झोळीचा खांब - भाग २ (अंतिम)

0
0

जागा झालो तेव्हा दुपार ढळली होती. चहा पिउन मामाशी जरावेळ बोलत बसलो. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. थोड्या वेळाने चल मी जुन्या वाड्यावर चक्कर मारुन येतो म्हणालो. मामा म्हणाला काही नाही आता तिथे. दोन वर्षांपुर्वी पडुन गेलं होतं नव्हतं ते. कशाला जातोस उगाच. पावसाचे दिवस. हम्म म्हटले पण बाहेर निघालो. मामाचं नवं घर जरा गावाबाहेर होतं. लातुरच्या भुकंपाच्यावेळी काही भाग पडला. डागडुजी करुन करुन इतके वर्ष सांभाळला होता. किती दिवस अजुन तग धरेल म्हणुन नवे घर बांधले. काही दिवस जुनं घर गोडाउन म्हणुन वापरले आता ते पण नाही. गावची कुत्री आणि डुकरांचे हक्काचे घर झालं आहे. मामेभावाचा लहान पोरगा चालता चालता सांगत होता. मी हे विचार ते विचार करत चालत होतो.

बघता बघता जुन्या ओळखीच्या खुणा काही स्पष्ट काही अस्पष्ट दिसु लागल्या. कुठल्याही गावात असतंच तसं हनुमानाचं मंदीर. त्याच्या बाहेर बसलेल्या म्हाता-याकोता-यांच्या मैफिली. पलीकडे ग्रामपंचायतीचं कार्यालय. आता नवे बांधले होते पण नेहमीप्रमाणे बंदच होते. दोन चार फुटकळ दुकानं. चहाची टपरी. बाजुलाच विडी सिगारेट फुंकत, तंबाखु मळत शेती, राजकारण आणि तमाशा यावर चाललेला अविरत काथ्याकुट. माणसं बदलतात पण काही विषयांना मरण नसतं खरं. पुढे सरकत होतो. ह्याच मारुतीच्या मंदीराच्या भोवती खेळण्यात लहान पणी मजा यायची. किती वेळा पडलो. रडलो.

पलीकडे भैरोबाचं मंदीर. त्याच्या समोरचा मोठ्ठा नगारा. सकाळी संध्याकाळी वाजायचा. वर्षातुन एकदा होणारी जत्रा. बघता बघता मनाच्या कोप-यात लपुन बसलेले ते मंतरलेले दिवस झर्रकन समोर आले. काका का रे हसलास? पुतण्याने विचारले तेव्हा त्याच्या पाठीवर हलकेच थाप मारुन काही नाही असेच असे म्हणालो आणि पुढे चाललो. पलीकडेच मैदान होतं. चार पाच पोरं क्रिकेट खेळत होती. दोन चार गोट्या. त्यांच्यात माझ्या मलाच पहायचा व्यर्थ प्रयत्न करत होतो.

जुनं घर समोर आलं. किती वर्षांनी पहात होतो. दहा. हो मोजुन दहा वर्षं झाली. हलकेच निश्वास टाकत पुढे गेलो. घराचा दरवाजा उघडाच पडला होता. आजु बाजुच्या भिंतीनीच असहकार पुकारल्यावर त्याला तरी कशाला त्रास ! दरवाजाच्या बाहेर कधीतरी लिहिलेले शुभ लाभ अस्पष्ट झाले होते. दारावरचा दगडी गणपती लावलेला शेंदुर उडुन गेल्याने काळपट झाला होता. मनातल्या मनात त्याला नमस्कार करुन आत गेलो. कित्येक खोल्यांच्या खुणा नष्ट होवुन तिथे केवळ मातीचा ढिगारा उरला होता. ओसरीचा भाग अजुन नीट होता. पलीकडे देवघर. बाजुला स्वयंपाक घर. त्याच्या मागे मागचे अंगण. अंगणात आड. हळुच आडापाशी येवुन पोहोचलो. डोकावले. काळपट पाण्यात कोणीतरी पहात आहे असं दिसलं. मागे झालो. तिथल्याच एका दगडापाशी बसलो.

विचारात डोळे आपसुक मिटले गेले. घंटीचा आवाज आला. सकाळी सकाळी काका उठुन देवपूजा करायचे. काका आईचे वडील. सगळे जण काका म्हणायचे. आम्ही नातवंड पण काकाच म्हणायचो. त्यांचा घोग-या आवाजातला स्तोत्र म्हटल्याचा आवाज आला की हळु हळु आम्ही नातवंड अंथरुण सोडायला लागायचो. तिकडे स्वयंपाकघरात माई कामात असायची. माईला आज्जी म्हणुन कधीच हाक मारली नाही. माई हे हवं माई ते हवं असं करत तिला जाम त्रास द्यायचो. तेव्हा काही वाटलं नाही. आज असं वाटतं जरा जास्तच त्रास दिला की काय म्हणुन लवकर गेली. तव्यावर कधी भाक-या कधी पोळ्या, पलीकडे कालवण उकळत असलेलं. खाली चुल ढणाणा. बाजुला माई बसुन सगळं नीट करत असलेली. मनाच्या कोप-यात हे चित्र अजुन जपुन ठेवलेलं आहे. धुराचा वास सगळीकडे पसरलेला. त्यातच मस्त कालवणाचा वास. सकाळी उठल्यावर अशा संमिश्र वासात दिवस सुरु झाल्यावर मग काय विचारता!

आडाजवळ यायचे. तोंड धुउन बसायचे. चहा पिउन लोटा घेउन शेतात पळायचे. तेव्हा संडास घरात असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं आणि गावात कुणीही श्रीमंत नव्हता ! शेतात गेल्यावर तिथल्याच विहिरीवर कधी आंघोळ करुन अंगावरचे कपडे वाळले की रमत गमत घरी यायचे. तोपर्यंत घरातली मोठी माणसं शेतावर किंवा तालुक्याला निघुन गेलेली असायची. आल्या आल्या माई भुक करुन ओरडायचे आणि ताटात वाढलेलं भरा भरा खाउन परत खेळायला फरार व्हायचं.

घराबाहेर एक मोठा पिंपळ होता. होताच कारण बारा पंधरा वर्षांपुर्वी एक दिवस मोडुन पडला. किती वर्षांपासुन होता हे कूणालाच माहित नव्हतं. प्रत्येकाने आपल्या लहानपणापासुन त्याला पाहिलेलं होतं. पिंपळाच्या एका बाजुला मुंजा होता. छोटंसं मंदीर. त्याला बारिक घंटा. कधी कधी तिथे दिवा लागलेला असायचा. कधी पत्रावळीवर भात त्यावर कुंकु गुलाल पिठाचा दिवा असं काहीसं असायचं. ते ओलांडायचं नाही अशी सक्त ताकिद आम्हाला दिलेली होती. त्याकाळी मोठ्यांच ऐकायच नाही अशी प्रथा नसल्याने आम्ही असं काही दिसलं की दुर रहायचो. पिपळाचं कोवळ पान घेवुन त्याची शिट्टी बनवायची हा आमचा आवडता खेळ होता. गोल गुंडाळी करायची. एका बाजुला तोडुन कपाळावर ठेवुन थोडी दाबायची. हे करतांना उगाचच ओम एम काली वगैरे मंत्र म्हणायचे आणि तोंडात ठेवुन हवा फुंकुन आवाज काढायचा. किती वेळ जायचा पण खेळ काही थांबायचा नाही.

उन वाढत गेले की माई बाहेर येउन आवाज द्यायची. जरा वेळ आत खेळा नाही तर झोपा. ओसरीवर बसुन पत्ते किंवा भेंड्या सुरु व्हायच्या. मधुनच एकेक बसल्या जागी पेंगत गळुन जायचा. थोडावेळा करता घर अगदी शांत व्हायचे पुन्हा संध्याकाळी गजबजायला. दुपार ढळायला लागली की आजुबाजूच्या बायका यायच्या. माई मामी आणि बायका कधी निवडणाचे किंवा कधी कसले काम करत बसायच्या. आम्ही पोरं तिथेच खेळत असायचो. आलेल्या बायकांमधे काही लेकुरवाळ्या असायच्या. तान्ही अंगावरची पोरं घेउन यायच्या. काम करतांना त्यांना पोरांना निजवण्यासाठी झोळी बांधलेली असायची. त्यात टाकुन एका हाताने झोका देत एका हाताने काम करायच्या.

कधी कधी आम्ही पोरं झोका द्यायचे काम करायचो. जेव्हा पासुन पाहिले तेव्हापासुन झोळी बांधलेलीच असायची. कधी गडी माणसांच्या बाया धान्य घ्यायला यायच्या. धान्य पाखडुन घेउन जात्यावरुन दळून घ्यायच्या. माईचा कारभार सगळ्यांसाठी खुला होता. त्या बायांची पोरं सुद्धा त्याच झोळीत झोपायची ज्या झोळीत कधीकाळी माईची नातवंड झोपायची.

बघता बघता संध्याकाळ झाली. चल रे काका जाउ आता पुतण्या मागे लागला. अंगणातुन उठुन परत आत आलो. कोप-यातल्या चुलीच्या खुणा अवशेष रुपाने होत्या. माईच्या शेवटच्या दिवसांत गावात गॅस मिळायला लागला होता त्यामुळे धुराचा त्रास कमी झाला होता. पण माईला चुलच बरी वाटायची. सवयीचा परिणाम असावा. देवघरात गेलो. छत पडले होते. पुर्वी देवघरात छान पितळी देव होते. शेंदराने माखलेला गणपती होता. प्रतिमा होत्या. सतत तेवणारी समई होती. आणि आता मात्र काही नव्हते. लहानपणी देवासमोर बसुन म्हटलेली स्तोत्रं आठवली. समोर मुर्ती नाही, देव नाही असे वाटलेच नाही. शांतपणे हात जोडले. पुतण्या पहात होता. नक्कीच मी वेडा असणार त्याच्या दृष्टीने. मी जे पाहीलं होतं ते त्याने कधी पाहिलेच नाही, त्याचा तरी काय दोष!

बाहेर ओसरीवर आलो. कोप-यातल्या खांबाकडे लक्ष गेले. तिथेच माईचे जुने पातळ बांधुन झोळी बांधलेली असायची. तिथे आज एक खांब मोडायला आला होता. दुसरा म्हणायला उभा होता. झोळीचे पातळ बहुदा फाटल्याने काढुन टाकले असावे किंवा घर बदलतांना सामान बांधायला वापरलं असावं. एक निश्वास टाकुन बाहेर आलो. समोरच नजर गेली. भलामोठा पिंपळ पहायची सवय असलेलं मन अजुन सरावलं नव्हतंच. आभाळाला जणु भोक पडल्यासारखंच वाटलं. पिंपळाकडे चालु लागलो. जुनाट खोडाचे काही तुकडे दिसत होते. दोन चार ठिकाणी पालवी येवुन झाड वाढलं होतं. पण ते झाड आणि हे झाड यात फरक होताच. पलीकडे मुंजाचं मंदीर मोठं आणि नवं दिसत होतं.

आजु बाजुला पाहिलं. काही घरं बदलली होती. काही माणसं बदलली होती. बदललो नव्हतो तो मीच. अजुनही तेच आणि तसेच असेल असं वाटुन पुन्हा पुन्हा तेच शोधण्याचा प्रयत्न करत होतो. जड पावलाने घरी आलो. जेवतांना मामाला सांगितलं सकाळच्या गाडीने परत जाईन. मामाने विचारले परत कधी येशील. येत जा अधुन मधुन. हम्म येईन असे मोघम बोलुन जेवण संपवले. मामेभावाबरोबर गप्पा मारत केव्हातरी झोपुन गेलो.

टिंग टिंग बेल वाजली. गाडी सुटली. मामा स्वतः गाडीपर्यंत आला त्याला हात करुन गाडीत बसलो. गाडीच्या वेगात डोळ्यावर झोप येत असतांना डोळ्यासमोर सतत तरळत होता ओसरीवरचा खांब आणि जिच्यामुळे कधी तरी लहानपणी मला शांत झोप दिली होती ती त्याला बांधलेली झोळी !!

काटा आणला अंगावर बर्‍याच

1

काटा आणला अंगावर बर्‍याच वाक्यांनी.. काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं ते तसं दिसलं नाही पण अपेक्षाभंगही झाला नाही.

मस्तच रे नाना!

सुरेख !!! नाना मी सुढ्धा

2

सुरेख !!! नाना मी सुढ्धा तुझ्याबरोबर फिरुन आले तुझ्या गावात.

नाना.. जबरदस्त.. पुन्हा एकदा

3

नाना.. जबरदस्त..

पुन्हा एकदा म्हणतो.. तु काय लिहितोस ह्याची तुला अजिबात कल्पना नसावी अथवा कदाचित पुर्ण कल्पना असावी..

खुप वेगळं काम आहे हे.. हा पोत. हा अबोल बोलका भाव..

नाना

4

मस्तच लिहले आहेस.

नान्या बस्तंच रे... जुनं घर

5

नान्या मस्तंच रे... जुनं घर जुनं आवार, जुनं शिवार सगळं बदलतं आपण फक्त जुनं जुनं करत राहतो. कारण ते अनुभवलेले सुख असते. मग कोणी जुनं म्हणो काही म्हणो ते सोनं म्हणूनच मनाच्या कोटात संभाळून ठेवलेले असते.


-पुण्याचे पेशवे

२४ कॅरेट बावनकशी ... आणखीन

6

२४ कॅरेट
बावनकशी

... आणखीन असंच.

हेच म्हणतो... कोणत्याही

7

हेच म्हणतो...

कोणत्याही प्रकारचे लेखन आपला नाना करू शकतो..खरा ऑलराऊंडर.... Grade Grade Grade Grade

लेखन कुनीबी पाडतंय वो.. ते

8

लेखन कुनीबी पाडतंय वो..

ते इतकं सकस हाच साला करु शकतो..

तुमच्याशी अगदी सहमत!

9

तुमच्याशी अगदी सहमत!

कातर

10

कातर झाले मन...!
सगळ्यांच्या आठवणी थोड्याफार अशाच असतात. ( माझ्यातरी आहेत ) पण ते असं मांडता येत नाही..
व्यक्त होता येणं हा कितीतरी मोठा वर आहे. जो केवळ तपश्चर्येनं मिळत नाही. तुला मिळालाय हा वर.

( वर = वरदान ) ( आधीच सांगितलेलं बरं ! नाहीतर ते काश्मीर वगैरे... )


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

सुंदर लेखन नाना!!

11

सुंदर लेखन नाना!!

मस्त

12

शब्द सुचत नाहियेत इतकं अप्रतिम लिहलं आहेस
खूप आवडलं.
हास्य

अप्रतिम...आणि निव्व्ळ

13

अप्रतिम...आणि
निव्व्ळ अप्रतिम....

छान ...आवडलं..

14

छान ...आवडलं..

...

15

यापुढे तुझे लेखन ऑफिस मधून कधीही वाचणार नाही... त्रास होतो.


नानू (सरंजामी नसलेला)

सुरेख रे.. गावच्या आठवणी

16

सुरेख रे.. गावच्या आठवणी जाग्या झाल्या बघ नाना.. अप्रतिम लिहतोस तु !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त नाना! आवडलं.

17

मस्त नाना! आवडलं.

सुरेख !!!

18

सुरेख !!!