प्रोमीथीयस्

0
0

वैशाखातले रणरणते उन. सगळ्या धरतीवर जणु वैराग्य आल्यासारखा पिवळा धमक प्रकाश पसरलेला असतो. जिकडे पहावे तिकडे भगभगते उन अन जीवाची नुसती काहिली होत असते. अथांग पसरलेल्या निळाशार आभाळात तुरळक कुठेतरी एखाद दुसरा ढगाचा चुकार तुकडा भगभगीत पणात अजुनच भर टाकत असतो. उगाचच एखादी घार तरंगत आपल्या पिलावर लक्ष ठेवुन असते. पिंज-यातला राघु मैने कडे पहात
नाही, की दारातल्या खंड्याला आपल्या शेपटीवर पाय देवुन मनीमाउ पसार झाली याची जाणीव होत नाही. सगळे टळटळीत दुपारी जागेपणीच झोपलेले असतात. तहान लागली म्हणुन थंडगार पाणी पिवुन दोन क्षण होतात न होतात तोच शरीर परत पाणी पाणी करत सुटते. टळटळ अशा वातावरणात बाहेर जाण्याचे मनात येते न येते तोच भेगाळलेल्या जमीनीवर पाणी पडताच जसे जिरते तसाच तो विचार मनात कुठल्या कोप-यात दबुन जातो तेच कळत नाही. स्वस्थ शरिराने अन अस्वस्थ मनाने विचार करत बसुन रहातो... कुठुन तरी काही तरी गार हवेची झुळुक तरी यावी. पण उष्ण झळाच काय त्या येत रहातात. दुपारभर हेच चालु रहाते.

सूर्य जरी असला तरी तो ही मावळणारच असतो. संध्याकाळ होणारच असते. दुपारपासुन कुठेतरी हरवलेल्या थंडगार हवेच्या झुळुका हळुहळु यायला सुरवात होते. अन रात्र जसजशी वाढत जाते, तसतसा दिवसभर हरवलेला उत्साह सगळीकडे यायला लागतो. अन रहित केलेला बाहेर जाण्याचा बेत तुम्ही अमलात आणायचे
ठरवुन गाडी काढुन रस्त्यावर येता.

वैशाखातील कृष्णपक्षाची रात्र... अहाहा.. गार हवेच्या झुळुका वाहत असतात.
गाडीच्या काचा उघड्या ठेवुन मस्त गार हवा अंगावर घेत प्रवास करण्याची मौज काय सांगावी? पूर्वेकडुन उगवलेला चंद्र, रोहिणी मैफिलीतुन आधीच पसार झाल्याने मध्यावर झुकलेल्या विशाखाशी गप्पा मारता मारता दिवसभराचा शीण घालवत घालवत घालवत लक्ष ठेवुन असतो त्याच्यामागोमाग रेवती कधी येते याचीच. पुर्वेकडे कधी पश्चिमेकडे पहाता पहाता, भरभर मागे पळणारी झाडे पहात पहात, निवांतपणे वा-यावर डोलणारी पिके पहाता पहाता रस्ता कधी आणि कसा मागे चालला आहे याचे भानच उरत नाही. अशा मदमस्त वातावरणात अजुनच भर पडते ती लताच्या हळुवार गीतांची. गाणी ऐकता ऐकता शरिरासह गाडी पुढे चाललेली असते पण मन मात्र मागे मागे भुतकाळात जात असते. अल्लड बालपणच्या अन खेळकर युवावयातील सुखद आठवणी मनाभोवती पिंगा घालु लागतात... अन ओठावर हलकेच स्मित जागवुन जातात. हलकेच शीळ घालता घालता नजर दुरवर पसरलेल्या रस्त्याचा वेध घेत असते. आणि अचानक नजरेला काही तरी दिसते.

दुरवरुन कोणीतरी रस्त्यावर आडवे जात आहे असे दिसते. म्हैस की गाय की अजुन काही? लांबुन काही समजत नाही. मनाला अजुन काही फिकीर नसते ते अजुन भुतकाळातच असते. नजरेला काहीतरी दिसलेले असते आणि तसे इशारे मेंदुला गेलेले असतात. मेंदु पटापट अंतराचा हिशोब करुन सांगतो.. काळजीचे कारण नाही. तिथपर्यत जाईपर्यत ते जनावर रस्ता ओलांडुन गेलेले असेल. जाणिवेच्या आड चाललेला खेळ मनाला अजिबात माहित नसतो. त्याचे आपले बागडणे चालुच असते. ते आपल्याच मस्तीत असते.

गाडी धावत असते...
मन भुतकाळात असते...
गाणे चालु असते...
ओठातुन शीळ वाजतच असते...
.
.
आणि अचानक ते जनावर रस्त्यात मधेच थबकते.
दिव्याच्या प्रकाशात त्या जनावराचे डोळे लख्खकन चमकतात.
.
नजरेला कळते.
मेंदुला इशारा जातो.
.
अन जीव एकवटुन पाय ब्रेक दाबतात....जीवाचे रान करुन हात चक्र संभाळतात...
.
वेड्यावाकड्या चालीने त्या जनावराच्या अगदी जवळ जावुन गाडी थांबते अन बंद पडते....
.
रस्त्यात एक रेडा मख्ख चेह-याने तुमच्याकडे पहात असतो... तुमच्या मनातल्या सर्व हालचालींचा काही परिणाम त्याच्यावर झालेला दिसत नाही. एक दोन क्षण तुमच्याकडे अन गाडीकडे पाहुन, तुच्छतेचा हुंकार टाकुन हळुहळु रस्त्याच्या दुस-या बाजुला निघुन जातो.
.
तो गेलेल्या दिशेकडे तुम्ही पहात बसता .....कितीवेळ झाला कळत नाही....
.
अचानक ओल लागली म्हणुन तुम्ही तंद्रीतुन जागे होता ... लक्षात येते घामाचा ओघळ मानेवरुन थेट पाठीवर उतरला आहे. तुम्ही घामाने थबथबले असतात... हृदयाचे ठोके वाढलेले असतात... शांत वातावरणात तुमचेच ठोके तुमच्या कानावर दाण दाण आदळत असतात... होय. तुम्ही घाबरलेले असतात!!!

हळुहळु श्वास नीट झाल्यावर, चेह-यावर हात फिरवुन, पाण्याचे दोन घोट घेवुन परत गाडी चालु होते. पण वातावरण पूर्ण बदललेले असते. गाणी बंद असतात. आता लक्ष फक्त समोर रस्त्यावर. आणि मनात फक्त मगाचाच विचार. परत परत तो रेडा आठवला की, आपोआप गाडीचा वेग मंदावत असतो. केव्हा एकदा घरी जातो असे झालेले असते. मनातुन कितीही झटकुन टाकला तरी तोच विचार परत परत येत रहातो.

नक्की काय झाले असते?
ज्या क्षणी डोळे चकाकले असतात त्या क्षणी शरीराची हालचाल होते.
मग ती हालचाल भितीमुळे झाली का?
नाही.
भितीचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही.
भिती, राग, लोभ, मद, मत्सर, मान, अपमान हे तर मनाचे खेळ.
भितीचा आणि मनाचा संबंध.
मन तर तेव्हा दुर कोठेतरी होते...
हालचाल झाली. ती ज्ञाना मुळे.
नजरेने बुद्धिला इशारा दिला अन बुद्धिला ज्ञान झाले.
धोका.
संभाळ.
शरिराने पटकन इशारा समजुन हालचाल केली.
बस.
जाणिव, नेणिव, सुप्त, जागृत मन या खलात मला आता शिरायचे नाही.
ज्ञान मिळाल्यावर तुमच्याकडुन कृती झाल्यावर मनात आलेली भिती योग्य की अयोग्य...
त्यावेळेस वाचलो म्हणुन आनंद व्हायच्या ऐवजी भितीने मनावर का पगडा बसला?...
नकोच ती चर्चा.. नंतर कधीतरी करु.

त्या विशिष्ठ परिस्थितीतील ज्ञानप्राप्तीचा क्षण रेड्याचे डोळे चकाकणे होता एवढेच पुरे.

***

'ओलिंपियन विश्वाधिपतीचा विजय असो...'

'दरबार सुरु करा. आरोपीला हजर करा...'

साखळदंडाने बांधलेला टायटन देव लोकांपैकी एकाला हजर केले गेले.

'ओलिंपियन देवलोकांचे विश्वावर अधिपत्य असतांना, त्यांची प्रत्येक आज्ञा अनुल्लंघनीय अशी असतांना, टायटनांशी झालेल्या युद्धात सर्वंकश पराभवानंतर केवळ तुझा मातीपासुन मनुष्य बनवण्याचा पराक्रम लक्षात घेवुन तुला आम्ही पाताळात डांबले नाही..' झुस तावातावाने बोलत होते...

'हुं...'

'पण तु पवित्र अग्नीला चोरले आहेस...आमचा अपराध केला आहेस...'

'अपराध?...तुमच्या इतकाच मानवाचा पण अधिकार आहे त्या अग्नीवर. अग्नी उर्जा देतो, अन्न देतो, अंधःकार दुर करतो. मानवाला हक्क आहे त्याच्या जीवनातील अंधःकार दुर करण्याचा...'

'मानवाला कशाचा अधिकार आहे आणि कशाचा नाही हे आम्ही ठरवणार...'

'कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? मी मनु‍ष्यांचा मित्र आहे...मी त्यांनाच मदत करणार...'

'ते शक्य नाही. देवांशी गद्दारी करणारा मरणाच्या स्वाधीन केला जातो...'

'मला कैद केले असले तरी विसरु नकोस झूस... तुझ्याप्रमाणेच मी पण अमर आहे...'

'मला माहित आहे. तु अमर आहेस पण वेदनेपासुन तुला मुक्तता नाही. तुला मरण नाही त्यामुळेच तुझ्या वेदनेला पण अंत नाही, तडफडत रहाशील पण सुटका नाही.'

'मनुष्याचे हित साधण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी मी वेदनेची पर्वा करत नाही. तुम्ही हजारदा मला अडकवले तरी मी मनुष्याला ज्ञानप्राप्ती साठी मदत करणारच... कुणीही अडवु शकत नाही मला.. अधिपती .. तु सुद्धा..'

'हूं...भ्रम आहे तुझा... आम्ही तुला भयानक वेदना देवु...मरण येईल तर बरे इतका तु तडफडशील.. दयेची भीक मागशील..'

'कितीही वेदना झाल्या तरी माझा निश्चय कदापिही बदलणार नाही, मानवाशी असलेली मैत्री मी वेदनेला घाबरुन तोडणार नाही.'

'कळेलच ते! कोह-ए-काफ च्या शीळेवर साखळदंडानी बांधुन ठेवलेला तुला पाहुन घिरट्या घालणारी भुकेली गिधाडे आनंदाने चित्कार करतील. ते आवाज तुझ्या कानावर तप्त शिस्याप्रमाणे आदळतील. त्यांचे अन्न बनुन आलेला तु दिवसभर तुझ्या पोटाचे अन यकृताचे तुकडे त्यांना देशील... रात्रीतुन भरुन येतील सगळया तुझ्या जखमा परत दुस-या दिवशीचे अन्न बनण्याकरता...असेच चालेल जगाच्या अंतापर्यत.. तुला मरण नाही ... पण वेदनेलाही अंत नाही.....'

'देवांच्या अधिपतींचा निर्णय मान्य.. मी तयार आहे...'

'जा! प्रोमीथीयस् !!! माझ्या नजरेपासुन दुर जा!!! देवांशी गद्दारी केलीस, अग्नी मानवांना दिलास या गुन्ह्याची हीच सजा तुला मी देवराज झूस सुनावत आहे. तडफडत रहा न संपणा-या वेदनेने आयुष्यभर.........कळु दे मर्त्य मातीपासुन बनलेल्या मानवांना देवांशी गद्दारीचे फळ ! ....'

***

आपले प्राक्तन प्रोमीथीयस् प्रमाणे आहे हे ज्ञान व्हायला रेड्याचे चकाकणारे डोळे कोणत्या स्वरुपात समोर येतील हे सांगणे खुप कठिण असते आणि अतिशय महत्वाचे म्हणजे ते सगळ्यांनाच उमगते असे नाही.

अवलिया

1

अवलिया, सुरेख रे!!

नाना, शब्दागणिक मनाचे दार

2

नाना, शब्दागणिक मनाचे दार ठोठावले गेले रे. छान समतोल मांडणी केली आहेस. आणि शेवट तर कळस आहे. अतिशय सुंदर, जादुई लिखाण! झक्कास लेख वाचायला देऊन लंचटाईम सत्कारणी लावल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद र नानबा!

+१

3

असेच म्हणते
अतिशय सुंदर, जादुई लिखाण!!

नान्या मस्तं लिहीले आहेस.

4

नान्या मस्तं लिहीले आहेस. वर्णनं तर छान. प्रोमिथीयसची कथाही छान. आपल्यासाठी यातना सोसणारा देव. पण त्याच्या रुपकाचा अर्थ नाही कळला रे. Sad
तो रेडा मृत्यूचे प्रतिक आहे का? रेड्यावर बसून येणारा यम अथवा काळ त्याचे प्रतिक आहे का ते?


-पुण्याचे पेशवे

पुप्या, लाष्टं लायनीत आसां

5

पुप्या, लाष्टं लायनीत आसां मरे सपष्टीकरण.. क्लीयरकट!

हम्म

6

आपले प्राक्तन प्रोमीथीयस् प्रमाणे आहे हे ज्ञान व्हायला रेड्याचे चकाकणारे डोळे कोणत्या स्वरुपात समोर येतील हे सांगणे खुप कठिण असते आणि अतिशय महत्वाचे म्हणजे ते सगळ्यांनाच उमगते असे नाही.

किंवा जगाकडे स्वच्छ नि पूर्वग्रहरहित मनाने पाहणारे नि 'राजा नागवा आहे' हे निर्भयपणे सांगू शकणारे एखादे निरागस मन हवे, महत्त्वाचे म्हणजे त्याचे म्हणणे मान्य करणारी खुल्या मनाची माणसेही. तसे निरागस मन नि स्वच्छ दृष्टी असणे दुर्मिळ नाही पण पूर्वग्रह दूर ठेवून खुल्या मनाने त्या निष्कर्षाचा स्वीकार करणारे???...भवति वा न वा...

नान्या, जियो रे..! तात्या.

7

नान्या, जियो रे..!

तात्या.


झकास!!!

8

झकास!!!

जिनके सर हो इश्क की छाव ; पाव

9

जिनके सर हो इश्क की छाव ; पाव जे नीचे जन्नत होगी.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

जहबरा नाना

10

जहबरा नाना



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मस्त

11

अगदी सुरेख...अप्रतिम झालय लेखन!
हास्य

क्या बात है ! सुरेख !

12

क्या बात है !

सुरेख !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त्च रे नाना.. काय छान लिहीतोस तू

13

ते झूस बिस काही माहिती नाही पण गेल्या महिन्यात भर दुपारी रस्त्यावर गाडीपुढे पळणार भल मोठ्ठ हरण आडव आल तेन्व्हा जो कचकचून ब्रेक मारलाय तेंन्व्हा मला आणी माझ्या मागच्या ५-६ गाडीवाल्याना हेच ज्ञान १का क्षणात झाल.. मग २ दिवस ते हरणच दिसत होत मला सगळीकडे..

अवांतर : माझ पोरट ग्रीक मेथोलोजीच्या कथा ऐकवून मला रोज पकवतय.. आता त्याला सांगायला मला एक गोष्ट मिळाली..

नाना

14

Puzzled
promo


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

जबरद्स्त

15

मागचे काही दिवस मि.म. येउ शकलो नाही म्ह्णुन आज बॅकलॉग भरून काढताना हा लेख सापडला. खुप सुंदर लिखाण. एकदा वाचला, मग पुन्हा एकदा, मग पुन्हा. आतिशय आवडले.

लेख (साहित्य या अर्थी) जास्त चांगला आहे कि आशय (contents) , ठरवणे फार अवघड आहे. मला दोन्ही ही आवडले.

या पुर्वीही तुमचे लिखाण आवडायचेच पण आज एकदम फॅन झालो. मनःपूर्वक धन्यवाद. असेच लिहीत रहा.
- राजाभाउ

लिखाण आवडले. मला असे वाटते.

16

मानवाचे प्राक्तन हे प्रोमिथियसच्या प्राक्तनाच्या तुलनेत कमी यातनांचे आहे. प्रोमिथियसला मरण नाही. आख्खं जीवनच यातनामय आहे.
रेड्यामुळे अपघात झाला असता. त्यातून काय झाले असते. मनाला झालेल्या ह्या क्षणैक यातना आहेत. त्यामुळे मरणाच्या जाणीवेची तुलना कश्याही प्रकारे प्रोमिथियसच्या अखंडपणे वाट्याला आलेल्या यातनामय जीवनाशी होऊ शकत नाही.

क्या बात है.... मस्तच.....!

17

क्या बात है....
मस्तच.....!


जय हो