हे खेळ संचिताचे .....!

0
0

हे खेळ संचिताचे .....!

काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला

सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला

तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला

पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
झुंजतांना एकला मी, श्वासही सुस्तावला

साठले कंठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती
चालता मी "अभय" रस्ता, काळही भारावला

गंगाधर मुटे
......................................................
(वृत्‍त- देवप्रिया)
......................................................

पुन्हा पुन्हा वाचून देखील मला

1

पुन्हा पुन्हा वाचून देखील मला का काय माहित कविता कळली नाही असेच वाटत आहे Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."