गाणी.. आईच्या आठ्वणीतली .. २

0
0

भा. रा. तांबेंशी ओळख तशी खूपच लवकर झाली.. घरी एक पाठ्यपुस्तक होते... सगळी चित्रे हिरव्या रंगात छापलेली होती.. (अंमळ हिरवा माज त्याकाळी पण अस्तित्वात होता की काय!!!) नि त्यात कविता होती:

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

जन पळभर म्हणतील.. अथवा नववधू... ही प्रकर्णं आयुष्यात त्यानंतर जवळजवळ ७-८ वर्षांनी आली... आणी हे गाणे ऐकवल्यानंतर आईने झाशीच्या राणीची गोष्ट सांगितल्याने ते अधिकच आवडले... गाताना अगदी जोशात येऊन मी हे गाणे म्हणत असे.. तसे गाण्याच्या तालासुरांच्या बाबतीत मी अतिशय स्वतंत्र विचारांची आहे.. त्यामुळे गाणे आहे त्या तालासुरात तर जाऊच दे, पण प्रत्येक वेळेस वेगळ्याच चालीत येते.. आता याला कुणी मला चालीत गाणं म्हणता येत नाही असं म्हणत असतील म्हणोत बापडे... ज्याची त्याची जाण, समज इ.इ. म्हणून तो विषय मी सोडूनच देते कसा??? हास्य

लहानपणी आमच्या बंधुराजांना खाऊ घालणे हा एक मोठा सोहळा असायचा.. हा खाण्याच्या बाबतीत अतिशय आळशी.. मग त्याला बाबापुता करून खायला घालायला लागायचं... तेव्हा आई त्याच्यासाठी एक गाणं म्हणायची,
दिपका मांडिले तुला सोनियाचे ताट
घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची सोपी करू पायवाट
कुतू काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली गोड शिते उचलून घ्या रे
गा रे राघू गा रे मैना बाळाच्या या ओळी
मुखी घालू तुमच्याही दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये कुलदेवी!!!

तर आमच्या या गुणी कुलदिपकाला या गाण्याची इतकी सवय लागली, की हे गाणं म्हटल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरेनासा झाला.. नि आईने त्याला सवय तर लावली, पण नंतर तिला काम असल्याने त्याला भरवायचे काम माझ्याकडे आले.. मी या गाण्याला कंटाळून एक-दोनदा दुसरं गाणं गायचा प्रयत्न केला... तर लगेच याने भोकाड पसरलन्!!!! मग त्याचे जेवण होईपर्यंत या गाण्याची आवर्तने करावीच लागायची!!! Sad

आणखी एक गाणं होते.... त्यात मला एक नवीन शब्द मिळाला होता, 'चटोर'. मला आजवर फक्त खाण्याचे चिरोटेच माहित!!! त्यातल्या शब्दांची अदलाबदल केल्यावर अर्थाचा कसला अनर्थ होतो.. मला तो शब्द जाम आवडला होता.. मी उगाच कुरापत काढून सापडेल त्याला चटोर म्हणत सुटले होते..

गाई पाणयावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही हा मिळाल्या
उभय पितरांचया चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला
तुला लंकेच्या पार्वती समान
पाहनीया होवोनी साभिमान
काय तयातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"
पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूतसंगे सुमहार का भिकारी??
कशी तुही मग मज मुळी भिकारी?
नारीमायेचे रोप हे प्रसिद्ध
सोस लेणयांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे
तदा बापाचे हदय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सदगुणी बालकांना
काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?

हे गाणं मला निखिल, विवेक मोडक आणि संग्रामने पाठवलेल्या बालभारतीच्या पुस्तकात मिळाले.. पण त्यात मला माहित असलेल्या
"मुली असती शाळेतल्या चटोर,
एकमेकींना बोलती कठोर"
या ओळी नाहीत!!! कशा विसरतील म्हणा??? लहान भावाला आंघोळ घालायला शेजारच्या एक आजी यायच्या.. आणि आंघोळ घालताना भाऊ रडायचा.. मला वाटायचं की या आजी त्याला मुद्दाम रडवतात.. मग त्यांना चटोर म्हटल्याबद्दल चांगलाच प्रसाद मिळाला होता!!! :|
चला.. आजच्या आठवणी इथेच थांबवते!!!

हा भाग पण क्लासच.. गाई

1

हा भाग पण क्लासच..
गाई पाण्यावर माझ्या आईची पण आवडती कविता..
तुमच्या बंधुराजांचे आवडते गाणे आधी एकले नव्हते


-निखिल

मस्तच....

2

मस्तच....

पुन्हा "जगण्याजोग्या" आठवणी

3

पुन्हा "जगण्याजोग्या" आठवणी !!

मस्तच.... 'गाई पाण्यावर...'

4

मस्तच.... 'गाई पाण्यावर...' ही कविता माझ्या आईच्या आवडीची आहे. हास्य

"भा. रा. तांबेंशी ओळख तशी खूपच लवकर झाली.."

एवढी वयस्कर वाटत नाहीस हां तू... ग्रेट.. तांब्यांशी ओळख म्हणजे मस्तच. wink

मी पहिली आणी बालवाडी एकाच

5

मी पहिली आणी बालवाडी एकाच वर्षी शिकले.. बालवाडी चांगली ३-४ किमी दूर होती.. आणि आईच शिकवायची तिथे..!! मग तिला सोबत म्हणून मी... नि माझी टकळी बंद व्हावी म्हणून रस्ताभर हे उद्योग चालायचे.... आणि तिथून परतल्यावर स्वारी पहिलीच्या वर्गात जायची!!!
आता सांगा.. इतरांच्या मानाने लवकरच झाली ना ओळख????

आमची एक आठ्वण ..

6

लहानपणी मला आणि तायडीला सकाळी झोपेतून उठवताना पप्पा नेहमी हे गाणं म्हणायचे ..
"उठ राजसा , चिमण्या बाळा ..
बघ हा अरूणोदय झाला ...
किलबिलती बागडती ...
झाडावरती पक्षी किती "

आणखी एक आठवतेय .. पप्पांनी सांगितलेली ते शाळेत असतानाची ... ती अशी काही होती ...

"झाडाखाली बघूनी सावली ..बसतो चांभार ...
ठावूक आहे मजला त्याचा सर्व कारभार ...."

"झाडाखाली बघूनी सावली ..बसतो

7

"झाडाखाली बघूनी सावली ..बसतो चांभार ...
ठावूक आहे मजला त्याचा सर्व कारभार ...."

मलाही माहित आहे ही!!! चांभार दिवसभर काय करतो त्याचे वर्णन होते.. ही माझ्या बहिणीच्या स्कॉलरशीपच्या पुस्तकात होती कविता.. यावरून आणखी एक आठवली,
विटीदांडूचा खेळ मजेदार
धूम चालुनिया लोटली बहार....
यात एक श्रीमंत बाई त्या मुलाला घरी चल, तुला खेळणी-खाऊ देते म्हणतात.. पण तो मुलगा तिथे सगळॅ असेल पण आई नसेल असे म्हणून त्याला नकार देतो!!!

छान उपक्रम

8

आईच्या आठवणीतुन आलेल्या जुन्या गाण्यांचा उपक्रम छान आहे.
वाचतो आहे ...

निबंध ...

9

शाळेत ग्रूहपाठ म्हणून निबंध लिहायचा असला की मी हमखास मम्मी-पप्पांना पकडत असे ... बरीच अ‍ॅडीशन मिळायची ... जुन्या कविता, गाणी ... मग आमचा निबंध सगळ्यात भारी व्हायचा हास्य
असचं आठवलं ... शेती किंवा असाच तत्सम विषय होता ...
"माउलीच्या दुधापरि .. आले मृगाचे तुषार ..
तहानेल्या बाळासम .. तोंड पसरी शिवार ..."

आणखी एक आठवली ... अशी काही होती ...पुर्ण आठवत नाही Sad

मला वाटते बसूनी विमानी
आकाशातून भटकावे ..

उभा उभा तो समोर डोंगर
चढूनी त्यावर पाहावे ...

राज्य पर्‍यांचे जाउनी तेथे राज्यपदाते मिळवावे ...

राज्य पर्‍यांचे जाउनी तेथे

10

राज्य पर्‍यांचे जाउनी तेथे राज्यपदाते मिळवावे ...

ही मला

"पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन..... मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी वसेन..... "
ही कविता वाटतेय!!!

अंह..

11

नाही हो ....

लिहित रहा

12

लिहित रहा...

अतिशय सुरेख ! छान लिहले आहेस

13

अतिशय सुरेख !

छान लिहले आहेस मके !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हे घे गं मके. फुल्ल कविता.

14

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?

का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा

-कवि बी (नारायण मुरलीधर गुप्ते)


-पुण्याचे पेशवे

धन्यवाद पेशवे

15

धन्यवाद पेशवे


-निखिल

आयला सही रे पुपे!!! धन्स!!!

16

आयला सही रे पुपे!!!
धन्स!!! मजा आली वाचायला!!!

मस्त रे पुपे. धन्यु ! छान

17

मस्त रे पुपे.
धन्यु !

छान कविता दिली आहेस तु शोधून.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कसचं कसचं.. इथे जा..

18

कसचं कसचं.. इथे जा..


-पुण्याचे पेशवे

जुन्या आठवणी जागवल्याबद्दल

19

जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद.

मजा आली

20

मजा आली वाचताना
गाई पान्यावर काय म्हनुनी आल्या असे रेकुन म्हणण्याची आठवण आली


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मस्त गं मके....लेख आवडला....

21

मस्त गं मके....लेख आवडला....

हे वाचा

22

आंतरजालावर हा दुवा मिळाला ...
आठवणीतील गाणी ....

ज ह ब ह र्‍या:!!!!

23

मके मके...तुझ्या स्वभावाची ही दुसरी बाजु पहिल्यांदाच पाहतोय. कुठे ती दंगा धुडगुस घालणारी मकी, आणि कुठे ही कवितांमध्ये रमणारी शाणी शाणी मक

छान वाटलं दोन्ही भाग वाचुन.
तसं कविता-गाणी वगैरे प्रातांशी आम्ही लहानपणापासुनच दूर! औरंगजेबच म्हणा ना!! त्यामुळॅ फार काही आठवत नाही. पण हे सगळं वाचुन आता मात्र त्यावेळी का नाही आवड निर्माण झाली ह्या सोनेरी खजिन्याशी अशी रुखरुख लागुन राहिलीये.

लिही...आणखी लिही...पुन्हा सगळ्यांना आपापल्या बालपणात फेरी मारुन यायचं दार किलकिलं करुन दे! हास्य

>> पण हे सगळं वाचुन आता मात्र

24

>> पण हे सगळं वाचुन आता मात्र त्यावेळी का नाही आवड निर्माण झाली ह्या सोनेरी खजिन्याशी अशी रुखरुख लागुन राहिलीये.
हो रे ... मलाही असचं म्हणायचय .. माझ्या लहानपणाची एक आठवण ...
आमच्या घरी जातं [दगडी जातं - धान्य दळण्यासाठी] होतं .. त्यावर काकी धान्य दळताना ओव्या म्हणायची ते आठवलं... तेव्हा लिहून ठेवलं असतं तर Sad

गंडवलं रे तिनं...

25

कुठे ही कवितांमध्ये रमणारी शाणी शाणी मक
गंडवलं रे तिनं तुला... हा मुखवटा आहे. चेहरा तोच तो जो आधीपासून दिसतोय.
(आता हे नको तिथं लागू करून वाद घालू नका माझ्याशी म्हणजे मिळवली. मी काही गोविंदाचार्य नाही)

मी काही गोविंदाचार्य

26

मी काही गोविंदाचार्य नाही

खुलाशाबद्दल धन्यवाद. नाही तर लगेच उमाभारतीजी कुठे आहेत असं विचारणार होतो.

झाकलेलं

27

झाकलेलं वाकून बघायची खोड काही केल्या जात नाही!

काय करता...

28

वाळवंट..ऊंट आणि अरब!

च्यायला, बिपीनदा तु आत्मचरित्र लिहिशील तेव्हा हेच नाव ठेव रे. भारीये

हाही भाग उत्तम!!

29

वाचतो आहे.

बाकी आताच्या काळात थॅंक्स टू टिव्ही , यु ट्युब हो!

मस्तै...मस्तच

30

मस्तै...मस्तच लेख..आवडला..माझी काकु आणि आई पण काही ओव्या म्हणायच्या त्याची आठवण झाली.
काळानुरुप ओव्या तसच काही तत्सम प्रकार पुर्णतः लोप पावत चालले आहेत.
तुझ्या या लेखाने परत आई व काकु कडुन परत परत ओव्या ऐकाव्याश्या वाटत आहेत.
तसे गाण्याच्या तालासुरांच्या बाबतीत मी अतिशय स्वतंत्र विचारांची आहे
पटल एकदमच Laughing out loud

@ पु.पे. मला शाळेत मराठीच्या पुस्तकात होती ही कविता..पण एवढी मोठी नव्हती... Sad


राधा
Grade Innocent Quest

||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||

मस्त लिहीले आहेस्.मलाही

31

मस्त लिहीले आहेस्.मलाही शाळेतल्या कविता फारशा आठवत नाहित.Sad पण आत्ता तुझ्यामुळे ते सगळं परत वाचताना मजा येतिये.हास्य

अरे वाह मके मस्त लिहिले आहेस

32

अरे वाह मके मस्त लिहिले आहेस एकदम. दोन्ही भाग आवडले.

माझ्या ही आठवणीतले एक गाणे

33

माझी आई छान सुरात म्हणायची...शांता शेळके यांचे आहे असे वाटते ..
अजून ही आठवत आहे..
टप टप ट्प टप टाकीत टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !!
उंच उभारी दोनही कान .. ऐटीत वळवी मान-कमान
मधेच केवहा दडुकत दडुकत, चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हशार , पाठीवर मी होता सवार
नुसता तयाला पुरे ईशारा , कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात , ओलांडील हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !
'शांता शेळके '

जुन्या आठवणी जाग्या झाल्या ...

~ वाहीदा

मके मस्त मालिका चालु केली

34

मके मस्त मालिका चालु केली आहेस.
काही विसमृतीत गेलेली तर काही गाणी नव्याने वाचतोय.

दिपका मांडिले तुला सोनियाचे ताट
घडविला जडविला चंदनाचा पाट

लेकीला तिची आई हे नेहमी गाउन झोपवते त्यामुळे हे माझही चांगलच पाठ आहे हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

दोन्ही भाग

35

दोन्ही भाग वाचले, खूप आवडले.
खूप आठवणी ताज्या झाल्या..
स्वाती

आठवणीतील गाणी ...

36

सुरेख!

37

सुरेख!

फारच छान

38

वा! फारच छान लेखन
बर्‍याच दिवसांनी तांबे वाचले


-ऋ

सुंदर

39

आठवणी.
पण हे सगळं वाचुन आता मात्र त्यावेळी का नाही आवड निर्माण झाली ह्या सोनेरी खजिन्याशी अशी रुखरुख लागुन राहिलीये.

तेच ना. मलापण असच वाटतय आता.

पुढचा भाग कधि ???

40

पुढचा भाग कधि ???


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."