क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?

0
0

आम्ही हल्ली विचार करतो. नाही म्हणजे मोठेमोठे विषय झेपत नसल्याने जे सहज जमेल अशा त्यातल्यात्यात साध्यासुध्या विषयावर जरा सराव करतोय. एकदा जमले की मग थोडे गंभीर विषयांवर ट्राय मारूया असा विचार आहे. चला नमनाला घडाभर तेल नको. तर आजचा विषय आहे 'क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?' थोडंसं इस्कटून सांगतो. क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात, किंवा यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडतात, ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षण हे मैदानावर बहुसंख्येने असले तरी ते तुलनेने दुय्यम असतात, मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण मुद्दा असा आहे की हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही. आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे वटकावतो आहे.

  1. एखादा फलंदाज बाद आहे असे अपील झाले असता जर निश्चित निर्णय करता येत नसेल तर ’संशयाचा फायदा’ फलंदाजाला दिला जातो. (चला ठीक आहे, तो एकदा बाहेर गेला की त्याला दुसरी संधी मिळत नाही म्हणून हे योग्य म्हणूया.)
  2. हल्ली एकदिवसीय नि वीस-वीसच्या जमान्यात गोलंदाजाला लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याची सोय नाही, लगेच वाईड दिला जातो, ज्याचा अर्थ प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
  3. एकदिवसीय नि वीस-वीसच्या सामन्यात एका षटकात एकच बाउन्सर (डोक्यावरून जाणारा) टाकण्याची परवानगी आहे. दुसरा टाकल्यास तो नोबॉल ठरवून पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
  4. फलंदाजाच्या कंबरेच्या वर फुल्टॉस टाकल्यास नोबॉल दिला जातो नि यावर फलंदाज बाद दिला जात नाही. पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही. असे चेंडू एका सामन्यात दोनदा टाकल्यास पंच त्या गोलंदाजावर त्या सामन्यापुरती बंदी घालू शकतात. अशीच बंदी फलंदाजाच्या एखाद्या फटक्याबद्द्ल घातली जात नाही.
  5. याशिवाय पारंपारिक कसोटी क्रिकेटमधून आलेले नोबॉल नि वाईड आहेतच. जिथे पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
  6. आणखी एक जिझिया कर म्हणजे एकदिवसीय नि वीस-वीस क्रिकेटमधे क्रीजपुढे पाऊल आल्याने नोबॉल ठरलेल्या पुढच्या चेंडूवर फ्री-हिट बहाल केली जाते. म्हणजे नोबॉलवरच नव्हे तर पुढच्या चेंडूवरही फलंदाज बाद होऊ शकत नाही. हा अन्याय नव्हे काय?
  7. लेग-बिफोर अर्थात पायचीतचे अपील केलेला चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीबाहेर (पक्षी: लेगस्टंप) असेल तर भले चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळणार असेल तरी फलंदाजाला पायचीत दिले जात नाही.
  8. फलंदाजाला ’रनर’ अर्थात धाव-मदतनीस असतो. त्याच्या मदतनीसाने धावलेल्या धावा त्याच्या नावावर नोंदल्या जातात. क्षेत्ररक्षक देखील काही काळ मैदानाबाहेर जाऊन आराम करतो, ज्या काळात त्याच्याऐवजी बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या कामात दुस‌र्‍या व्यक्तिची मदत घेता येते, मग गोलंदाजाला अशी सुविधा का नसते?
  9. फलंदाज फलंदाजी करताना मधेच उलट्या दिशेने फिरून ’रिवर्स स्वीप’ किंवा तत्सम पलटी शॉट मारू शकतो, पण गोलंदाज मधेच हात बदलून उजव्याऐवजी डाव्या हाताने गोलंदाजी करू शकत नाही. किंवा गेला बाजार न सांगता ओवर द विकेटच्या ऐवजी अचानक राउंड द विकेट चेंडू टाकू शकत नाही.
  10. एवढेच नव्हे तर त्याने चेंडू टाकताना हाताची हालचाल कशी असावी यावरही काही निर्बंध आहेतच नि त्याअनुसार अधेमधे काही गोलंदाजांचे चेंडू अवैध ठरवले जाऊ शकतात व त्या गोलंदाजावर बंदीही येऊ शकते. फलंदाजावर एखाद्या नियमानुसार अशी बंदी घातली जाऊ शकते का? माझ्या ऐकिवात तरी असा काही नियम नाही.
  11. फलंदाज खेळी चालू असताना कितीही वेळा आपली बॅट वा अन्य साधने बदलू शकतो पण गोलंदाजाला मात्र ही सोय नाही. केवळ चेंडू फार खराब झाला असे पंचांचे मत झाले तरच त्याला नवा चेंडू मिळू शकतो.
  12. आपली बॅटला चिकटपट्ट्या लावून भक्कम करण्याची फलंदाजाला परवानगी आहे, पण एखाद्या गोलंदाजाने जरासे वॅसलीन लावले तर गदारोळ होतो नि त्याची कारकीर्द संपुष्टात येते.
  13. बॅटचे वरचे रबर खेळताना त्रास देत असेल वा बॅटचे गटिंग नको असेल तर फलंदाज ते कापून टाकू शकतो. पण गोलंदाजाला चेंडूची शिवण जरा उसवून सैल करावीशी वाटली की लगेच त्याच्या कारवाई होते.

वरील ढीगभर निर्बंध पाहिले नि फलंदाजांना जाचक असे काय नियम आहेत हे पहायला गेलो तर एक फुटकळ नियम सापडला तो म्हणजे फलंदाज एकदा आउट झाला की त्या इनिंगमधे तो पुन्हा खेळू शकत नाही, फुस्स. याशिवाय एखादा असा नियम आम्हाला काही नोंदवता आला नाही ज्यात एखाद्या चुकीबद्दल फलंदाजाला शिक्षा केली जाते नि गोलंदाजाला अप्रत्यक्ष फायदा होतो. तुम्हाला आठवतोय का एखादा नियम, पहा बरं जरा.

हे सगळे नियम पाहता क्रिकेट हा फलंदाजांसाठी पक्षपाती खेळ आहे असे आमचे मत झाले आहे. हल्ली पद्धत आहे त्यानुसार 'आपले काय मत आहे?' असा प्रश्न घेऊन आलोय. बोला बघू पटपट.

{तज्ञांच्या मतांची वाट पहात}

1

तज्ञांच्या मतांची वाट पहात आहे

{हा हा हा ! मज्जा आली,}

2

Laughing out loud

हा हा हा !
मज्जा आली, गोलंदाजाच्या दृष्टीने कधी क्रिकेट पाहिलेच नाही wink
आमचे क्रिकेट सचिन पासून सुरु सचिन पाशी समाप्त हास्य


Hope is a good thing...

{हो माझा ही तसेच आहे}

3

सचिन ची फंलदाजी हवे ...

{लेख विचार करावयास लावतो खरा.}

4

लेख विचार करावयास लावतो खरा.

{आता यावर एक वेगळा लेखच लिहायला हवा...}

5

आठवड्याभरात या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहीतो आणि यावर अधिक उजेड पाडायचा प्रयत्न करतो. बाकी चांगल्या विषयाला सुरूवात करून आमच्या मेंदूला चालना दिल्याबद्दल धन्यवाद.


चेतन सुभाष गुगळे
+९१९५५२०७७६१५
http://at-least-i-think-so.blogspot.com/

{रमताराम यांच्याशी}

6

रमताराम यांच्याशी असहमत,
क्रिकेट मध्ये फलंदाजाच्या बाजूने जरी नियम केले असले तरी क्रिकेट्मध्ये सर्वाधिक दडपण हे फलंदाजांवरच असते फलंदाजाला बाद होण्यास एक चेंडू पुरतो पण त्याला धावा करण्यासाठी कितीतरी चेंडूवर चांगले फटके मारावे लागतात

त्यासाठी हर्षा भोगले यांचे आउट ऑफ द बॉक्स हे पुस्तक जरूर वाचावे.ते खालील संकेतस्थळावर उपल्ब्ध आहे.

http://www.flipkart.com/books/0670083054?pid=k3w3f9bd2b&_l=CJHVEqJO3veuH...


माझा ब्लॉग http://world97.blogspot.com/

{अरेच्या}

7

बाकीचे प्रतिसाद कुठे गेले? या धाग्यावर बरीच चर्चा झाली होती राव. राजेऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{मी पण तेच म्हणार होतो मागे}

8

मी पण तेच म्हणार होतो मागे एकदा जेव्हा मी हा लेख वाचला होता तेव्हा येथे बरेच प्रतिसाद होते.काहीतरी घोळ आहे नक्कीच


माझा ब्लॉग http://world97.blogspot.com/

{क्रिकेट खेळाबद्दल जास्त}

9

क्रिकेट खेळाबद्दल जास्त माहिती नाही पण लेख वाचला त्याची पावती.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही