ढासळता दीपस्तंभ?
गेले पंधरा-वीस दिवस पत्रकारितेतील वातावरण अक्षरशः ढवळुन निघालेले आहे. समस्त पत्रकार कारु-नारु ज्याची उत्कंठेने प्रतीक्षा करीत होते त्या दिव्य मराठीने औरंगाबादमधे पदार्पण केले पण दिव्य मराठीच्या आगमनाच्या चाहुलीने उल्हसित झालेले पत्रकार जगत गेले दोन-तीन आठवडे मिड डे चे इन्व्हेस्टिगेटिव्ह एडिटर जे डे यांच्या हत्येमुळे भांबावले आहे. सर्वाधिक धास्तावले आहेत ते पत्रकारितेतले मुख्य आधारस्तंभ समजले जाणारे शोधपत्रकार आणि क्राईम रिपोर्टर्स.
जे डे यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या त्या क्षणापासुनच अस्वस्थ क्राईम रिपोर्टर्स प्रोफेशनल रायव्हलरी विसरुन एकमेकांशी संपर्क साधत आहेत. सुरुवातीला बसलेल्या धक्क्यातुन पत्रकार जगत एकदोन दिवसात सावरले अन संतापाने थरथरले. राज्यभरातील पत्रकारांचा आक्रोश विविध ठिकाणी धरणी, उपोषणे, मोर्चे इत्यादीमधुन व्यक्त झाला. नेमेची येतो मग पावसाळा न्यायाने एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला की पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीला जोर येतो. तसेच यावेळी देखील झाले. या मागणीला नेहेमीप्रमाणेच राजकारण्यांनी वाटाण्याच्या अक्षता देखील लावल्या. पण नेहेमी स्वतःच्या सर्व काळज्या, विवंचना बाजुला सारुन कामाला लागणार्या पत्रकारांच्या मनातली चिंता अद्याप कमी झालेली दिसत नाही. पत्रकार, विशेषतः क्राईम रिपोर्टर्स नेहेमीच्या बिनधास्तपणे बातम्या लिहित नाहीत अशी तक्रार संपादक करीत आहेत. ज्येष्ठ पत्रकार जे डेंच्या हत्येमुळे अधोरेखित झालेल्या पत्रकारितेपुढील धोक्यांबाबत आपापसात विचार करीत आहेत तर तरुण पत्रकार आपल्या पुर्वासुरींना फोन करुन किंवा प्रत्यक्ष भेटुन धीर गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे डे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक करुनही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. या सर्व परिस्थितीमधे सामान्य माणुस, ज्याच्याकरता वृत्तपत्रे निघतात तो वाचक मात्र मौन पाळुन आहे. तो बिचारा डिझेल, गॅसच्या वाढलेल्या दरांमुळे महिन्याची तोंडमिळवणी कशी करायची या विवंचनेत आहे.
ही परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. एका बाजुला जे डे यांची हत्या होण्याआधी गेल्या दोन वर्षांमधे पाऊणेदोनशेपेक्षा अधिक पत्रकारांवर महाराष्ट्रात हल्ले झालेले आहेत. यातील कोणत्याच प्रकरणात पत्रकार आश्वस्त व्हावेत अशी कडक कारवाई झालेली नाही. एका बाजुला राजकारण्यांच्या, धनदांडग्यांच्या, गुन्हेगारांच्या मनातील पत्रकारांबाबतचची शत्रुभावना सातत्याने अधिकाधिक आक्रमक होत आह तर दुसरीकडे वाचकाची पत्रकारांबाबतची ही उदासिनता यामुळे तरुण पत्रकारांचा गोंधळ उडाला नाही तरच आश्चर्य.
वस्तुता प्रामाणिक पत्रकारिता करणे हे सतीचे वाण. एकदा ते हाती घेतले म्हणल्यावर चटके बसतात, आयुष्याची घडी विस्कटते याची फिकिर करु नये असे जुन्या पठडीतल्या पत्रकारांच्या मनावर सातत्याने बिंबवले जाते. या विचारसरणीच्याच आधाराने अनेक पत्रकार आपल्या वैय्यक्तिक विवंचना बाजुला ठेवुन तळमळीने काम करतात. (सध्याच्या परिस्थितीत वाचकांचा असे पत्रकार आहेत यावर विश्वास बसणे अवघड असले तरी असे हजारो पत्रकार आहेत ही वस्तुस्थिती आहे.) असे काम करणार्या पत्रकारांचे मनोधैर्य कायम रहाते ते मी माझ्या वाचकांकरता निष्ठेने काम करतो आणि वाचक ते जाणुन मला सतत पाठिंबा देतील या विश्वासामुळे. परंतु गेल्या एकदोन दशकात झपाट्याने बदलत्या परिस्थितीत हा विश्वास डळमळत आहे.
ही परिस्थिती निर्माण होण्याला अनेकविध कारणे आहेत. भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले असले तरीही भारतात प्रत्यक्षात मुक्त पत्रकारितेचा (फ्री जर्नालिझम) संकोच अनेक कायद्यांमुळे होतो. टीकेबाबत असहिष्णु असलेल्या राजकारणी, नोकरशहा यांच्याकडुन अश्या कायदेशीर तरतुदींचा वापर अनेकदा पत्रकारांवर दबाव आणण्याकरता होतो. हा दबाव गेल्या काही वर्षात प्रचंड वाढला असल्यामुळे पत्रकारांवरील तणावदेखील त्याच प्रमाणात वाढलेला आहे. अश्या परिस्थितीत अनेक पत्रकार प्रियं ब्रुयातचा सोपा मार्ग चोखाळतात आणि त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता कमी होते.
दुसर्या बाजुला गेल्या काही दशकांमधे वाचकांमधील आक्रमक पत्रकारितेबाबतची आवड वाढत आहे. आक्रमक पत्रकारिता प्रभावीपणे करण्यासाठी ती करणारा पत्रकार आणि ती वाचणारा वाचक या दोन्हीना प्रश्नांची, त्यावरील उत्तरांची सखोल जाण असावी लागते परंतु ती जाण सर्वच ठिकाणी कमी होत आहे. धोके टाळण्यासाठी खोलात शिरुन माहिती काढणे टाळण्याची प्रवृत्ती पत्रकारांमधे वाढत आहे तर वाचकांमधील एकुणच समज कमी होत आहे. गेल्या दोन दशकात निर्माण झालेल्या तरुण वाचकवर्गामधे तर नागरिकशास्त्राच्या किंवा विकासाच्या मुलभुत संकल्पना, कायदा, प्रशासकीय व राजकीय कार्यपद्धती याबाबतच अज्ञान आहे. परिणामी आक्रमक पत्रकारितेच्या नावाखाली तावातावाने, आक्रस्ताळेपणे एकांगी मते मांडणे वाढत आहे आणि त्याला वाचकांची मान्यता देखील मिळत आहे.
९०च्या दशकापासुन माध्यमजगतात जीवघेणी स्पर्धा आली आहे. दुरचित्रवाणी या माध्यमाने ब्रेकिंग न्युज ही संकल्पना भारतात रुजवली आणि एकुणच पत्रकारितेतील कामाचा वेग आणि ताण प्रचंड वाढला. दुरचित्रवाणीचे जाळे सर्वदुर पसरत गेले तसतसे बातम्या सर्वप्रथम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्याकडे केंद्रित होत गेले. अश्या परिस्थितीत मुद्रित माध्यमांकडे सखोल वृत्तांकने, वृत्तविश्लेषण अश्या कामगिर्या आल्या. परंतु २४ तास न्युजचॅनेल चालु झाली तेव्हा टाईम स्लॉट भरुन काढण्याकरता त्यांच्यावर चर्चांची गुर्हाळे देखील सुरु झाली आणि त्यानंतर बातम्या मिळवण्यासाठी, त्या सर्वप्रथम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, वाचकांना खिळवुन ठेवणार्या चर्चा दाखविण्यासाठी दुरचित्रवाणी वाहिन्यांमधेच जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. तेव्हा मुद्रित माध्यमांनी खास बातम्यांवर भर दिला परंतु खास बातम्या शोधण्यालाही मर्यादा असतात. यातुनच पेपरची पाने रोज भरण्यासाठी आणि वाचक वाढवण्यासाठी, वाहिन्यांचे टाईम स्लॉट आणि टीआरपी वाढवण्यासाठी पत्रकारितेच्या मुल्यांशी तडजोड सुरु झाली आणि पत्रकारितेत रंजकतेचे महत्त्व वाढु लागले. गेल्या दशकभरात इंटरनेट्च्या वाढत्या प्रसारामुळे या स्पर्धेला एक नवे परिमाण मिळाले आहे. न्युज पोर्टल्स, ब्लॉग्ज आणि आतातर फेसबुक आणि व्टिटरसारख्या माध्यमांमधुन माहितीचे प्रसारण सुरु झाल्यामुळे पत्रकारितेचा पार बाजार उठला आहे. यामुळे वार्तांकनामधील अधिकृतता, अभ्यास जोखणे अधिकाधिक कठिण होत आहे. प्रचार आणि वार्तांकन, अफवा आणि बातमी यातील फरक ओळखणे अधिकाधिक अशक्य होत आहे.
या परिस्थितीचे मुल्यगामी परिणाम पत्रकारितेवर होणे साहजिक आहे आणि ते होत आहेत हे स्पष्ट आहे. अर्थातच पत्रकारितेच्या खालावलेल्या दर्जामुळे वाचक असंतुष्ट असणे देखील साहजिक आहे. परंतु यावरचा उपाय देखील वाचकांच्याच हाती आहे. आपण पैसे खर्चुन जो प्रॉडक्ट घेतो त्याबाबत आपल्याला पुर्ण समाधान मिळायला हवे, तो आपला हक्कच आहे हे वाचकाने समजुन घेऊन आपल्या हक्कांचे रक्षण स्वतः करायला हवे. त्यासाठी त्याने सतत जागरुक रहायला हवे आणि आपल्या अपेक्षा स्पष्टपणे संबंधितांपर्यंत पोहोचवायला हव्यात. त्या अपेक्षा पुर्ण करणार्यांना सातत्याने जनाधार द्यायला हवा. बदलत्या काळात आपल्या गरजा पुर्ण करणारी माध्यमे हवी असतील तर ही जबाबदारी वाचकांनी समर्थपणे पेलणे अत्यावश्यक आहे.
.jpg)
{प्रचार आणि वार्तांकन, अफवा}
प्रचार आणि वार्तांकन, अफवा आणि बातमी यातील फरक ओळखणे अधिकाधिक अशक्य होत आहे. >>
+१
सच्च्या पत्रकारितेच्या व्यथा अगदी योग्य प्रकारे मांडल्या आहेत . !!
{प्रचार आणि वार्तांकन, अफवा आणि बातमी यातील फरक ओळखणे अधिकाधिक अश}
प्रचार आणि वार्तांकन यातील फरक ओळखणे अधिकाधिक अशक्य होत आहे.
ही फार मोठी समस्या आहे असे मला वाटत नाही.
साधा विविधतेचा मुद्दा घेऊ. एखाद्या पक्षाने जर त्यांचे मुखपत्र काढले व वर दुसर्या एखाद्या वृत्तपत्रातल्या एखाद्या पत्रकारास हाताशी धरले तरीही त्याच वृत्तपत्रातले दुसरे पत्रकार हे निष्पक्षपणे लिहु शकतात.
उदा. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र. भरतकुमार राऊत हे मटा मधील पत्रकार व शिवसेनेतर्फे राज्यसभेत. पण तरीही मटातील इतर पत्रकार (फडके वगैरे) निष्पक्ष लिहु शकतात.
अगदी निष्पक्ष पत्रकारिता म्हंटली तरीही वृत्तपत्र-मालकाच्या मतांशी विपरित लिहिल्यास समस्या आहेतच.
जरी सगळी वृत्तपत्रे प्रचारकी काम करायला लागली तरीही एकप्रकारची पोकळी निर्माण होईल व त्यातून निष्पक्ष वृत्तपत्राला मागणी निर्माण होईल व ती होत असेल तर एखादा उद्योजक ते सुरु करेलच की.
मात्र मागणी हवी. जर निष्पक्ष वृत्तपत्राला मागणीच नसेल तर समस्या जनतेत आहे ... पत्रकारितेत नाही.
हां जर सरकारने बंधने लादली तर मात्र याचे पर्यावसान गंभीर समस्येत होऊ शकेल. पण तेही होणे फार अवघड आहे.
I am relying a lot on market (competitive) process. But it is not unrealistic.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{हत्या}
माहीती अधीकार कायदा कार्यकर्ते सतीश शेट्टी, पत्रकार डे अश्या हत्या होणे अतिशय चिंताजनक आहे.
१९९० नंतर प्रसारमाध्यमांची वाढ ही तेव्हा तरी अनेक अर्थाने सकारात्मकच वाटली होती. गुगलचा वापर वाचक माहीती मिळवण्याकरता व उद्योजक वाचकांपर्यंत पोहोचवण्याकरता व गुगल स्वतासकट सगळ्यांचे हित साधण्याकरता करत आहेच. आजही गुगल आपल्या सगळ्यांना हवेहवेसेच आहे तसेच काहीसे प्रसारमाध्यमांचे व्हावे असे मनापासुन वाटते.
{वाचकांनी केलेले दुर्लक्ष}
वाचकांनी केलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय आहे हे मात्र तिव्रतेने जाणवत आहे
Hope is a good thing...
{धन्यवाद सुहास, गब्बर सिन्ग आणि सहज...}
स्वतःच्याच धाग्यावर स्वतःच प्रतिसाद देऊन टीआरपी खेचण्याचा प्रयत्न करु नये असे माझे मत आहे. पण हा धागा त्याला अपवाद करत आहे.
@ सुहास & गब्बर सिन्ग -
प्रचार आणि वार्तांकन यातील फरक ओळखणे अधिकाधिक अशक्य होत आहे.
हे माझ्या दृष्टीने लोडेड स्टेटमेंट मी करत आहे. वार्तांकनामध्ये तटस्थता, वस्तुनिष्ठता असे जे गुण अपेक्षित असतात त्यांचा प्रचारात संपुर्ण अभाव असतो. फॅक्टस आर सेक्रेड हा वार्तांकनाचा गाभा असतो. त्यामुळे वार्तांकन विश्वासार्ह ठरते. वार्तांकनाची ही विश्वासार्हता माध्यमाला विश्वासार्ह बनवते. त्यामुळे या दोन्हीमध्ये गल्लत होणे हे पत्रकारितेला नेहमीच मारक असते. ही गल्लत वार्ताहर, बातम्या रिराईट करणारा उपसंपादक, संपादक, माध्यम व्यवस्थापन, माध्यम मालक अशा अनेक पातळ्यांवर होऊ शकते. त्यावर वाचक/ प्रेक्षक हा प्रॉडक्टचा एंड युजर या नात्याने दबाव ठेऊ शकतो. पण गेल्या काही दशकांमधे वाचकांमधेच अशी गल्लत होत आहे. त्यामुळे पत्रकारितेला सर्वात मोठा धोका संभवतो असे माझे मत आहे.
@ गब्बर सिन्ग -
साधा विविधतेचा मुद्दा घेऊ. एखाद्या पक्षाने जर त्यांचे मुखपत्र काढले व वर दुसर्या एखाद्या वृत्तपत्रातल्या एखाद्या पत्रकारास हाताशी धरले तरीही त्याच वृत्तपत्रातले दुसरे पत्रकार हे निष्पक्षपणे लिहु शकतात.
उदा. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र. भरतकुमार राऊत हे मटा मधील पत्रकार व शिवसेनेतर्फे राज्यसभेत. पण तरीही मटातील इतर पत्रकार (फडके वगैरे) निष्पक्ष लिहु शकतात.
अगदी निष्पक्ष पत्रकारिता म्हंटली तरीही वृत्तपत्र-मालकाच्या मतांशी विपरित लिहिल्यास समस्या आहेतच.
हे एव्हढे सोपे नसते. प्रत्येक माध्यमव्यवस्थेत (आंतरजाल वगळता - या एकाच माध्यमाला कोणताच पॅरॅमीटर नाही.) हे होऊ नये यासाठी अनेक डिफेन्स मेकॅनिझम असतात. वाचकांचा माध्यमांशी संबंध दुरावल्याने (यालाच माध्यमांची वाचकांबरोबरची नाळ तुटणे म्हणता येईल.) वाचकांना ते समजत नाहीत. परिणामी वाचकांचा असे असु शकते किंबहुना असेच आहे हा गैरसमज होतो. त्यामुळे अनेकदा तो माध्यमे, त्यातील माणसे यांच्याबाबत सरसकट मते बनवतो आणि ते पत्रकारांसाठी अन्यायकारक आहे.
जरी सगळी वृत्तपत्रे प्रचारकी काम करायला लागली तरीही एकप्रकारची पोकळी निर्माण होईल व त्यातून निष्पक्ष वृत्तपत्राला मागणी निर्माण होईल व ती होत असेल तर एखादा उद्योजक ते सुरु करेलच की.मात्र मागणी हवी. जर निष्पक्ष वृत्तपत्राला मागणीच नसेल तर समस्या जनतेत आहे ... पत्रकारितेत नाही.
प्रिसाईजली! यु हॅव हिट ऑन द हेड ऑफ द नेल.
ही मागणी नक्की काय आहे? ती वाचक कशी नोंदवतो? हे कळीचे मुद्दे आहेत. माझा वाचकांबाबत आक्षेप आहे की तो दुटप्पी आहे. एकतर वाचक आपली मागणी माध्यमांपर्यंत पोहोचवत नाही. पोहोचवलीच तर ती मागणी कितपत जेन्युईन आहे हे कायम गुलदस्त्यात राहते. ज्या गोष्टींना वाचक नावे ठेवतात नेमक्या त्याच गोष्टीना ते प्रतिसाद देतात. याचाच अर्थ असा निघतो की वाचकाला गिल्टी रीडची चटक लागलेली आहे.
जर सरकारने बंधने लादली तर मात्र याचे पर्यावसान गंभीर समस्येत होऊ शकेल. पण तेही होणे फार अवघड आहे.
याबाबत भरवसा देणे अवघड आहे. किंबहुना तसे करण्याचे प्रयत्न सुरु आहेतच. त्यासाठी नोकरशाही, राजकारणी, कॉर्पोरेटस, समाजसेवक असे अनेक घटक एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि संभमित किंवा दुटप्पी वाचक त्याबाबत मौन पाळण्याचीच शक्यता आहे. पत्रकार संरक्षण कायदा असावा काय? त्याचा पत्रकारांना कितपत उपयोग होईल हे मुद्दे बाजुला ठेवले तरी त्या कायद्याबाबत विविध घटकांनी घेतलेली भुमिका असे प्रयत्न सुरु आहेत हेच दर्शविते.
@ सहज -
१९९० नंतर प्रसारमाध्यमांची वाढ ही तेव्हा तरी अनेक अर्थाने सकारात्मकच वाटली होती. गुगलचा वापर वाचक माहीती मिळवण्याकरता व उद्योजक वाचकांपर्यंत पोहोचवण्याकरता व गुगल स्वतासकट सगळ्यांचे हित साधण्याकरता करत आहेच. आजही गुगल आपल्या सगळ्यांना हवेहवेसेच आहे तसेच काहीसे प्रसारमाध्यमांचे व्हावे असे मनापासुन वाटते.
मालक गल्लत होते आहे. गुगल आणि माध्यमे यांची तुलना होऊ शकत नाही. माध्यमांनी स्वतःची विश्वासार्हता निर्माण करणे अपेक्षित आहे. ती जबाबदारी गुगल कधीच घेणार नाही. वृत्तपत्र आणि टपाल किंवा कुरियर सेवा यांच्यात फार मोठा गुणात्मक फरक आहे. गुगल माध्यम तर नाहीच, ते फक्त माध्यमांचे सेवापुरवठादार आहे. आंतरजालावर माहिती प्रसारित करण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध होतात पण त्या माध्यमांची विश्वसनियता, तेथुन मिळणार्या माहितीची अधिकृतता याबाबत बहुतेकदा कोणीच जबाबदारी घेत नाही. त्यामुळे सध्या तरी तेथुन मिळणार्या बर्याचशा माहितीचे मुल्य बाजारगप्पा एव्हढेच रहाते. त्यामुळे ही संपुर्ण तुलनाच अनाठाई आहे. ही परिस्थिती कदाचित बदलेल अशी आशा आहे. पण जर ही बदलली नाही तर आंतरजालावरच्या माहिती आदानप्रदानाच्या नावाखाली होणार्या प्रचारामुळे गंभीर समस्या उभ्या राहु शकतील. किंबहुना फेसबुक क्रांती, व्टिटर क्रांती अश्या नावांनी गौरवल्या जाणार्या अनेक संशयास्पद चळवळी या धोक्याकडेच निर्देश करतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{पत्रकारांवरील हल्ला }
पत्रकारांवरील हल्ला हा निषेधार्थ आहे. कधी कधी त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब हि धोक्यात येते. ( मी स्वतः एका पत्रकाराची मुलगी आहे त्यामुळे प्रत्यक्षात अनुभव आहे )
परुंतु वाचकांनी केलेले दुर्लक्ष हे जास्त खटकले
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{पत्रकारांवरील हल्ला }
पत्रकारांवरील हल्ला हा निषेधार्थ आहे. कधी कधी त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब हि धोक्यात येते. ( मी स्वतः एका पत्रकाराची मुलगी आहे त्यामुळे प्रत्यक्षात अनुभव आहे )
परुंतु वाचकांनी केलेले दुर्लक्ष हे जास्त खटकले
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{पत्रकारांवरील हल्ला }
पत्रकारांवरील हल्ला हा निषेधार्थ आहे. कधी कधी त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब हि धोक्यात येते. ( मी स्वतः एका पत्रकाराची मुलगी आहे त्यामुळे प्रत्यक्षात अनुभव आहे )
परुंतु वाचकांनी केलेले दुर्लक्ष हे जास्त खटकले
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{हे धोके...}
प्रोफेशनल हजार्ड म्हणुन स्वीकारणे शक्य असते. पत्रकार तसे ते स्वीकारतात देखील. स्वतःच्या, कुटुंबाच्या जीवाला असलेल्या धोक्यांबाबत त्यांची सहसा तक्रार नसते. त्यांचे कुटुंबिय तर थोरच असतात. आपल्या घरातले कुणीतरी पत्रकार आहे म्हणुन ते सगळी स्वातंत्र्ये कुठलीच तक्रार न करता गमावतात. तुम्ही पत्रकाराची मुलगी आहे म्हणल्यावर तुम्ही हे नक्कीच भोगलेले असेल. वडीलांनी एखादी सणसणीत बातमी दिल्यानंतर तुमच्या घराबाहेर खेळायला जाण्यावर देखील कदाचित बंधने आली असतील. (माझ्या स्वतःच्या मुलावर तशी बंधने आहेत.)
पण आज वाचकांचा अनास्थेचा दृष्टीकोण पाहिल्यावर प्रश्न पडतात की हे सगळे करायचे ते कुणासाठी? एवढी किंमत आपण मोजतो ती नक्की कशासाठी?
अशा संभ्रमित अवस्थेतल्या पत्रकारांकडुन वाचकांनी आता कोणतीही अपेक्षा ठेवु नये. किंबहुना तशी कोणतीही अपेक्षा बाळगण्याचा किंवा पत्रकारांवर कोणतीही टीकाटिपण्णी करण्याचा हक्क ते आपल्या अशा दुटप्पी वागण्याने गमावत आहेत.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{>>अशा संभ्रमित अवस्थेतल्या}
>>अशा संभ्रमित अवस्थेतल्या पत्रकारांकडुन वाचकांनी आता कोणतीही अपेक्षा ठेवु नये. किंबहुना तशी कोणतीही अपेक्षा बाळगण्याचा किंवा पत्रकारांवर कोणतीही टीकाटिपण्णी करण्याचा हक्क ते आपल्या अशा दुटप्पी वागण्याने गमावत आहेत.
मान्य्
आजकाल सगळे मॅनेज करता येते तशा बातम्याही करता येत असाव्यात असे सतत मनात येते आणि जेथे होत नसतील तेथे असे होत असावे का?
>>पत्रकार, विशेषतः क्राईम रिपोर्टर्स नेहेमीच्या बिनधास्तपणे बातम्या लिहित नाहीत अशी तक्रार संपादक करीत आहे
का करतील ?? त्यांना आपण धोक्यात आहोत या गोष्टीची कल्पना असेलच ना??
{धोक्याच्या कल्पना...}
खुप सब्जेक्टिव्ह असतात. रिपोर्टरला जिथे धोका वाटतो तिथे सब एडिटरला किंवा एडिटरला तो वाटेलच असे नाही. एडिटरची अपेक्षा रिपोर्टरने दणदणीत बातम्या आणाव्यात ही असते. सबएडिटरचा रोल रिपोर्टरने लिहिलेली बातमी अधिक आकर्षक पद्धतीने लिहिणे, तिला हेडिंग देणे, ती पानावर सजवणे अशी असते. अश्या परिस्थितीत रिपोर्टर हातचे राखुन बातमी देऊ लागला तर कंटेंट क्वालिटी खालावते आणि त्याचा थेट परिणाम वृत्तपत्राचा खप, जाहिरातींचे उत्पन्न यांच्यावर होतो. त्यामुळे एडिटर, सब एडिटर्स रिपोर्टरमागे दणदणीत बातम्या देण्याचा तकादा लावतात. रिपोर्टरच्या दृष्टीने ते म्हणजे सतत काम मागणारे अन काम दिले नाही तर खाऊन टाकणारे राक्षस असतात.
बातमी छापुन आल्यावर रिपोर्टर आणि एडिटर कायदेशीर परिणामांना जबाबदार असतात. कायदेशीर बाबींमधे एडिटर अधिक जबाबदार्या घेतो देखील पण अन्य प्रकारे होणार्या अनेक थेट परिणामांना (धमक्या, हल्ले, असहकार्य, उपेक्षा, टीका इ.) सातत्याने फील्डवर असलेला रिपोर्टर एकटाच बहुतेकदा सामोरा जातो.
अशा परिस्थितीत माझे रिपोर्टर्स धास्तावलेत. त्यामुळे ते बिनधास्तपणे काम करत नाहीत असा विचार करणारे एडिटर्स खरेच समजुतदार म्हणावे लागतात. असे एडिटर्स रिपोर्टर्सचे मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न करु शकतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{देवा... वाचकांचा फोरम नावाचा}
देवा...
वाचकांचा फोरम नावाचा प्रकार अस्तित्वात राहिला नाहि म्हणून असे होत असेल काय.
पेपर विकत घेणार्या वाचकाचे त्याबद्दलचे मत काय हे कळण्याची काही यंत्रणा आहे का किंवा तसा काही सर्वे वगैरे होतो का. पूर्वी वाचकांचा पत्रव्यवहार वगैरे प्रकार असे पण अलीकडे तो वाचकांच्या खाजगी वा सामाजिक समस्या मांडण्यासाठीच उरला आहे
वृत्तपत्रे आपणहून अशा प्रकारचा फोरम किंवा इमेल आयडी वगैरे वापरू शकतील आणि त्याचा योग्य प्रसार करू शकतील तर वाचकांचा प्रतिसाद मिळणे आणि तो सतत तपासात राहाणे याला काही मदत होऊ शकेल काय.
दुसरा भाग असा आहे की वाचकाला खरंच चांगलं काय आणि निकस काय हे कळतच नसेल तर त्या प्रबोधनासाठी काही करता येईल काय. म्हणजे मला चांगला पेपर काय हे माहित नव्हतं तेव्हा मी रोज सकाळ आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचत असे, थोडेसे समजायला लागल्यावर मग लोकसत्ता आणि 'हिंदू' वर आलो तो अजून टिकून आहे..
मी माझ्या मित्रांना हिंदू वाचायला सांगतो तेव्हा त्यांना ते खरंच कळत नाही.. पण दोन तीन वेळा वाचल्यावर मग त्याची चटक लागते, सकस निकस कळायला लागतं
समस्या जर वाचकांच्या मधे असेल तर (आणि ती तशी आहेच असं मला वाटतं ) तर वाचक प्रबळ आणि जास्त सजग झाल्याशिवाय चांगल्या दर्जाच वृत्तपत्र खपणार नाही, आणि जर ते खपलं नाही तर पत्रकारांच्यावरचा दबाव तसाच राहणार
{"पूर्वी वाचकांचा पत्रव्यवहार}
"पूर्वी वाचकांचा पत्रव्यवहार वगैरे प्रकार असे पण अलीकडे तो वाचकांच्या खाजगी वा सामाजिक समस्या मांडण्यासाठीच उरला आहे"
त्यांना खटकणारी पत्रे पाठवली तर ते छापत देखील नाहीत.
{वाचकांचे फोरम्स...}
अजुनही आहेत. किंबहुना सिटीझन जर्नालिझम सारख्या उपक्रमांमुळे ते वाढले आहेत. पण किती वाचक त्यात सहभागी होतात?
माध्यमे हा एक प्रॉडक्ट आहे. पैसे खरेदी करुन वृत्तपत्र विकत घेणारा किंवा वाहिनी पहाणारा वाचक त्याचा ग्राहक आहे. वीस रुपयांच्या टुथपेस्टने दात स्वच्छ झाले नाहीत तर आपण त्याबाबत विक्रेता, वितरक, उत्पादक यांच्याशी भांडतो. वेळी कज्जे खटले करतो. हा त्यांना मिळणारा फीडबॅक असतो. असा फीडबॅक आपण माध्यमांना किती वेळा देतो? असा फीडबॅक माध्यमांना न देता, आपल्या त्यांच्यापासुनच्या अपेक्षा त्यांना स्पष्ट न करता आपण फक्त त्यांच्याबाबत अन्यत्र कुरकुर करतो.
आपण ग्राहक असल्याने माध्यमांनी आपल्या अपेक्षा पुर्ण केल्याच पाहिजेत. पण त्या अपेक्षा कधी स्पष्ट असतात? आपल्या गल्लीतली ड्रेनेजची मॅनहोल्स तुटली आहेत, त्यामुळे अपघात होतात तरी ती बदलली जात नाहीत किंवा आपल्या गल्लीत चोर्या-घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे याला माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी ही अपेक्षा योग्यच आहे. पण किती वेळा आपण असे प्रश्न माध्यमांच्या दृष्टोत्त्पत्तीस आणतो? हे आपण केले नाही तर आपले प्रश्न माध्यमांना कसे कळतील याचा आपण कधी विचार करतो काय?
माध्यमांनी समाजाला उपयुक्त अश्या गंभीर विषयांवर सखोल वृत्तांकन करावे. सनसनाटी, श्लील-अश्लिलतेच्या सीमारेषेवरचा मजकुर किंवा गॉसिप छापु नये या अपेक्षेला कुणीतरी विरोध करु शकेल काय? पण गंभीरपणे समाजाशी बांधिलकी ठेवुन काम करणार्या माध्यमांपेक्षा सनसनाटी, श्लील-अश्लिलतेच्या सीमारेषेवरचा मजकुर किंवा गॉसिप प्रसारित करणार्या माध्यमांनाच वाचकांचा अधिक प्रतिसाद मिळतो ही वस्तुस्थिती नाही काय? ही वस्तुस्थिती बहुसंख्य वाचकांनाच गिल्टी रीड हवे आहे, ते दुटप्पी आहेत हेच दाखवत नाही काय?
माध्यमांनी संवेदनाक्षम, सविस्तर वृत्तांकन करावे ही अपेक्षा अगदी योग्य आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यासाठी आवश्यक ते सामाजिक सहकार्य कधीच मिळत नाही. एखाद्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांची छायाचित्रे किंवा त्यांच्याबाबतची सविस्तर माहिती गोळा करणार्या वार्ताहरांना बहुतेकदा संबंधितांकडुन मिळणारे शिव्याशाप, वेळप्रसंगी धक्काबुक्की, मारहाण यांचा सामना करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. सातत्याने घडणार्या अश्या प्रसंगांमुळे मनस्वास्थ्य हरवलेले काही क्राईम रिपोर्टर्स मी स्वतः पाहिलेले आहेत.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{>>पण किती वाचक त्यात सहभागी}
>>पण किती वाचक त्यात सहभागी होतात?
वाचक सहभागी होण्याचा प्रयत्न करतो पण, आपल्याच तत्वाविरोधात आलेले लेखन छापणे मिडियाला जमतयं असे कुठे वाटत नाही आहे.
Hope is a good thing...
{- १}
तत्वाविरोधी लिखाण म्हणजे?
वाचक हा ग्राहक. त्याला हवे तेच तो खरेदी करणार. जे त्याला नको असेल ते तो स्वीकारणारच नाही. मग इथे मीडीयाच्या तत्वाचा प्रश्न येतो कुठे?
हा कांगावा करण्याआधी वाचक स्वतः स्वतःशी किती प्रामाणिक आहे हे जरा तपासुन पहाण्याची गरज आहे असे माझे मत आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{अनेकदा पेपर विरोधी विचारणा}
अनेकदा पेपर विरोधी विचारणा केली तर उत्तरे दिली जात नाहीतच उलट ते पत्र वाचकांच्या पत्र व्यवहार मध्ये छापले देखील जात नाही.
Hope is a good thing...
{अविश्वसनीय...}
विरोधी विचारणा केली तर उत्तरे दिली जात नाहीत
हे शक्य आहे.
ते पत्र वाचकांच्या पत्र व्यवहार मध्ये छापले देखील जात नाही
असे होणे अशक्य आहे. मुळात वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात छापायला मजकुर मिळणेच अवघड जाते. मग तिथे आलेली पत्रे नाकारण्याची शक्यता अजिबात रहात नाही. अगदीच अतर्क्य तर्कटे असतील तर आणि तरच तसे होते. वृत्तपत्रे विरोधामधे आलेल्या बहुतेक सर्व पत्रांची आवर्जुन दखल घेतात. मुळात अशी पत्रे फारशी येत नाहीत आणि आलीच तर ती छापावी अश्या प्रकारची नसतात. ज्या पत्रांमधे गंभीरपणे मुद्दे उपस्थित केलेले असतात अश्या पत्रांना बहुतेकदा प्रसिद्धी मिळते. अर्थात ती प्रसिद्धी देताना आक्षेपांना उत्तरे देखील दिली जातातच.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{हाच तर कळीचा मुद्दा आहे, आधी}
हाच तर कळीचा मुद्दा आहे, आधी येत होती तेव्हा कोणी छापली नाही व आता येत नाहीत म्हणून छापत नाहीत.
Hope is a good thing...
{अहो...}
मी गेली तीन दशके हेच होताना पहातोय.
वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजे अंगावर काटे आणणारे प्रकरण असते.
एकतर वाचक पत्रे लिहित नाहीत, लिहिली तर....
प्रतिसादांबाबतचे प्रश्न आज आंतरजालावर नाही निर्माण झालेले, खुप मोठा इतिहास आहे त्या प्रश्नाला!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{अगदी. दोन्ही बाजूने विचार}
अगदी. दोन्ही बाजूने विचार होणे महत्त्वाचे आहे.
Hope is a good thing...
{वाचकांची आणि पत्रकारांची}
वाचकांची आणि पत्रकारांची सजगता, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत असे मला वाटते किंबहुना वाचकांची जास्त !
{हा कांगावा करण्याआधी वाचक स्वतः स्वतःशी किती प्रामाणिक आहे हे जर}
@प्रसन्न साहेब, तुम्ही म्हणता -
हा कांगावा करण्याआधी वाचक स्वतः स्वतःशी किती प्रामाणिक आहे हे जरा तपासुन पहाण्याची गरज आहे असे माझे मत आहे.
इथे मी value judgment वि. Scientific judgment चे लॉजिक वापरायचा प्रयत्न करेन.
वाचक हा ग्राहक आहे असे मानले व लोकशाही आहे हे गृहीत धरले तर -
Rule No. 1) Customer is always right.
Rule No. 2) Whenever you have a doubt - Refer to Rule No. 1.
वाचकाला काय हवे आहे व काय नको आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न उद्योजक करू शकतो. पण वाचकाला जे हवे आहे ते चूक आहे असे म्हणणे हे Value judgment. वाचकाला जे हवे आहे ते कमीतकमी किंमतीत उपलब्ध कसे करून देता येईल हे Scientific judgment.
-----------------------------
याच्याशी समांतर प्रश्न -
जाती/धर्मावर आधारित निवडणूक प्रचार (उमेदवाराने) करू नये असा कायदा जरी केला तरी जाती/धर्मावर आधारित मतदान मतदार करणार नाहीत याची हमी नाही. मतदार जाती/धर्मावर आधारित मतदान करतात व करू शकतात. कोणताही कायदा ते रोखू शकत नाही.
-----------------------------
मला नेमके काय म्हणायचे आहे - (लोकशाहीत) नागरिकास काय हवे आहे त्याविषयीचे Value judgment हे सर्वसाधारणपणे सरकार, उद्योजक यांनी न केले तर जास्त चांगले. कारण अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था मागणीवर अवलंबुन असते. अर्थात एखाद्याची मागणी दुसर्याच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करणारी असेल तर पोलिस व न्यायव्यवस्था आहेच.
व म्हंजे याचाच अर्थ असाही की वाचकांनी तक्रार करणे की आम्हाला हे मिळत नाही व ते मिळत नाही आणि वृत्तपत्रे टॅब्लॉइड्स झालियेत त्यांच्यात कस राहिला नाही असा कांगावा करणे हे ही कितपत बरोबर ही तुमची शंका कम टीका रास्त.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{प्रसन्नदा.. थोडेसे प्रॅक्टीकल}
प्रसन्नदा.. थोडेसे प्रॅक्टीकल काहि करता येतं का बघु या...
तुम्हाला सर्व वृत्तपत्रांशी योग्य त्या चॅनलमधुन संपर्क करता येइल असे विरोपपत्ते (म्हणजे जेथे फीड्बॅकची आवर्जुन दखल घेतली जाइल असे) इथे देता येतील काय.
त्यांना मत कळवताना अर्थातच तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाइल
{सुचना चांगली आहे...}
शक्य तेव्हढे विरोपपत्ते मिळवण्याचा प्रयत्न करतो.
तोवर...
बहुतेक सर्व वृत्तपत्रांच्या मुद्रित आवृत्त्यांमधे किंवा संकेतस्थळांवर त्यांचे विरोपपत्ते दिलेले असतातच ते वापरता येतील.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)