नाचकामात.. म्हणजे तेच ते हो.. स्नेहसंमेलनात, हिंदी गाणी एवढी बोकाळली नव्हती तेव्हाचं म्हणतेय मी.. तेव्हा कृष्ण-राधेची गाणी चांगलीच पॉप्युलर होती.. मला लहानपणी 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणं पुन्हा एकदा त्यातल्या चटोर शब्दांमुळं आवडायचं.. पण जेव्हा हे गाणं टीव्ही वर पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा कृष्ण म्हणून धुमाळांना बघून बिचार्‍या कृष्णाची कीव आली.. नंतर म्हणून त्या चटोर गाण्याच्या नि चटोर धुमाळांच्याही वाटेस गेले नाही!!!! Sad असो!!!


गणपाची मुलगी 'दिपका मांडिले तुला' ऐकून झोपते.. त्यावरून आठवलं, आमच्या घरातली आख्खी पिलावळ आईचं एक गाणं ऐकत झोपायची. अगदी भावापासून ते सध्या तीन वर्षाचा असलेल्या भाच्यापर्यंत. सगळ्या भाचरांत सर्वात जास्त लाड झाले ते मोठ्या भाचीचे.. घरातलं पहिलं बाळ!! साहजिकच डोक्यावर मिर्‍या वाटायचं.. अजूनही वाटतंच आहे..!!! भावाच्या 'दिपक' प्रकरणात तोंड दुखल्याने त्याला झोपवण्याची जबाबदारी मी कधीच घेतली नाही. पण या भाचीसमोर माझ्या निश्चयाने नांगी टाकली.. आधीच ती मला सोडून राहायची नाही.. नि झोप आल्यावर माझ्या मांडीवर डोकं ठेवून स्वतःच उंउं करत मान हलवायची.. मग कळायचं.. महाराणींना झोप आली ते!!! बाकी, हे गाणं मला माझ्या स्वतंत्र चालीत म्हणता येत नाही असं इतरांचं मत आहे. Sad

आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ झोपला
सृष्टी माऊली लागे गायला... जो बाळा जो जो रे जो!!!

निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळ नीज भास्करा.. जो बाळा जो जो रे जो!!!

आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा.. जो बाळा जो जो रे जो!!!

सृष्टीमाऊली आपल्या दोन मुलांना आलटून पालटून झोपवते, ही कल्पनाच कस्सली येडू आहे. हास्य
एकदा इथे मुंबईतच एका बारशाला जायचा योग आला.. नांव ठेवले.. पाळ्णा म्हणायची वेळ आली. पण 'पहिल्या दिवशी राजदरबारी' तर सोडाच हो पण अंमळ उत्साहाने पुढे आलेल्या मंडळाची गाडी 'हलके हलके जोजवा' च्या दोन ओळींवरच अडकली... मी म्हटलं, नाहीतरी तुम्हांला काहीतरी 'जो बाळा जो जो रे जो' च हवंय ना??? मी म्हणते गाणं!!! मग कुणीतरी, 'म्हण बै. तू पण वाट मिर्‍या' म्हणायचीच खोटी होती!!
मला वाटलं, की हे गाणं कुणाला माहितही नसेल. पण कुठलं काय?? तिथल्या बर्‍याच काकवांनी पण म्हणायला सुरुवात केली.. Party नंतर कळलं, त्यांना शाळेत पाचवी-सहावीच्या पुस्तकात ही कविता होती म्हणून.. नि नंतर सगळा प्रोग्रॅम राहिला बाजूला.. नि समस्त काकूमंडळ शाळेतल्या आठवणीत असं रमलं की यंव रे यंव!!! Big smile



आणखी एक कविता होती.. बहुतेक माझ्याच पहिलीच्या पुस्तकात असावी.. आता जसे मी आणी माझा भाचा जिंगल टून्समधली उंदराच्या टोपीची गोष्ट, 'हे काय आहे? असेल रूमाल!!!! ओहो.. आहा येईल धमाल" असं तालासुरात म्हणतो, तसे तेव्हा मी आणी आई ही कविता म्हणत असू.

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना!!!!!

या गाण्यात कधी मी चिमणी असे, तर कधी आई चिमणीची भूमिका करे. पण मग मला कावळेदादा, कपिलामावशी, पोपट्दादा व्हावं लागे. नि ते मला मुळीच नाही आवडायचं. मग आई मी काही ऐकेना म्हणजे 'आता तुला चिमणी होऊ देणार नाही' अशी धमकी द्यायची!!!


अजूनही पुष्कळशी गाणी आहेत.. मनाच्या कुपीत दडलेली... अशीच कधीतरी इच्छा होईल.. मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!

आणि हो, सर्व वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे, न देणार्‍यांचे, सगळ्यांचे आभार!!!

३ ही भाग उत्तम ही गाणी खरच

1

३ ही भाग उत्तम हास्य
ही गाणी खरच माहीत नव्ह्ती, छान वाटली वाचायला

मस्त

2

>>> सृष्टीमाऊली आपल्या दोन मुलांना आलटून पालटून झोपवते, ही कल्पनाच कस्सली येडू आहे. Smile
--- सहमत आहे.

>>> असेल रूमाल!!!! ओहो.. आहा येईल धमाल"
--- अगायायाया, मेलो Laughing out loud Laughing out loud

सगळेच लेख उत्तम झालेयत...मला

3

सगळेच लेख उत्तम झालेयत...मला ही गाणी तशी नव्यानेच कळतायत...पण छान वाटलं सगळे लेख वाचून...कीप इट अप...

दिपाली हास्य

मस्त मी परत येईन एकदा

4

मस्त हास्य

मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!

लवकरात लवकर येणे हास्य

असेच

5

मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!

लवकरात लवकर येणे

असेच म्हणते.
स्वाती

पाळणा

6

रामनवमीला आमच्या मंदिरात रामजन्मोत्सव साजरा व्हायचा त्यावेळी पाळणा हलवायला मिळवण्यासाठी आटापिटा करायला लागायचा. इथेही भाउबंदकी असायची. बाळा जो जो रे कुलभुषणा दशरथा नंदना निद्रा करी बाळा या नादमय पाळण्याचे ठेके, पखवाजाची सम , तल्लीन झालेले गावकरी, रंगात आलेले किर्तनकार माहोल काही और असायचा.
असो काही माहिती http://mr.upakram.org/node/673#comment-10490


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

माझ्या गांवी अजूनही

7

माझ्या गांवी अजूनही रामजन्मोत्सवाचा सोहळा असतो.. सकाळी लवकरच भजन-कीर्तनाला सुरूवात होते.. आणि नंतर दुपारी बारा वाजता रामजन्मकाळ होतो नि पाळणे म्हणतात... राम म्हणजे श्रीफळाला टोपडं घालतात नि बराच काळ निपुत्रिक असलेली स्त्री त्यादिवशी कौसल्या असते. असं म्हणतात की वर्षभरात तिलाही अपत्यप्राप्ती होते. त्यामुळे हा मान मिळावा म्हणून लोकांची धडपड असते.

आमचं लक्ष सुंठवड्याकडेच असायचं.. खूप वर्षं झाली रामनवमीला गांवी गेले नाही...

कुलभुषणा दशरथा नंदना निद्रा करी बाळा

याने तर गांवच्या आठवणी जाग्या झाल्या!!! हास्य

लेखमाला छानच झालिए.. ह्याही

8

लेखमाला छानच झालिए..
ह्याही भागातले गाणी माहित नव्हते....
, 'हे काय आहे? असेल रूमाल!!!! ओहो.. आहा येईल धमाल"
हे गाण पण मस्त आहे...

मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!

तोवर आम्ही वाट बघु


-निखिल

हे काय अजुन बाकी आहेत ना

9

बरीचशी झोपवतानाची गाणी झाली, उठवतानाची कुठे आहेत?

उठा उठा चिउताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही अजुनही

असे काहीतरी आहे ना?

असो परिक्षा होउ दे आधी. शुभेच्छा!

वा!!!

10

वा!!!

अतिशय उत्तम अशी लेखमाला

11

अतिशय उत्तम अशी लेखमाला हास्य

आवडली !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तच...

12

काय काय आणि किती आठवतंय तुला...

इतकी गाणी? व्वा!

मस्तच..आणखी येऊ दे!

वाचनखुण साठवली आहे.

मस्त लेखमाला वाचनखुण साठवली

13

मस्त लेखमाला
वाचनखुण साठवली आहे

झकास

14

जुनी आणी जास्त कानावर न पडलेली गाणी.
खरंच सुरेख!!

तिनही भाग उत्तम आहेत. ही

15

तिनही भाग उत्तम आहेत. ही लेखमाला संपू नये असे वाटते, तेव्हा लवकर परत या!

-अनामिक

व्वा !!...वाचनखुण साठविली

16

व्वा !!...वाचनखुण साठविली आहे..

सही ग ..

17

एक सुपरहीट गाणं विसरलीस की ग .. का मी विसरलो लेख नीट वाचायला thinking
"लिंबोणीच्या [का निंबोणीच्या ?] झाडामागे चंद्र झोपला गं बाई ... "
माझी भाची हे गाणं ऐकतच झोपायची ... गायक कोणीही चालायचं ...माझी आई किंवा ताई हास्य तसा दोघींचा आवाज सेम आहे ...
>> 'हलके हलके जोजवा'
भाच्याच्या बारशावेळी हे ऐकून नंतर बरेच दिवस माझी भाची गाणं गुणगुणायची.. इतकचं आठवतयं
"हलके हलके जोजवा ... बाळाचा पाळणा"
"पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा "

अरे हो की.. हे गाणं

18

अरे हो की..
हे गाणं सुटलंच!!!
तसंही मी पहिल्या लेखाच्या शेवटीच म्हटलं होतं.. की येऊद्यात सगळ्यांच्या आठवणीतील गाणी.. त्यामुळे मी लिहिलं काय किंवा तू लिहिलं काय.. गाणं महत्त्वाचं!!! खरं ना?

मस्त

19

मस्त

आमचं लक्ष सुंठवड्याकडेच

20

आमचं लक्ष सुंठवड्याकडेच असायचं.. खूप वर्षं झाली रामनवमीला गांवी गेलो नाही...
आणी जन्माष्टमीच्या काल्यालाही

ओ भौ...

21

धैहंडीकडं जास्त लक्ष....फुल मजा ना हास्य

अबे ते तर हाय रे.... पण माय

22

अबे ते तर हाय रे....
पण माय मस्त वाडगा भर काला ठेवायची ना काढून साईडला...

साला गावजेवणातली गरगट्टा भाजी आणी जन्माष्टमीचा काला ...अजून जिभेवर चव हाय

आमच्या शेजारच्या आजी हे गाण

23

आमच्या शेजारच्या आजी हे गाण शिकवायच्या..

इवल्या इवल्याश्या
टिकल्या टिकल्यान्चे
देवाचे घर बाई, उन्चावरी
ऐका मजा तर ऐका खरी

निळी निळी वाट
निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झूळू झूळू पाट
निळ्या निळ्या डोन्गरात निळी निळी दरी
ऐका मजा तर ऐका खरी

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगान्ची अन्थरली गादी
चान्दण्यान्ची हन्डी, चान्दण्यान्ची भान्डी
चान्दोबाचा दिवा मोठा लावला वरी


पुष्करिणी

अजुन एक गाणं

24

मक,
अजुन एक जुनं गाणं आठवतंय,
सुमनताईंनी गायलं आहे, "मी नाही तु, तु नाही मी, कुठं कुणि गं लपायचं, लपाछपीचा खेळ चालला अंगण नाही पुरायचं"
कुणाकडे आहे??

मस्तच...!

25

मस्त झालेत सगळे भाग.

आठवणी जाग्या झाल्या.

26

तीनही लेख चांगले आहेत. गाई पाण्यावर हे तर माझ्या आईचे पण आवडते गाणे आहे. माझ्या ४ महिन्याच्या मुलीला झोपवताना आई हे गाणा म्हणायची आणि एकदा माझे बाबा म्हणायला लागले तर ही ४ महीन्याची पण बघायला लागली की आज्जीच्या आवजाला काय झाला.

(विषय दिलेला नाही)

27

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काही जुन्या कवितांचे आपल्याला

28

काही जुन्या कवितांचे आपल्याला ईबुक तयार करता येईल का ????


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

यातली काही गाणी आधीच इ-बुक

29

यातली काही गाणी आधीच इ-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.. जी गाणी कुणाला माहित नाहीत त्यांचे इ-बुक तयार करता येईल.. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेली(माझ्या माहितीतील) गाणी तुलनेने कमी आहेत. जर या/ एका विशिष्ट धाग्यावर इतर सदस्यांनीही त्यांच्या माहितीची जुनी गाणी/कविता दिल्यास त्यांचे संकलन करता येईल!!!!

सहमत आहे . सदस्यांनी आपल्या

30

सहमत आहे .

सदस्यांनी आपल्या आठवणीतील गाणी येथे द्यावी असे आवाहन मी ( मी मराठी तर्फे व माझ्या तर्फे देखील ) करत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लवकर परत ये गं बाई... वाट

31

लवकर परत ये गं बाई... वाट पाहतो आहे हास्य
खुप छान जमला आहे हा ही लेख !


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन