एक सैर हॉस्पिटलची… २

0
0

दुवा
अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी “अनइव्हेंटफुल” (काय पण शब्द आहे हादेखील!) पार पडली आणि मी आयसीयूत परतलो. डाव्या बाजूला ९५ टक्के ब्लॉक होता, तो काढला गेला. उजव्या बाजूला ७० टक्के आहे, तो औषधोपचारांनी दूर होईल. सकाळी आठला मी आत गेलो होतो, साडेदहाला बाहेर आलो. त्यात एक छोटी इव्हेंट दडली होती, पण ती मला खूप उशीरा कळली. बिल भरलं तेव्हा! अर्थात, ते नंतर.
हा प्रसंग आहे माझ्या एको टेस्टच्या वेळेचा. डॉक्टर शैलेंद्र जोशी यांनी माझ्यावर अँजिओप्लास्टी कोणी केली याची चौकशी आपल्या सहायकांकडं केली. त्यांनी नाव घेतलं, “डॉ. जहांगीर डॉक्टर.”
“जहांगीर हा फिजिशियन आहे...” सूर अत्यंत उपहासात्मक. मला कारण काही कळलं नाही. नंतर माझ्यावर अँजिओप्लास्टी करणार्या” डॉ. देवभक्त यांचं नाव त्या सहायकानं घेतलं. माझी टेस्ट सुरू झाली. डॉक्टर जोशी त्यांच्या सहायकांशी बोलताहेत, ते माझ्या कानावर येतंय. अर्थातच, मला भूल वगैरे दिलेली नाहीये. सारांश इतकाच: उजव्या बाजूला अडथळा आहे असं देवभक्त आणि डॉक्टर यांचं म्हणणं आहे. त्यावर जोशांचा विश्वास नाही. त्यांनी ही टेस्ट रेकॉर्ड केली आहे. माझ्यासमोर दोन्ही रिपोर्ट आहेत. अँजिओप्लास्टीच्या रिपोर्टमध्ये “Ramus: Ostial segment shows 70% stenosis” असा उल्लेख आहे. इकोच्या रिपोर्टमध्ये “Right ventricle and righjt atrium: are normal” असा उल्लेख आहे. गंमत आहे! इकोच्याच रिपोर्टमध्ये “Left Atrium: is normal in size and free of clots” असा उल्लेख आहे. उजव्या बाजूला मात्र क्लॉट्स वगैरे आहेत की नाही याचा स्पेसिफिक उल्लेख नाही. या चाचणीचा हेतू काय असतो? एक रुग्ण म्हणून आपल्याला हे कधीच नेमकेपणानं कळत नसतं. आत्ताही मला कळलेलं नाहीये. या नोंदी समजून घ्याव्या लागतील एकदा, मी मनाशी ठरवतो.
हा एकूण विचार करत होतो तेव्हा कानावर पडलेल्या या दुसर्या.च चर्चेचा हा सारांश: हा मुलगा असावा पंधरा वर्षांचा. थोड्याच काळापूर्वी जोशांच्या या सहायकानं दुसर्याच एका विभागात त्याच्या तपासणीत भाग घेतला आहे. नोंदी केल्या आहेत. त्यानुसार त्या मुलाची ती संबंधित शारीर यंत्रणा निर्दोष आहे असा निष्कर्ष या हॉस्पिटलच्या दुसर्या. एका डॉक्टरांनी काढला आहे. या निष्कर्षाशी डॉ. जोशी सहमत नाहीत. अधिक चर्चेतून असं लक्षात येतं की, या मुलाची याआधीची तपासणी डॉ. जोशी यांनीच याच हॉस्पिटलच्या दुसर्याच एका शाखेत केली असून त्यांचा निष्कर्ष स्पष्टपणे नोंदवलेला आहे. तो निष्कर्ष म्हणजे त्या मुलाच्या त्या शारीर यंत्रणेत काही दोष आहे. पण डॉ. जोशी यांच्या त्या अहवालाची नोंद आत्ता मात्र ‘बाहेरचा अहवाल’ अशी करून त्या मुलाला निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
“द पेशंट इज अनफॉर्च्युनेट.” डॉ. जोशी म्हणतात आणि कामाला लागतात.
काही क्षणांतच तेच अस्वस्थ होतात. सहायकाला सांगतात, “तो पेशंट आत्ता कुठं आहे? गेला का खरंच? गेला नसेल तर पहा ना जरा. त्याला आणा इथं. असं होणं शक्य नाही...”
धावपळ सुरू होते, दरम्यान माझी तपासणी संपते आणि मी बाहेर येतो.
हॉस्पिटलातील डॉक्टरांच्या गप्पातून स्कँडल्स बाहेर पडतात हे थ्रिलरमध्ये वाचलेलं होतं, ते वास्तववादी असावं का?
***
आयसीयूतून मला जनरल वॉर्डात जायचं होतं. पण तिथं तर जागाच नव्हती. जागा रिकामी होण्याची वाट पहात मी पुन्हा आयसीयूतच पडून. डॉक्टर तपासून गेले तेव्हाच म्हणाले होते, “सारं ठीक झालं आहे, एको करू आणि मग डिस्चार्ज देऊ. पण उद्या रविवार असल्यानं सोमवारी.” मी खुष होतो. पण हा डिस्चार्ज आयसीयूतून थेट कसा? वॉर्डात तर जावं लागेलच. तिथं तर जागा नाही. तरीही, आधी ठरवल्याप्रमाणं मी शांत राहिलो.
हॉस्पिटलांची भरभराट अशी की, मला जनरल वॉर्डात जागा मिळण्यासाठी रविवारची रात्र उजाडली. इथून हॉस्पिटलांविषयीच्या माझ्या जाणीवांत जी भर पडत गेली, ती अनन्य अशी आहे. सुरवात जनरल वॉर्डात प्रवेश केला तेव्हाच.
मला कपडे बदलायचे होते, आयसीयूवाल्यांचे त्यांना परत करायचे आणि जनरलवाल्यांचे अंगावर चढवायचे. हे म्हणजे भारत-पाकिस्तान होतं. पण मी गप्प होतो. शर्ट घातला, पायजमा चढवली आणि पाहतो तर नाडीचा एक तुकडा फक्त होता. बांधायची कशी पायजमा कमरेला?
“जरा दुसरी पायजमा द्या. नाडी नाहीये याच्यात.”
“नाडीची पायजमाच नाही.” खाणकन उत्तर आलं तिथल्या मावशीकडून. मी क्षणभर चमकलोच. मला वाटलं तिथली डॉक्टर हस्तक्षेप करेल. पण तसं काही घडलं नाही आणि इथं आल्यापासून माझा तोल दुसऱ्यांदा सुटला. काही न बोलता कमरेपाशी घडी करून मी ती पायजमा चढवली आणि आयसीयूवाल्यांचे कपडे त्यांना देऊन टाकले. माझ्या पायजमातील नाडीचा सहा इंची तुकडा काढला, तो मावशीकडं दिला आणि म्हणालो, “हा माझ्याकडून तुमच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांना (इथं मी त्यांचं नाव खणखणीतपणे घेतलं) भेट पाठवा.”
माझा आवाज चढला होता, वॉर्ड पाहू लागला होता. आता डॉक्टरही बोलू लागली, “थांबा, दुसरी व्यवस्था करू.” मग मावशीनं नाडी ओवून दुसरी पायजमा दिली.
मनात आलं होतं त्यांना सांगावं, नाडीत अब्रू असते आणि आरोग्यही दडलेलं असतं.
आजूबाजूला पाहिलं. जिथं डॉक्टरांच्या टेबलसह, सुविधांच्या ट्रॉलीसह एकूण सहाच खाटा बसतील तिथं सहाच खाटा होत्या, पण त्या खाटांवरच्या पेशंटच्या एका नातेवाईकानं तिथंच रहावं हीही अपेक्षा होती. एकूण तीनशे चौरस फुटांचा हॉल तो. त्यात या सहा खाटा, तीन कपाटं, दोन ट्रॉली, दोघं जण बसू शकतील असं काऊंटरवजा टेबल. अजून एखादी खाट तिथं मांडता येईल का याचा मी विचार करू लागलो. जमलं असतं तर, त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्या अभिप्राय फॉर्मवर लिहिलं असतं.
दुसर्याल दिवशी सकाळी इको झाल्यानंतर डिसचार्ज मिळणार हे नक्की झालं. बिलं होईपर्यंत वाट पहायची होती. चार तास बिलासाठी लागतात असं सांगितलं गेलं. आम्ही ते ऑलरेडी स्वीकारलेलंच होतं. ते चार तास म्हणजे प्रत्यक्षात दहा तास होते हे रात्री आठ वाजता तिथून बाहेर पडल्यावर समजलं. मधल्या काळात आणखी काही इव्हेंट्स व्हायच्या होत्या.
दुपारची वेळ. जेवण घ्यायचं होतं. शुगर तपासली गेली, तेव्हा माझी फाईल वर अकाऊंट्समध्ये होती. त्यामुळं शुगर – इन्शुलीन याचा चार्टही त्या फाईलमध्येच. वाट पाहून मला तसंच जेवण घेण्याचा सल्ला दिला गेला. “नाहीतरी, उद्यापासून रेग्युलर इन्शुलीन आहेच,” डॉक्टरांची टिप्पणी. त्यानंतर तासाभरानं दुसरा धक्का. “काका तुम्ही दुपारी रेस्टिल घेता का हो?” सिस्टर मलाच गोळ्यांविषयी विचारतेय.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बिल आलं. त्यावेळी शिल्लक गोळ्या, पुढे घ्यायच्या गोळ्या वगैरे गोष्टी सुरू झाल्या. मला आणखी काही धक्के होते त्यावेळी. एक गोळी अशी होती की ज्या मी खरेदी केल्या होत्या सोळा गोळ्या. तेरा शिल्लक होत्या आणि त्या चालू आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं. मी हिशेब लावू लागलो आणि लक्षात आलं की, या गोळ्या दिल्याच गेल्या नाहीयेत आपल्याला पहिला दिवस सोडला तर. मग एकच गोंधळ उडाला. आसीयूत संपर्क, तिथून इकडं सिस्टरच्या नावाची चौकशी, तिचा नाव सांगण्यास नकार आणि उलटा आसीयूत प्रश्न, तुम्ही कोण बोलताय वगैरे... मी पहात होतो गंमत. पाचेक मिनिटं झाल्यानंतर मी ड्यूटी डॉक्टरांना म्हणालो, “तुमच्या लक्षात आलं का काय झालंय ते? तुम्ही माझ्यावर आवश्यक उपचार केलेले नाहीत असा या परिस्थितीचा अर्थ निघतो.”
थोड्या वेळानं आसीयूचा माणूस आला. काय झालं माहिती नाही. पण त्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या ठेवून बाकी परत केल्या गेल्या. एकेक गोळी ऐंशी रुपयांवर किंमतीची होती. प्रश्न गोळ्या परत करण्याचा नव्हताच मुळी. माझा मूळ प्रश्न कायम राहिला. माझ्यावरच्या उपचारांचं काय?
गोळ्यांच्या स्ट्रिपमधली एक गोळी काढली की ती स्ट्रिप सामान्यपणे पेशंटला घ्यावी लागते; रिटर्न होतेच असं नाही अशी ही व्यवस्था असेल तर एक स्ट्रिप संपण्याच्या आधीच दुसरी स्ट्रिप सिस्टर का फोडत असतील असा प्रश्न दुसर्यार एक गोळीवरून निर्माण झाला. आणखी एक अनुत्तरित प्रश्न!
हॉस्पिटलातून बाहेर पडल्यानंतरही इन्शुलीन सुरूच राहणार होतं. माझ्याकडं तिथं घेतलेल्या इन्शुलीनची बाटली होती. मी तेच इन्शुलीन घ्यावं असं सिस्टर मला सांगत होती. ते अॅलक्ट्रापिड होतं. मला बाकी काही नाही, पण इतकं ठाऊक होतं की हे इन्शुलीन घरात घ्यायला सांगत नाहीत. मी तिला विचारलं, “नक्की? हेच घ्यायचं आहे?” आता मात्र तिला शंका आली. बिचारी गेली फोनवर. कन्फर्म करून आली, “मी दुसरं लिहून देतेय!”
मी बिल पाहू लागलो. अँजिओप्लास्टीच्या लॅबसाठी एक तास एक्स्ट्रॉ चार्ज लावण्यात आला होता. आठ वाजता माझी अँजिओप्लास्टी होती. सव्वानऊपर्यंत मी तिथं नुसताच पडून होतो. हा एक तास माझ्या बिलात असा चढला होता.
आठ वाजता सारे सोपस्कार कसेबसे झाले. आम्ही बाहेर पडलो एकदाचे.
येताना त्या अभिप्रायाच्या फॉर्मवर रेटिंग केलं आणि खाली लिहिलं, “सध्या देत असू ती सेवा असेल तर ‘सुधारूया’ हा एकच मंत्र कामी येईल. पायजमात नाडी नसणं याचा अर्थ सांगावा लागू नये.”
मी विचार करतोय. सरकारी हॉस्पिटलात गेलो असतो तर काय झालं असतं? अनुभव असेच राहिले असते. पण एक झालं असतं, बिलही त्याच अनुभवांना साजेसं आलं असतं.
अनुभव एकाच ठिकाणचा नाही. पुण्यातील चारेक मोठ्या, नावाजलेल्या हॉस्पिटलात असे अनुभव आले आहेत. यांच्या नाड्या आवळल्या पाहिजेत असं नेहमी वाटतं. पण नाड्याच नसतात तेव्हा काय करायचं?

{वेलकम बॅक}

1

वेलकम बॅक.
काय पथ्यपाणी?

{दिस ईज सो रिडीक्युलस !! आज}

2

दिस ईज सो रिडीक्युलस !! आज घरी जाऊन हा लेख दाखवणार ?

{ह्म्म..}

3

विचार करायला लावणारी हॉस्पिटलची सैर...
स्वाती

{माझा अनुभव}

4

माझाही अनुभव काही वेगळा नाही. स्थळ चिंचवड मधील एक मोठं हॉस्पिटल. तिथे तर ड्रेसिंग साठी कॉटन बँडेज पण संपलेलं होतं. स्टोअर मधे पण नसल्याचा शोध आवाज चढल्यानंतरच लागला.

{काळजी घ्या हो.. आधी बरे व्हा}

5

काळजी घ्या हो..
आधी बरे व्हा मग नाड्या आवळा....


-निखिल

{हम्म....}

6

हम्म....

{अगग्ग्गा ! काय हे....}

7

अगग्ग्गा !

काय हे.... Sad


Hope is a good thing...

{हुश्श्य!}

8

सुटका झाली ना? हातीपायी धड आहात ना?

लवकर खडखडीत बरे व्हा. अन नवीन नोंदी लिहायचा विचार करा बरं. फारतर सध्या जरा विनोदी चालतील.

हॉस्पिटलमधे जायचं म्हणजे मेडीकल सायन्सच्या बाजारात जाण्यासारखंच असतं. तिथ आपल्याला स्वतःला मेडिकल सायन्स समजलं अन जरा नडिंग करायची तयारी असली तरच ठीक असं एका डॉक्टर मित्रानं सांगीतलं होतं त्याची आठवण झाली हे दोन्ही भाग वाचुन.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{आइ ग!}

9

कधीची गोष्ट आहे मोडक? बरे आहात ना आता?

वेल हे असेच असते. एक, दोन डॉक्टर चांगले असतात पण प्रशासन सगळीकडचे इथुन तिथुन सारखेच!

रुग्णांचे प्रशिक्षण व त्याच्या हक्कांची जाणीव हे प्रबोधन. अश्याच अनुभवांची माहीती, एखादी पुस्तीका आहे का? नसल्यास तुम्हीच लिहा मोडक. पण काही म्हणा अश्या वेळे विकितज्ञ असल्याचा थोडा फार फायदा होतो. हास्य

{लवकर बरे व्हा ...}

10

लवकर बरे व्हा ...

{माझी या मोडक नावाच्या माणसाला}

11

माझी या मोडक नावाच्या माणसाला अशी जाहिर विनंती आहे की आता सांगण्यात आलेले पथ्यपाणी चूपचाप निमूटपणे पाळा आणि स्वस्थ पडा. आणि असं काही झालं (आणि स्वतःचा मोबाईल बंद असला तरी) कोणा एकाला साधा एसेमेस करावा.

{एक मोठ्ठी सहमती...}

12

एक मोठ्ठी सहमती...

{....}

13

>>> डॉक्टरांना म्हणालो, “तुमच्या लक्षात आलं का काय झालंय ते? तुम्ही माझ्यावर आवश्यक उपचार केलेले नाहीत असा या परिस्थितीचा अर्थ निघतो.”

--- काही प्रतिक्रिया देण्यापलीकडे हतबुद्ध झालो आहे. बिपिनदांशी सहमत आहे. काळजी घ्या.

{मोडक मोडक...लव्कर बरे}

14

मोडक मोडक...लव्कर बरे व्हा.... आणी हो कल्जी घेने हास्य

{पुन्हा एकदा ह्म्म्म...}

15

नाड्या नसतात तिथे ह्यांना इलॅस्टिक लावायला हवं!! नो जोक्स!!! खरोखर. आपण सुशिक्षित माणसं डॉ. ला घाबरुन असतो, थोडे दबलेले असतो त्याचा गैरफायदा बरेच डॉ. घेतात. आपण बिनधास्त त्यांना प्रश्न विचारायला हवेत, उत्तरं मागायला हवीत, आवाज चढला/चढवावा लागला तरीही!

मोडकसाहेब, काळजी घ्या. इतका त्रास करुन घेऊ नका. इथे येऊन तुम्हाला सांगावसं वाटलं ह्याचा मला आनंद आहे. आता म्हणा बघू डावीकडे हात ठेऊन, छातीवर म्हणतोय मी, "आल इज वेल!" हास्य

मी अगदी ताजा ताजा, हो सहा महिन्यांपूर्वी ताजाच म्हणायला हवा, माझ्या आईचं ऑपरेशन होतं तेव्हा ह्यातून गेलोय! त्या डॉ. खाजगी प्रॅक्टिस करतात तिथे ३ आठवड्यापूर्वीच अल्ट्रासाऊंड केलेलं , त्याच डॉ. ह्या हॉस्पिटलमध्ये जिथे अ‍ॅटॅचमेंट मध्ये आहेत तिथे पुन्हा एकदा तेच अल्ट्रासाऊंड करायला सांगतात!! मी विचारलं रिपोर्ट नॉर्मल आहे, तुमच्या समोर आहे, पुन्हा का? उत्तर नाही. मी अडून बसलो करायचं नाही म्हणालो.. वादावादी ..सीनिअर डॉकटर आले ..अल्ट्रासाऊंड रद्द झालं!
तीच कथा पुढे एक आठवडा चालू राहिली. प्रत्येक औषधाला, सलाईनला, तपासणीला माझे प्रश्न संपेचनात. डॉक्टर चिडले मी म्हणालो शंका विचारणं हे माझं काम आहे, अमूक एक गोष्ट तुम्ही का करता आहात हे मला जितपत समजायला हवं तितपत तुम्ही सांगितलंच पाहिजे. मी त्यातल्या तांत्रिक आणि वैद्यकीय खाचाखोचा अपेक्षितच नाहीये पण अमूक तपासणीतून काय पाहिलं जाणार आहे हे कळायलाच हवं! औषधांचंही तेच, मी एकटाच घरी आणि हॉस्पिटलमध्ये धावपळ करतोय अमूक एक कॅश भरल्याशिवाय औषधे नाही देणार म्हणे! मी म्हटले अहो माझी आई इथे अ‍ॅडमिट आहे ती काय कुठे पळून जाणार आहे का? मी घरातून आलो की पैसे देतो अर्ध्या तासात. अडून बसले. माझं डोकंच सणकलं! मुख्य डॉ. ना फोन लावला म्हणालो तुमच्या एक नंबर दवाखान्यात खाली मेडिकल स्टोरला ही असली अडवणूक चालते हे तुम्हाला चालतं का? पुढची आठ दिवस औषधं खोलीवर निमूट पोचती झाली. सगळं बिल शेवटच्या दिवशी दिलं!!

आजारी पडणं म्हणजे गुन्हा झालाय आजकाल!!

{आजारी पडणं म्हणजे गुन्हा}

16

आजारी पडणं म्हणजे गुन्हा झालाय आजकाल!

खरं आहे.
खुप महाग पडते आजारी पडणे.


करतो. करेन. व करेगें

{वाईट अनुभव}

17

फारच संतापजनक अनुभव.
तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

{फारच संतापजनक अनुभव अत्यंत}

18
फारच संतापजनक अनुभव

अत्यंत संतापजनक! तुम्हाला माहिती होती तरी सुद्धा तुम्हाला अशी वागणुक. ज्याला काहीच कळत नसेल त्यांचे जीव घेत असतील हे लोक निष्काळजीपणे!

काळजी घ्या मोडक, लवकर बरे व्हा!


-Nile

{व्यवस्थित संताप}

19

श्री मोडक, प्रकृतीची काळजी घ्या. सैर नेहमीप्रमाणेच नैसर्गिक. अल्बेर काम्युच्या 'द प्लेग'ची न जाणो का आठवण झाली.

{सामाजिक नोंदी}

20

श्रावण!
मी ही या अनुभवातुन १९९२-९३ साली गेलो होतो त्याची आठवण आली.(१९९२ साल लग्न, सिंहगडावर अपघात व आजार एकाच वर्षी ) अ‍ॅन्जिओग्राफी झाली होती. trans arterior miocardial infarction. हॉस्पीटल ची आम्हाला तशी भीतीच. डॉ.अनिल काटदरे यांचे उपचार. फक्त दीर्घकाळ अ‍ॅन्टी कोअ‍ॅग्युलंट ट्रीटमेंटवर भागले. अजुन प्रतिबंधात्मक म्हणुन अ‍ॅस्प्रिन चालु आहे.
मेडिकल रिएम्बर्स्मेंट मिळाल नाही. सरकारी कागदी काड्या. संताप आला. कारकून ते ससुन सिव्हिल सर्जन भ्रष्टाचाराची साखळी. बिलाच्या १० टक्के ठरलेले. बोगस केसेस मधे मोठे अर्थकारण दडले आहे. नामंजुर झाले.एक अवली मित्राने रक्कम दिली. (त्याच्याकडे मी उसने दिले होते काही अर्थात त्यातुनच) त्याच कागदावर नामंजुर चे प्रकरण लगेच मंजुर . नंतर आमच्या कार्यालयातील कारकुनी फटके. १०००० च्या पुढे पोलिस महासंचालकांची मंजुरी आवश्यक. नंतर मुळ डिस्चार्ज सर्टिफिकेट गायब करणे. वैतागुन शेवटी महासंचालकांना पत्र लिहिले की या प्रकरणात इतका मनस्ताप झाला आहे की मला आता वैद्यकीय बिलाचा परतावा नको आहे. तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे आले. पोलिस महासंचालक कार्यालयात टपाल ड्युटीसाठी काम करणारा एका कॉन्स्टेबल मित्र म्हणाल हे तर फक्त एका मॅक्डोवेल चपटीचे प्रकरण. असहायता व संताप यांचे मिश्रण
२३ वर्षाच्या सरकारी सेवेत हक्काची खोटी बिले, हक्काची ट्रान्स्पफर टी ए ची व तत्सम खरी बिले तसेच एकही मेडीकल बिल स्वतः वा कुटुंबासाठी कधी घेतले नाही
आठवण एकीकडे त्रासदायक दुसरीकडे मनोरंजक
श्रावण विश्रांती घे! पुढच्या इतर सामाजिक नोंदींच्या भरारी साठी थोडी विश्रांती हवीच.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{काय बोलावे.}

21

Sad

काय बोलावे.


Hope is a good thing...

{प्रकाशकाका}

22

सुरवातीला प्रकाशकाकांचे मुक्त फिरणे, विविध विषयातील कार्यक्रमात सहभागी होणे याबद्दल असुया वाटायची. पण त्यांचे असे काही अनुभव, आयुष्य पाहीले की त्यांना आता सतत मनसोक्त आनंद उपभोगायला निरोगी जीवन मिळावे असेच वाटते.

{प्रकृतीची काळजी घ्या}

23

गेल्या भारतभेटीत असेच काही अनुभव घेतलेत हॉस्पिटलचे.. १ वर्षाच्या बाळाला सलाईन अस लावल की थोड्यावेळाने रक्त बाहेर येऊ लागले.. मी घाबरुन ते दाखवल्यावर वर तुमच लक्ष कस नाही गेल म्हणून मलाच ओरडल्या नर्सबाई.. अजून विचार करुन अंगावर काटा येतो माझ्या..

{लवकर बरे व्हा...}

24

काळजी घ्या. बाकी अनुभव विचार करण्यासरखे आहेत.
बाकी इतक्या कठिण प्रसंगी तुमच्या शांत राहण्याच्या प्रवृत्तीला मानलच पाहीजे.

{अहो, हे सगळं ठिक आहे. (म्हणजे}

25

अहो, हे सगळं ठिक आहे. (म्हणजे तसं ते ठिक नाहीये. वाईटच वाटलं सगळं वाचून) पण तुमची तब्येत कशी आहे? काळजी घेताय का? त्याविषयी काही लिहाना.

{नाशिकलाही एका मोठ्या}

26

नाशिकलाही एका मोठ्या दवाखान्यात असाच अनुभव माझ्या सासर्‍यांना बरे नसताना आम्हाला अनुभवायला मिळाला.बाकी हा एक प्रातिनिधीकच म्हणावा लागेल अनुभव Sad सगळीकडे असेच आहे.बाकी लवकर बरे व्हा.हास्य

{लवकर बरे व्हा.}

27

लवकर बरे व्हा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{माझा पाथदुखी अनुभव भयंकर आहे}

28

माझा पाथदुखी अनुभव भयंकर आहे हो......... वेदना परवडल्या पण उपचार त्याहून भयंकर केलेत


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते