'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ६: काही टिपणे
मागील दोन भागात रोशच्या व्यावसायिक नीतीचे विवरण आपण पाहिले. अॅडम्सच्या यापुढील लढ्याचे मूळ यात होते. परंतु हे सारे तपशील देताना यामधे नेमके गैर काय, आक्षेपार्ह काय किंवा बेकायदेशीर काय याबाबत अॅडम्स काहीच बोलत नाही. कदाचित हे सारे स्वयंसिद्ध आहे असा त्याचा समज असावा. पण पुढील घटनाक्रमामधे जेव्हा रोशला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले गेले ते नेमके कोणत्या मुद्यावरून हे आपल्याला समजून घ्यायला हवे तरच तो घटनाक्रम नीट समजावून घेता येईल. अॅडम्सने याबाबत पुरेशी कारणमीमांसा दिलेली नाही तसेच युरपियन आयोगाच्या संबंधित कागदपत्रात याबाबत काय आहे हे ही मला ठाऊक नाही. मग आता रोशला नक्की कोणत्या मुद्यावर दोषी ठरवले नि कसे याचे विश्लेषण करून आपणच ही कारणमीमांसा मांडण्याचा प्रयत्न करून पाहू. एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकवार अधोरेखित करतो, तो म्हणजे मी स्वतः अर्थशास्त्राचा, न्यायव्यवस्थेचा अभ्यासक नाही. माझा या घटनाक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ एका सामान्य माणसाचा आहे. त्या पातळीवर जे दिसू शकते तेवढेच मी पाहतो आहे. एखादी अधिक माहितगार व्यक्ती अर्थशास्त्रीय बाजू अथवा वाणिज्य व्यवस्थेच्या संदर्भात अधिक नेमकेपणे भाष्य करू शकेल, काही आणखी महत्त्वाचे मुद्दे मांडू शकेल हे मला मान्यच आहे.जालावरील लिखाणाची व्याप्ती लक्षात घेता यावर अधिक तपशीलाने लिहिणे अवघड आहे, पण शक्य तितके सोदाहरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन.
रोशविरुद्ध अॅडम्सच्या लढ्याचा पाया काय हे प्रथम समजावून घ्यायला हवे. नाहीतर पुढील संघर्षाचे मूळ कारणच लक्षात आले नाही तर पुढील सारे विवेचन गैरलागू वाटण्याचा धोका आहे. तिसर्या भागामध्ये रोशची कार्यपद्धती विशद केली आहे. आता या कार्यपद्धतीमध्ये आक्षेपार्ह असे काय होते हे तपासून पहायला हवे. निव्वळ भरपूर नफा मिळवला हे आक्षेपार्ह असण्याचे कारण नाही, कारण कोणताही व्यवसाय हा नफा कमावण्यासाठीच केला जातो. परंतु किती नफा मिळवणे न्याय्य आहे, 'न्याय्य आहे' अथवा 'न्याय्य नाही' असे म्हणताना त्या न्यायाची व्याख्या कशी करावी आणि त्याची व्याप्ती कशाच्या - कायद्या/कराराच्या - आधारे निश्चित केली जावी; तसेच न्याय-अन्यायाचा विचार करताना त्या व्यवसायातील कोणत्या भागधारकांच्या हिताचा - नि किती प्रमाणात - यात विचार केला जावा इ. गोष्टींबाबत खुलासा होणे आवश्यक असते. खुल्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व उत्पादकांना समान संधी, ग्राहकांना अनेक पर्यायांमधून उत्तम ते निवडण्याची संधी त्याचबरोबर स्पर्धेमुळे वाजवी किंमतीमधे ते उत्पादन मिळण्याची संधी हे महत्त्वाचे सूत्र असते. यासाठी खुली आणि न्याय्य स्पर्धा असणे हे महत्त्वाचे आहे. रोशच्या पद्धतीने ही स्पर्धा न्याय्य होती का हे तपासणे आवश्यक ठरते.
हे सारे नेमकेपणे अभ्यासता यावे यासाठी अर्थशास्त्राचा, कायद्याचा तपशीलवार अभ्यास असण्याची गरज आहे. तसा नसल्याने मला हे जमणे शक्य नाही. पण
सध्या आपण साध्या सोप्या दृष्टिकोनातून या सार्या कार्यपद्धतीकडे पाहू या. तुम्हा आम्हाला सहज समजतील अशा ’नैतिकता’, ’न्याय’ आणि ’कायदा’ या तीन पातळीवर आपण मूल्यमापनाचा प्रयत्न करू. या तीन गोष्टी मी स्वतंत्र मानतो आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. (का ते पुढे स्पष्ट होईल अशी आशा आहे.)
कायदा:
पहिला प्रश्न असा की रोशने अंगीकारलेल्या कार्यपद्धतीमधे बेकायदेशीर असे काही होते का? याला एक उपप्रश्न असा असेल की आपण कायदेशीर अथवा बेकायदेशीर म्हणणार ते कोणत्या कायद्याच्या संदर्भात. कारण आपण एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करतो आहोत. मग कायदा ग्राह्य समजायचा तो कोणत्या देशाचा? की असे म्हणावे की प्रत्यक्ष तो घटनाक्रम, तो व्यवहार, ती प्रक्रिया ज्या देशात घडली त्या त्या देशाचा कायदा ग्राह्य मानून त्या घटनाक्रमाचे मूल्यमापन करावे. एका मर्यादेपर्यंत हे ठीक आहे. पण जिथे मुद्दा परस्पर-व्यापाराचा आहे तिथे तो व्यवहार अमूक एका देशात घडला असे म्हणणे शक्य नाही. तसेच त्या दोन देशात त्या संदर्भात असलेल्या कायद्यातील फरक अथवा तफावत निर्णयप्रक्रियेला अधिकच जटिल बनवतो.
याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे खुद्द अॅडम्सच्याच बाबत दाखल केलेल्या गुन्ह्यामागची कायदेशीर प्रक्रिया. आंतरराष्ट्रीय नियमानुसार अन्य देशाचा नागरिक असलेल्या देशाच्या नागरिकावर कायदेशीर कारवाई करताना त्या मूळ देशाच्या कायद्यानुसार, अथवा त्या देशाच्या कायदाव्यवस्थेच्या संमतीसह, अथवा दोन्ही देशांनी मान्य केलेल्या नियमावलीनुसारच केली जाणे अपेक्षित असते. अॅडम्स हा ब्रिटिश नागरिक असल्याने त्याच्यावर ब्रिटिश कायद्यानुसार कारवाई होणे त्याने अपेक्षित धरले होते. परंतु स्वित्झर्लंड हा युनोचा सदस्य देश नसल्याने त्या संघटनेचे कायदे अथवा आचारसंहिता (directives, guidelines) पाळणे स्विस सरकारवर बंधनकारक नव्हते. आणि त्या देशाच्या जाचक नि उद्योगांना झुकते माप देणार्या, एकांगी कायद्यांसमोर एकट्या अॅडम्सचा पाड लागणारच नव्हता.
बहुराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात असे घडू शकते ही जाणीव बहुतेक राष्ट्रांच्या अर्थविषयक तज्ञांना असतेच. परंतु महत्त्वाचा मुद्दा हा की अजूनही सर्वव्यापक असा आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक कायदा वा कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात नाही. एवढेच नव्हे तर तशी असावी याबाबत कोणताही देश अथवा देशांचा समूह आग्रही दिसत नाही. याचे एक कारण म्हणजे जागतिकीकरण नि खुली व्यवस्था या नव्या जगाच्या मूलमंत्रामधे कायदेशीर व्यवस्थेचे - राष्ट्राचे सरकार नि त्यांचे व्यापारविषयक कायदे - अस्तित्व हे नेहमीच 'प्रगतीला खोडा घालणारे' मानले जाते. आणि प्रत्येक देशाला भौगोलिक, राजकीय तसेच औद्योगिक परिस्थितीनुसार विविध देशांशी वेगळ्या पातळीवर करार करणे सोयीचे ठरते. यातून ’सम आर मोअर इक्वल’ ही सोयीची स्थिती निर्माण करता येते. (गंमत म्हणजे हा वाक्प्रचार ऑर्वेलच्या ज्या 'एनिमल फार्म' मधे प्रथम वापरला ते ’फक्त’ कम्युनिजम वरची टीका मानले जाते. परंतु ते कोणत्याही सर्वंकष होऊ पाहणार्या सत्तेवरचे भाष्य आहे हे मूळ लेखकाचे मत इथे पटावे.) त्यामुळे सर्वव्यापक अशा व्यापार कायद्याचा आग्रह धरणे हे कदाचित व्याघाताचे उदाहरण ठरेल. परंतु परस्परसंबंध जिथे येतात तिथे दोनही बाजूंचे हक्क नि कर्तव्ये निश्चित करावी लागतातच, हे व्यापारच नव्हे तर अन्य - राजकीय, भौगोलिक हक्क इ. - बाबतीतही खरे आहे. त्यामुळे दोन अथवा अधिक देशातील व्यापार हा बहुधा द्विपक्षीय अथवा बहुपक्षीय कराराच्या आधारे केला जातो. युरपियन इकनॉमिक कम्युनिटी (European Economic Community) च्या माध्यमातून अशी निश्चित व्यवस्था युरप मधील देशांमधील परस्पर व्यापारासाठी निर्माण करण्यात आली. परंतु 'तटस्थते'चा झेंडा घेऊन मिरवणार्या नि युनो(UNO) पासून देशील फटकून राहणार्या स्वित्झर्लंडने ई.ई.सी.पासून दूर राहणेच पसंत केले होते. त्यामुळे स्विस कंपन्यांना युरपिय देशांशी व्यापार करणे सुलभ व्हावे यासाठी स्वित्झर्लंडला ई.ई.सी.शी स्वतंत्र व्यापारविषयक करार करणे भाग पडले. त्यामुळे रोशच्या युरपिय देशातील सारा व्यापार या कराराअंतर्गत होत होता आणि म्हणूनच त्या करारातील नियमांचे पालन करणे रोशला बंधनकारक होते. त्यामु़ळे रोशच्या युरपमधील ई.ई.सी. सदस्य देशातील कार्यपद्धतीचे मूल्यमापन करणे, कराराअंतर्गत जबाबदारीचे रोश पालन करते आहे की नाही हे तपासणे, नसल्यास ते करण्यास भाग पाडणे किंवा त्यावर दंडात्मक कारवाई करणे हे ई.ई.सी.च्या व्यापार-कायदेविषयक बाबी सांभाळणार्या 'युरपियन आयोगा'च्या (European Economic Commission) कर्तव्याचा नि अधिकाराचा भाग होता. त्यामुळे जेव्हा मागे उल्लेख केलेली रोशच्या कार्यपद्धतीमधे काही बेकायदेशीर होते का नव्हते हे ई.ई.सी.च्या कायद्याअंतर्गत तपासावे लागते, नि हेच युरपियन आयोगाने करावे असा अॅडम्सचा प्रयत्न होता.
आंतराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात तीन गोष्टी मारक अथवा हानिकारक समजल्या जातात, त्या म्हणजे एकाधिकार(Monopoly), गटबाजी(Collusion) आणि 'किंमत निश्चिती' (Price Fixing).
ढोबळ मानाने पाहिले तर ग्राहक, उत्पादक नि व्यवस्था या उतरत्या क्रमाने हित जोपासले जावे असा संकेत असतो. उत्पादन हे शेवटी ग्राहकाच्या उपयोगासाठी (हिंदी मधील 'उपभोक्ता' हा शब्द अधिक समर्पक आहे.) निर्माण केले जाते. वापरणारा ग्राहक नसेल तर उत्पादन करायचे कोणासाठी, (अर्थात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधे 'गरज नसेल तिथे ती निर्माण करणे' हा एक व्यापारविषयक धोरणाचा भागच आहे. पण हे धोरण नैतिक की अनैतिक हा एक नि आधी मागणीच्या प्रमाणात उत्पादन की उत्पादनच्या प्रमाणात मागणी हा दुसरा, हे दोन प्रश्न सध्या बाजूला ठेवतो.) त्यामुळे ग्राहकहित हे सर्वप्रथम जोपासले गेले पाहिजे हे उघड आहे. त्यानंतर उत्पादकाचे हित सांभाळावे लागते, कारण ग्राहकाची गरज भागवण्यासाठी उत्पादकाची आवश्यकता असतेच, त्यामुळे त्याचे नुकसान झाले तर अप्रत्यक्षपणे ते ग्राहकाचेही नुकसान असतेच उदारणार्थ तोट्यात गेल्याने वा अव्यवहार्य व्यापारामुळे उत्पादकांची संख्या घटली तर पुरवठा घटल्याने मागणी-पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने एकतर ग्राहकाला त्या उत्पादनाबद्दल अधिक किंमत मोजावी लागेल किंवा त्याहुन अधिक म्हणजे पुरेशा पुरवठ्याअभावी ते उत्पादन आवश्यक तेव्हा उपलब्ध नसण्याचीही शक्यता निर्माण होईल.
एकाधिकार: एखाद्या क्षेत्रात असलेल्या एकाधिकारामुळे उत्पादकाला व्यापारविषयक आस्थापनाला मनमानी करणे शक्य होते. अन्य पर्यायच नसल्याने ’गरजवंताला अक्कल’ नसते असे म्हणत ग्राहकाला उत्पादकाने दिलेली वस्तू तो सांगेल त्या किंमतीला विकत घेणे भाग पडते. हे ग्राहकहिताला बाधक ठरते. त्यामुळे स्पर्धात्मक व्यापारपद्धतीमधे स्पर्धा निकोप नि समान संधी या तत्त्वावर व्हावी याची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु ज्यांचे स्वार्थच यात गुंतलेले आहेत ते उत्पादक ही काळजी घेतील ही अपेक्षाच भाबडी आहे. त्यामुळे ज्यांचे हितसंबंध यात यात गुंतलेले नाहीत अशी त्रयस्थ व्यवस्था निर्माण करून तिने या स्पर्धेचे या दोन तत्त्वाआधारे नियमन करावे लागते. अर्थात् ज्यांचा स्वार्थ या नियमनामुळे बाधित होतो ते अशा नियमनाच्या विरोधात असतात हे उघड आहे. नव्या खुल्या धोरणाचे खंदे समर्थक बहुधा शासकीय धोरणांमुळे व्यावसायिक हिताचे नुकसान होते ही हाकाटी नेहमीच करताना आढळतात.
एक मुद्दा असू शकतो की जर ते उत्पादन फक्त त्या एकाच उत्पादकाकडे उपलब्ध असेल तर ”मागणीनुसार किंमत’ किंवा 'कॉस्ट टू द कस्टमर' या न्यायाने त्या उत्पादकाने ठरवली तर त्यात गैर काय. हा मुद्दा मांडणारे फक्त उत्पादकाच्याच दृष्टिकोनातून विचार करत असतात. वर म्हटले तसे इतर भागधारकांचे काय? यात त्यांच्या हिताचा विचार कुठे आला? बरं मग जर असे म्हणायचे असेल की ’ज्याला परवडेल त्याने वापरावे इतरांनी वापरू नये’ तर मग औषधांसारख्या जीवनावश्यक गोष्टींचे काय? की तिथेही स्पर्धात्मक व्यापाराची तत्त्वे लावायची का? आता प्रश्न असा आहे की ही तत्त्वे इतकी पवित्र (Sacrosanct) आहेत का की माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाची मानावीत. एकिकडे नव्या जगात जिथे जगण्याचा मूलाधार समजली जाणारी धर्मतत्त्वेही सॅक्रोसँक्ट न मानता स्थल-काल-व्यक्तीनुसार एकुण हिताचा विचार करता ती बदलणे गैर मानले जात नाही तिथे हा अट्टाहास काय म्हणून?
दुसरा दावा असा की उत्पादन फार महाग विकले तर विक्री घटेल नि फायदा कमी होईलच त्यामुळे आपोआपच उत्पादकाला किंमत कमी करून विक्री वाढवावी लागेल. हे ही उदाहरण तितकेसे बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. कारण आजच्या जगात विक्रीसाठी निव्वळ ’नैसर्गिकरित्या निर्माण होणारी गरज’ या एकाच घटकावर अवलंबून न राहता ती कृत्रिमरित्या निर्माण करण्याचे तंत्रही चांगलेच विकसित झाले आहे. (नुकतेच 'स्वाईन फ्लू'चे थैमान आपण पाहिले, त्यावर उपलब्ध असलेल्या टॅमिफ्लू' या एकमेव औषधाची एकमेव उत्पादक होती रोश! अन्यत्र बंदी आलेले हे औषध स्वाईन-फ्लू वरील एकमेव औषध असल्याने बंदी उठवून म्हणा विकावे लागले होते. हे कसे घडले असेल याबाबत काही कुतर्क केले गेले होते.) त्यातच जागतिकीकरणाने विविध स्वरूपाच्या बाजारपेठा उपलब्ध करून दिल्याने ’पिकते तिथे विकले’ नाही तरी कुठेतरी विकता येतेच. तिसर्या भागात उल्लेख केलेले व्हेनेझुएलाचे उदाहरण प्रातिनिधिक ठरावे.
गटबाजी:
निवडक उत्पादकांनी एकत्र येऊन अन्य उत्पादकांशी स्पर्धा करणे. किंवा सर्व प्रमुख उत्पादकांनी एकत्र येऊन उत्पादनाविषयी/विक्रीविषयी/किंमतीविषयी धोरण निश्चित करणे. पहिले छोट्या उत्पादकांच्या हिताच्या विरोधी जाते तर दुसरे ग्राहकहिताच्या. एका प्रकारे हे ही एकाधिकाराचे उदाहरण आहे. व्यक्तिसमूहातून उत्पादक/कंपनी निर्माण होते नि तिची एकत्रित ताकद व्यक्तिसमूहाच्या ताकदीच्या निव्वळ बेरजेच्या अधिक असते तसेच उत्पादकसमूह एकत्रितपणे लहान उद्योगांशी स्पर्धा करून त्यांचे दुकान बंद पाडू शकतात. पहिल्या भागात उल्लेखलेली शीतपेयांच्या कंपन्यांची नि अमेरिकेतील अंकल-आंटी शॉप्सच्या र्हासाची उदाहरणे या स्वरूपाची. एकत्रित उद्योगांची ताकद प्रचंड असते. सुरवातीला आपली अधिकारक्षेत्रे वाटून घेऊन, वितरण व्यवस्था, जाहिरात व्यवस्थेमधे सहकार्य करून ते आपल्या उत्पादनांच्या किंमती इतक्या खाली नेऊ शकतात की अन्य लहान उत्पादकांना त्या किंमतीला विकणे अशक्य होऊन जावे. अखेर अपरिहार्यपणे त्यांना आपला व्यवसाय गुंडाळावा लागतो. मग हे दादा लोक पूर्ण मैदानात एकमेकांशी सर्धा करायला मोकळे होतात. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यावर आपल्याकडे पेप्सी नि कोकला जॉर्ज फर्नांडिस यांनी बंद केलेली दारे उघडली गेली. त्यानंतर देशाच्या काही भागात पेप्सी तर काही भागात कोकचा बोलबाला होता. तसे दोन्ही पेये सर्वत्र मिळत असल्याचे भासवले असले तरी दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली ताकद एकवटल्याचे बोलले जात होते. यातून प्रथम पार्ले सारख्या देशी कंपन्यांचा घास घेतला गेला नि आता या दोन कंपन्याच देशभर हातपाय पसरून बसल्या आहेत. निदान या क्षेत्रात तरी निकोप स्पर्धेच्या माध्यमातून नवा उत्पादक जम बसवू शकेल हे अशक्यच आहे. आज या दोघांनी ठरवलेल्या किंमतीला शीतपेये घेणॆ आपल्याला भाग पडते भले त्याचा उत्पादन खर्च त्या किंमतीच्या विसाव्या तिसाव्या भागाइतकाच असतो हे उघड गुपित असो. शीतपेये ही - भारतात तरी - चैनीची गोष्ट आहे, पण हे एखाद्या औषधाबाबत झाले तर ते न्याय्य असेल का हे ज्याने त्याने ठरवावे.
किंमत निश्चिती:
ही खरेतर बहुतेक वेळा वरील दोन कारणांचे परिणामस्वरूप असते. एकाधिकार असल्याने उत्पादक उत्पादन खर्चाच्या अनेक पट विक्री-किंमत आकारू शकत असतो. त्या उत्पादनाची गरज असलेले ग्राह असल्याने नि त्या ग्राहकांना अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने उत्पादकाला प्रचंड फायदा मिळवून देणारी ही किंमत बाजारात त्या उत्पादकाला मिळतेही. दुसरीकडे प्रमुख उत्पादकांनी मिळून निश्चित केलेली किंमत ही उत्पादन खर्चाशी निगडित असलेल्या ’वाजवी विक्री किंमत’पेक्षा (आता पुन्हा ’वाजवी’ किंमत कशी निश्चित करावी हा आणखी एक वादाचा मुद्दा आहे, पण एकीचे बळ वापरून उत्पादक त्या किंमतीपेक्षा जास्तच ठेवणार हे मान्य होण्यास काही हरकत नसावी.) जास्त असल्याने ग्राहकहितास बाध येतो.
तिसरी शक्यता म्हणजे आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेऊन किंमत चढी ठेवणे. पूर्वी भारतात आलेल्या इंफ्लुएंझाच्या साथीच्या वेळी रोशने मुद्दाम उत्पादन कमी करून त्यावरील औषधांच्या किंमती चढ्या ठेवल्याचे उदाहरण आधी आलेच आहे.
’हे तर सगळॆच करतात, रोशने केले तर काय अयोग्य केले?’ असे प्रश्न विचारताना आपण बहुमताने एखादी गोष्ट केली तर ती कायद्याच्या, न्यायसंकल्पनेच्या पलिकडे आहे असे मानतो. नैतिकता तशीही स्थल-कालसापेक्ष असते नि बहुधा बहुमताच्या जोरावर ठरते त्यामुळे त्यामुळे ते वर्तन नैतिक असतेच. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो की बहुमत हे सर्व भागधारकांचे असले पाहिजे. मग व्यापाराबाबत बोलताना बहुमत मोजताना त्यात ग्राहकसमूह हा एक मोठा भागधारक आहे हे आपण विसरतो. त्याचे हित न साधणार्या पण बहुतेक उत्पादकांना मान्य असणारे मार्ग आपण कायदेशीर व नैतिक मानत असू तर आपण व्यापाराच्या, उत्पादनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासतो आहोत. अर्थात यात आपल्याला गैर काही वाटत नाही याचे एक महत्त्वाचे कारण या व्यवस्थेने त्यांना सोयीची असलेली ही विचारसरणी आपल्या विचारात इतकी बेमालूम मिसळून टाकली आहे की आज आपण त्यांच्याच दृष्टिकोनातून सार्या गोष्टींकडे पाहतो. याचे एक सुप्त कारण म्हणजे आपली वैयक्तिक समृद्धी या व्यवस्थेने आपल्याला दिलेली आहे असा आपला समज असतो, त्यामुळे या व्यवस्थेचे सारे काही बरोबरच असले पाहिजे (जसा धर्म, परंपरा याबाबत असतो तसा) आपला दुराग्रह असतो. त्याच्या मूल्यमापनाच्या कल्पनेनेही आपल्या अंगावर काटा येतो, न जाणो यात काही आक्षेपार्ह दिसलेच तर ती व्यवस्था मोडेल का नि आपला स्वार्थ - त्या व्यवस्थेचे अनुषंग असलेली आपली समृद्धी- तिला आपल्याला मुकावे लागेल का ही धास्ती अप्रत्यक्षपणे आपल्या मनात ठाण मांडून बसलेली असते.
मुळात आज तोंडदेखले जरी आपण ग्राहकहित मान्य करत असलो तरी आपल्या वैयक्तिक निर्णयप्रक्रियेमधे ’गरजे’पेक्षा, ’आवडी’पेक्षा ’निवड’च अधिक डोकावत असते. आज आपण नवा मोबाईल खरेदी करतो तो गरज निर्माण झाली म्हणून की बाजारात नवनवी मॉडेल्स आली आहेत नि त्यातील नव्या सुविधा - ज्याची आपल्या वैयक्तिक आयुष्यात गरज असो वा नसो - आपल्याला ठाऊक नाहीत हे समजल्यावर आपल्या कोंडाळ्यात आपला ’मोरु’ होईल म्हणून? मॉल संस्कृतीने आपल्याला काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मॉल्स हे स्पर्धात्मक व्यापाराचे प्रतीक मानता येईल, तिथे एकाच उत्पादनासाठी अनेक उत्पादकांचे पर्याय उपलब्ध असतात, त्यामुळे निर्माण होणार्या स्पर्धेतून त्या उत्पादकांना ग्राहकाने आपले उत्पादन खरेदी करावे यासाठी सतत जागरूक रहावे लागते, उत्पादनाचा दर्जा चांगला राखावा लागतो, किंमत वाजवी - ग्राहकाला परवडेल अशी - ठेवावी लागते, ’Better amongst equals' निवडण्याची वेळ येईल तेव्हादेखील काही खास स्कीम्स, डिस्काउंटस देऊन ग्राहकाला आपल्याकडे खेचून घ्यावे लागते. पण याची दुसरी बाजू अशी की या उत्पादनांचा मारा सतत तुमच्यावर होत राहिला तर अनेकदा गरजेपेक्षा अधिक अथवा गरजेबाहेर देखील खरेदी होऊ शकते. यातून ग्राहकाचे अप्रत्यक्ष नुकसानच आहे, कारण अशा गरजेबाहेरील खर्चामुळे अनेकदा गरजेच्या गोष्टींवरील खर्चात काटकसर करावी लागते किंवा त्याहून वाईट - जे खरेतर आता नव्या व्यवस्थेत वाईट समजले जात नाही - म्हणजे कर्ज काढून ऋणको व्हावे लागते. (अनेकदा आयटी मधील तथाकथित लठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावर स्वत:चे घर नसलेला आयटी हमाल - सोप्या इन्स्टॉलमेंट्स, त्वरित कर्ज, कमी व्याज वगैरेला भुलून - प्रथम चार-पाच लाख खर्चून कार घेतो नि नंतर घर विकत घेताना उसनवारी करत फिरतो तेव्हा या व्यवस्थेला दोष द्यावा की ही मानसिकता असलेल्या त्या ग्राहकाला हे मला समजलेले नाही.)
दुसर्या बाजूने पाहिले तर एखादे पसंतीस उतरलेले उत्पादन तुम्हाला मॉलमधे नेहमीच मिळेल असे नाही. मागल्या महिन्यात खरेदी केलेली एखादी वस्तू आपल्या गरजेस अगदी नेमकी आहे असे लक्षात आले म्हणून या महिन्यात ती आणायच्या हेतूने गेलो तर बरेचदा उपलब्धच नसते. कदाचित मॉल कंपन्यांना अपेक्षित हिस्सा त्या उत्पादकाने दिलेला नसतो, कदाचित त्याला शक्य झालेला नसतो. मॉल हा ही एक व्यवसायच असल्याने कमी फायद्याचे उत्पादन विक्रीस ठेवण्यापेक्षा ते एखादे - बहुधा अप्रसिद्ध - उत्पादन तिथे विक्रीस ठेवतात. इथे दोन व्यापारी संस्थांच्या हितसंघर्षात ग्राहकाचे हित बाजूला पडते. ही गोष्ट केवळ दोन व्यापारी-उत्पादक संबंधांची, एकाहुन अधिक व्यवस्थांची उतरंड असेल तर ग्राहकहिताचा किती संकोच होत असेल हे तर्क करण्याजोगे आहे. थोडक्यात ही तथाकथित स्पर्धा ग्राहकहिताची असेलच अशी खात्री देता येत नाही आणि त्यातून गरजबाह्य खरेदी आणि गरजपूर्ती न होणे अशा दोन टोकाच्या शक्यता यातून उद्भवतात.
न्याय:
लिब्रियम उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पुरवताना उत्पादक म्हणून त्याची किंमत निश्चित करणे हा रोशचा अधिकार होता, तो अमान्य करणे चूक ठरेल. जोवर किंमतीवर नियंत्रण ठेवणारे सरकारी धोरण अस्तित्वात नसते (जे भारतात अजूनही बर्याच अंशी शिल्लक आहे) अशा व्यवस्थेमधे अशी किंमत खुद्द उत्पादक निश्चित करतो. हे एका अर्थी न्याय्य आहे कारण कच्च्या मालाची किंमत, उत्पादन यंत्रणेवरील खर्च नि बाजारातील मागणी या तीन मुख्य घटकांमधे ती उत्पादक कंपनीच मुख्य भागधारक असल्याने अशी किंमत उत्पादकानेच निश्चित करणे योग्य ठरते. परंतु एकच उत्पादन दोन ग्राहकांना वेगवेगळ्या - त्यातही कित्येक पटींचा फरक असलेल्या - किंमतींना विकणे हे बेकायदेशीर असेलच असे नाही (स्विस कायद्यानुसार नव्हते पण कदाचित भारतात हे बेकायदेशीर ठरू शकेल) पण न्याय्य होते का? ब्रिटन मधील कंपनीला ३७० पौंड तर इटलीतील कंपनीला फक्त ९ पौंड दराने लिब्रियमचा कच्चा माल विकणे हा ब्रिटन मधील कंपनीवर अन्याय नव्हे का? आता ती कंपनी रोशचीच उपकंपनी असल्याने या विरूद्ध ब्रही उच्चारत नसे हा मुद्दा वेगळा. पण जर हीच स्वतंत्र कंपनी असती आणि रोशने हेच धोरण राबवले असते तर त्या कंपनीकडे काय पर्याय राहतो. इथे एक मुद्दा स्पष्ट केला पाहिजे की पुरवठा कच्च्या मालाचा आहे, ज्याच्या आधारे पक्का माल निर्माण करणार्या दोन स्वतंत्र कंपन्या आहेत, पैकी एकाला रोशने अतिशय झुकते माप दिले आहे, त्यांचा उत्पादन खर्च अतिशय कमी राहणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे दुसर्या कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी होत जाऊन नष्ट होणार आहे. एका प्रकारे त्या पक्क्या उत्पादनाच्या स्पर्धेत नसलेल्या रोशने त्यातील एका स्पर्धकाला नेस्तनाबूद केले आहे. आता स्पर्धेत स्वत: रोश नसल्याने यात स्पर्धानियमाचे उल्लंघन होत नसेल कदाचित पण हे अन्याय्य नव्हे का? या धोक्याचा बागुलबुवा दाखवून या दुसर्या कंपनीशी आपल्या सोयीचा करार करवून घेणे रोशसारख्या कंपनीला सहज शक्य आहे. हे ही बेकायदेशीर नसेल पण न्याय्य आहे का?
नैतिकता:
नैतिकता हा तसा अतिशय नाजूक प्रश्न आहे. याचे मुख्य कारण हे अतिशय सापेक्ष मूल्य आहे नि अनेकदा ते कायद्याला छेद देऊन जाताना दिसते. एक सहज लक्षात येण्याजोगे उदाहरण म्हणजे विकसित नि अविकसित देशातील फरक. हा जसा स्थानिक घटकांचा परिणाम असतो तसेच अविकसित देशातील कुशल मनुष्यबळाला कमी पैशात राबवून घेण्याची वर्चस्ववादी वृत्तीचाही असतोच. पण बरेचदा हा अनैतिक वाटणारा घटक रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करून देतो. (अर्थात हा फायदा -जाणवला नाही तरी - तात्कालिक असतो नि वाहत्या पाण्याच्या न्यायाने अन्यत्रही वाहत जाऊ शकतो हे ध्यानात ठेवायला हवे. आउटसोर्सड् नावाच्या एका सुरेख चित्रपटात हे छान अधोरेखित केले गेले आहे.) परंतु एकाच देशात -व्हेनेझुएलामधे - काम करणारर्या अॅडम्ससारख्या गोर्या अधिकार्याच्या नि त्याच्या समकक्ष स्थानिक अधिकार्याच्या वेतनातील तफावत नैतिकतेला धरून आहे का? यात अर्थातच बेकायदेशीर काही नाही, अन्याय्य काही आहे असेही ठामपणे म्हणता येणार नाही. एकाच आस्थापनात, एकाच ठिकाणी काम करणार्या दोन समकक्ष व्यक्तींचे वेतन वेगवेगळे असू शकते. त्यात त्या दोघांच्या Bargaining Power नि Bargaining करण्याची कुवत या दोन्हीचा कस लागतो. पण इथे मुद्दा ’आमचा नि परका’ हा भेद करून वेतनमानात तफावत ठेवण्याचा आहे. सर्वांना समान संधी हे जर आजचे मूळ सूत्र असेल तर हीच बाब व्यक्तींच्या वेतनमानाबाबतही खरी असायला हवी. तशी नसेल तर मूळ तत्त्वाला हरताळ फासणारे हे कृत्य अनैतिक म्हणता येईल. हीच गोष्ट रोशने तेथे ’निर्माण’ केलेल्या जीवनसत्त्वांच्या बाजारपेठेची. ’आम्ही काय जबरदस्ती केली होती का? विकत न घेणे तर ग्राहकाच्या हातात असते ना.’ असा युक्तिवाद केला जाऊ शकतो नि तो पूर्ण कायदेशीर आहे नि न्याय्यही. परंतु न्याय्य आहे म्हणतात तो ज्या परिस्थितीत न्याय्य ठरतो ती परिस्थितीच रोशने बदललेली असल्याने न्यायाचा विचार वेगळ्या संदर्भात करावा लागेल हे ध्यानात घ्यायला हवे. जिथे अन्नपदार्थांचा तुटवडा आहे, बेरोजगारीचा, तुटवड्याचा राक्षस थैमान घालतो आहे तिथे गुंतवणूक करण्याऐवजी फायद्याच्या रूपाने तिथून पैसा बाहेर नेणारी व्यवस्था निर्माण करणे हे कृत्य अनैतिकच म्हणावे लागेल. (क्रिकेटप्रेमींना एक उदाहरण ठाऊक आहे. सर डॉन ब्रॅडमन याच्या फलंदाजीच्या धसका घेतलेल्या इंग्रज गोलंदाजांनी ’बॉडीलाईन’ गोलंदाजी जन्माला घातली. आता क्रिकेटच्या नियमानुसार-कायद्यानुसार अशी गोलंदाजी बेकायदेशीर मुळीच नव्हती. चेंडू फलंदाजाकडे टाकण्याच्या तत्कालीन सार्या नियमातही ते बसत होते. जर फलंदाजाला गोलंदाजाकडे उलट चेंडू मारण्यास बंदी नाही तर गोलंदाजानेही तसे करणे अन्याय्य मानता येणार नाही. पण म्हणून या कृतीला नैतिक म्हणता येईल का? खिलाडूपणाच्या भावनेशी सुसंगत म्हणता येईल का?)
या मूळ मुद्यांच्या आधारे विवेचन अधिक नेमके करत नेणे शक्य आहे पण विस्तारभयास्तव आवरते घेतो. यातून रोशवरील कायदेशीर कारवाई अगदीच अन्य्याय्य नव्हती एवढा निष्कर्ष काढता आला तरी सध्या पुरेसे आहे.
(क्रमशः)
_______________________________________________________________________________________________
(पुढील भागातः तुरुंगातून सुटका नि काथ्याकुटांची सुरुवात)
.jpg)
{>>एकिकडे नव्या जगात जिथे}
>>एकिकडे नव्या जगात जिथे जगण्याचा मूलाधार समजली जाणारी धर्मतत्त्वेही सॅक्रोसँक्ट न मानता स्थल-काल-व्यक्तीनुसार एकुण हिताचा विचार करता बदलणे गैर मानले जात नाही तिथे हा अट्टाहास काय म्हणून?
क्या बात है..
>>त्यावर उपलब्ध असलेल्या टॅमिफ्लू' या एकमेव औषधाची एकमेव उत्पादक होती रोश!
आयच्च्या गावात..
लेखाबद्दल सांगायचं तर ह्याच लेखाची वाट बघत होतो. मागच्या लेखात केवळ वर्णन आलं आहे, ह्यात विवेचन.
मला हेच विवेचन अजून २-३ भागात वाचायला आवडेल.
{मी पण असेच म्हणतो.}
<<लेखाबद्दल सांगायचं तर ह्याच लेखाची वाट बघत होतो. मागच्या लेखात केवळ वर्णन आलं आहे, ह्यात विवेचन.
मला हेच विवेचन अजून २-३ भागात वाचायला आवडेल.>>
मी पण असेच म्हणतो.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{वाचतो आहे, टॅमिफ्लू विषयी}
वाचतो आहे, टॅमिफ्लू विषयी आपली झालेली चर्चा आठवली.
पुढील भाग लवकर येऊ द्या.
Hope is a good thing...
{वाचतो आहे}
वाचतो आहे...
This is imperfect universe
{एक एक करून...}
एक एक करून मुद्दे मांडलेत ते बरे झाले ... आता एक एक करून युक्तीवादही करता येईल.
मी माझा युक्तीवाद अर्थशास्त्रीय व अवांतर (उदा. केवळ निरिक्षणात्मक) अशा दोन गटात वर्गवारी करून मांडतो.
एकाधिकार/मक्तेदारी : - मक्तेदारी म्हंजे कोणत्याही एका उत्पादनासाठी संपूर्ण बाजारपेठेत एकच विक्रेता उपलब्ध असतो. याचा परिणामस्वरूप - त्या विक्रेत्यास हे माहीत असेल की ग्राहकाकडे दुसरा विकल्प (पर्याय) उपलब्ध नाही तर तो अवाच्यासवा किंमत आकारु शकतो. हे तुम्ही वर म्हंटल्याप्रमाणे "गरजवंतास अक्कल नसते" याप्रमाणे चालते.
मक्तेदारी निर्माण होण्याची ३ कारणे असतात -
१) एखाद्या कंपनीकडे उत्पादनास लागणारा एखादा महत्त्वाचा रिसोर्स (साधनसंपत्ती) ची मालकी असते. उदा. औषधकंपनीच्या बाबतीत औषधाचे पेटंट.
२) सरकारने निर्माण केलेली मक्तेदारी (उदा. लायसेन्स देऊन तयार केलेली मक्तेदारी Network Solutions, Inc.) किंवा सरकारांतर्गत मक्तेदारी ( स्थानिक पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, MSEB, Reserve Bank of India, Army, Navy, Airforce, Coast Guard). खरंतर सरकार ही एक मोठ्ठी मक्तेदारी आहे व त्याहूनही वाईट म्हंजे सरकार मक्तेदारी तून उद्भवू शकणार्या अरेरावी चे अनेकदा प्रदर्शन घडवते. त्याचे मुख्य कारण हे की सरकारला तोटा होण्याची फार भीती नसते. कारण सरकारी कर्मचारी/प्रतिनिधी/नोकरशहा यांच्या पदरचे फारसे काहीच जात नसते व त्यामुळे ते बेजबाबदार पणे निर्णय घेतात. यालाच Moral Hazard म्हणतात. आणि तोटा झालाच तर कररूपी पैसा वसूल करून (किंवा वित्तीय तूट निर्माण करून किंवा नोटा छापून) तोटा/नुकसान भरून काढले जाते. नोकरशहांना जो Moral Hazard असतो तो मॅनेजमेंट ला ही असतो पण तोटा झाल्यास समभागधारक त्यांना पदच्युत करू शकतात. सरकारच्या बाबतीत तोटा ही explicit, reportable संकल्पनाच नसते.
३) उत्पादनाची प्रक्रियाच अशा स्वरूपाची असते की एकच उत्पादक/विक्रेता एफिशियंटली उत्पादन्/सेवा पुरवू शकतो व बाकिचे स्पर्धेत तग धरू शकत नाहीत किंवा प्राथमिक भांडवालाची (Startup Capital / Initial Investment) गरज एवढी असते की त्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. किंवा स्केल एकॉनॉमी प्रचंड असते. उदा. विजेचे वितरण (उत्पादन नव्हे) करणारी कंपनी.
बाकी मक्तेदार्या मार्केट शेअर वर अवलंबुन असतात - उदा. www.google.com, www.ebay.com (या परफेक्ट मक्तेदार्या नव्हेत पण...)
मक्तेदारी बद्दल चे गैरसमज -
गैरसमज १) मक्तेदारी करणारे खाजगी उत्पादक नेहमीच/अनिवार्यपणे अवाच्यासवा किंमत आकारतात. (उदा. गूगल, इबे या कंपन्या माफक किंमतीत सेवा उपलब्ध करून देतात. गूगल चा मार्केट शेअर ८०% च्या आसपास आहे. इंटेल चे ही तसेच त्यांचा मायक्रोप्रोसेसर मार्केट मधील शेअर प्रचंड आहे पण उत्पादन माफक किंमतीत उपलब्ध आहे.)
गैरसमज २) खाजगी मक्तेदारी हीच जनतेला घातक असते व सरकारी मक्तेदारी घातक नसते.
गैरसमज ३) मक्तेदारीस वेसण घालण्यासाठी सरकार हीच सर्वात पात्र संघटना आहे.
गैरसमज ४) मक्तेदारी विरुद्ध कायदे परिणामकारक असतात.
मक्तेदारी असलेली खाजगी कंपनीही नफा तोट्याच्या चौकटीतच व्यवहार करत असते. नव्हे तिला तसाच करावा लागतो. व मक्तेदारीयुक्त अरेरावी करणार्या कंपन्या फार काळ अरेरावी करून टिकु शकत नाहीत. अशी अरेरावी करून दीर्घकाल तग धरून टिकु शकलेल्या कंपन्या खूप कमी आहेत.
----
मक्तेदारीचे थोडक्यात अर्थशास्त्रीय विश्लेषण (व्हिडिओ ७ मिनिटे) -
----
एक मुद्दा असू शकतो की जर ते उत्पादन फक्त त्या एकाच उत्पादकाकडे उपलब्ध असेल तर ”मागणीनुसार किंमत’ किंवा 'कॉस्ट टू द कस्टमर' या न्यायाने त्या उत्पादकाने ठरवली तर त्यात गैर काय. हा मुद्दा मांडणारे फक्त उत्पादकाच्याच दृष्टिकोनातून विचार करत असतात. वर म्हटले तसे इतर भागधारकांचे काय? यात त्यांच्या हिताचा विचार कुठे आला? बरं मग जर असे म्हणायचे असेल की ’ज्याला परवडेल त्याने वापरावे इतरांनी वापरू नये’ तर मग औषधांसारख्या जीवनावश्यक गोष्टींचे काय? की तिथेही स्पर्धात्मक व्यापाराची तत्त्वे लावायची का? आता प्रश्न असा आहे की ही तत्त्वे इतकी पवित्र (Sacrosanct) आहेत का की माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाची मानावीत.
इतर भागधारकांचे काय ? समभागधारक हेच फक्त भागधारक असतात. सप्लायर, ग्राहक, कर्मचारी, जनता हे भागधारक बनू शकतात - समभाग विकत घेऊन. ते समभाग विकत घेणार नसतील तर व तरीही भागधारक म्हणून दर्जा हवा असेल तर प्रचंड समस्या निर्माण होते. ती अशी की हे लोक (सप्लायर, ग्राहक, कर्मचारी, जनता) गुंतवणूक तर काहीही करणार नाहीत व मॅनेजमेंट च्या निर्णयांवर अधिकार चालवणार व त्याच वेळी त्यांना निर्णयांचे दुष्परिणाम भोगायची तयारी नसते कारण समभाग विकत घेतलेले नसतात. त्यामुळे ही परिस्थिती "चित मै जीता और पट तू हारा" अशी होते. तोटा झाला तर तो समभागधारकांचा व कंपनीने सामाजिक जबाबदारी घेतल्याने जे लाभ मिळाले ते मात्र या लोकांचे (सप्लायर, ग्राहक, कर्मचारी, जनता ).
कर्जपुरवठा करणारे लोक (बँका) हे दिवाळखोरी नंतरच भागधारक बनू शकतात. त्यापूर्वी कर्ज पुरवठा करताना Credit Agreement मधे काही अटी घालतात.
स्पर्धात्मक बाजारपेठेची तत्वे ही सुयोग्य का आहेत - तर त्यांचा परिणाम म्हणून औषधांविषयक संशोधन लवकर होते. जर पेटंट कायदा रद्द केला तर संशोधनावर गुंतवणूक करण्यास कंपन्या तयार होतील का ? किती कंपन्या होतील ? पेटंट ही २० वर्षासाठी मक्तेदारीच असते. व ही मक्तेदारीच जास्त परतावा मिळवून देते व म्हणूनच गुंतवणूक होते व संशोधन होते. व संशोधक्/शास्त्रज्ञांना चांगला पगार देणे परवडते व म्हणूनच हुशार लोक संशोधनाकडे आकर्षित होतात.
आता तुम्ही म्हणाल की इस्रो चे काय. ते कुठे दणकट पगार देतात ? पण लोक जातातच ना तिथे संशोधनास ?
उत्तर - इस्रो मधे लोक जातात त्याचे एक कारण (एकमेव नव्हे) त्यांना देशसेवा महत्त्वाची वाटते व त्यातून मिळणारा सामाजिक मान हा पैश्यापेक्षा जास्त प्रिय असतो.
स्पर्धा ही जबरदस्त शिस्त लावणारी प्रक्रिया असते.
----
दुसरा दावा असा की उत्पादन फार महाग विकले तर विक्री घटेल नि फायदा कमी होईलच त्यामुळे आपोआपच उत्पादकाला किंमत कमी करून विक्री वाढवावी लागेल. हे ही उदाहरण तितकेसे बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. कारण आजच्या जगात विक्रीसाठी निव्वळ ’नैसर्गिकरित्या निर्माण होणारी गरज’ या एकाच घटकावर अवलंबून न राहता ती कृत्रिमरित्या निर्माण करण्याचे तंत्रही चांगलेच विकसित झाले आहे.
वरील अर्थशास्त्रीय विश्लेषणातून हे दिसते की मक्तेदारी असलेल्या कंपन्याही तोट्याला घाबरून आपल्या किंमती आटोक्यात ठेवतात. नव्हे त्यांना ठेवाव्याच लागतात. नफा व तोटा या समीकरणात ते ही बद्ध असतात.
तुम्ही वर नैतिकतेच्या विभागात म्हंटल्याप्रमाणे ’आम्ही काय जबरदस्ती केली होती का? विकत न घेणे तर ग्राहकाच्या हातात असते ना.’ असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. हे खरे आहे. जबरदस्ती/बळजबरी ही कोणीच कोणासही करता कामा नये हे जर तत्व असेल तर कंपनीनेही ग्राहकांवर उत्पादन विकत घेण्यासाठी करू नये तसेच ग्राहकांनी (व ग्राहकांच्या वतीने सरकारने) कंपनीवर उत्पादन विकण्यासाठी करू नये.
इथे तुमचा व माझा सैद्धांतिक मतभेद आहे. तुम्ही असे सूचित करता की औषधासारख्या अतिमहत्त्वाच्या (जीवन मरणाचा प्रश्न) गोष्टीत सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार असावा व वेळप्रसंगी ग्राहकाचा/पेशंटचा जीव वाचवण्यासाठी सरकारने कंपनीवर जबरदस्ती करायला हरकत नाही.
माझ्यासारखा स्वातंत्र्यवादी असे म्हणेल की तसा कायदा आधी करावा व कायद्याचे उल्लंघन सरकार, कंपनी व ग्राहक यापैकी कोणीही करू नये. ज्या गोष्टी कायद्यांतर्गत आहेत त्याबाहेरील कृती सरकारने करू नयेत. कारण त्यामुळे मालमत्तेच्या अधिकाराचे उल्लंघन होते. सरकारला असे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही.
सरकार इतर मार्ग वापरू शकते - उदा. करसवलती वगैरे.
व सरकारमध्ये कंपनी व ग्राहक दोघेही समान भागधारक आहेत. त्यामुळे एकाची मालमत्ता जबरदस्तीने काढून घेऊन दुसर्यास देण्याचा अधिकार सरकारला नसावा. जर या कायद्यात तशा स्वरूपाची तरतूद (एकाची मालमत्ता जबरदस्तीने काढून घेऊन दुसर्यास देण्यासंबंधातील) असेल तर उद्योजक गुंतवणूक करताना विचार करेल.
------------
एखाद्या कंपनीचे उत्पादन विकत घेण्यास नकार देणे हे जबरदस्त पॉवरफुल्ल हत्यार आहे ग्राहकांच्या भात्यातले. बहुतेकांना हे माहीत नसते. खाजगी कंपन्या नुसत्या नफा मिळवतात असे गृहीत धरून चालतो आपण. तोटा होऊ शकतो (हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते). व त्याद्वारे कंपन्यांना वेसण घातली जाऊ शकते व ही वेसण जास्त प्रभावशाली असते.
आता ज्या कंपन्या खरोखर मक्तेदार्या असतात व ग्राहकांना त्यांच्या उत्पादनाची प्रचंड गरज असते व तेव्हा त्या अरेरावीने वागतात तिथे मात्र ही मात्रा लागू पडत नाही. याची दुसरी बाजु ही आहे की जिथे ग्राहकांना प्रचंड पर्याय उपलब्ध असतात तिथे ग्राहकही अरेरावीने वागू शकतात व वागतातही. अर्थात हा युक्तीवाद नव्हे ... फक्त एक निरिक्षण आहे.
कारण आजच्या जगात विक्रीसाठी निव्वळ ’नैसर्गिकरित्या निर्माण होणारी गरज’ या एकाच घटकावर अवलंबून न राहता ती कृत्रिमरित्या निर्माण करण्याचे तंत्रही चांगलेच विकसित झाले आहे.
तुमचा रोख हा जाहिरातबाजीकडे आहे. पण जाहिरात ही गोष्ट प्रचंड महत्त्वाची आहे. जाहीरातीमुळेच लोकांना पर्यायांची माहीती होते. कोणत्याही व्यक्तीसाठी स्वातंत्र्य म्हंजे बळजबरीचा अभाव आणि विकल्पांची मांदियाळी. जेवढे विकल्प जास्त तेवढे स्वातंत्र्य जास्त. विकल्प हे स्वातंत्र्याचे एकक (Unit of measure) आहे व जेवढी जाहिरात जास्त तेवढे विकल्पांची माहीती/प्रसारण जास्त.
कृत्रिमरित्या मागणी वाढवणे हे अयोग्य आहे असा सूर पंडित दीनदयाळ उपाध्याय (रा स्व संघ व भा ज पा चे विचारमहर्षी) यांनीही आपल्या "एकात्मिक मानवतावादाच्या" या २२ अप्रिल १९६५ च्या व्याख्यानात लावला होता.
http://www.bjp.org/index.php?option=com_content&view=article&id=134&Item...
पण जाहिरातबाजी करताना खालील २ जोखिमी लक्षात ठेवून जबाबदारीने जाहीरात करावी लागते -
१) जाहिरातीचा परिणामस्वरूप मागणी प्रचंड वाढली व उत्पादकाच्या उत्पादन क्षमते (Capacity) पेक्षा ही जास्त झाली तर विक्रेता माल पुरवू शकणार नाही व ग्राहक दुसर्या विक्रेत्याकडे जातील. म्हंजे जाहिरातदाराने जाहिरात दुसर्यासाठी केली असे होईल.
२) जाहिरातीचा परिणामस्वरूप मागणी निर्माण झालीच नाही तर प्रचंड तोटा होईल.
दोन्ही केस मधे समभागभागधारक मॅनेजमेंट ला बडवून काढतील. त्यामुळे जाहिरातबाजी हा शब्द संयुक्तीक नाही.
---------
अर्थशास्त्री मक्तेदारीच्या समस्येकडे खालील प्रश्नांच्या चौकटीतून पाहतात -
१) मक्तेदारी किती प्रमाणात आहे व त्याचा परिणामस्वरूप खरोखर अरेरावी युक्त वर्तणूक होत्ये का ?
२) मक्तेदारी ही जर समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी जी माहीती, कौशल्ये व इन्सेंटिव्ह्ज लागतात ती कोणाकडे आहेत ?
३) मक्तेदारी ही जर समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी जी कारवाई करायची तिचा खरोखर इष्ट परिणाम होईल का व त्याचे इतर अनिष्ट परिणाम होतील का ?
४) नक्की कोणाचे हित जोपासण्याचा आपला इरादा आहे ?
-----------
नव्या खुल्या धोरणाचे खंदे समर्थक बहुधा शासकीय धोरणांमुळे व्यावसायिक हिताचे नुकसान होते ही हाकाटी नेहमीच करताना आढळतात.
अगदी. मी या नव्या खुल्या धोरणांचा खंदा समर्थक आहे व याविषयक उपलब्ध असलेल्या (इतरांनी केलेल्या) संशोधनातून माझे हे मत झाले आहे की सरकारी हस्तक्षेप हा अनेक कारणांसाठी अनिष्ट ठरतो -
१) सरकारचे इन्सेंटिव्हज व Motivations ही नेहमीच ग्राहकांच्या बाजूची नसतात. कित्येकदा मक्तेदारांच्या बाजुची असतात. त्याला रेग्युलेटरी कॅप्चर म्हणतात. मक्तेदार मंडळी Too much to loose परिस्थीतीत असतात व त्यामुळे दबावगटांच्या माध्यमातून सरकारवर/निर्णयांवर प्रभाव टाकतात.
२) मक्तेदारी ला वेसण घालणारे कायदे हेच मुळी अनेकदा त्या Industry मधल्या Existing players च्या सांगण्यावरून केलेले असतात. नवीन कंपनीचा या क्षेत्रात प्रवेश होण्यापासून रोखण्यासाठी. म्हंजे सरकारचे दाखवायचे दात हे की आम्ही Competitive process बळकट करत आहोत किंवा ग्राहकांचे हित साधत आहोत. पण खायचे दात (अंतस्थ हेतू) असे की Erect barriers to entry. कायदे निर्माण केले की त्यांचे पालन करण्यावर कंपनीचा खर्च होतो व हा वाढत जातो. नवीन उद्योजक हा खर्च पेलू शकत नाही व त्यामुळे प्रवेशास उद्युक्त होत नाही.
३) मक्तेदारी विरोधी कायदे अंतर्विरोध असलेले असतात. (मक्तेदारीविरुद्धचे/प्रिडेटरी प्रायसिंग विरुद्धचे कायदे व डंपिंग विरुद्धचे कायदे.)
-------------
अवांतर - मक्तेदारी असलेल्या मंडळींचे मक्तेदारी नसलेल्या मंडळींकडून शोषण होऊ शकते. जगातील अनेक राष्ट्रात स्त्रियांचे प्रचंड शोषण चालते. स्त्रियांकडे मक्तेदारी असूनही. स्त्री-पुरुष विवाहातून कुटुंब निर्माण होते. अपत्याची मागणी स्त्री व पुरुष दोघांचीही असते व मुल निर्माण होण्याच्या प्रक्रियेत पुंबीज व स्त्रीबीज दोन्ही असतात. त्यामुळे तिथपर्यंत (फलनापर्यंत) स्त्री पुरुष दोन्ही समान भागधारक असतात. पण त्यापुढे ९ महिने स्त्री ही गर्भाशयाचा पुरवठा करणारी मक्तेदारीयुक्त सप्लायर असते. पण तरीही स्त्रियांचे गरोदरपणातही शोषण होते.
म्हणून मी मातृसत्ताक कुटुंबपद्धतीच्या बाजुचा आहे.
-------------
सांस्कृतिक दृष्ट्या बोलायचे झाले तर लक्ष्मी (भांडवल) ही चंचल मानली गेलेली आहे. पण हेच चंचलत्व बलस्थान असते. एखाद्या कंपनीची मक्तेदारी वाढली तर भांडवलदार व दलाल तिला आणखी भांडवल पुरवठा करायला उद्युक्त होतात. (प्राइस सिस्टीम द्वारेच त्यांना समजते की मक्तेदारी वाढलीय). व अनेक भांडवलदारांत व दलालांत स्पर्धा/चढाओढ लागते (विशेषत्वाने जागतिकिकरणाच्या जमान्यात) व त्यांचे entry valuation (purchase price of a share) वाढत जाते व समभागधारकांचा लाभ वाढत जातो. त्यामुळे समभाग विकत घेणे ह्यात व्यक्तीचेही हित असते.
-------------
तुमच्या छोट्याश्या एकाधिकार परिच्छेदास लांबलचक प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{धन्यवाद}
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
१. तुम्ही दिलेल्या गैरसमजांच्या यादीबाबत कोणतेही पुरावे/उदाहरणे न दिल्याने प्रतिवाद करत नाही. जवळजवळ प्रत्येकच मुद्दा हा काही प्रमाणात योग्य काही प्रमाणात अयोग्य आहे. तो तुम्ही पर्स्पेक्टिवमधे मांडल्यास कुठे सहमत व्हायचे किती असहमत व्हायचे याबाबत बोलू शकेन. तूर्तास 'असे तुमचे मत आहे' एवढे गृहित धरून सोडून देतो.
समभागधारक हेच फक्त भागधारक असतात.
हज्जार टक्के असहमत. इथेच आपले तुपले पहिले मतभेद चालू होतात. ग्राहकाला भागधारक न समजता हा तुमचा समज असेल तर व्यापार हा सर्वस्वी स्वार्थ साधण्यापुरता केला जातो असे समजावे लागेल, तुमची हरकत नसेल कदाचित पण आमची आहे ना. दुसरे असे की मुळात तुमचे हे मत एखाद्या कट्टर भांडवलशाही -थिअरेटिकल - पुरस्कर्त्यालादेखील मान्य होण्यासारखे नाही. ते ही ग्राहक हा मोठा -किंबहुना सर्वात मोठा - भागधारक मानूनच पुढे जातात. पहा विचार करून.
वरील अर्थशास्त्रीय विश्लेषणातून हे दिसते की मक्तेदारी असलेल्या कंपन्याही तोट्याला घाबरून आपल्या किंमती आटोक्यात ठेवतात. नव्हे त्यांना ठेवाव्याच लागतात. नफा व तोटा या समीकरणात ते ही बद्ध असतात.
अहो आमचे जे विधान तुम्ही या निष्कर्षासाठी वापरले आहे तेच आम्ही पुढे खोडून काढले आहे ते पाहिले नाही का? हे सारे थिअरेटिकली शक्य असले तरी अनेक मार्गांनी - खास करून जागतिकीकरणाने उपलब्ध होणार्या व्यामिश्र बाजारपेठांच्या समूहांमुळे - या तथाकथित अर्थशास्त्रीय नियमाला फाट्यावर मारता येते. नाहीतर ३७० डॉलर विरुद्ध ९ डॉलर ही विषम विक्री किंमत काय दाखवते.
तुमचा रोख हा जाहिरातबाजीकडे आहे.
जाहिरातबाजी ही अतिशय दुय्यम गोष्ट आहे. टॅमिफ्लूची गरज कशी निर्माण झाली असेल..... तर्क करून पहा.
सरकारचे इन्सेंटिव्हज व Motivations ही नेहमीच ग्राहकांच्या बाजूची नसतात. कित्येकदा मक्तेदारांच्या बाजुची असतात.
धन्यवाद.
मक्तेदारी विरोधी कायदे अंतर्विरोध असलेले असतात. (मक्तेदारीविरुद्धचे/प्रिडेटरी प्रायसिंग विरुद्धचे कायदे व डंपिंग विरुद्धचे कायदे.)
पुरावा, उदाहरण दिले तर केस टू केस बेसिस वर सहमत होण्यास प्रत्यवाय नसावा. पण तुमचे गैरसमजाची यादी अथवा हे विधान फारच स्वीपिंग आहे, जणू सारे काही असेच असते, अगदी १००%. शक्यतांचा विचार करायची तुमची तयारी का नसावी, काही बाबतीत सरकारी नियमन आवश्यक असू शकेल असे तुम्हाला अजिबातच वाटत नाही का? तसे असल्यास कदाचित तुम्ही - कम्युनिस्टांप्रमाणेच - फारच एकांगी विचार करता आहात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
एक महत्त्वाचा मुद्दा आहे नि जो माझ्या लिखाणाचा गाभा आहे तो जर लक्षात आला तर कदाचित चर्चा वेगळ्या दिशेने जाईल. तुम्ही अर्थशास्त्राचे सिद्धांत नि त्यातील तरतुदींबद्दल बोलत आहात तर मी प्रत्यक्षात काय घडले/घडते याबाबत बोलतो आहे. जर व्यावसायिक मंडळी सैद्धांतिक व्यवस्थेला अनुसरत असतील तर मग समस्याच नाही. पण हीच गोष्ट कम्युनिजम एक सिद्धांत म्हणून पाहिले तर खरी आहे असे मी मानतो. पण त्यावर आधारित व्यवस्था कोसळली तर त्या सिद्धांताचा दोष नि सब-प्राईम क्रायसिस मात्र भांडवलशाहीचा नव्हे तर चुकीच्या अंमलबजावणीचा दोष हा एकांगी विचार आहे. (याची तुलना मी आमचा धर्म खरा इतर सारे खोटे या दाव्याशी करू शकतो.) फक्त भांडवलशाही ही आजची यशस्वी व्यवस्था म्हणून किंवा आपण त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेतले लाभधारक आहोत एवढ्याच कारणासाठी जे चालले आहे ते सैद्धांतिकदृष्ट्या बरोबर आहे असा स्टँड घेणे निदान मला तरी शक्य नाही. जे दोष आहेत ते आहेत भले ते सिद्धांतामधील नसतील पण अंमलबजावणीमधे नक्कीच आहेत नि ते अमान्य करणे म्हणजे सुधारणेची संधी नाकारणे आहे. माझ्या मते प्रत्येक व्यवस्थेत गुणदोष असतातच, तसेच तिचे प्रभावक्षेत्रही असते. त्या मर्यादेतच तिची उपयुक्तता असते. एका क्षेत्रातील यश पाहून तिला सर्वंव्यापक बनवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{क्या बात है.. अब आएगा मजा...}
क्या बात है.. अब आएगा मजा... फक्त तुम्ही दोघांनी चर्चेतून अंग काढून घेतले तर दोघांच्याही नावाची सुपारी देण्यात येइल ह्याची नोंद घ्यावी..
>>जर व्यावसायिक मंडळी सैद्धांतिक व्यवस्थेला अनुसरत असतील तर मग समस्याच नाही. पण हीच गोष्ट कम्युनिजम एक सिद्धांत म्हणून पाहिले तर खरी आहे असे मी मानतो. पण त्यावर आधारित व्यवस्था कोसळली तर त्या सिद्धांताचा दोष नि सब-प्राईम क्रायसिस मात्र भांडवलशाहीचा नव्हे तर चुकीच्या अंमलबजावणीचा दोष हा एकांगी विचार आहे. (याची तुलना मी आमचा धर्म खरा इतर सारे खोटे या दाव्याशी करू शकतो.) फक्त भांडवलशाही ही आजची यशस्वी व्यवस्था म्हणून किंवा आपण त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेतले लाभधारक आहोत एवढ्याच कारणासाठी जे चालले आहे ते सैद्धांतिकदृष्ट्या बरोबर आहे असा स्टँड घेणे निदान मला तरी शक्य नाही. जे दोष आहेत ते आहेत भले ते सिद्धांतामधील नसतील पण अंमलबजावणीमधे नक्कीच आहेत नि ते अमान्य करणे म्हणजे सुधारणेची संधी नाकारणे आहे.
अत्यंत वास्तव मुद्दा
{ग्रेट.. गब्बरसिंग, तुम्ही}
ग्रेट..
गब्बरसिंग, तुम्ही भारतात आला की, तुम्हाला आणि रमतारामजींना एका खोलीत दिवसभर कोंडून घालून तुमच्या शेजारी, आरामखुर्चीवर तुम्हा दोघांना निवांत ऎकत बसायचा माझा विचार आहे.
अतिशय सुंदर चर्चा..
..............................................................
क्या फर्क पडता है?
{कुलुप-किल्ली मीमराठी.नेट}
कुलुप-किल्ली मीमराठी.नेट तर्फे !!!
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
..............................................................
क्या फर्क पडता है?
{मक्तेदारी विरोधी कायदे अंतर्विरोध असलेले असतात. (मक्तेदारीविरुद्}
मक्तेदारी विरोधी कायदे अंतर्विरोध असलेले असतात. (मक्तेदारीविरुद्धचे/प्रिडेटरी प्रायसिंग विरुद्धचे कायदे व डंपिंग विरुद्धचे कायदे.)
पुरावा, उदाहरण दिले तर केस टू केस बेसिस वर सहमत होण्यास प्रत्यवाय नसावा. पण तुमचे गैरसमजाची यादी अथवा हे विधान फारच स्वीपिंग आहे, जणू सारे काही असेच असते, अगदी १००%.
उदाहरणच दिले होते - मक्तेदारीचा परिणाम म्हणून कंपन्या अवाच्यासवा भाव लावतात असा कंपन्यांविरुद्ध आरोप केला जातो. व म्हणून कंपन्यांनी असे भाव लादु नयेत म्हणून कायदे करावेत अशी मागणी केली जाते.
पण एखादी कंपनी जर आपले उत्पादन खूप कमी किंमतीला विकत असेल (डंपिंग) तरीही आरडाओरडा होतो. की ही कंपनी कमी भाव लावून इंडस्ट्रीतल्या existing players ना तोटा होईल असे वर्तन करत आहे व म्हणून ह्या कंपनी वर कारवाई करावी. कंपनीने आपले उत्पादन किती किंमतीला विकायचे हे त्यांचे त्यांना ठरवू द्यात ना. त्यात सरकार ने का हस्तक्षेप करावा ?
कंपनीने आपला माल प्रचंड भावास विकला तरीही समस्या व प्रचंड कमी भावात विकला तरीही समस्या - हा अंतर्विरोध.
उदाहरण - Predatory Discounts - इंटेल वि. AMD
http://www.nytimes.com/2007/10/29/opinion/29mon2.html?ref=opinion
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{असहमत}
कंपनीने आपला माल प्रचंड भावास विकला तरीही समस्या व प्रचंड कमी भावात विकला तरीही समस्या - हा अंतर्विरोध.
असहमत. यात अंतर्विरोध काहीच नाही. किंबहुना दोन विरुद्ध टोकाला परस्पर्विरोधी समस्या निर्माण होतात हे समजून घेऊन त्यांच्या मधे एक ऑप्टिमम झोन निर्माण करणे हे अगदी सुज्ञपणाचेच आहे. गाडीच्या एवरेज चे उदाहरण घेऊ. गाडी शक्य तितक्या वेगाने चालवली तर मिळणारे अॅवरेज, अगदी हळू १०-२० ने चालवत असू तर मिळणारे अॅवरेज नि ३०-५० च्या दरम्यान चालवल्यास मिळणारे अॅवरेज यात शेवटचे सर्वात अधिक असते हे 'पुराव्याने शाबीत' झालेले आहेच. तेव्हा अॅवरेज चांगले मिळायला हवे असेल गाडी जशी या वेगमर्यादेत चालवणे गरजेचे असते तसेच किंमतीचेही असणारच. कोणत्याही (धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक) व्यवस्थेचे समर्थक जेव्हा ती व्यवस्था परिपूर्ण समजतात तिथेही ते नेमकी हीच चूक करीत असतात. कोणत्याही टोकाला जाण्याचे एका प्रकारच्या समस्या वेगाने वाढत राहतात. तेव्हा असा ऑप्टिमम झोन निश्चित करणे नि तो पाळणे आवश्यकच असते. आणि या दोन टोकाला उद्भवणार्या समस्या दोन वेगळ्या घटकांवर परिणाम करणार्या असण्याने त्या दोघांचे थोडे थोडे हित जपणारी त्रयस्थ व्यवस्था म्हणूनच आवश्यक असते.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{वाचतोय हो ररा.}
वाचतोय हो ररा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{ग्राहक हा defacto भागधारक मानणे अशक्य आहे}
समभागधारक हेच फक्त भागधारक असतात.
हज्जार टक्के असहमत. इथेच आपले तुपले पहिले मतभेद चालू होतात. ग्राहकाला भागधारक न समजता हा तुमचा समज असेल तर व्यापार हा सर्वस्वी स्वार्थ साधण्यापुरता केला जातो असे समजावे लागेल, तुमची हरकत नसेल कदाचित पण आमची आहे ना. दुसरे असे की मुळात तुमचे हे मत एखाद्या कट्टर भांडवलशाही -थिअरेटिकल - पुरस्कर्त्यालादेखील मान्य होण्यासारखे नाही. ते ही ग्राहक हा मोठा -किंबहुना सर्वात मोठा - भागधारक मानूनच पुढे जातात. पहा विचार करून.
भागधारक हा कंपनीच्या नफा व तोट्यास जबाबदार असतो. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे समभाग रु. १०० ला खरेदी केलेत. व त्या नंतर त्या कंपनी ला नफा झाला. व संचालक मंडळाने लाभांश देण्या चा निर्णय घेतला तर समभागधारकांनाच ( म्हंजे तुम्हालाच) लाभांश (Dividend ) मिळतो. हा तुमचा परतावा. या ऐवजी जर तोटा झाला तर कंपनीच्या समभागाची किंमत रु. १०० वरून घसरते व तुमच्या पोर्टफोलिओ मधे तुम्हास लॉस दिसतो. कंपनीस जर तोटा झाला तर सर्वसामान्यपणे लाभांश दिला जात नाही.
ग्राहकांना लाभांश मिळत नाही. (स्पेशल केस मधे - ग्राहकाने तुमच्याप्रमाणेच समभाग विकत घेतले असतील तर तो ग्राहक व भागधारक दोन्ही असतो व त्यास लाभांश मिळतो पण तो ग्राहक आहे म्हणून नव्हे तर समभागधारक आहे म्हणून.)
समभागधारक हे कंपनीच्या संचालकमंडळाची निवड (मतदानाद्वारे) करतात. व त्याद्वारे मॅनेजमेंट वर नियंत्रण ठेवतात. तुमच्याकडे जेवढे समभाग जास्त तेवढी तुम्हाला देता येणारी मते जास्त. तुम्ही १०० समभाग विकत घेतलेत तर तुम्ही १०० मते देऊ शकता. ग्राहकांना हे मतदान करता येत नाही. (तोपर्यंत ... जोपर्यंत ते समभाग विकत घेत नाहीत.)
मॅनेजमेंट च्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संचालकमंडला द्वारे समभागधारकांनाच असतो. ग्राहक हा नफा तोटा यांस जबाबदार नसल्याने त्यास संचालक मंडलावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला जात नाही.
व म्हणून ग्राहक हा भागधारक नाही.
ग्राहकास हा अधिकार मिळू शकतो .... पण फक्त समभाग विकत घेतल्यावरच ... पण त्या केस मधे तो अधिकार (वर म्हंटल्याप्रमाणे) त्यास ग्राहक म्हणून नव्हे तर समभाग धारक म्हणून मिळतो.
ग्राहकास defacto भागधारक मानणे both theoretically and practically अशक्य आहे.
तुम्ही साबण विकत घेता - तुम्ही साबण बनवणार्या कंपनीचे ग्राहक. आता उद्या कंपनीस तोटा झाला तर त्यास तुम्ही जबाबदार असता का ?
-------------------------------
दुसरे असे की मुळात तुमचे हे मत एखाद्या कट्टर भांडवलशाही -थिअरेटिकल - पुरस्कर्त्यालादेखील मान्य होण्यासारखे नाही. ते ही ग्राहक हा मोठा -किंबहुना सर्वात मोठा - भागधारक मानूनच पुढे जातात. पहा विचार करून.
(माझ्या पेक्षा क्रूर व निर्दय भांडवलवादी जगात कधीही झाला नाही व होणारही नाही.)
गेल्या ३०० वर्षातले जे सर्वोत्तम जगप्रसिद्ध भांडवलवादी - अॅडम स्मिथ (आद्य भांडवलवादी) , मिल्टन फ्रिडमन, फ्रेडरिक हायेक, लडविग मिझेस, जॉर्ज स्टिग्लर .... यापैकी कोणीही ग्राहकास defacto भागधारक मानायला तयार होणार नाहीत असा माझा दावा आहे. ग्राहक भागधारक बनू शकतो पण फक्त समभाग विकत घेऊनच. पण मग त्या केस मधे तो दोन्ही असतो ... प्युअर ग्राहक राहत नाही.
संदर्भ - http://www.colorado.edu/studentgroups/libertarians/issues/friedman-soc-r...
(हा डायरेक्ट उत्तर देणार नाही पण अप्रत्यक्ष उत्तर देईल.)
----
आता तुमच्या म्हणण्याचा आशय - ग्राहकास उत्पादन विकण्यासाठीच कंपन्या निर्माण होतात. व त्या म्हणून ग्राहक हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो (भागधारकांसाठी). पण ग्राहक defacto भागधारक नसतो.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{दादानुं}
जरा अर्थशास्त्रातून बाहेर या. आम्ही व्यापाराचा भागधारक म्हणत आहोत. आमचा लेख व्यापारव्यवस्थेबद्दल आहे नफानिर्माण व्यवस्थेबद्दल नाही. मी जेव्हा भागधारक असा शब्द वापरतो तो 'स्टेक होल्डर' या अर्थाने वापरतो - जो सहभागी असतो तो - 'शेअर होल्डर' या अर्थाने नव्हे. 'लाभधारक' नि 'भागधारक' यात गल्लत होते आहे साहेब. तुमची नफा, लाभांश नि शेअर यांच्यात जी 'गुंतवणूक' झाली आहे त्यामु़ळे तुम्ही वेगळ्या दिशेने विचार करत आहात.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{जरा अर्थशास्त्रातून बाहेर या. आम्ही व्यापाराचा भागधारक म्हणत आहो}
जरा अर्थशास्त्रातून बाहेर या. आम्ही व्यापाराचा भागधारक म्हणत आहोत. आमचा लेख व्यापारव्यवस्थेबद्दल आहे नफानिर्माण व्यवस्थेबद्दल नाही. मी जेव्हा भागधारक असा शब्द वापरतो तो 'स्टेक होल्डर' या अर्थाने वापरतो - जो सहभागी असतो तो - 'शेअर होल्डर' या अर्थाने नव्हे. 'लाभधारक' नि 'भागधारक' यात गल्लत होते आहे साहेब. तुमची नफा, लाभांश नि शेअर यांच्यात जी 'गुंतवणूक' झाली आहे त्यामु़ळे तुम्ही वेगळ्या दिशेने विचार करत आहात.
स्टेक होल्डर विरुद्ध शेअर होल्डर. तुम्ही स्टेक होल्डर च्या बाजुने युक्तीवाद करताय व मी शेअरहोल्डर च्या बाजुने.
स्टेक होल्डर मधे खालील मंडळी येतात - समभागधारक, ग्राहक, कर्ज पुरवठा करणारे, कर्मचारी/कामगार, सप्यायर्स, सरकार, Joint Venture Partner/Collaborator, स्वयंसेवी संस्था (पर्यावरणवादी वगैरे) , मिडिया, कम्युनिटी (स्थानिक).
शेअरहोल्डर मधे फक्त समभागधारक व प्रवर्तक्/उद्योजक/संस्थापक येतात.
प्रवर्तक्/उद्योजक/संस्थापक यांनी त्यांच्याकडले सर्व समभाग विकुन टाकल्यास ते मालक उरत नाहीत.
माझा युक्तीवाद असा आहे की स्टेक होल्डर मॉडेल हे शेअरहोल्डर्सवर (समभागधारकांच्यावर) अन्यायकारक आहे. व म्हणूनच मी मिल्टन फ्रिडमन यांचा लेख (दुवा) पाठवला. त्यामधे Corporate Social Responsibility ची संकल्पना (जी सर्वस्वी स्टेकहोल्डर मॉडेल वर आधारलेली आहे) ही कशी चूक आहे त्याचे विवरण त्यांनी केलेय. व मी माझ्या "ग्राहक हा defacto भागधारक मानणे अशक्य आहे" या वरील प्रतिसादात हेच फक्त वेगळ्या भाषेत मांडले.
मी नेमके काय म्हणतोय - थोडक्यात - समभागधारक हेच फक्त कंपनीचे मालक असतात. बाकीचे मालक नसतात व त्यांना मालकांचे अधिकार दिले जाऊ नयेत. या बाकीच्या लोकांना मालक बनायचे असेल तर फक्त एकच मार्ग - समभाग विकत घेणे.
माझे मत -
१) समभागधारकांच्या (शेअरहोल्डर्स) सहमती विना Corporate Social Responsibility च्या योजना राबवू नयेत.
२) ज्या कंपन्यांचे मॅनेजर्स समभागधारकांच्या सहमती विना Corporate Social Responsibility च्या योजना राबवतील त्यांना कोर्टात खेचुन शेअरहोल्डर्स (समभागधारकांच्या) च्या पैश्याचा गैरवापर केल्याबद्दल शिक्षेची तरतूद असावी.
Corporate Social Responsibility मध्ये कंपनी ने स्थानिक जनतेसाठी शाळा, इस्पितळे बांधणे यासारख्या धर्मादाय योजना असतात.
प्रदूषण नियंत्रण सारख्या योजना कायद्याचे पालन (Compliance) या क्षेत्रात येतात. त्या Corporate Social Responsibility मधे येत नाहीत.
---------------------------------------
आम्ही व्यापाराचा भागधारक म्हणत आहोत. आमचा लेख व्यापारव्यवस्थेबद्दल आहे नफानिर्माण व्यवस्थेबद्दल नाही.
व्यापार व्यवस्था व नफानिर्माण व्यवस्था यात काय फरक आहे ?
नफानिर्माण व्यवस्था ही व्यापारव्यवस्थेत अंतर्भूत असते.
खाजगी कंपनी प्रॉडक्शन्/सेवा/व्यापार यापैकी कुठेही असली तरी नफा हेच उद्दिष्ट असते. पण काही वेळा तोटा होतो.
व्यापार (ट्रेड) मधे उत्पादन अंतर्भूत नाही. पण उद्दिष्ट नफ्याचेच असते.
कदाचित तुम्हाला जे म्हणायचे आहे ते मला समजले नसावे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{स्टेक होल्डर विरुद्ध शेअर}
स्टेक होल्डर विरुद्ध शेअर होल्डर. तुम्ही स्टेक होल्डर च्या बाजुने युक्तीवाद करताय व मी शेअरहोल्डर च्या बाजुने.
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मी कोणाच्याच 'बाजूने' युक्तिवाद करीत नाही. मी फक्त व्यवस्थेत कोण सहभागी आहेत त्यांच्या सामूहिक हक्काबाबत नि कर्तव्याबाबत बोलतो आहे. तुमचे 'सहभागधारक' हे 'भागधारक' असतातच त्यामुळे जर मी भागधारकांचे सामूहिक हिताबद्दल बोलत असेन तर त्यात ते ही अंतर्भूत आहेतच. आता तुमच्या मत व्यवसाय हा फक्त सहभागधारकांच्या हिताचाच वापर करणारा असतो हे तुमचे मत सार्वत्रिक असेल तर ही व्यवस्था फारशी न्याय्य नाही नि ती मोडण्याची मागणी करणार्या कम्युनिस्टांना मी पूर्ण पाठिंबा देईन. कारण भागधारकांपैकी एका छोट्या उपसमूहाचे हित जोपासणारी व्यवस्था मुळीच न्याय्य मानता येणार नाही. किंबहुना कळीचा मुद्दा हाच आहे की धोरणे अशी छोट्या समूहाचे हित पाहणारी असतात म्हणूच संपत्ती मूठभरांच्या हाती एकवटत जाते नि ३% लोकच पैसेवाले, कर भरणारे नि वर आम्हीच फक्त कर का भरायचा म्हणून गळा काढणारे अशी परिस्थिती निर्माण होते. '
आत इथे सरकारचा हस्तक्षेप तुम्हाला आवडत नाही. मग काय उरलेल्या ९७% समाजाला विषम स्पर्धेत सोडून द्यायचे? मुळात अर्थिक बाजू कमकुवत असल्याने या स्पर्धेत उभे राहण्याची पुढे जाण्याची शक्यताच जवळजवळ नसते (पेप्सी नि कोकने पार्ले सारख्या बर्यापैकी प्रस्थापित भारतीय कंपनीचे काय केले हे उदाहरण समोर आहेच) थोडक्यात आम्ही तथाकथित यशस्वी आहोत म्हणून आम्ही ३% लोक 'लायक' आहोत असे आम्हीच जाहीर करणार, जगातील ८०% संपत्ती आम्ही बुडाखाली घालून बसणार, हे 'खुली' नि 'निकोप' स्पर्धा म्हणून आम्हीच जाहीर करणार मग भले यात आम्हा मूठभरांखेरीज इतरांना उभे राहण्याची जवळजवळ शून्य संधी आम्ही देत असताना. ही असली व्यवस्था मोडून टाका ही सार्वजनिक हिताच्या विरोधी आहे असे कोणी म्हटले तर त्यात चूक काय. हे ३% आपल्या हिताची व्यवस्था निर्माण करतान - नि तुम्ही त्या हेतूचेही समर्थन करत आहात - तर मग उरलेले ९७% आपल्या हिताची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून निर्माण करतात तर त्यात त्यांचे काय चूक आहे? पैशाच्या बळावर जर तथाकथित स्पर्धा समान संधीची राहणार नाही याची दक्षता जर हे 'स्वतःचे हित साधणारे' घेत असतील तर इतरांनी आपले हित साधण्यासाठी प्रशासन यंत्रणेचा, ही गैरसोयीची व्यवस्था मोडण्यासाठी प्रसंगी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला तर त्यांचे काय चुकले? तुम्ही आर्थिक बळ वापरता, ते बहुमताचे, शस्त्राचे वापरतात, क्विट्स. ही व्यवस्था त्यांच्या हिताची नाहीच, केवळ तुम्ही जाहीर करता म्हणून ती न्याय्यही नाही. आता तुम्हीच्म्हणत असाल की ही फक्त लाभधारकांच्या हिताचा विचार करते, तर मग नको आम्हाला असली संकुचित दृष्टीकोन असलेली व्यवस्था, आमच्या बहुमताच्या बळावर आम्ही मोडून काढू ही व्यवस्था असे उरलेले ९७% म्हटले तर ते ही न्याय्यच आहे.
मुळात सरकारी हस्तक्षेप नको हे अतिशय चलाख विधान आहे. याच्यामागचे खरे विधान म्हणजे 'आम्हाला हवा तेव्हाच सरकारी हस्तक्षेप चालेल.' थोडक्यात सरकार आमच्या तंत्राने चालायला हवे. भूसंपादनासाठी सरकारने आमच्यासाठी काम करायला हवे, कारण सरकार स्वस्तात मिळवून देते, आमच्या आस्थापनांना सारे इन्फ्रास्ट्रक्चर - रस्ते, पाणी, वीज - हे सरकारने निर्माण करून द्यावे, सर्वसाधारण कायदा-सुव्यवस्थेची, न्यायव्यवस्थेची जबाबदारी घ्यावी (हा तुम्ही किंवा तुमच्यासारख्या स्वतंत्र उद्योगांच्या पुरस्कर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षलेला मुद्दा, सोमालियात जाऊन करा बरं व्यवसाय, तिथे बिलकुल सरकार नाही, पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला.) पण कर मागू नका, आमचे ग्राहक कोण त्यांचाशी आमचा व्यवहार काय हे विचारू नका. कदाचित व्यवसाय ज्या देशात करतो त्यांच्या विरोधकांशीही आम्ही व्यवसाय करू, त्यातून आमचेही हित होत असेल त्यांचे हित जोपासू, त्यातून अप्रत्यक्षपणे या देशाच्या विरोधात काम करू पण सरकारने मात्र आम्हाला अजिबात जाब विचारता कामा नये. तुमचे सारे विचार इतर समाज घटकांना पूर्ण दुर्लक्षित करून केलेले आहेत, यात समाजभावनेचा पूर्ण अनादर आहे. या समाजाचा भाग म्हणून कोणतेही उत्तरदायित्व तुम्ही मानत नाही असा याचा अर्थ होतो हे लक्षात येत आहे का?
स्टेक होल्डर मधे खालील मंडळी येतात - समभागधारक, ग्राहक, कर्ज पुरवठा करणारे, कर्मचारी/कामगार, सप्यायर्स, सरकार, Joint Venture Partner/Collaborator, स्वयंसेवी संस्था (पर्यावरणवादी वगैरे) , मिडिया, कम्युनिटी (स्थानिक).
शेवटचे दोघे वगळून असहमती. स्वयंसेवी संस्था अथवा मीडिया यांचा सहभाग व्यवसाय निर्मिती वा संचालनासाठी अनिवार्य नाही. मालक. चालक, ग्राहक नि कर्मचारी हे किमान भागधारक.
मी नेमके काय म्हणतोय - थोडक्यात - समभागधारक हेच फक्त कंपनीचे मालक असतात....
मला वाटते तुम्ही खळ्यातल्या खांबाभोवती फिरता आहात. मालक कोण हा माझ्या दृष्टीने प्रश्न नाही. मी तर लाभधारकांबद्दलही बोलत नाही हे मागच्या प्रतिसादातच स्पष्ट केले आहे. मी त्याहून मोठ्या अशा भागधारक समूहाबद्दल बोलतो आहे नि त्यांच्या संदर्भात विचार करतो आहे.
व्यापार व्यवस्था व नफानिर्माण व्यवस्था यात काय फरक आहे ?
जे ब्बात है. हाच मूलभूत फरक आहे तुमच्या नि माझ्या विचारात. तुम्ही व्यापार ही फक्त नफा निर्माण व्यवस्था म्हणून पाहता आहात.
सायबा जरा विचार करून पहा व्यापाराची सुरुवात कुठून झाली असेल. माणसाच्या इतिहासात सर्वप्रथम गरजेच्या वस्तू (अन्न, वस्त्र) स्वतः मिळवणे नि वापर करणे असे होते. यात समूहाने शिकार हा पहिला सामुदायिक प्रयोग. इथे मूठभरांचा नव्हे तर सार्या कुटुंबाचा, कबिल्याचा स्वार्थ साधला जातो. मिळवलेले अन्न सर्वांची भूक भागवण्यासाठी वापरले जाई, मूठभरांची नव्हे. त्यानंतर दुसरा टप्पा 'बार्टर' अथवा 'देवाण्घेवाण व्यवस्थेचा' यात आवश्यक वस्तू आपल्याकडील अन्य वस्तूच्या बदल्यात कोणाकडून तरी घेणे. हा उभयपक्षी हिताचा मामला (बळाचा वापर, फसवणूक या नियमबाह्य गोष्टी अजूनही व्यवस्थेचा भाग नाहीत, वा त्याचे समर्थन करणारी सैद्धांतिक व्यवस्था नाही!) आहे. नंतर कशाच्या बदली काय हे ठरवणे अडचणीचे आले म्हणून त्रयस्थ अशी मूल्यव्यवस्था आली जिच्यामुळे मूल्यमामनाला रेफरन्स स्केल मिळाले नि देवाणघेवाण ही व्यवस्थाबाह्य त्रयस्थ (!!!!!) निकषाआधारे तपासून दोन्ही बाजू आपल्या हिताचे रक्षण होते आहे ना हे तपासून पाहू लागल्या. इथे प्रथम त्रयस्थ व्यवस्थेची गरज निर्माण झाली पहा. इथून पुढे बर्याच गोष्टींसाठी या त्रयस्थ व्यवस्थेचा विस्तार होत गेला. प्रशासन, सरकार नेमकी हीच भूमिका पार पाडत आहे. पुढे दोन व्यक्तींऐवजी दोन कुटुंबात, दोन देशात अशा प्रकारचा 'व्यापार' होऊ लागला. अजूनही उभयपक्षी हित आपापल्या परीने जपले जात होतेच. हा व्यापार आहे पण याचा 'धंदा' झालेला नाही. कारण यात गरज भागवणे हा व्यापाराचा मूलभूत उद्देश आहे. भारतात मसाल्याचे पदार्थ अधिक नि दर्जेदार मिळतात म्हणून तेथून ते आणून त्याबदली मातीची भांडी त्यांना देऊन चीन आपली गरज भागवत असेल. म्हणजे आता आपल्याकडे अतिरिक्त असलेले देऊन आपल्याकडे गरजेला जे कमी पडते ते मिळवून समतोल साधणे हा हेतू झाला. अजूनही नफानिर्मिती कुठेच नाही बरं का. गरज भागवणे हाच हेतू आहे. हा ही व्यापारच आहे! पुढचे टप्पे देत आणखी काही हेतू दाखवता येतील पण माझ्या मते व्यापार व्यवस्था ही नफा निर्मिती व्यवस्था नसते हे पुरेसे स्पष्ट झाले असावे. किंबहुना भांडवलशाहीने व्यापार - खरेतर उत्पादन - व्यवस्थेला नफा निर्माण व्यवस्था मानले नि त्या आधारे वाटचाल केली म्हणून तर आज तिची अधोगतीच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे. निव्वळ पैसा निर्माण करणे पुरेसे नाही तो सर्व भागधारकांपर्यंत पसरत जाईल याची व्यवस्थेतच काळजी घेणे जमले नाही म्हणून तर आजच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत 'जबरदस्तीने वा सरकारी हस्तक्षेपाने संपत्तीचे न्याय्य वितरण करू पाहणारे कम्युनिस्ट त्या मुद्याबाबात हास्यास्पद असले तरी भांडवलशाहीतून मूठभरांच्या हाती प्रचंड संपत्ती एकवटते हे त्यांचे भाकित द्रष्ट्याचे भाकित ठरले आहे. माझा या लेखमालेचा एक मुद्दा असा आहेच की व्यवस्था ही मुळात विनिमयासाठी नि नियमनासाठी निर्माण केली गेली परंतु तिचेही स्वतःचे असे स्वार्थ निर्माण झाले नि त्यांनी मूळ व्यक्तीलाच बाजूला सारले. आज व्यवस्था व्यवस्थेच्या - नि त्यातील मूठभर व्यक्तींच्या - हितासाठी काम करते, तिचा मूळ हेतू लुप्त झाला आहे. (म्हणून तर तुम्ही या दोन गोष्टीत फरक काय असा प्रश्न विचारता आहात.)
सहज गंमत म्हणून 'इनसायडर जॉब' पहा. एकेका बँक अधिकार्याची संपत्ती, प्रायवेट चार पाच प्लेन्स, प्रायवेट प्लेन हँगर्स वगैरे ऐकून छाती दडपूनच गेली होती. टॉलस्टॉय विचारतो तसे विचारावेसे वाटते की नक्की माणसाची गरज तरी किती असते. मिळवता येते म्हणून किती मिळवावे, नि ते ही इतर अनेकांच्या किमान गरजा भागत नसताना? ज्या समाजाचा आपण घटक आहोत त्याच्याप्रती आपली काही जबाबदारी नाही का? अधिक निर्माण करा, अधिक विका, अधिक पैसे निर्माण करा हे ठीक पण ते पैसे वापरणारे पुन्हा त्या व्यवस्थेतलेच फक्त असतील तर उरलेल्या समाजाला तुमचे काही सोयरसुतक नसतेच, उगाच आम्ही पैसा निर्माण करतो त्याबद्दल आम्हाला श्रेय द्या, आमची स्तुती करा, आमचे आभार माना हे म्हणणे अश्लाघ्यपणाचे आहे. तुम्ही तुमच्यासाठी निर्माण करता, आय केअर अ झिल्च अबाऊट इट.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{व्यापार व्यवस्था}
माणसाच्या इतिहासात सर्वप्रथम गरजेच्या वस्तू (अन्न, वस्त्र) स्वतः मिळवणे नि वापर करणे असे होते. यात समूहाने शिकार हा पहिला सामुदायिक प्रयोग. इथे मूठभरांचा नव्हे तर सार्या कुटुंबाचा, कबिल्याचा स्वार्थ साधला जातो. मिळवलेले अन्न सर्वांची भूक भागवण्यासाठी वापरले जाई, मूठभरांची नव्हे. त्यानंतर दुसरा टप्पा 'बार्टर' अथवा 'देवाण्घेवाण व्यवस्थेचा' यात आवश्यक वस्तू आपल्याकडील अन्य वस्तूच्या बदल्यात कोणाकडून तरी घेणे. हा उभयपक्षी हिताचा मामला (बळाचा वापर, फसवणूक या नियमबाह्य गोष्टी अजूनही व्यवस्थेचा भाग नाहीत, वा त्याचे समर्थन करणारी सैद्धांतिक व्यवस्था नाही!) आहे. नंतर कशाच्या बदली काय हे ठरवणे अडचणीचे आले म्हणून त्रयस्थ अशी मूल्यव्यवस्था आली जिच्यामुळे मूल्यमामनाला रेफरन्स स्केल मिळाले नि देवाणघेवाण ही व्यवस्थाबाह्य त्रयस्थ (!!!!!) निकषाआधारे तपासून दोन्ही बाजू आपल्या हिताचे रक्षण होते आहे ना हे तपासून पाहू लागल्या. इथे प्रथम त्रयस्थ व्यवस्थेची गरज निर्माण झाली पहा. इथून पुढे बर्याच गोष्टींसाठी या त्रयस्थ व्यवस्थेचा विस्तार होत गेला. प्रशासन, सरकार नेमकी हीच भूमिका पार पाडत आहे. पुढे दोन व्यक्तींऐवजी दोन कुटुंबात, दोन देशात अशा प्रकारचा 'व्यापार' होऊ लागला. अजूनही उभयपक्षी हित आपापल्या परीने जपले जात होतेच. हा व्यापार आहे पण याचा 'धंदा' झालेला नाही. कारण यात गरज भागवणे हा व्यापाराचा मूलभूत उद्देश आहे. भारतात मसाल्याचे पदार्थ अधिक नि दर्जेदार मिळतात म्हणून तेथून ते आणून त्याबदली मातीची भांडी त्यांना देऊन चीन आपली गरज भागवत असेल. म्हणजे आता आपल्याकडे अतिरिक्त असलेले देऊन आपल्याकडे गरजेला जे कमी पडते ते मिळवून समतोल साधणे हा हेतू झाला. अजूनही नफानिर्मिती कुठेच नाही बरं का. गरज भागवणे हाच हेतू आहे. हा ही व्यापारच आहे! पुढचे टप्पे देत आणखी काही हेतू दाखवता येतील पण माझ्या मते व्यापार व्यवस्था ही नफा निर्मिती व्यवस्था नसते हे पुरेसे स्पष्ट झाले असावे.
नफ्याचे उद्दिष्ट / मोटिव्ह नव्हतेच हा दावा करणे फारच धाडसाचे आहे.
कारण १) तुमच्या या वाक्यात -> "म्हणजे आता आपल्याकडे अतिरिक्त असलेले देऊन आपल्याकडे गरजेला जे कमी पडते ते मिळवून..." . surplus (अतिरिक्त) निर्माण का होईल - १) अपघाताने किंवा २) ठरवून निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे फलस्वरूप ? ठरवून का निर्माण करायचे - त्याबदल्यात दुसरे काही तरी मिळवता येईल म्हणून.
म्हंजे अतिरिक्त जर अपघाताने निर्माण झालेले नसेल तर तो नफा कसा नाही ?
कारण २) समजा ३० व्यक्तींचा कबिला आहे व त्यातील ५ व्यक्ती समूहाने शिकार करतात असे समजा. बाकीचे लोक इतर कामे करतात. जर ही ५ मंडळी एक गट करतात तर ती त्या गटाची मक्तेदारीच आहे की नाही ? कारण ३० लोकांमध्ये शिकारीचा पुरवठा करणारा एकच गट आहे. शिकार सर्वांत (३० जणांत) समसमान वाटली जाते हे मान्य ... पण मक्तेदारी नाहीच हे म्हणता येत नाही. आता नफ्याचा मुद्दा - कबिल्यातील अनेकांना सर्वात जास्त हरणाचे मांस आवडते (समजा) ... त्याखालोखाल बकरीचे (समजा) व त्याखालोखाल कोंबडीचे आवडते असे समजा. आता ३० व्यक्तींसाठी जर मांसाची तजवीज करायची असेल तर या ५ शिकारी लोकांनी जर हरीण मारून आणले व ते ३० लोकांत समसमान वाटले तर काबिल्यातील लोकांना सर्वात जास्त आनंद होईल. व बकरी मारून आणली तर त्याखालोखाल आनंद होईल. Secondly each individual will place different value on quantity of meat needed/supplied to him/her and type of meat (goat/chicken/deer).
हरणाचे मांस खाण्याचा आनंद वजा बकरीचे मांस खाण्याचा आनंद. यासाठी एककाची गरजच नाहीये. हे व्यक्तीस जाणवू शकते.
किंवा हरणाचे मांस खाण्याचा आनंद वजा त्या व्यक्तीने केलेल्या योगदानाचे त्या व्यक्तीच्या दृष्टीने असलेले मूल्य. (अर्थात मूल्य मोजण्यास एकक उपलब्ध नाहीये पण एकक नाहिये म्हणून profit or profit motive नाहिये असे म्हणता येत नाही.).
(माझा मुद्दा सापेक्षतावादाचा नसून एककविरहित व्यवस्थेत नफ्याचे/नफ्याच्या अंतस्थ् हेतूचे अस्तित्व नाकारणे कसे खूप धाडसाचे आहे हा आहे.)
प्रत्येक व्यक्तीस होणार्या आनंदातला हा जो फरक आहे तो त्या व्यक्तीसाठी नफा.
शिकारी मंडळींचा जो गट आहे त्या गटाची जी शिकार करण्याची historical क्षमता आहे त्यापेक्षा जर जास्त त्यांनी मारून आणले तर तो नफा त्या गटाचा. पण तुमच्या उदाहरणात तो संपूर्ण कबिल्याचा होतो. कारण तो गट हा गट (with Profit and loss responsibility ) म्हणून रेकग्नाईझ केला जात नाही.
If they had 2 options (पहिला विकल्प - hunt 5 deer or दुसरा विकल्प - hunt 5 goats) And they chose to hunt 5 deer then the difference between the two options is profit.
तिथे मोजदाद करण्यासाठी एकक नाहिये हा फरक आहे (जो तुम्ही पुढे मांडलाय.). पण नफा आहेच व नफ्यासाठी इन्सेंटिव्हज आहेत.
-------------------------------------------
तुमचे 'सहभागधारक' हे 'भागधारक' असतातच त्यामुळे जर मी भागधारकांचे सामूहिक हिताबद्दल बोलत असेन तर त्यात ते ही अंतर्भूत आहेतच. आता तुमच्या मत व्यवसाय हा फक्त सहभागधारकांच्या हिताचाच वापर करणारा असतो हे तुमचे मत सार्वत्रिक असेल तर ही व्यवस्था फारशी न्याय्य नाही नि ती मोडण्याची मागणी करणार्या कम्युनिस्टांना मी पूर्ण पाठिंबा देईन. .
सरकारकडे ही व्यवस्था मोडून काढण्याची क्षमता/कौशल्य/माहीती/इन्सेंटिव्ह्ज आहे असे तुम्हास का वाटते ? व सरकार जी पर्यायी व्यवस्था आणेल ती सर्वांच्या हिताचा विचार करणारी असेल व टिकेल असे का वाटते ?
-------------------------------------------
आत इथे सरकारचा हस्तक्षेप तुम्हाला आवडत नाही. मग काय उरलेल्या ९७% समाजाला विषम स्पर्धेत सोडून द्यायचे? मुळात अर्थिक बाजू कमकुवत असल्याने या स्पर्धेत उभे राहण्याची पुढे जाण्याची शक्यताच जवळजवळ नसते (पेप्सी नि कोकने पार्ले सारख्या बर्यापैकी प्रस्थापित भारतीय कंपनीचे काय केले हे उदाहरण समोर आहेच) थोडक्यात आम्ही तथाकथित यशस्वी आहोत म्हणून आम्ही ३% लोक 'लायक' आहोत असे आम्हीच जाहीर करणार, जगातील ८०% संपत्ती आम्ही बुडाखाली घालून बसणार, हे 'खुली' नि 'निकोप' स्पर्धा म्हणून आम्हीच जाहीर करणार मग भले यात आम्हा मूठभरांखेरीज इतरांना उभे राहण्याची जवळजवळ शून्य संधी आम्ही देत असताना. ही असली व्यवस्था मोडून टाका ही सार्वजनिक हिताच्या विरोधी आहे असे कोणी म्हटले तर त्यात चूक काय. हे ३% आपल्या हिताची व्यवस्था निर्माण करतान - नि तुम्ही त्या हेतूचेही समर्थन करत आहात - तर मग उरलेले ९७% आपल्या हिताची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून निर्माण करतात तर त्यात त्यांचे काय चूक आहे? पैशाच्या बळावर जर तथाकथित स्पर्धा समान संधीची राहणार नाही याची दक्षता जर हे 'स्वतःचे हित साधणारे' घेत असतील तर इतरांनी आपले हित साधण्यासाठी प्रशासन यंत्रणेचा, ही गैरसोयीची व्यवस्था मोडण्यासाठी प्रसंगी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला तर त्यांचे काय चुकले? तुम्ही आर्थिक बळ वापरता, ते बहुमताचे, शस्त्राचे वापरतात, क्विट्स. ही व्यवस्था त्यांच्या हिताची नाहीच, केवळ तुम्ही जाहीर करता म्हणून ती न्याय्यही नाही. आता तुम्हीच्म्हणत असाल की ही फक्त लाभधारकांच्या हिताचा विचार करते, तर मग नको आम्हाला असली संकुचित दृष्टीकोन असलेली व्यवस्था, आमच्या बहुमताच्या बळावर आम्ही मोडून काढू ही व्यवस्था असे उरलेले ९७% म्हटले तर ते ही न्याय्यच आहे.
पृथ्वीवर असलेली साधनसंपत्ती मर्यादित आहे असे तुम्हांस म्हणायचे आहे का ?
कोकाकोला ने पार्ले विकत घेतली त्यात कोणावर अन्याय झाला ?
तुम्ही सशस्त्र क्रांतीचा मुद्दा मांडलाय. खुली व्यापार व्यवस्था (Free Trade) शांततेस प्रेरक असते असा दावा अर्थशास्त्री करतात (संशोधनांती). भांडवलदारांनी/भांडवलदारीचे समर्थक लोकांनी असा दावा केला तर ते सेल्फ सर्व्हिंग असेल.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{>>निव्वळ पैसा निर्माण करणे}
>>निव्वळ पैसा निर्माण करणे पुरेसे नाही तो सर्व भागधारकांपर्यंत पसरत जाईल याची व्यवस्थेतच काळजी घेणे जमले नाही म्हणून तर आजच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
हे पटतंय प्रथमदर्शनीतरी, पण विस्तार करू शकाल का?
माझ्या मते गब्बरसिंग असं म्हणतायत की, ते जी व्यवस्था विषद करतायत त्यामधेच ग्राहकहितसंरक्षण अंतर्भूत आहे. (मार्केट प्राएस सेल्फ रेग्युलेशन च्या माध्यमातून)
माझे मत पण वास्तवात अशी परिस्थीती आहे की, त्या व्यवस्थेनेच नियमन करणारी व्यवस्था आपली अंकीत बनवून ठेवली आहे त्यामुळे निकोप स्पर्धा शक्य नाही.
आणखी एक मुख्य मुद्दा जो अजून चर्चीला गेलेला नाहिये,
ही सर्व भांडवलशाही व्यवस्था राबवताना ती व्यवस्था अथवा तिचे हस्तक, ही व्यवस्था सर्वांनाच कल्याणकारी आहे, ग्राहक हे आमचे प्रथम दैवत आहे, वगैरे वगैरे प्रचार करत असतात,
गब्बरजींचे म्हणणे खरे ,मानायचे तर ह्या व्यवस्थेने ही सर्व फुकाची बडबड बंद केली पाहिजे आणी बाकी काहिही न सांगता, "नफा कमावणे" हे त्या व्यवस्थेचे जे अंगभूत आणि प्राथमीक उद्दीष्ट हेच सर्वकाळ प्रचारिले पाहिजे.
कारण गब्बरजींच्याच व्याख्येप्रमाणे, जाहिरात हे अंगभूत कर्तव्य आहे हा मुद्दा ह्या व्यवस्थेच्या जाहिरातीलाही लागू होतो. फक्त जाहिरात करताना त्यात खरे (नैतीक वा अनैतीक नाही, खरे ) मुद्दे यावेत असा काही आग्रह नको का.
व्यवस्था काम करताना करणार केवळ नफ्यासाठी आणी प्रचार करणार की हि व्यवस्था, ग्राहककेंद्रीत, व्यक्तीकेंद्रीत, समानन्याय असणारी आहे म्हणून हे बरोबर ठरेल काय. (बहुतेक बड्या कंपन्या असा प्रचार करतात हे वेगळे सांगायला नकोच.)
{माझ्या मते गब्बरसिंग असं म्हणतायत की, ते जी व्यवस्था विषद करतायत}
माझ्या मते गब्बरसिंग असं म्हणतायत की, ते जी व्यवस्था विषद करतायत त्यामधेच ग्राहकहितसंरक्षण अंतर्भूत आहे. (मार्केट प्राएस सेल्फ रेग्युलेशन च्या माध्यमातून). माझे मत पण वास्तवात अशी परिस्थीती आहे की, त्या व्यवस्थेनेच नियमन करणारी व्यवस्था आपली अंकीत बनवून ठेवली आहे त्यामुळे निकोप स्पर्धा शक्य नाही.
ग्राहकहितसंरक्षण हे खालील माध्यमांतून केले जाते -
१) काही केसेस मधे विक्रेता(उद्योजक) डायरेक्टली करतो कारण ग्राहक हे करण्यासाठी त्यास पैसे/मोबदला देतो.
२) थर्ड पार्टी द्वारे. आता थर्ड पार्टी मधे विमा, रेटिंग एजन्सी वगैरे येतात. यात ग्राहक व विक्रेता यांत प्रचंड Information Asymmetry असेल तर थर्ड पार्टी ची गरज लागते. Information Asymmetry is risk. But everyone does not view it at same level/degree. पण स्पर्धा प्रक्रिया ही सुद्धा हे काम उत्तम पणे करते (अनेक केसेस मध्ये. सर्व कसेस मधे नाही.). म्हणूनच मार्केट हे बव्हंशी Incentive compatible आहे असे म्हणतात.
३) सरकार हे काम करते पण सरकारकडे यासाठी लागणारी कौशल्ये असतातच असे नाही, माहीती अनेकदा नसते व इन्सेंटिव्हज फारच कमी असतात. मी एकाच मुद्द्यावर जरूरीपेक्षा जास्त भर देतोय पण समस्या ही आहे की सरकारने केलेले काम (या बाबतीत) हे खूप महागात पडते (कोणास महागात पडते ? ग्राहकास व विक्रेत्यास दोघांनाही. तुम्ही म्हणाल ते कसे काय - उत्तर -> ज्याच्याकडे जास्त बार्गेनिंग पॉवर असते तो दुसर्याकडे कॉस्ट्स ट्रान्स्फर करतो.) त्याचे कारण सरकार पॉलीसी बनवते पण ती फारच सर्वसमावेशक असल्याने त्यात डिटेल्स मिस् होतात ... व प्रत्येक ग्राहकाचे Risk preferences एकाच पॉलीसीद्वारे नियमित करण्याचा हा तोटा आहे.
इथे चुकीची अंमलबजावणीचा मुद्दा मी मांडलेला नाहिये तो आता मांडतो - अंमलबजावणी करणारे लोक तुमच्या माझ्यासारखेच लोक असतात. त्यांच्याकडे अंमलबजावणीसाठी लागणारी कौशल्ये असतील तर माहीती पुरेशी नसते. इन्सेंटिव्हज फारच कमी असतात. They are also subject to bounded rationality and opportunism. या लोकांचे नियमन कोण करणार (Who will regulate the regulators ?) व त्यांच्यावरील देखरेखीचा खर्च पण येतो.
मार्केट प्राईस वापरणे मोफत नसते. त्यासाठी किंमत चुकवावी लागते.
१) शोधण्याची किंमत
२) वाटाघाटींची किंमत
३) देखरेखीची किंमत
ही किंमत चुकवल्यावर काय मिळते - फायदे हे की मार्केट प्राईस ही अत्यंत वेगवान असते व प्रत्येकास ती वापरण्याचे ज्ञान, कौशल्य व इन्सेंटिव्हज असतात. सरकार जेव्हा नियमन करायचा प्रयत्न करते तेव्हा सरकार मार्केट प्राईस सिस्टीम ला replace करायला पाहते. व ते इन्-एफिशियंट होते. कारण प्राईस सिस्टीम सत्वर प्रतिसाद देते.
प्राईस = Information + Incentives/Disincentives असा विचार केलात तर एकदम थेट होईल.
------------------
ही सर्व भांडवलशाही व्यवस्था राबवताना ती व्यवस्था अथवा तिचे हस्तक, ही व्यवस्था सर्वांनाच कल्याणकारी आहे, ग्राहक हे आमचे प्रथम दैवत आहे, वगैरे वगैरे प्रचार करत असतात,
गब्बरजींचे म्हणणे खरे ,मानायचे तर ह्या व्यवस्थेने ही सर्व फुकाची बडबड बंद केली पाहिजे आणी बाकी काहिही न सांगता, "नफा कमावणे" हे त्या व्यवस्थेचे जे अंगभूत आणि प्राथमीक उद्दीष्ट हेच सर्वकाळ प्रचारिले पाहिजे.
कारण गब्बरजींच्याच व्याख्येप्रमाणे, जाहिरात हे अंगभूत कर्तव्य आहे हा मुद्दा ह्या व्यवस्थेच्या जाहिरातीलाही लागू होतो. फक्त जाहिरात करताना त्यात खरे (नैतीक वा अनैतीक नाही, खरे ) मुद्दे यावेत असा काही आग्रह नको का.
नफा कमवणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे व ते प्रचारणे योग्यच आहे.
थोडेसे मागे जायची परवानगी दिलीत तर - स्वार्थ ही धर्मातून आलेली संकल्प्ना आहे तशीच लोभ, मत्सर वगैरे. अर्थशास्त्र हितसंबंधांबद्दल बोलते. स्वार्थाबद्दल नाही.
आता ग्राहकास जर विक्रेता/उद्योजक हे सांगु लागला की मी फक्त माझे हितसंबंध जपतोय तर ग्राहक नाराज होईल. (यात मी नवीन काहीच सांगत नाहिये.). म्हणून preaching केले जाते.
आद्य भांडवलवादी अॅडम स्मिथ ने आपल्या "वेल्थ ऑफ नेशन्स" मधे हे वाक्य टाकले होते - "It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker, that we expect our dinner, but from their regard to their own self-interest."
त्यामुळे स्वहितसंबंध जपणे हे काम व्यक्ती करत असते हे एक महत्त्वाचे गृहितक आहे अर्थशास्त्रीय विश्लेषणात. त्याउपरच अनेक इतर दावे केले जातात. व प्रुफं दिली जातात. जर व्यक्तीकडे स्वहितसंबंध जपण्यासाठी लागणारी माहीती, कौशल्य नसेल तर काय करायचे हा प्रश्न असतो. कारण तिसरा भाग आहे असे गृहीत धरले जाते व तो तिसरा भाग म्हंजे इन्सेंटिव्ह्ज.
जाहिरातीचे एक मोठ्ठे उद्दिष्ट हे ही आहे की - Information Asymmetry कमी करणे. व यात जाहिरात करताना खरे खोटे चा नीरक्षीरविवेक विक्रेत्याने बाळगावा अशी अपेक्षा आहे. पण काही वेळा हे काम थर्ड पार्टी द्वारे केले जाते. (त्याबद्दल संध्याकाळी लिहीन...)
-------------------
@ररा,
मी अर्थशास्त्रीय टूल्स वापरूनच अॅनॅलिसिस करू शकतो. अर्थशास्त्रीय टूल्स परफेक्ट नाहियेत पण गेल्या २०० वर्षांत त्यात खूप सुधारणा झालेल्या आहेत.
अर्थशास्त्राच्या बाहेर येऊन मी अॅनॅलिसिस कसा करू ? त्यासाठी कोणती अॅनॅलॅटिकल टूल्स वापरू ? माझ्याकडे त्यासाठी लागणारे इन्सेंटिव्हज आहेत असे जरी गृहीत धरले तरी माहीती व कौशल्य नाहीत.
पूर्वी धर्म हे फ्रेमवर्क होते ... व त्यातील टूल्स वापरली जायची ... पण ती अपुरी होती व ती फक्त त्या धर्माच्याच लोकांना लागू होती. बाकीच्या धर्माच्या लोकांचे विश्लेषण कसे करायचे ?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{नोड ६११६ (भाग ३) हीच लिंक भाग ४ व भाग ५ यांनाही पडली आहे.}
र रा. जी,
आज ब-याच दिवसांनी थोडा वेळ मिळाला होता, म्हणून सर्व भाग वाचायचे ठरवले.
वर आपण दिलेल्या लिंकांपैकी दोन भागांच्या लिंका गंडल्या आहेत, असे दिसते.
नोड ६११६ (भाग ३) हीच लिंक भाग ४ व भाग ५ यांनाही पडली आहे.
बाकी - पहिले ३ भाग वाचले आहेत.
मुक्तसंग: अनहंवादि
{धन्यवाद}
दुवे दुरूस्त केले आहेत.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{३ सिनॅरिओज}
@ररा,
धर्मा मांडवकर (राहणार कोतमिरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नगिरी) च्या बाबतीत खालील ५ सिनॅरिओज आहेत -
१) धर्माकडे १० म्हशी आहेत. त्याच्या मालकीच्या. त्यांचे दूध काढून तो विकतो. आता त्याने सामाजिक जबाबदारी/दायित्व म्हणून कायकाय करावे असे तुम्हास वाटते ?
२) धर्माकडे १००० म्हशी आहेत. त्याच्या मालकीच्या. आता त्याची कोतमिरे गावातील दुधाच्या मार्केटमधे जवळपास ५०% मार्केट शेअर आहे - समजा त्यामुळे प्रचंड बारगेनिंग पॉवर आहे) त्यांचे दूध काढून तो विकतो. त्याला नफा होतो. आता त्याने सामाजिक जबाबदारी/दायित्व म्हणून कायकाय करावे असे तुम्हास वाटते ?
३) धर्माकडे १०००० म्हशी आहेत. त्याच्या मालकीच्या. आता त्याची संगमेश्वर तालुक्याच्या दुधाच्या मार्केटमधे जवळपास ८०% मार्केट शेअर आहे, ब्रँड आहे, स्केल आहे, प्रचंड अनुभव आहे असे समजा त्यामुळे महाप्रचंड बारगेनिंग पॉवर आहे व जवळपास मक्तेदारी आहे.) त्यांचे दूध काढून तो विकतो. त्याला प्रचंड नफा होतो. आता त्याने सामाजिक जबाबदारी/दायित्व म्हणून कायकाय करावे असे तुम्हास वाटते ?
४) यातील कोणत्याही केस मधे थोडासा तोटा झाला तर त्याने समाजाप्रति काय दायित्व निभावावे असे तुम्हास वाटते?
५) त्याला प्रचंड तोटा झाला ... अगदी दिवाळखोरी पर्यंत पाळी आली तर समाजाची त्याच्या प्रति जबाबदारी असावी का ?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{पुढे काय / कधी?}
पुढे काय / कधी?
संजय सोनवणीं, गंगाधर मुटे आणि गब्बर सिंग हे सहभागी असलेल्या वेगेवेगळ्या अर्थशास्त्रीय चर्चांमुळे याची आठवण झाली.
This is imperfect universe
{ओ}
सातारकर कसले जुने भुक्कड लेख खणून काढताय हो. त्या लेखकाला एक अक्कल नाही उगाच पीळ मारत बसलाय नि तुम्ही उगाच उकरून काढून पुन्हा डोस्क्याची मंडई करताहात.
अवांतर: सध्या मोबाईलचे कोणते मॉडेल ट्रेंडी आहे हो, चार महिने झाले माझ्या सध्याच्या मोबाईलला, बदलायची वेळ आलीये आता. ४जी चे काही मॉडेल मिळायला लागले का आपल्याकडे?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)