गोटुल बद्द्ल लिहायला सुरुवात करण्याचे कारण हे कि ब-याच लोकानी गोटुल बद्दल बरच उलट सुलट ऐकलेलं आहे. गोटुल बद्दलचा संभ्रम दुर करण्यासाठी मी गोटुल हि लेखमालिका सुरु करित आहे.
**************************************
मुक्काम कुडकेल्ली. ता. भामरागड जि. गडचिरोली राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या अगदि पुर्वेकडे आंध्रप्रदेश व छत्तिसगडला लागुन असलेला व घनदाट अरण्याने व्यापलेल्या या भागातिल कुडकेल्ली हे माझं जन्मगाव. जिथे आजहि बस जात नाही, टेलिफोनची सेवा नाहि. पावसाळ्याच्या दिवसात हा भाग महाराष्ट्रापासुन पुर्णत: तुटलेला असायचा (आजकाल नसतो). ईथली भाषा मराठी नसुन माडिया व गोंडी आहे. सरकारनी बळजबरीने आमच्यावर मराठी लादली त्याचा परिणाम मी आज मराठीत लिहतोय.
आमची वेगळी संस्कॄती आहे. आमचे वेगळे सण आहेत, आम्हाला धर्म नाहीच. शिक्षणामुळे मला नुकतच कळलं कि मी वेगळ्या धर्माचा आहे व ते माडीया वेगळ्या धर्माचे, पण शेकडे वर्षांपासुन माझे पुर्वज ईथे याच समाजाचा एक घटक म्हणुन जगत आलेले आहेत. रानात जाउन शिकर करुन जागणा-या जमातितील मी एक घटक आहे. नदितील मासे, कंद, मुळ हे आमच्या रोजच्या जेवनातिल मेनु होय. वन्य प्राण्याची शिकार करणे तर अनिवार्यच आहे, सरकारनी आम्हाला विरोध केला तरी पर्यायी सोय न दिल्यामुळे आजही आम्ही मोर, हरिन सारखे (कायद्याने बंदी घातलेले) प्राणी मारुन खातोच.
गोटुल हे लोकांसाठी प्रश्नचिन्ह घेऊन येणारं शब्द असावं पण आमच्या साठी मात्र ते आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. गोटुल शिवाय आमच्या आयुष्यात काहिच घडत नाही. गावात जे काहि लहान मोठे कार्यक्रम, मिटींग, भांडण तंटयाचे निकाल, प्रेम प्रकरण, लग्न समारंभ, चोराचा शोध, गावात आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय, पोलिस व इतर सरकारी अधिकारी, किंवा आजुन काहि असो. या सगळ्या गोष्टींचा आपसुकच गोटूलशी संबंध येतो.
तर चला गोटुलधे..........
रात्रीचे ७ वाजले असावेत, नुकताच अंधार पडत आलेला होता, गायी ढोरं घेऊन मी अगदी २० मिनटा आधी गावात आलो होतो. गुराना गोठ्यात साठवल्यावर हात पाय धुवुन जेवायला सुरुवात केली. तोच तीकडे आवाज आला.
पोलोssssssss रोsssssssss पोलोsssssssssssssss
नाड पोलो मांता रो पोलो मांता. ( पोलो म्हणजे सुट्टी)
रेडीनी उदयाची सुट्टी जाहिर केली होती.
रेडी, याचं खर नाव एडका आत्राम. हा एडका आत्राम आमच्या कुडकेल्लीची जान होता. आत्राम हे कुडकेल्लीचे पोलिस पाटिल. कित्येक वर्षापासुन पोलिस पाटिलकि हि आत्राम घराण्याकडेच आहे.
हा एडका म्हणजे पोलिस पाटलाचा धाकटा भाऊ, पोलिस पाटिल नुसता नावाचा पाटील होता. पाटिलकिची खरी गुणवत्ता होती एडका आत्रामच्या अंगी. मग नकडत हा एडका केंव्हा स्वयंघोषीत पाटिल झाला हे कुणाला कळलच नाही.
गावातिल, शेजार पाजारच्या गावातिल व गावात येणा-या जाणा-या सरकारी अधिका-याना कुडकेल्लीचा पाटील म्हणुन एडक्याचीच ओळख होती.
खरा पाटील आता नुसता नावापुरता उरलेला होता.
एकडा तसा फार बोलका, एकदम बोल्ड व्यक्तिमत्व, धाड्सी वृत्तीचा व गरज पडेल तेंव्हा शत्रुच्याही मदतीला धावणारा जीगरबाज माणुस होता. त्याच्या या वृत्तीमुळे कुडकेल्लीने एडक्याचं स्वयंघोषित नेतृत्व स्विकारलं होतं.
तसं एडका स्वभावानी होता चांगला पण एकदा दारुचे दोन घोट पोटात गेले कि मग गाणे म्हणने काय, नाचणे काय, पारई (एक फोक वादय) वाजवुन भर पावसात नाचणे काय, हे सगळे प्रकार करायचा. यावरुन त्याला कुणीतरी एकदा म्हटलं कि दारु पिल्यावर रेडिओ ऐवजी तुलाच ऐकलेल जास्त चांगलं. तेंव्हा पासुन त्याला लोकं रेडीओ म्हणायचे, मग या रेडीओचं रेडी केंव्हा झालं कळलच नाही.
मी घराच्या बाहेर येऊन नक्की रेडीच ओरडतोय ना पोलो म्हणुन, याची खात्री करुन घेतली. आमच्याकडे एकदा पोलो Declare झाला कि पोलोच्या दिवशी काहिच काम करायला परवानगी नसते. तो दिवस ज्या कामासाठी पोलो घोषित करण्यात आला, फक्त त्याच कामासाठी घालवायचा असतो.
रेडी पोलो पोलो करत आमच्या घरापर्यंत पोहचला होता.
मी: रेडीss बाराक पोलो मांता रा. (कशाची सुट्टी आहे रे, आमच्याकडे बापालाही अरे म्हणण्याची पद्धत आहे)
रेडी: ईध हुडा, नेल्ला डोलता माती इंका प्याग वावो, नाड वेटांग दायना इत्तेके दायनाये ( पावसाचे दिवस आले तरी आजुन पाऊस नाही पडला त्या साठी गाव देवी (आव्वाल) ला खुष करण्यासाठी वेटांगला जावे लागेल)
वेटांग म्हणजे गावातिल लोकानी सामुहिकरित्या रानात जाऊन शिकार करणे होय. नुसती शिकार आणि वेटांग याच्यात बराच फरक आहे. एखाद्यानी मटन खायला शिकार करने हि वयक्तिक शिकार आहे. पण गाव देवी व इतर पारंपारिक सनाला गावातिल प्रत्येक घरातुन किमान एका माणसानी सहभागी होऊन केलेली सामुहिक शिकार म्हणजे वेटांग होय. आज मात्र गावात पाऊस पडावं म्हणुन देवीला खुष करण्यासाठी प्राण्याचा बडी देण्याचा विधी करण्यासाठी वेटांग करायचे ठरविले जाणार होते.
तसं रेडीचं व माझ्या वडिलांच खुप पटायचं, आमच्या वेटाळातुन जातान रेडी आमच्या घरात किमान १० मिनिटासाठी तरि हमखास शिरायचा. पण आज तो दुरुनच जात होता. कारण पोलोची माहिती गावात दयायची होती.
पोलोssssssss रोsssssssss पोलोsssssssssssssss म्हणत रेडी पुढे निघुन गेला.
आता दुस-या दिवशी कुठलीच काम करता येणार नव्हती. प्रत्येक घरातुन किमान एकानी वेटांगसाठी जायचं होतं.
जुनचा पहिला दुसरा आठवडा असावा, सकाळी अगदी साखर झोपेत असताना पुन्हा हा रेडी गावातील गोटुल पुढे उभा राहुन पोलोssssssss रोsssssssss पोलोsssssssssssssss म्हणुन ओरडु लागला.
माझे बाबा केंव्हाच वेटांगला जात नसत. मग आज मलाच जावे लागणार होते. मी १० मिनटात तयार होऊन गोटुलच्या दिशेनी निघालो. तिथे सगळी लोकं अधिपासुनच जमलेली होती. वेटांगला जाण्या आधी गोटुलमधे जी मिटींग घेतली जाते, त्यात शिकारीची Blueprint तयार केली जाते. जसे, कुठल्या दिशेनी रानात शिरायच, वाद्दींगवाले कुठल्या दिशेनी पुढे जाणार, रान हाकणारी माणस कुठुन सुरुवात करणार, गोरके (भाले) वाले कुठे दबा धरुन बसणार वगैरे वगैरे.आणि हे सगळं ठरवल्या जातं गोटुलमधे व गोटुलचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता रेडि. रेडीनी सगळा प्लान समजावुन सांगण्याची जबाबदारी होती रेडीची.
कुडकेल्ली इनमिन ६०-६५ घरांच गाव आहे, एकुण लोकसंख्या ६००-७०० च्या घरात असावी. पुर्व पश्चिम व उत्तर दक्षीण अशा दोन वाटा आहेत. या दोन्ही वाटा जिथे एकदुसरिला छेदतात तो गावातिल मुझ्य चौक व तिथेच गोटुल आहे. गोटुल म्हणजे ९ डेरीचं मोठं हॉल. या हॉलला खोल्या नसतात म्हणुन हॉल नाहितर हे घरच म्हणण्यासारखं दिसतं. व गोट्लु चारी बाजुनी वेशी रोवुन बंद केलेलं आहे. उत्तरेला मात्र तेवढी ताटीचं दार ठेवलं आहे. गोटुलच्या पुढे सरकारी बोअरवेल (हापसा) आहे, आणि एकाच वेळी ५०० लोकं बसु शकतील असं मोठ पटांगण आहे.
गोटुलमधे (आत ) काहि माणसं बसलेली होती, बाहेरहि बरिच गर्दी होती. कुणी गोटुलच्या दारावर, कुणी शेजरच्या मातीच्या ढिगा-यावर, तर कुणी एखादया दगडावर बसुन मिटींग मधे काय काय सांगितल्या जात होतं ते ऐकत होते. मी बोअरवेलजवळ जाऊन उभा झालो. माझ्या सोबत आमचा कारे पण होता. कारे म्हणजे माझा लहाणपणीचा मित्र. तो रंगाने खुप काळा ( म्हणजे माझ्यापेक्षाही काळा) त्याला लोकं कारिया म्हणत, पुढे कारियाचं कारे झालं.
रेडी- हुडाट, नेंड वेटांग दायना मांता. ( आज वेटांगला जायचं आहे), कन्नर मधुन वाद्दी ( जाळं) घेऊन निघणारी टिम पुढे जाईल व गावाच्या उत्तरेला रानात नदिच्या उतरत्या पात्रात जाळें लावलं जाई. बाकि भाले व इतर हत्यारानी अचानक हमला करणारी टोली जाळ्यांच्या मागे जवळच्या झुडुपात लपुन बसेल. व उरलेली बाकी सगळी मुलं, बायका, पोरी, पोरं व इतर टिम लिडर्स दक्षीणेकडुन उत्तरेकडे रानातिल झाडा झुडुपातनं लाठ्या काठ्यांचा आवाज करते वाद्दींगच्या दिशेने कुच करतिल. म्हणजे रानातिल प्राणी वाद्दींगच्या दिशेन पळतील व वाद्दींगमधे अडकतील. तेंव्हा मात्र गोर्कातोर (Rapid Action Force, भालेवाले ) वेगवान चढाई करुन अडकलेल्या प्राण्यांची शिकार करतील.
मायले- होsss रेss रेssडी, पण मला तर दारु पिल्याशिवाय काहिच दिसत नाही, मी येऊ कि नको. ( हा मायले आमच्या गावातील अट्टल बेवळा, पिल्या शिवाय त्याला काहि सुचायचंच नाही. दिसायला अगदी बारिक, शरिराकाठी बारिक असल्याने तो जरा जास्तचं उंच वाटायचा व सततच्या पिण्यामुळे डोळे खोल गेलेले व नेहमी कुणाच्यातरी बोलण्याच चोच मारणे हि या मायलेची सवय. त्याला मायले नावं पडण्याची एक वेगळी कथा आहे. मायलेचा अर्थ होते पळुने गेलेला. या मायलेचं खरं नाव आहे वंजा. पण फार वर्षापुर्वी म्हणजे त्याच्या तारुण्यात त्यानी गावात काहीतर घोटाळा केला व गोटुल मधे धुलाई अटळ आहे हे कळल्यावर काही महिन्यासाठी गाव सोडुन पळून गेला. तेंव्हापासुन त्याचं नाव पडलं मायले. आता मात्र हा मायले अगदी रोजच पिऊन अधे मधे करत हिंडत असतो.)
आमचा रेडी का एकदम फटकळ
रेडी-अरे मायल्या, ** पितोस का **, देऊ का ? चर्चा कशाची चाललिये, हा मायल्या बोलतो काय आहे, चोच मारल्या शिवाय तुला राहावत नाही का रे नालायका!
रेडीला सिरिअस विषयात कुणी तोंड खुपसलेलं मुळीच आवडायचं नाही. गावाच्या भल्यासाठी जिथे चार लोकं एकत्र येऊन काही विधी करणार होते आणि या मायलेनी मधेल रेडीचा मुड खराब केला.
मायलेला स्वतःची चुक कळलिच असेल असं नाही पण रेडीच्या धाकापायी तो गप्प बसला.
रेडी-आता सगळे फटापट आपापल्या घरी जा, वेटांगसाठी लागणा-या संबंधीत वस्तू घेऊन १ तासाच्या आत जेवन वगैरे आटपुन ईथे हजर व्हा.
रेडीने फर्मान सोडल्या सोडल्या मी घराकडे धावत सुटलो, जेवण वगैरे करुन ८-९ च्या दरम्यान गोरका(भाला) घेऊन गोटुल मधे हजर.
रेडी मात्र आमच्या आधीच गोटूल मधे येउन बसला होता. बसणारच कारण रेडी म्हणजे गोटुलचा मुख्य अधिकारी होता. बघता बघता सगळी लोकं जमलीत व आम्ही वर्षाची पहिली शिकार म्हणजेच वेटांग करायला वाद्दींग, गोरकांग, कानींग (तीर कामठे) घेऊन रानाच्या दिशेनी निघालो.
आज खरंतर मी खुष होतो, कारण वेटांगला जाणे म्हणजे नुसती धमाल असते. गावातील प्रत्येक घरातुन किमान एक सदस्य व ब-याद घरातुन एकापेक्षा जास्त लोकं येतात. गोरकांगनी हमला करणा-यांची वेगळी टिम असते जी वाद्दींगवाल्यांसोबत असते. बाकि इतर चिल्यापिल्यांसकट बायका, पोरी, तरुण पोरं व आजुन काही अनुभवी माणस रान हाकतात. मी व कारे या रान हानणा-या टिममधे होतो.
माझ्या हातात गोरका होता, कारेकडे तीर कामठा होता. जीथे वाद्दींगचा सापडा लावला त्या पासुन साधारण तिन किलोमिटर दक्षीणेला रान हाकण्याची सुरुवात झाली. शंभर दिडशे लोकं एका रांगेत, दोन तीन मिटर किंवा थोडं जास्त अंतर ठेवुन नदीच्या काठावरुन रान हाकायला सुरुवात झाली. झाडा झुडुपांवर काठ्या मारत, मोठ्याने आवज काढत, जोर जोरात आरडा ओरडा गोंगाट पसरवत मोर्चा पुढे सरकत होता. पुढे चालता चालता दोन व्यक्ती मधील अंतरही वाढु लागलं. एक दीड किमी चालल्यावर प्रत्येकामधील अंतर दहा मिटर पेक्षा जास्त झालं आणि हे सगळं स्वाभाविक आहे.
एवढ्यात एका झाडावरुन आवाज आला, “कारे, ओय कारे!!!!!”
आवाज ओळखिचा होता, आम्ही जीथुन चाललो होते त्या शेजारच्या कुठल्यातरी झाडावरुन आवाज येत होता.
कारेनी माझ्याकडे बघितलं, “निम्मा केंजतीन, बोअ कोटे केयतापा आतोग?” ( कुणीतरी हाक दिली तु ऐकलास का ?)
मी- हो, मग आम्ही आवाजाच्या दिशेनी थोडं पुढे गेलो. बघतो काय तर एक माणुस झाडावरुन उतर होता.
आम्ही आपल्या जागी उभं राहुन उतरणा-याकडे बघत होतो. तो झाडावरुन उतर दात दाखवत आमच्या दिशेने पुढे येऊ लागला. आधी दुरुन कळलं नाही कि येणारी व्यक्ती कोण आहे, पण एकदा नजरेच्या टप्प्यात आल्यावर कळलं तो पेडू होता.
पेडु: पेडु सुद्धा कुडकेल्लीचं एक निराळच व्यक्तीमत्व होतं. त्याच्या वडीलाचं नाव मला आठवत नाही पण त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले. आज्जी आजोबानी याला पोसुन लहानाचं मोठ केलं. घरात तिनच सदस्य व भरपुर पैसा व धनधान्यानी संपन्न अशा घरचा हा मुलगा, पण कष्ट करण्याची मुळीच तयारी नाही, सगळं आज्जी आजोबाच्या जीवावर चालायचं. दिसायला गोरा गोमटा, उंची ५.३”, कसलेलं शरिर व एकदम हॅंडसम पर्सनॅलीटी. थोडक्यात सांगायचं तर तो सलमान खानच, हो कुडकेल्लीचा सलमान खान होता. पण आज्जी आजोबांच्या लाडानी बिघडलेला. खुप आळशी, कष्ट कराची मुळीच तयारी नाही, पैसे मात्र खर्चायला पाहिजेत. घरचा श्रीमंत असल्यामुळे आज्जी आजोबा या पेडुला पैसे देत. पण पुढे पुढे याला आज्जी आजोबानी दिलेले पैसे अपुरे पडु लागले. मग गावातील लोकांच्या शेळ्या मेंढ्या, कोंबड्या, डुकरं वगैरे चोरुन दुस-या गावाला नेऊन विकायचा. नंतर नंतर गावात कुठेही चोरी झाली तरी लोकं पेडुलाच धरायची. पण आज्जी आजोबांकडे भरपुर पैसे असल्यामुळे ती लोकं प्रत्येक तंट्यातुन या पेडुला सोडवत.
आज मात्र पेडु या रानात झाडावर काय करत होता मला प्रश्नच पडला होता.
मी- “पेडु, बातांग किसोर मात्तीन रा ईगा” ( ईथे काय करत होतास रे)
पेडु- “बातय हिल्लो रा, उग्गासे तांगतान मात्ती” ( काहीच नाही सहजच चढलो होतो)
मला मात्र या पेड्यावर मुळीच विश्वास नव्हता, त्यानी काहितरी घोळ घातला होता हे मात्र निश्चित. आता पेडु आमच्या सोबत चालु लागला. आज वेटांग आहे हे पेडुला माहितही नसावं. कारण हा गावात राहतोच कुठे. एखादया चोरी केली कि काहि दिवस गावाच्या बाहेर राहायची सवय. आजही असलच काहितरी करुन आलेला असाव. म्हणुन लोकं याला काल्ले पेडु म्हणत. ( काल्ले = चोर)
आता काल्ले पेडु, कारे व मी आम्ही तिघे मिळुन रान हाकत होतो. जीकाडे तिकडे रानात गोंगांट ऐकु येत होता. झाडा झुडपाना मारत आमची वेटांगची टिम पुढे सरकत होती.
पुढे कुणीतरी ओरडला, “न्याआल रो न्याआल” ( तडस रेsss तडस )
वेटांगमधे काहि नियम आहेत, वाद्दींगच्या सापड्याच्या दिशेने दोन तिन किमी दुरुन प्राण्याना हाकत आणणा-यांमधे लहान मुलं व बायकांची संख्या मोठ्या प्रंमाणात असते. आणि अशा वेळी हिंस्त्र प्राणी (वाघ, अस्वल, तड्स) जर वाटेत आले, तर त्याना वाट मोकळी करुन जाऊ दयावे. गोरकांगवाल्यानी मुलं व स्त्रीयाना (खरं तर स्त्रीया पण गोरकांग टिमचे मेंबर असतात) तेवढं संरक्षण दयायचं असतं. पण बरेच वेळा अशा हिंस्त्र प्राण्यांचिही शिकार केली जाते ते हि तेवढच सत्य. कारण लहानपणापासुन हे सगळ अगदी युज टु झालेलं असतं. जर हाथात गोरका असल्यास कुणीच घाबरत नाही त्या वाघ व आस्वलाला.
आज मात्र त्या तडसाला वाट मोकळी करुन दिली, व तडस मेलो वाचलो म्हणत पळून गेला. हे सगळं आम्ही अगदी मजा घेत बघत होतो. तसं तडस गोरकांग वाल्याच्या टप्प्यात नव्हता. नाहितर एखादातरी वार झालाच असता त्या तडशावर.
एवढयात आम्हाला कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. तडस ज्या दिशेने पळून गेला होता तिकडे आमच्या सोबत आलेले शिकारी कुत्रे होते बहुतेक. कुत्र्यांची टिम या वेळी तळसवर भारी पडली असावी. तडस परत आमच्या दिशेनी धावत येत होता. मला काही समजन्याच्या आतच तळस आमच्या खुप जवळ पोहचला. कारेनी तीर ताणला तोवर भुयरामनी तडसच्या दिशेनी गोरका फेकला. तडसाच्या डाव्या मांडीवर निसटता वार करत तो गोरका जमिनीत जाऊन ४५ डिग्रीमधे रोवल्या गेला. तडस खुप घाबरला होता. तडसच्या पायातुन रक्त वाहु लागलं होतं व तो सरड माझ्या दिशेनी येत होता. मी पेडुचा हात धरण्याचा प्रयत्न करत होतो, पेडुनी हाथ झटकुन गोरका तडसच्या दिशेनी ताणला. मला वाटत प्राण्यानं माणसांची हत्यारं व्यवस्थीत कळतात.
पेडुनी गोरका तानल्यावर तडसनी दिशा बदलली व नदीच्या दिशेनी ऊडी मारुन झुडपात नाहिसा झाला. आम्हाला तडसाची शिकार करायची नव्हती म्हणुन आम्ही पाठलाग न करण्याचं ठरवलं
भुयरामनी चुक चुक करुन कुत्र्याना मागे बोलावुन घेतलं. आता लक्षात आलं ती कुत्री या
भुयरामची होती.
भुयरामी: भुयरामचं खर नाव चुक्कु तलांडी, ६” उंची, जबरदस्त भारी भक्कम कमावलेलं शरिर, चार माणसाना एक बुक्कीत पाणि पाजेल एवढा ताकदवान असा हा चुक्कू. त्याचं लग्न होऊन १५ वर्ष झाली होती पण त्याला आजुन मुल बाळ नव्हतं. त्याची शेती अगदी गावाला लागुन असल्यामुळे खत वगैरे न टाकताच भरपुर धान्य पिकायचं. नवरा बायको दोघाना पुरुन उरेल एवढं धान्य पिकल्यामुळे चुक्कु गावतील श्रींमंतापैकी एक होता. पण एकदा पोटात दारुचे दोन घोट गेलेत कि मग लोकांची टिंगल टवाळक्या करण्यात पटाईत, तसेच वाट्टेल ते फेकम फाक चालायचं. खोटं खुप बोलायचा. बरं दारु पिलेली नसल्यास एक शब्दही खोटं बोलणं त्याला जमायचं नाही. पण दारु पिल्यावर मात्र काहिच्या काहि फेकत असे. म्हणुन त्याला लोकं भुयरामी असं म्हणायची.
हा सगळा थरार फार फार तर अर्धा मिनीटात संपलं व आम्ही पुढे वाद्दींगच्या दिशेनी सरकु लागलो. माझ्या उजव्या बाजुला काल्ले पेडू, डाविकडे कारे व कारेच्या डाव्या बाजुला तिन शिकारी कुत्री सोबत घेऊन भुयरामी व त्याच्या बाजुला गावातिल इतर कोणीतरी अशी एकंदरीत आमची टिम रानातुन आरडा ओरडा करत वाद्दींगच्या दिशेन पुढे चालु लागली.
भुयरामी- “पेडु, तु ईथे कसा काय रे ? तु नव्हतास म्हणुन तुझे आजोबा आलेत वेटांगला, आणी आता तु हि कसा काय आला ईथे ( भुयराम दुरुन ओरडुन पेडुला विचारत होता)
मी काहि सांगण्या आधीच पेडु बोलला.
पेडु- अरे ईथेच नदीत आलो होतो आंघोळीला, वेटांग हाकणा-यांचा आवज आला, म्हणुन तुम्हाला जॉईन केलं.
पेडु साफ खोटं बोलत होता हे मला जणवत होतं पन मी काहीच बोललो नाही.
या प्रकारे इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा करत आम्ही वाद्दींगच्या सापड्याच्या ब-याच जवळ आलो. तिकडे वादींगच्या सापड्याच्या दिशेला खुप जोरात आरडा ओरडा झाल्याचा आम्हाला आवाज आला.आम्ही दोन मिनटं शांत होऊन काय घडत याचा अंदाज घेऊ लागलो.
भुयरामी- शिकार अडलं वटत रे वाद्दीगमधे.
भुयरामी आमच्या पेक्षा वयानी खुप मोठा होता. वाद्दींगच्या दिशेला झालेला आरडा ओरडा ऐकुन शिकार मिळाल्याचा प्राथमीक अंदाज भुयरामीला आला.
आम्ही वाद्दींगपासुन अर्धा किमी दुर होतो, पण रानात खुप दुरवरचा आवाज ऐकु येत असल्यामुळे आम्हाला वाद्दींगच्या दिशेनी चाललेला गोंधळ ऐकु येत होता.
आता आम्ही सगळ्यानी इकडुन जोर जोरात आवाज करत मोठ्यानी ओरडत पुढे सरकु लागलो.
कारे- भुयरामी, कुssका रा, (कुssका= रानात एक दुरवरच्या माणसाला ओळख देण्यासाठी देल्या जाणा-या आवाजाला कुssका म्हणतात, हा आवाज सिनेमात टारजन काढतो ना, त्या प्रकारचा असतो. )
भुयरामीनी लगेच कुssका घातला. भुयरामीचा कुssका एक मैलाचा टप्पा पार करुन जायचा. तसहि रानात शांतता असल्यास प्रत्येकाचाच कुssका एक किमी पर्यंत जातो, पण भुयरामी त्यातल्यात्यात स्पेशल होता. भुयरामीचा कुssका ऐकुन वादींगच्या दिशेकडुन कुssकाचा प्रतिउत्तर आला.
आता आम्ही १५-२० मिनटात वाद्दींगच्या सापड्या पर्यंत पोहचणार होतो. आम्हा सगळ्याना जोश आला. आमची चालण्याची गती वाढत गेली. वाद्दींग २००-३०० मिटरच्या टप्प्यात असताना सगळ्यानी धावत रान हाकायचं असतं, त्यामुळे प्राण्यांची धांधल उड्ते, त्याना वाद्दींगचा अंदाज येत नाही व ते अडकतात. आता आमच्या टिम लिडर्सनी धावत सुट्ण्याचे सिग्नल दिले व आम्ही धावत रान हाकायला लाग्लो.
जिथे वाद्दींगचा सापडा लावला होता तिथे डाव्या बाजुला नदी, उजव्या बाजुला डोंगर व मधल्या ५००-७०० मिटरच्या जागेत वाद्दींगचा सापडा. आमची टिम शेवटचे काहि मिनिट अगदी जोरात धावु लागली. झाडा झुडुपातुन प्राणि बाहेर पडुन वाद्दींगच्या दिशेनी धावु लागले. आम्ही सगळी दिड दोनशे माणसं ओरडत वाद्दींग पर्यंत पोहचलो. आमच्या पोहचण्याच्या ५ मिनिट आधी वाद्दींगच्या दिशेला मोठा आरडा ओरडा झाला. तिकडे काहितरी महत्वाचं घडत असल्याचा अंदाज आलाच होता.
एकदाचं वाद्दींगचा सापडा आलाच, पाहतो काय तर आम्ही ज्या वाद्दींग जवळ पोहचलो ती वाद्दी अगदी जशीच्या तशी होती. लोकं पण शांत नजरेनी आमच्याकडे बघत होते. ईकडे काहि झालचं नव्हतं.
भुयरामी- काय रे काहि आलच नाहि का ?
पुढच्या माणसानी त्यांच्या वाद्दीच्या दिशेनी काहिच न आल्याचं सांगितल्यावर आम्ही जरा नाराजच झालो.
भुयरामी- मग मगाशी एवढा आरडा ओरडा कशाचा चालला होता ?
पुढचा माणुस- डोंगराच्या पायथ्याशी जी वाद्दी लावली होती तिकडे काहितरी झालं बहुतेक पण आम्हाला ईथुन हालण्याची परवानगी नसल्यामुळे आजुनतरी आम्हाला काही कळलं नाही. आमचा एक माणुस त्या दिशेनी गेला पण तुमचा कुssका ऐकल्यावर हालायला मनाई असल्यामुळे तो तिकडेच अडकलाय.
आमचं हे सगळं बोलण चालु असताना त्यांचा माणुस खबर घेऊन आला, कि डोंगराच्या पायथ्याशी लावलेल्या वाद्दीमधे सांबर अडकला व गोरक्याने वार करुन सांबराला मारण्यात आले.
आम्ही सगळे अगदी जल्लोषात उड्या मारु लागलो. कारण वेटांगचा आजुन एक नियम आहे. प्राण्याची शिकार होईस्तोवर वेटांग सुरुच ठेवायचा असतो. एका शिकारीसाठी ३-४ दिवस सतत वेटांग केलेलं मला आठवत होतं.
तिकडे रेडी वेटांग यशस्वी झाल्याचं ओरडुन सांगु लागला. सगळ्या लोकांमधे आनंदाच वातावरन होतं. रान हाकुन आलेली बरीच लोकं रानातल्या त्या गवतात लोळत होती. काहिजण त्या सांबराला बघायला पायध्याकडे गेली होती. ईथे मी आणि कारे एक दगडावर डोकं ठेवुन आडवे झालो होतो आणि वाद्दींगवाले वाद्दींगचा सापडा काढण्यात गुंग होते.
तेवढ्यात पेडु शेजारच्या झुड्पातुन ओरडत बाहेर आला. हा तिकडे नंबर १ साठी गेला होता.
पेडु- माकड रे माकड, या झाडावर माकड आहे रे माकड.
पेडुला शेजारच्या झाडावर माकड बसलेला दिसला, तो धावत ईकडे येऊन माकड झाडावर असल्याचं सांगतोय काय आणि लोकानी त्या झाडाला वेढा टाकला. गोरकांग, वाद्दींग व इतर हत्त्यारं तर होतीच आणि आयतं माकड दिसलं.
मला प्रश्न पडला कि हे माकड ईथे थांबलच कस काय ?
मी विचारातच होतो आणि लोकानी माकडावर गोरका फेकला, काहिनी तीर कामठ्यानी माकडावर हल्ला चढविला. त्यातील कुठलंतरि हत्यार त्या मकडाला लागलं व तो कोसळला. माकड खाली कोसळल्यावर शेजारच्या झाडावर लहानचं माकडाचं लहान पिल्लु जोर जोरात ओरडायला लागलं. आता मला कळलं कि हे मोठ माकड ईथे कशासाठी थांबलं होतं. ती माकडाची आई होती, लहान पिल्लाला घेउन पळून जाता येईना, म्हणुन ती आई ईथे अडकली होती.
मग काय, आमच्या लोकानी माकडाच्या पिल्लालाही वेढा दिला व त्याला मात्र जीवंत धरलं.
सगळी वेटांगची टिम शिकार मिळाल्याच्या आनंदात सांबराला कावड बनवुन व माकडाला सुध्दा एक वाश्यात अडकवुन गावाच्या दिशेनी निघाली. रेडी पुढे पुढे व बाकी सगळं गाव त्याच्या मागे चालत होता.
सायंकाळ झाली होती, अगदी अंधार पडायला सुरुवात झाली व आम्ही शिकार मिळाल्याचा जल्लोष करित कुडकेल्लीत पोहचलो.
आमच्याकडे तिन प्राणि होते, मेलेलं सांबर, माकडाची आई व माकडाचं जीवंत पिल्लु. सांबर व माकड आणुन गोटुल मधे टाकला.
रेडि- पेकोर, बेस अस्काट, नान्ना हांजी बुकामेंड उंजी, पागई पोस वायनान.(रेडीनी तरुणाना, सांबराची मटन बनविण्याचं काम सोपवलं)
रेडी येईस्तोवर तरुण मुलानी सांबराला व माकडाला कापुन मट्न तयार केली. आणि आम्ही मात्र घरोघरो जाऊन वेटांगसाठी तांदुळ गोळा करुन गोटुल मधे परत आलो. लोकं शोधु लागले विज्जा कुठे आहे ते. पण हा विज्जा पठ्ठा वेटांगनंतर आमच्या सोबत येण्या ऐवजी नदिवर गेला होता आंघोळ करायला. तसं वेटांग झाल्यावर बरिच लोक थेट गोटालात आली नाही त्यातली काहि लोकं आंघोळ करायला थेट नदिवर गेली होती त्यापैकी विज्जा एक होता.
ईकडे मटन कापुन तयार होतं व तांदुळ पण तयार पण विज्जा मात्र गोटुल काय पुर्ण कुडकेल्ली गाव पालथ घातलं तरी कुठेच दिसेना. मग कुणितरी आम्हाला सांगितलं कि तो नदिवर गेला होता, मागे येतोच आहे.
आम्हाला रेडी येण्या आधी स्वयंपाक तयार करायचा होता. तेवढ्यात कुणितरी विज्ज्याला धरुन आणलं. हा विज्जा म्हणजे आमच्या कुडकेल्लीचा स्वयंपाकी. ५००-६०० लोकांचं स्वयंपाक करायचं असल्यास विज्ज्या शिवाय कुडकेल्लीचं पान हालत नाही. विज्ज्याची कहाणिपण दमदार आहे. विज्ज्याचे आई वडील खुप गरीब, १४ वर्षीच त्याचं लग्न झालं. खुप कष्टाने पैसे कमविले, लहान भावाला पोस्ट ग्रज्युएट पर्यंत शिकवुन शिक्षक बनविलं. भावाची भरभराटी डोळ्यात साठवुन समाधानानी हसणारा तो विज्जा स्वत: मात्र आजही तसाच आहे. मी मात्र लहानपाणापासुन त्याला विज्जू मामा म्हणतो.
मग काय विज्जु मामानी गोटुलमधे दाखल झाल्या झाल्या सगळ्यांच्या जीवात जीव आला. गोटुलच्या आत दोन मोठाल्या चुली माडंण्यात आल्या, एक चुलीवर मोठं गंज ठेवुन पाणि तापविवुन गावातील सगळ्याना पुरेल इतकं भात बनविण्यात आलं व दुस-या चुलीवर सांबराची मट्न शिजत होती.
आणि तिकडे रेडी वेटांग एंदना रो वेटांग एंदना म्हणत गावात फिरत होता.
वेटांग एंदना म्हणजे शिकार झाली या निमीत्तानी गावातील सगळ्यानी गोटुल मधे येऊन रात्रभर नाचायचं असतं.
रेडी गोटुलमधे येईस्तोवर स्वयंपाक झालेला होता. आता सांबराचं गंज उतरवुन माकडाच्या भाजीच गंज चुलीवर चढलं होतं.
रेडी व इतर गावातील प्रमुख लोकानी शिजत्या गंजातुन माकडाची व सांबराची मटन एका डोप्प्यामधे (पत्रावळीपासुन तयार केलेला द्रोण म्हणा) व भात दुस-या डोप्प्या मधे काढुन घेतलं हे सगळं घेऊन गावातील पुर्वेला मोहाच्या झाडाखाली बसलेल्या आव्वालची पुजा करायला हि चार-पाच लोकं निघुन गेली. आव्वालला शिकारीची मटन, भात व दारु असा नैवेद्य दाखवुन अर्ध्या तासात रेडी व कंपनी गोटुलमधे परत आलीत.
आज रात्रभर गोटुलमधे जोल्लोष होणार होता.
क्रमश:
जबरा ! वाचत आहे.. लवकर पुढचा
जबरा ! वाचत आहे.. लवकर पुढचा भाग येउ द्या !!
मस्त
पटकन येऊ दे पुढचा भाग.
वाचतेय
जास्त वेळ लावू नका मालक
जास्त वेळ लावू नका मालक !
आधीच खुप मोठा गॅप घेतला आहे तुम्ही ....
लवकर लिहा पुढील भाग..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त..!
मस्त..!
जय हो
वाचतोय..छान झालाय भाग..
वाचतोय..छान झालाय भाग..
ए परा आणि पुपे करा आता इथे
ए परा आणि पुपे करा आता इथे तुमच्या इतिहासांचे (अनेकवचन मुद्दाम कारण प्रत्येकाच्या असलेल्या वेगवेगळ्या आवृत्त्या) पुनर्लेखन
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
मस्त वेगळ्या धाटणीचे लेखन
मस्त वेगळ्या धाटणीचे लेखन
सगळी व्यक्तीचित्रे मस्त उतरली आहेत.
पुढे
वाचत आहेच! (तिथे ब्लॉगवर बरेच वाचून झाले आहे.)
लवकर येऊद्या.
जबरा
काय जबरा लेखन आहे. अजुन येउ द्या लवकर लवकर ! !
सरकारनी बळजबरीने आमच्यावर मराठी लादली
हे बाकी बरे झाले. (राग येउ देउ नका पन तुम्ही मरठी शिकला नसता तर हे दर्जेदार लेखन कधी वाचायलाच मिळाले नसते)
खुपच छान! अगदी जिवन्त चित्र
खुपच छान! अगदी जिवन्त चित्र डोळ्या समोर उभी केलीत.
पटकन लिहा पुढचा भाग.
लवकर पुढचा
लवकर पुढचा भाग येउ दे..
मस्त झालंय लिखाण.
सगळे भाग एकत्र करुन गोटुल चे
सगळे भाग एकत्र करुन गोटुल चे एक ई-पुस्तक तयार केले आहे.
मधुकरराव भाग २ मिळाला नाही आहे, अवधानने प्रकाशित झालेला नसावा जरा पाहून घ्या.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."