भक्षक…!
“ए रम्या, कशापायी भाव खातुस? सांग की काय झालं हुतं त्ये? “
गोपाळनं रम्याच्या पाठीत एक दणका घातला. तसा सगळ्यांनीच गलका केला. संज्या, नान्या, पाठकाचा औध्या, म्हटलच तर कुलकर्ण्याचा जन्या…. सगळेच रम्याच्या मागे लागले.
“सांग ना बे, कशाला भाव खातो फुकटचा?”
“आरं… आरं… वाईच, चा तरी पिऊ देशीला का न्हायी?”
रम्यानं चहाचा कप संपवला. मिशीला लागलेले चहाचे कण उलट्या मुठीने निपटून काढले. औध्याकडनं तंबाखु मागुन घेतली. चुना लावून व्यवस्थीत चोळली. कचरा काढून टाकत भुकटी ओठांच्या कोपर्यात सरकवली. हात झटकले आणि सावरुन बसला…
तर मंडळी, ऐका कहानी गायब झालेल्या पोरांची …..! पर दोस्तानु येक गोष्ट पैलेझुटच सांगुन टाकतोय, म्या काय समद्याच गोष्टी डोळ्यानी बिगिटलेल्या न्हायीत. तर काही बिगिटलेल्या, काही पाटलांकुन कळ्ळेल्या, पोलिसांकुन ऐकलेल्या आन काही तर म्या दोन आन दोन चार आसा साधा सरळ हिसाब लावलेल्या. तवा सांगण्यात काय गोंदुळ झालाच तर समजून घेवा…काय?……
***********************************************************************************************************
हंबीरराव कोळपेकर-पाटील उर्फ आबा पाटील रोजच्यावाणीच वसरीवरच्या शिसवी झोपाळ्यावर बसलेलं व्हतं. तोंडात तमाखुचा बार भरलेला. झोपाळ्यावर शेजारीच पानाचा पितळी डबा ठिवलेला. त्यातलीच दोन पिवळीजर्द पानं चुना लावुन उजव्या मांडीवर ठिवलेली. बसल्या बसल्याच पायाने हलकंच झोपाळ्याला झोका देत हातातल्या अडकित्त्याने सुपारी कातरण्याचं काम अगदी निगुतीनं चाललेलं. समुरच्या वसरीवर हातरलेल्या हातरीवर गावातली रिकामटेकडी मंडळी (पाटलीण बाईंच्या भाषेत टोळभैरव) आशाळभुत नजरेने पाटलांच्या शेजारी ठेवलेल्या पानाच्या डब्यावर नजर लावुन बसलेली व्हती. कधी एकदा पाटलांचं पान लावुन व्हतया आन डबा खाली आपल्याकडं येतुया याची वाट बघत. आता त्येस्नी भायीर पान मिळत न्हाय अशातल्या भाग न्हाय, पन भायीर कुटंबी टपरीवर पान खायाचं म्हनलं की पैका टाकनं आलं, आन हितं फुकाटचं मिळत असताना पैका कामुन खरचायचा बा?
तसं बगाया गेलं तर पाटलास्नी म्हायत व्हतंच की ही टाळकी रोज सकाळच्याला कशापायी जमत्यात वाड्यावर त्ये. फुकाटची पान-तमाखु आन पाटलाची मर्जी झालीच तर फुकाटचा चा बी मिळतुया रोजच्या रोज. पन आजच्या काळात जितं वतनदारी पार खतम झालीया अश्या येळी लै खर्च न करता गावात आपली पत टिकवुन ठिवायची आसल तर असली भुतं पदरी बाळगावी लागत्यात हे पाटलांना ठावं हायेच की! गावात काडी दिकुन हालली की त्याची बातमी पाटलांपत्तुर बिनबोभाट पोचती ती कुणामुळं वं? पाटीलकी सपली, पन गेली आठ वरसं गावात दुसरा सरपंच झालंला नाय… कशामुळं?
“आवं…., जरा आत यिताय काय?” माजघराकडनं आवाज आला आन आबांनी सुपारी कातरता कातरताच मान वळवुन आवाजाच्या दिसंला बगिटलं. कपाळावरच्या आठ्या अजुनच गडद झाल्या….! तसा पाटलीण बाईनी आबांचा नुर वळकला. त्या गपचिप म्हागं वळल्या….
“आता आलाच हायसा तर वाईच चा टाकायला सांगा रकमाबाईस्नी….., समद्यास्नी कप-कप!बरुबर शंकरपाळीबी द्या मनावं उलशिक !”
पाटलांनी कातरलेली सुपारी तोंडात टाकली. मांडीवरचं पान उचलुन दाताखाली घितलं. काताचा तुकडा तोंडात टाकत, जिभंनीच व्हटाच्या कोपर्यातली तमाखु पानाच्या लगद्यात वडुन घिटली आन फुडं बसलेल्या मंडळीकडं पानाचा डब्बा सरकावला….!
“घ्या, पान तमाकु घ्या !”
तसा समुरच बसल्याला शिंप्याचा शिवा माजघराच्या तोडाकडं आधाशासारका बगत म्हनला..
“आबा, आता चा न शंकरपाळं खाऊनच पान खाऊ की! कस्सं?….”
हा कस्सं? बाकीच्यांसाटनं व्हता.
“व्हय्,व्हय. चा व्हवु द्याच आता. उगाच रकमातैंची म्हेनत वाया जाया नगो ना!” मागची टाळकी एकासुरात बोलली.तसं आबानी मुंडी हालवली…
“का रं शिरपा… काय म्हनती आमची कोळपेवाडी?”
“आता तुमी आमचं राजं पाटील. तुमच्या राज्यात समदं झ्याकच हाय तसं, फकस्त गेल्या म्हैन्यात त्यो इभुत्याच्या संज्या रानाकडं म्हुन गेला त्यो गेलाच, परत दिसलाच न्हाय. तेवडी गोस्ट सोडली तर …………
“आबा… आबा…. माझा रंग्या……
नायकाचा इजुआबा पळतच वाड्यात शिरला. त्येच्या मागं त्याची बायकुबी व्हती. रडुन रडुन दोगांचंबी डोळं सुजल्यालं व्हतं.
“आबा, माजा रंग्या हारवलाय. कालच्याला रानाव गेल्याला परत आलाच नाय बगा. सांजच्याला आला नाय त मला वाटलं रायला आसल वस्तीला रानावर संभाबरुबर. तसं लेकरु लै येळा राहतं बगा रानावर रातच्याला. पन आज सकाली संभा येकटाच परत आला. त्यो सांगतुया की रंग्या रातच्यालाच गावाकडं परत आलाय म्हुन. आबा, आवं, दिड मैलाचं अंतर न्हाय गावापासुन शेताचं माज्या. आवं चौदा वरसाचं पोर गायब झालं. त्याचं आयनं तर रडुन रडुन गोंधूळ घाटलाय….!”
एवढं ऐकलं आणि त्याच्या बायकोनी परत रडायला सुरुवात केली. पाटलीणबाई लगुलग भायीर आल्या, आबाबी लककन झोपाळ्यावरुन उटलं आणि इजुआबाकडं सरकलं…
“आरं सापळल पोर! हितंच आसल कुटं तरी. रातच्याला भ्या वाटती येकट्यानं याची, म्हुन झोपलं आसल कुनाच्या तरी कोठ्यावर. उठुन यिल गप थोड्या येळानं. कारं इजु, तु रागं भरला न्हवता ना कालच्याला रंग्याला?” पाटलीणबाई कळवळुन बोलल्या.
“न्हाय वो वयनीसायेब, तसं काय बी झालं न्हवतं पगा! आन रंग्या घाबरणारा न्हाय वो. आर्ध्या रातीला येकटा येतु न्हवं रानातनं. आबा…., आवं गेल्या म्हैन्यात हरवल्याला इभुतेआण्णाचा संज्या अजुन सापडला न्हाय, आन आज त्येच्याच बरुबरीचा माजा रंग्याबी…..
बाईनं पुन्यांचान गळा काडला….. तसं पाटलाच्या कपाळावरच्या आठ्या अजुन दाट झाल्या.
काय चाललंया गावात? येका म्हैन्याच्या आंतरानं दोन पोरं गायब.
“आमी येतो पाटील? ” समुर बसल्याली टाळकी परसंग बगुन पळायच्या तयारीत आली.
“आता कुटशिक जाताय रं फुकट्यानु? रोजच्याला हितं बसुन फुकटचा चा नं शंकरपाळी खायाला लै चव वाटतीया न्हवं? आता गावावर संकाट आलय तर थोबाड लपवुन पळताय व्हय. कुटं नाय जायचं. आता समद्यांनी मिळुन येक काम करा. गावातल्या परत्येक घराकडं, शेतावरल्या वस्त्यांमधुन निरुप द्येयाचा. कुणाला तरी पाटवुन आजुबाजुच्या चार गावातुन सांगा ग्रामसेवकांना यायला. सांजच्याला समद्याला चावडीवर बलिवलय म्हनाव आबा पाटलांनी. या संकटाचा सामना कसा करायचा त्ये ठरवायलाच होवं. मी इजुआबाला घेवुन तालुक्याच्या गावाला जातुया, पोलीसात तक्रार नोंदवाया होवी. सांजच्याला मला समदे चावडीवर पायजेत. चला फुटा आता. इजु चल आपण जावुन येवु तालुक्याला. आवं, त्या रम्याला जिपडं काडायला सांगा. आन या इजुच्या बायकुला आत घिवुन जा. इजु , तु बस जरा, म्या कापडं घालुन आलु.”
“च्यायचं इज्याबी, आत्ताच यायचं व्हतं याला? चांगला चा आन शंकरपाळं मिळत व्हते फुकाटचे.”
आत शिरता शिरता आबांनी शिरप्याच्या तोंडचं कुजबुजणं ओझरतं ऐकलं आन येक सणसणीत शिवी हासडली. आन आतल्या खोलीत शिरलं.आबा लै गंभीर झाले व्हते. कालच शेजारच्या रातांब्याहुन निरुप आला व्हता….. रातांब्याच्या निकाळजेआण्णांचा १३-१४ वर्षाचा पोरगा राजा बी धा पंदरा दिवसापास्नं गायब व्हता.
आन म्या वाड्याभायीर पडलो, गाडी काडायला…..
***********************************************************************************************************
दोन म्हैन्यामागची गोष्ट …….
………………
…………………………
आज आठवड्यातला डाक्टरचा वार. म्हंजी आज न्हेमीपरमानंच फिरता दावखाना गावात येनार. दावखाना कसला तर एक मारुती गाडी. आजुबाजुच्या चार पाच गावात दावखाना नसल्यानं गावात येणारा फिरता दावखाना चावडीवरच थांबायचा!
डाक्टर फर्नांडो म्हंजी आक्षी देवमाणुस. परदेसात शि़क्षाण घिवुन आलेलं डाक्टर फर्नांडो म्हंजी आजुबाजुच्या दहा गावातल्या लोकांसाठी जनुकाय देवच व्हते की! तालुक्याच्या गावी त्यांचा लई मोटा दावखाना होता. खोर्याने पैसा खेचणारा माणुस. एकदा कसल्यातरी कामासाठी म्हणुन डाक्टरसायब रातांब्याला आलं व्हतं. तवा त्येंच्या धेनात आलं की आजुबाजुच्या दहा गावांत म्हणावा तसा दावखाना नाही. नाही म्हणायला सरकारनं शिष्टर नेमल्या व्हत्या परत्येक गावात. पण त्या गावात कमीच असायच्या. असल्या तरी त्येंच्याकडे असलेला औषिदाचा साठा लैच कमी असायचा. लोकांस्नी अगदी सर्दी खोकल्यावरच्या उपायासाठी तालुका गाठायची पाळी यायची. ती हालत बघुन डाक्टरसायेबांसारख्या देवमाणसाचं काळिज खालवर झालं नसतं तरच नवल…..
तवापासनं बगा औषिदांनी भरलेल्या अशा दोन मारुती गाड्या आमच्या या भागात फिराया लागल्या. डाक्टर सोता हप्त्यातला येक दिस या गाडीबरुबर असायचं. बाकिच्या टायमाला त्याचं दुसरं डाक्टरलोक, शिष्टरबाया गाडीवर असायच्या. या गाडीवर एखादं बारकंसं आपरेशनपण करायची सोय व्हती बरं ! आन पुना पैशाची झिगझिग नाय. आसंल तर द्या नसल तर नंतर द्या, आणि नाहीच दिलं तरी कुणालाबी नाय म्हनायची न्हायीत ही मंडळी. दरबी येकदम परवडनारं बगा. त्यामुळं लोक डाक्टरसायेबांना लै मानायचे. डाक्टरसायेबांचं कुठच्याबी गावात येकाद्या घरच्या माणसांसारखं स्वागत असायचं.
आज डाक्टरसाहेबांची स्वारी शिरगावात होती. न्हेमीपरमानंच हासुन खेळुन, अगदी आपलेपणानं इचारपुस करत पेशंट बघणं चालु व्हतं.
“हं…सुमाकाकु, कशी आहे तुझी लेक आता? परत नाही ना आला ताप? आता पाण्यात खेळु नको म्हणाव तिला काही दिवस.” कुणाच्यातरी हाताला पट्टी बांधता बांधता समूर आलेल्या बाईकडं बघत डाक्टर सायेबांनी हासत हासत ईच्चारलं.
“आता बरी हाये माजी सवी, डाक्टरसायेब तुमी देवासारकं धावुन आलासा पगा. तुमी व्हता म्हुन वाचली वो माजी पोर. पर डाक्टरसायेब तुमची फी द्याला पैका न्हाय वो माज्याकडं. म्हुन यो शेरभर जुंधळा घिवुन आली व्हती. त्येवडा ठिवुन घ्या. नगं म्हनु नगासा. आमच्या गरिबाकडे दुसरं काय बी न्हाय द्यायला.”
सुमाकाकुच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं होतं.
खरं तं ती शेरभर ज्वारी घ्याचं डाक्टरसायेबांच्या लै जिवावं आलं व्हतं. पर त्या भाबड्या जिवाचं मन मोडायचं नाही म्हनून त्यांनी ती शेरभर ज्वारी ठिवुनशान घेतली बगा. हळुहळु त्यांचं सगळं पेशंट संपत आलं. शेवटची एक नजर टाकली त्यांनी तर एका कोपर्यात अंग चोरुन हुबं आसल्यालं येक जोडपं त्यांना दिसलं. आसं बगा, चाळीशीला आलेला बाप्या आणि त्यांची बत्तीस- तेत्तीस वयाची बाईल. दोघांची तोंडं उदास, काळवंडलेली, कुठ्ल्यातरी काळजीनं सुकल्याली.तशी त्यांनी त्या दोगास्नी जवळ येण्याची खुण केली. दोघांनाबी गाडीत आत घेतलं. एक शिष्टर सोडली तर गाडीतल्या समद्यांना त्यांनी गाडीच्या भायेर काढलं.
“ये रे अर्जुनभाऊ, बस ! पारूवैनी तुम्ही पण बसा ! कमलाबाई , यांची फाईल काढा बघु जरा. “
कमलाबाईंनी दिलेली फाईल डाक्टरांनी पुन्यांदा चाळली. तशी ती फाईल त्यांनी या आधीपन लैयेळा बिगिटली होती. पर समूर बसल्याल्या जोडप्याला आता जे काही सांगायचं व्हतं त्येच्यासाठी थोडी सोताच्याच मनाची तयारी करायला त्यांस्नी थोडा येळ फायजे व्हता.
“अर्जुनभाऊ, पारूवैनी.. असं बघा देव सगळ्यांना सगळं देतोच असे नाही. ते म्हणतात ना दात आहेत तर चणे नाही आणि चणे आहेत तर दात नाही. माफ करा, खरे तर हे तुम्हाला सांगताना खुप वाईट वाटतेय मला पण खरे ते कही ना कधी सांगायला हवेच. तुम्ही दोघे पहिल्यांदा माझ्याकडे आलात तेव्हाच साधारण कल्पना आली होती मला. पण तुम्हाला काहीही सांगण्याआधी मला त्या क्षेत्रातल्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला हवा होता. म्हणुन मी मागच्या वेळेला तुम्हा दोघांनाही काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्यासाठी माझ्या ओळखीच्या तालुक्याच्या प्रसिद्ध डॉक्टरना मी माझी चिठ्ठीही दिली होती.
आज तुमचा रिपोर्ट माझ्या हातात आहे.
मन घट्ट करुन ऐका. पण तुम्हाला मुल होणं खुपच कठीण आहे. नाही…! पारूवैनी अगदी व्यवस्थित आहेत. त्यांच्यात काही दोष नाही. दोष असलाच तर तो अर्जुनभाऊ तुमच्यामध्ये आहे. आमच्या वैद्यकीय भाषेत याला ‘वेरिकोसील’ असे म्हणतात. तुम्हाला कळावे म्हणुन सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या शरीरात, विशेषतः जननेंद्रियाला रक्तपुरवठा करणार्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांचा आकार काही जणांच्या बाबतीत रेग्युलर आकारापेक्षा मोठा असतो, म्हणजेच त्या ठिकाणी या रक्तवाहिन्या खुपच रुंद असतात. साहजिकच रक्ताभिसरणाचे प्रमाण जास्त असते. रक्त हे मुळातच उष्ण असल्याने त्या भागातील उष्णता खुप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शुक्राणु एकतर निर्माणच होत नाहीत किंवा झाले तरी अतिषय कमजोर असतात आणि उष्णतेमुळे लगेचच मृत होतात, किंवा हवे तितके मोबाईल, प्रवाही होवू शकत नाहीत. त्यामुळे स्त्रीबीजांशी संकर होईपर्यंत ते नष्ट होवुन जातात किंवा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. व त्यामुळे गर्भ धारणा होत नाही. तुमच्या बाबतीत अगदी हेच समस्या असल्याने तुम्हाला मुल होणे दुरापास्तच आहे.
दोगांच्याबी तोंडावर गोंधूळ, त्येस्नी कायबी कळ्ळं नव्हतं.
मंग डाक्टरसायेबांनी समद्या गोष्टी दोगांनाबी येकदम बैजवार समजावुन सांगिटल्या.
हं आता यावर उपाय काय?….. तर आहे, उपाय आहे!
पण दुर्दैवाने आज तरी कुठलाही डॉक्टर या उपायांचा उपयोग होईलच अशी खात्री देवु शकत नाही. काही ठराविक शस्त्रक्रिया करुन शरीरातील त्या विवक्षित क्षेत्रातील रक्तवाहिन्यांचा आकार कमी करुन उष्णता कमी करता येवु शकेल. पण ही शस्त्रक्रिया पुर्णपणे उपयोगी ठरेलच असे १००% नाही सांगता येणार. आणि पुन्हा ती खर्चिक आहे. निदान किमान ४०-५० हजार तरी खर्च येतोच. अगदी मी शस्त्रक्रियेसाठी माझ्या हॉस्पिटलमधली सुविधा मोफत पुरवेन. पण तरीही जे डॉक्टर शस्त्रक्रिया करणार त्यांची फी निदान २०-२५ हजाराच्या घरात जाते.अर्थात, दुसरेही पर्याय आहेत. ” डाक्टरानी आणकीबी काय काय सांगिटलं त्येस्नी.
“बघा तुम्ही आपापसात बोला, ठरवा आणि मग तुमचा निर्णय मला सांगा, मग पुढे काय करायचे कसे करायचे ते मी समजाविन .काळजी करु नका वैनी, सगळे काही ठिक होईल.”
डाक्टरसायेबांनी अर्जुनाच्या पाटीवरुन हात फिरवला आन त्या दोगांकडं बगत वर आबाळाकडं बोट दाखिवलं….
“तो आहे ना !”
अर्जुनानं खालमानंनंच मुंडी हालवली व डाक्टरची नजर चुकवून येकदा पारुकडं, आपल्या बायकोकडं बिगितलं. त्याच्या डोळ्यात येगळीच चमक व्हती. पारूनं त्येच्याकडे बगत मान हालवली आन ती दोगंबी मागारी वळ्ळी.
***********************************************************************************************************
क्रमशः
.jpg)
पुढचा भाग कधी मालक ?
पुढचा भाग कधी मालक ?
लवकर टाक रे पुढ्चे
लवकर टाक रे पुढ्चे भाग................
अरेच्या
आधी कुठे तरी वाचल्यासारखे वाटते आहे. (त्यामुळे का आमच्या तर्कबुद्धीमुळे, शेवट आताच स्पष्ट दिसू लागला आहे.) विशालभौ तुम्ही अन्यत्र हे आधी टाकले होते का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
म्लापण ...पन नीटस आठवत
म्लापण ...पन नीटस आठवत नाहीय...त्यामूळे चालेल ....
ररा.. येस हे याआधी इतरत्र
ररा.. येस हे याआधी इतरत्र टाकलेले आहे, कुठे ते सांगणे नलगे
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
गुडेष्ट
नेहेमीप्रमाणे (विशाल)कुलकर्णी स्पेश्शल!!!
माझे लिखाण
धन्यवाद अभिजित
धन्यवाद अभिजित
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन