कथा - कॉस्टयुम डिझायनर !!!!

0
0

कॉस्टयुम डिझायनर !!!!!

सकाळी सकाळी विशाखा ताईंचा फोन आला, त्यावेळेस साडेनऊ झाले होते, म्हणाल्या "वहीनी, सुजाने कॉस्टयुम डिझाईन केलेला सिनेमा आज गोपी मॉलला रिलिज होतोय. मी पासेस आणले आहेत, तुला तीने आग्रहाच आमंत्रण केले आहे. ती कामासाठी बाहेर गेलीय. त्यामुळे तिला नाही येता येणार.....आणि चित्रपट सृष्टीतील बरीच मंडळी येणार आहेत म्हणे....पहील्या शो ला....!! हो कां!! मी पण एक्साईट झाले. पण तरी म्हटल, "अहो काल कां नाही केलात फोन? आता कसं जमतय बघते." "अगं, इतकी कसली कामं, साडेबाराचा शो आहे, येत असशील तर तुमच्या कॉम्प्लेक्स वरुन घेते रिक्शा", "तसं नाही हो, माझे दोन प्रॉब्लेम आहेत......एक म्हणजे नवरात्रीतली अष्टमी आहे त्यामुळे गुरुजी येणार आहेत सप्तशतीचा पाठ वाचायला. त्यांना अकरा पर्यंत बोलावलय....पाठ दोन तास चालतो आणि दुसरं म्हणजे आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी साडेतीन वाजता नवरात्री निमित्त "नऊवारी साडी" स्पर्धा आहे......मी भाग तर घेतला आहेच, पण सगळ्या कार्यक्रमाच नियोजनही माझ्याकडे आहे.

"पाठाला त्या ’शेंडीवाल्या" श्री गुरुजीला सांगीतलय ना? तो ताईच्या नंणदेचा मुलगा.....मग काय काम असत ग त्याला....रिकामाच तर असतो....लगेच फोन करुन लवकर यायला सांग", विशाखा ताईंच्या सुचना चालल्या होत्या. गुरुजींबद्दल केलेलं अस वक्तव्य मला अजिबात आवडल नाही....हे गुरुजी त्यांच्याकडे जायला तयार नसायचे ना म्हणुन वैयक्तीक आकसापोटी हे ताशेरे. "आणि नऊवारी साडीचच म्हणशील तर तु साडी नेसुनच निघ....आपण अगदी वेळेवर पोहोचु म्हणजे पटकन थिएटर मध्ये गेलं की कुणी नाही बघणार....आणि सोसायटीच्या मैत्रिणींना फोन करुन, तु साडे तीन पर्यंत येतेयस म्हणुन कळवुन टाक....पण तु ये ग......." त्यांनी त्यांच्याकडुन माझे सगळे प्रॉब्लेम्स सोडवले होते. आता इतक आग्रहाचं आमंत्रण नाही कसं म्हणणार? शिवाय डोळ्यासमोर चित्रपटातील मान्यवर मंडळीचे चेहेरे येत होते.....त्यामुळे वाटेल ती अडचण आली तरी जायचेच....हे नक्कीच ठरवले होते. आता हातातली कामं टाकुन मला हे सगळे फोन करायला हवे होते. पहीला फोन गुरुजींना लावला....त्यांनी लवकर यायला लगेचच हो म्हटल.....मला खुप विशेष वाटल.....एवढा डिप्लोमा इंजिनियर, पण मध्ये कंपनीत प्रॉब्लेम झाला नोकरी गेली, घाबरला नाही, सरळ पौरोहित्याचे शिक्षण घेतले आणि भिक्षुकी चालु केली. आमच्या सगळ्यांचाच तो "परमनंट गुरुजी" होता. नंतर ’मुन्नी’ला फोन लावला. ही ’मुन्नी’ म्हणजे आमची ’डोअर-स्टेप ब्युटीपार्लर’ वाली आमच्याकडे फुलके करणा-या भाभींची मुलगी. लग्नानंतर हा व्यवसाय सुरु केलेला.....ब्युटीपार्लरची सर्व्हीस घरी येऊन देणारी......फेशियल, हेअर मसाज, मेहेंदी....काय पाहीजे ते "अ‍ॅट यूअर डोअरस्टेप!!" आता ती एवढी तंदुरुस्त, तिचा ’आकारही’ एवढा मोठा तरीही तिचं नांव मुन्नी कां? मला आजपर्यंत न उलगडलेले कोडे...आमच्या घरात अगदी घरच्या सारखी वावरते.....तिला तेरा प्रकारच्या साड्या नेसवायला येतात, म्हणुन तिला बोलावल होत, नऊवारी साडी नेसवायला. आता तिच्याशी बोलायच म्हणजे तिच्या टिपेतल्या आवाजातल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची...तरी लावला फोन..."मुन्नी, जरा दुसरा काम निकल आया है, तु तिन बजेके बदले बारा बजे आयेगी क्या?.....हा चलेगा!! तिन असं म्हटल आणि माझा जिव भांड्यात पडला. मनात एक विचार तरळला....तिथे ’फर्स्ट डे फर्स्ट शो ला’ सगळी मोठी मोठी मंडळी येणार....आणि मी काय हे ध्यानासारख नऊवारी नेसुन जायच....पण काही इलाजच नव्हता. कॉम्प्लेक्स मधल्या कार्यक्रमाच नियोजन, संकल्पना माझीच होती त्यामुळे गुगली देण शक्यच नव्हत, मग सोसायटीच्या मैत्रीणींनाही लगेचच निरोप देऊन टाकला. सगळी ’फिल्डींग’ बरोबर लागली.....मग विशाखा ताईंना फोन करुन येतेय म्हणुन सांगीतल.

केशरी रंगाच्या साडीला हिरव्या रंगाचे काठ आणि हिरवं ब्लॉउज. मुन्नीने झकास नेसवली साडी. वरती केसांचा खोपा....!! ऑंटी बहोत अच्छी लग र्ही हो आप"!! मुन्नीने तिच्या टिपेतल्या आवाजात कॉमेंट दिली. मी म्हटल, "कुछ भी"!! अस म्हणतेय तेवढयात विशाखा ताईंचा फोन..."खाली उतर, पाच मिनिटात येतेय कॉम्प्लेक्स पाशी" त्यांच्या ऑर्डर्स एकदम खणखणीत आवाजात असतात....वन्स ना!! बापरे साडीमुळे सॉलिड कॉन्शस व्हायला झालं होतं. मी पटपट नऊवारीवर घालायचे दागिने....ठुशी....मोहनमाळ.....नथ....खोप्यावर लावायचे फुल सगळं पर्स मध्ये घातलं, आम्ही दोघी खाली उतरलो तर समोरच रिक्शा आणली होती. नेहेमीच्या स्वत:च्या पायावर धोंडा पाडुन घ्यायच्या सवयीप्रमाणे मुन्नीला म्हटलं, तु पण वेस्टला रहाते ना चल गोपी मॉल पर्यंत.....त्याबद्दल विशाखा ताईंच्या चेहे-यावर उमटलेली नाराजी मी टिपली. मग अगडबंब देहाची मुन्नी, मी, विशाखा ताई आणि त्यांची छोटी नात...’ननू’ सुजाची मुलगी. अशी आमची वरात वेस्टला गोपी मॉलला निघाली. खुपच वेळेवर निघालो होतो, सिनेमा चालु होऊन जातो की काय याचं दडपण आलं होतं "श्रेयनामावली" बघायची होती ना....त्यामुळे रिक्शावाल्याच्या पाठीमागे दर पाच मिनिटांनी, "भय्या, जरा जोरात चालव रे.....तो ’भय्याच’ ना त्यामुळे तो त्याच्याच पद्धतीने चालवत होता....वर त्याच्या खास ’भय्या’ भाषेत ’डोंबिवलीच्या खडड्यांवर प्रवचन देत होता...."काहे को पनिक (पॅनिक!! बापरे डोंबिवलीतला भय्या चक्क इंग्लीश बोलत होता) होत मांजी.....इह खड्डांसे कैसी चलाउ रिकसा.....शिणेमाकी जरासी शरुआत ना देखी तो चलत है, पर इह जानसे काहे को खेलना!!! आम्हाला "भिक नको पण कुत्रा आवर" या म्हणीच्या चालीवर "हळु चालव पण प्रवचन नको" असं झालं होतं. एकदाचा आला गोपी मॉल. विशाखा ताई ननू ला घेउन वरच्या मजल्यावर पळत निघाल्या. मी ही माझ्या नऊवारीला सांभाळत त्यांच्या मागे धावले. तिकिट काउंटरला पास जमा करुन तिकिट घ्यायची होती. आम्हा पुर्वेकडील मंडळीच पश्चीमेकडे येणं होत नाही,....त्यामुळे गोपी मॉल होऊन बरेच दिवस झाले होते, पण बघायचा योग मात्र आत्ता आला होता..... त्यामुळे थिएटरचा दरवाजा कुठे आहे समजतच नव्हते. तिथल्या सिक्युरिटीने आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही तिघीही धावतच लिफ्टमध्ये शिरलो....एन्ट्री गेट जवळ आलो.....गेटवरच्या माणसाला विचारले...."सुरु झाला का?"......तो पण बहुतेक ’भय्याच’ असावा, एक जांभाई देत म्हणाला...."हां, अभी शुरु हुआ है!! तिघीही लगबगीने पाय-या चढत होतो......अन समोरच स्क्रीनवर श्रेयनामावली झळकत होती......"वेषभूषा - सुजा सामंत", विशाखा ताई भान विसरुन जरा मोठया आवाजातच बोलल्या, "वहीनी, ते बघ सुजाच नांव" आम्ही अंधारात ते पडद्यावरच नांव वाचल आणि "याच साठी केला होता अट्टाहास!!" असे सुर मनात आळवत धप्पदिशी मिळेल त्या खुर्चीवर जाऊन आदळलो.....आता पुढच्या श्रेयनामावलीशी आमचं तस काही देणं घेणं नव्हत. सकाळची फोनाफोनी आणि धावपळ यामुळे दमायला झालं होतं......मग आम्ही आमच्या बॅग मध्ये काय काय खायला आणले होते त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली.....वेफर्स....बटाटा कचोरी.....आता आमची पिकनिक सुरु झाली होती. त्यात ननूची बडबड सुरु होती, "विशाखा आजी, हा मम्माचा पिक्चर नां ग, मग मम्मा दिसत नाही याच्यात कुठे??? ननूच्या तोंडात एक भले मोठे चॉकलेट देऊन तिचे तोंड बंद केले.....मस्त खाण्याचा सपाटा लावला होता.....मधुन मधुन सिनेमा पण बघत होतो. आता अंधाराला डोळे सरावले.....आजुबाजुच्या ब-याच खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. सगळी मान्यवर मंडळी बहुतेक पुढे बसली असतील. विशाखा ताईंचा क्लास चुडिदार....आणि माझी नऊवारी!!! बापरे!!! मनातल्या विचारांना बाजुला सारुन थोडं सिनेमावर लक्ष केंद्रीत केलं. लो बजेट सिनेमा दिसत होता......"कॉस्टयुम डिझाईन" नावाची गोष्ट काय होती समजतच नव्हते......सिनेमाची हिरॉईन सबंध सिनेमाभर सुजाच्याच दोन साडया नेसुन वावरतांना दिसत होती....."विशाखा ताई, या सुजाच्याच साडया दिसताय", मी त्यांच्या कानात कुजबुजले...."बहुतेक, तु बघ ग शांतपणे सिनेमा", त्यांना जरा फणकारा आल्यासारखा वाटला.बरीचशी खादाडी करत, चुळबुळ करत.....ननूने बडबड केली की तिच्या तोडांत चॉकलेट कोंबत, एकदाचा सिनेमा संपला....थिएटर मध्ये लाईट लागलेत........आणि काय आश्चर्य!!! थिएटरमध्ये इनमिन ’साडेचार’ व्यक्ती!!! "मी, विशाखा ताई, ननू (अर्धी), खुप अंतरावर पुढे.....सिनेमाची हिरॉईन आणि तिची आई. आम्ही दोघी तिला भेटायला गेलो, ती विशाखा ताईंशी छान बोलली, पण माझ्या अवताराकडे मात्र विचित्र नजरेने बघत होती...एखाद्या झुरळाकडे बघाव तसं....मला उगीचच माझ्या वॉर्डरोबमधले डिझाईनर चुडिदार आठवत होते, "छान झालय तुमच काम" असं म्हणत मी तिला हात मिळवायला गेले पण तिने शेकहॅन्ड केलाच नाही. जाऊदे गेली उडत, कुठे मोठी हिरॉईन वाया चाललीय....थिएटर तर रिकाम पडलय, तरी एवढा शिष्टपणा!! मनातले संवाद चालु होते.

बाहेर पडलो तर माझ्या नऊवारी साडीचा पार बोजवारा उडाला होता. सकाळपासुनची धावपळ आणि ते नऊवारीच बुजगावणं....आता मात्र डोळ्यात पाणी यायला लागलं होतं....इकडुन, तिकडुन सुटायला लागलेल्या साडीला आवरणं मुष्किल झालं होतं. "थांब, वहीनी, मी तुला सगळीकडुन निट पिना लाऊन देते." मग आम्ही कॅरिडॉर मधल्या एकांत असलेल्या भागात सटकलो. विशाखा ताईंनी सगळीकडे टकाटक सेफ्टी पिना लावल्यात. आम्ही अवघडलेल्या अवस्थेत बिल्डिंग मध्ये पोहोचलो.....मी रिक्शातुन उतरले तर सगळ्या बायकांनी मला गराडा घातला, "अगं होतीस कुठे, तुझीच थिम आणि तु गायब? काय हे? तुझं नांव तीनदा पुकारुन झालय. जा लवकर स्टेजवर. पर्समधले सगळे दागिने पटपट अडकवले आणि मी स्टेजवर पोहोचले.....दहा मिनिटे तिथे काय गोंधळ घातला माहीत नाही पण परफॉरमन्स संपवुन स्टेजच्या खाली आले आणि मैत्रीणींना म्हटल, अगदी पंधरा मिनिटात घरी जाउन येते...घरी आले....इथे..तिथे टोचलेल्या सेफ्टी पिना काढल्या....फराफरा साडी काढुन फेकली. छान आंघोळ केली, डोक्यावरचा तो घट्ट खोपा सोडला. हलकासा मेक-अप केला. माझा आवडता ’लक्की’! पांढरा आणि बेबी पिंक कॉंबिनेशनचा चुडिदार घातला, केसांना दोन नाजुक हेअरक्लिप्स लाउन मोकळे सोडले, छानसा रॉयलचा परफ्युम उडवला....गरम चहा घेऊन खाली उतरले. दिडशे स्पर्धक होते....स्पर्धा संपायला आली होती....निकाल यायला निदान एक तास लागणार होता.....मग बिल्डिंगचा भोंडला झाला. मी शांतपणे खुर्चीवर बसले होते. मान्यवरांच्या हातात निकाल आला होता. रोटरीच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा "राधिका सप्रे" याच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता. आणि मग उत्कंठा वाढवत वाढवत त्यांनी पुरस्कार जाहीर केले......आजचा हा प्रथम पुरस्कार जाहीर होतोय...सौ...........बापरे!!! माझं नांव ऐकलं आणि आश्रर्याचा जबरदस्त धक्का बसला मला.....मान्यवर बोलत होत्या......"यांच्या नऊवारी साडीचं प्रेझेंन्टेशन म्हणजे.....’जुन्या आणि नव्या काळाचा संगम’ त्यांची साडी, दागिने, केसांची स्टाईल ही जुन्या पद्धतीची होती...पण त्यांचा स्टेजवरचा "वॉक"!!! तो मात्र नविन काळातला..........प्रत्येक पावलागणीक बदलणारे चेहे-याचे हावभाव!!!

मी जोरात डोक्याला हात लावला....मनात म्हटल....कप्पाळ माझं....अहो मॅडम......पायाजवळ लावलेल्या चारही सेफ्टी पिना उघडल्या होत्या....आणि प्रत्येक पावलागणीक पोटरीला टोचत होत्या, त्यामुळे वेडीवाकडी पडणारी पावलं......आणि प्रत्येकवेळी पिनेच्या टोचण्यामुळे होणा-या वेदना...आणि त्यामुळे चेहे-यावरचे बदलणारे भाव!!! शतश: धन्यवाद ग तुमच्या परिक्षणाला आणि तुमच्या नव्या जुन्याच्या फ्युजनला!!

पण तरीही, नऊवारी नेसुन सहजपणे काम करणा-या सासुबाई.......एखादी तरुण मुलगी जीन घालुन जितक्या सहजतेने वावरेल तितक्या सहजतेने वावरणा-या आत्येसासुबाई.....अन नऊवारी साडी नेसुन घोडयावर बसून हातात ढाल तलवार घेऊन लढाई करणारी झांशीची राणी!! आणि सगळ्यात....लाल जरी काठी....सोनेरी बुंदक्यांच नऊवारी नेसुन दहाही हातांमध्ये शस्त्रे घेउन, व्याघ्रावर बसुन जगाच रक्षण करणारी ती अंबामाता....आदीमाता!! सगळ्यांची आठवण झाली आणि मी त्यांना मनोमन वंदन केलं.

{नेहमीप्रमाणे ही पण मस्तच}

1

आवडली हास्य

{छान आहे कथा}

2

विनोदी ढंगाने जाणारी. ओघवती आणि लाघवी लेखनशैली यामुळे तुमची प्रत्येक कथा वाचनिय. लिहीत रहा, पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

{छान कथा आहे...पण त्या}

3

छान कथा आहे...पण त्या हिरवणीने शेकह्यांड नाही केला तर फाडकन बोलायचं तरी तिला?

{मस्तच}

4

मस्तच हास्य


Hope is a good thing...

{मस्त}

5

मस्त लिहलय!

{राजे, शुभांगी, शिल्पा, स्नेहाराणी}

6

तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.


दिप्ती जोशी

{विनोदीच पण...}

7

विनोदीच पण क्लासिकल विनोद. जसं हिपहॉप म्युझिकच्या भाऊगर्दीत क्लासिकल म्युझिक वेगळं उठून दिसतं तशी तुमची ही क्लासिकल विनोदी कथा इतर विनोदी लिखाणांपेक्षा जरा हटके आहे.

आवडली.

अशाच अजून येऊद्या.


चेतन सुभाष गुगळे
+९१९५५२०७७६१५
http://at-least-i-think-so.blogspot.com/

{छान खुलवली }

8

खरच खूप छान खुलवली आहे कथा, प्रथम दर्शनी नावा प्रमाणे एखाद्या कॉस्टयुम डिझानरची व्यथा किंवा कथा असणार असे वाटत असताना छान कलाटणी दिली, मजा आली वाचताना. असे छान लेख लिहा.

{चेतन, नाम गुम जाएगा,}

9

धन्यवाद.


दिप्ती जोशी

{छान कथा आहे.}

10

छान कथा आहे.

{HAT'S OFF !!!}

11

HAT'S OFF !!!

{HAT'S OFF !!!}

12

HAT'S OFF !!!

{छान लिहिली आहे कथा....}

13

मस्तच....


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{कथा आवडली.}

14

कथा आवडली.


Hope is a good thing...

{मनिमाऊ, दत्तात्रय जोशी, परिजा}

15

धन्यवाद.


दिप्ती जोशी

{राजे,}

16

तुम्हाला कथा आवडली, मनापासुन धन्यवाद, खुप दिवसांनी मागील वर्षीच्या लेखनस्पर्धेतील या कथेला मिळालेला हा प्रतिसाद वाचुन खुप आनंद झाला.

परत एकदा धन्यवाद.


दिप्ती जोशी