ही नाती कोणती?

0
0

"ओ काकी, लवकर जेवायला वाढा, पुन्हा पळायचय." - माझं नेहमीच ओरडणं.
"अरे ह्या पोळ्या लाटण्यार्‍या बाया लवकर येतच नाहीत. मी तरी काय करु" काकीच ठरलेलं उत्तर.
"मला तुम्ही केलेल्या पोळ्याच आवडतात, अगदी मऊसुत असतात, ह्या बाया नुसत्या कळकट, जळालेल्या कडक पोळ्या करतात" - मी
"थांब, मीच तुला गरमागरम पोळ्या करुन देते बघ फटकन." काकी
"अहो कॉलेज फक्त अर्धा तासच सुटी देत जेवण्यासाठी, त्यात अर्धा किमी पळत यायचं, कसबसं गिळायचं आणी पुन्हा कॉलेजात जायचं, कसं करणार सांगा बरं?" - मी.
अगदी आईवर हक्क गाजवावा तसा आम्ही या आमच्या मेसवाल्या काकीवर गाजवायचो. तरी ही काकी आमच्यावर कधी रागावली नाही की चिडली नाही. काकी मेस चालवायच्या, तशी त्यांना आर्थिक अडचण अशी नव्हती. काका सरकारी ईंशुरंस कंपनी मधे डेवलपमेंट ऑफिसर होते. काका, काकी आणी काकांची आई एवढच काय ते कुटूंब. काकीला आणी आजीला आईसक्रीम जीवापाड प्रिय. दोघींची फ्रीजमधल्या उरलेल्या आईसक्रीमसाठी नेहमी जुंपायची.

काकींना मुलबाळ नव्हते. साधारण चाळीशीच वय, पाच फुट उंची, बारीक अंगकाठी, पण घरकामात अतिशय हुशार आणी चपळ. पहाटे पाच वाजता ह्यांचा दिवस सुरु होई. रात्रीची उरलेली कामे, सासुबाईचं आवरणं कारण त्या आजींना वयामुळे चालता येत नव्हते, एक दोन वेळा घरातच पडुन ऑपरेशन्सही झालेली. त्यामुळे सासुबाईंना पुर्णपणे संभाळण्याची कामगिरी काकींकडे होती, रात्री त्यांना बाथरुमला जायचे असले तरी काकींनाच उठावं लागे. २०-२५ लोकांचा दोन वेळचा स्वयंपाक, शिवणकाम, पापड बनवणे, केटरींगची ऑर्डर घेणे, ईतकी असंख्य कामे करुन ही काकी थकत कशी नाही याचं सर्वांनाच नवल वाटे. पहाटे पाचला सुरु झालेला दिवस रात्री बाराला संपे. तरी काकीच्या चेहर्‍यावर नेहमी प्रसन्न भाव आणी कायम आनंदी.

आम्हा सर्वांवर काकी-काका आणी आजी यांचा खुप जीव होता. सर्व दात पडलेले, क्षीण नजर झालेली आणी एकाच खुर्चीवर बसुन राहणारी पंचाहत्तर वर्षांची आजी सर्वांचे वाढदिवस बरोबर लक्षात ठेवायची आणी प्रत्येकाला वाढदिवसाच्या दिवशी आणी रिझल्ट्च्या दिवशी काहीतरी बक्षिस द्यायची. बर्‍याचदा रात्रीच्या जेवणानंतर आम्ही आजीला तिच्या आवडीची पुस्तके वाचुन दाखवत असु. मग आजी तिने लिहिलेल्या कविता आणी गाणे आठवेल तसं म्हणुन दाखवायची. एखाद्या दिवशी मी आलो नाही तर तिला हुरहुर लागायची, काळजी वाटायची. एकदा आजी न्हाणीघरात पडली, कंबरेचे हाड मोडले, बरेच दिवस हॉस्पिटलमधे होती. त्या अवस्थेत सुद्धा ती माझ्याबद्दल चौकशी करायची. मी सुद्धा आजीला न चुकता भेटायला जायचो. एकदा असाच तिला भेटायला गेलो तर म्हणाली, "तुला परिक्षेत चांगले मार्क मिळाले ना, पण काय करु रे यावेळी तुला बक्षिस द्यायला विसरलेच बघ. हॉस्पिटल मधुन सुटले कि नक्की बक्षिस देईन तुला." मला रडु आवरेनाच, हॉस्पिटलच्या बाहेर येऊन ओक्साबोक्शी रडुन घेतलं.

"आलं, जिरं, खोबरं आणी कोथिंबीर याशिवाय माझी भाजीच होत नाही बघ. आलं, जिरं पाचक आणी उत्साहवर्धक, खोबरं पौष्टीक आणी कोथिंबीर जीवनसत्व देते ना." -- काकी. गोड आंबट, गोड आंबट फोडणीचं गरमागरम वरण. काकी भातावर वरण वाढताना म्हणायची. एखादा पदार्थ मागितला तर दुसर्‍या दिवशी न चुकता ताटात तो पदार्थ हजर असे, तोसुद्धा घरी बनविलेला, मग गुलाबजाम क असेना. स्वच्छ भाज्या, चांगल्या प्रतीचा गहु आणी तांदुळ काकी स्वतः बाजारातुन घेउन यायची. "माझी मुलं आजारी पडली म्हणजे?" असं भाजीवाल्याला दमटावायची. काही मुलं-मुली होती मेसवर जी काकीच्या भोळेपणाचा फायदा घ्यायची. काकीकडुन ५०-१०० रुपये गरज म्हणुन घेउन जायची आणी काकी विसरते असं समजुन परत करायची नाही. जेवणाचे पैसे नेहमी कमी द्यायची. मला हा प्रकार माहित होता, मी एकदा काकीला म्हंटलं "काकी, तुमचा हिशोब चुकतो असं मला वाटतं".- मी
"अरे मी बी.कॉम आहे म्हंटलं, कशी चुकेन?" काकी हसत म्हणाली.
"म्हणजे तसं नाही...."- मी
"मला माहिती आहे तुला काय म्हणायचय ते, ती मुलं आहेत ना, मुलं लहान असताना अशीच वागतात, आता त्यांची आई इथे नाही ना, मग त्यांच्या ह्या चुका कोण पदरात घालणार?" मी निशब्द झालो आणी काकीकडे पहातच राहिलो. एकदा मी रात्री उशीराच जेयावला गेलो. काकी घरात एकटीच टीवी पहात बसली होती. काकीला आरामत बसलेलं पहिल्यांदाच पहात होतो. काकी म्हणाली "ये, उशीर केलास?"
मी हो म्हंट्ल आणी जेवायला बसलो, काकीन ताट वाढलं.
"बाकीची जेवुन गेले?"- मी विचारलं
"नाही रे, आज माझी तब्येत बरी नाही, त्यामुळं सुटी दिली" - काकी
"मग मला का बसवलत जेवायला?"- मी
"अरे या महिन्यात तुझ्याकडे पैसे कमी आहेत ना, कुठे बाहेर जाशील, आणी गेलास तरी पनास, शंभर रुपये झटक्यात घालवशील. ते पैसे संभाळुन ठेव. कामी येतील तुझ्या."

माझा कंठ दाटुन आला, अश्रु पाझरले, मग त्या ममतेच्या मऊसुत पोळ्यांचा अमृताचा घास मी तोंडी घेतला.
मी काकीला विचारलं "काकी मला नोकरी लागली मी काय आणु बरं तुमच्यासाठी?"
काकी म्हणाली "मला एक छोटा कप आईसक्रीम घेऊन ये, बास आणखी काही नको."

आजही मी त्या शहरात गेलो की काकीला भेटायला जातो. अर्थात आईसक्रीम घेऊनच्.
पण एक प्रश्न नेहमी माझ्या मनात घोळतो - "ही नाती कोणती?"

आपला मराठमोळा.

लेख खूप आवडला...काय नाव देणार

1

लेख खूप आवडला...काय नाव देणार या नात्यांना!!! खरं तर महागड्या वस्तूंपेक्षा प्रेमाने केलेली विचारपूस, हाताने बनवलेला खाऊ , २५ पैसेच असले तरी त्यामागचं प्रेम याचंच खरं मोल...आता कुठे मिळणार या गोष्टी ? आणि मिळाल्या तरी त्याची किंमत तीच राहील का?

ममो छानच लेख. अशी काही माणसं

2

ममो छानच लेख. अशी काही माणसं भेटतात आयुष्यात कि जी काही नातं गोतं नसताना आपल्यावर माया करतात, जीव लावतात. त्यांच्यासाठी मायेचं एकच नातं असतं दुसरं कुठलंच नाही. काही नाती ही कुठल्याही व्याख्येत मधे बसत नाहीत.
माझी मावशी आजी पूर्वी अशीच खाणावळ चालवत असे. तिला सर्वजण माई म्हणायचे. तेव्हा तिची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. परंतु ती जेवायला येणारी सर्वच तिची स्वतःची मुलं असल्यासारखी वागवायची. कोणाला काविळ वगैरे झाली असेल तर त्याच्यासाठी पथ्याची म्हणून तेल न घालता केलेली पोळी, मसाला न घालता केलेली भाजी, मुगाचं वरण वेगळं करून ठेवत असे. तो मुलगा जेवायला आला नाही तर प्रशांतमामाबरोबर त्याच्या खोलीवर जेवण पोचतं करायची कारण काय 'आजारी असलं की अशक्त पणा येतो. मग जेवायला येऊ शकला नसेल म्हणून' एखादा मुलाबाळांपासून काही कारणाने दूर राहणारा वृद्ध असेल तर त्याच्यासाठी मुद्दाम कमी तिखटाची, मसाल्याची आमटी, थोडासा मऊ भात मुद्दाम वेगळं तयार करायची नाहीतर त्या आजोबांना नीट चावता येणार नाही उपाशी राहतील. अर्थात आजही अनेक प्रेमळ काकी, मावशी, माई असतील. आजही घरापासून दूर असणार्‍याना आईच्या मायेची उणीव पडू देत नसतील.
सणासुदीच्या दिवशी जेव्हा खाणावळ फक्त दुपारची असे व रात्री सुटी असे तेव्हा सुधा अनेक मुलं म्हणायची "माई, संध्याकाळी येतो थोडंस खायला दुपारचं गुलाबजामाचं जेवण जड झालं आहे. तुझ्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी करशील त्यातलीच मी खाईन थोडी". असं म्हणता म्हणता संध्याकाळीही १५-२० जण खिचडी खायला येत. कसली सुटी कसलं काय. पण त्या लोकांच्या चेहर्‍यावरचं समाधान हीच तर माईची मोठी कमाई होती मग तिथे कसले आलेत कष्टं आणि कसला आलाय नफा तोटा.
मावशीआजीने खाणावळ बंद करूनही आता २५हून अधिक वर्ष झाली.पण तेव्हाची गरजू असलेली मुलं आता प्रतिष्ठीत झाली. अजूनही दसर्‍याला संध्याकाळी खिचडी खायला येतात. येताना सपरीवार येतात. माई मग खिचडीबरोबरच स्वतः खपून केलेले गुलाबजामही आग्रहाने वाढते. त्या मुलांचीही मुलं, नातवंडं माईआज्जीकडे खाऊ मागतात मग माई गुलाबजाम भरवते. मुलं करवादतात म्हणतात 'माईआज्जी, गुलाबजाम नको चॉकलेट दे'मग माईआज्जी त्यांना म्हणते 'बरं बाबा चॉकलेट देते'. मुलाचा चेहरा खुलतो पण त्यांच्या वडिलांचा आणि आजोबा मनातल्या मनात म्हणत असतात 'तू लहान आहेस तुला कळत नाहीये तू काय मिस करतोयस. माईकडचा गुलाबजाम म्हणजे पृथ्वीवरचा सर्वोच्च आनंद'


-पुण्याचे पेशवे

हम्म

3

स्पर्धेच्या जगासाठी आपल्य मुलांना तय्यार करण्याच्या खटपटीत असणार्‍या पालकांना आयुष्याची ही बाजू दाखवायला जमते? मुळात त्या पालकांपैकी किती जणांच्या जाणीवेच्या कक्षेत ही बाजू असते. स्पर्धा हे एकच जगण्याचे वास्तव समजून मुलांसाठी बनवलेल्या घरातील 'अभ्यासक्रमा'त अशा जाणीवांना जागाच कुठे उरते. मुले परगावी किंवा परदेशात असताना नातवंडे आजी-आजोबांशी आतड्याचे नाते निर्माण करू शकत नाहीत तिथे अशी बिननावाच्या नात्यांची फिकीत कोण करतो.

ममो, अशा जाणीवा जिवंत असलेल्या कोणाला भेटून खूप खूप बरे वाटले. याच जाणीवेने जगाकडे बघाल ही शुभेच्छा.

(मि चिप्स सारखा ओल्ड सेंटिमेंटल स्लॉब) रमताराम

ममो

4

मला तुझा हेवा वाटतो. हास्य

"मला माहिती आहे तुला काय म्हणायचय ते, ती मुलं आहेत ना, मुलं लहान असताना अशीच वागतात, आता त्यांची आई इथे नाही ना, मग त्यांच्या ह्या चुका कोण पदरात घालणार?" Grade


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

माझ्या मेसवाल्या काकू पण

5

माझ्या मेसवाल्या काकू पण अश्शाच छान आहेत. रोज रात्री गरम गरम पोळ्या...स्वतःहून वरण भातावर तूप वाढणार... हास्य आणि त्यांच्या मुलींबरोबर आम्हाला आग्रह करुन आम्हाला वाढतात...

अशी काही माणसं भेटतात आयुष्यात कि जी काही नातं गोतं नसताना आपल्यावर माया करतात, जीव लावतात. त्यांच्यासाठी मायेचं एकच नातं असतं दुसरं कुठलंच नाही. काही नाती ही कुठल्याही व्याख्येत मधे बसत नाहीत.

अगदी सहमत..

नाती?

6

नाती? नाती म्हटलं की आपल्याला बहुदा रक्तसंबंधच आठवतात. जग बदललं, रक्तसंबंधांच्या पलीकडं काही गोष्टी घडू लागल्या आणि त्यातून नातीच तयार होत गेली. त्या नात्यांना रक्तसंबंधांचा आधार लागत नाही. लागते ती फक्त जिव लावण्याची वृत्ती. ही नाती याच वृत्तीतून आलेली. पूर्वी बहुदा जीव लावण्याची वृत्ती रक्तसंबंधांतून येत असावी.
मी अनेकदा म्हणतो, माझ्या रक्तसंबंधांतील काही नातलगांपेक्षा मी असे संबंध नसलेल्या अनेकांशी अधिक रिलेट करतो. जालावरचेही काही त्यात आहेत. जालाबाहेरचे आहेत. या नात्यांचा आधार कोणता? जीव लावण्याची वृत्ती.
ममोही आता व्यक्तिचित्रं लिहू लागणार की काय? लिही, लिही. वाचायला मिळण्याशी मतलब माझा.

खरं आहे.

7

खरं आहे.


करतो. करेन. व करेगें

भाग्यवान आहेस लेका.

8

भाग्यवान आहेस लेका. हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

त्या नात्यांना रक्तसंबंधांचा

9

त्या नात्यांना रक्तसंबंधांचा आधार लागत नाही. लागते ती फक्त जिव लावण्याची वृत्ती
हे मात्र १००% खरं आहे. अशा नात्यांना कुठल्या शब्दात बांधता येत नाही ती फक्त अनुभवायची असतात

ममो मस्त लेख. आमच्या

10

ममो मस्त लेख.

आमच्या पुण्यातल्या स्वयंपाकाच्या मावशीची आठवण झाली.. त्यांना सगळे पूनमच्या आई म्हणायचे. २ वेळच्या जेवणाबद्दल बोलणी असूनसुद्धा सकाळी सकाळी येऊन मित्र ऑफिसला जाण्याआधी त्याला गरम गरम डबा बनवून देणार...मला नाश्ता बनवून देणार...मग परत दुपारी येऊन गरम गरम वाढून जाणार..संध्याकाळी परत मस्त जेवण बनवून जाणार. आमच्या (बॅचलर) घरात कोणतातरी जिन्नस नसेल तर दुसर्‍या घरी काम करायच्या, तिथून हक्काने घेऊन येऊन आम्हाला करून खाऊ घालायच्या. सणाच्या दिवशी सुटी घ्यायच्या पण सकाळ संध्याकाळ २ वेळचा साग्रसंगीत डबा त्यांच्या मुलीच्या हाती पाठवायच्या.

माझ्या कॉलेज जिवनामध्ये मी पण

11

माझ्या कॉलेज जिवनामध्ये मी पण एका खानावळीमध्ये जेवत असे, जवळ जवळ २-३ वर्ष.
खुप लळा लागला होता त्यांचा. कधी पुन्हा जाऊन भेटावे असे सारखे वाटते पण कधी शक्य झाले नाही.
पण आता भेटेन त्याना जाऊन एकदा तरी.


करतो. करेन. व करेगें

सुंदर लेख रे!

12

सुंदर लेख रे!

मस्तच..छान लेख..सुंदर

13

मस्तच..छान लेख..सुंदर व्यक्तिचित्रण

मस्त लेख ..

14

मस्त लेख ..

छान लिहले आहेस ममो. असेच

15

छान लिहले आहेस ममो.

असेच अनुभव अजून माणूसकी संपली नाही आहे ह्याची जाणीव करुन देतात.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छानच.....!!! अनुभवावरुन

16

छानच.....!!!

अनुभवावरुन सांगतो, क्षुल्लक स्वार्थासाठी रक्ताची 'आपली वाटणारी' माणसे पाठीत खंजीर खुपसतात.(जास्त रक्तरंजित झाले काय?)मात्र दोस्तीच्या, आपुलकीच्या नात्यांचाच जास्त उपयोग होतो.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

>>.(जास्त रक्तरंजित झाले

17

>>.(जास्त रक्तरंजित झाले काय?)

नाही.

हास्य

>>दोस्तीच्या, आपुलकीच्या नात्यांचाच जास्त उपयोग होतो.

१००% खरं आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान लिहिले आहे...

18

छान लिहिले आहे...

+१ हेच म्हणतो. काय बे ममो,

19

+१
हेच म्हणतो.

काय बे ममो, अमेरिकेत मेस लावायचा/की चालु करायचा विचार आहे की काय? wink

रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळ्ची नाती

20

ममो धागा वाचुन एकदम जिवाला हात घातलात. खर सांगू आजच्या कलियुगात नकळत जोडलेले प्रेमाचे नातेच जवळचे वाटते. माझ्या माझ्या म्हणणार्‍या आणि रक्ताच्या नात्यांना सुध्दा लाजवेल अशी संगत फक्त हीच नाती करतात. आणि मग मन बंड करुन उठत वाटत का मी ही रक्ताची नाती चिवडत बस्सयची ज्याच्यामध्ये कृत्रिमतेव्यतिरिक्त कशाचाच गंध नाही. कसलाही फायदा, तोटा न बघता निर्व्याज प्रेम करणारी ही नाती अनुभवताना वाटत खरच अजुनही माणुसकी शिल्लक आहे.


मीच तो Cool

तब्येतन लिहीलय बॉस !!

21

तब्येतन लिहीलय बॉस !!

मस्त लिहिलय ममो......मि

22

मस्त लिहिलय ममो......मि नि:शब्द...........

स्साला.. हे आजच वाचतोय.

23

स्साला.. हे आजच वाचतोय. काळजाला हात घालणारा लेख नको वाटतो सकाळीसकाळी

"नात्याला या नकोच नाव." अशी

24

"नात्याला या नकोच नाव." अशी काही नाती जोडली जातात ज्याला आपण सोप्या शब्दात ऋणानुबंध म्हणतात. अस म्हणतात की ही गतजन्मीची नाती असतात, नात्यांना शब्दात बांधण तस अवघडच.

लेख सुंदर आहे , काही क्षण हळवं वाटल


मी जाह्नवी. एका कल्पनेचं वास्तव

हळवे करुन गेला.............

25

लेख वाचता-वाचता मन कधी हळवे झाले कळलेच नाही..............


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

हे अजून थोडे ...

26

फारच सुंदर लिहिलेत. हे अजून थोडे हवे होते. मी होस्टेलमध्ये अनेक वर्षे होतो त्यामुळे अश्या अनेक काकींच्या हातचे "आशिर्वाद" मिळालेले आहेत. हास्य

Why did you so ruthlessly edit your own article ? आपलीच कलाकृती एवढ्या निर्दयपणे (कात्री मारून) संपादित करणे कसे काय जमते बॉ तुम्हाला ?

व्यक्ती आणि वल्ली आठवले.

आमचे मामाश्री सांगतात की ही अशी नाती व त्यांचा ओलावा व त्यांच्याबाबत असलेली ओढ व मुख्य म्हंजे ही नाती दुर्मिळ होत चाललियेत ही खंत (तक्रार) गेली कमीतकमी ८० वर्षे चालू आहे. मामाश्रींच्या मते प्रत्येक पिढी ही तक्रार करत आलेली आहे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.