पत्रकारितेतला राडा...
सध्या माध्यमांमधे पत्रकारितेतील नीतीमत्तेबाबत बरेच विचारमंथन सुरु आहे. (बरे असते कधी कधी विचार करणे पण!) हे सगळे नेमेची येतो पावसाळा पद्धतीने सुरु असते. शेवटी पत्रकारिता म्हणजे वैचारिकतेवर आधारित बुद्धीवादी व्यवसाय (!) त्यामुळे त्या व्यवसायात रहायचे म्हणजे विचारमंथन करावेच लागते. अन विचारमंथन करायचे झाले तर सगळ्यात सुप्पर-डुप्पर हिट विषय एकच - नीतीमत्ता. त्यामुळे कुठेही काहीही झाले की सुरु होते नीतीमत्तेबाबतच्या विचारमंथनाचे दळण.मग तो २६/११ प्रकरणातील माध्यमांची भुमिका असो, विकीलिक्स ची गळती असो कि २ जी स्कॅमला फुटलेला नीरा राडीया प्रकरणाचा फाटा असो; विचारमंथन लगेच सुरु होते अन त्या गिरणीचा आवाज एव्हढा वाढतो की मुळ प्रकरण त्यात बाजुलाच रहाते. हौशे, नवशे, गवशे... सगळ्या प्रकारच्या विचारवंतांना आपले विचार लोकांपुढे मांडण्याची घाई एव्हढी असते की वृत्तपत्रे, नियतकालिके, वेबसाईट, ब्लॉग्ज अश्या सगळ्याच माध्यमांमधुन विचार अगदी ओसंडुन जातात अन या सर्वाच्या केंद्रस्थानी जो असणे आवश्यक असते तो सामान्य वाचक यातले काय खरे अन काय खोटे हे कसे ठरवावे म्हणुन हतबुद्ध होतो.
सध्या विचारमंथन सुरु आहे ते नीरा राडीया-काही ज्येष्ठ व वरिष्ठ पत्रकार-राजकारणी-उद्योजक यांच्यातील कथित युतीच्या निमित्ताने. नेहमीप्रमाणे यात तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत - १) काय सांगता? पत्रकारिता एव्हढी सडली आहे? आम्हाला हे माहितीच नव्हतं. (थोडक्यात बोलायचे तर मी नाही बाई त्यातली.) २) अश्या प्रवृत्ती ही पत्रकारितेला लागलेली कीड आहे. त्यांच्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता संपत आहे. त्यांचा नायनाट व्हायलाच हवा. (हे म्हणजे शिवाजी महाराज जन्माला यायलाच हवेत पण माझ्या घरात नको असे म्हणल्यासारखे वाटते अनेकदा.) ३) पहा सांगत होतो ना आधीच कशी पत्रकारिता विटाळली आहे ते? तेव्हा माझे म्हणणे कुणीच गांभीर्याने ऐकुन घेत नव्हते आता कळले? (हे म्हणजे अगदी बंड्या खोड्या करत असताना स्वतःच्या गप्पात रमलेली सगळी मोठी माणसे तो पडल्यावर बघ सांगत होतो खोड्या करत नको जाऊस. आता पडलास ना असे तो सणकुन आपटल्यावर त्याच्यावर ओरडतात ना तश्या प्रकारे वाचावे.) आता एव्हढे सगळे सुरु आहे तर आपण का फुका संधी दवडा स्वतःचे वैचारिक अस्तित्व दर्शवायची म्हणुन ही आमची गाड्याबरोबरच्या नळ्याची वरात.
लो. टिळक, आगरकर, म. गांधी, डॉ. आंबेडकर अश्या अनेक थोर मंडळींचा वारसा आपल्याला आहे हे सतत उच्चरवाने सांगणारी पत्रकारिता आज लोकांना विश्वासार्ह वाटत नाही हे माध्यमातील मंडळींच्या मनावर ठसविण्यासाठी खरे तर अशी प्रकरणे गरजेची नाहीत. वृत्तपत्रांमधील वाचकांचा पत्रव्यवहार नावाने सतत छापुन येणारा त्याच लोकांचे त्याच त्या प्रचारकी थाटाचे लेखन, वेगवेगळ्या प्रसंगी माध्यमांबाबत वाचकांकडुन दर्शविली जाणारी उदासीनता आणि काहि प्रसंगी केला जाणारी उपहासात्मक बोचरी टीका हे सर्व काय दाखवतात हे न समजण्याएव्हढी माध्यमातील माणसे बुद्धीहीन आहेत? अर्थातच माध्यमातील माणसे बुद्धीहीन नाहीत तर ती या सर्वांकडे पाहणे सोयिस्कररित्या टाळतात. टीकाकारांचा उपमर्द करणे आणि त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे (मग ते वाचक का असेनात), थोडक्यात विरोधाला अनुल्लेखाने मारणे सर्वात श्रेयस्कर असते हे ती जाणतात. माध्यमांची समाजाशी, वाचक्/श्रोत्यांशी असलेली नाळ त्यामुळेच तुटते आहे हे देखील ते जाणतात. यामुळे माध्यमे सत्त्वहीन, शक्तीहीन होत आहेत हे ती समजतात. परंतु हे मान्य करणे गैरसोयीचे असल्याने हे सर्व गुलदस्त्यात ठेऊन माहितीचे प्रसारण, समाजप्रबोधन आदि हेतु बाजुला ठेवुन केवळ रंजन करुन खप्/टीआरपीचे कागदी घोडे नाचवितात आणि ही कागदावरची शक्ती वापरुन स्वतःला मुळात नसलेले परंतु शक्तीकेंद्रांशी व्यवसायानिमित्त येत असलेले अनैतिक अथवा ननैतिक अधिकार वापरुन फिक्सर बनतात. हे दुष्टचक्र गेली कित्येक वर्षे सुरुच आहे. अर्थातच माध्यमांशी संबंधित सर्व व्यक्ती अश्या आहेत असेही नाही. बर्यागच प्रामाणिक व्यक्तीही माध्यमांमधे आहेत आणि म्हणुनच अजुनही माध्यमांचे अस्तित्व टिकुन आहे. परंतु हे दुष्टचक्र सुरु तरी झाले का अन कसे?
वीस-बावीस वर्षांपुर्वी पत्रकारिता आणि जनसंज्ञापन शिकताना पत्रकारितेची मुलतत्वे शिकलो होतो त्याची आज आठवण होते. तेव्हा सत्य, वस्तुनिष्ठता आणि प्रामाणिकता हा पत्रकारितेचा गाभा असल्याचे आम्हाला वारंवार सांगीतले जाई. अर्थातच तो काळ म्हणजे भारतात शोधपत्रकारिता ऐन बहरात असण्याचा काळ होता. त्यामुळे पत्रकारांच्या भुमिकेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका असत. काहीजण शोधपत्रकारिता आणि स्टिंग ऑपरेशन्स म्हणजे पत्रकारितेचा सर्वोच्च बिंदु समजत तर काहीजण त्याला कमी लेखत. मग यामधे संतुलन साधण्यासाठी संज्ञापनाबाबतच्या आधिकारिक (ऑथॉरिटेरियन), स्वातंत्र्यवादी (लिबरल), सामाजिक जबाबदारीवादी (सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) इत्यादी तात्त्विक बैठकांबाबत माहिती दिली जाईल. त्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलीटी या भागावर भर दिला जाई. प्रशिक्षण संपवुन व्यवसायात दाखल होताना पुर्वासुरी (सीनीअर्स) नवशिक्यांना ठोकुन ठोकुन या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न करत असत. व्यक्तीपेक्षा कुटुंब महात्वाचे, कुटुंबापेक्षा मोहल्ला/ गांव, गावांपेक्षा जिल्हा, जिल्ह्यापेक्षा राज्य अन सर्वाधिक महत्त्वाचे राष्ट्र असे ठसविले जाई. वस्तुनिष्ठ्तेचे पाठ दिले जात. पत्रकारिता हा उदात्त व्यवसाय (नोबेल प्रोफेशन) आहे हे सतत घोकले जाई. एकुण हे प्रशिक्षण अनेक वर्षे सुरु राही.
ही अशी छान घडी बसलेली असताना माध्यमे अचानक रुळावरुन का घसरली? या प्रश्नाचे मुख्य कारण दडलेले आहे ते गेल्या वीस वर्षात बदलत गेलेल्या परिस्थितीत. माध्यमातील बरीचशी मंडळी या क्षेत्रात गेल्या २०-३० वर्षात प्रवेशलेली आहेत.
१९८० च्या दशकाचा उत्तरार्ध आणि १९९० च्या दशकाचा पुर्वार्ध हा भारतातला स्थित्यंतराचा काळ होता. स्वातंत्र्यानंतरचा समाजातला नवराष्ट्रनिर्मितीचा जोम तोवर उसरला होता. सरकारी यंत्रणा, निमसरकारी यंत्रणा, सहकार आदि विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार रोजच उघड होत होता अन शोधपत्रकारितेमार्फत त्या सर्व भ्रष्टाचाराला केवळ राजकारणीच जबाबदार आहेत असे चित्र उभे रहात होते. सत्तेचा समतोल ढासळत असताना, विविध राजकीय पक्ष जनतेला धार्मिक, जातीय भावनिक आवाहने करुन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातुन कायदा सुव्यवस्था धोक्यात येत होती. दहशतवाद हा काही ठराविक राज्यांपुरता मर्यादित न राहता देशभर पसरलेला असाध्य रोग ठरत होता. बड्या धेंडांचा माजोरीपणा, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, ननैतिकता उघडकीला आणणार्याी शोधपत्रकारितेमार्फत मोठा तोटा म्हणजे वाचकांची सर्वच यंत्रणेवरचा विश्वास त्यातुन उडु शकतो. याच कालावधीत तो देखील हळुहळु स्पष्ट होत होता. दुसर्या् बाजुला भारतात माहिती तंत्रज्ञानाची क्रांती सुरु झाली होती अन परदेशातील संधी निम्न व उच्च मध्यमवर्गियांना खुणावत होत्या. लंकेत सोन्याच्या विटा पद्धतीची पाश्चिमात्य देशांतील सुबत्तेची, सुख-समृद्धीची स्वप्ने या मोठ्या वर्गाला पडत होती. अर्थातच डेट्रॉईटमधील वाहन उद्योगांचे वर्णन होताना तेथील प्रदुषण व घेट्टो हे विषय चर्चिले जात नव्हते; शिकागो, सॅनफ्रान्सिस्को, एल ए मधील चंगळीचे वर्णन करताना तेथील माफिया, व ननैतिकतेने उभे रहाणारे कुमारीमातांसारखे प्रश्नांचा उल्लेख होत नव्हता किंवा लंडनच्या वेस्ट एंडमधील सुबत्तेचे वर्णन करताना तेथेही ईस्ट एंड आहे याचा सर्वांनाच विसर पडत होता. अमेरिकेतील उत्तरेकडच्या राज्यांमधील सहिष्णुतेचे वर्णन करताना दक्षिणेकडे अद्याप दिसणार्या वर्णद्वेषाकडे, स्त्रीयांविषयीच्या आकसाकडे व कायदा स्वतःच राबविण्याच्या झुंडशाही प्रवृत्तीकडे डोळेझाक होत होती.
एका बाजुला भारतातील अस्थिर, असुरक्षित परिस्थिती आणि दुसर्या् बाजुला पाश्चिमात्य देशांतील सुबत्तेची भुरळ अश्या परिस्थितीत विकासाच्या सर्व व्याख्याच अर्थकेंद्रित होत होत्या आणि विकासाच्या सर्व संकल्पना व्यक्तीकेंद्रित बनत होत्या. निम्नमध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय यांच्यामधे आपल्यावर सतत अन्याय होत गेला आहे, माजोरी श्रीमंत व लुबाडणारे गरीब यांच्यामधे आपण असुरक्षीत आहोत,केवळ आर्थिक क्षमतेतील वाढच आपल्याला टिकवु शकेल ही भावना निर्माण होत होती व हा विकास कोणत्याही किंमतीवर साधणे हे समाजातील एका मोठ्या वर्गाच्या जीवनाचे इतिकर्तव्य ठरत जात होते. त्याचवेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातच राहणार्यां नाही आर्थिक उन्नतीचे मार्ग खुले केले होते. गरीब निम्नमध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय तर उच्चमध्यमवर्गीय श्रीमंत होत होते परंतु या प्रक्रियेमधे एकुणच राजकीय समज, सामाजिक भान आणि नैतिक जाण यांच्या जोपासनेकडे दुर्लक्ष होत होते.
याचवेळी भारतातील माध्यमांमधेही मोठी क्रांती होत होती. दुरचित्रवाणी या माध्यमाने मुद्रित माध्यमे व नभोवाणी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले होते. दुरचित्रवाणीवर २४ तास बातम्यांचे दळण दळणार्यान वाहिन्यांनी ब्रेकिंग न्युज, एक्स्पोझेस, न्युज अॅेनॅलिसीस नुसते ताब्यातच घेतले नाही तर स्वतःची अशी बातम्यांची वेगळीच व्याख्या तयार केली. नाट्यमय पद्धतीने सादर होणार्याॅ या बातम्या (खाजगीत नाके मुरडत का होईना) पहाणारा वाहिन्यांचा प्रेक्षक वर्ग जसजसा वाढत गेला तसतसा मुद्रित माध्यमांपुढे प्रश्न उभे राहु लागले. त्यातच नाट्यमय पद्धतीने सादर केलेल्या बातम्यांची आवड लागल्याने बहुसंख्य वाचकांच्या दृष्टीने माध्यमे ही करमणुकीचे साधन बनत गेली. एकुणच माध्यमांची वैचारिक दिवाळखोरी सुरु झाली होती.
अश्यातच माध्यमांना लोकांमधिल असुरक्षिततेची भावना, सुबत्तेची ओढ यांची जाण होऊ लागली अन सुरु झाले एक नवे पर्व - फील गुड पत्रकारितेचे, जग कसे सुंदर आहे याचे काळ्या रंगाच्या सर्व छटा वगळुन चित्र रंगविण्याचे. अर्थातच सुंदर दिसणे, छान छान बोलणे हे माध्यमांच्या दृष्टीने महत्त्वाचे बनत गेले. दुसर्याण बाजुला वाहिन्यांनी स्टिंग ऑपरेशन्सचा सपाटा लावला अन त्यातुन निर्माण होणार्यान नाट्यमय बातम्या अत्यंत आक्रमकपणे सादर होऊ लागल्या.
या सर्व घडामोडींमधे पत्रकारांची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारत गेली पण त्याचबरोबर कंत्राटी कामगार पद्धत आल्याने त्यांचा दृष्टीकोणही अधिकाधिक व्यक्तीकेंद्रित होऊ लागला. कमी कष्टात बातमी मिळविण्याची प्रवृत्ती त्यांच्यात वाढु लागली अन अर्थातच पत्रकारितेचे हे बदलते स्वरुप जनमत आपल्याबरोबर आहे असा भास उत्पन्न करुन स्वतःचा फायदा करुन घेणार्यार कॉर्पोरेटस, राजकारणी आणि नोकरशहांनी उठवला.
एका बाजुला या मंडळींनी जाहिरातींव्दारे पैशांची खैरात करुन माध्यमांच्या व्यवस्थापनांना आपल्या भजनी तर लावलेच होते परंतु त्यांचे खरा डोळा होता संपादकीय विभागावर. अन व्यक्तीकेंद्रित आर्थिक विकासाच्या भजनी लागलेल्या संपादकीय विभागातील लोकांची देखील कोणत्याही मार्गाने स्वतःची आर्थिक उन्नती साधायचीच होती. परंतु ही मंडळी स्वतः माध्यमांशी संपर्क साधण्यास कचरत होती. यातुनच सुरु झाली माध्यमातील दलालखोरी.
पश्विमेकडील विकसीत देशातील मुक्त अर्थव्यवस्था आपल्याबरोबर भारतात फक्त मॅकडोनाल्ड, कोका कोला यासारखे ब्रँडच घेऊन आली नाही तर जीवघेणी विषारी स्पर्धा आणि ती जिंकण्यासाठी लागणारी ननैतिकता देखील घेऊन आली होती. यातुनच माध्यमे, अन्य सत्ताकेंद्रे व त्यांचा लाभ घेऊ पहाणारे धनिक यांच्यात संवाद साधुन देणारी एक नवी जमात लॉबिस्ट, स्ट्रॅटेजिस्ट अशी आकर्षक नावे घेऊन जन्माला आली. यातील काही ननैतिक मध्यस्थांनी साम, दाम, दंड, भेद अश्या सर्व मार्गांचा वापर करुन आपल्या बोलवित्या धन्याचा अन स्वतःचा प्रचंड फायदा करुन घ्यायला सुरुवात केली. या फायद्यातील पत्रकारांचा महत्त्वाचा सहभाग लक्षात घेऊन त्यांनी माध्यमातील लोकांनाच त्यात ओढले.
या सर्व पैशांच्या खेळात तोवर तोट्यातच चालणार्याम माध्यमांना पैसे दिसु लागले आणि ती देखील तत्त्वांपासुन ढळु लागली. ही व्हर्नरेबिलिटी हळुहळु वाढत गेली तशी पत्रकारिता अधिकाधिक `वस्तु'निष्ठ होऊ लागली.
या सर्व गोष्टी घडत असताना माध्यमांचा केंद्रबिंदु जो वाचक तो देखील अधिकाधिक स्वयंकेंद्रित होत होता. तो माध्यमांकडे करमणुक म्हणुन पाहु लागला होता. अन हळुहळु माध्यमांचे काही खरे नाही अश्या समजापर्यंत तो पोहोचला होता. परंतु एरव्ही कन्झ्युमरिस्ट असलेला तो वाचक आपण पैसे देऊन माध्यमांचा उपभोग घेतो त्या अर्थे आपण कन्झ्युमर आहोत आणि आपले समाधान हेच माध्यमांचे ध्येय हवे या समजेपर्यंत कधी पोहोचलाच नाही. त्याने आपला असंतोष माध्यमांपर्यंत कधी पोहोचु दिलाच नाही. दोन रुपयांच्या बिस्कीट पुड्यात अळ्या निघाल्या म्हणुन न्यायालयाची दारे ठोठावणारा तो वाचक माध्यमांमधल्या या बदलाची अनुभुती घेऊनसुद्धा शांत राहिला. आपल्याला आपल्या पैशांचा पुरेपुर मोबदला न देणारा हा फॉल्टी प्रॉडक्ट खरेदी करत राहिला अन आपण फसवले जातोय म्हणुन स्वतःशीच कुढत राहिला.
वाचक किंवा श्रोता जोवर हा दृष्टीकोण बदलत नाही तोवर हे चित्र बदलणार तर नाहीच पण अधिकाधिक काळेकुट्ट होत राहिल. माध्यमांची झाडाझडती अन साफसफाई होण्याची गरज नक्की आहे. परंतु ती करण्याचा नैतिक हक्क केवळ त्या ग्राहकराजालाच आहे. हा ग्राहकराजा जागा झाला तरच माध्यमांची ही घसरण थांबेल. अन्यथा दर वर्ष सहा महिन्यांनी असेच विचारमंथन होत राहील अन पुढे सर्व थंड होईल.
.jpg)
{प्रसनदा !!}
आत्ताच मटा मधील हा लेख वाचत होतो .
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7090568.cms
माझ्या मते मिडिया जनजागृतीचे काम नियमित करीत आहे (अपवाद असु शकतात आणि टक्केवारी कमी अधिक असु शकते.) बाकी हिन्दी मिडिया ,(इन्डिया टि.व्ही वगैरैंचा तर प्रश्नच येत नाही. काय हास्यास्पद बातम्या देतात एक-एक.).
जनजागृतीचे अनेक पैलु आहेत . त्यातल्या त्यात मिडियाची स॑रकाझम आहेच.
एका बातमीत सरकार पाडणार्यांपासुन ते मोठ-मोठ्या नेत्यांना गजाआड करणारी पत्रकारिता आहे, पण नोकरशंहाच काय ?
{सुहास...}
तु मांडलेला मुद्दा बरोबरच आहे. माध्यमांमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे अनेक लोक आहेत किंबहुना बहुसंख्य लोक प्रामाणिक आहेतच. परंतु मीडीया आणि वाचक यांच्यातले संबंध दुरावलेत यात शंकाच नाही. अन एकदा मजुर अड्ड्यावर बसले की घेणेदेणे असते ते फक्त दिवसाच्या मजुरीशी, मग ती कुठुन का येईना.
पत्रकारांचा वापर फक्त कॉर्पोरेटस, राजकारणीच करुन घेऊ पहातात असे नाही. नोकरशहा देखील ते करण्याचा प्रयत्न करतातच. खरे तर हा एक प्रोफेशनल हझार्ड आहे. माध्यमातील व्यक्तींनी त्याला बळी पडु नये ही अपेक्षा वाचकाने करणे अयोग्य नाहीच. परंतु माध्यमातील व्यक्ती पण शेवटी याच समाजातुन येतात अन समाजाचा एकंदर जो कल आहे तोच त्यांचाही रहातो. यामुळेच वाचक/ श्रोत्यांनी ग्राहक म्हणुन दक्ष राहणे आवश्यक आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{छान लिहिलयस रे प्रसन्नदा. २४}
छान लिहिलयस रे प्रसन्नदा.
२४ तास रतीब घालणार्या 'न्युज' वाहिन्या आल्या आणि वाहिनी चालु ठेवण्यासाठी काय वाट्टेल ते बातमीच्या नावाखाली खपवु लागले.
अश्यात छापील माध्यमातुनही बातम्या छापुन (पेड न्युज) आणल्या जाउ लागल्यात. त्यामुळे एकंदर सर्वच बातम्या देणार्या माध्यमांवरुन विश्वास उडत चाललाय. कोण खर बोलतो आणि कोण खोट ते कळत नाही.
त्यातल्या त्यात अजुनही डीडी वरच्या बातम्या सगळ्यात विश्वासार्ह असाव्यात असे वाटते.
काल NDTV राबवलेला एक कार्यक्रम मात्र आवडला. वाघांना पर्यायाने निसर्गाला वाचवण्यासाठी उघडलेली मोहीम.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{+ १ गणपाशी सहमत. खरं तर}
+ १
गणपाशी सहमत.
खरं तर वाचकांच्या व प्रेक्षकांच्या मताचा काही कदर आहे असेच वाटते आहे, जेव्हा राखी का इंन्साफ, बिग बॉस सारखे टिव्ही चॅनेल व बाबा के पेट में बच्चा, नागिन की सुहागरात टाईपचे न्युज दाखवणारे चॅलन असोत व मटा सारखा विदेशी संस्कृतीकडून उधार घेतलेला नागडेपणा असो...
सेक्स विषयी माहिती देणे वेगळे व सेक्स चे प्रदर्शन मांडणे वेगळे हे मटाला कधी कळणार देव जाणे !
Hope is a good thing...
{धन्यवाद गणपा...}
लोकशाहीमधे माध्यमे वाचकांच्या दृष्टीने जागल्याची भुमिका बजावतात म्हणुन तर त्यांना वॉचडॉग ऑफ डेमॉक्रसी, फोर्थ इस्टेट वगैरे नावांनी संबोधले जाते. ही भुमिका परिणामकारकरित्या साधण्यासाठी माध्यमे व वाचक/ प्रेक्षक/ श्रोत्यांमधे सुसंवाद हवा. तो कितपत राहिलाय हा महत्वाचा प्रश्न आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{तोच तर महत्त्वाचा मुद्दा}
तोच तर महत्त्वाचा मुद्दा आहे.
उदा. ईसकाळने वाचकांशी सरळ संपर्क साधता यावा हेतूने, मुक्तपीठ सारखा समुदाय तयार केला, संकेतस्थळावर प्रतिसाद देण्याची सुविधा दिली पण त्याच्याकडे ते किती गांभिर्याने पाहतात हे तेथे आलेल्या प्रतिसादावरून व भांडणांवरुन समजते.
या बाबतीत बीबीसी हिंदी या संकेतस्थळाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, त्यांच्या संकेतस्थळावर असलेली एक चूक दाखवून दिल्यावर त्यांनी ती चूक त्वरित दुरुस्त केली व त्याची नोंद ई-पत्राद्वारे दिली गेली व त्यानंतर कधी ही असे काही दिसले / खटकले तर कळवा असे बोलायचे म्हणून न बोलता, त्या विभागामध्ये इतर काही त्रुटी आढळल्यास सरळ इडिटर व साईट व्यवस्थापकांना कसा संपर्क करावा याची पुर्ण माहिती देखील दिली.
आता मटा, सकाळ मध्ये मी दिलेल्या तक्रारीची साधी पोच मिळालेली नाही, तक्रार दुरुस्त होणे तर वेगळी गोष्ट
Hope is a good thing...
{+१ गणपाभौ}
प्रसन्नदा, पुन्हा एकदा छान अभ्यासपुर्ण लेख. कारणॆ आणि परिणाम यांचा सुरेख उहापोह !
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{प्रसनदा !!}
परंतु माध्यमातील व्यक्ती पण शेवटी याच समाजातुन येतात अन समाजाचा एकंदर जो कल आहे तोच त्यांचाही रहातो. यामुळेच वाचक/ श्रोत्यांनी ग्राहक म्हणुन दक्ष राहणे आवश्यक आहे. >>
बरोबर आणि १०१ % सहमत ..
दुसरी एक गोष्ट म्हणजे बदलते समाजमान !
मी काही कार्यक्रमांबद्दल जी उत्सुकता प्रेक्षक दाखवितात, ते कार्यक्रम त्याच्या अनुषंगाने दाखविणे म्हणजे काही गुन्हा नव्हे..
बाबा के पेट में बच्चा, नागिन की सुहागरात टाईपचे न्युज दाखविणे गरजेचे नसले तरी मी असल्या बातम्यांकडे डोळे लावुन बसणारे बरेच पाहिले आहेत. त्यात माझ्या शेजारच्या (हा एअर फोर्समध्ये उच्च पदावर आहे) एका इसमाने , ते टिव्ही वरची 'नजर-सुरक्षा-कवच' ची जाहिरात पाहुन ' कवच ' मागवुन , जणु काही आपण ' कवच कुंडले ' घालुनच फिरतो आहे असा आव आणणे. हे जर बदलत्या समाजाच प्रतिक मानल तर माझे वैयक्तीक मत हे आहे की मग मिडियाच काय चुकल.
दुसरी एक बाब म्हणजे मिडिया चालविणे हे अतिशय अवघड आहे.(२०० करोड फक्त रेडियो लॉन्च करण्यासाठी लागतात)पत्रकारांसाठी तर अति -अवघड (प्रसनदांना आलेल्या फोन-धमक्या, औ.बादला सुरडकरांना झालेली मारहाण माहीत आहे मला.)
तो समाज कुठाय ?
माझ्या मते बदलले पाहिजे ते समाजमन , जर ते बदलल्या गेले तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ अजुन पारदर्शक होवु शकेल .
{सुहास, समाजमन हे कुणी एकाच्या}
सुहास, समाजमन हे कुणी एकाच्या मागणीने किंवा एकाच्या सांगण्याने बदलत नसते. समाज हा एक कळप असतो. जास्त मेंढ्या ज्या दिशेने जातील त्या दिशेने इतर मेंढ्या जातात. एखाद्या मेंढीची इच्छा नसेल तरी तिला जावेच लागते. राजकारण्यांकडून समाजमन बदलाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. मिडीया हा त्यासाठी फार मोठी जबाबदारी घेवू शकतो. पण ते किती प्रकारे ती निभावतात? किती मिडीया समाजासाठी लिहीतात? बहूतेक जण केवळ गल्लाभरू कार्यक्रम सादर करतात. अरे, तुला दुरदर्शनवरील जुन्या सामाजिक जाहीराती आठवतात का? जुने देशभक्तीपर गीते समुहस्वरात म्हटलेली आठवतात का? आजकाले कोठे गेले ते? अगदी दुरदर्शनही काही वेळा TV shop ची जाहीरात करते आहे. रेडीओ सकाळी सकाळी ६:४५ वाजता 'के.प्र प्रायोजीत संवाद' सादर करतो आहे. अरे ती तर धडधडीत के.प्र ची जाहिरात असते ५-७ मिनीटांची! तिडीक येते ते ऐकून. अशाने कोणत्या समाजाचे मन देशासाठी, समाजासाठी तयार होईल?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{वाचनिय}
वाचनिय लेख.
गेल्या २० वर्षात नितीमत्तेची घसरण सर्वच क्षेत्रात झाली आहे.पत्रकारिता त्याला अपवाद असावी असे अशी अपेक्षा करणे चूकीचे वाटते.प्रचंड गुंतवणूक करुन प्रचंड नफा मिळवणे हे तत्व खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर येणार हे उघड होते.customer is the king/customer is god हा ईतर क्षेत्रांतला नियम ह्या क्षेत्राला लावला तर पत्रकारांना पूर्ण दोष देता येत नाही.frontline मध्ये पूर्वी वाचलेली बातमी आठवते-९७/९८ साली एका ख्यातनाम इंग्रजी वृत्तपत्राच्या मॅनेजमेंटची मीटिंग चालु होती.वृत्तपत्र मालकांनी खप वाढवण्यासाठी काही 'आय्डियाज' आणल्या होत्या.तेथे बसलेल्या संपादक मंडळाला सांगण्यात आले-की सेक्स,विवाहबाह्यसंबंध अशा प्रकारच्या बातम्यांना प्राधान्य द्या.पेपरात रोज २/३ पानावर 'दिलखेचक' चित्रे दिलीच पाहिजेत.!.
ज्यांनी विरोध केला त्यांची बदली तरी करण्यात आली किंवा काढून टाकण्यात आले.
{सडेतोड लिहिलायत}
लेख मनःपुर्वक आवडला.
समस्या सोडवण्यासाठी जे उपाय आहेत त्यात आणखी एक उपाय - पत्रकारितेला असणारे incentives वाढवणे. पगार गलेलठ्ठ करणे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{अजूनही आपला समाज चक्षुर्वैही}
अजूनही आपला समाज चक्षुर्वैही सत्यम या समजातच वावरतो. डोळ्यानी देखले ते खरेच छापलेले सगळे खरेच असते या अंधश्रद्धेला अजून कोनी धक्काच दिलेला नाही.
तो धक्का ज्या दिवशी बसेल त्या दिवशी माध्यम क्रान्ती होईल. बातमी आणि मनोरन्जन यातील फरक लोकांच्या ध्यानात आला तर फलतू सनसनाटी पत्रकारीतेला आळा बासेल.
नाशीकला कोणाच्या तरी बंगल्यात सापडलेल्या त्या नोटांच्या गठ्ठ्यांचे काय झाले हे नन्तर कोणीच पाठपुरावा केला नाही
सातार्यात झालेल्या लेवे प्रकरणातील आरोपी जिल्हा न्यायालयात निर्दोश सुतल्यानन्तर पोलीसानी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला किंवा काय याचा कोणी पाठपुरावा केला नाही.
माध्यमानी हे करावे ही अपेक्षा असते. दुर्दैवाने माध्यमे असा कोणताच मुद्दा लावून धरत नाहीत.
पत्रकारीततेत "दिगु टिपणीस" ही भूमिका वठवायची असते हे कोणाच्याच लक्षात येत नाही.
माध्यमे त्यांच्या भाम्डवलदार मालकांच्या हातात आहेत. त्या भाम्दवलदार मालकांची राजकीय भागिदार्री असते हे उघड गुपीत आहे. पण सर्वसामान्य माणसाला या नेक्ससची फिकीर नसते. हे खरे दुर्दैव आहे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{छान लेख!}
आता देश व नागरीक ही ओळख पुसट होत जाणार व हळुहळू व्यापारी व उपभोक्ता हीच ओळख होत जाणार.
ही सर्व माध्यमे मिळून, जगातील सर्व देशाचे नागरीकांचे = कन्झ्युमर्स बनवणार!
प्रसन्नदा लेख आवडला.