भक्षक : अंतीम
कृपया आधी भाग १ आणि २ वाचावे, त्याशिवाय कथासार कळणार नाही.
रम्यानं थोडायेळ थांबून श्वास घिटला...
दोस्तानु आता पुन्यांदा आजच्या काळात येवू म्हनं. जन्या, बार लावतु का जरा?……………
>>>>>>>>>>>
पुन्ना चालू काळात ……
…………………………….
……………………………………….
“येस डॉ. फर्नांडो हिअर !”
“…………”
दॉक्टर लगबगीने उठले, त्यांनी आपल्या केबीनचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा फोन घेतला.
“तु इथे कशाला फोन केलास? तुला किती वेळा सांगितलेय इथे फोन करत जावू नकोस म्हणून.”
“……………….”
“ठिक आहे, पण…! परत इथे फोन करू नकोस.”
“………………..”
“हे बघ, हे अति होतय !”
त्यांनी दुसरा एक नंबर फिरवला…
“हॅलो डॉक हिअर….. थोडा सबुर करा!”
“……………………………”
“व्हू इज द बॉस स्टुपीड! डू अॅज आय सेड, अंडरस्टूड? ” नकळत डॉक्टरांचा आवाज चढला होता.
डॉक्टरांनी फोन खाली ठेवला आणि कपाळाला आलेला घाम पुसत टेबलावरची बेल वाजवली.
“याचं काहीतरी करायलाच हवं….!”
तेवढ्यात दारावर खटखट झाली.
“कम इन प्लीज!” डॉक्टरांनी आपल्या आवाजात शक्य तितके मार्दव आणत उत्तर दिलं. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण आत्ताच केबीन आतुन लॉक केली होती, तसे त्यांनी उठून केबीनचा दरवाजा उघडला. तशी त्यांची सेक्रेटरी आत आली. डॉक्टरांचा चेहरा बघून ती थोडी चरकलीच.
“सर, आर यु ओके? बरं वाटत नाहीये का तुम्हाला?”
“काही नाही गं! थोडंसं अनकंफर्टेबल वाटत होतं. नाऊ आय एम फाईन! तरीही मी आज घरी जातोय. आजच्या अपॉईंटमेंट्स कॅन्सल कर प्लीज. से देम सॉरी फ्रॉम माय साईड!”
डॉ. फर्नांडो गडबडीतच केबीनच्या आणि पर्यायाने हॉस्पीटलच्याही बाहेर पडले. त्यांची सेक्रेटरी पाहातच राहीली. गेल्या सहा महिन्यात प्रथमच डॉक्टरांनी आपल्या अपॉईंटमेंट्स कॅन्सल केल्या होत्या. आज ते थोडेसे टेन्सच वाटत होते.
*******************************************************************************
“साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. हे आसलं घाणेरडं काम आमी नाय केलेलं.कुणाचा जीव घेण्याची हिंमत नाय वो आमच्यामदे.”
त्यो आक्षी जिवाच्या आकांताने सांगत होता. ती तर कुठल्याबी क्षणी ढसाढसा रडायला लागंल आसच वाटत व्हतं.
नाईकनवरें सायबांनी कोपर्यात हुब्या आसलेल्या त्या दोघांकडे एकदा खालपासुन वरपत्तुर बगुन घितलं. तशी त्यानं नजर झुकवली.
“कदम…. काय म्हणणं आहे यांचं!”
“साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या दोघांवर तसेच त्या मांत्रिकावर देखील नजर ठेवली होती. या दोघांना मुल बाळ नाही साहेब. म्हणुन त्या रघ्या कडे गेले होते दोघेही. त्याने यांच्याकडे दोन डोळ्याच्या नारळाची मागणी केलीय. “
“हूं….. दोन डोळ्यांचा नारळ…. म्हणजे नरबळी ! साऊंड्स इंटरेस्टिंग ! ते जावु दे मी बघतो यांच्याकडे. तुला मी आणखी एका व्यक्तीवर नजर ठेवायला सांगितली होती. त्याचे काय झाले?”
“साहेब, ते भारी प्रकरण आहे बघा. माझे खबरी त्याच्यावर नजर ठेवून आहेत. त्याचे हात खुप वरपर्यंत जावून पोचलेत साहेब. खुप मोठ्या मोठ्या माणसात उठबस आहे त्याची.”
” तू त्याचं टेन्शन घेवू नकोस. माझ्याकडं स्पेशल ऑर्डर्स आहेत गृहमंत्रालयाच्या. ही केस खुप वरपर्यंत जावुन पोचलीय कदम. आपल्याला कुणालाही संशयाच्या नावाखाली उचलायची, तपास करायची परवानगी मिळालीय. हा आठवडाच काय तो आपल्या हातात आहे. नाहीतर केस सी.आय. डी. कडे जाईल आणि आपली नाचक्की होइल. तेव्हा मला रिजल्टस हवेत. मला खात्री आहे कदम तिथेच नक्की काहीतरी पाणी मुरतेय.”
नाईकनवरेसायेब अगदी ठामपणानी बोललं.
“ठिकाय साहेब, या दोघांचं काय करायचं?” कदमनं इच्चारलं.
“मी बोलतो त्यांच्याशी. वरकरणी तर वाटतेय की तेच खरे गुन्हेगार आहेत, ही पोरं गायब करुन त्यांना बळी देण्याचं कृष्णकृत्य या दोघांनीच केलय म्हणून…..! पण का कोण जाणे माझ मन, माझी सदसद विवेकबुद्धी त्यांना निदान या प्रकरणात तरी गुन्हेगार मानायला तयार नाहीये. तु त्या व्यक्तीवर नजर ठेव, अजुन चार जणांना सोड त्याच्यावर हवेतर. त्याच्या सगळ्या माणसांमागे आपला एक एक माणुस हवाय मला. पैशाची काळजी नको करूस. हि केस या आठवड्यात सुटायलाच पाहीजे. तु निघ आता. मी बघतो या दोघांकडे!”
“तुम्ही काहीही म्हणा साहेब. पण ही दोघेही वाटतात तेवढी साधी आणि सरळ नाहीत. मला पक्की खात्री आहे, की आपल्याला मुल व्हावे म्हणुन या दोघांनीच ती पोरं गायब करून त्यांचे बळी दिलेत. तो मांत्रिक सद्ध्या फरारी आहे पण जातो कुठे? एक दोन दिवसात त्याला पकडतोच आणि हजर करतो तुमच्यासमोर. तो समोर आला की मग पोपटासारखे बोलतील दोघे.”
सब इन्स्पेक्टर कदमांनी एक जळजळीत नजर त्या दोघांकडे टाकली आणि ते तिथुन निघुन गेले.
” हा बोल आता, काय नाव म्हणालास तुझं?
“साहेब, आम्ही काहीही केलेलं नाही. आमी कोणचीबी प्वॉरं पळवलेली नाहीत की त्यांचे बळी…..
ती मुसमुसून रडाया लागली.
“पारु, गप्प बस की आता, आपण काय केलेलच न्हाय तर घाबरायचं कशापायी?”
“मी तुला तुझं नाव विचारलं होतं बाबा… चल तुझ्या बायकोचं नाव पारू आहे एवढं कळलं. अर्थात तुझं नाव पण माहीत आहे मला अर्जुन. पण जे काही झालं ते तुझ्याच तोंडुन ऐकायचं आहे मला. बोल तुझा त्या रघ्या मांत्रिकाबरोबर काय संबंध? मागच्या महिन्यात त्या मध्यरात्री ऐन स्मशानात काय करत होता तुम्ही दोघे त्या रघ्या बरोबर.”
दोघेही चपापले. पारु अजुनच जोरजोरात रडायला लागली.
“साहेब मी तुम्हाला सगळे सांगतो. पण विश्वास ठेवा हे पाप आमी नाय केलेलं. सायेब, आमाला मुलबाळ नाय. डॉक्टरकडं बी गेलो होतो. पन त्यानं सांगितलं की तेबी कसलीच खात्री देवू नाय शकत. मग येक दिवस आमाला कमलाबाईंनीच रघ्या मांत्रिकाबद्दल सांगितलं.”
“ही कमलाबाई कोण?”
तसं त्यानं आपल्या बायकोकडं, पारुकडं पाह्यलं आन घडा घडा बोलायला लागला……..
…………………………………………………………………………………………
चव्हाण या दोघांनाही लॉक-अपमध्ये टाक. आणि ते पोस्टमार्टेमचे रिपोर्ट आले का?”
“मघाशीच आलेत साहेब. तुमच्या टेबलावरच ठेवलीय फाईल?”
नाईकनवरेंनी फाईलवर झडपच घातली. सगळे रिपोर्ट वाचत गेले. ते वाचत असताना जे मुद्दे समोर आले ते वाचताना नाईकनवरे साहेब अतिषय गंभीर झाले. पण एक गोष्ट त्यांना सगळीकडे कॉमन जाणवली आणि त्यांच्या चेहर्यावर ही केस सुरू झाल्यापासुन पहिल्यांदाच हास्य आले.
तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी फोन उचलला आणि ……
“दॅट्स इट ! उचला दोघांना पण, थर्ड डिग्री लावा, पोपटासारखे बोलतील!”
मग त्यांनी आणखीही काही ठिकाणी फोन केले.
“बस्स आणखी एखादा दुसरा दिवस ! तुझी घटका भरलीच म्हणुन समज चांडाळा !” समाधानाने त्यांनी आपल्या खुर्चीच्या पाठीवर डोके टेकले आणि डोळे मिटून घेतले.
*******************************************************************************
आजच्याला चौकीवर लै मोट्या-मोट्या आसामी हाजर हुत्या बग औध्या.
पुन्यांदा तमाकुचा बार लावीत रम्यानं फुडची गोष्ट सांगाया सुरुवात केली.
“मोट्या मोट्या म्हंजी…..
फुकणीच्या शब्दात पकडाया नगो बगू. समजून घी. नायतर आपून चाल्लो. रम्या भडकला तसा बाकिच्यांनी औध्याला आवरला.
तु बोल रं रम्या. तवर म्या अजुन येक चाय मागिवतो.
हांग आश्शी ! आता कसं मनातलं बकलास बरं…….. मागिव, मागिव….
तर चौकीवर नाईकनवरे सायेब, आबा पाटील, फर्नांडू डाक्टर,म्हनलंच तर फौजदार कदम सायेब आन पंचक्रोशीतली कायबाय राजकारनी लोकंबी व्हती. म्या नाईकसायबाच्या केबीनभायेरच खिडकीखाली आसलंल्या बाकड्यावर बसलू व्हतू. समदं सपष्ट आयकू येत व्हतं….
इनिस्पेक्टरसायेबांनी खाकरून घसा साफ केला आन बोलाया हुबं र्हायलं…
…………………………………..
………………………………………………..
मंडळी, गेले दोन-तीन महीने, किंवा कदाचीत जास्तच काळ आपण सगळेच धास्तावलेल्या , घाबरलेल्या अवस्थेत जगत होतो. आज कुणाला वाईट बातमी ऐकायला मिळेल याच काळाजीत दिवस ढकलत होतो. याची सुरुवात झाली ती कोळपेवाडीच्या संजय विभुते याच्या गायब होण्यापासून. नंतर एका मागून एक ६-७ मुले गायब झाली. विशेष म्हणजे ही सर्व मुले एकाच वयोगटातली होती. आम्ही शांत बसलो नव्हतो, आमच्या पद्धतीने शोध घेणे चालूच होते. आधी आम्हाला संशय होता की ही मुलांना पळवून नेवून त्यांना भिक मागायला लावणारी एखादी टोळी असावी. त्यानुसार आम्ही पंचक्रोशीतल्या अनेक जणांना संशयाखाली ताब्यात घेतले. पण शेवटी या निष्कर्षापर्यंत आलो की हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे.
माझे खबरी सगळ्या पंचक्रोशीत शोध घेत होते. त्यातल्याच एकाने खबर आणली की शिरगावाभाहेरच्या स्मशानात त्याने काही संशयास्पद गोष्टी पाहील्या होत्या म्हणुन. आम्ही त्या रोखाने शोध घ्यायला सुरूवात केली आणि हे दोघे हातात सापडले.
नाईकनवरेसाहेबांनी जमीनीवर बसलेल्या अर्जुन आणि पारुकडे बोट केले. तशा जमलेल्या लोकांच्या नजरा त्येंच्याकडे वळ्ळ्या !
अर्जुन आणि पारु खालमानेनंच उटून हुबं र्हायलं…
“बोल अर्जुन, त्या दिवशी मला जे सांगितलस त्ये आज नीट सांग परत सगळ्यांना …….
“साहेब मी तुम्हाला सगळे सांगतो. पण विश्वास ठेवा हे पाप आमी नाय केलेलं. सायेब, आमाला मुलबाळ नाय. डॉक्टरकडं बी गेलो होतो. पन त्यानं सांगितलं की तेबी कसलीच खात्री देवू नाय शकत. मग येक दिवस आमाला कमलाबाईंनीच रघ्या मांत्रिकाबद्दल सांगितलं.”
“ही कमलाबाई कोण?”
“डॉक्टर फर्नांडोसायबाकडं नर्सबाई म्हुन हाये ती. तशी लै चांगली बाई हाये. मला म्हनली दादा, हे दुकणं डॉक्टरच्या हातनं बरं होण्यासारखं नाही. तुमी दोगं रघ्याला भेटा. तो कायतरी उपाय सांगल. मग आमी त्या रघ्याला भेटलु. तर त्यो म्हनला नुकत्याच मेलेल्या ताज्या बाळंतिणीचं प्रेत पायजे. त्याची पुजा करावी लागत्ये नागव्यानं. मंग ती जर खुश झाली तर लेकरू हुतया.
म्हुन त्या रातच्याला आमी दोगंबी ततं गेलो. त्यो म्हनला तशी पुजाबी ………
इथे अर्जुननं खाली मान घातली आणि पारु पुन्हा रडायला लागली…….!
साहेब लेकरू पायजे म्हनुन हे सम्दं केलं आमी. पन आईची आण घिवून सांगतो जवा रघ्यानं सांगितलं की दोन डोळ्याचा नारूळ पायजे, म्हनजे माणसाचा बळी पायजे तवा आमी ठरवलं की बास्स, आता परत म्हनुन ह्येच्या नादाला लागायचं न्हायी. नंतर दोन तीन येळेला त्या रघ्यांनी निरुप पाटिवला पन आमी नाय गेलो. तिसर्या येळंला तर रघ्या म्हनला तुमी ती ओली बाळांतीन जागावलीय आता तिला पायजे ते दिल्याबिना ती मानायची न्हाय. न्हाय तर येक दिस ती तुमालाच घेवुन जायीन.
पन सायेब आमी पक्कं ठरिवलं होतं की कायबी होवु दे. आता जिव गेला तरी बेहत्तर पन आपल्याला पोर व्हावं म्हनुन दुसर्याच्या पोराबाळावर टाच नाय आणायची. मग भले आविष्यभर आसंच का र्हावं लागंना. त्या बाळंतिणीच्या भुतानं आमाला मारलं तरी चालल. परवा कुटंतरी आईकलं म्या की भुतांची बी एक हद्द असतीया, त्याच्या भायेर न्हायीत जात ती. म्हनुन मग आमी शिरगाव सोडुन लांब हिच्या म्हायेरी जावुन र्हायलो होतो. पण तुमच्या त्या सायबांनी आमाला तिथुन पकडलं आन हितं परत आनलं. आमच्यावर इश्वास ठिवा सायेब, पोराच्या आशेनं सुरूवातीला आमी त्या रघ्याच्या नादी लागलो होतो पन आम्ही कुणाचीबी पोरं न्हाय पळवली सायेब. मारली तर अजाबात नाय. सायेब आमाला पोर न्हाय म्हनुन आमची काय हालत झालीय आमाला म्हायीत, आमी एकाद्या आई-बहिणीचं पोर मारण्याचं वंगाळ काम कसं करु साहेब.”
आतामातुर अर्जुन आन पारु दोगंबी रडाया लागले.
“हम्म्म्म ! माझीच शंका खरी ठरतेय असे वाटतेय. पण अर्जुना , तुझ्यावर कसा विश्वास ठेवू मी. सगळे पुरावे तुमच्याकडे बोट दाखवताहेत. प्रेतं ज्या अवस्थेत सापडलीत ती अवस्था, आजुबाजुची परिस्थिती सांगतेय की ती कुणीतरी विकृत माणसाने कुठल्यातरी अघोरी कामासाठी बळी दिलेली आहेत.
आणि सापडलेले पुरावे व तत्कालीन परिस्थिती ओरडून -ओरडून तुमच्याकडे बोट दाखवतेय.
‘तुज्या आयला तुज्या….. जिवच घेतू म्या तुजा!”
इजुआबा दात्-ओट खातच अर्जुनावर धावून गेला. तसं एका हवालदारानं त्येला पकाडलं.
“थांबा विजुभाऊ, अजुन त्याच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाहीये. सद्ध्या फक्त त्यांच्यावर संशय आहे. अजुन त्यांनीच हे खुन केलेत हे सिद्ध झालेले नाही.”
“आता आजुन काय र्हायलंय सायेब,माजं सोन्यासारकं प्वार गमवलंय म्या. आसल्या लोकांना चावडीवर हुबं करुन दगडानी चेचाया पायजे.” इजुआबाचा संताप काय थंड व्हईत न्हवता. पण पोलीसानी आवारलं त्याला.
“तुमी बसा एका कोपर्यात.” नाईकनवरेसायबांनी त्या दोगास्नी बसाया सांगितलं आणि फुडं बोलाया लागलं……
“मला शंका वाटत होती की यात आणखी काही वेगळंच असण्याची शक्यता आहे, म्हणुन आमचा शोध आम्ही चालुच ठेवला होता. तशात एक दिवस एका खबर्याने बातमी आणली की डॉ. फर्नांडोंच्या दवाखान्यात मागच्या यार्डात मध्यरात्रीच्या नंतर काही संशयास्पद हालचाली पाहील्याची!”
नाईकनवरे सायबांनी बारक्या डोळ्यांनी फर्नांडोकडं बिगिटलं आन गालातल्या गालात हासाया लागलं…
“ए रम्या, उगा पाचकळपना करु नगो, पटं पटं सांग फुडं काय झालं ते……..”
औध्या भडकला तसा रम्या हासला.
“बरं बाबा, सांगतु…., तस्सं डाक्टर येकदम हुबं रायलं.
” काय बोलता आहात इन्स्पेक्टर तुम्ही? काही पुरावे असतील तर आरोप करा? मी एक जबाबदार आणि प्रतिष्ठीत नागरीक आहे. एक विख्यात डॉक्टर आहे या भागातला. काहीही आरोप करु नकात.”
डाक्टर रागानं लाल-लाल झालं हुतं बघ औध्या.
“डॉक्टर प्लीज आरडा ओरडा करु नका. मी अजुनही तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत. मी केवळ तुमच्या हॉस्पिटलचा उल्लेख केलाय आणि मी पुरावे असल्याशिवाय काहीही बोलत नाही. तुमची उर्जा राखुन ठेवा, पुढे उपयोगी येइल कदाचित.”
सायबाच्या आवाजात आसा काय अंगार व्हता की डाक्टरची आवाजी बंदच झाली.
“पन रम्या, डाक्टरसायबांसारखा देवमानुस… ?” जन्यानं मधीच पिल्लु सोडलं…
आता गपचिप बसुनशान ऐकतु का? उगा मधीमधी काड्या करू नगं” रम्या डाफरला तसा जन्या गप्प झाला.
“डॉक्टर, त्या नंतर आम्ही सगळीकडेच नजर ठेवायला सुरुवात केली आणि एके दिवशी तुम्हाला एक फोन आला आणि तुम्ही भर दुपारीच सगळ्या अपॉईंटमेंट्स रद्द करुन घाई घाईत दवाखान्याच्या बाहेर पडलात. असं तुम्ही यापुर्वी कधीच केलं नव्हतं. काय झालं होतं नक्की त्या दिवशी?”
सायबानी बाँब टाकला आन डाक्टर हादरलं.
“तुम्हाला….., कसं…? कळलं हे सगळं?” डाक्टरचा आवाज नको तेवडा खाली आला हुता.
“डॉक्टरसाहेब, अगदी स्कॉटलँडयार्डच्या तोडीचे नसलो आम्ही तरी काय झालं, या छोट्या छोट्या गोष्टी फार अवघड नाहीत आम्हाला. सगळीकडे माणसं आहेत माझी. तुमचं फोनवर काय बोलणं झालं ते सांगु? कोण आणि कशासाठी ब्लॅकमेल करतय तुम्हाला?”
“क क्क कोण ब्लॅकमेल करतय? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साहेब. असं काहीही नाहीये.”
नाईकनवरेसायबानी खांदं उडिवलं….
“ठिके तर, हवालदार त्या डॉक्टर वर्तकला घेवून या जरा.”
तसं फर्नांडो डाक्टर चमाकलं, हवालदार वर्तकला घिवुन आलं , वर्तकचा पडल्याला चेरा बिगिटला आन डाक्तरची ताकद सपली.
“ठिक आहे इनस्पेक्टर, मी सगळं सांगतो तुम्हाला. पण या सगळ्याचा ही लहान लहान पोरं गायब होण्याशी काही एक संबंध नाहीये. गेले कित्येक महीने आम्ही एका नव्या औषधावर प्रयोग करतोय. जर यशस्वी झालो तर कॅन्सरसारख्य रोगावर याचा खुप फायदा होवू शकेल. सुरूवातीला आम्ही या नव्या औषधाचा परिणाम चेक करुन पाहण्यासाठी आधी उंदीर, मग माकडे अशा प्राण्यांवर त्याचा वापर करुन पाहीला अॅंड वी वेअर सक्सेसफुल. मग ……..
“बोला डॉक्टर, पुढे बोला……..” इन्स्पेक्टरसायेब वरडले.
“नंतर आम्ही त्याचा माणसावर वापर करुन पाहायचा असं ठरवलं. पण असं कोणी सहजासहजी तयार होणार नव्हतं. म्हणुन आम्ही कुणाच्याही नकळत आमच्याकडे असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णावर त्याचा प्रयोग करुन पाहीला. त्याचा कॅन्सर तसा प्रायमरी स्टेजला होता, नियमीत उपचाराने तो कदाचित बराही झाला असता, पण आमच्या औषधाचा त्याच्यावर वेगळाच परिणाम झाला आणि तो रुग्ण दगावला……!”
डाक्टरसायबांची मान खाली झाली व्हती, डोळ्यात पाणी साठलं व्हतं.
तो तर गेलाच सर, पण माझ्यातला राक्षस जिवंत होता अजुन. नोबेलची लालसा होती मला. मी ते प्रकरण दाबुन टाकलं आणि माझे प्रयोग करत राहीलो. वर्तक माझे असिस्टंट होते त्या प्रोजेक्टवर. त्यांनी मला थांबवायचा खुप प्रयत्न केला पण मी थांबायला तयार नव्हतो. तो रुग्ण आमच्या औषधाने दगावला ही गोष्ट फक्त मी आणि वर्तक, अशा आम्हा दोघांनाच माहीत आहे अशी माझी समजुत होती. पण ते साफ चुकीचे होते. दुर्दैवाने माझी समजुत चुकीची होती.वर्तक मला एकनिष्ठ होते
पण …..
कुणीतरी अस्तनीतला निखारा होता. त्याने याचा गैरफायदा घेवून मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. सुरूवातीला त्याच्या फक्त पैशाच्या मागण्या होत्या. पण त्या दिवशी त्याचा फोन आला……
“येस डॉ. फर्नांडो हिअर !”
“नमस्कार डॉक्टर, मी बोलतोय !”
मी लगबगीने उठलो, माझ्या केबीनचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा फोन घेतला.
“तु इथे कशाला फोन केलास? तुला किती वेळा सांगितलेय इथे फोन करत जावू नकोस म्हणून.”
“त्याचं काय आहे ना डॉक्टर. आजकाल जाम कडकी चालु आहे. हात जरासा तंग होता, म्हणुन म्हटलं तुम्हाला जरासा त्रास द्यावा. थोडी निकड होती डॉक्टर….”
“ठिक आहे, पण…! परत इथे फोन करू नकोस.”
“ठिक आहे, डॉक्टर, मी परत फोन नाही करणार. बस आज रात्री १० पेट्या तयार ठेवा आणि मी जर पुन्हा फोन करु नये असे वाटत असेल तर आपण एक डिल करुया आज. माझ्या माहितीप्रमाणे तुमचं संशोधन पुर्ण होत आलेय. आता परत तुम्हाला गिनीपिगची गरज पडेल. ते मी तुम्हाला पुरवेन, फक्त त्यासाठी औषधातुन तुम्ही जे काही कमवाल त्यात मला पण हिस्सा पाहीजे , जास्त नाही ५०-५० बस्स! ” फोनवरची व्यक्ती खदखदा हासली.
“हे बघ, हे अति होतय ! मला थोडा वेळ दे!”
“हवा तेवढा वेळ घ्या डॉक्टर, फक्त मला विसरु नका. नाहीतर……..!”
त्या आवाजातली गर्भित धमकी समजुन मी हादरलो आणि लगेच लॅबला फोन लावला…
“हॅलो डॉक हिअर, डॉ. वर्तक, सगळे प्रयोग थांबवा….. थोडा सबुर करा!”
“पण सर, वी हॅव ऑलमोस्ट अॅचिवड दॅट! आपण आता यशाच्या उंबरठ्यावर आहोत.”
“व्हू इज द बॉस स्टुपीड! डू अॅज आय सेड, अंडरस्टूड? ” नकळत माझा आवाज चढला.
त्यानंतर मी लगेचच बाहेर पडलो. तात्पुरते का होईना सगळे प्रयोग थांबवायला हवे होते. त्याला रोखणे जरुरीचे होते. कारण मला हे औषध गोर-गरीबांसाठी, ज्यांना खर्च करणे शक्य नाही त्यांच्यासाठी आणायचे होते, तेच जर या ब्लॅकमेलरच्या हातात सापडले असते तर सगळीच मेहनत वाया गेली असती… !”
काहीही असो एका निरपराध व्यक्तीच्या मृत्युला मी कारणीभुत ठरलो आहे, त्याबद्दल मी स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करतोय, कायदा देइल ती सर्व शिक्षा मला मान्य आहे. …..”
डाक्टर सायेब लैच हताश झालं हुतं…
“पण या मुलांच्या गायब होण्यात माझा काही एक हात नाहीये इन्स्पेक्टरसाहेब आणि वर्तकही निर्दोष आहेत, ते फक्त हुकमाचे गुलाम होते.”
“हम्म्म्म्म ! नाईकनवरे सायेबानी एक सुस्कारा सोडला… शोधायला गेलो एक आणि हाती आलं दुसरंच….. ! पण म्हणजे आपली मुळ समस्या अजुनही तशीच आहे.
बट, आय एम सॉरी टू से डॉक्टर, पण त्या सर्व मुलांच्या गायब होण्याचा अगदी तुमच्याशी नसला तरी डॉ. वर्तकांशी आणि पर्यायाने तुमच्या हॉस्पीटलशी संबंध आहेच. काय डॉ. वर्तक?”
इनिस्पेक्टरसायबांनी आता वर्तक डाक्टरकडं मोर्चा वळीवला….
तसा वर्तक घाबरून हुबा र्हायला….
“साहेब मी सगळं सांगतो, पण मी फक्त कठपुतळी आहे, यात हॉस्पीटलमधले अजुनही काही डॉक्टर सामील आहेत. आणि या सगळ्यांचा चिफ आहे ……..!”
एकदम कसलीतरी मोठी गडबड झाली, नाईकनवरेंसायबानी वर्तक डाक्टरला येकदम लांब ढकलला आणि कंबरेचं पिस्तुल काडुन फायर केला. जोरात वरडुन कुणीतरी खाली पडलं. तसं नाईकनवरे सायबांनी वाघासारकी झेप घेतली आन त्येच्या मुसक्या बांदल्या.
………….
……………….
………………………..
कदम फौजदाराच्या हातावरच गोळी बसली हुती. लै रगात व्हात हुतं. लगेच फर्नांडो डाक्टरानी आपल्या गाडीतली औषिदाची प्याटी मागवली आन त्येन्ला पट्टी बांधली. समदंच आ वासुन बगत रायलं हुतं. आबा तर जागवर उटून हुबंच रायलं.
“हे खुपच दु:खद आहे, क्लेषकारक आहे , संतापजनक आहे….., कदम. नाईकनवरे सायेब येकदम हळु आन थकलेल्या आवाजात बोलाया लागले.
“का केलस हे? कशासाठी आणि काय मिळवलंस यातुन?”
“साहेब हा मला फसवण्याचा डाव आहे. मला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःची मान बचावण्यासाठी हे डॉक्टरलोक मला अडकवू पाहताहेत.”
कदम अजुनबी कबुल करायला तयार न्हवता.
“बस्स, कदम ! खुप झालं ! आत्ता माझी सहनशीलता संपलीय. “
नाईकनवरेसायेब लै चिडले व्हते.
“कदम, इथे कोणीही तुझं नाव घेतलेलं नव्हतं. वर्तकांनी चिफचं नाव घ्यायच्या आधीच तु त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलास, म्हणुनच मला तुझ्यावर गोळी चालवावी लागली. माझ्याकडे तुझ्या विरोधात सगळे पुरावे आहेत. अर्जुन आणि पारुला पुढं करुन आमची दिशाभुल करण्यासाठी तु वापरलेले रघु मांत्रीक आणि नर्स कमलाबाईंनी कधीच तुझ्याविरुद्ध जबाब दिलाय. तुला साथ देणारे डॉ.अभिजीत वर्तक, डॉ. साळुंके आणि डॉ. नियाझ अहमद यांना अटक केलीय आम्ही. त्यांनी आपलं तोंड उघडलय कधीच. तु एक निर्ढावलेला आहेस, पन पोलीसांच्या चौदाव्या रत्नाला तोंड देण्याइतकी ताकत त्या पांढरपेश्या लोकात नाहीये. एवढेच नाही तर ज्यांच्यासाठी तु हे निर्घूण कृत्य करत आलास, त्या मुंबईच्या गँग्जच्याही बहुतेक जणांची धरपकड झाली असेल आत्तापर्यंत. तु तुझ्या तोंडाने गुन्हा कबुल करतोस की ……
प्लीज एका पोलीसालाच थर्ड डिग्री लावण्याची वेळ आणु नकोस माझ्यावर. तुला माहिती आहे गुन्हेगारांशी बोलताना नाईकनवरे माणुस राहात नाही.”
“आयला तुला सांगतो, औध्या. नाईकनवरे सायबाला येवडा चिडलेला कंदीबी बिगिटला न्हवता म्या. लै डेंजर चिडलं हुतं ते. त्येंचा जमदग्नी झालेला बिगितला आन कदम पोपटासारका बोलाया लागला…..!
“फौजदाराची परीक्षा पास होवून चांगली खाती पिती पोस्टींग मिळण्यासाठी पंधरा लाख रुपये मोजले होते मी. सुरुवातीला मुंबईला मिळाले पोस्टींग. पण मला थांबायला वेळ नव्हता. मी पैसे कमवायला सुरुवात केली. नेमका एका मोठ्या प्रकरणात वरीष्ठांच्या नजरेत आलो आणि मोठ्यांना वाचवण्यासाठी म्हणुन मग साहजिकच माझ्यासारखी लहान मासोळी कापण्यात आली. माझी बदली मुंबईपासुन दुर या असल्या कोरड्या ठिकाणी करण्यात आली. इथे लहान सहान भुरट्या चोर्या, आपापसातले हेव्यादाव्यातुन होणारी क्षुल्लक भांडणे सोडली तर मेजर गुन्हे घडतच नव्हते. त्यात नाईकनवरे साहेब नको तेवढे इमानदार. कर्तव्याला देव वगैरे मानणे असल्या खुळचट कल्पना मनात बाळ्गुन बसलेले. इथे काही वरकमाईची अपेक्षा करणे अवघडच नव्हे तर मुर्खपणाचे होते. मी जवळ जवळ आशाच सोडली होती. तरी जुन्या संबंधीत वरीष्ठांशी संपर्क ठेवुन होतो, परत मुंबईला बदली करुन घेण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्याच दिवसात मुंबई अंडरवर्ल्डच्या जुन्या लोकांकडून एक जण मला भेटायला आला. त्याने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला…..
इट वॉज अॅन टेम्प्टिंग ऑफर! माझ्यासारख्या बुद्धीमान माणसासाठी पैसे कमावण्याचा फार चांगला मार्ग होता तो. सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागणार होती. पैसा ओतावा लागणार होता जो अंडरवर्ल्ड ओतणार होतं. मला फक्त कमिशन एजंट म्हणुन काम करायचं होतं. कमिशन म्हणुनच प्रचंड अगदी लक्षावधी रुपये मिळणार होते.
काम होतं साधारण दहा ते पंधराच्या वयोगटातली मुलं पळवायची. त्यातले जे हट्टेकट्टे असतील ते मुंबईमार्गे सरळ आखाती देशात पाठवले जाणार होते. उंटाच्या शर्यतींसाठी . जे धड नसतील त्यांच्या शरीरातील धड असणारे अवयव कामी येणार होते. मी डॉ. फर्नांडोच्या हॉस्पीतलमधील काही डॉक्टर्सना पैशाचा मोह दाखवुन, काहींना त्यांच्या काही विकपॉईंटसच्या जोरावर ब्लॅकमेल करुन या कामात सामील करुन घेतले. खरेतर आम्ही मुलांना, त्यांच्या आई वडीलांना मुंबईत काम मिळवून देण्याची लालच दाखवुन उचलत होतो. कामासाठी म्हणुन मुंबईत आलेली पोरं थेट आखाती देशात पाठवली जात तिथल्या उंटांच्या शर्यतींसाठी. आम्ही प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम त्या मुलांच्या घरी पाठवत असु, त्यामुळे त्या आघाडीवरही फारशी तकलीफ नव्हती. राहीलेल्या मुलांना इथेच संपवण्यात येत असे, मारण्यापुर्वी किंवा नष्ट करण्यापुर्वी त्यांच्या शरीरातील चांगल्या अवस्थेतील अवयव काढुन घेवुन ते परदेशी पाठवण्यात येत. या अवयवांना परदेशात प्रचंड मागणी असे. त्यासाठी डॉ. वर्तक आणि इतरांचा उपयोग होत होता. त्यातुनच मला डॉ. फर्नांडोंच्या नव्या शोधाची माहिती मिळाली. आणि मी त्यांना ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. पण मग माझा लोभ वाढायला लागला. आतापर्यंत आम्ही फक्त कामाचे आमिष दाखवुन मुले पळवत होतो. आता सरळ सरळ उचलायला सुरूवात केली. जर लक्षात आलेच तर ते डॉक्टरच्या माथ्यावर मारता येणार होते. कमलाबाईकडुन जेव्हा अर्जुन आणि पारुच्या समस्येबद्दल कळाले तेव्हा मी त्यांचा फायदा करुन घ्यायचे ठरवले. पुढे मागे त्यांचा व्यवस्थित वापर करुन घेता येण्यासारखा होता. मग पंचक्रोशीतलाच एक फुटकळ हातचलाखीची कामं करणारा रघ्या हाताशी धरुन मी त्या दोघांना अडकवण्याचा प्लान केला. पण ते दोघेही निसटले. सुदैवाने त्यांचा अडाणीपणा माझ्या पथ्यावर पडला. पोलीसात जायच्या ऐवजी भुताला घाबरुन ते दोघेही पारुच्या माहेरी लांब पळुन गेले.
हि सगळी रिस्क मी घेतली होती, ती डॉ. फर्नांडोंच्या गुड विलच्या जोरावर. माझे काम त्यांच्या हॉस्पीटलचा वापर करुनच व्यवस्थित चालु होते. पण डॉक्टर स्वतःच त्याच्या संशोधनात बुडालेला असल्याने त्याला इतर क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ती जबाबदारी त्याने आपल्या विश्वासु डॉ. वर्तकवर सोपवली होती. आणि वर्तक माझा माणुस होता. डॉ. च्या देवमाणुस या किर्तीमुळे इतर कुणालाही त्यांचा किंवा त्यांच्या हॉस्पीटलचा साधा संशयही आला नाही. आमचे काम व्यवस्थीत चालु होते…..
पण पुन्हा या मुर्ख डॉक्टरलोकांचा हलगर्जीपणा गोतास काळ ठरला. हवे ते अवयव काढुन घेतल्यानंतर प्रेत पुर्णपणे नष्ट करुन टाकायचे असे स्पष्ट आदेश त्यांना दीले गेले होते. पण एक प्रेत त्यांनी तसेच जंगलात टाकुन दिले. नेमके ते पोलीस टिमच्या हाती सापडले आणि नाईकनवरे साहेबांच्या नाकापर्यंत वास गेला. मग त्यांची दिशाभूल करण्यासाठी मी अर्जुन आणि पारुचा वापर करण्याचे ठरवले. काही प्रेते मुद्दाम अशा अवस्थेत टाकुन देण्यात आली की त्यातुन नरबळीचा भास निर्माण व्हावा. मग माझ्या माणसांनी अर्जुन आणि पारुबद्दल नाईकनवरे साहेबांना बातमी मिळेल याची व्यवस्था केली. त्यानंतर मी स्वतः त्या दोघांना पकडुन नाईकनवरेंच्या स्वाधीन केले. खुन पाडणाराही मीच आणि शोध घेणाराही मीच… यामुळे मी निर्धास्त होतो. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे…….!”
फौजदार कदम बोलायचे थांबले.
“पुढे मी सांगतो, कदम. तु अर्जुन आणि पारुला माझ्या स्वाधीन केलेस आणि अगदी ठासुन, तावातावाने सांगितलेस की तेच या प्रकरणाचे सुत्रधार आहेत. सुरुवातीला मी थोडा गोंधळलो होतो खरा. पण पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आला आणि बर्याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या.
पहिली महत्त्वाची बाब उघडकीस आली ते म्हणजे प्रेताचे अतिषय कसबी कलाकाराने कागद कापावे तसे व्यवस्थितपणे, सराईतपणे तुकडे करण्यात आले होते. जे एखाद्या कुशल सर्जनलाच शक्य होते.
दुसरी गोष्ट म्हणजे सापडलेल्या प्रत्येक शवातील काही ना काही अवयव गायब होते. उदा. किडनी, डोळे……ई. विशेष म्हणजे शरीराचे तुकडे करण्यापुर्वी हे अवयव काढुन घेतल्यावर प्रेतं पुन्हा नीट शिवण्यात आली होती. ही चुक तुमची सगळ्यात मोठी चुक होती.
मग मी हात धुवुन डॉ. फर्नांडोच्या मागे लागलो. पण नंतर त्यातुन दुसरीच स्टोरी बाहेर यायला लागली. एका तपासातुन दोन गुन्हे उलगडणार होते. मी हॉस्पीटलच्या स्टाफवर नजर ठेवली. त्यातुन लक्षात आलं की त्यातले काही नामवंत डॉक्टर्स वारंवार तुझ्या संपर्कात असतात. मग मी मुंबई हेडक्वार्टर्सवरुन तुझे रेकॉर्डस मिळवले आणि तुझ्या मागे लागलो. कदम, तुला तुझा मोह नडला. निर्धास्तपणे चालु असलेलं कृष्णकृत्य सोडुन तु डॉक्टरला ब्लॅकमेल करायला लागलास. थोडा ट्रेस घेतल्यावर सगळ्या गोष्टी अगदी तुझ्यासकट माझ्या लक्षात यायला लागल्या. मग आम्ही तुझ्यावर नजर ठेवली. खरेतर त्याच वेळी तुझ्यावर हात टाकु शकलो असतो आम्ही, पण मग तुझे खरे बाप निसटले असते म्हणुन ते हराम….. हातात येइपर्यंत आम्ही कळ काढली. सगळे पुरावे आमच्या हातात आले आणि आज या सगळ्यांसमोर तु उघडा पडलास.
आय स्वेअर कदम, तुला कमीत कमी फाशी तरी होइलच याची खात्री देतो मी तुला ! एक पोलीस असुन जे कृत्य तु केले आहेस ते जनतेचा पोलीसांवरील विश्वास उडायला भाग पाडणारे आहे. तुझ्यासारखेच कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा जनतेचा कायद्यावरील विश्वास उडायला वेळ लागत नाही. त्यांचा विश्वास उडु नये म्हणुन तुझ्यासारख्या नराधमांना मृत्युदंडच मिळायला हवा !
एकच शिक्षा To be hanged till death !
******************************************************************************
“तर गड्यांनो, अशी साठा उत्तराची कहानी एकदम ते काय सुफला काय म्हनत्यात तशी संपुर्न झाली बगा. चला आता भजी मागवा कुनीतरी. “
रम्यानं परत तमाखुचा बार लावला. सगळेच सुन्न झाले होते, भजी मागवायचीही कुणाला शुद्ध राहीली नव्हती.
समाप्त.
(पुर्णपणे काल्पनिक)
.jpg)
पुन्हा एकदा सिक्सर
विशालभौ , जबरी.
या भागाच्या सुरवातीला डॉ. फर्नांडो चा पार्ट आला तेंव्हा वाटले की हे कशाला टाकले आता सगळे समजले आम्हाला, पण शेवट वेगळाच नीघाला.
लै भारी.
राजाभाउ
एक्दम्मस्त
एकदम मस्त...बेष्ट नाही तर बेष्टेष्ट!!!
माझे लिखाण
अभिजित, राजाभाऊ खुप खुप आभार
अभिजित, राजाभाऊ खुप खुप आभार
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
विशाल, छान लिहीतोस रे! मागे
विशाल, छान लिहीतोस रे! मागे पण एकदा तुला सान्गितल होत की वाचकाची उत्सुकता ताणून धरायला छान जमत तुला. शाळेत असताना नारायण धारप वाचायला खूप आवडायच माला.अजुनही आवडत पण तेवढा वेळच नसतो. तुझ्या कथा वाचल्या की छान वाटत. असाच लिहीत रहा!!!!!!!!!!!
धन्यवाद भाग्यश्री ! मनःपूर्वक
धन्यवाद भाग्यश्री ! मनःपूर्वक आभार
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
छान रे. आधी पण वाचले होते व
छान रे. आधी पण वाचले होते व तेव्हा आनंद मिळाला होता तोच आनंद पुन्हा वाचन करताना मिळाला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद राजे
धन्यवाद राजे
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
अप्रतिम कथा.. तिन्ही भाग
अप्रतिम कथा.. तिन्ही भाग अतिशय उत्तम जमले आहेत.
अप्रतिम कथा...........
अप्रतिम कथा...........
जबरा!
आयला हे वाचलेच नव्हते....
जबर्या झालिय कथा....
रहस्यकथेचे वैशिष्ठ्य म्हणजे खरा सुत्रधार / खुनी शेवट पर्यंत न कळणे हे आहेच पण त्या शिवाय वाचकाच्या मनातील संशयाची सुई पात्रा पात्रांवर फिरती ठेवणे...
विशल्याने या कथेत ते काम फारच कौशल्याने केलय.....
अप्रतीम कथा!
अंजली, आंबोळी मनःपूर्वक
अंजली, आंबोळी मनःपूर्वक आभार्स !!
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन