आभा !

0
0

.

आभा !
----------

जखमी पिल्लासारखी
मी माझ्या गुहेच्या
अंधार्‍या कोपर्‍यात
दडून होते !

पिल्लू ?.....
पण ... गुहेत तर
श्वापदं रहातात ना ?

असतील.....
पण माझ्या गुहेत
मीच रहाते......
असेलही कदाचित्‌
एखादं श्वापद रहात....
कधीकाळी......

पण ........
मला आठवतंय तेव्हापासून......
मीच तर मीच आहे इथे.....

आणि....
दडून होते....
जखमी होऊन.....
की पडून होते....??
कुणास ठाऊक.....

उबेचा कवडसा दिसला
की चट्‌दिशी बाहेर येऊन
एक श्वास भरून घ्यायचे....
तुम्हीलोक सिगरेटचा झुरका घेता ना...
अगदी तश्शीच......
श्वासभर ऊब घेऊन.....
आत विसावायचे....

अचानक ऊब निघून गेली की...
अंधार घाव करायचा....
पुन्हा जखमी पिल्लासारखी....

कुणास ठाऊक
किती युगं चाललं होतं हे असं....

मऊशार स्पर्शाने जागले...
तर.......
हे कुणाचे होते मृदुल हात ?
ते स्निग्ध डोळे ???
ती अतीव आपुलकी...???

सैरभैर झाले,
अन्‌ स्वत:तच डोकावले...
उत्तर शोधत......

आणि आतल्या प्रकाशात
दिपून गेले.......

म्हणजे मग....
माझ्यापाशीच तर होतं ना सगळं ???
.......आणि मी शोधलंच नव्हतं....
देवा....मी शोधलंच नव्हतं रे.....!!!

प्रभा.
२४.११.२००८.

.