है दुनिया उसीकी...
प्रेमभंगाच्या दुःखाने आणि प्रियतमेच्या विरहाने व्याकूळ अशा अवस्थेत त्या कातर संध्याकाळी, मदिरेच्या प्याल्यामध्ये स्वतःचं नैराश्य लपविताना आयुष्याच्या सार्थकतेविषयी आणि प्रेमाच्या महतीविषयी एक सच्चा प्रेमी काय मोलाचं सांगून गेलाय पाहा...
बरबाद होना जिसकी अदा हो
दर्दे मुहब्बत जिसकी दवा हो
सतायेगा क्या गम, उसे जिंदगीका
मुहब्बत में जो, हो गया हो किसीका
है दुनिया उसीकी, जमाना उसीका
मुहब्बत में जो, हो गया हो किसीका...
क्या बात है ! क्या अंदाज-ए-बयॉं है!
काही गाणी, काही प्रसंग, काही चित्रचौकटी आपल्या भावविश्वात असं काही घर करून बसतात, की पाहता पाहता आपल्या व्यक्तिगत आयुष्याचा, अविस्मरणीय आठवणींचा, आपल्या सुखदुःखांचा त्या अविभाज्य भाग होऊन जातात.
त्यांच्याच साथीने आणि साक्षीने आयुष्यातल्या कडूगोड प्रसंगांना आपण सामोरे जात असतो.
चित्रपटगीतांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि त्याच्या सुरेल विश्वामध्ये स्वतःला विसरून जाणाऱ्या तुम्हा-आम्हा गाणेवेड्या रसिकांच्या लेखी या गाण्यांना जन्म देणारे, आपल्या थक्क करणाऱ्या प्रतिभेने त्यांच्यात अद्भुत रंग भरणारे हे अवलिया कलाकार म्हणजे देवच जणू!

"कश्मीर की कली'मधील या गाण्याचेच पाहा. जवळपास फक्त ओ.पी.कडेच गाणी लिहिणारा एस.एच. बिहारी किती मोजक्या शब्दांमध्ये किती भारी सांगून गेलाय. झिंग आणणारी गाणी देणाऱ्या ऱ्हिदमकिंग ओ.पी. नय्यरने किती हटके गाणे दिलेय. आणि ते देताना दुःखाची पण काय नशा असते, अशी भन्नाट चाल दिलीय. या दोघांच्याही भावना अगदी नेमकेपणाने रफीसाहेबांनी दिल से व्यक्त केल्यात. या तिघांची ही अशी भट्टी जमल्यावर शम्मीने आपल्या अदाकारीने गाण्याला "चार चॉंद लावलेत...' आणि मित्रांनो, हे सगळे कमी पडतेय की काय, म्हणून त्यातल्या बेधुंद करणाऱ्या सॅक्सोफोनने या गाण्याला अक्षरशः "सातवे आसमानपर' नेऊन ठेवलेय.... सुभानअल्ला !!
आपल्या "मनोहारी' वादनाने या गाण्यात नशा निर्माण करणाऱ्या या वादकाचे नाव मनोहारीसिंग. आपल्या अनोख्या वादनशैलीने अनेक गाण्यांमध्ये अद्भुत किमया करणारा अवलिया कलावंत! एस.डी., आर.डी.च्या ऑर्केस्ट्रामधील ब्रास सेक्शनचा राजाच!

ब्रास सेक्शनमधील सॅक्सोफोन, ट्रम्पेट, हॉर्न, म्यूट, ट्रम्बोन, टेनर सॅक्स, सुप्रानो सॅक्स अशी विविध वाद्ये, क्लॅरोनेट, एबोनेट याशिवाय सिल्व्हर फ्लूट, बासरी या साऱ्या वाद्यांवर प्रभुत्व असणाऱ्या मनोहारीदादांनी सलीलदा, ओ.पी., एस.जें.पासून एल.पीं.पर्यंत अनेक संगीतकारांची गाणी आपल्या वादनाने खुलवली.
अगदी हृदयापासून येणारा स्वर, हे दादांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच एखादे अप्रतिम गाणे हे जेवढे गीतकार, संगीतकार, गायक आणि वादक यांच्या नावाने ओळखले जाते, तेवढेच ते दादांच्या वादनामुळेही ओळखले जाते. जा रे उड जा रे पंछी (माया) आणि तेरे मेरे सपने (गाईड) या गाण्यांमध्ये ऐका, सॅक्सोफोन कसा गाण्याला लपेटून गेलाय...
ओ.पीं.च्या गाण्यामध्येसुद्धा सुरवातीपासूनच सॅक्सोफोनचे सूर वातावरण भारून टाकतात. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ध्रुवपदाची चाल पूर्ण गाण्यात म्युझिक पीस म्हणून वापरली आहे. पूर्ण गाणंभर सगळ्या नोट्स सारख्या वाजवताना दादांनी गाण्याची एक्झिट घेताना "गया हो किसीका,' या ओळीवर जे काही वाजवलंय... ती फक्त अनुभूतीचीच गोष्ट आहे.
आयुष्यभर आपलं म्युझिक पॅशन दादांनी जपले. आयुष्याच्या उत्तरार्धात डायलिसिसच्या जीवघेण्या वेदनेचा सामना करण्याचे आणि तरीही तितक्याच उत्कटतेने सॅक्सोफोन वाजवण्याचे बळ त्यांना याच पॅशनने दिले. मुंबईत सकाळी डायलिसिस करून संध्याकाळी पुण्यात माझ्या कार्यक्रमाला सॅक्सोफोन वाजविण्यासाठी दादा हजर झाले, तेव्हा माझ्या आयुष्याचेच सार्थक झाल्यासारखे वाटले...
13 जुलैला दादा आपल्याला सोडून गेले. चित्रपट संगीतातला सॅक्सोफोन संपला. "ब्रास'च्या राजाला मानाचा मुजरा...
- चंद्रशेखर महामुनी
सकाळ-सप्तरंग(जीवनगाणे)
.jpg)
व्वाह क्या बात है..!!
व्वाह क्या बात है..!!
>>"ब्रास'च्या राजाला मानाचा मुजरा...
वाईट या गोष्टीचं वाटतं की
वाईट या गोष्टीचं वाटतं की गाणं खुलवणार्या या कलाकाराच्या निधनाची बातमी आली ती आतल्या पानावर एका कोपर्यात.
अशा कलाकाराची आठवण जागी केल्याबद्दल चंद्रशेखरजी तुमचे शतशः आभार
असेच म्हणतो.
असेच म्हणतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मनातले बोललात
विवेक मोडक साहेब.....मनातले बोललात
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
छान लेख
आवडला.
आभार..!
मित्रानो..!
सर्वांचे मनापासून आभार..!
दादांच्या निधनाची बातमी खूप छोटी आणि आतल्या पानावर आली..!
पण ठीक आहे जीवनगाणे च्या या सदरा निमित्ताने मनोहारी दादांवर मला
या सुंदर गाण्याच्या निमित्ताने लिहिता आले व सकाळ आणि इ सकाळ च्या माध्यामा ने ते सर्वां समोर आले.