आमची नवीन एकांकिका .... डेटाबेस ( भाग १)

0
0

आमची नवीन एकांकिका इथे देत आहोत, नाव आहे डेटाबेस... या एकांकिकेस रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असून या एकांकिकेतील संवादांमुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशी आशा आहे.... wink

(स्थळ : संभाजीपार्क , सकाळचे ११ वाजलेत. एका झाडाखाली एक मुलगा आडवा पसरून ’फ़ॅशन & स्टाईल’ प्रकारातले एक मासिक वाचतोय...वय वर्षे २२..हा डेटाबेस.. हा स्वत:ला सर्वज्ञ मानतो. सर्व मुलींविषयी याला उत्तम माहिती असते,...गावात, सोसायटीत, कॉलेजात वगैरे चाललेले प्रत्येक प्रकरण याला डीटेलवार ठाऊक असतं.....तो एकदम झान्टामाटिक दिसतो, वेगळा गॉगल, केस स्पाईक आणि कलर केलेले... शायनिंग मारायची अत्यंत आवड..त्याच्याशेजारी मान्या उभा आहे..त्याचा मित्र. तोही वय २२..हा रिक्षा चालवतो..तो डेटाबेसकडून ज्ञान गोळा करतोय.)

मान्या : ( दूरवर पाहत ) अरे आता दुपार झाली..ही काय व्यायामाची वेळ आहे होय?
डेटाबेस : ( नजर पुस्तकातच) कोण तो कार्तिक ना?
मान्या : बघ ना.. ते येडं कसं हातपाय हलवतंय.. मध्येच जॉगिंग करतंय...
डेटाबेस : अरे तो वाट बघतोय.. आता ११ वाजताहेत..पाच मिनिटात सोनिया पोचणार इथं..मग जातील ते झाडामागं..
मान्या : सोनिया...? अरे पण दोन महिन्यांपूर्वी तर त्याची कोणीतरी दुसरी ...
डेटाबेस : दोन महिने !!!!.. अरे ते फ़ार जुनं झालं मान्या.. जमाना लै फ़ाष्ट आहे..तुमची रिक्षा पुरी नाही पडायची..
मान्या : हां... राहू द्या राहूद्या...( दुसरीकडे लक्ष जातं..).. ए sss... अरे त्या कट्ट्यामागं कोण आहे ?
डेटाबेस : ( नजर पुस्तकातच).. जाड्या आहे का टीशर्टवाला ?
मान्या : नाही...
डेटाबेस : बरं..मग तो नितिन असणार.. बिल्डर आहे का?
मान्या : हो..
डेटाबेस : केस कशे आहेत ?
मान्या : काय?
डेटाबेस : मशीन मारलंय का? गजनी कट?
मान्या : हां..
डेटाबेस : अन पोरीचा बॊबकट ना ?
मान्या : हो..
डेटाबेस : मग नितिन आणि रियाच ते...
मान्या : काय नवीन आलेत काय?
डेटाबेस : ( हसतो)..नवीन काय ? झाले की दोन आठवडे... आधी तिकडे कॉलेजमध्ये बसायचे..आता कालपासून इकडे.. रिसेन्ट ऎडिशन..
मान्या : ही रिया काय ? लै ऐकलं होतं..रिया रिया... येवढी खास नाहीये राव...
डेटाबेस : रिया बॆनर्जी फ़्रॊम त्रिवेन्द्रम.. वय वर्षे १९.. रंग गोरा ..मध्यम बान्धा.. केस कुरळे , बॊबकट...
मान्या : एsss... बॆनर्जी म्हन्जे बंगाली ना राव..त्रिवेन्द्र्म काय? काहीही..
डेटाबेस : काय झालं... रियाचे आजोबा होते मर्चंट नेव्हीत.. आजोबा म्हन्जे आईचे वडील..तर त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या.तर ते रिटायर झाल्यावर त्रिवेन्द्रमला सेटल झाले. रियाचे बाबा एकदा ऒफ़िसच्या टूरसाठी त्रिवेन्द्रमला आले होते..तिथे त्यांची ओळख झाली. झालं ,प्रेम वगैरे बसलं पण तिच्या आईचे वडील म्हणाले तिच्या बाबांना की घरजावई होता का ?
मान्या : हो ..हो .. कळलं...
डेटाबेस : नाहीनाही... आता ऐक ना...पण त्यांना जरा वाईट वाटलं ..पण त्यांना वाटलं की काय हरकत आहे? अशा प्रकारे हा मुम्बईचा बंगाली त्रिवेन्द्रमला सेटल झाला.आणि म्हणून ही रिया त्रिवेन्द्रमची.. कळलं? डेटाबेसला चॆलेन्ज नाही करायचं...
मान्या : आणि तो नितिन ?
डेटाबेस : तो चंदीगडचा...
मान्या : पन्जाबी?
डेटाबेस : करेक्ट बोल्लास..जालन्धर...पण त्याचा फ़ॆमिली बिझनेस काय माहिती आहे तुला ?
मान्या : खेळण्याचं दुकान...
डेटाबेस : चूक..
मान्या : मग?
डेटाबेस : कुस्ती..याचे सगळे फ़्यामिलीवाले कुस्तीगीर..प्रोफ़ेशनल.. पण याचे वडील पन्जाब पॊवरमध्ये.
मान्या : ते कसं काय ?
डेटाबेस : स्पोर्ट्स कोटा..या नितीनलाच कशाला शिकायला पाठवलंय इकडे कोणास ठाउक ? काय झालं असणार.. त्याच्या आत्याचे मिष्टर .. ते क्यानडाला असतात.. टॅक्सी चालवतात...ते म्हणले असणार याला शिकवा म्हणून.. पण अजून नक्की कल्पना नाही..
मान्या : का रे?
डेटाबेस : अरे ती फ़ाईल अपडेट व्हायचीय रे डेटाबेसमधली... चम्या सांगणार आहे..
मान्या : हं... ( घुटमळत ) काय डेब्या आज दुकानावर नाही जायचं का ?
डेटाबेस : नाय .. आज आराम करावा म्हणतो..
मान्या : बरंय राव तुझं..
डेटाबेस : बरं कसलं.. बापू सारखे मागे लागलेत .. दुकानावर बस.. दुकानावर बस.. आपल्याला नाय मजा येत त्यात...
मान्या : ( त्याच्याकडे बघत हसायला लागतो)...
डेटाबेस : का रे? हसतो काय ?
मान्या : चिडू नको... पण मनात आलं, तुझ्या बापाची दोन दोन कटिंग सलून आहेत, तरी तुझी दाढी का रे इतकी वाढलीय..? का मालकाच्या पोराची करत नाहीत तुमच्या दुकानात?
डेटाबेस : ( जाम उखडतो).. हेच रे..ही ष्टाईल आहे ष्टाईल.. कळत नाही ना तर बोलू नको...
मान्या : एवढा काय चिडतो राव..मजा केली...
डेटाबेस : अरे आपलं तर डोकंच हालतं रे एकदम.. लोकांना व्हिजन नाय रे... ष्टाईल म्हणजे काय तेही कळत नाही.. बापूंनासुद्धा ष्टाईल कळत नाही..ते तेवढंच म्हणतात, दुकानावर बस.. कमावून दाखव.आपली अ‍ॅम्बिशन वेगळी आहे रे त्यांना नाही कळत..
मान्या : सुख दुखतंय रे लेका तुझं...तुझ्या जागी मी असतो ना, तर मस्त गल्ल्यावर बसलो आस्तो... कस्लं पॊश एसी सलून आहे, चार चेअर आहेत , इन्टिरियर भारी आहे,चांगले चार कारागीर आहेत..आणि काय पाहिजे?
डेटाबेस : हेच हेच मान्या, हे सारं बापूंचं आहे...त्यांनी कष्ट केले... गावाकडून इकडे आले... रिस्क घेऊन दुकान खोल्लं.. दुसरं दुकान पण खोल्लं.. ब्येष्ट.. पण मला काय करायचंय ?
मान्या : काय?
डेटाबेस : तुला मजरूह पास्ताकिआ माहितीए काय?
मान्या : म्हन्जे काय?
डेटाबेस : मानूस आहे..
मान्या : कोण ? पास्ता?
डेटाबेस : मजरूह पास्ताकिआ ...( मासिक दाखवतो..) हे बघ...आपल्याला मुम्बईला जायचंय..
मान्या : हे काय? अन मुम्बईला कशाला?
डेटाबेस : वाच तर खरं..
मान्या : " मजरूह पास्ताकिया हेयर ष्टायलिन्ग ऍक्याडमी"?... असली कसली ही ऍक्याडमी?
डेटाबेस : याच्या हाताखाली ट्रेनिन्ग घ्यायचं...
मान्या : कशाचं?
डेटाबेस : हेयर ष्टायलिंगचं...
मान्या : म्हन्जे केस कापायचं?
डेटाबेस : हं म्हन्जे तसंच..
मान्या : अरं मग बापूंकडून शीक की...
डेटाबेस : ( वैतागून त्याला हाणत) अरे मान्या, हा मजरूह पास्ताकिया कोन आहे माहित्येय का?
मान्या : असेल एखादा सलूनवाला..फ़ार तर चार चार असतील मुम्बईत..
डेटाबेस : नाय रे मान्या नाय.. अरे फ़ाष्टेष्ट हात आहे त्याचा आणि ऎक्युरेट्टे.. वल्ड रेक्कॊडे त्याचा...
मान्या : रेक्कॉड? कशात?
डेटाबेस : दहा मिन्टात पंधरा ष्टाईल.. अवघड अवघड...इन्डष्ट्रीत लै मान आहे त्याला...
मान्या : कस्ली इन्डष्ट्री?
डेटाबेस : फ़िल्म इंडष्ट्री
मान्या : आयला... म्हन्जे हा नटनट्यांचे केस कापतो?
डेटाबेस : मंग? हा फ़क्त नटनट्यांचेच केस कापतो... उगाच पैशे हाएत म्हणून कोनाला पन नाय हात लावत... त्याचा आधी टाईम घ्यावा लागतो.
मान्या : म्हन्जे?
डेटाबेस : अपॉइन्टमेन्ट.. दोन दोन महिने फ़ुल्ल असतात त्याच्या अपॉइन्टमेन्ट...
मान्या : (हसत) म्हन्जे ज्या दिवशी केस कापू त्याच दिवशी पुढची अपॉइन्टमेन्ट घ्यायची...
डेटाबेस : त्याचं अजून एक रेक्कॉड आहे..
मान्या : कोन्तं?
डेटाबेस : मेणबत्तीनं केस कापायचे...! तेही डोळे बान्धून...
मान्या : कोनाचे?
डेटाबेस : म्हन्जे?
मान्या : म्हन्जे कोनाचे डोळे बान्धायचे? कस्टमरचे का स्वत:चे?
डेटाबेस : अरे स्वत:चे..
मान्या : आयला, मग केस जळतील ना...
डेटाबेस : ( स्माईल करत) न्हाई जळत..
मान्या : कस्काय?
डेटाबेस : मी स्वत: पाहिलेलं.. आजतक वर दाखवलेलं...
मान्या : तेच्यायला भारी... कस्काय जमत असंल रे?
डेटाबेस : च्यॅक.. जम्तं रे ..मी पण करतो..
मान्या : काय ? तू पण केस जाळतो...?? रावनाची दाढी जळाली तशी गत व्हायची कष्टमरची...
डेटाबेस : एsss.. क्यांडल ष्टायलिंग म्हणतात त्याला...मी करतो न दुकानात प्रॆक्टिस.. आता मला डोळे बान्धून शिकायचंय... ( मान्याचा अन्दाज घेत).. येतो का मान्या दुकानावर? क्येस लै वाढलेत तुझे...
मान्या : गप रे .. माझ्यावर प्रयोग नाय पायजेत... काय शिकायचं ते तुझ्या मझरू पास्ताकडून शीक..
डेटाबेस : पास्ताकिया..
मान्या : तेच रे...
डेटाबेस : हं... तो शिकवेल रे... पन त्याची फ़ी अशी आहे ना..
मान्या : आयला तुला काय कमी आहे ? त्याला म्हन, काय दोन पाचशे घ्यायचे ते घे आन शिकव बाबा...
डेटाबेस : अरे मी फोन केलेला ... त्याच्या ऍक्याडमीत कोर्स करायची फ़ी काय आहे माहिताय का?
मान्या : काय?
डेटाबेस : तीस हज्जार ...
मान्या : ( खिखिखि करून हसतो)..
डेटाबेस : खरंच...
मान्या : आरं.. सगळ्या वर्गाची फ़ी नको सान्गू... एका मान्साची सांग..
डेटाबेस : एकाचीच फ़ी आहे इतकी..
मान्या : हे बघ, डेब्या, असा ज्योक नको करू..
डेटाबेस : शप्पथ..
मान्या : ( चिन्ताक्रान्त) ... मग कस्काय रे?... ( विराम).. बापूंना मागितले ?...
डेटाबेस : पहिल्यान्दा मागनारच नव्हतो..
मान्या : का?
डेटाबेस : काय फ़ायदा? आप्ल्याला माहित आहे ना बापू कशे आहेत ते..
मान्या : हं...
डेटाबेस : पण नन्तर काय सोय होईना कुठं... आणि नोकरी करण्यात लै वेळ जाईल...
मान्या : अन मझरू सायबाची फ़ी पन वाढंल...
डेटाबेस : म्हणून गेलो ना मग बापूंना मागायला.. तीन महिने झाले..तेव्हा बापूंनी गावाकडली थोडी जमीन विकली होती..सात लाख आले... त्ये सगळे डेक्कनच्या नव्या दुकानाच्या इन्टिरियरवर घातले... मी म्हटलं मला फ़क्त तीस हजार द्या ना...
मान्या : मग?
डेटाबेस : बापू बिथरले..
मान्या : का?
डेटाबेस : मी त्यांना म्हटलं, मी इतर पोरांसारखा कॊलेजात गेलो असतो, तर फ़ी वह्या पुस्तकं क्लास, झाला अस्ता की नाय खर्च?.. आपण बारावीनन्तर शिकलोच नाय... वाचवला की नाय तुमचा खर्च?
मान्या : हे एकदम करेक्ट आहे तुझं..
डेटाबेस : पण त्यांना पटायला पाहिजे ना... एकदम पिसाळलेच....." तुला माज आलाय..." म्हणाले... "चार वर्षं गावभर उंडारत हिंडलास...काम नाय धन्दा नाय.. खायला काळ अन भुईला भार..... म्हणे फ़िल्म इन्डष्ट्रीत जायचं... पुन्हा माझ्याकडे पैसे मागितले ना तर तन्गडं तोडून ठेवीन...
मान्या : (हसत)... खायला काळ. भुईला भार...क्खिखिखि..

(क्रमश : )

हा हा हा पुढे ???

1

हा हा हा

पुढे ???

छान. पटापट येऊद्या पुढचे.

2

छान. पटापट येऊद्या पुढचे.


-पुण्याचे पेशवे

मास्तर रिटन्स.....!! स्वागत

3

मास्तर रिटन्स.....!!

स्वागत !!स्वागत !!

पहिला भाग आवडला ...आपल्या ईथे असाच एक डेटाबेस होता....त्याला लव्ह गुरु अस नाव पाडल होत्..त्या बेण्याकडे नंबर पण असायचे पोरींचे.....आता साल बॉऊन्सर हाय अ‍ॅड्-लॅब्स ला....तिथबी साल्याचा डेटाबेस मजबुत हाय.....

पुढे? मास्तर, लै भारी जमत आहे

4

पुढे?

मास्तर, लै भारी जमत आहे रसायन ....

हा हा हा ! मस्त मास्तर......

5

हा हा हा !

मस्त मास्तर...... लै भारी...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मास्तर

6

मास्तर जबरा...
वाचतोय....
पुढचा भाग लवकर टाका


-निखिल

लैच भारी मास्तर लवकर येउ

7

लैच भारी मास्तर Laughing out loud

लवकर येउ द्या पुढचा भाग.

मस्त

8

मस्त