प्रिय विनील,
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रिय विनील,
परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?
रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.
तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.
तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.
मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.
तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.
हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.
आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.
हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.
एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.
कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.
तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.
विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.
आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.
विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.
आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.
विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?
हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?
पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.
विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.
तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.
तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.
आय सॅल्यूट यू, सर!
सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.
.jpg)
{काय बोलावे, काय लिहावे काही}
काय बोलावे, काय लिहावे काही सूचत नाही आहे...
सरकारी अधिका-यांची जी वाईट ईमेज आमच्या नजरे समोर होती... त्याच्या चिंध्या झाल्या एवढे म्हणेन. किती प्रचंड काम त्यांनी केले आहे व ते देखील एवढ्या कठीण परिस्थितीतून.. सल्युट !!!!!
लवकर त्यांची सुटका व्हावी व ते पुन्हा आपल्या कार्यात मग्न व्हावेत ही इच्छा.
* हे पत्र येथे प्रकाशित केल्या बद्दल आपला आभारी आहे श्रामो.
Hope is a good thing...
{>>>हे पत्र येथे प्रकाशित}
>>>हे पत्र येथे प्रकाशित केल्या बद्दल आपला आभारी आहे श्रामो.
+१
चांगले अधिकारी असतात पण त्यांना काम करु दिले जात नाही असे ऐकण्यात यायचे. पण ही व्यक्ती तर या सर्वाच्याही पलिकडे जाऊन काहीतरी करतेय, यातून इतर अधिकार्यांनी थोडाजरी बोध घेतला तरी भारतात खूप काम होईल.
मीऽच तो...
{आताच बातमी पाहिली !! विनित}
आताच बातमी पाहिली !!
विनित याची सुटका होत आहे.....
http://www.bbc.co.uk/hindi/india/2011/02/110222_orissa_release_ac.shtml
लगातार छह दिनों क़ी कश्मकश के बाद मंगलवार देर रात को आख़िरकार मलकानगिरी के अपहृत जिलाधिकारी आर विनील कृष्ण और जूनियर इंजीनियर पवित्र मांझी की रिहाई के लिए रास्ता साफ़ हो गया.
माओवादियों की ओर से नियुक्त मध्यस्थों के साथ चार दिन की बातचीत के बाद मंगलवार देर रात उड़ीसा के गृह सचिव यूएन बेहेरा ने पत्रकारों को बताया कि दोनों पक्षों में सभी 14 मुद्दों पर सहमति बन गई है और अपहृत अधिकारियों को जल्द ही रिहा कर दिया जाएगा.
वार्ताकार प्रोफ़ेसर हरगोपाल ने बुधवार सुबह कहा कि दोनों अपहृत लोग रास्ते में हैं और उन्हें किसी भी क्षण रिहा किया जा सकता है. इस संकट के समाधान के लिए माओवादियों और उड़ीसा सरकार दोनों को धन्यवाद दिया.
उनसे पूछा गया कि जब सभी मुद्दों पर दोनों पक्षों में सहमति हो गई है तो फिर रिहाई के लिए और 48 घंटे क्यों लगेंगे?
उनका कहना था, "जहाँ अपहृत कलक्टर और इंजीनियर को रखा गया है वो काफ़ी दुर्गम इलाक़ा है. यही कारण है कि माओवादियों ने उनकी रिहाई के लिए 48 घंटे का समय माँगा है."
प्रोफ़ेसर हरगोपाल ने शुरू से ही कहा था कि मामले को जल्द सुलझाने के लिए माओवादी चिंतक गांटी प्रसादम का बातचीत में शामिल होना ज़रूरी है और आख़िरकार वही हुआ.
कोरापुट जेल में बंद गांटी प्रसादम को मंगलवार सुबह भुवनेश्वर लाया गया. माओवादियों के मध्यस्थों ने मंगलवार को दो बार उनसे झारखंड जेल में लंबी बातचीत की.
दूसरी मुलाक़ात के कुछ ही घंटों के अंदर दोनों पक्षों में सभी मुद्दों पर सहमति बन गई.
माओवादियों ने भले ही 14 मांगे रखी थी, लेकिन अड़चन मुख्य रूप से से माओवादी नेताओं कि रिहाई पर थी.
इनमें से गांटी प्रसादम सहित पांच के ख़िलाफ़ उड़ीसा में दायर मामले वापस लेने के लिए उड़ीसा सरकार के राज़ी होने के बाद ही बात आगे बढ़ी.
Hope is a good thing...
{अतिशय सुखद बातमी. मराठी}
अतिशय सुखद बातमी.
मराठी वृत्तपत्रांचा मात्र तिव्र निषेध..
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{तिव्र निषेध..}
एक छोटी बातमी ईसकाळ मध्ये सोडल्यास, अजून इतर वर्तमानपत्रामध्ये मला तरी ही बातमी पहावयास मिळालेली नाही.
{सुन्न झालोय वाचून आज हे}
सुन्न झालोय वाचून
आज हे वाचताना राहून राहून शहिद भगतसिंगाची आठवण येतेय. परमेश्वरा, आम्हाला हा भगतसिंग मात्र आहे तसा परत हवाय, शहिद म्हणुन नको !!
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती !!
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{आय सॅल्यूट यू, सर! अश्याच}
आय सॅल्यूट यू, सर!
अश्याच अधिकार्यांची देशाला गरज आहे.
{सुन्न झालो वाचून... आनंद}
सुन्न झालो वाचून...
आनंद आहे की त्यांची लवकरच सुटका होत आहे. आय सॅल्यूट यू, सर!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{निशब्द.....}
श्रामो हे पत्र इथ दिल्याबद्दल खुप खुप आभार....
सध्या देशाला अश्याच अधिकारी वर्गाची गरज आहे,
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती !!
{आय सॅल्यूट यू, सर!}
आय सॅल्यूट यू, सर!
{विनित बरोबर जो इंजिनियर}
विनील कृष्ण बरोबर जो इंजिनियर पवित्र मांझी होते त्यांना सोडला पण अजून विनित ला सोडले गेले नाही आहे
Hope is a good thing...
{सरकारी यंत्रणेत काम करताना}
सरकारी यंत्रणेत काम करताना देखील एक गॉडफादर असावा लागतो का? म्हणजे कदाचीत असा प्रसंग आणखी एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्यावर ओढवणार नाही
{धन्यवाद}
'मी तो केवळ भारवाही' !!!
पत्राचे सारे श्रेय सचिनचे. हे त्याला लिहावेसे वाटले. इथे मी दिले ते त्याने सुचवल्यानेच.
{सुन्न झालो वाचून...}
आय सॅल्यूट यू, सर! त्रिवार सॅल्यूट

परेश भास्कर कुंटे
युद्ध आता सुरु होत आहे......
{एक सरकारी अधिकारी काम करायचे}
एक सरकारी अधिकारी काम करायचे असेल तर काय काय करू शकतो याचे विनील हे उत्तम उदाहरण आहे...! नक्षलवादाचे जे मूळ आहे त्यावरच घाव घातलाय त्यांनी ! तो वर्मी बसलाय... विनील सॅल्यूट यू ! आपली लवकरच सुटका व्हावी !
सचिन यांनी एका वेगळ्या ज्वलंत विषयावर अतिशय प्रगल्भ भाषेत भावना व्यक्त केल्यात... विनील यांचे कार्य आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल आभार !
श्रावण मोडक यांचे आभार... तुम्ही हे पत्र इथे भारवाही म्हणून का असेना पोहोचवलेत...
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{pls share it all. काही लोक}
pls share it all.
काही लोक काय काम करत आहेत, हे आपल्या सारख्यांना कधी कळत नाही... जेव्हा कळते तेव्हा त्यांची महती इतरांपर्यत तरी नक्कीच आपण पोहचवू शकतो.. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास मरणार नाही याची दक्षता घेऊ शकतो... प्लीज...
पण आपण जागृत आहोत......... आपण देऊ शकतो.... कसे ही आपल्या मित्रांपर्यंत हा लेख पोहचवा.. मेल, फेसबुक इतर जे साधन असेल त्यांने... !
मराठी मिडिया याला महत्त्व देत नाही आहे...
Hope is a good thing...
{करेक्ट राजे}
राजे, अगदी बरोबर. शेअर करा. सचिनच्या नावासह. तो पहिला परिच्छेद घ्या. ब्लॉगवर टाकलेत तर लिंक द्या.
{श्रामो मी आजच हा लेख कमीत}
श्रामो मी आजच हा लेख कमीत कमी १००० लोकाच्या पर्यंत पोहचवण्याचा संकल्प घेतला आहे...व सुरवात केली आहे.
आपण फालतु फालतु गोष्टी मेल मधून फॉरवर्ड करत असतोच दिवसात... पुढील काही दिवस हा लेख फॉरवर्ड करु.
थोडे तरी काहीतरी आपण समाजाचे देणे लागतो... जे ज्याला समजते तो नक्कीच हा लेख पुढे पाठवेल.
Hope is a good thing...
{मी ही सुरूवात केलीय. माझ्या}
मी ही सुरूवात केलीय. माझ्या ब्लॉगवर, तसेच फेसबुक वरही शेअर केला आहे. आतापर्यंत किमान २०० जणांना ईमेल वरुन पोहोचवला आहे हा लेख !
श्रामो या लेखासाठी आणि शेअर करण्याची अनुमती दिल्याबद्दल खुप आभार
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{विनीलला सोडलंय!}
त्याला नक्षलवाद्यांचं म्हणणं ही कळलं असेल, आता अशांतता विधायक मार्गानी संपण्याची आशा निर्माण होईल!
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
{धन्यवाद}
धन्यवाद मित्रांनो.