अस्तित्व दान केले

0
0
अस्तित्व दान केले

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला देदीप्यमान केले

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले

                                        - गंगाधर मुटे
------------------------------------------------
या रचनेचे प्रताधिकार सुरक्षित आहेत.
------------------------------------------------

{इवल्या जगात माझ्या, मी रांगतो}

1

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निरपेक्ष भावनेला मी शक्तिमान केले

गझल आवडली साहेब !!!


Hope is a good thing...

{अप्रतिम कविता आहे}

2

अप्रतिम कविता आहे


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{मुटेसायबा}

3

आज बरेच दिवसांनी जालावरच्या कविता वाचण्याचे धाडस करावे असे ठरवले नि पहिलीच कविता तुमची. आमची चैन झाली.

माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
पहिल्याच कल्पनेने अंगावर रोमांच उभे राहिले.

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

अगदी समर्पक. पहिला प्याला, पहिले चुकीचे पाऊल हेच सांभाळण्याचे क्षण असतात. तिथे माणूस चळला की अधोगतीची निसरडी वाट तोल सांभाळण्यास अवघड अशी.

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

हास्य मुटे साहेबांचा राजकारण्यांवरचा राग 'चंचूप्रवेश' करतोय इथे.

आणखी एका सुंदर कवितेबद्दल अभिनंदन.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{असणेच आज माझे, नसण्यासमान}

4

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

एक नंबर गझल मुटे तात्या.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{प्रतिसादाबद्दल सर्वांना}

5

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. हास्य

रमतारामजी,
आपल्या प्रतिसादाचे मोल काही औरच असते.. धन्यवाद.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{सुंदर गझल.}

6

सुंदर गझल.

{हळवा नकोस होऊ, अश्रू मला}

7

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

मुटेजी, झकास आहे. "संतप्त" हुंदके खरच हळवेपणा सोडायला लावतात.. कधी त्यांचा राग ही येतो व आपल्यातला हा निगरगटटपणा कोठुन आला याचा विचार करत बसतो. त्याच उत्त्तर केवळ सतंप्त हुंदकेच आहे.

मजा आली वाचताना...

{लोकमत दिवाळी अंक २०११}

8
------------------------------------------------

              लोकमत दिवाळी विशेषांक
              
             मध्ये प्रकाशीत कविता/ गझल
------------------------------------------------

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{इवल्या जगात माझ्या, मी रांगतो}

9

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदीप्यमान केले

सुंदर रचना मुटेजी!!!

{वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा}

10

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

हा भाग आवडला. "मार्केट फॉर आयबॉल्स" आठवले.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{छान आहे कविता.}

11

<<असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले..>>

छान आहे कविता.


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)