प्रवास

0
0

दर वेळी असंच होतं, जी.एम.आर.टी.ला जायचं असलं की मी कुरकूर करायला सुरूवात करते. "कशाला जायचं तिथे?", "त्रास आहे रे, उद्या ग्मर्टला जायचं आहे. सक्काळी सक्काळी उठून तिकडे जायचं, तिकडचं जेवणही मला आवडत नाही." असं काही नेहेमीच होतं. पण आलिया भोगासी म्हणून सकाळी सहाचा गजर लावून सव्वासहापर्यंत मी उठते. अर्धवट झोपेत, आवश्यक अशा अर्ध्या महत्त्वाच्या गोष्टी घरात किंवा ऑफिसातच विसरून मी बसमधे बसते आणि बस सुटायच्या आधीच माझा डोळा लागतो.

जाग येते तर बस बहुदा ऑफिसाच्या गेटपाशी असते आणि पुन्हा डोळा उघडतो तर इंद्रायणी जवळ आलेली दिसते. श्वासात बराच जास्त ऑक्सिजन आहे हे जाणवतं आणि खूप छान वाटतं. चाकण आल्याची चाहूल लागते आणि मला सगळ्यात पहिले आठवतात ते चाकणचा भुईकोट किल्ला आणि फिरंगोजी नरसाळा. हा किल्ला बघण्याचा प्रयत्न मी अजूनही केला नाही आहे, पण तरीही ठाण्याचा किल्ला(/तुरूंग) बाहेरून पाहिलेला आहे त्याची आठवण होते. पण त्याहीपेक्षा जास्त आठवतो तो फिरंगोजी नरसाळाच; तो कसा दिसत असेल कोण जाणे, पण त्याच्यासारख्या वीरांमुळे आज माझं आयुष्य चांगलं झालं आहे याची जाणीव होते, मी दगड नाही, मलाही भावना आहेत याची किंचित कल्पना येते. बस तशीच पुढे जात असतेच आणि विचारांमधून बाहेर येईपर्यंत भामा येते. या भामेच्या तीरावरच्या भाममधे मी एकदा मिसळ खाल्ली होती. जी.एम.आर.टी.च्या स्टाफमधल्या एक इंजिनीयर आहेत, त्यांनी आपुलकीने मला मिसळ खायला लावली होती, तेव्हापासून आमची मैत्री झाली ती झाली. भामा ओलांडली की लगेच एक सुंदर, सुशोभित कँपस दिसतो, ही आहे कांदा-लसणीवर संशोधन करणारी संस्था! लगेचच भीमेवरचा पूल दिसतो आणि येतं राजगुरूनगर ... खेड! कोवळ्या वयात देशासाठी जीवाची आहुती देणार्‍या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुंपैकी, राजगुरूंचं गाव! त्यांच्या नावाचं कॉलेज दिसतं, एस.टी. स्टँडबाहेरचा त्यांचा पुतळा दिसतो आणि वाटतं, किती फालतू गोष्टींचा आपण मोठा इश्यू बनवतो. कोवळ्या वयात फाशी गेलेल्या राजगुरूंबद्दलचा आदर दरवेळी वाढतच जातो. आणि समोर दिसतो एक बकाल नाला आणि एक देशी दारूचा गुत्ता ... संताप होतो, पण आपण काही करू शकत नाही याची जाणीव जास्त टोचते.

पण हे सह्याद्रीचं सौंदर्य असं आहे की सगळं विसरायला होतं. पुणे-नाशिक रस्त्यावर आधी खेडची घाटी लागते. रस्त्यावरची वळणं, आडदांड सह्याद्री आणि त्याच्या कुशीतला पाझर तलाव कितीही वेळा पाहिला तरी समाधान होतंच नाही. पुढे एक अवसरीची घाटीही येते, आणि तिथली झाडं पाहून सरळ बसमधून उडी मारावी आणि झाडाखाली शांत बसावं, थोडा विचार करावा, थोडं काम करावं, थोडं भटकावं आणि दमून एखाद्या झाडाखालीच पसरावं अशी इच्छा वारंवार होते. मग मात्र मी घाबरून गाणं कोणतं सुरू आहे वगैरे विचार करते. उगाच उडी-बिडी मारली तर, अशा वेळी माझा स्वतःवरच विश्वास नसतो. या सगळ्या घाट्यांमधे मला आवडतो तो चंदनापुरीचा घाट! अरेरे, जी.एम.आर.टी.साठी त्याच्या आधीच वळतो. एकदाच हा घाट पाहिला, पण राकट सौंदर्य म्हणजे काय तर आता मला चंदनापुरीचा घाटच आठवतो. नाशिक रस्त्याला आळेफाटा मागे टाकून संगमनेरकडे गेलं की हा घाट मधे येतो. एखादा नाकी-डोळी नीटस, सावळासा तरूण, जो शारिरीक श्रमाच्या कामांमुळे आखीव-रेखीव आहे, आणि मुळचा गव्हाळ वर्ण आता उन्हामुळे रापून तांबूस-सावळा झाला आहे, असं काहीसं या घाटाकडे पाहून मला वाटलं. हा घाट 'आवडला'... अगदी तस्सा आवडला. आधी खेड घाट मला आवडायचा, पण चंदनापुरीचा घाट पाहून ते आवडणं वेगळं आणि हे वेगळं असं काहीसं वाटतं. खेड घाटातलं सौंदर्य वेगळं आणि चंदनापुरीचं वेगळं. आणि हे चंदनापुरी नावसुद्धा मला एवढं आवडतं की हा आखीव-रेखीव तरूण अचानक बसून गणित, भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्रावर गप्पा मारतोय असं वाटतं. एखादं ठिकाण नुस्तंच आवडतं असं नाही तर त्याची मोहिनी पडते तसं माझ्या बाबतीत चंदनापुरीचं झालं असावं ... नुस्तंच डोक्यात शब्द घुमत रहातो चंदनापुरी, चंदनापुरी, चंदनापुरी ....

पण पुन्हा पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, घोड नदी आलेली असते. रस्त्यात 'खवय्येगिरी', वगैरे एकदम पॉश रेस्तराँ दिसतात. मला 'खवय्येगिरी'मधले स्नॅक्स आवडलेही, पण ते थोडे विजोड वाटतात. मंचर सोडलं की एकलहर्‍याच्या दिशेला ही खादाडी-गृह आहेत. मंचर बर्‍यापैकी आधुनिक गाव वाटतंही, पण मला मात्र एकलहरे आणि कळंबमधली छोटेखानी पण सात्विक अशी कौलारू घरं जास्त आवडतात. सारवलेलं खळं, समोर एकमजली घर, एका बाजूला गायी-गुरं बांधलेली ... मी क्षणभर आजोळी जाऊन येते. पण बहुदा मला पाण्याची ओढ असावी, कारण घोड नदीचं पात्रं मला जास्त आवडतं. शांत पाण्याशी एखादं जनावर पाणी पित असतं, आणि माझी पुन्हा तंद्री लागलेली असते. मधेच डाव्या बाजूला एक एकटाच डोंगर येतो. त्याच्यावरचा कातळ पाण्यामुळे अगदी घासून-पुसून स्वच्छ आहे. एकांडा शिलेदार आजूबाजूला पहारा देतो आहे, असं त्या डोंगराकडे बघून मला नेहेमी वाटतं. समोर दिसते एक पाटी 'महाळुंगे पडवळ <-- ६ किमी'. खरंतर या पाटीकडे लक्ष जाण्याचं काही कारण नाही, पण खाली आणखी एक ओळ आहे, 'हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मस्थान'. पुन्हा एकदा डोक्यात फिरंगोजी नरसाळा, राजगुरू, बाबू गेनू सगळा इतिहास आठवतो. या सगळ्या लोकांचे आपल्यावर किती उपकार आहेत आणि आपण मात्र देशासाठी काहीही करत नाही असा काहीसा त्रासदायक विचार डोकं पोखरायला लागतो.

आणि मग येते इवलीशी मिना नदी! खरंतर या नदीत आवडण्यासारखं काही नाही, पण नदीच्या जवळूनच जी.एम.आर.टी.चा सेंट्रल-स्क्वेअर दिसतो, आता जी.एम.आर.टी. आली याची कल्पना येते म्हणूनही असेल, मला मिना नदी आली की एकदम "हं आता जवळजवळ पोहोचलोच" हा सुखावह विचार येतो. कितीही जवळून ते अँटेनाज पहाता येत असले तरीही नारायणगावातून जे लँडस्केप दिसतं ते निराळंच. नारायणगडावरूनतर आणखी सुंदर देखावा दिसतो. हा सगळा विचार डोक्यात शिरून बाहेर पडेपर्यंत हाडं बाहेर येणार का काय असं वाटायला लागतं. पुणे-नाशिक रस्ता सोडून बस आता छोट्याशा खोडदच्या दिशेला लागली असते. मधेच एक गाव येतं भोरवाडी. खरं सांगायचं तर या गावात काही निराळं नाही, पण तिथलं एका कोपर्‍यावरचं देऊळ मला बाहेरुनच पाहिलेलं असलं तरी आवडतं. आधुनिक विटा-सिमेंट वापरून चिर्‍यांच्या बांधणीसारखं हे बांधलं, रंगवलं आहे. किती वेळा पाहिलं तरी पुढच्या वेळी मी पुन्हा डोकावून हे देऊळ पहातेच. एकदा तिथे सामुदायिक विवाह सोहळा रंगला होता, त्यामुळे बस ट्रॅफिकमधे अडकली. खरंतर ते गाव एवढंसं टिचभर, पण तिथेही गर्दी होती. एरवी ट्रॅफिक आणि गर्दीला वैतागणारी मी, त्या देवळाशेजारीच बस थांबली म्हणून जाम खूष झाले.

अचानक बसचा आवाज कमी होतो, बस थांबतेच आणि जी.एम.आर.टी.च्या प्रांगणात शिरते. मी एकदम लहान मुलीसारखी हरखून जाते, "आता ऑब्झर्व्हेशन्स! हुर्रे ... आणखी डेटा, आणखी काहीतरी इंटरेस्टींग काम .... "

मला जी.एम.आर.टी.त जायचा खरंच कंटाळा येतो. आत्ता तिथे बसले आहे, पण पुन्हा पुढच्या वेळेस इथे यायला लागेल याचा विचार करून आत्ताच कंटाळा आला. पण एकदा इथे आले की काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस काम होत नाही, रुटीन बिघडतं म्हणून रुटीनप्रिय मी करवादते, पण इथल्या लोकांना भेटलं की वेगळंच काही वाटतं. जाऊन अगदी कॅंटीनमधले आचारी, वाढपी ते अगदी अ‍ॅडमिनीस्ट्रेशन-प्रमुखांशी गप्पा मारते. नुस्तं "काय, कसे आहात? मजेत ना??" एवढं विचारलं तरी हे सगळे चेहेरे किती सुंदर दिसतात. संध्याकाळी साडेपाचला परत यायला निघताना मी अगदी सहजच म्हणते, "मजा आली आज ... पुन्हा भेटू या. माझी ऑब्झर्व्हेशन्स कधीच संपणार नाहीत... तेव्हा सी यू लेटर"

क्या बात है!!

1

हे जीवन सुंदर आहे!

आभासी विश्वात रुतुन गेलेल्या जीवांकरता तर एक सुंदर गार वार्‍याची झूळुक असा लेख!

+१

2

अगदी !!!

नितांत सुंदर लेखन !

- टारझन

नितांत सुंदर लेखन

3

+२

टारझनशी सहमत

अगदी !!!

नितांत सुंदर लेखन !

नितांत सुंदर लेखन

4

+३
खूप खूप छान !!!

वाह ! नितांत सुंदर

5

वाह !

नितांत सुंदर लेखन.

आवडले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त...

6

मस्त लिहलयं रुटीनच्या वाटेवरचा प्रत्येक नजारा अगदी बारकाईने टिपलाय...

छान लिहीलं आहे. मी कोकणात

7

छान लिहीलं आहे. मी कोकणात गेलो, कोणत्याही गड किल्ल्यावर गेलो की असाच वेडा होतो. फक्त फरक इतकाच की मला कधी तिथून निघावेसे वाटतच नाही. कसा बसा काढतो स्वतःला तेथून बाहेर. येतो परत या मायावी विश्वात. अदिबै फारच छान लिहीलं आहे.


-पुण्याचे पेशवे

क्या बात! क्या बात!! क्या

8

क्या बात! क्या बात!! क्या बात!!!
एकदम प्रसन्न वाटल वाचुन.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

एवढं विचारलं तरी हे सगळे

9

एवढं विचारलं तरी हे सगळे चेहेरे किती सुंदर दिसतात
यमे तु ना कधीकधी इतके भन्नाट लिहीतेस. झॅक मजा आला.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

छान

10

मुक्तकासारखं प्रकटन अतिशय आवडलं. दूरच्या वस्तू टिपण्यासाठी जाताना वाटेतल्या जवळच्या गोष्टींची जिव्हाळ्याने घेतलेली नोंद खासच. (विरोधाभास अलंकाराची शिकवणी wink)

अदिती अदिती लै भारी

11

अदिती अदिती लै भारी लेख..
प्रवासात खिडकी बाहेर चे जग.. छोट्या छोट्या गोष्टीची नोंद करणे सहीच आहे...
असेच एखादे लिहावे म्हणतोय...


-निखिल

सही.. अगदी आम्हांला पण प्रवास

12

सही.. अगदी आम्हांला पण प्रवास घडला..
यावरून मला कुठेतरी 'एक प्रवास' असं कायसंसं वाचल्याचं आठवलं.. पण नक्की कुठं ते काय की ब्वॉ!!!

छान!

13

अतिशय छान आणि प्रवाही लेखन. ह्या वाटेवरही एकदा जावसं वाटू लागलं आहे.

लेख आवडला

14

- दिगम्भा

लेख आवडला

15

- आण्णा

आळेफाटा

16

आळेफाटा असा संपुर्ण उच्चार जो करायचा तो बाहेरचा अस आमच गणित होत. टाईमपासला ल्वॉक फाट्याव यायची. लेखनानिमित्त जुन्या आठवणी जागा झाल्या. टिंग्या आठवला. पुण्यात मामाकडे येताना अणे पुणे गाडीने प्रवास करताना मेंदुत एक वेगळेच तरंग उमटायचे. आळेफाट्याला यष्टी ष्ट्यांड वर चन्नापुरी ,वत्तुर,नारंग्गाव,बेल्ह, अणे, अशी स्थानिक गावांची नावे घेत प्रवाशांना मार्गदर्शन करणारा बुवा कंट्रोलर आठवला. प्रवासात अष्टरची रंगी बेरंगी शेती दुतर्फा असायची. पुस्तकातल्या काश्मिरवानी वाटायच. डामरी रोड सिमेंट ,कॉन्क्रीट च आकर्षण वाटायच. नारंग्गाव आल कि शहर आल्यासारखच वाटायच. आळेफाटा व आळे यांच्या दरम्यान एका रेषेपासुन डांबरी सडक चालु व्हायची व यष्टी यकदम स्मूथ चालायला लागायची. आपल्या गावाला रेल्वे येणार, गावात डामरी सडक व्हनार,गाव आपल तालुक्याव व्हनार अशी स्वप्ने पडायची. टेंभीच्या(शेताजवळील ७ छोट्या टेकड्यांची रांग) इथ हाता टेप धरुन एखादी मोजणी सदृष दृष्य दिसले कि रेल्वेचे रुळ टाकण्यासाठी मोजमाप घेतोय अस वाटायच. मग कॉलेजला आपण गेल्यावर सुट्टीवर घरी येताना रेल्वे स्लो झाली कि डायरेक ब्रिफकेस घेउन आपल्या शेतात उडी मारायची आन ए टिप्या ए टिप्या, ए चंपे ए चंपे असे ओरडायचे. मग शेतावर सगळे भुभे गोळा होतील मंग आपण त्यांना चोंबाळायचे, जरा मस्ती करायाची. पाटावरल्या पाण्यातुन हातपाय धुवायचे,शेतातल्या गड्यांबरोबर थोडा टाईमपास करुन मंग डामरी रोडनी श्ट्यांडवरुन डायरेक घरी जायच अस एक दिवास्वप्न.
पेठ घाटातल्या पेठ गावाजवळील भावडी नामक एका गावात घाटपांडे लोकांचा उगम झाला . काही आंबेगाव काही खेड तर काही जुन्नर तालुक्यात विखुरले. राजगुरु नगर ला खेड म्हणायचे. राजगुरु आमचे नातेवाईक. आजोबांचे आते वगैरे असे काहीतरी भाउ. शाळेत देव गुरुजी इतिहास शिकवताना राजगुरु हे इंग्रजांना चकवण्यासाठी घाटपांड्यांच्या बळदात लपले होते असे सांगायचे त्यावेळी कॉलर ताठ व्हायची. माडीत भगत सिंग राजगुरु व सुखदेव असा एकत्रित जुनाट पत्र्याच्या फ्रेममधील फोटो बंदुकीजवळ टांगलेला असायचा.
पुणे नाशिक रोड जुन्नर आंबेगाव खेड तालुक्याचे पुर्व व पश्चिम असे भाग कारतो. पुर्व भाग दुष्काळी तर पश्चिम भागात पाउस त्यामानाने चांगला पडे. पेठ व खेड घाट हे उन्हाळ्यात अगदी ओसाड असायचे. आता वनीकरणामुळे, इंदिरा पाझर तलावामुळे बरे दिसतात. जुन्नर हे आमच्यासाठी कोर्टाच्याप्रकरणाचे ठिकाण. आजोबांच्या गावकी व भावकी मुळे जुन्नर व पुणे येथे कायम वार्‍या असायच्या. नंतर वडिलांच्या काळात कमी झाल्या.जुन्नर घोडेगाव(आंबेगाव), खेड या तालुक्यातील लोकांसाठी प्रांत नावाचा एक सरकारी प्राण्याचे हापीस खेडला होते, तिथेही जावे लागायचे.
यष्टीतुन पुण्याला येताना अगदी भोसरी च्या पुढे आल्यावर प्रचंड पाण्याची टाकी दिसली कि पुण्याचा वास यायला लागायचा.
शहरातले नातेवाईक घरी आल्यावर जेव्हा शेतात जायचे तेव्हा वा! वा! काय ही हवा! प्रदुषण नाही !काय ही हिरवीगार शेती, कैर्‍या चिचा,जांभळ,पेरु सिताफळ फुकट मज्जा आहे बाबा प्रकाशची. शी काय ती पुण्यातील गर्दी इथ कस मस्त वाटतयं. इथच राहायला पाहिजे. अस म्हणायची , दोनचार दिवस झाले कि मग पळ काढायची.
असो गेले ते दिन! पाच वर्षा पुर्वी घर विकले त्या अगोदर शेती . घराण्याच्या इभ्रती साठी ठेवली होती शहरात गेलेला माणुस परत खेड्यात थोडाच येणार? त्यातुन आपण एकुलते एक. घराण्यातील भावकीचा व गावकीचा इतिहास पहाता बाहेर पडलो. आज घराण्यातल्या बातम्या ऐकल्या कि वाईट वाटत.
असो आठवणीच्या हिंदोळ्यावरुन वर्तमानात येतो


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पकाकाका, मस्तच आठवणी

17

हास्य

पकाकाका,
मस्तच आठवणी काढल्यात! बाकी, ह्याबाबत तुपलं-मपलं जमलं बघा!!
सालं आपलं गाव ते आपलं गाव. ह्या शहरात ती मजा नाय. तिथं असतील चार सोयी कमी, पण सुख आहे.

>>असो गेले ते दिन! पाच वर्षा पुर्वी घर विकले त्या अगोदर शेती .
Sad अरेरे!
माझ्या एका मित्राचं शेत, तिथलं घर जिथं कळायला लागल्यापासुन धुडगुस घालतच वाढलो ते जेव्हा विकलं तेव्हा आम्ही पाच मित्र (ज्याचं शेत-घर होतं तो आणि आम्ही चौघं..) त्या मातीतच फतकल मारुन गुढघे टेकुन हमसुन हमसुन रडलो आणि घरात परत गेल्यावर त्या दगडी भिंतींवर कधीकाळी आम्हीच काढलेली वेडीवाकडी चित्रं पाहुन, त्यावर हात फिरवत रडणार्‍या काकूंना पाहुन परत रडलो त्याची आठवण झाली!
बाकी, दुसर्‍याचं रान्,घर काढलं तर त्याचं आमाला इतकं वाईट वाटलेलं...हितं तर स्वतःचंच असताना तुम्हाला किती त्रास झाला असेल? Sad

>>घराण्याच्या इभ्रती साठी ठेवली होती शहरात गेलेला माणुस परत खेड्यात थोडाच येणार?
Sad दुर्दैवानं खरंय!

>>त्यातुन आपण एकुलते एक. घराण्यातील भावकीचा व गावकीचा इतिहास पहाता बाहेर पडलो.
आयला! भावकीची लफडी का? बोंबला!!!!

असो!
पकाकाका, तुम्हाला एक विनंती आहे राव...गावकडच्या अशा आठवणी काढू नका. मला लैच्च कसंतरी होतं. उगं डोळ्यात पाणी जमा होतं.

पका, लेका... तोडलंस रे... मला

18

पका, लेका... तोडलंस रे... मला शेताचा / गावाचा एवढा अनुभव नाही रे... पण आत्ता पर्यंत तीन वेळा नवीन गावात स्वतःचा संसार स्वतः उभा करून स्वतःच्या हाताने मोडला आहे... परत कधीच या घरात आपण शिरू पण शकणार नाही हे माहित होते... अवस्था काय होते मला माहित आहे. जास्त विस्तृत नाही लिहिलंस तेच बरं केलंस गड्या...

Sad

व्वा !!! झकास लिखाण

19

व्वा !!! झकास लिखाण !!!

नुकताच नाशीकला गेलो होतो....तेव्हा पाहिला चंदनापुरी.....आणी फैसला केलता की तिथे एकदा जाणारच...आणी जाणारच

छान स्फुट लिहिलंयस

20

छान स्फुट लिहिलंयस अदिती!
प्रचंड आवडलं.

बाकी, चंदनापुरीचा घाट म्हणजे...आहाहा....
आमचं 'प्रकरन' नवंनवं होतं तेव्हा कारभारनीला फटफटीवर बसवुन हिंडायला म्हणुन पार सगंमनेरपत्तुर गेलो व्हतो तेव्हा तर चंदनापुरीचा घाट जरा जास्तच स्वर्गीय भासला होता Big smile
असो!

असेच मनमोकळं लिहित रहा.. छान वाटते. हास्य

अरे वा!!!

21

आमचं 'प्रकरन' नवंनवं होतं तेव्हा कारभारनीला फटफटीवर बसवुन हिंडायला म्हणुन पार सगंमनेरपत्तुर गेलो व्हतो तेव्हा तर चंदनापुरीचा घाट जरा जास्तच स्वर्गीय भासला होता

तुम्हालाही त्या प्रवासाचा कणनकण आठवत असेल मग? wink Big smile

ह्याट्ट!

22

धुंदीच एव्हढी होती, की काहीच आठवत नाही. Big smile

हो क्का? बर्‍याच लोकांना

23

हो क्का? बर्‍याच लोकांना आठवतो बरं... तुम्ही नुसतेच धुंद व्हा... wink

क्या करुं? मेरी तो फितरत ही

24

क्या करुं? मेरी तो फितरत ही ऐसी है|
गालीबने फर्माया हुवाही है...
..................

जाऊ द्या...कशाला उगाच गालीबला त्रास देत, नाही नाही ते गोड पाश आठवावे...तेच नंतर पाशवी होतात Big smile

नाही नाही ते गोड पाश

25

नाही नाही ते गोड पाश आठवावे...तेच नंतर पाशवी होतात
हम्म्....धमाल खांडेकर........


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

मी

26

बघतोय हां बिका! wink

चतुरंग

आयला... ओ कणाद ऋषि.... आलात

27

आयला... ओ कणाद ऋषि.... आलात का?

मला वाटलं की अजूनही तुम्हाला कणनकण समोर दुसरं काहीच दिसत नाहीये... wink

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.....

28

कणादॠषी काय राव.....
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

काय रंगाकाका,
हल्ली क्यांपुटरच्या खिळ्यामोळ्यांची ठाकठोक सोडुन 'न्युक्लियर सायन्स'कडं वळलेले दिसताय wink

क्या बात है लेखकनाव पुन्हा

29

क्या बात है

लेखकनाव पुन्हा पुन्हा पाहुन खात्री केली.... सुरेख लेखन

हॅ हॅ हॅ हॅ... एकदम सेम टु

30

हॅ हॅ हॅ हॅ...
एकदम सेम टु सेम नाना, मि पण कमीत कमी २-३ वेळा खात्री केली..
मोठ्या भिंगाच्या चश्म्यातुन एवढे बारकावे टिपुन तेव्हढेच सुंदर लिहिल्याबद्द्ल धन्यवाद आदिती.

--टुकुल

सुरेख!!!!!!!!!

31

सुरेख!!!!!!!!! हास्य

खरंच सुरेख

32

हे वर्णन वाचून खरंच जुने दिवस आणी ते प्रवास आठवले! असंच चालू दे!!

आदितीतै, मजा आला. पकाकाका नि

33

आदितीतै,
मजा आला. पकाकाका नि धमूचे प्रतिसादही हळवे बनवणारे आहेत.

अप्रतिम... अतिशय आवडलेला एक

34

अप्रतिम... अतिशय आवडलेला एक लेख. नेहमीच लक्षात राहिल हा लेख.

मस्त

35

सुंदर लेख.

अजुन कौतुक

36

अजुन कौतुक कसे करावे. ललित लिहलेय ... एकटाकी असावे. आनंद झाला. अजुन अजुन अजुन येउ दे.

आत दडलेली अदिती हळुहळु बाहेर येतिये .. आंतरजालावरच्या वावराचे चांगले साईड इफेक्ट्स.
wink

फार सही लिहीले आहेस

37

फार सही लिहीले आहेस अदिती!!!
खूप आवडलं वर्णन!

खूप आवडलं वर्णन! असेच

38

खूप आवडलं वर्णन!

असेच म्हणतो..

लिखाण आवडलं. आयुष्य असंच

39

लिखाण आवडलं.
आयुष्य असंच असतं. एकेका क्षणाचा आनंद असाच लुटायला जमायला हवं.
छान लिहिलं आहेस.


- प्राजु

लिखाण

40

लिखाण विशेष आवडण्याचे एक कारण म्हणजे, अलिकडे पुण्याहून नाशिकला जाताना आपल्याला आलेल्या अनुभवाचेच वर्णन केल्यासारखे वाटले. उत्तम लेख.

असेच म्हणतो, आवडले! एकदा आमची

41

असेच म्हणतो, आवडले!

एकदा आमची खोडदला शैक्षणिक सहल गेली होती त्याची आठवण झाली. मस्त परिसर आहे तो!

तुझ्याच भाषेत, 'सी यु लेटर, सी यु अगेन'. हास्य


-Nile

हे सगळ खर आहे तरी पण

42

हे सगळ खर आहे तरी पण प्रवासातले फोटो कुठेय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान लिहीतेस ग

43

कधी गेले नाही तिथे पण आता वाचुन जावस वाटतय आणी तुझ्या चष्म्याने हे घाट, नदी, गाव पहाव म्हणतेय..

सुंदर!

44

अतिशय ओघवत्या भाषेत केलेलं वर्णन....खरं तर एखाद्या कॅमेराने केलेलं दृष्यचित्रण वाटावं इतकं बोलकं. खूपच सुंदर. खूप आवडलं.

घाटपांडेसाहेबांचे मनोगतही मनाला भावलं.

शॉल्लेट ...

45

अदिती अदिती एखादी उच्चभ्रु ब्लॉगकर्ती का नाही झालीस ?
एकदम सुपर्व्ह लेख आहे.
जाम आवडला !

मधला पकाकाका आणि धम्याचा प्रतिसादही छान !

+१ सहमत

46

अदिती अदिती एखादी उच्चभ्रु ब्लॉगकर्ती का नाही झालीस ?

खल्लास!

47

मार डाला अदिती.

नाशीक रोड... पुण्याजवळ असुनही ग्राम्य जीवन, निसर्ग सौंदर्य तिथे टिकलय. म्हणुनच मला आवडतो.

रस्त्यात मिसळीचे एक प्रसिद्ध हॉटेल आहे. संजय नावाचे. तिथली झणझणीत मिसळ अन खेकडा भजी! आठवणीनंच तोंडाला पाणी सुटलंय!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अंमळ लहान व्हा..

48

एखादा नाकी-डोळी नीटस, सावळासा तरूण, जो शारिरीक श्रमाच्या कामांमुळे आखीव-रेखीव आहे, आणि मुळचा गव्हाळ वर्ण आता उन्हामुळे रापून तांबूस-सावळा झाला आहे, असं काहीसं या घाटाकडे पाहून मला वाटलं.

ह्म्म्म्म.. अदितीताई खूप मोठ्या झाल्यात.

ल्हान व्हा..

- फुन्सुक

सुंदर!

49

अदिती, प्रवास आवडला..
स्वाती