गाण्यांचं आणी आमचं अतूट नातं!!! कोणे एके काळी, जेव्हा लोडशेडिंग नव्हतं.. सटीसहामाशी केव्हा तरी नाहीतर गेला बाजार आठवड्यातून एखाद्या दिवशी लाईट्स नसत तेव्हा, किंवा लहानपणी शेत विकलं नव्हतं तेव्हा, कधी शेंगदाण्याच्या पेरणीसाठी बियाण्यांच्या शेंगा फोडत असताना, तर कधी भुईमुगाच्या वेलाच्या शेंगा तोडताना, कधी दिवाळीत करंज्या करताना.. घरातले सगळेजण एकत्र असायचे.. नि ठरल्यासारखी गाण्यांच्या भेंड्यांना सुरूवात व्हायची.. तशी ती अजूनही होतेच.. 
यात प्रत्येकाची गायची गाणी ठरलेली. बाबा म्हणजे फक्त मुकेश नि राज कपूर.. आम्हा भावंडाची प्रत्येकाची नवी-जुनी आवड ती निराळीच.. आंणी आई म्हणजे फक्त मराठी गाणी!!!! तिच्या तोंडून मी बरीचशी गाणी ऐकली.. अगदी नकळत्या वयापासून.. त्यातली कित्येक गाणी मी कुठे पाहिलीही नाहीत.. पण लहानपणापासून ऐकत आलेय.. नि बहुतेक सगळी जशीच्या तशी लक्षात आहेत..
सुरूवात कुठून करावी हा प्रश्न तर आहेच.. आज अशीच काही गाणी आठवली आहेत.. काहींचे मधले मधले शब्द विसरले गेलेयत..
आईचं खूप आवडतं गाणं होतं..कविताही म्हणू शकतो तिला... दिव्याची कहाणी...!!! जणू काही दिवा आपल्या आयुष्याची स्थित्यंतर सांगतोय... तशा लहानपणातल्या सगळ्याच गोष्टी ठळकपणे आठवत नसल्या तरी काही गोष्टी मात्र मेमरीत अगदी फिट्ट बसल्या आहेत.. या गाण्याची आठवण झाली.. की मी आईच्या मांडीवर बसलेय, नि ती अंगणात बसून मला हे गाणं ऐकवतेय हेच दृष्य आठवतं..
आधी होते मी दिवटी ,
शेतकर्यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मिणमिणती!!
समई केले मला कुणी,
देवापुढती नेऊनी
तिथून आले बाहेर,
ओकीत काळासा धूर!!!
काचेचा मग महाल तो,
कुणी बांधूनी मज देतो,
कंदील त्याला जन म्हणती,
मीच तयातील परि ज्योती!!!
बत्तीचे ते रूप नवे,
पुढे मिळाले मज बरवे,
झगमगाट तो कसा पडे,
वरात मज वाचून अडे!!!
आता झाले मी बिजली,
घरे मंदिरे लखलखती
देवा ठाऊक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे!!
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांना
कसलेही मज रूप मिळो
देह जळो अन जग उजळो!!!
मी तशी जाम रडूबाई होते.. म्हणजे काहीतरी आगाऊपणा करणे,त्याबद्दल आईचा किमानपक्षी ओरडा नि कमालपक्षी मार खाणे.. चालूच असायचं!!! आजही जास्त फरक पडलाय असं नाही.. फक्त आता मार पडत नाही
घरी जसं सगळ्यांना गाण्यांचं वेड, तसंच पुस्तकांचंही.. आम्हा भावंडाना परीक्षेच्या दिवसांत अभ्यासाच्या पुस्तकांत घालून अवांतर पुस्तके वाचताना रागवणारी आई आता माझी भाचरंही तोच उद्योग करताना पाहून दोघी बहिणींची जाम खेचते...(इतिहासाची पुनरावृत्ती इथेही झालीच!!!)
असंच पहिलीत असेन-नसेन.. कुठलंसं पुस्तक माझ्या हातात.. त्यामुळे आता ही काही गोंधळ घालणार नाही म्हणून आईही निवांत.. तोच आधी मुसमुस.. आणी नंतर हुंदके सुरू झाले तेव्हा ती घाबरली.. बरं, का रडतेय हे ही मी सांगायला तयार नव्हते.. ती बिचारी जाम गोंधळात!! शेवटी कसे कोण जाणे पण तिने हातातले पुस्तक काढून घेतले तेव्हा तिला कळाले, की मी हिरकणीची गोष्ट वाचून रडत होते!!!! :| (त्यानंतर कित्येक दिवस घरी पुस्तक असूनही तिने मला शामची आई पुस्तक वाचू दिले नव्हते.
) अशीच आणखी एकदा बालपणीच्या रडण्याची आठवण आहे, ती श्रावणबाळाचे कथा ऐकली तेव्हाची!!! यावर आईने एक गाणे ऐकवले होते....
शर आला तो धावूनी आला काळ,
विव्हळला श्रावण बाळ..
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा
मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले!!!
यापुढच्या ओळी आता आठवत नाहीत.. 
लहानांनाच काय, मोठ्यांनाही गोष्टी वाचयला आवडतात..आई सांगते मी चालायला, बोलायला नि वाचायलाही अंमळ जास्तच लवकर शिकले होते.. मी तेव्हा एक वाचली होती, की काहीतरी होते, नि वार्याच्या अंगाला खाज सुटते.. मग तो वारा वेळूच्या बनात जातो, आणी अंगाची खाज शमवतो. त्या गोष्टीच्या शेवटी असा धूसर दिसणारा वारा, वेळूचं बन असलेलं चित्र होतं.. नि भरीस भर म्हणजे त्या धूसर आकाराला चेहरा ही होता.. मग मी आईकडे तसा दिसणारा वारा दाखव असा हट्ट धरला होता..!!!!
आधी रूसणं.. फुगणं.. मग आईचा थोडाफार रॅंडमायझेशन अल्गोरिदम प्रयोग.... सगळं सगळं झालं.. तेव्हा आईच्या मदतीला एक कविता धावून आली...
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला
आमच्या घराला अंगण होतं.. पण परसदार नव्हतं.. घरी फुलांचं झाडही नव्हतं.. मग बिचारा वारा येणार कसा??? मग माझी आई वारा कसा काय मला दाखवू शकणार होती??? माझं तेव्हढ्यापुरतं समाधान झालं.. पण त्यानंतर जेव्हा आम्ही आजोळी गेलो, तेव्हा कुणालाही न भेटता स्वारी सरळ परसात!!! तिथे जास्वंदीचं आणी विलायती चिंचांचं झाड होतं... तिथं जाऊन मी बराच वेळ वारा कधी तिथे पिंगा घालायला येतो याची वाट बघत बसले होते.. 
आज इथेच थांबतेय.. अजूनही काही गाणी डोक्यात आहेत.. त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी!!! तुमच्याकडूनही येऊ देत अशी आठवणीतली गाणी!!!!!!
सुंदर.... लहानपणापासून जेवढं
सुंदर....
लहानपणापासून जेवढं आठवतय मी आईपेक्षा आज्यासोबतच (आईचा बा) जास्त हुंदडलो.....झोपायचो पण आज्याच्याच पलंगावर.....लहानपणीच्या आठवणी आज्याच्याच जास्त आहेत..
वाह ! काय सुरेख लिहले
वाह !
काय सुरेख लिहले आहेस....
तुझ्या स्मरणशक्तीला ही दाद द्यावी असे वाटत आहे येथे !
ह्या कविता कधी कानावर आल्याच नाहीत...
एका पेक्षा एक सुरेख आहेत.. आवडल्या...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मके... खरंच सुंदर लिहिलं
मके... खरंच सुंदर लिहिलं आहेस. नक्की लिहिन माझ्या आठवणितल्या गाण्याबद्दल....
हे आठवलं ! श्रवाण मासि हर्ष
हे आठवलं !
श्रवाण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
-बालकवी
सुरेख
पहील्या दोन कविता ऐकल्या नव्हत्या.
छान लिहले आहे.
>मी तशी जाम रडूबाई होते..
"होते"???
सुरेख लिहिले आहे.
सुरेख लिहिले आहे.
मके, आता झरझर वाचलं म्हणून ही
मके, आता झरझर वाचलं म्हणून ही पोच! पण खरा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचून देते.
शर आला तो धावूनी आला काळ.....
श्रावण बाळाची कविता आजुनहि आमच्याकडे हिट आहे....
छान
कविता आणी आठवणी दोन्ही सुरेख.
माझ्याकडे बालभारती आणी कुमारभारती मधल्या काही कविता आहेत. पिडीएफ फाइल आहे. कशी शेअर करू??
मेलवू शकता... किंवा इस्निपवर
मेलवू शकता... किंवा इस्निपवर चढवून लिंकवा... किंवा गूगल डॉक्स वगैरे... किंवा गूगल बुक्स वगैरे... किंवा.... एवढे ऑप्शन्स बास होतील बहुतेक
हे घ्या ...
मराठी कविता दुवा चढवल्या आहेत ....
मस्त
मस्त
सुरेख...
मलाही लहानपणी आईच्या कविता गाणी ऐकणे खूप आवडायचे. तासनतास आईच्या मांडीवर डोकं ठेवुन ऐकत बसायचो. ते दिवस आठवले.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
मस्त लेखन...
छान लिहलय. मस्त.
पुढची
पुढची गाणी कधी?
पुढची गाणी कधी?
छान!!!
सर्व प्रथम परत लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन
आणि निवडलेला विषयही आवडला...
आईच्या आवडीचे एक गाणे
हरवले ते गवसले का
गवसले ते हरवले का ॥ ध्रु ॥
मीलनाचा परिमल तोचि,
फूल तेची त्या स्वरुपी
पापण्यांच्या उघडझापी
हास्य उमले वेगळे का ॥ १ ॥
पावसाळी ग्रीष्म सरिता
सागराला फिरुनी मिळता
जलाशयाची सॄष्टी आता
मॄगजळे हि व्यापली का ॥ २ ॥
दूर असता जवळ आले
जवळ असता दूर गेले
जो न माझे दु:ख हसले
तोचि सुखही दुखावले का ॥ ३ ॥
-निखिल
सुरेख लिहले आहेस ! घाल घाल
सुरेख लिहले आहेस !
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला
सुरेखच आहे कविता कोणाची आहे ही ?
इथे
इथे दिल्याप्रमाणे दुवा
गीतकार:
कृ. बा. निकुंभ
गायक/गायिका:
सुमन कल्याणपुर
संगीतकार:
कमलाकर भागवत
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
मस्त
सुरेख लेख. असं आठवणारं गाणं म्हणजे 'शेपटीवाल्या प्राण्यांची...'
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अजुन एक गाणं
अजुन एक गाणं, जे गेल्या खूप वर्षात कानावर आलेलं नाही
"तुझी नी माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात"
असचं
तेव्हा आम्ही तासगावला होतो ... दर मंगळवारी लाइट जायची ...
मग काय ...संध्याकाळी गल्लीत नुसता दंगा ... कधी कुणाच्या घरी तर कधी नळाच्या कट्ट्यावर ...
तर अशाच एका मंगळवारच्या संध्याकाळी भेंड्या खेळत होतो ... लाल्या वर "व" आलं ... त्याला गाणं आठवलं ...मौसमी आणि विनोद मेहराचं.. "वो क्या है ... मंदिर है , उस मंदिर मे इक मूरत है .."
लगेच लाल्यानं गाण्याची मोड तोड करून गाण सुरू केलं .. वो क्या है ... इक मंदिर है , उस मंदिर मे इक उंदीर है ...
आम्ही हसून हसुन बेजार .. हे गाण काकूनं म्हणजे लाल्याच्या आईनं ऐकलं ... काही कळायच्या आतचं .... धपाक ... जोरदार दणका लाल्याच्या पाठीत... सगळे लगेच अंधारात पळून आपापल्या घरी ...
असाच आणि एक किस्सा घडला ... लाईट गेले होते ... नेहमीप्रमाणे नळाच्या कट्ट्यावर जमलो होतो ... उन्हाळ्याचे दिवस होते ... गप्पा रंगल्या होत्या ... विषय होता "साप" , प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता ..एक जण फार बढाया मारत होता ... माझ्या बहीणीच्या डोक्यात काय आले कुणास ठावूक
... हळूच तिने घरी जाउन "फ्रीजमधून" एक थोडी लांब काकडी आणली .... बढाइखोर अजून चालूच होता ... तिने एकदम त्याच्या अंगावर ती काकडी टाकली 
मग काय विचारता
हा हा भारी किस्सा !
हा हा भारी किस्सा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
-ऋ
मस्त लेख.
मस्त लेख.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
पुढचा भाग कधी????
पुढचा भाग कधी????
-निखिल
छान कविता
छान कविता
गो ऑन
गो ऑन
मस्त!! मला आई एक गाणं
मस्त!!
मला आई एक गाणं म्हणायची ते आठवतं..
माझ्या चिमणीचं लगीन..
वर्हाडी कोण कोण येणार.. माझ्य चिमणीचं लगीन..
आला घोडोब दौडत.. वाघोबा नाचत.. ..
आठवत नाही पूर्ण आता..
- प्राजु
दुसर्या भागापेक्षा पहीला भाग जास्त आवडला !
सुंदर लेख !!
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
आता तर परस ही नाही अन अंगण ही नाही
अशी मस्त वार्याची झुळूक तर आता नशिबानेच अनुभवायला मिळ्ते
मन मात्र अजून खंतावत ...
~ वाहीदा