बाणाची कादंबरी
शुद्रक राजाचा दरबार भरलेला असतो.
अनेक दरबाराची कामे चालु असतांनाच एक चांडाळाची मुलगी दरबारात पोपट घेऊन येते. हा पोपट साधासुधा नसतो तर चक्क मानवी वाणीने बोलणारा पोपट असतो. ती चांडालकन्या पोपट राजाला भेट म्हणुन देते. शुद्रकाला पोपटाविषयी खुप कुतुहल वाटुन तो त्याला त्याची हकिगत विचारतो. तेव्हा तो पोपट त्याची दु:खद कहाणी सांगतो.
विंध्यारण्यातील एका मोठ्या वृक्षावर तो आणि त्याचे वडील रहात असतात. त्याच झाडावर त्याचे अनेक सगेसोयरे रहात असतात. पोपटाची आई लहानपणीच वारल्याने त्याच्या वडीलांनीच त्याचा संभाळ केलेला असतो. केव्हातरी एक दिवस अचानक एक शबर येतो आणि तो झाडावरच्या जवळपास सर्व पोपटांना मारतो. त्यात याचे वडील सुद्धा मारले जातात. केवळ दैवयोगाने हा कसाबसा प्राण वाचवुन पळुन जात जाबाली ऋषींच्या आश्रमात शिरतो. तिथे जाबाली त्या पोपटाला त्याच्या मागच्या जन्माची हकीगत सांगतात.
तारापीड नामक राजा आपली पत्नी विलासवती आणि अमात्य शुकनास यांच्यासह उज्जयनी येथे राज्य करत असतो. बराच काळ मुलबाळ न झाल्याने राजा निराश असतो. बराच काळ ईश्वराची आराधना केल्यावर त्याला पुत्रलाभ होतो. त्याचे नाव चंद्रापीड असे ठेवले जाते. त्याच वेळेस शुकनास अमात्यांना सुद्धा पुत्रलाभ होतो. त्याचे नाव वैशंपायन असे ठेवतात. हे दोघे लहानपणापासुन एकत्रच वाढतात, शिकतात. चंद्रापीड बघता बघता १६ वर्षांचा होतो. राजा तारापीड त्याला युवराज बनवण्याचे निश्चित करतो. त्यावेळेस अमात्य शुकनास चंद्रापीडाला भावी काळात राजा बनल्यावर कसे वागावे आणि कसे वागु नये याचा खोलवर विचार करुन उपदेश देतो. चंद्रापीड यानंतर युवराज होतो. राजा तारापीड यानंतर त्याला दिग्विजयासाठी राजधानीबाहेर पाठवतो. सोबत वैशंपायन, इंद्रायुध नावाचा घोडा आणि सर्व तर्हेचे सुसज्ज सैन्य घेऊन चंद्रापीड एकामागुन एक राजे जिंकत हिमालयात पोहोचतो.
हिमालयात मृगयेच्या निमित्ताने भटकत असतांना चंद्रापीड एका किन्नर जोडप्याला पाहुन त्यांच्या मागे जातो. जाता जाता रस्ता चुकल्याने तो अच्छोद नामक सरोवराच्या आसपास पोहोचतो. तिथे दुरवर एक मंदीर पाहुन तिकडे जातो. तिथे त्याला महाश्वेता नामक सुंदर युवती दिसते. अत्यंत दु:खी कष्टी अशी ती युवती शिवाची आराधना करत असलेली पाहुन तो तिच्याशी आपला परिचय करुन देतो. पुढे एकमेकांशी बोलतांनी महाश्वेता आपली हकिगत त्याला सांगते.
पुंडरीक नामक एका ऋषीकुमाराशी तिची अच्छोद सरोवरावर गाठ पडते. प्रथम पहाताच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. परंतु प्रेम व्यक्त होऊन सफल होण्यापुर्वीच पुंडरीक मरण पावतो. महाश्वेता सती जाण्याची तयारी करत असतांनाच आकाशवाणी होते. तिला सती न जाण्याचा आदेश मिळतो. चंद्रबिंबातुन एक पुरुष येतो आणि पुंडरिकाचे प्रेत चंद्रलोकात घेऊन जातो. ते पाहुन पुंडरिकाचा मित्र कपिंजल त्या पुरूषाचा पाठलाग करत चंद्रलोकास जातो. महाश्वेता अच्छोद सरोवरापाशी पुंडरिकाची वाट पहात थांबते.
महाश्वेता आपली दु:खद कहाणी सांगुन चंद्रापीडास गंधर्वलोकात घेऊन जाते. तिथे कादंबरीशी त्याची ओळख होते. एकमेकांना पाहुन ते प्रेमात पडतात. पण प्रेम कुणी आणि कसे व्यक्त करायचे ह्या संभ्रमात असतांनाच राजपुत्राला राजाचे बोलावणे येते. वैशंपायन वगैरे मंडळींना अच्छोद सरोवरापाशीच ठेवुन राजपुत्र राजधानीकडे परत येतो. कादंबरी विरहाने अतिशय व्याकुळ होते.
पुढे राजधानीतले काम आटोपुन चंद्रापीड परत येतो तेव्हा वैशंपायन नाहीसा झाला असे समजते. बरीच चौकशी झाल्यावर त्याला कळते वैशंपायन महाश्वेताच्या प्रेमात पडून तिच्याकडे याचना करत असतांना तिने त्याला "पोपट हो" असा शाप दिल्यामुळे वैशंपायन पोपट झाला आणि त्याचा आता काहीही ठावठिकाणा लागत नाही. हे ऐकताच मित्राच्या विरहाने चंद्रापीड मरुन पडतो. ते पाहुन कादंबरी सती जाण्याची तयारी करते पण तेवढ्यात आकाशवाणी होते. चंद्रापीडाचे प्रेत नीट जपुन ठेवा असा आदेश मिळतो. सर्व लोक पहात असतांनाच चंद्रापीडाचा घोडा इंद्रायुध अच्छोद सरोवरात प्रवेश करतो आणि त्यातुन कपिंजल बाहेर येतो. कपिंजलाच्या सांगण्यावरुन पुंडरिक आणि वैशंपायन हे एकच आहेत असे महाश्वेताला समजते.
जाबालींनी सांगितलेली ही हकिगत ऐकताच पोपटाला आपणच वैशंपायन आहोत असे जाणवते आणि तो चंद्रापीडाच्या शोधात जात असतो. त्याचवेळेस चांडालाच्या हाती लागतो. चांडालकन्या त्याला शुद्रक राजाकडे घेऊन येते. अशा प्रकारे पोपटाने त्याचा वृत्तांत सांगितल्यावर शुद्रकाला आपणच चंद्रापीड आहोत हे लक्षात येते आणि तो देह सोडतो. तत्क्षणीच इकडे चंद्रापीड पुन्हा जिवंत होतो. पोपट बनलेला वैशंपायन पुन्हा पुंडरिक बनुन अच्छोद सरोवरापाशी येतो. पुंडरिक - महाश्वेता आणि चंद्रापीड - कादंबरी यांचे मिलन होते. सर्वत्र आनंदी आनंद होतो.
****
ही आहे संक्षिप्त रुपात संस्कृतमधील एक गद्य लेखक बाणभट्ट याच्या कादंबरी या कथेचा सारांश. असे म्हटले जाते की गुणाढ्याच्या बृहत्कथेतल्या कथेला कलात्मक रंग भरुन सादर केलेली ही कृती बाणभट्टाची सर्वोत्कृष्ट कारागिरी आहे. कादंबरी हे यातल्या एका पात्राचे नाव. पण अशा प्रकारच्या कथांना कादंबरी म्हणण्याची प्रथा बहुधा या साहित्यकृतीपासुन पडली असावी.
संस्कृत गद्यकाव्यात बाणाचे स्थान खुप वरचे आहे. एकापेक्षा एक सरस प्रसंग वर्णन करण्याची हातोटी वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. बाणभट्टाचे संस्कृत जड असल्याचे आक्षेप अनेक जण घेतात परंतु मोठमोठे सामासिक शब्द, पल्लेदार वाक्ये आणि अतिशय सुक्ष्मतेने प्रसंग वर्णन करण्याची कला यामुळे कादंबरी हे गद्यकाव्य संस्कृत साहित्यात मानदंड आहे हे नक्कीच.
कादंबरी कथेतील विरहवर्णने, पोपटाचा दु:खाने केलेला आलाप, अमात्य शुकनासाने चंद्रापीडाला केलेला उपदेश, द्रविड पुजार्याचे वर्णन, चंद्रापीड आणि कादंबरी या दोघांमधले प्रणय प्रसंग इत्यादी खुलवतांना बाणाची लेखणी अगदी समर्थपणे ते प्रसंग उभे करतेच पण त्याच वेळी अनेक संस्कृत कथाकारांच्या लेखणीला प्रणयवर्णने सांगतांना सुटणारा सुक्ष्म कंप जो कधी कधी अश्लिलते कडे जातो असे वाटते तो बाणाच्या लेखणीत जाणवत नाही. वर्णन अगदी सहज सरळ येते.
कथारचनेत प्रचंड गुंतागुंत आहे. कालविपर्यासाची ठळक उदाहरणे आहेत पण मनोरंजन हे ध्येय असल्याने आणि एकंदर त्याकाळात होत असलेल्या साहित्यांत अशा प्रकारच्याच कथांचा प्रादुर्भाव असल्याने बाणाला दोष देता येणार नाही. मात्र कधी कधी अनेक ठिकाणी वाचकाला उत्सुकता असली तरी कथा पुढे न सरकता बरेचसे पाल्हाळ वाचावे लागते. पण बहारदार संस्कृत आणि उत्कंठा यामुळे हे चालुन जाते असे म्हटले तरी चालेल.
बाण हर्ष राजाच्या कालावधीत झाला असे म्हटले जाते. इस ६०० ते ६५० च्या दरम्यान असे मानले जाते. हर्षचरित, कादंबरी, चंडीशतक, पार्वती परिणय हे ग्रंथ बाणाने रचले आहेत असे मानले जाते.
कादंबरी पुर्ण होण्याआधीच बाणाचा मृत्यु झाला. पुर्वार्ध बाणाने लिहिला असुन उत्तरार्ध त्याचा मुलगा भुषण/पुलिंद याने पुर्ण केला असे मानले जाते. उत्तरार्ध पुर्वार्धाच्या मानाने खूपच छोटा असुन पुर्वार्धात विस्तारलेले कथानक केवळ पूर्ण केले आहे असे दिसते. भाषेत सुद्धा जाणवेल इतका भेद आहे.
दुर्गा भागवतांनी बाणाची कादंबरी असे या साहित्य कृतीचे अनुवादात्मक रसग्रहण मराठीत केले आहे.

.jpg)
{मस्त................}
मस्त................
{नवीन गोष्टी समजल्या. नाना खूप}
नवीन गोष्टी समजल्या.
नाना खूप चांगली ओळख करून दिली आहेस रे बाणाची !
पुस्तक वाचायचे आहे आता मला हे.
Hope is a good thing...
{खुप सुंदर लिहीले आहेत नाना !}
खुप सुंदर लिहीले आहेत नाना ! बाणाची अजुन माहिती मिळेल का???
{कालविपर्यास, गुंतागुंत... }
कथारचनेत प्रचंड गुंतागुंत आहे. कालविपर्यासाची ठळक उदाहरणे आहेत >>>>
संक्षिप्त स्वरूपातला हा परिचय वाचतावाचताच इतके गोंधळायला होत होते की मूळ कादंबरी वाचण्या इतके संस्कृत येत असते तर वाचून समजे समजे पर्यंत माझा नक्कीच पोपट झाला असता असे वाटले.
अवलियांना विनंती की " कादंबरी कथेतील विरहवर्णने, पोपटाचा दु:खाने केलेला आलाप, अमात्य शुकनासाने चंद्रापीडाला केलेला उपदेश, द्रविड पुजार्याचे वर्णन, चंद्रापीड आणि कादंबरी या दोघांमधले प्रणय प्रसंग इत्यादी " यासारखे निवडक प्रसंगाचे रसग्रहणात्मक अनुवाद मी म वर लिहावेत एखादे इ- पुस्तक ही तयार करता येइल.
बाकी मजा आला...
{>वाचून समजे समजे पर्यंत माझा}
>वाचून समजे समजे पर्यंत माझा नक्कीच पोपट झाला असता असे वाटले.
+१ माझा देखील.
___________________________________
योगेश नाईक
{बाणभट्टाचे "हर्षचरित्र"}
बाणभट्टाचे "हर्षचरित्र" बद्दलही लिहा ना !
{ही एक आली अजून संकृतप्रेमी}
ही एक आली अजून संकृतप्रेमी !
अगं आधी त्यांने वर काय लिहले आहे ते समजून दे
मला माहित आहे संकृतमध्ये तु पैकीच्या पैकी गुण घेतले आहेस.. तुच लिही व तुला नाव माहित आहे म्हणजे माहिती देखील माहित असेल. सरळ लिहायला घे.
Hope is a good thing...
{अरे राहू दे रे, घरात तशी ही}
अरे राहू दे रे, घरात तशी ही पिडते खुप
___________________________________
योगेश नाईक
{योगेश ! अजून एक}
योगेश !
अजून एक नवरा-बायकोची जोडी मीमवर अॅक्टीव्ह, क्या बात है !
स्वागत आहेत, तुम्हां चीरतरुण म्हातार्यांचे
Hope is a good thing...
{जबरदस्त नाना}
बाणभट्टाची कादंबरी मी वाचली आहे. संस्कृतचा अभ्यास होता तेव्हा संस्कृतातही थोडीफार अभ्यासता आली.
बाणभट्टाने या कादंबरीत अप्रतिम रसनिर्मिती केली आहे
या नितांत सुंदर लेखाद्वारे नाना पुन्हा मैदानात आल्याची पावती मिळाली
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{प्रेमात किंवा इतर कुठल्या}
प्रेमात किंवा इतर कुठल्या बाबतीत अपयश येण्याला "पोपट होणे" का म्हणतात त्याची हकीकत आज समजली. (कृ.ह.घे.)
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
{वा वा}
वत्स चन्द्रापीड विदितवेदितव्यस्य च ते....अशा वाक्याने सुरू होणारा शुकनासोपदेश अजून लक्षात आहे.
काय जबरदस्त भाषा आहे ह्या बाणाची!! केवळ अप्रतिम.
अब्राहम लिंकन यांच्या हेडमास्तरांस लिहिलेल्या पत्रातही, शठेषु शाठ्यं वगैरे भाग ह्याच शुकनासोपदेशातला ना हो नाना?
{अगदी बरोबर... शुकनासोपदेश}
अगदी बरोबर... शुकनासोपदेश जबरदस्त आहे
{मस्त}
मस्त कथा!
अजुन असतील तर लिही, आवडेल वाचायला!
{ह्म्म कथा वाचली. त्यातिल}
ह्म्म कथा वाचली. त्यातिल पात्रांचीच नावे खुप कठिण आहेत न

त्यात सुढ्ह्या ह्याच तिच्याशी न तिच त्याच्याशी आहे
त्यामुळे पटकन सोपा रेफ्र्र्न्स लागत नाहिये.
नावे कशी सोपी हवित जशी चुचु, राजे, नाना, पन्द्या, सेन्दी , मेवे, मितान, पुश्का,
अमा;)निका,
हि स्तॉरी एकता ला आइकवली तर छान सिरियल तयार होइल नै.
नाना सॉरी हं
{ह्ल्कत.}
ह्ल्कत.
Hope is a good thing...
{एकताला ऐकवली}
एकताला ही स्टॉरी ऐकवली तर नावपण बदलायची गरज नाही.
कारण सुरुवात 'क' पासून च होतिये.
{एक आख्यायिका }
पुर्वार्ध बाणाने लिहिला असुन उत्तरार्ध त्याचा मुलगा भुषण/पुलिंद याने पुर्ण केला असे मानले जाते.
उत्तरार्धाच्या लिखाणाबद्दल माझ्या वाचनात आलेली आख्यायिका अशी आहे. बाणभट्टाला दोन मुलगे होते. बाण मृत्युशय्येवर असताना आपल्या कादंबरीचा उत्तरार्ध लिहायचं काम दोन मुलांपैकी कोणावर सोपवावं असा त्याला प्रश्न पडला. दोन्ही मुलगे गाढे पंडित होते. पण नुसतं पांडित्य उपयोगाचं नाही, लालित्यही हवं असं त्याला वाटलं. म्हणून त्यानी दोन्ही मुलांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यानी दोन्ही मुलाना जवळ बोलावलं नी गवाक्षातून दिसणार्या एका वठलेल्या वृक्षाकडे निर्देश करून त्याचं वर्णन करायला सांगितलं. मोठ्या मुलानी त्याचं वर्णन, "शुष्कं काष्ठं तिष्ठत्यग्रे" असं केलं. धाकट्यानी त्याच वृक्षाचं वर्णन, "नीरस तरुवर विलसति पुरतः" असं केलं. बाणानी उत्तरार्धाची जबाबदारी धाकट्या मुलावर सोपवली.
{शुष्कोवृक्षस्तिष्ठत्यग्रे}
ही आख्यायिका मी कालिदासाच्या बाबतीत वाचली होती.कालिदासाचे राजदरबारात जरा जास्तच कौतुक होते,त्याच्यावर राजाची विशेष मर्जी असते असे इतर दरबारी कवी व मानकर्यांना मोठे वैषम्य वाटे. या विषयीची कुजबूज शेवटी राजाच्या कानांवर गेली.एकदाचा सोक्षमोक्ष लावावा या हेतूने राजाने दरबार भरवला असता समोरच्या वठलेल्या झाडाचे वर्णन सर्वांना करयला सांगितले.इतरांनी 'शुष्कोवृक्षस्तिष्ठत्यग्रे' असे रुक्ष खडबडीत वर्णन केले तर कालिदासाने 'नीरस तरुरिह विलसति पुरतः'असे लालित्यपूर्ण शब्द वापरले.श्रेष्ठ कोण व का याचा निर्णय तेथेच झाला.
{खुप सुंदर लिहीले आहे, नवीन}
खुप सुंदर लिहीले आहे, नवीन माहिती समजली.
{लई भारी नाना}
बाणभट्टाच्या 'कादंबरी' तील विरहाची वर्णने मनाला चटका लावून जातात.
जबरदस्त कलाकृती आहे कादंबरी.
कालिदासाच्या अभिज्ञान शाकुन्तल मध्ये पण विरहाची अशीच वर्णने चटका लावून जातात.
तरी पण चंद्रापीड-कादंबरी यांची ही कथा अतुलनीय आहे यात शंकाच नाही
संक्षिप्त पण सुंदर ओळख नाना.
मालविका, वासवदत्ता व वसंतसेना या संस्कृत कलाकृतींबद्दलही वाचायला आवडेल आपल्या सिद्धहस्त लेखणीतून
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{वाचनिय लेख म्हणून वर घेऊन येत}
वाचनिय लेख म्हणून वर घेऊन येत आहे.
Hope is a good thing...
{नान्या कुठ दिसना}
नान्या कुठ दिसना आजकाल...
त्याला ही कुठून तरी असाच घेउन या हो राजे
{संस्कृतचा अभ्यास नाही. पण}
संस्कृतचा अभ्यास नाही. पण संक्षिप्त स्वरुपातली बाणाची कथा आवडली.
- पिंगू
{"पण अशा प्रकारच्या कथांना}
"पण अशा प्रकारच्या कथांना कादंबरी म्हणण्याची प्रथा बहुधा या साहित्यकृतीपासुन पडली असावी."
ही प्रथा सर्वत्र नसावी. कारण गुजरातीत अशा कथांना नवलिका किंवा नवलकथा म्हणतात तर हिंदीत उपन्यास.
अशा कथांचे कादंबरी हे नाव मराठीपुरतेच मर्यादित असावे.