माझे पोहणे

0
0

आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते..
खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण...

मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल... पाण्यात कायम मगर, सुसर आणि शार्क असतातच असं मला आपलं वाटायचं, आणि डोळे बंद करून पोहायचं म्हणजे संकटच....आला समजा शार्क नाहीतर मगर तर डोळे बंद केल्यावर कसं कळणार? आणि डोळे उघडे ठेवले तर डोळ्यात पाणी जाऊन डोळे चुरचुरतात त्यामुळे उगाच पोहायच्या भानगडीत पडले नाही कधी...माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
खूप लहान असताना मांडवगणच्या गीतेच्या क्लासच्या सहलीला पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत बरेच लोक उतरले, ते उतरले म्हणून मी पण...आणि ५ एक वर्षाची असतानाच विठ्ठलाला भेटायला जायची वेळ आली होती...तेव्हापासून मी देवापासून दोन हात लांबच राहते.

लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?

तर कालेजात पोहण्याचा क्लास होता तो करू का नको करत घेतला...नाव नोंदवायच्या आधी कोचला सांगितलं कि मी आत्तापर्यंत मुद्दामहून कधीही पाण्यात गेलेले नाही..
आता मुंबईत पावसाळ्यात आमच्या गल्लीत ५-५ फुट पाणी जमायचे आणि त्यातून मी अनेकदा गेले आहे हे तिला सांगायची गरज नव्हती म्हणून नाही सांगितलं ...आणि त्या
पाण्यात इतके लोक ये-जा करीत असतात कि बुडू म्हंटल तरी बुडायचे नाही...असो,

तर ब्याक टु माझं पोहणं...तर मी कोचला सांगितल्यावर ती म्हणाली हा क्लास बिगीनरसाठीच आहे...म्हंटल चांगलं आहे ...सगळे आपल्याचसारखे असतील त्यामुळे फजितीचा प्रश्न
फारसा नाही...पहिल्या दिवशी पहिले तर मी आणि अजून एक दोन मुलं सोडली तर बाकीचे लोक छान पोहत होते...मी पायरीजवळच्या पाण्यात उभी कारण त्यापुढे जायची हिम्मत होत नव्हती...पूल प्रचंड मोठा आहे...३ १/२ फुटापासून ८ फुटापर्यंत खोल आणि साधारण २५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.. ४.५ फुटावर एक मोठा दोर मध्यावर बांधला
कोच आल्यावर आधी वॉर्मअप म्हणून पाण्यात धावायला लावले...त्याने अंगात उष्णता निर्माण होऊन पाणी तेवढे गार वाटत नाही...

मी कधीच २ फुटाच्या वर गेले नसल्याने आजूबाजूला लोक आहेत आणि कालेजवाले आपल्याला मरू देणार नाहीत हे जाणवल्याने मीसुद्धा पाण्यात धावायचा प्रयत्न केला....आणि साधारण ४.५ ते ५ फुटापर्यंत गेल्यावर प्रचंड भीती वाटली आणि तोल जायला लागला...म्हंटल आता मी बुडणार...लगेच जवळच असणाऱ्याचा भसकन हात धरला आणि पाणी कमरेखाली आल्यावर गुपचूप कडेला जाऊन उभी राहिले....

माझी हि अवस्था पाहून थोडेसे बेसिक शिकवल्यावर बेल्ट लावायला दिला...मी बुडू नये म्हणून ...तर त्या बेल्टने मला काही पाय खाली ठेवता येईना आणि धड पोहताही येईना...एकदम त्रिशंकू होऊन गेले...दोनतीन वेळा तर ३.५ फुट खोल पाण्यातच गटांगळ्या खाल्ल्या...क्लास संपल्यावर दुसरा एक कोच जो थोड्या वरच्या लेवलला शिकवायचा त्याने काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला...
" असं श्वास घेऊन खाली जायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा "
मी श्वास घेऊन खाली गेले आणि फुस्कन सगळा श्वास सोडला आणि भसकन पाणी नाका तोंडात...
"घरी बादलीत पाणी घेऊन त्यात सराव कर"
"बरं" असं सांगून केला नाही तो नाहीच... शेवटी विद्यार्थी असण्याचा पुरावा नको का?
आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...

सारखंसारखं बुडून वैताग आला शेवटी मी म्हंटल आता या बाईचं ऐकलं पाहिजे...म्हणतीये अंग सैल सोडून श्वास धरून डोक घाल पाण्याखाली तर घालावं....काही मरेपर्यंत बुडू द्यायची नाही...शेवटी तिचेही रेप्युटेशन आहेच नाही का? थोडा श्वास धरून डोक घातलं पाण्याखाली आणि कसलासा फोमचा बोर्ड धरून पाय मारायला लागले ....काय आश्चर्य २ एक फुट तरी पोहता आले असेल...मग काय महाराजा !!!...भीती झाली ना कमी...मग एकदम जन्मजात कोळीण असल्यासारखं पोहायचा प्रयत्न करायला लागले...डोकं फार काळ पाण्याखाली ठेवायची हिम्मत अजूनही होत नव्हती पण बर्यापैकी बेल्ट न लावता जमायला लागलं...बऱ्याच जणांनी मी इतका मनापासून प्रयत्न करताना पाहून मदत केली, कौतुक केलं...आमच्या पोहायच्या बाईंनी तर दुसरा वर्ग चालू होईपर्यंत सराव करण्याची मुभा दिली...हळू हळू जमायला लागले आणि दोनचार स्ट्रोक सुद्धा जमायला लागले...

आता तर पाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होऊन थोडफार पोहता येतं...काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.

मला सुध्दा पाण्याची भिती

1

मला सुध्दा पाण्याची भिती वाटत असल्यामुळे पोहता येत नाही , पण शिकण्याचा प्रयत्न मी पण करत आहे हास्य

>काहीही झाले तरी पाय जमिनीवरच

2

>काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.

Laughing out loud

हा हा !

आवडले तुमचे पोहणे पुराण !

आम्हाला लहानपणी ईसाव अज्जा ( पोहणारे आजोबा) म्हणून होते त्यांनी उचलून विहीरीमध्ये १०-१२ फुटावरुन टाकले असेल , चारपाच गटांगळ्या खल्यावर बाहेर काढला व आम्ही आपोआप पोहायला शिकलो त्याची आठवण झाली Big smile


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त

3

मस्त हास्य

छान लिहले आहेस.

4

छान लिहले आहेस.

मस्त

5

लिहील आहे. आठव्णी आवडल्या Big smile


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

सर्वांचे धन्यवाद.

6

सर्वांचे धन्यवाद.

छान लिहीतेस शिल्पा !! तुझ्या

7

छान लिहीतेस शिल्पा !! तुझ्या ब्लॉगवरचं असच साध-सुध,प्रामाणिक लिखाण मला खुप आवडतं !!

बाकी पोहण्यावरून ...

खुद्द तिर्थस्वरूपानेच आम्हाला शिकिवल ...पण एक विचीत्र प्रकार तुला सांगतो ...आमच्य लोहगावात,जिथे तुकाराम महारांजाच्या जन्मस्थळापासुन थोड्याश्या अंतरावर एकाची शेती आहे, फार नाही असेल तीन एकर ...त्या शेतातल्या विहीरीत सकाळी-सकाळी तीन मुली ,पाठीला रिकामा कॅन लावुन विहीरीत ऊड्या मारतात पोहतात,वय काय असेल ? सात पाच आणी पाच (दोन जुळ्या आहेत),वडील पहारेकर्‍यासारखे काठावर बसुन असतात !!

इतक्या लहान वयात? छान

8

इतक्या लहान वयात? छान आहे...एकदा भीती गेली कि गेली..व्यायाम होतो आणि नाही म्हंटल तरी एक कला शिकून होते..

मस्त लिहीलय.....अचानक मी

9

मस्त लिहीलय.....अचानक मी स्विमिंग चँपियन असल्याची आठवण झाली

(स्विमिंग चँपियन नसलेली)

10

Laughing out loud

(स्विमिंग चँपियन नसलेली) प्रीमो

डोक्यावर म्हणजे

11

Big smile डोक्यावर म्हणजे घराच्या..स्विमिन्ग टॅन्क असुनही आळशीपणामुळे मी पोहत नाही व आले मनात तरी काळी पडेन ही भिती असते Stare.

हेच ते........हेच ते.

12

हेच ते........हेच ते. ह्यामुळेच आपण मागे पडतो.

छान लिहिलय..मजा वाटली

13

छान लिहिलय..मजा वाटली वाचताना..२-४ शिंतोडे उडुन फ्रेश झाल्या सारखे वाटले हास्य

मस्त लिहील आहे

14

काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?

आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...

हे एक नंबर


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

>>काय तर म्हणे अशाने भीती

15

>>काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?

वाहव्वा.. मस्त येकदम.. कसलाही अभिनीवेष नाही.. ओढूनताणून विनोदाचा प्रयत्न नाही.. एकदम सकस.

हॅ हॅ हॅ..जीव गेल्यावर..

16

जीव गेल्यावर कशाची भीती?... एकदम खरे..

खरं सांगू का ते पाणी कानात घुसते ना त्याने भीती वाटते, इअरप्लग घाला कमी भीती वाटेल (माझा अनुभव), नंतर ब्रीदींग ची एक र्‍हीदम असते ती साधली की मग स्ट्रोक्स च्या हालचाली अचूक करणे बाकी रहाते. पाण्याच्या बाहेर श्वास घेणे व पाण्यात सोडणे ही लय साधली की थकवा लवकर येत नाही. एक प्रयोग करा, पाण्याबाहेर श्वास घ्या अन हातपाय सरळ ठेउन, पाण्यात तोंड घालून नुसते आडवे पडून रहा, जो पर्यंत श्वास सोडत नाही तोवर आपण तरंगतो बुडत नाही असे लक्षात येइल. हे समजले की भीती संपूर्ण जाईल. पाण्यात श्वास सोडते वेळी हात खाली दाबायचे की आपण वर येतो वर आले की बाहेर श्वास घ्यायचा. हे वारंवार केले की पोहणे आलेच समजा.

एकदा ते आले ना की त्यासारखा दुसरा आनंद नाही, बटरफ्लाय सारखा दमछाक करणारा प्रकार तर अंगातली सगळी रग जिरवतो.
स्ट्रोक्स शिकण्या साठी टीव्ही वर मी काही व्हीडीओ पाहीले होते मला त्याचा खूप उपयोग झाला, नेटवर शोधा सापडेल

( आता पुरे करतो नाही तर म्हणाल "फुकटचे सल्ले द्यायला यांचे काय जाते तिथे माझा दम निघतो.")

वडिलांनी मला ६ वर्षाची असताना

17

वडिलांनी मला ६ वर्षाची असताना १ (फक्त) दिवस पोहायला शिकवायचा प्रयत्न केला..म्हणजे पोहोण्याच्या तलावाकाठी उभं राहून 'आता मार उडी' अशी आज्ञा केली, मी अर्थातच खूप घाबरलीय असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धपकन सरळ ढकलून दिलं...आले मी कशीबशी तरंगत काठावर आणि भीती चेपली.

लेख छानच झालाय. मला तुमचं लेखन आणि (फटकळ)प्रतिसादही खूप आवडतात.


पुष्करिणी

मी वयाच्या ४५ व्या वर्षी

18

मी वयाच्या ४५ व्या वर्षी पोहायला शिकलो. भिती होतीच सुरूवातीला. महिनाभर प्रयत्न केला. आता उद्या पासून सोडायचं असा निश्चय केला आणि त्याच दिवशी कसं काय कुणास ठावूक पण जमून गेलं आता पाण्यात पाठीवर पडून डोळे मिटून तरंगायचा अनुभव घेवू शकतो. नथिंग लाईक इट, बिलीव्ह मी!


आपला स्नेहांकित...
-अशोक

लेखण वर काढण्याच्या

19

लेखण वर काढण्याच्या निमीत्ताने शिल्पा ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

धन्यवाद.

20

हास्य धन्यवाद.