पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहेत या पु.गं. नी 'नरोटीची उपासना' लिहिल्याला. त्याला पन्नास वर्षे झाली त्या वर्षी एका प्रथितयश वृत्तपत्राने तो पुनर्मुद्रित केला होता. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्याची आठवण झाली. (आणखी एक कारण म्हणजे आम्हाला आजच 'संस्कृती विरोधक' असा बहुमान बहाल करण्यात आला. मग आता त्याला अनुसरून वागायला नको? असो.)
हा लेख पु.गं.चा लेख नाही, त्याचा आजच्या काळात वेध घेणारा म्हणून शकू कदाचित. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो (फारसा उपयोग नसतो हे ठाऊक असूनही) ती म्हणजे पु. गं.चा लेख किंवा हा लेख आपल्या परंपरांचे/प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. इथे अश्रद्धतेचा विचार येणार नाही. (प्रतिवादाच्या सोयीसाठी प्रथम तसा शिक्का मारणे सोपे असते, पण लेखाची व्याप्ती ती नाही.)
नरोटी म्हणजे करवंटी, नारळाच्या आतील जीवनदायी पाण्याचे, खोबर्याचे रक्षण करणारे भक्कम वेष्टण. श्रद्धा आणि परंपरांच्या भाषेत सांगायचे तर खोबरं नि पाणी हे मूलतत्त्व नि नरोटी म्हणजे त्याभोवती उभे राहिलेली व्यावहारिक कर्मकांडे वा उपचार. आपल्या लेखात पु.गं.नी त्याचा विचार साररूपाने मांडला आहे तो असा.
कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा, त्याची उन्नती व्हावी यासाठी त्यातील धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वे मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासने सांगितलेली असतात. त्या शासनांच्या मागची जी तत्त्वे, त्यांचा जो मूळ हेतू त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचे पालन करीत असतो तोपर्यंत ती फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणास, रक्षणास, अभ्युदयास त्यांचे साह्य होते. कालांतराने स्वार्थामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, आळसामुळे, श्रद्धाशून्यतेमुळे त्या मूळतत्त्वांचा विसर पडून समाज केवळ त्या जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचे बाह्यरूप तेवढे जाणतो. अंतरीचे तत्त्व, त्याचा आत्मा तो जाणत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतले खोबरे कोणी नेले, ते नासले, तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त नरोटीची उपासना करीत राहतो. पण त्याची श्रद्धा मात्र असते की आपण श्रीफळाचीच उपासना करीत आहोत. समाजाचा अध:पात येथूनच सुरू होतो.
या मूलत्त्वाचे निरूपण त्यांनी काही ऐतिहासिक काही तात्कालिक उदाहरणांच्या आधारे केले होते. आजच्या काळाचा विचार करता परिस्थिती फार बदलली आहे का असा विचार मनात येतो. रोजच्या जगण्यातले तुमचे-माझे काही अनुभव आहेत ज्यावरून असे वाटते की आजही परिस्थिती काही वेगळी नाही. कदाचित उद्याचीही काही वेगळी नसेल.
आज नागपंचमी आहे, नागपूजेचा दिवस. हा सण खरेतर शेतकर्यांचा. वावरातील धान्याची नासाडी करणार्या उंदरांवर जगणारा नाग हा एकप्रकारे शेतकर्याचा उपकारकर्ताच असतो. परंतु हा उपकारकर्ता मवाळ वृत्तीचा नाही. खुद्द तो शेतकरी वा त्याचे कुटुंबिय त्याच्या जगण्याआड आले तर त्यांनाही डसण्यास कमी करणार नाही. यास्तव, एका बाजूने त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे नि दुसर्या बाजूने वावरातले सहजीवन सुखदायी व्हावे म्हणून त्याला अन्न देऊन स्नेह जोडणे असा दुहेरी हेतू यात असावा.
आता मुद्दा असा आहे की मुळात हा वावराशी निगडित सण आहे. मग ज्यांनी जन्मात कधी वावराचे तोंड पाहिले नाही अशा पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील फ्लॅट्-संस्कृतीमधे वाढलेल्या नि कदाचित (त्यातील काही) गांडूळ दिसले तरी चप्पल घेऊन मारायला धावणार्या स्त्रिया, नागपंचमीचे व्रत करतात हा विरोधाभास नाही का? बराच काळ गारुडी नाग दाराशी घेऊन येत नि या तथाकथित सश्रध्द स्त्रिया त्या नागाची पूजा करून पुण्य कमावत. यात अनेक नाग मृत्युमुखी पडतात हे लक्षात आल्यावर पुण्यातील एका प्राणिमित्र संघटनेने दाराशी आलेल्या नागाची पूजा न करता सर्पोद्यानात जाऊन करा अथवा प्रतिमेची पूजा करा असे सांगताच त्यांच्यावर 'संस्कृती विरोधक' असल्याचा शिक्का मारला गेला (आमच्यासारखाच). एका विद्वान साहित्यिकाने लेख लिहून 'दाराशी नाग येणे नि तो पहायला मिळणे हा आमच्या मुलांचा सांस्कृतिक हक्क आहे' असा दावा केला होता. आता नागपूजा हक्क हे खरे पण त्यापाठोपाठ 'दाराशी येण्याचा हक्क' हे त्याचे पिलू कुठून आले? जसे गणोशोत्सवाबरोबर कर्णकटू स्पीकर लावण्याचा हक्क हा देखील संस्कृतीचा भाग होतो तसेच बहुधा.
अशीच गोष्ट निर्माल्याची. आपल्याकडे देवाच्या अंगावरून काढलेले निर्माल्य नदीत सोडण्याचा प्रघात आहे. यामागे अतिशय सुंदर नि संवेदनशील कारण आहे. पण संस्कॄतीच्या नावाखाली त्याचे पालन करणार्या किती जणांना ते ठाऊक आहे? विचारा स्वतःला हा प्रश्न. कारण असे आहे की आपण आपल्या उपासनेसाठी निसर्गातून त्याच्या चैतन्याचा अंश ती फुले काढून आणतो. जे आपले नाही ते आपण निसर्गाकडून घेतो. ते पुन्हा निसर्गालाचा परत करावे हा हेतू असतो. मग नदीतच का, तर वाहते पाणी हा चैतन्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. सुकलेल्या फुलांना - ज्यांचे चैतन्य आपण हिरावून घेतले होते - पुन्हा एकवार चैतन्याच्या सहवासात सोडावे, संकेतार्थाने त्यांचे चैतन्य त्यांना पुन्हा मिळवून द्यावे हा.
आजच्या आपल्या नद्यांची अवस्था काय आहे. पुण्यातील मुठा नदी हे सार्या शहराचे मैलापाणी पोटात घेऊन गटार झाले आहे. दोन धरणांमुळे वाहते पाणी हा मुद्दा पूर्णपणे निकाली निघालाय. अशा पाण्यात निर्माल्याचे विसर्जन करणे हे त्याचे अवमूल्यन नाही का? आमच्या मातोश्रींना अनेकदा हा मुद्दा सांगण्यात आला परंतु तो नाकारून आमच्या माघारी निर्माल्य नदीतच विसर्जन केले जाते. माझी खात्री आहे बहुतेकांकडे हीच स्थिती असणार आहे.
आता याची दुसरी बाजू पाहूया. काही वेळा आपण कर्मकांडात बदल करतो. पण त्यात हेतू मूल्यमापनाचा/सुधारणेचा असतो की स्वार्थाचा/सोयीचा? श्रावणात एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावण्याची पद्धत आहे. आता बहुतेक नोकरदार स्त्रिया रविवारी बोलावतात, कारण एरवी सुटी नसते. आता सवाष्ण बोलावण्याचे हेतू काय असतील हे मला माहित नाही. पण माझ्यापुरता एक अर्थ मी लावला आहे तो सांगतो. श्रावण हा महिना असा आहे की हा बहुधा दुष्काळी महिना. मागच्या वर्षीचे धान्य संपत आलेले नि यावर्षीची कापणी व्हायला वेळ असते. अशा वेळी घरची स्त्री अन्नधान्य पुरवून वापरत असते. बहुधा घरच्या धन्याला नि पोरांना अधिक देऊन ती अर्धपोटी राहत असेल. अशा वेळी निदान एक दिवस तिला चांगले जेवण मिळावे हा एक हेतू असावा. बहुधा अशा गरजू स्त्रीला बोलावण्याचा मूळ प्रघात असावा. तसेच फळत्या-फुलत्या घरात एक दिवस एक माणूस सहज खपून जाते त्यामुळे फार काही खर्च वाढत नाही हा ही एक फायदा.
आज काय स्थिती आहे? जिला सवाष्ण म्हणून बोलावण्यात येते ती गरजू असते का?. एक धक्कादायक प्रकार - निदान त्यावेळी मला तसा वाटला- पाहण्यात आला. वारः शनिवार, स्थळः अभिषेक वेज, मेहेंदळे गॅरेज समोर. आम्ही एका मित्राची वाढदिवसाची पार्टी काढायला गेलो होतो. शेजारी दोन टेबलवर एकुण आठ स्त्रिया बसल्या होत्या. मधे चांदीचे ताम्हण आणि निरांजन. प्रकार काय आहे समजून घेण्यासाठी जरा कान देऊन ऐकले तर धक्काच बसला. ते सवाष्ण भोजन होते. अ ने बला, ब ने कला असे करत ट ने अला दिलेले. एकच ताम्हण नि निरांजनात भागते, है का आव्वाज. त्यातच एक बया तिच्या अफाट हिंदीत (हिंदी का कुणासा ठाऊक) दुसर्या अफाट स्त्रीला म्हणत होती 'मै तो उसको (एखाद्या अनुपस्थित महिलेबद्दल असावे) बोली की तुम दोनोही आजाव, मेहुण करके'. मला फेफरं यायचं बाकी होतं.
असे अनेक मुद्दे आहेत. दसर्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटायची पद्धत आहे. हल्ली सर्रास मोठी असतात नि तजेलदार दिसतात म्हणून त्या झाडाच्या सजातीय असलेल्या कांचनवृक्षाची पाने वाटली जातात. श्रावणात जीवतीच्या पुजेसाठी प्रत्यक्ष लेकुरवाळ्या स्त्रीला न बोलावता तिच्या चित्राची पूजा केली जाते, तीच गोष्ट वटपौर्णिमेची. काही चतुर लोकांनी अशा आळशांच्या सोयीसाठी श्रावण महिन्यातील सार्या सणांचे एक पानाचे टेम्प्लेटच तयार केले आहे. ते देव्हार्यात चिकटवायचे की बास झाले काम.
तात्पर्य. आपल्या सोयीनुसार आवडीनुसार परंपरेत आम्ही बदल करू, त्यासाठी मूळ हेतूला बाधा येते का हे आम्ही पाहणार नाही. अर्थातच हे आम्ही गुपचूप करू, गाजावाजा करणार नाही. आणि आम्ही संस्कृती जाणतो त्यामुळे आम्हाला तो हक्कच आहे. आम्ही मूळ हेतूला हरताळ फासतो आहोत हे सांगणार्याला आम्ही संस्कृती विरोधक ठरवू, त्यांचा निषेध करू, त्यांच्या तोंडाला काळे फासू. आम्ही म्हणू ती परंपरा, आम्ही सांगू ती संस्कृती, आमच्या हेतूबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही.
अखेरीस नरोटीला चिकटून राहण्याचा अट्टाहास कुठल्या थराला जातो याचे उदाहरण म्हणून एक श्लोक देतोय.
वरं हि मातृगमनं, वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्या न भोजनम्
परंपरेने घृणास्पद मानली गेलेली सगळी पापे केली तरी चालतील पण एकादशीला भोजन केलेले चालणार नाही. हो हे लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते हे मला ठाऊक आहे, पण मुळातच ही तुलना इतकी घृणास्पद आहे की ही जर संस्कृती असेल तर आम्ही सुखे संस्कृती विरोधक म्हणवून घेऊ. खोबरे सडून गेले तर नवे श्रीफल आणून उपासनेसाठी - मग ते भले जुने नसेना- पण नरोटीची उपासना कधीही करणार नाही.
>>मला फेफरं यायचं बाकी
>>मला फेफरं यायचं बाकी होतं.
खरं आहे.
उत्तम लेख.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
विचार करायला लावणारा .. लेख
विचार करायला लावणारा .. लेख आवडला.
काळानुसार बदलणार्या गरजा विचारात घेता रुढी,परंपरासुध्दा बदलणे आवश्यक आहे. सगळ्याच काही टाकाऊ नाहीत कि सगळ्याच काही उपयोगीदेखील नाहीत, त्या तात्कालिक स्वरूपाच्या होत्या आणि आतादेखील आवश्यक आहेत कां ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. श्रावणातले बहूतेक सण हे निसर्गाशी माणसाचे असणारे नाते आणि त्याच्यातून माणसांची निसर्गाबाबतची कर्तव्ये ह्या संबंधानी आलेले आहेत. त्यात ऋतुचक्रानुसार वातावरणात निर्माण झालेली स्थिती त्यानुसार माणसाला त्या त्या ऋतुत करावा लागणारा दैनंदीन जिवनातला बदल हे देखील सणावारामागचे कारण आहे. त्यामुळे आजकाल ते महत्व राहीले नसेल तर रुढींमध्ये देखील बदल करणे किंवा नको असलेल्या रुढी/परंपरा नष्ट करणे गरजेचे आहे.
चालु द्या
ररा, लेखातील विचारांशी १०० %
ररा, लेखातील विचारांशी १०० % सहमत !
उत्तम लेख
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
खूप छान
मस्त लेख आहे. विचार करायला भाग पाडणारा.
नानू (सरंजामी नसलेला)
अप्रतिम लिखाण.......उत्तम
अप्रतिम लिखाण.......उत्तम आहे.
हे सर्व करण्यापेक्षा अंतर्मयी आत्मानंदाचे उपासक होणे चांगले नाही का??
छान लेख
सांस्कृतीक लेख छान लिहलाय. भावनाओं समजो केले परंतु
पण 'आता नागपूजा हक्क हे खरे'????? , आज नद्यांची अवस्था उत्तम असेल तर पुन्हा एकदा लोकांना हवे तेव्हा, हवे तेवढे, हवे तिथे "निर्माल्य" (बरेच लोक प्लॅस्टीकच्या पिशवीतुन टाकतात, सरसकट पुजेचे काही साहीत्य जे उरले असेल तेही फुलांबरोबर जाते ) हे पुन्हा नदीत सोडायचे का? सवाष्ण - नेमकी त्या दिवशी कोणाला सोकॉल्ड गरजु मिळालीच नाही (हो तर भारतात इतके गरजु, गरीब असुन बरेचदा कामाला नोकर मिळतील असे नाही.) तर गरजु हा टॅग सोडून इतर अटीत बसणारी व्यक्ती ही सोय फारशी वाइट नसावी, आता हिंदीचा असा अविष्कार महाराष्ट्रात बरेच मराठी जनांनी केला आहे व अजुन काही काळ होत राहील असे वाटते, त्यामुळे तो काही मोठा मुद्दा नाही. असे अनेक विचार तरळुन गेले.
असो.
भा.पो.
खुलासा
'आता नागपूजा हक्क हे खरे'?????
मालक, सुरवातीलाच लेखनाची व्याप्ती निश्चित केली आहे. हा लेख आपल्या परंपरांचे/प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. हे पाहिले नाही का?
नेमकी त्या दिवशी कोणाला सोकॉल्ड गरजु मिळालीच नाही
मालक वेळ महत्त्वाची की गरज? जेवायला घालणे महत्त्वाचे की शुक्रवारी जेवायला घालणे महत्त्वाचे? पुन्हा नरोटीच
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
नागाचा
नागाच्या प्रतिमेचा, फटूचा, इ चा हक्क मान्य करतो पण ऑलमोस्ट दहा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात (नागपंचमी महाराष्ट्रातला सण की देशभरचा मग तर कल्पना करवत नाही) किती खरे खुरे नाग दारोदारी फिरवावे लागणार?
'खर्या नागाची पूजा हा हक्क' इतकाच विचार करुन चक्रावलो.
बाकी काय बोलू, काळानुसार प्रथा बदलणार, कर्मकांडावर तर नक्कीच मोठा फेरबदल होणार.
हा हा
'खर्या नागाची पूजा हा हक्क' इतकाच विचार करुन चक्रावलो.
हा पुरोगामी विचार झाला साहेब. या लेखात तो बाजूला ठेवलाय.
अवांतर: सर्पोद्यानात जाऊन पूजा करा वा प्रतिमेची या बद्दल जनजागृती करणार्या प्राणिमित्रांशी आम्ही काही काळ संबंधित होतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ररा.. च्यायला काय एक नंबर
ररा.. च्यायला काय एक नंबर विषयाला हात घातलाय.
मी नास्तीक कधी झालो मला आठवत नाही, नास्तीक म्हणजे नक्की काय ह्याची व्याख्याही नाही सांगता येत. पण बहुदा सुरूवात अशा स्वच्छ तर्कविसंगत दिसणार्या नरोट्यांपासूनच झाली असली पाहिजे.
माझीही आस्तीक व्हायची खूप मनापासुन इच्छा आहे पण त्या प्रयत्नात पदोपदी ठेच लागायला लागली, परीणाम उलटाच झाला.
असो तुम्ही सांगितलेल्या रुढी, त्यामागची मुलतत्वे, मुळ गाभा फेकून देउन आलेले विकृत स्वरूप, हे पदोपदी जाणवायला हवं हो, पण आपलं लक्षच जात नाही त्याकडे. आणि काही बोलायला गेलं की धर्म, संस्कृती, दांभीकता हे सगळे पदर एकमेकात इतके घट्ट विणले जातात की कधी गळफास बसेल सांगता येत नाही.
अत्यंत उत्तम लेख पाडलाय तुम्ही, मला पु.गं. चा मुळ लेख द्याल का? मला तात्यारावांच्या 'दोन शब्दात दोन संस्कृती' 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव' या लेखांची आठवण झाली..
बरंच लिहीता येइल ह्या विषयावर पण थांबतो.. उगाच जाळपोळ नको तुमच्या धाग्यावर.. व्यनी करतोय सवडीने उत्तर द्या..
मू़ळ लेख
पु.गं.चा मूळ लेख 'माझे चिंतन' नावाच्या पुस्तकात आहे. कॉन्टिनेंटलचे आहे. लहानसे पुस्तक आहे अजूनही मिळते. एकाहून एक सरस असे लेख आहेत. जमल्यास नक्की विकत घ्या. माझ्याकडे जादा प्रत आहे का पाहतो. नसेल तर निदान तेवढा एक लेख स्कॅनून देऊ शकतो.
तात्यारावांचे लिखाण म्हणजे अमोल ठेवा आहे. दुर्दैवाने त्यांना वैचारिकदृष्ट्या हायजॅक केले गेल्याने प्रत्यक्ष जीवनात नेमके हेच विचार समोर येत नाहीत, आणि अतिशय संकुचित अशी त्यांची इमेज आज आपल्यासमोर आहे. दुर्दैव - त्यांचे नाही - आपले.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
विचार
विचार करायला लावणारा .. लेख आवडला.
आपल्याला मिळालेल्या
आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
उद्या मला ध्वजवंदनाला बोलावणं आलं आहे, वेळ रात्री ८.३०, त्यानंतर जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रम. जिथे हे होणार आहे तिकडे हॉलमध्ये झेंडा उभा करतात कारण बाहेर तशी काही सोय नाही. येताना भारतीय वेष( स्लीव्हलेस चालणार नाही ) परिधान करून यायची आणि प्रतिज्ञा (इंग्रजीत) पाठ करून
जाण्याची अट आहे. याला काय म्हणायचं?
बाकी हॅप्पी नागपंचमी..
पुष्करिणी
च्च् च्च्
पुरस्कार नाही हो 'बहुमान'.
बाकी तुम्हाला आलेल्या आमंत्रणाबद्दल म्हणाल तर त्याचा नि या लेखातील विचाराचा काही संबंध लावता येईल असे दिसत नाही. तुम्हाला काही दिसत असेल तर सांगा.
मला तर तिथे ड्रेस-कोड चा हेतू दिसतो. तसा तो कारखान्यातही मजुराला असतोच (क्वचित आय टी मजूरालाही, अमूक एकच असे नाही पण अमूक चालणार नाही हे असते) आता निळाच का खाकी का नाही असा प्रश्न तो मजूर विचारू शकत नाही. तो नियम केलेला आहे, पण त्याच्यामागे 'रेजिमेंटेशन' (याचे बराकीकरण असे भिकार भाषांतर अनेकदा वापरले जाते) हा एकमेव हेतू आहे. मुख्य म्हणजे नियम करणारा नि पाळणारा हे वेगळे आहेत. तुमचा कार्यक्रम एखाद्या खासगी कार्यक्रमासारखा आहे. यात त्या कार्यक्रमाची परंपराच जर तशी असेल आणि ती नेमकी पाळली जात असेल तर तिला नरोटीची उपासना म्हणता येणार नाही. त्यात सोयीने बदल करूनही आपण परंपराच पाळतो आहे असा दावा काही जणांनी केला तर तसे म्हणता येईल. हां आता ही परंपरा अशीच का हा परंपरेला आव्हान देणारा प्रश्न असतो, तो या लेखाच्या व्याप्तीत बसत नसल्याने याचे उत्तर इथे देणार नाही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
तात्पर्य. आपल्या सोयीनुसार
तात्पर्य. आपल्या सोयीनुसार आवडीनुसार परंपरेत आम्ही बदल करू, त्यासाठी मूळ हेतूला बाधा येते का हे आम्ही पाहणार नाही. अर्थातच हे आम्ही गुपचूप करू, गाजावाजा करणार नाही. आणि आम्ही संस्कृती जाणतो त्यामुळे आम्हाला तो हक्कच आहे. आम्ही मूळ हेतूला हरताळ फासतो आहोत हे सांगणार्याला आम्ही संस्कृती विरोधक ठरवू, त्यांचा निषेध करू, त्यांच्या तोंडाला काळे फासू. आम्ही म्हणू ती परंपरा, आम्ही सांगू ती संस्कृती, आमच्या हेतूबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही
सहमत आहे. मुळात मूळ हेतू हा उदात्त आहे आणि तो मनात जाणून पुढच्या गोष्टी करायच्या असतात. आपल्याकडच्या सगळ्याच गोष्टी बालिश आहेत असे समजून पुढे जायचे तर सगळ्याच गोष्टी त्याज्य आहेत.
बाकी आम्हाला जे पटतं ते आम्ही करतो जे पटत नाही ते करत नाही. नाहीतर त्यात आम्हाला पटेल असा बदल करतो कारण आम्ही बुद्धीवादी आहोत. पण तो दुसर्या कोणी केला तर त्याचा सोयिस्कर म्हणून शिषेध करतो . असो.
बाकी नदीत सोडलेली गटारे बंद करून ते पाणी शुद्ध करून परत कसे नदीत सोडून नदी निर्मळ करुन गणपती विसर्जनायोग्य कशी होईल याचा विचार करत मी नदीत निर्माल्य टाकतो.
-पुण्याचे पेशवे
कर्मकांड
कर्मकांड या शब्दातच कर्माचे कांडन आहे. आमचे मते संक्रमणाच्या प्रत्येक टप्प्यावर असेच उहापोह होत असतात. कालच पाणी प्रश्नाच्या परिसंवादाला गेलो होतो. तेव्हा राष्ट्रगीत म्हणताना सर्वांबरोबर उभे राहिलो व राष्ट्रगीत मोठ्याने म्हटले हे ही एक कर्मकांडच केले मी. बसलो असतो तर राष्ट्रगीताचा अवमान व मी राष्ट्र द्रोही मग त्या मागची माझी भावना कुठली का असेना?
निर्माल्य पुलावरुन नदीत फेकताना सुशिक्षित पाहिले की चीड येते. पण चीड येउन चालणार नाही. तो त्यांचा परंपरागत संस्कार आहे. गुरुजींनी जर सांगितले कि निर्माल्याचे बागेत टाका त्याचे खत करा. तर परिणाम होतो. काही गुरुजी हल्ली सांगतात अस.
नागपंचमी ला गारुडी आता दिसत नाहीत फारसे. कायदा आला आहे ना? त्यांनाच प्रशिक्षण देउन जर सर्पमित्र बनवले तर ते उपयोगाचे ठरेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
सहमत
गुरुजींनी जर सांगितले कि निर्माल्याचे बागेत टाका त्याचे खत करा. तर परिणाम होतो. काही गुरुजी हल्ली सांगतात असं.
अहो पण अशा बाबतीत गुरूजींनाही फाट्यावर मारतात लोक. एकदा एक पायंडा पडला की तो बदलायची तयारीच नसते, भले आज त्याचा अर्थ पूर्ण बदलला असेल तरी.
निर्माल्याने खत करून झाडांना घालणॅ म्हणजे नव्य चैतन्याला (झाडाला, पानांना फुलांना) आधार देणेच आहे. मूळ हेतू जर लक्षात घेतला तर आज नदीत निर्माल्य विसर्जन करण्यापेक्षा खत स्वरूपात झाडाला घालण्यानेच तो साध्य होणार आहे. पण म्हणून तर नरोटीची उपासना म्हणायचे ना, खोबरे सडले, नष्ट झाले तरी ते आहे असे 'मानून' चालायचे. सगळे जर मानायचेच तर मग प्रत्यक्ष कर्माची आवश्यकताच नाही हे आणखी एक वास्तव ध्यानात घेतले जात नाही. उक्ती-कृतीतला हा विसंवाद (अनेकदा दांभिकता देखील) हेच समाजाच्या अधोगतीचे मुख्य कारण ठरते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
संस्क्रूती आणि प्रंप्रा
-आहेच मुळी. आता आमच्या मुलांना (किंवा मुलाला किंवा मुलीला) नाग दाखवायला काय पुण्याच्या कात्रजच्या सर्पोद्यानात घेऊन जाऊ? कितीला पडेल ते? दारावर नाग आला की कसे? हा बघ 'कोब्रा' आणि त्याचा आज 'फिप्थ डे' असे सांगायला कित्ती सोपे जाते!
-कारण असे आहे की आपण आपल्या पोटोबाच्या उपासनेसाठी निसर्गातून त्याच्या चैतन्याचा अंश ते अन्नधान्य आणतो. जे आपले नाही ते आपण निसर्गाकडून घेतो. ते पुन्हा निसर्गालाचा परत करावे हा हेतू असतो.
-महानगरात 'सवाष्ण' म्हणून जेवायला जाणे/येणे हे वाढत्या वाहनखर्चामुळे हॉटेलात जेवायला जाण्यासारखेच आहे.
पुण्याच्या बायकांनी 'सवाष्ण' बोलवण्याचा आधुनिक प्रकार शोधून काढल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!पुण्याचे लोक खरेच खूप,खूप हुश्शार बाबा!
लोक जिवाचा किती आटापिटा करून संस्क्रूती जपत आहेत आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर ताशेरे ओढता.अशा 'संस्क्रूती'विरोधकांमुळेच भारत आपली पाळेमुळे विसरत चालला आहे.
आम्हीतर बाबा आमच्या मुलांना (किंवा मुलाला किंवा मुलीला) युएसेलाच पाठवणार. तिथेच आता आपल्या 'प्रंप्रा' टिकणार. म्हटलेच आहे - सॅन होजे हे भविष्यातले पुणे असून फ्रिस्को भविष्यातली मुंबई आहे. (किंवा हेच वाक्य - एडिसन,न्यू जर्सी हे भविष्यातले पुणे असून न्यू यॉर्क सिटी ही भविष्यातली मुंबई आहे असेही वाचता येईल.किंवा -)
खरे आहे. आपल्या प्रंप्रा आपण
खरे आहे. आपल्या प्रंप्रा आपण निराळ्या पद्धतीने जपतच आहोत. विंग्रजी मेडीयम मधल्या शाळेत रक्षाबंधन करून, वाढदिवसाला केक कापून, लग्नात गरज नसतांना तेच तेच आहेर देवून, अंत्यविधीत अव्यवहारी टॉवेल टोप्यांचा वर्षाव करून, डबक्यासम पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरीस ची गणेशमुर्ती बुडवून अन हो आजकाल नवरात्राच्या देव्याही वाढल्या नाही का? त्या पण त्याच पाण्यात पंधराविस दिवसात बुडवून, नवरात्रात नाचून अन मग रात्री पार्ट्या करून....यादी बरीच वाढवता येईल. आपल्या प्रंप्रांचा आपल्याला अभिमान आहे अन तो आम्ही वाढविणारच.
(आजकाल प्लास्टर ऑफ पॅरीस च्या गणेशमुर्तींबद्दल बरीच जागृती होते आहे. मग आम्ही मातीच्या मुर्त्या बनवायला घेतल्या. अहो पण माती आणणार कोठून? त्याने पर्यावरणाचीच हानी होते आहे ना? गल्लोगल्ली गणेश मंडळं स्थापन होतात. दिवसेंदिवस भाऊबंदकीसारखी फाटाफुट होवून ते वाढतात. गणेशौत्सवातल्या घाणेरडया चालींना फाटा द्यायला पाहिजे. पितळेचा गणपती वर्षांनुवर्ष नाही का चालणार? मात ते बुडवतांना मात्र नाच हवाच हं. (डिजे बिजे नको. कानफाडू, छातीफोडू आवाजाजाच्या भिंती नको. त्याविना चालेल. आपला नाशिक ढोल चालेल.) नाचायला मजा येते.
अहो ररा. पु.गं. म्हणजे पु.गं. वैद्य का? नसल्यास परिचय द्या. आम्ही तुम्हाला ररा म्हणतो म्हणून तुम्ही इतरांची आडनावे गाळलेली चांगले नाही हं.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अर्रर्र
अहो ररा. पु.गं. म्हणजे पु.गं. वैद्य का? नसल्यास परिचय द्या. आम्ही तुम्हाला ररा म्हणतो म्हणून तुम्ही इतरांची आडनावे गाळलेली चांगले नाही हं.
खरंच की. स्वारी स्वारी हां. पु.ग. म्हणजे पु.ग. सहस्रबुद्धे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
लेख आवडला. निर्माल्याचे
लेख आवडला.
निर्माल्याचे बागेत टाका त्याचे खत करा. तर परिणाम होतो. काही गुरुजी हल्ली सांगतात अस.
हे खुपच छान. असे बदल होणे ही काळाची गरज.
लेख वर आणतो आहे
म्हातारबुवांच्या या प्रतिसादामुळे हा लेख नजरेस आला
आणि
त्यांच्या अगाध ज्ञानाने प्रभावित होऊन हा लेख अजून वाचकांची ज्ञानतृष्णा भागवेल या अपेक्षेने प्रतिसाद देऊन वर आणतो आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सागर,
धन्यवाद.
एक छान लेख वाचायला मिळाला.
रमतारामजी,
सेमसेम माझे इच्चार लिव्लेत.
गाल कुठे आहे?
फोटू काढून हितं डकवा! पप्पी घ्यायची आहे
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
म्हणूनच धागा वर आणला
इब्लिसराव,
म्हणूनच धागा वर आणला.म्हातारबुवांना वाटले की मी त्यांची खेचतोय
बघा ररा, उपेग झाला का नाय?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
आंय
गाल पुढे करा म्हट्लात तेव्हा घाबरलो ना. म्हटलं जोडा मारताय की काय (स्वगतः या बेट्यानं नाव बाकी समर्पक घेतलं आहे) आणि हो आम्ही आम्रिकन पद्धती ऐवजी आपले ब्रिटिश वळणाचे स्वागत स्वीकारतो, हस्तांदोलन करून. बाप्याने बाप्याची पप्पी घ्यायची परंपरा नाय हो आमच्याकडे. (तुम्ही बाप्ये आहात असे गृहित धरुन हे लिहिले आहे, नसल्यास कुठे भेटायचं बोला.)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बच्चन अन गब्बर चा
तो "दारू पिनेसे लिव्हर खराब होता है" वाला सीन आठवतोय का सत्ते पे सत्ता चा?
गब्बर गुपचुप गाल पुढे करतो बच्चनला पप्पी घेण्यासाठी
खी: खी: खी:
टरबूज घेऊन भेटयला या. बघू पुढे काय करायचं ते.
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
लेख आवडला
ररा सर..
खूपच छान लिहील आहे.
कळावे,
___मनस्वी राजन
अनुभव… क्षण वेचलेले…
>>ररा सर..
>>ररा सर..
ररा सर.. >>> आमचे
ररा सर.. >>>
आमचे सासरेबुवा आज हवेत असणार !!
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
च्यायला
हसायला काय झालं. चार वर्स पुणे उनिवर्सिटीत शिकव्ल्यालं हाय, तवा हाईच आमी मास्तर. (आता विद्यार्थ्यांनी अजाबात शिकवता येत नाही म्हणून आमच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणून काढून टाकले ते सोडा.)
अवांतरः आजच का, पुढचे पाच दिवस हवेतच असणार आहे मी.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
उगी उगी मास्तर, चिडू नगासा
उगी उगी मास्तर, चिडू नगासा राव !
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
मस्त लेख सर... आणि हो निदान
मस्त लेख सर...
आणि हो निदान माझ्यासाठी तरी ररा सर आहेचं... बाकी कोणी काही बोलू देत
:)
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
आपण वडिलांच्या साठी फादर्स डे
आपण वडिलांच्या साठी फादर्स डे साजरा करतो
आई साठी मदर्स डे साजरा करतो.
प्रेमाच्या अभिव्यक्ती साठी व्हॅलेंताईन डे साजरा करतो.
नाग पूजना साठी कोणता डे साजरा करतो ?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
द नागा डे
द नागा डे
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
???
द नागाडे?
(नक्की कसा साजरा करतील बरे...
)
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
द नागाडे?>>>> मराठी भाषा अवघड
द नागाडे?>>>>
मराठी भाषा अवघड आहे मान्य, पण निदान मिंग्लिशमध्ये तरी लिवा की?
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
(विषय दिलेला नाही)
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
द नागा डे कि नागपंचमी ??
द नागा डे कि नागपंचमी ??
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
नै हो.
ते अक्लेचे नगाडे वाव्जून र्हाय्लेत.
(नागपंचमीला बड्डे अस्लेला
आय्त्या बिळावर्चा नागोबा) - इब्लिस.
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
विचार करायला लावणारा उत्तम
विचार करायला लावणारा उत्तम लेख आवडला.