पोकळवाडीत चमत्कार

0
0

पोकळवाडी...मराठी मातीतलं असंच एक गाव! फार नाही, शे-दिडशे उंबरा, पण गाव मात्र अस्सल बेरकी. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या, भांडणतंटे, भाऊबंदकी सगळं सगळं अगदी पार पोचलेलं. चार गावात असतो तसाच इथंही गावगन्ना! मग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतलं राजकारण, त्यात गावाचे पडलेले तट, हाणामार्‍या, गटबाजी सगळं सगळं कसं आखीव रेखीव चित्रासारखं जागच्याजागी!

इथं शेतात कंबर कसुन खपणारे सरळमार्गी लोक, तसेच रिकामटेकडेही पुष्कळ. पण तसा गावाला कुणाचा काही त्रास असा काही नाही. तान्या-भैर्‍यासारख्या उडाणटप्पू जाड्या-रड्याच्या जोडीनं गावात रोजच डोंबारीमदार्‍यासारख्या खेळ करुन जणु सगळ्यांच्या मनोरंजनाचा मक्ताच घेतलेला. रोज आपापली कामं आटपली की मंडळी बंड्या धायगुड्याच्या पारावर येऊन बसायची. मग गप्पांचा फड असा काही रंगायचा, की काही विचारता सोय नाही. तिथं शाळा उरकुन भुरकेमास्तर येऊन बसायचे, जन्या लव्हार भट्टी थंडावली की धायगुड्याच्या पाराचा रस्ता धरायचा, सुताराचा आजिनाथ कुठं दुसर्‍या गावात कामाला गेला आसला तर येता येता करवती कानस घेऊन तिथंच ठिय्या मारुन बसायचा, तान्या गावभर उकीरडे फुंकुन कंटाळला की पाराकडं निघायचा,भैर्‍या तालमीत पोरांना लाल मातीत माखवुन झालं की खुराक हाणुन धायगुड्याच्या घराकडचाच रस्ता धरायचा. दिवसभराच्या घडामोडी, सरपंचाच्या कुटाळक्या, कधी भुरकेमास्तरानं आणलेल्या पेपरातल्या बातमीवर जोरदार चर्चा...जोडीला पान आणि तंबाखुचे बार...दिवाबत्ती होऊन घराघरात भाकर्‍या कालवणं कधी शिजली ह्याचं भानच रहायचं नाही मंडळीना! मग एकेकाची पोरंसोरं आपापल्या बापसाला शोधत यायची, अन, "आन्ना, मायनं सांगावा धाडालाय, ज्येवाय चला" असं म्हणायची खरं, आणि बापासोबत तिथंच रेंगाळायची...पारावर बापमंडळी गप्पांचा फड रंगवुन बसलेली, तर बापाला बोलवायला आलेली चिल्लीपिल्ली खाली दंगामस्ती करत बसलेली..असा रोजचा सुखाचा दिवस चाललेला असायचा.

एक दिवस असंच नेहमीप्रमाणं फड रंगात आल्येला, मुख्यमंत्र्यांच्या नव्या शेतीच्या धोरणांवर जोरजोरात चर्चा झाली, नेहमीप्रमाणं ती सरपंचावर घसरली, त्याला चार शिव्या घालुन झाल्या, मग मध्येच तान्याचं आन भैर्‍याचं टेकायला बसण्यावरुन भांडण निघालं..तान्या तसा निव्वळ मरतुकडा..पण त्याचं तोंड म्हणजे काय विचारायची सोय नाही! नुस्ता बोलुनच समोरच्याला निम्मा करणार! बरं, भैर्‍या पडला पैलवानगडी, त्याची अक्कल मुठीत! दोघांची दोस्ती असली तरी भैर्‍याचा तान्या करपाट बोलुन आब्रु काडतो म्हणुन राग तर तान्याचा चारचौघात रट्टे घालुन भैर्‍या अपमान करतो म्हणून त्याच्यावर डुख! आज पारावरच्या मंडळींना पुन्हा एका नविन भांडणाची मजा बघायचा चान्स घावला. दोघांची चांगली जुंपलेली बघुन सगळी मंडळी खुसुखुसु हासत बसलेली, तेव्हढ्यात भैरुनं शेवट्चं हत्यार काढलं आणि तान्याला पारावरनं ढकलुन जागा बळकावली..पारावर हसण्याचा एकच गलका उडाला!! कुणाची तंबाखु सदर्‍यावर सांडली, कुणाच्या तोंडातल्या पानानं समोरच्यावर फुरकी मारली..सगळा नुसता धुमाकुळच उडला. हसता हसता जन्या लव्हारानं डोळ्यातलं पाणी पुसत बंड्यापुढं टाळीसाठी हात केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आज बंड्या काही बोलतच नाही. त्याचं ह्या दंग्याकडं लक्षच नव्हतं. धोतराच्या टोकात काडी गुंडाळुन त्याची सुरळी करुन कान खाजवत तो कुठंतरी बघतच बसलेला!
"अऽऽय बंड्या..आरं आज ध्यान कुटंय तुझं? मगाधरनं पघतोय, आज निस्ता गप गप का रं? काय वैनी म्हायारी चाल्लीय का उद्या?" जन्यानं धायगुड्याला डिवचलं.
सगळ्यांनी आता धायगुड्या काहीतरी फर्मास उत्तर देइल म्हणुन त्याच्याकडं ध्यान लावलं, तर कसनुसं हसत बंड्या म्हणाला, "कुटं काय? काय न्हाय की!"
"आरं बोल की मर्दा, काय आडचन हाय का?" मास्तरानं धायगुड्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.
"आरं दोस्तांना सांगायचं न्हाई तर कुनाला रं? दोस्तच तर मदतीला येत्यात न्हवं का? क्काय?" आज्या सुतार शेवटचा क्काय भैर्‍याच्या मांडीवर थाप मारत म्हणाला..

पुढे ??????????

1

पुढे ??????????


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शंकर पाट्लांच्या

2

कथा वाचल्याचा आंनद मिळाला. ही क्रमश: आहे का? असल्यास तसा उल्लेख करावा आणि
नसल्यास शेवट काही कळला नाही.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

असेच म्हणतो. सुरवात एकदम

3

असेच म्हणतो.

सुरवात एकदम जबरदस्त झाली आहे...

पण अचानक शेवटी काही कळाले नाही असे फिलिंग आले.. शक्यतो क्रमशः लिहल्या नसल्यामुळे असेल.

* हा पण जर क्रमशः असेल तर तुझी शिकार आम्ही नक्की करु सगळे मिळून हे लक्षात घे धम्या.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पाटिल नाही द.मा.

4

भाषा पाटलांची वापरली आहे पण स्वरूप मिरासदारांच्या भोकरवाडीचे आहे.
धम्या लै भारी रे....
पटापटा पुढचे भाग टाक.

आंबोळी

क्रमशः

5

क्रमशः असा तरी लिहा राव ... का पुढचा भाग लिहिण्यासाठी स्पर्धा ठेवणार आहात ?

धम्या .......थोडेसं कळतय

6

धम्या .......थोडेसं कळतय ...पन ते तसेच आहे की नाही यावर शंका आहे !! बाकी पारावर गप्पा होतीलच !!

रिकामा वेळ!

7

रिकामा वेळ बराच मिळालेला दिसतोय! चालू द्या... वाचतो आहे!

चालू द्यात तुमच्या गप्पा

8

चालू द्यात तुमच्या गप्पा टप्पा ... पण अशा अर्धवट का सोडल्या?

येक्दम जंक्शान

9

येक्दम जंक्शान लिवलंय!!!
कुणाची तंबाखु सदर्‍यावर सांडली, कुणाच्या तोंडातल्या पानानं समोरच्यावर फुरकी मारली..
आनी कुनाची काफी ठॅऽऽ करुन उडाली! ते नाय लिवलं?हास्य

आन्ना, मायनं सांगावा धाडालाय, ज्येवाय चला"
आयला, ती मंडळी लय भाग्यवान हाईत!!!
आमच्याकडं तर, "काय, आता येनार हाय क नाय गिळाया? काय पन ध्यान भेटलंय!!! सवताच्या गवर्‍या मस्नात गेल्या तरी त्या पोरांहून ल्हान हुन धुमडी घालतंय!!!!!", आशी प्रेमळ चौकशी आसतीय!!
चालायचंच, येकेकाचं नशीब!!!!

आन धम्या, तू बेशक क्रमशः लिव! काय करतो त्यो बिकाअण्णा तेच बघूयात!!!!
हास्य
तुजा,
डांबिसकाका

चक्क च्क्क चक्क धम्याचा

10

चक्क च्क्क चक्क धम्याचा लेख...तो पण भांडी घासण्यातून मिळालेल्या सवडीतून....
धमालजी आपण ही मिमराठीची आणी मायमराठीची सेवा करत आहात ते पाहून धन्य झालो.

बाकी क्रमशः असो नसो आम्ही वाचूच....

वा, वा, वा

11

अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. द्मुसेठ, मचाण बांधून झालंय. हाकारे उठलेत. आता होऊन जाऊ द्या शिकार निवांत wink

पुढे काय?

12

लवकर लिव्हा..


- प्राजु

सुंदर सुरवात धम्या.... पण

13

सुंदर सुरवात धम्या.... पण ह्याची शिकार कथा करु नकोस ही विनंती...

धम्या ल्येका, तुला रं काय

14

धम्या ल्येका, तुला रं काय झालं गड्या? आस लिहूनश्यान तू जनू काय आमचा आसा अंत का पाहून राहिलाय. मस्त पाराव बैठक जमल्याली आन तू मातूर रंगाचा भंग करुं र्‍हायलासा. आरं थुत तुज्या ल्येका. ही कथा म्होरल्या बागात संपाया पायजेल तरच पाराव याच्च.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ल्ही बाबा ल्ही रे. पुढचा भाग

15

ल्ही बाबा ल्ही रे.
पुढचा भाग ( लेखाचा) कधी तरी सवडीने टाक.
क्रमश: ल्हिण्याच्या बाबतीत लेखक जे काही ल्हितो त्याचे लिंक ही वाचकानी लावून घ्याची आस्ते हे लक्षात ठेव.
लोकाना जे कळत नाही ते उच्च लिखाण अशी कोणीतरी त्याची व्याख्या केली होती.
असो.
लिहिणाराने लिहीत जावे. वाचकाना कळाले की नाही याची पर्बा करू नये. ते काम वाचक स्वतःच करून घेतील.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

पुढे ??????????????????????/

16

पुढे ??????????????????????/

ह्यांची ? की झिजनार

17

ह्यांची ? की झिजनार लवकरच!!!!!

कट्टयावरच्या काही मंडळींची

18

कट्टयावरच्या काही मंडळींची ओळख पटतीए, वाचतोय.


-Nile

वाचतोय बे...

19

वाचतोय बे...


-निखिल

वाचतोय बे...

20

वाचतोय बे...


-निखिल

छान रंगलीए ,पुढे

21

छान रंगलीए ,पुढे काय??????????????

लिव्हा...

22

पुढच लिव्हा...!
चांगली रंगत चाललेली कथा म्हंटल चमत्कार वाचेन तर कुठ वो काय? काय्च नाही Sad
लिहा पुढचा भाग पटकन...

पुढे????

23

बैठक तर फर्मास जमलीय.. पुढचा भाग लवकर येऊ दे... नाहीतर आहेच तुझी शिकार!!!!

काय धमुशेठ सगळ क्षेम आहे ना?

24

काय धमुशेठ सगळ क्षेम आहे ना? अचानक लेखणी वरची कोळीष्ट्क झटकुन लिहिते झालात.
आनंद आहे. आता त्या लेखणीवर परत धुळ, कोळी यायच्या आत पुढला भाग टाकाच.
न्हाय तर आम्ही आहोतच बंदुक घेउन 'शिकार' करायला wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

हायला!!! धम्स तु पण क्रमशः

25

हायला!!!
धम्स तु पण क्रमशः ??
लवकर लवकर लिहि..

_/\_ माफी द्या

26

_/\_

माफी द्या मायबापहो...
काल घरी जायच्या टायमाला रिकाम्या वेळेत असाच एका गोष्टीचा किडा वळवळला आणि बसलो किबोर्डावर टकटकत! आणि घरी जायच्या गडबडीत झालं चुकुन प्रकाशीत!
गोष्ट अर्धवटच राहिलीये...करतो, पुढे काम करतो आहे हास्य
गरिबावर असाच लोभ ठेवा ही विनंती!

हांगाश्शी!!!

27

हांगाश्शी!!!

जबरदस्त...

28

सुरुवात. वातावरण निर्मिती मस्त झालीये. लगोलग पुढचं शक्यतो एकटाकी लिहुन काढ.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

ह्या अद्भुत कथेची वेळीअभावी

29

ह्या अद्भुत कथेची वेळीअभावी शिकार होउन तिची माती होउ नये हिच अपेक्षा.