मृत्यु ठरलेलाच होता !
.
मृत्यु ठरलेलाच होता !
----------------------------------
( फ़ार, फ़ार पूर्वी ऐकलेली ही गोष्ट............
गोष्ट जुनीच, वडिलांनी सांगितलेली, शब्दांकन मात्र माझं !)
..
धूमझोड पाऊस कोसळत होता.....बेफ़ाट वारे सुटले होते...आभाळात वीजांचा कल्लोळ चालू होता.....
एक तूफ़ानी रात्र होती ती......अचानकच सुटलेलं वादळ होतं ते........
गावाबाहेरच्या एका जीर्ण देवळाच्या ओसरीत काही वाटसरू जीव मुठीत धरून उभे होते....परगावाहून परतताना
अचानक वादळात सापडून आसर्याला थांबलेले.....वादळ ओसरेल का, अन् केव्हा अशा चिंतेत पडलेले.....
काही अघटित घडणार हे सतत जाणवत होतं.....आभाळात कल्लोळ मांडणार्या वीजांपैकी एक वीज कडाडत
त्या देवळाच्या कळसापर्यन्त येत होती...अन् सन्तापी थैमान घालत त्याच त्वरेने परत जात होती.....
येत होती.....परतत होती......सुप्त संतापाने लवलवत होती...पुन्हा कडाडत होती.....हादरे बसत होते......
त्या तशा अवस्थेत अखेर उपस्थितांनी एक अंदाज बांधला....." आपल्या पैकी कुणाचा तरी मृत्यु आज वीज पडून ठरलेला आहे, विधिलिखित आहे ते, हे नक्कीच. मात्र इतरांचा मृत्यु आज नसल्याने वीज परत जात आहे. न जाणो, त्या कमनशिब्यामुळे सर्वांचेच जीव धोक्यात आले आहेत....."
हे संकट निवारण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाने पाळी पाळीने समोर देवळाच्या अंगणाच्या टोकाला असलेल्या एकुलत्या एका वृक्षाखाली उभे रहायचे. जेव्हा " तो " मनुष्य झाडाखाली उभा होईल, तेव्हा वीज झाडावर पडेल, आणि विधिलिखित पूर्ण होईल. वादळही शांतवेल, बाकिचे सुखरूप घरी जाऊ शकतील.
अंमलबजावणीला लगेच सुरूवात झाली. जीव मुठीत धरून प्रत्येकजण झाडाखाली जात होता.....वीज कडाडत येत होती....परतत होती......अखेर त्या वाटसरूंच्या गटातील नसलेल्या, पण आडोशाला आलेल्या एका तिर्हाईताची पाळी आली. बिच्चारा....जीव मुठीत धरून तोही झाडाखाली उभा राहिला.......ह्या वेळी वीज एका नव्याच आक्रमक आवेशाने आली........कडाड् कड्.......डोळ्याचं पातं लवण्यापूर्वीच वीज देवळावर कोसळली आणि देवळाच्या जागी दगड धोण्डे, अन् रक्तमांसाच खच पडलेला दिसला......डोळे विस्फ़ारून झाडाखालून "तो" पहातच राहिला !
विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही ? ज्याच्या कमनशिबामुळे आपल्याला धोका आहे असं "ते" समजत होते,
खरं तर त्याच्याच प्रबळ जीवनरेखेमुळे त्यांना क्षणा क्षणाचं जीवनदान मिळत होतं.
असंच होतं जगात. " वेळ " आली की आपल्या भाग्याला माणूस स्वत:च दूर लोटतो......विधिलिखित ललाटे !!
( एक लोककथा )
शब्दांकन : प्रभा.
.jpg)
अद्वितीय आणि अद्भुत
धन्यवाद प्रभाजी इथे हे सुंदर कथानक सांगितल्याबद्दल...
सुहास शिरवळकरांची "अनुभव" कादंबरी म्हणजे हेच कथानक आहे.
सुशिंनी हे कथानक इतक्या ताकदीने फुलवले आहे की कितीही वेळा वाचली तरी कंटाळा नाही येत या कादंबरीचा
मी जेव्हा कधी बोअर होतो तेव्हा (मोस्टली महिना दोन महिन्यांतून एकदा तरी) अनुभव वाचतोच
हे कथानक अद्वितीय आणि अद्भुत आहे यात वादच नाही. पण तुमची सांगण्याची शैलीही सुंदर आहे.
अशाच सुंदर सुंदर गोष्टी अजून लिहा
धन्यवाद
सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
+१
मला पण हेच लिहायच होत
छान बोधप्रद कथा आहे.
छान बोधप्रद कथा आहे.
-पुण्याचे पेशवे
हम्म
बहुधा बौद्ध परंपरेतील असावी.
ज्याच्या कमनशिबामुळे आपल्याला धोका आहे असं "ते" समजत होते
याचा कथेच्या आधीच्या परिच्छेदामधे कुठेही संदर्भ जुळला नाही. टंकताना/लिहिताना राहिले असावे.
मला वाटते यात ते चौघे स्वतःला धर्मनिष्ठ वगैरे समजत असतात नि देव आपल्यावर प्रसन्न आहे असा काहीसा त्यांचा समज असतो. म्हणून तो वाटसरूच पापी असावा असा ठाम समज घेउन त्याला ते तिथून हाकलून देतात. तो ज्याक्षणी देवळातून बाहेर पडतो त्याचक्षणी देवळावर वीज कोसळते.हीच कथा जीएंनी उपकथानक म्हणून वापरली आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ओह. अशा कथा लिहीतात तर मोठे
ओह. अशा कथा लिहीतात तर मोठे मोठे लेखक.
(जीए न वाचलेला जीएप्रेमी)
-पुण्याचे पेशवे
पुपे
'उपकथानक' या शब्दाचा - मराठीच आहे हा - तुम्हाला माहीत असावा अशी आशा आहे, त्याचा उपयोग काय/कसा करतात वगैरे विचारजंती बाजू माहित नसली तरी. जीए न वाचता औपरोधिक शैलीत केलेली त्यांची टवाळी फारशी दखलपात्र नाही (वाचून केली असती तरी सुद्धा नाही) पण मित्र म्हणून खुलासा केला.
(स्पष्ट) रमताराम.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
(विषय दिलेला नाही)
-पुण्याचे पेशवे
विधिलिखित ललाटे !!
विधिलिखित ललाटे !! >>
छोटेखानी कथा आवडली ....बोध घेण्याईतपत !!
सुन्दर..
सुन्दर...