सबला
ती एक गृहिणी. मुंबईतल्या टाटा स्वदेशी मिलमधे कामगाराची बायको. अठरा विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या घरापलीकडे जग असते याची जाणीवच नसलेली. पण २००१ मधे मिल बंद पडली अन तिचा नवर्याच्या नशीबी इतर हजारो मिलवर्कर्स प्रमाणेच बेकार झाला. कुणाचीही कंबर खचुन जावी अशीच सगळी परिस्थिती. पण ती नाही खचली. ती नवर्याला घेऊन मुंबईहुन पुण्याला आली अन खानावळ सुरु केली. खानावळ काही चालली नाही पण तिनं हार नाही मानली. एका नातेवाईकाच्या मदतीनं तिनं व्यवसाय सुरु केला. व्यवसायही चाकोरीबाहेरचा - पोलिस कोठडीतल्या कैद्यांना नाष्टा अन जेवण पुरवण्याचा. त्यातुनच निर्माण झाला उत्पन्नस्त्रोत - तिच्यासाठी, तिच्या नवर्यासाठी अन तिच्या नातेवाईकांसाठी.
ही कथा आहे एक्कावन वर्षाच्या शोभा कोंढाळकर या सबलेच्या जीवन संघर्षाची. या संघर्षात तिने बरेच आघात सोसलेत पण ती यशस्वी झाली आहे टिकुन रहाण्यात. शोभाची फर्म लॉकअप मधल्या कैद्यांना प्रतिबंदी प्रतिदिवशी २५ रुपये या दराने २००४ पासुन रोजचा नाष्टा अन जेवण पुरवते.या कामात पुण्यात तिची मोनॉपली आहे.
शोभा म्हणजे शोभा एंटरप्राईझेस या छोट्या फर्मची मालकीण. चाळीस लाख लोकसंख्येच्या पुण्यातली एक अतिसामान्य महिला. १०५, न.ता.वाडी हा तिचा अन तिच्या फर्मचा पत्ता. हा शोधणे तसे अवघडच कारण तिचे घर आहे न.ता. वाडीच्या सबवेलगतच्या झोपडपट्टीतली दहा फूट लांब अन दहा फुट रुंद खोली. समोरच्या आठ फूट लांब अन पाच फूट रुंद अश्या मोकळ्या पडवीला पत्रा मारुन आडोसा करुन थोडी वाढवलेली. तिथेच ती रोज १००-१२५ कैद्यांचा स्वयंपाक करते. शेजारी रहाणार्या लोकांना ती शोभा स्वयंपाकीण म्हणुनच माहिती आहे पण तो स्वयंपाक कुठे जातो हे कुणालाच माहिती नाही. सगळे शेजारी पण अस्तित्वासाठी झगडणारे, कोण कुणाची विचारपुस करतो?
"या उद्योगात बराच रामरगाडा आहे. तो मी पुतण्या संतोष अन पुतणी अपेक्षाच्या मदतीने सांभाळते. रोज माझा दिवस पहाटे चार वाजता सुरु होतो. माझा नवरा सदाशिव त्याआधीच दोन्-तीन तास उठुन कामाला लागलेला असतो. मध्यरात्रीनंतर थोड्या वेळाने तो उठुन मार्केट यार्डात जातो अन घाऊक बाजारातुन भाज्या आणतो. तो घरी आला की माझे अन अपेक्षाचे काम सुरु होते. सकाळी आठ वाजेपर्यंत कैद्यांचा नाष्टा, दुपारचे जेवण असा सगळा स्वयंपाक आम्ही संपवतो. त्यानंतर लगेचच आम्ही डबे भरतो अन ते पोहोचवायला मी अन संतोष निघतो," शोभा सांगते.
डबे पोहोचवण्याचे काम मात्र अगदी चाकोरीबद्ध पद्धतीने चालते. "रोज मी भोसरी, पिंपरी, निगडी आणि खडकी पोलिस ठाण्यांतल्या लॉकअपमधल्या कैद्यांसाठी डबे नेते तर इतर पोलिस ठाण्यांमधे संतोष जातो. मी बसने प्रवास करते तर संतोष सायकलवर डबे नेतो.सगळ्या लॉकअपमधे डबे पोहोचवुन परतायला आम्हाला एक वाजुन जातो. त्यानंतर घरातल्या लोकांसाठी स्वयंपाक करायचा अन जेवण. जेवणानंतर अर्धा तास विश्रांती घेतली की परत रात्रीच्या डब्यांसाठी स्वयंपाक अन ते डबे पोहोचवणे. परत घरी येऊन झोपायला रोज अकरा वाजतात," शोभा तिच्या कामाची पद्धत समजावते.
कैद्यांचा आहार पोलिस मॅन्युअलनुसार असतो. नियमानुसार प्रत्येक भारतीय कैद्याला एका वेळच्या जेवणात ७५० ग्रॅम वजन भरेल एव्हढ्या चपात्या, १५० ग्रॅम डाळ आणि २०० ग्रॅम भाजी मिळते. मांसाहारी कैद्यांना आठवड्यातुन एकदा १५० ग्रॅम मटन मिळते. तीन वर्षापेक्षा कमी वयाची मुले असलेल्या महिला कैद्यांना ५० टक्के जादा आहार असतो तर आजारी कैद्यांना गरजेनुसार जेवणाऐवजी दिवसाला एक लीटर दुध देतात. स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन अश्या राष्ट्रीय सणांना त्याशिवाय एक शिरा, सोजी अशी स्वीट डिश मिळते. सकाळचे जेवण ९-१० या वेळात दिले जाते तर रात्रीचे जेवण संध्याकाळी ५-६ या वेळात होते. त्याखेरीज सकाळी सात अन दुपारी तीन वाजता चहा नाष्टा असतो. बहुधा नाष्टा म्हणजे पावभाजीचा पाव असतो, तो चहात बुडवुन खायचा. शोभा प्रत्येक कैद्याला जेवणात चार चपात्या, एक वाटी डाळ अन थोडी भाजी देते. जर एखाद्या कैद्याला वैद्यकीय कारणांनी पोळी खाणे शक्यच नसेल तर त्याला भात पोहोचवला जातो.
हा व्यवसाय कसा सुरु झाला हे सांगताना शोभा म्हणते, "२००१ मधे टाटा स्वदेशी मिल बंद पडली अन माझ्या नवर्याची नोकरी गेली. पुढे सगळाच अंधार होता. मग आम्ही पुण्याला आलो अन बचतीतले पैसे वापरुन बिबवेवाडीला खानावळ सुरु केली. पण त्या धंद्यात मी मार खाल्ला. जवळपास चार लाखाचं कर्ज झालं अन दिवाळं निघालं. कर्ज फेडण्यात सगळे पैसे गेले. मग २००४ मधे माझ्या नणंदेच्या नवर्यानं कुठंतरी पेपरमधे निविदा सूचना बघितली, लॉकअप मधल्या कैद्यांना जेवण नाष्टा पुरवण्याची. त्यानं मला ती दाखवली अन मी निविदा भरली. तेव्हापासुन दरवर्षी मला हे कंत्राट मिळु लागले."
पण पोलिसांबाबत बरेच लोकापवाद असतात. त्यांच्याबरोबर वागण्या-बोलण्यात शोभाला अडचणी येत नाहीत? शोभा सांगते, "सुरुवातीला सगळे नातेवाईक पण मी हा व्यवसाय करण्याच्या विरोधात होते. मी बाई माणुस, कश्याला पोलिसांशी संबंध ठेवायचा असे सगळ्यांचे मत होते. पण माझी पण मजबुरी होती. शेवटी जगायला पैसे तर मिळवायचे होते. तसा अजुन मला कुणाचा वाईट अनुभव आलेला नाही. पण २००४-०५ मधे मात्र एकदा दफ्तरदिरंगाईचा फटका बसला. एक वर्षभर माझे पैसेच मिळाले नाहीत. भागवताना नाकी नऊ आले. हे काम सुरु करताना मी तीन गरजु बायकांना पगारावर घेतले होते. त्यांचे पगार देणे तर शक्यच नव्हते. मग त्यांना काढुन टाकले अन सगळं काम घरच्या घरीच सुरु केलं.सरकारकडुन आज ना उद्या पैसे मिळतील हा भरवसा होता पण पोट कसं भरायचं हा प्रश्न ही होता. मग शेवटी मी काही कॅन्टीन अन खानावळींमधे पोळ्या लाटायला सुरु केलं. त्यातुन खर्चापुरते पैसे मिळवले अन घर चालवलं."
शोभा म्हणते तिची मोठी अडचण म्हणजे रोज किती कैद्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे हा नक्की आकडा तिला माहिती नसतो. "बहुधा मी सकाळी किती लोकांचे जेवण केले त्यावरुन संध्याकाळच्या जेवणाचा अंदाज बांधते. बहुतेकदा दिवसाला १००-१२५ माणसे लॉकअप मधे असतात. पण कधी कधी हा आकडा एकदम ७०-८० एव्हढा कमी होतो. अश्या वेळेस शिजवलेले अन्न तर वाया जातेच पण माझे आर्थिक नुकसान पण होते," ती सांगते.
पण अवघ्या २५ रुपयात दोन वेळचे जेवण पुरवणे तिला कसे शक्य होते? शोभा प्रामाणिकपणे सांगते, "सगळी खरेदी घाऊक बाजारातच केल्याने थोडे पैसे वाचतात. शिवाय मी घरातल्या लोकांच्याच मदतीने व्यवसाय करत असल्यानं पगार द्यावा लागत नाही. पण तरीपण सरकारी दर खूपच कमी आहेत. त्यात भागवायचं तर शेवटी जेवणाच्या गुणवत्तेकडे अन प्रतिकडे दुर्लक्ष करावेच लागते."
.jpg)
वा!!! मस्त
वा!!! मस्त ओळख करुन दिलीत शोभाची...
असे अनेक स्वःताच्या पायावर उभे राहाणारे लोक दुर्लक्षित राहताता...
त्यात कैद्यांना डब्बे पोहचवणे म्हणजे वेगळाच व्यवसाय.
-निखिल
हम्म्म
वाचून वाईट वाटले. बाईंवर संकटांमागून संकटे येत आहेत.
शोभाबाईंनी बाहेरच्या जेवणावळींच्या पोळ्यांच्या आणि भाजीच्या ऑर्डरी घेतल्या तरी ४ पैसे जास्त मिळतील असे वाटते.
-पुण्याचे पेशवे
जिद्द
शोभाताईंबद्दल जेवढं वाईट वाटलं तेवढाच त्यांच्याबद्दल आदरही वाटला. जिद्द यालाच म्हणतात.
असेच
असेच म्हणतो... जिद्द यालाच म्हणतात.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सहमत
आहे. शोभाताईंच्या जिद्दीला सलाम!
(छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व, पण '७५० ग्रॅम वजन भरेल एव्हढ्या चपात्या' च्या ऐवजी ७५ ग्रॅ. असावे बहुतेक.)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जिद्द
बाई मोठी जिद्दीची दिसते. त्यांना आमच्यकडून शुभेच्छा द्या. सध्यातरी एवढेच करू शकतो.
@ पुपे : सहमत. बाईंनी धंदा वाढवण्याच्या दृष्टीने विचार जरूर करावा.
पुपे अन बिपिनदा
जे सुचवताहेत ते एव्हढे सोपं नाहीये. मी शोभा अन तिच्या कुटुंबाचा दिनक्रम दिलाच आहे. अजुन कामं करायला जो वेळ/ स्टॅमिना लागतो तो या रामरगाड्यातुन मिळवणं खूप अवघड आहे. त्यावर दुसरा मार्ग आहे तो मनुष्यबळ वाढवणे हा. पण त्यासाठी पैसे लागतात ते कुठुन आणणार?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
पुणेरी, उत्
पुणेरी,
उत्तम परिचय
त्यांनी जर पंतप्रधान बेरोजगार निधी सारख्या एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेतला तर? (अर्थात त्यांना त्या विविक्षित योजनेची संधी मिळु शकत असेल तर)
>>त्यांनी जर पंतप्रधान
>>त्यांनी जर पंतप्रधान बेरोजगार निधी सारख्या एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेतला तर?
सहमत आहे.
पण अश्या योजना गरिबांपर्यंत पोहचतात का ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
झोप उडते
हे कष्ट पाहिले की झोप उडते. ही मंडळी रात्री अकरा ते पहाटे चार असे पाच तासच झोपतात. कष्ट मात्र अफाट. चांगला परिचय.
छान माहीती.
छान माहीती.
शोभाताईंना सलाम!!
शोभाताईंना सलाम!!
शोभाताईंच्या जिद्दीला सलाम!
शोभाताईंच्या जिद्दीला सलाम!
शोभाताईंना सलाम!!
शोभाताईंना सलाम!!
शोभाताईंच्या जिद्दीला सलाम
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन