सर्वात वरच्या मजल्यावरच्या कोपर्यातल्या आठवीच्या वर्गात आम्ही वाट पाहत होतो, आता कोण येणार तासाला? जोशीबाई जिना चढताना दिसल्यावरच एकच गलका सुरु झाला,
" बाई.. गोष्ट, बाई गोष्ट.."
" अरे, अरे मला वर्गात तरी येऊ द्याल की नाही?"
"परवाच्या ऑफ तासाला अर्धवट राहिलेली कार्व्हरची गोष्ट आधी पूर्ण करा, मग अभ्यास..."
बाई हसतच बरं म्हणाल्या आणि धडा शिकवायचे बाजूला ठेवून कार्व्हरचा अनोखा जीवन झगडा विलक्षण प्रभावीपणे सांगू लागल्या ...
साधारण सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, शेलाटा बांधा आणि शांत,सात्विक चेहरा! बाईंना आवाज चढवून बोलताना कधी पाहिले नव्हते, तशी त्यांना गरजही लागत नसावी. अगदी अव्वल नंबरी कार्ट्यांनाही बाईंबद्दल अतीव आदरच होता. त्या आम्हाला शिकवायला कधी येणार ह्याची सारेजण वाट पाहत होतो आणि त्या आठवीपासून आम्हाला मराठी शिकवणार म्हटल्यावर आम्ही सारेच फार आनंदलो होतो कारण आतापर्यंत बाईंची ओळख आम्हाला पर्यवेक्षिका म्हणून होती.. एकदोनदा खूप शिक्षक आले नव्हते तेव्हा आमच्या वर्गात येऊन बाईंनी ग्रंथालयातली गोष्टीची पुस्तके वाचायला दिली होती आणि पुढच्या वेळी कोणी काय वाचले, काय आवडले हे सुध्दा विचारले होते. शनिवारी शाळा सुटल्यावर तासभर वाचलेल्या चांगल्या पुस्तकांवर बाई बोलतात असे ६वी, ७वीत असताना समजले होते. त्यावेळी मराठी साहित्य, मराठी वाङ्मय वगैरे शब्दसुध्दा माहित नव्हते पण छान गोष्टी ऐकायला मिळतील ह्या नादात आम्ही काहीजण एका शनिवारी थांबलो आणि थांबतच राहिलो. मराठी वाङ्मय मंडळाचे अॅक्टिव्ह सदस्य आम्ही कधी झालो ते कळलेच नाही. अॅन फ्रँकची डायरी बाईंनीच आम्हाला दाखवली. कार्व्हर, अलबर्ट श्वाइटझर,लिंकनशी ओळख बाईंनी करुन दिली आणि आणि पुलंच्या गटणे, अंतूबर्वा, नारायणाशीही मैत्री बाईंनीच करवली.
आठवीच्या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी वहीच्या मागच्या दोन पानांवर काही कॉलम्स करायला सांगितले. त्यात धड्याचे /कवितेचे नाव त्याचा लेखक/कवी ,त्याचे टोपणनाव,तो उतारा/कविता कोणत्या पुस्तकातली आहे, ह्या साहित्याचा/काव्याचा वाङ्मय प्रकार कोणता अशी सारी माहिती प्रत्येक नव्या धड्याच्या सुरुवातीला त्या सांगत आणि आम्हाला त्यात भरायला लावत, नंतर नंतर त्या आम्हाला ती माहिती शोधायला लावत. आवडलेला धडा किवा कविता कोणत्या पुस्तकातली आहे ते आपसूकच कळत असे आणि ते पुस्तक मिळवून वाचण्याची ओढ लागे.बाईंनी दहावीपर्यंत आम्हाला मराठी शिकवलं, नुसतं टेक्टबुक नाही तर मराठीशी, मराठी साहित्याशी ,कवितेशी आमची मैत्री करुन दिली. मला आठवत आहे नववीत असताना आमच्या वर्गातल्या ८/१० मुलांचा एक असे गट करुन प्रत्येक गटाला बाईंनी एकेक साहित्यप्रकार दिला आणि त्यावर निबंध लिहवून घेतले आणि त्याचे हस्तलिखित तयार करायला लावले. त्या हस्तलिखिताला साजेसे नावही आम्हीच शोधायचे होते. आमच्या वर्गाची अशी ५/६ हस्तलिखिते झाली. मग वर्गातच बाईंनी त्याचे प्रकाशनही केले आणि सगळ्या पुस्तिका वाचून त्यातल्या उत्तम लेखांना आणि सर्वोत्तम पुस्तिकेला बाईंनी बक्षिसही दिले.
वर्षासहलीच्या खर्या मजेची ओळख बाईंनीच आम्हाला करुन दिली. येऊरच्या जंगलात पावसाच्या कवितांनी बाईंनी श्रावण उभा केला होता. आमच्या दहावीच्या वर्गाची मेच्या सुटीत आम्ही ट्रीप काढायचे ठरवले तेव्हा जोशीबाई आवर्जून आमच्याबरोबर येऊरच्या जंगलात आल्या. त्यांच्या कवितावाचनाने आणि गुप्तेबाईंच्या गाण्यामुळे सुंदर झालेली ती सहल आज इतक्या वर्षांनतरही मनाच्या खूप जवळ आहे. शाळेच्या १५ ऑगस्टच्या गौरवसमारंभाच्या कार्यक्रमाकरता एखादी थीम घेऊन त्याची संहिता जोशीबाई किवा साठेबाई स्वतः लिहित आणि मग त्या दोघी आणि गोडबोलेबाई तो कार्यक्रम उत्कृष्ठरीत्या बसवत असत. बाईंनी लिहिलेला 'ज्ञानाचे मानदंड!' आज २५ वर्ष झाली तरी मनात ताजा आहे. कार्यक्रमाच्या तालमीसाठी बाईंच्या घरी आम्ही जात असू. अंगणातले लगडलेले रायआवळ्याचे झाड खुणावत असे पण बाईंना न विचारता आवळे वेचायचे धाडस आदरापोटी होत नसे, खरं तर बाईंना कधीच रागवतानाच काय पण आवाज चढवून बोलतानाही पाहिले नाही. अतिशय मृदू, ऋजु तरीही ठाम बोलत असत त्या! तालमीच्या ब्रेकमध्ये मग बाईच म्हणत, जा आवळे हवेत ना, घेऊन या जा.. मग काय? पर्वणीच असायची. त्यांचे 'साद देती हिमशिखरे'.. ऐकताना अभिवाचन कसे असावे, कसे करावे याचे वस्तुपाठच मिळत होते. एका टिळकपुण्यतिथीला बाईंनी नेहमीच्या 'टिळककथा' आणि भाषणबाजीला छेद देत एक नवा प्रयोग केला. लो.टिळकांच्या काही ग्रंथ,पुस्तकातले निवडक उतारे आम्हा काहीजणांकडून वाचून घेतले होते आणि नंतर चांगले वाचन केले म्हणून कॅडबरीही बक्षिस दिली त्या कॅडबरीचं अप्रूप आज ढिगानी उपलब्ध असणार्या चॉकलेटात कुठून असणार?
व्याकरणासारखा रुक्ष विषयही बाई किती रसाळपणे आणि सोपी,सोपी लक्षात राहण्यासारखी उदा. देऊन शिकवत. व्याकरणासाठी त्यांनी आम्हाला आठवी पासून दहावीपर्यंत एकच वही ठेवायला सांगितली होती आणि ती वही पुढेही जपून ठेवा असं सांगितलं होतं. समास, शब्दालंकार,अक्षरगणवृतांची अगदी लक्षात राहतील अशी उदाहरणे त्या देत. त्यामुळेच 'ताताजगागा गणी इंद्रवज्रा' किवा 'मंदाक्रांता वृत्त हे मंद चाले'.. हे आजही लक्षात आहे. एम ए चा अभ्यास करतानाही 'त्या' जपून ठेवलेल्या वहीचा उपयोग झाला हे विशेष! बहुतांश मुलं दहावीनंतर विज्ञान शाखा घेतात आणि भाषेपासून, लिहिण्यापासून दुरावतात असे त्यांना वाटे. जेव्हा बी.एस्सी नंतर मी एम. ए. केले आणि त्याचे पेढे द्यायला आवर्जून बाईंकडे गेले तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं.
संक्रातीला तिळगूळ द्यायला बाईंकडे गेलं की आशीर्वादाबरोबरच त्यांनी आता नवीन काय वाचलं आणि त्यात काय आवडलं ते ही ऐकायला मिळायचं आणि त्याचबरोबर तू काय नवीन वाचलंस, लिहिलंस हा प्रश्नही! बाई जेव्हा मुख्याध्यापिका झाल्या तेव्हाही त्यांना भेटायला आवर्जून गेले होते. आमच्या शाळेच्या अमृतमहोत्सवात बाई भेटल्या होत्या पण नंतर ठाण्याबाहेर आणि मग देशाबाहेर गेल्यावर बाईंशी भेटी जवळ जवळ थांबल्याच !
बाईंना खूप दिवसात भेटलो नाही, एकदा वेळ घेऊन जायला हवं, नवीन लिहिलेलं,वाचलेलं बाईंशी शेअर करायला हवं.. बाईंना खूप बरं वाटेल. मित्रमंडळींकडून बाई आजारी असल्याचं समजलं तेव्हा तर असं फारच वाटलं.
आणि एक दिवस समजलं की 'जोशीबाई गेल्या..'
सुन्न व्हायला झालं. ह्या भारतभेटीत बाईंकडे जाऊ, नवीन लिहिलं, वाचलेलं बोलू.. असं मनात म्हणत होते ते आता अधुरंच राहिलं ह्याची रुखरुख आहे
सुरेख लेख!
अतिशय सुंदर भावाजंली.
बरेच दिवसांनी स्वातीताईचे लेखन वाचायला मिळाले ही पण आनंदाची बाब.
मीमवर स्वागत!
सुंदर लेख.. शाळेच्या आठवणीत
सुंदर लेख..
शाळेच्या आठवणीत हरवलो थोड्यावेळ...
मीमवर स्वागत!
-निखिल
नुतन मराठी विद्यालयातील पवार
नुतन मराठी विद्यालयातील पवार मॅडमची आठवण आली.. इतिहास शिवत त्या आम्हाला...
तै ... स्वागत आहे मीम वर.
बाकी लेखाबद्दल काय लिहू.. नेहमी प्रमाणेच अप्रतिम.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुरेख लेखन. मीमवर स्वागत.
सुरेख लेखन.
मीमवर स्वागत.
स्वातीताई, बर्याच दिवसांनी
स्वातीताई, बर्याच दिवसांनी आंतरजालावर दिसलीस, छान वाटलं. लेखन मस्तच! आणि मीमराठीवर स्वागतही.
सुंदर ...
खूप सुंदर ...
शाळेच्या आठवणीत हरवलो ...
सुरेख!
सुरेख!
अतिशय उत्तम लेखन. शाळेची आठवण
अतिशय उत्तम लेखन.
शाळेची आठवण झाली...
+१
अतिशय उत्तम लेखन.
शाळेची आठवण झाली...
+१
अतिशय उत्तम लेखन.
शाळेची आठवण झाली...
--------------------
सिद्धार्थ
माझ्या गजाल्या
मीमवर स्वागत !!!
मीमवर स्वागत !!!
पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं
पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं... नि शाळेतले बरेचसे शिक्षक नि त्यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या... धन्स स्वातीतै!!!
अवांतरः 'संहिता जोशीबाई' हे दोन शब्द एकत्र वाचून अंमळ गंडले होते!!! आता ठीक आहे...
मीमवर स्वागत
खरच परत एकदा शाळेत गेल्यासारख वाटल...
'संहिता जोशीबाई' हे दोन शब्द एकत्र वाचून अंमळ गंडले होते ...
मीपण
उ त्त म ! ! !
उ त्त म ! ! !
जोशीबाई
प्रत्येकाच्या आयुष्यात अशा एक जोशीबाई असतातच. सारे प्रतिसाद वाचले की ते लक्षात येते. प्रत्येकापुढं त्याच्या-तिच्या जोशीबाई डोळ्यांसमोर आल्या हेच महत्त्वाचे!
+१
मोडकांशी असहमती दर्शवण्याचा प्रश्नच कधी येत नाही बुवा!
आमच्याकडे व्हेरिएशन इतकंच की आमच्या भावेसरांची आठवण झाली.
स्वातीताई, छान लिहिलंयस...आणि हळवं ही.
अगदी सुंदर
स्वाततै इअ बॅक... छान उजाळा.
यानिमित्ताने शाळा, तेथील आमच्या भांगेबाई, परब मॅडम यांची आठवण झाली.. बरं वाटलं
-ऋ
छान प्रकटन. चायला आम्हाला अशी
छान प्रकटन. चायला आम्हाला अशी साहित्याची आवड लावणारे शिक्षक शाळेत तरी बिलकुल भेटले नाहीत याचे फार वाईट वाटते.
-पुण्याचे पेशवे
पुपेशी हजारदा सहमत. साहित्यच
पुपेशी हजारदा सहमत. साहित्यच काय पण आहे तो विषयही मला माझ्या शिक्षकांनी निट समजावून दिल्याचे आठवत नाही. फक्त पाट्या टाकण्याचेच काम माझ्या शिक्षकांनी केले. तुमच्या बाईंसारखे शिक्षक मला मिळाले असते तर आहे ते चित्र वेगळेच दिसले असते.
त्यामुळे शिक्षक या जमातीबद्दल थोडी अढी आहेच.
असो. रडण्यात काही अर्थ नाही.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
धन्यवाद.
प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात अशा एक जोशीबाई असतातच, ह्या लेखाच्या निमित्ताने त्या बर्याच जणांना आठवल्या, धन्यवाद.
स्वाती
सुरेख.....अप्रतिम च !!!!!!!!!!!!!!
सुरेख.....अप्रतिम च !!!!!!!!!!!!!!
सुरेख.....अप्रतिम च !!!!!!!!!!!!!!
सुरेख.....अप्रतिम च !!!!!!!!!!!!!!
खूप छान
खूप छान
सुरेखच लेख!!!
प्रत्येकाला आपापल्या शिक्षकांची आठवण करुन देणारा लेख!!
खरोखरच सुंदर.
दिप्ती जोशी
मनाचा हळवा कोपराच उलगडला ताई
मनाचा हळवा कोपराच उलगडला ताई तु तर..
- पिंगू
मस्त लेख ..... पुन्हा वरती
मस्त लेख ..... पुन्हा वरती आणण्याकरिता आभार्स !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !