भक्षक : भाग २

0
0

खरेतर सर्व कथा एकाच भागात टाकायची इच्छा होती. पण काही जणांना मोठ-मोठ्या कथा वाचायचा कंटाळा येतो, म्हणुन तुकड्या तुकड्यात टाकावी लागतेय.

भाग १

“रामराम पाटीलसाहेब, आज आमच्याकडे कशी काय पायधुळ झाडलीत? या..या…बसा ! चव्हाण चार स्पेशल सांगा आणि बिस्कीटंही आणायला सांगा बरोबर. बसा आबा!” नाईकनवरेंनी हसत हसतच स्वागत केले आबांचे.

“इनिस्पेक्टर सायेब, तुमचा चा प्यायला लई आवडलं आसतं बगा आमास्नी. आवो तुमी आमचे खास दोस्त. तुमास्नी नाय म्हनाची हिंमत हाय का आमच्यात? पण आजच्याला लै इंपार्टण कामासाठी आलो हाये बगा.”

आबांनी तंबाखुची फक्की भरली आणि खुर्चीवर बसकण मांडली. इजुआबा तिथेच आवघडुन उभा राहीला. तसं इन्स्पे. नाईकनवरेंनी त्येला बसायची खुण केला. पण त्यो काय बसंना.

“न्हाय सायेब, मी बरा हाये हितंच!” इजु तसाच आंग आकसुन कोपर्‍यात हुबा रायला.

“त्ये न्हायी बसायचं आमी सांगिटल्याबगर, आमच्यासमुर आसं! ए इजु, बस बाबा ! सायबांच्या दरबारात आलुया आपण.”
आबांनी सांगिटलं की इजुआबा लगीचच खुर्चीवर बसला.

तसं नाईकनवरेसायेब त्याच्याकडे बगुन गालातल्या गालात हासाया लागले, त्यो आजुनच आकासला.

आबांनी आपल्या येण्याचं काराण सांगितलं.

“नाईकनवरे सायेब ही आमच्या पंचक्रोशीतली तिसरी घटना हाये. तिन पोरं गायब झाल्याती. दोन आमच्या गावची आन एक ४ कोसावरच्या रातांब्यातलं. लोकं लई घाबरल्याती सायेब. काल या इजुचा पोरगा रंगनाथ गायब झालाय बगा. इज्या सांग रे समदं सायबांना बैजवार.”

तसा इजुआबा रडायाच लागला. नाईकनवरेंनी पाण्याचा ग्लास त्येच्या हातात दिला आन एका हवालदाराला हाक मारली.

“चव्हाण, यांची फिर्याद लिहुन घ्या. त्यांना एक प्रत द्या त्याची, आणला असेल तर पोराचा एखादा फोटो द्या विजुभाऊ! नाहीतर नंतर आणुन द्या, जा चव्हाणांबरोबर जावुन व्यवस्थित सर्व सांगा त्यांना.”

इजुआबानं मान डोलवली आणि चव्हाण हवालदारासोबत तो भायिर गेला. तसं नाईकनवरेसायेब सावरुन बसलं. इजुआबा गेला त्या दिशेनं बगत गंभीरपणे म्हणालं…

“आबा, तुमचा विजुभाऊ घाबरुन जाईल म्हणुन मी काही बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो, मला नाही वाटत त्याचा मुलगा जिवंत असेल म्हणुन. आबा, अहो ही तिसरी नाही…, गेल्या दोन महिन्यातली ही सातवी घटना आहे. विशेष म्हणजे ही साती मुले एकाच वयोगटाची आहेत, साधारण १४ ते १६ च्या दरम्यानची. माफ करा आबा, पण त्यातल्या पाच जणांची प्रेते अतिषय वाईट अवस्थेत सापडली आहेत. अगदी पोस्ट मार्टेम करायलाही काही शिल्लक ठेवलेले नाही. शरीराचे बारीक बारीक तुकडे करुन पोत्यांमध्ये भरुन टाकण्यात आली होती दोन प्रेते. दोन प्रेतांचे तर पुर्ण अवयवही मिळाले नाहीत. काही दातांवरुन तर काही प्रेतांची शरीर- खुणांवरुन ओळख पटवण्यात आली.

हे एक प्रकारचे सिरियल किलींग आहे आबा ! या सगळ्यांच्या मागे कुणीतरी एकच व्यक्ती आहे. कारण एक गोष्ट इंटरेस्टिंगली पुढे येतेय. प्रत्येक प्रेताच्या कपाळावर एक गुणाकाराचे चित्र कोरण्यात आलेय कुठल्याशा तिक्ष्ण हत्याराने. काही प्रेतांपाशी लिंबु, सुया असल्या विचित्र गोष्टी सापडल्या आहेत. आमचा अंदाज असा आहे की एकतर कोणीतरी विकृत माणुस हे करतोय किंवा कदाचित कोणीतरी अघोरी साधक. आम्ही कसोशीनं तपास करतोय आबा. हे आत्ताच या विजुभाऊंना सांगु नका. कदाचीत लवकरच आम्ही परत बोलवुच त्यांना.”

आबा, तुम्ही आता जा परत. शक्य असेल तर आजुबाजुच्या गावच्या लोकांची एखादी सभा घेवुन त्यांना सावध राहायला सांगा. शक्य असेल तर गावकर्‍यांची गस्त चालु करा गावोगाव. आबा, मला खरेतर कसेसेच वाटतेय हे सांगताना,पण पोलीसबळ कमी आहे हो इथे. दहा गावांना इथले मोजके पोलीस कसे पुरेसे पडणार. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. तुमची साथ मिळाली तर लवकरच सुटेल ही केस.”

आबा उठलं.

“तुमी काय बी काळजी करु नगासा, नाईकनवरे सायेब. आमी जमल ती सारी मदत करुच. आज रातच्याला सबा बलीवली हायेच म्या गावात. गस्ती बी सुरु करतो. तुमी काळजी नगा करु. पन काय बी नवीन कळ्ळं की आमाला कळवा. नमस्कार, येतो आमी. इजु झालं का रं..चल, सायेब्..काडतील शोदुन तुझ्या रंग्याला.!

********************************************************************************
चावडी आणि मारुतीच्या पार यांच्या मध्ये असणार्‍या मोकळ्या मैदानात सभा भरल्याली. तसं शिवा न्हाव्यानं दोपारच्यालाच दोन पेट्रोमॅक्सचं दिवं आणुन ठिवलं व्हतं. लोक जमलेले. समद्यांच्याच तोंडावर भीती, ताण यांची मिक्स भावना पसरलेली. चारी बाजुला तसं मोकळं मैदानच असल्यानं वार्‍याचा आवाज लैच जोरात हुता. मारुतीच्या देवळापासला उंबर तर रातीच्या अंदारात लैच भ्याव घालत व्हता. पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात देवळाची सावली या टोकापासुन त्या टोकापत्तुर पसरली व्हती तीनं अजुनच भ्याव वाटत व्हतं. समदी मंडळी कशी धरुन आणल्यासारखी बसली व्हती.

पंचक्रोशीतल्या चार पाच छोट्या छोट्या गावातली मिळुन बरीच माणसं सभंसाठी जमली व्हती. गावं कसली वो वस्त्याच त्या. शिरगाव, रातांबा, कोळपेवाडी, सालसं, भोकरं. त्यातल्या त्यात आबांची कोळपेवाडीच काय ते जरा मोठालं गाव. आबांचा या सगळ्याच वस्त्यातुन चांगलाच वट. लोक मानायचे त्यास्नी. आज येवु घातलंल्या किंवा आलंल्या या संकटानं समदीच धास्तावली व्हती.

“का रं जगु, कशापायी बलीवलं आसल आबा पाटलानी?”

“आता…, आसं काय करतु रामभाऊ? आरं आजकाल काय इचितर घडतय म्हायीत न्हाय का तुला? आरं पोरं गायब झालीत चार – पाच. कोळपेवाडीची तं दोन पोरं जणु काय इरघळुन गेल्यात. मला तं वाटू लागलय की त्येच्या बाबत कायतरी बोलणी करण्यासाटनंच बलिवलय आबानी. त्ये बग ना रातांब्याचा निकाळजेआण्णा, शिरगावचं आन भोकर्‍याचं तलाठीबी आल्याती.”

“आसंल बाबा आसंल…….”

“तर मंडळी…..

आबा उठुन उभे राहीले…. लोकांमदली कुजबुज थांबली आन लोक आबा काय म्हनत्यात ते ध्यान दिवुन ऐकाया लागलं.

“तर मंडळी, मला वाटतं समद्यास्नी थोडीभोत आयडीयेची कल्पना आली आसलच आपण हितं कशापायी जमलो हावो त्याबद्दल. दोस्तानु, आजपत्तुर लै येळेला आपण एकत्र आलो. मंग ती आळंदीच्या माऊलीची पालखी असो, तुकाराम म्हाराजांचा सप्ता असो की रातांब्याच्या पिराचा उरूस असो. आपन समद्यांनी समदे सन वार येकत्र साजरे केलेत. येकमेकाच्या सुकादुकात येकत्र आलो, सामील झालो. पन आजचा परसंग थोडा येगळा हाये. तुमा सम्द्यास्नी म्हायीती आसलच आपल्या या चार पाच गावाच्या परिसरात गेल्या महिन्या दिड महिन्यात लै इपरित गोष्टी घडल्या हायेत. हे आपलं निकाळजेआण्णा, इभुते आण्णा, इजुआबा यांची लेकरं रानातल्या जिमीनीवर पाणी वतल्यावर ढेकूळ इरघाळुन जातो तशी इरघळुन गेल्याती.

दोस्तानु म्या काल तालुक्याच्या गावी जावुन इनिस्पेक्टर सायबांनाबी भेटलु. त्येस्नी स्पेशल इनंती केली …

“म्हनलं सायेब, काय बी करा. पर ह्येचा तपास लावा. या चार पाच गावातली माणसं म्हंजी माजी फ्यामिली हाये. तवा कुटुंबपरमुक या नात्यानं त्यांची काळजी म्याच करायला पायजे का नको. तुमाला सांगतो मंडळी गेल्या चार्-पाच दिसात मला झोपबी लागली नाय. काय रं शिवा?….”

आबांमदला राजकारनी जागा झाला व्हता, आल्या परसंगाचा सोतासाठी कसा फायदा करून घ्याचा हे त्यास्नी लै झ्याक कळतं बगा.

“व्हय की आबा, तुमचं सुजल्यालं डोळंच सांगत्याती की!” शिवानं लगेच लाचारी दाकवत आपली धन्यासाठीची निष्टा परकट केली. तसं तर काल रातच्याला सुंदरा सातारकरणीच्या फडावर आबांबरुबर त्योबी व्हताच ना, आबांच्या खरचानं.

“तर दोस्तानु, सायेब बोलले की आपल्या परिसरात ही साव्वी का सातवी घटना हाये. मंडळी , पोलीस त्यांचं काम करत रयतीलच. पन आपल्याला बी काय तरी करायला पायजे का नगो. पोलीस काय सारकं आपल्याबरुबर थोडीच असनार हायती. म्हुन आप्ल्याला आता सावद र्‍हायला होवं. आपुनच काय तरी कराया पायजे गड्यांनो.”

तशी कुजबुज परत सुरु झाली. लोक आपापसात बडबडाया लागलं.

“माज्या मनातलं बोललासा बगा आबा तुमी!” धोतराच्या सोग्यानं डोळं पुशीत निकाळजेआण्णा म्हनले.

“मंडळी, माजा राजा तर हरवलाच हाये. पन गावातल्या इतर लेकरास्नी तर आपन वाचवु शकतो. म्या काय म्हनतु, समद्यानी आपापल्या वस्तीत काही लोकांचे गट करुन गस्त घालाया सुरुवात करावी. काही मंडळी हरवलेल्या पोरांना शोदण्याचं काम करतील आन काही राखनीचं काम करतील. मला इचाराल तर आजपासुनच आपन हे काम सुरु कराया पायजे. काय आबा?”

“आक्शी माज्या मनातलं बोललासा आण्णा! आपनच जर आसं सावध रायलो तर जे कायबी चाललय त्याला थोडाफार तरी चाप लावता यिल बगा आपल्याला.”

“व्हय , व्हय आबा. आसंच करुया ! आमी समदी तयार हावो. गावातल्या लोकांबरुबर बोलुन त्येस्नी तयार करायचं काम आमच्याकडं लागलं. पन आबा आता मातुर तुमी आमचे नेते. या परकरणात तुमचं मार्गदर्शन असु द्या आमाला, मंग बगा कसं काम करतो आमीबी त्ये.”

काही उत्साही, धाडसी तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घिटली, तसं आबा खुश झालं. लै काय न करता आपसुक चार पाच गावचं नेतेपद मिळालं व्हतं.
चला आवंदा आमदारकीचं तिकीट पक्कं?

दुरवर मारुतीच्या पारापासुन थोडं लांब अंधारात बसुन चार डोळे कानोसा घित व्हते. सबा संपली तसं त्ये दोगंबी लगबगीनं उटलं.

“काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर सगळा गोंधळ होइल बघ.” त्यांच्यातला येकजन हळुच बोलला आन दोगंबी रातीच्या अंदारात गुडूप जाले.

*******************************************************************************

वरच्या घटनंआदी सादारण येक महिन्यामागची गोष्ट …….
……………
………………………….

पाण्याची तर्‍हाबी काय औरच आसती बगा. दनक्यानं, जोरजोरात आवाज करणारं, खळखळ करत वाहणारं पाणी निचितच मनात एक परकारचं जबर्‍या भ्याव आणु शकतं. पर ईच्चार करा…..

मध्यरात्तीची येळ…,
नदीकाठची किर्र झाडी पर वाराबी लै शांत,गुमान वाहतुया. झाडाचं पानबी हालत नायये…….
समदीकडं आवस्येचा काळाकुट्ट अंदार पसरलेला. लांबपत्तुर कसलीबी जाग न्हायी. फकस्त रातकिड्यांची किर-किर. अशायेळंला नदीच्या शांत पाण्यात एक छोटासा दगुडबी पडला तरी त्या आवाजानं काळीज धाड धाड उडतया की. त्यो टप्प आवाज काळजात धडकी भरवाया फुरं आसतय बगा. आबाळातबी अंदाराची सत्ता. आसलाच परकाश तर कुठंतरी मधुनच चमकणार्‍या काजव्यांचा. त्यो काळजातल्या भीतीत आजुनच भर घालतूया…..

आन या समद्या अंदार्‍या, भीतीदायक परिस्तितीत नदीकाठच्या मसनवटीत शांतपणं जळणारं मडं. तसं त्ये बी आता हळु हळु ईझत आलंलं व्हतं म्हना. तरीबी त्येच्यातुन आबाळाकडं झेपावणारा पिवळसर लाल रंगाचा जाळ, आसमंतात जळ्ळेल्या प्रेताची दुर्गंधी भरुन राहीलेली व्हती, मदूनच प्रेताच्या जळत्या हाडांच्या फुटण्याचा… पिचकण्याचा आवाज मसनवटीतल्या शांततेचा भंग करुन जात हुता.

ॐ र्‍हिं क्लिं चामुंडायै विच्चै नमः

त्या भयाण, सुमसाम रातीत त्या काळ्यानं भयाण आवाजात आपलं मंत्र म्हणाया सुरूवात केली आन ती दोगंबी थरारुन गेली.

त्यो तसाबी दिसायला भयंकरच व्हता. काळाकुट्ट कोळशावाणी रंग, पाठीला आलेलं त्ये घाणेरडं, किळसवाणं वाटणारं कुबड. डोक्यावरचं अर्धवट झडुन गेल्यालं क्यास. अंगावर आणि कमरेला कायबी कापडं न्हायीत. नुकताच नदीच्या पाण्यातनं डुबकी मारुन थेट जळत्या मड्यासमुर हजर झालेला. त्याचं त्ये इस्तवासारखं लाल झालेलं डोळं. (आता ते देशीच्या दोन बाटल्या रिचवल्यामुळं झाल्याती हे त्या दोगास्नीबी म्हायीत न्हायी म्हना.) मंत्र म्हनताना चितंच्या त्या लालसर पिवळ्या उजेडात मधुनच चमकणारं त्याचं घाणेरडं पर सुळ्यावाणी वाटनारं दात. ती दोगंबी लै घाबारलेली. तिनं त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरलंला आन रातीच्या त्या थंडीतबी त्येच्या कपाळावर घाम साचलंला …..!

हातातली ती वस्तु हवेत नाचवत त्या काळ्यानं दोगाना सांगिटलं….

“सांगटलेल्या समद्या गोष्टी आणल्या हायेत न्हवं? अंगावरची कापडं काडा …., सम्दी ! …………………. आन नदीत जावुन आंगुळ करुन या!”

यायेळेला पयल्यांदाच त्येच्या हातातली ती वस्तु तिनं बिगिटली आन ती हादरलीच की. ती एक बारकीशीच पण मानसाची कवटी व्हती. ती घाबरलेली बघताच तिच्या जोडीदारानं तिचा तळवा हातानं दाबुन तिला धीर देण्याची कोशीस केली. तसा त्यो बी टरकलाच व्हता. त्या दोगांना घाबरल्यालं बगुन त्यो काळ्या खदाखदा हंसला…

“भ्या वाटतय, नगा डरू…. फकस्त कवटी हाये… सा म्हैन्याच्या नवजात पोराची!”

तशी ती दोगंबी थरारली, ती भीतीनं त्याला घट्ट चिकाटली.

“जावा लवकर आटपा, पुन्यांदा येळ हातातुन निसाटली तर ही बया बी निसटल.”

“कोन्ती बया?”

तिनं घाबरत, घाबरत इच्चारलं…….

“ही बया…. त्यानं समुरच्या चितंवर जळनार्‍या मड्याकडं बोट दाखवत सांगिटलं….

“वली बाळंतीन व्हती न्हवं! बगा कशी सुकानं जळतीय, येकदा का सटकली की पुन्यांदा न्हाय घावायची.”

त्यानं पुन्यांदा हातातली कवटी तोंडाला लावली. ती दोगंबी टरकल्याली, त्याचा कार्यक्रम सुरूच व्हता. खांद्यावरल्या पिवशीतनं त्यानं आपलं सामान भायेर काडलं. कसल्या-कसल्या बाटल्या, हाडं, रंगीबेरंगी दोरे, चारपाच परकारची राख, कसली कसली भस्मं…..! ती दोगंबी आ वासुन बघतच व्हती, तसा काळ्या पुन्यांदा वसकला …

“जावा, लवकर या बुडी मारुन…. येकदम नागव्यानं!”

“पण आमचं काम नक्की व्हईल ना?” तिच्या जोडीदाराने घाबरत घाबरत इचारलं तसं काळ्यानं आपलं तांबारल्यालं डोळं वटारून त्याच्याकडं बिगितलं. त्यो एकदम घाबरुन मागं सरकला.

“आमी येतो लगीचच आंगुळ करुन….!”

दोगंबी नदीकडं गेलं आन काळ्या तयारीला लागला. कसले कसले जंतर मंतर म्हनत त्याचं अघोरी काम सुरू झालं. जराश्यानं ती दोगंबी आली. बाय भल्ली आकसलेली. परक्या बाप्यासमुर अशा अवस्थेत येण्याची ही पैलीच येळ. जोडीदाराने तिला धीर दिला. ती दोगंबी काळ्यासमोर येवुन हुबी रायली. तिची नजर पार जमीनीत घुसल्याली. काळ्यानं तिच्यावरुन खालपासुन वरपत्तुर येक नजर फिरवली. तिचा जोडीदार बघतुया हे ध्येनात आल्या आल्या मातुर लगीचच नजर फिरवीत दोगास्नी चितंसमोर राखंनी काडलेल्या एका वर्तुळात बसण्याची खुण केली आन सोता जोरजोरात मंत्र उच्चारत आपल्या पोतडीतून काढलेल्या त्या चित्र-विचित्र वस्तु एक एक करून त्या चितंत फेकत मड्याभवती फिराया लागला. थोड्या येळाने अचानक चितेची आग भडकली… सगळीकडे धुर धुर झाला. तसा काळ्या घुमाया लागला. त्येच्या तोंडातुन आता येगळाच , बाईमान्साचा आवाज भायेर पडत व्हता……

दोगंबी येड लागल्यासारकं त्याच्याकडं बगाया लागलं. काळ्या…, बाईच्या आवाजात कायबाय बडबडत व्हता… काय बोलतुया ते फारसं कळत नव्हतं. त्या दोगास्नी फकस्त एकच गोष्ट नीट कळ्ळी….

“मला दोन डोळ्यांचा नारूळ पायजे.”

दोगंबी एकमेकाला घट्ट धरुन त्याच्याकडं बगत हुती. जरायेळाने तो शुद्धीवं आला. त्यांनी त्याच्याकडं बिगिटलं तसा काळ्या नकारार्थी मान झटकत म्हनला.

“न्हायी बाबा, लै कठीन हाये. बया दोन डोळ्याचा नारुळ मागतीया. जमल का तुमास्नी आणाया?”

“दोन डोळ्यांचा नारूळ….? ह्यो कसला नारूळ आसतो अजुन?” तिच्या जोडीदाराने इचारलं.

तसा काळ्या खदखदुन हासला…. हातातली कवटी त्यानं परत तोंडाला लावली, दोन घुटकं घेतलं आन म्हन्ला…..

“दोन डोळ्याचा नारुळ म्हंजी माणुस….. नारळाला तीन डोळे आस्त्यात, मान्साला दोन !”

तशी ती दोगंबी चमाकली….

“कायबी काय बोलताय जंगम? आसं कंदी आसतय काय? म्हंजी यासाटनं मान्साचा बळी द्याचा. न्हाय न्हाय, काय तरी वंगाळ सांगु नगासा. कायतरी दुसरा उपाय सांगा.”

“ह्यो येकच उपाय हाये! जमत आसल तर फुडच्या आवसंला या तयारी करून. आता निगा. माजी सादनेची येळ झालीया.”

त्या दोगांनी कापडं घातली आन तिथनं पाय काडला. तसा काळ्या लगबगीनं उठला, जवळच पडल्याली त्याची लुंगी त्यानं कशीबशी गुंडाळली आन तिथनं पळाला.

त्ये तिगंबी तितनं पळाली तसं मसनवटीभायेरच्या पिपळाच्या मागुन एक सावली भायेर आली. येक पळभर त्या जळत्या मड्याकडं बगत थांबली आन मंग सोताशीच हासत तिथनं निघून गेली.

*****************************************************************************

क्रमशः