अफगानिस्तानमधील स्त्रियांबद्दल टाईम नियतकालिकातील "कव्हर स्टोरी"

0
0

अफगानिस्तानमधील स्त्रियांबद्दल टाईम नियतकालिकातील "कव्हर स्टोरी"
Credits
Picture 1
Picture 2
Picture 3
Picture 4
(टाईममधील पूर्ण लेख अतीशय वाचनीय असून सर्वांनी तो जरूर वाचावा.)
'टाईम'च्या ९ ऑगस्टच्या अंकात भारतीय नागरिकांना अपरिचित अशा कांही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्या वाचून माझ्या अंगावर तर शहारेच आले. आयेशा नावाच्या १८ वर्षाच्या तरुणीला शिक्षा द्यायला आलेल्या तालीबानी गटाने तिच्या घराच्या दारावर मध्यरात्री थाप मारली. गुन्हा होता कीं तिला सासरचे लोक गुलामासारखे वागवत ते सहन न झाल्यामुळे ती घरातून पळून गेली. ते तिला मारहाण करत असत. जर ती पळाली नसती तर ती मरण पावली असती असे तिने गयवया करून सांगितले. न्यायाधीश होता तालीबानचा 'कमांडर'. त्याच्यावर या निवेदनाचा कांहींच परिणाम झाला नाहीं. आयेशाच्या दीराने तिला धरून ठेवले व तिच्या नवर्‍याने आधी तिचे कान कापले व नंतर नाकाकडे वळला.
ही दहा वर्षांपूर्वी (तालीबानच्या कारकीर्दीत) घडलेली गोष्ट नाहीं तर गेल्या वर्षी (म्हणजे हमीद करझाईंच्या कारकीर्दीत) घडलेली ही गोष्ट आहे. एका गुप्त ठिकाणी लपलेली आयेशा बातम्या लक्षपूर्वक ऐकते. करझाईंचे तालीबानशी समझोता करण्याचे मनसुबे तिला घाबरवून सोडतात. तिची अशी अवस्था करणार्‍या तालीबान्यांशी तडजोड कशी होईल असा प्रश्न तिला पडतो.
जूनमध्ये करझाईंनी एका 'शांतीमंडळा'ची स्थापना केली. जुलैमध्ये मानवाधिकारावर नजर ठेवणार्‍या संस्थेचे मालिनोवस्की करझाईंना भेटले. करझाई त्यांच्याशी या संघर्षात होत असलेल्या मनुष्यहानीबद्दल बोलले. "चोहोंकडे हिंसाचार होत असताना एका मुलीचा जीव वाचवणे जास्त महत्वाचे कीं तिचे शिक्षण जास्त महत्वाचे" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आता अशा प्रश्नांची उत्तरें करझाई आणि त्यांची मित्रराष्ट्रे कशी देतात याच्यावर अफगाणिस्तानमधील स्त्रियावरच नव्हे तर संपूर्ण अफगाणिस्तानवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
अफगाणिस्तानमधील युद्ध संपविण्यासाठी तालीबानशी समेट आवश्यक आहे असा सूर सध्या ऐकू येतो. पण अफगाणी स्त्रियांना काळजी लागली आहे कीं घाईघाईत समेट करताना त्यांच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये. पण तसे होण्याची दाट शक्यता आहे कारण तालीबानला नक्कीच सनातनी पठडीतील-विशेषत: स्त्रियांच्याबाबतीत-अफगाणिस्तान हवा असेल. समेट करताना वास्तवाचे भान ठेवावेच लागेल. पण पुरुषांच्या बरोबरीने चालायलासुद्धा अफगाणिस्तानी बायकांना १०-१५ वर्षें लागतील असे सुधारक प्रवृत्तीच्या स्त्रियांना वाटते, पण ते झाल्यास सर्व अफगाणिस्तानला फायदा होईल अशीही त्यांची खात्री आहे. कारण अफगाणिस्तानी स्त्रियांच्या हक्कांत पुरुषांचाही फायदा आहे कारण मग सार्‍या देशाचीच प्रगती होईल असे त्यांना वाटते. आणि स्त्रियांना हक्क जर मिळाले नाहींत तर देश पुन्हा सनातन्यांच्या हातात जाईल व जुने प्रश्न पुन्हा उभे रहातील असेही त्यांना वाटते.
या अंकावरचे चित्रच इतके भयंकर आहे कीं भारतीय लोकांचा तर विश्वासच बसणार नाहीं व त्यांना घृणा येईल. 'टाईम'ला आयेशाच्य सुरक्षिततेचीही काळजी होती. पण आयेशा धैर्याने फोटोसाठी पुढे आली कारण तिला हे दुष्कृत्य सार्‍या जगाने पहावे असे वाटले. आयेशावर आता अमेरिकेत ग्रॉसमन बर्न धर्मादायी संघटनेतर्फे प्लास्टिक सर्जरी होणार असून तिचा चेहरा पूर्ववत् होईल अशी आशा आहे.
हे चित्र मुखपृष्ठावर छापावे कीं नाहीं याबद्दल 'टाईम'च्या संपादकांनी खूप विचार केला. मुलांच्या मानसोपचारतज्ञांचेही मत विचारले. कांहींनी सांगितले कीं आजकाल मुले वृत्तपत्रात व चित्रवाणीवर अशी भयंकर दृश्ये पहातातच त्यामुळे ती मुले असली चित्रें पाहू शकतील. तर कांहींना वाटले की त्यांच्या बालमनावर ताण पडेल. मग संपादकांनी ते चित्र स्वत:च्या ९ आणि १२ वर्षाच्या मुलांना दाखविले. त्या दोघांना खूप दु:ख झाले व अशी क्रूर कृत्ये माणसे कशी काय करू शकतात असा प्रश्न त्यांनी विचारला.
पण या जगात दुष्ट कृत्ये होतच असतात व त्यांना सामोरे जाणे भाग आहे. हे चित्र अफगाणिस्तानात काय होत आहे हे दाखविणारी खिडकीच आहे. टाईमच्या संपादकांनी शेवटी अशा क्रूर कृत्यांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा हे चित्र मुखपृष्ठावर टाकून वाचकांना धैर्याने तोड द्यायचे ठरविले. त्यांना सत्य परिस्थिती सांगून अमेरिकेने आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांनी काय करावे याबद्दल वाचकांनी निर्णय घ्यावा असे त्यांना वाटले.
टाईमचे संपादक शेवटी म्हणतात कीं त्यांनी अमेरिकेच्या युद्धाचे समर्थन करायला किंवा त्याला विरोध करायला हे चित्र टाकले नाहीं. फक्त तिथे काय चालले आहे हे सांगण्यासाठी हे केले आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी आणि तिची कायदेमंडळे याबाबत निर्णय घ्यायला बसतील तेंव्हां त्यांच्यापुढे परराष्ट्रसंबंधाचे वेगवेगळे पैलू दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
उपयुक्त दुवे:
http://www.time.com/time/world/article/0,8599,2007238,00.html
http://www.time.com/time/world/article/0,8599,2007269,00.html
http://www.time.com/time/world/article/0,8599,2007238,00.html#comments

काय निष्ठूरपणा आहे हा. >या

1

Sad

काय निष्ठूरपणा आहे हा.

>या अंकावरचे चित्रच इतके भयंकर आहे कीं भारतीय लोकांचा तर विश्वासच बसणार नाहीं व त्यांना घृणा येईल.

ह्या वाक्याचा संदर्भ नाही समजला.

>> 'टाईम'ला आयेशाच्य सुरक्षिततेचीही काळजी होती. पण आयेशा धैर्याने फोटोसाठी पुढे आली कारण तिला हे दुष्कृत्य सार्‍या जगाने पहावे असे वाटले.

ज्या अवस्थेतून ती बाहेर पडली आहे त्यानंतर तिने दाखवलेल्या ह्या धाडसाचे कौतुक वाटते

>>आयेशावर आता अमेरिकेत ग्रॉसमन बर्न धर्मादायी संघटनेतर्फे प्लास्टिक सर्जरी होणार असून तिचा चेहरा पूर्ववत् होईल अशी आशा आहे.

ही चांगली गोष्ट आहे. तिला सुखा समाधानाने जगण्याचा हक्क आहेच.

>>टाईमचे संपादक शेवटी म्हणतात कीं त्यांनी अमेरिकेच्या युद्धाचे समर्थन करायला किंवा त्याला विरोध करायला हे चित्र टाकले नाहीं. फक्त तिथे काय चालले आहे हे सांगण्यासाठी हे केले आहे.

+ १

**

तालिबान बरोबर अफगान सरकारचा समजोता ????
बाप रे ! म्हणजे उद्या अलकायदा व अमेरिकापण एकत्र होतीलच !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अमेरिकेचा काय भरवसा?

2

या अंकावरचे चित्रच इतके भयंकर आहे कीं भारतीय लोकांचा तर विश्वासच बसणार नाहीं व त्यांना घृणा येईल.
म्हणजे आपल्याकडील स्त्री-स्वातंत्र्याची संवय असलेल्या भारतीयांना असे कुणी करू शकेल याच्यावर विश्वासच. बसणार नाहीं आणि ज्यांनी हे क्रूर कृत्य केले त्याच्याबद्दल तीव्र तिरस्कार (घृणा) वाटेल.
तालिबान बरोबर अफगान सरकारचा समजोता ???? बाप रे ! म्हणजे उद्या अलकायदा व अमेरिकापण एकत्र होतीलच!
हाहाहा! अमेरिकेचा काय भरवसा? "परराष्ट्रनीतीत कधीच कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात. फक्त कायमचे हितसंबंध असतात" अशी म्हण आहे तिची आठवण झाली.
आणि करझाईंचा काय भरवसा? "कुर्सीके लिये कुछभी करेगा!"


सुधीर काळे
------------------------

हा हा

3

म्हणजे आपल्याकडील स्त्री-स्वातंत्र्याची संवय असलेल्या भारतीयांना...
रागावू नका काका, पण हे वाक्य वाचून पोट धरून हसलो. सुबुद्ध नि समाजातील बुद्धिमंत म्हणवणार्‍या जालावरील मंडळीत याबद्दल कशी मते आहेत ते वाचतोय आपण (आणि ओठात एक पोटात एक वाले पुरोगामी तर मोजतच नाहीये मी) असे असता हे विधान भलतेच धाडसाचे आहे.

'तुलनेने' स्वतंत्र असा शब्दप्रयोग अधिक समर्पक होईल कदाचित.
खरेतर हे जरा अ‍ॅपल्स अँड ऑरेंजेस सारखे होते आहे. अमेरिकन प्रॉपगंडा आणि आपले वास्तव अशी तुलना करतोय आपण. कल्पना करा उद्या भारत - अमेरिकेत वितुष्ट आले तर याहून भयानक स्टोरीज भारताबद्दलही येऊ शकतात. सध्या नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी सारख्या खाजगी चॅनेलवर भारताबद्दल जे कार्यक्रम दाखवतात ते बघा. अतिशय पद्धतशीरपणे आणि बेमालूमपणे प्रॉपगंडा चालू आहे. इंडिय विद रॉबिन xyz(नाव नक्की आठवत नाही) नावाचा एक कार्यक्रम काही काळापूर्वी पाहिला होता (अजून चालू असेल कदाचित). हे महाराज भारतभर फिरून तथाकथित भारताचे दर्शन घडवत होते. हास्यास्पद ठरतील वा पाश्चात्त्यांची भ्रष्ट नक्कल ठरतील अशाच गोष्टी निवडून दाखवणे चालू होते नि शेवटी या महाराजांची अप्रत्यक्ष पण कुत्सित टीका असेच. न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट हे खरेच किती 'स्वतंत्र' आहेत हे एखाद्या जुन्या जाणत्या अमेरिकनाला विचारा.
अमेरिकेच्या दृष्टीने हिरो असलेला सद्दाम डोईजड होताच अचानक लोकांना त्याच्या कृष्ण्कृत्यांचा साक्षात्कार झाला नि भरभरून त्यावर लेख/तथाकथित संशोधन येऊ लागले ही गोष्ट जुनी नाही. तसेच लिबियाच्या गड्डाफीच्या पोराने अमेरिकेशी जुळवून घेताच अमेरिकेतील बातम्यातून गड्डाफी गायब झाला.

हाहाहा! अमेरिकेचा काय भरवसा?
एवढेच खरे. शेवटी राजकारण नि आपल्या देशाचे हित हे महत्त्वाचे. इथे करझाई जाण्याच्या मार्गावर आहेत इतकाच याचा अर्थ.

"पापी पेटका सवाल!"

4

रमताराम-जी,
न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनला कशाला जाताय? इथे भारतात, इंग्लिशच काय मराठी वृत्तपत्रांतसुद्धा मालकालाच फक्त भाषणस्वातंत्र्य (हवे) असते, वार्ताहारांना तो थोडेच देतो?
'सामना'त शिवसेनेविरोधी सत्य बातमी छापून येईल?
'सकाळ'मध्ये पवारसाहेबांच्या विरुद्धची सत्य बातमी चापून येईल?
स्वातंत्र्य हे फक्त मालक मंडळीना हवे असते, वार्ताहारांना हवे असते पण मिळत नाहीं. कारण?
"पापी पेटका सवाल!"


सुधीर काळे
------------------------

१०० % सहमत

5

"सध्या नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी सारख्या खाजगी चॅनेलवर भारताबद्दल जे कार्यक्रम दाखवतात ते बघा. अतिशय पद्धतशीरपणे आणि बेमालूमपणे प्रॉपगंडा चालू आहे."

मला वाटल मी एकटाच आहे अस वाटणारा.

असो, हा पाचकळ प्रकार चे गुवेरा, LTTE (विवाद्य असल तरी) अश्या इतर देशातल्या लोकांविषयी देखील चालू आहे.

प्रसारमाध्यमांचाच विषय चालू आहे म्हणून, NGC वर Jailed Abroad नावाचा एक कार्यक्रम लागतो, त्यात परदेशात तुरुंगात अडकलेल्या लोकांविषयीची बरीचशी माहीती दाखवली जाते, त्यात तो सुरु झाल्यास आजपर्यंत एकदाही अमेरिका किंवा युरोपात अडकलेल्या व्यक्तीचा अंतर्भाव नव्हता.

प्राणी आणि तंत्रज्ञान वगळता बाकी गोष्टींवर भरोसा नाही.

(छ्या, मी फारच टी.व्ही पाहतो)


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

>>सध्या नॅशनल जिओग्राफिक,

6

>>सध्या नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी सारख्या खाजगी चॅनेलवर भारताबद्दल जे कार्यक्रम दाखवतात ते बघा. अतिशय पद्धतशीरपणे आणि बेमालूमपणे प्रॉपगंडा चालू आहे.

+ १

माझे ही असेच काहीसे मत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ररांशी बाडिस. अमेरिकेचा काही

7

ररांशी बाडिस.

अमेरिकेचा काही भरवसा नाही, मि स्वत: इराणला गेलो तेव्हा हा असला प्रोपॅगेंडा कानावर असल्यामुळे खुप घाबरलो होतो. पण तिथे गेल्यावर खरी परिस्थीती लक्षात आली. त्यामुळे आता जरा सावध असतो.

>>एवढेच खरे. शेवटी राजकारण नि आपल्या देशाचे हित हे महत्त्वाचे. इथे करझाई जाण्याच्या मार्गावर आहेत इतकाच याचा अर्थ.

अगदी बरोबर,
"सर्प विखारी मातृभुमीचा ये घेउ चावा,
अवचीत गाठुनी भुलवुनी ठकवुनी कसाही ठेचावा" - तात्याराव.

तर ते एक असो काळेसाहेब, पण तुम्ही जे समोर आणलय ते निर्घृण तर आहेच, पण त्या प्रकाराचं निर्लज्ज समर्थन काही मंडळी करताना मी स्वतः ऐकलियेत, ते भिकेची डोहाळे जास्त धडकी भरवणारे आहेत.

अवांतर - खाप पंचायतीची मागणी वाचल्याचं आठवतय काही दिवसांपुर्वी, की स्त्र्रीयांनी घुंघट घ्यायला हवा म्हणुन.

माझी तक्रार असते जर फक्त तेच दाखवू लागले तर.

8

मी अमेरिकन माणसांबद्दल कांहींच लिहिले नाहींय्.
मी एक फोटो टाकलाय् आणि तो फोटो सारे बोलून जातो.
आपल्याकडे सतीची प्रथा होती ती आपण काढविली.
आपल्याकडे एकाहून जास्त लग्ने करायला कायद्याची आडकाठी नव्हती, ती आणली.
आपल्याकडे बाईला वारसाहक्कने कांहीं मिळायचे नाहीं. आज बरोबरीने मिळते.
भाडेकरू कायदा (जरा अतिरेक झाला असेल), कूळ कायदा, कसेल त्याची जमीन हे सारे कायदे क्रांतिकारक आहेत. संवयीमुळे आपल्याला त्यांची थोरवी कळत नाहीं.
स्त्री-स्वातंत्र्य आहेच आपल्याकडे.
कुणी भारताबद्दल वाईट गोष्टी दाखवतो ते आपल्याला आवडत नाहीं पण बर्‍याचदा ते खरे असते. अगदी Slumdog Millionaire सुद्धा!
माझी तक्रार असते जर फक्त तेच दाखवू लागले तर.


सुधीर काळे
------------------------

>>कुणी भारताबद्दल वाईट गोष्टी

9

>>कुणी भारताबद्दल वाईट गोष्टी दाखवतो ते आपल्याला आवडत नाहीं पण बर्‍याचदा ते खरे असते. अगदी Slumdog Millionaire सुद्धा!
माझी तक्रार असते जर फक्त तेच दाखवू लागले तर.

अगदी हेच म्हणतो..

>>माझी तक्रार असते जर फक्त

10

>>माझी तक्रार असते जर फक्त तेच दाखवू लागले तर.

अहो तेच ते करत आहेत Sad
त्यांचा हेतु तोच दिसतो आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझ्या तरी पहाण्यात नाहीं

11

माझ्या तरी पहाण्यात नाहीं. कदाचित् मी नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी हे चॅनेल्स बघत नाहीं म्हणून असेल. पण CNN, BBC, Al Jazeera, Fox वगैरेवर तरी असा प्रतिकूल प्रसार दिसत नाहीं आणि मी साधारणपणे हेच चॅनेल्स पहातो.


सुधीर काळे
------------------------

आमच्या एका मित्राची आठवण

12

आमच्या एका मित्राची आठवण झाली, तो पण BBC सोडुन काहीच बघत नाही, आज पिक्चर कुठले लागले विचारलं तरी BBC वर बघतो, आणि नंतर माझ्यावरच वैतागतो.

असो, अवांतर प्रतिसाद ह. घ्यालच

बाकी वाहिन्यांच माहीत नाही पण NGC आणि Discvery ह्यावर काही अपप्रचार जाणवला नाही.

स्टार प्लस झी वगैरे चॅनलवरच्या मालिका

13

तसे नाहीं. एरवी स्टार प्लस झी वगैरे चॅनलवरच्या मालिका सौ. पहात असते!


सुधीर काळे
------------------------

हम्म

14

हम्म

वाचुन अंगावर काटा आला !!!

15

वाचुन अंगावर काटा आला !!! रानटी लोक आहेत.


मदनबाण.....

I also felt the same way.....

16

You said it! I also felt the same way.....


सुधीर काळे
------------------------

रुपयाच्या 'नव्या रूपा'तल्या नव्या नोटा आल्या कां?

17

मदनबाण-जी,
रुपयाच्या 'नव्या रूपा'तल्या नव्या नोटा आल्या कां?


सुधीर काळे
------------------------

रुपयाच्या 'नव्या रूपा'तल्या

18

रुपयाच्या 'नव्या रूपा'तल्या नव्या नोटा आल्या कां?
नाही, अजुन नाही आल्यात... पण न्यूज चॅनलवर रुपयाचा हा सिम्बॉल दाखवण्यात येत आहे. जिथे जिथे आधी Rs.होते तिथे हा सिम्बॉल आणला आहे.
आणि याचा अधिक प्रसार होण्यासाठीच हे चिन्ह मी वापरत आहे... हास्य


मदनबाण.....

"अमेरीकन" किंवा "तालिबानी"

19

"अमेरीकन" किंवा "तालिबानी" ध्येय धोरणांविषयी सर्वांनी जागरुक असावयास हवे. त्याचे कारण ते आता त्यांना आपल्या साधन संपत्ती ची तितकीशी आवश्यकता नाही. गरज आहे, ती मनुष्यबळाची आणी "बोध्दीक संपदेची". आयेशा ही दुर्दैवी आहे. यात सशंय नाही.. आपल्या देशात "महात्मा फुलेंचे विचार" आजही त्यासाठीच प्रेरणादायी ठरतात. नाहीतर.. केशवपन हा आपला विद्रुप करण्याचाच प्रकार नव्ह्ता काय? यासाठी विचार परिवर्तन आणी जनजाग्र्ती आणी कायद्याचा बड्गा हाच उपाय आहे. ह्ळ्ह्ळण्यापेक्षा यावर आदोंल्न झाले पाहीजे.