भारतीय तत्वज्ञान - भाग ४
आता आपण वैशेषिक दर्शनाचा विचार करु.
ह्या दर्शनाचे प्रवर्तक कणाद मुनी आहेत असे मानले जाते. सर्व विश्व हे सुक्ष्म अशा अणुंनी बनलेले आहे. या अणुंचा संयोग, वियोग, एकत्रिकरण, विलगीकरण होवुन वस्तुंमधे बदल होतात. ह्याचाच अर्थ जगाचे कारण अणु आहेत. परमात्मा किंवा ईश्वर आपल्या सुखदुःखाला कारणीभुत नसुन संसार जरी दुःखमय असला तरी तत्वज्ञानाच्या सहाय्याने दुःखाची निवृत्ती होवु शकते. जीव दुःखमुक्त होणे म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती असे वैशेषिक मानतात.
कणादांच्या अनुसार जगाची रचना विभाग करता येणार नाही अशा अणुपासुन झाली आहे. जड पदार्थांचे विविध विभागात वर्गीकरण करुन त्यामागचे तत्व शोधुन काढणे ही वैशेषिकांची भुमिका आहे. ह्या प्रकारे पदार्थांचे अनुशीलन करुन दु:खाचे कारण शोधुन दुःखमुक्ती मिळवणे हाच मनुष्याचा धर्म आहे असे वैशेषिकांचे म्हणणे आहे. पदार्थांचे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय यांच्या सहाय्याने सारखेपणा आणि वेगळेपणा शोधुन जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाने दुःखमुक्ती होते असे वैशेषिक दर्शन मानते.
वैशेषिक पदार्थांचे द्रव्य म्हणुन वर्णन करतात त्यात पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन हे प्रकार मानले असुन, पृथ्वी, आप, तेज, वायु हे परमाणुने बनलेले असुन नित्य (कायम अस्तित्व) मानले जातात. यांच्या संयोगाने जे शरीर, इंद्रिय, विषय यांचे रुप बनते ते अनित्य (नाश पावणारे किंवा बदलणारे) असते. आकाश, काल, दिशा ह्यात बदल होत नाही. मन हे अणुरुप आहे. भिन्न शरीरात भिन्न आत्मे असतात. मनाने ज्ञानाचा आश्रय घेवुन आत्मा वसतो असे वैशेषिक मानतात म्हणजेच ज्ञानाच्या सहाय्याने आत्म्याचे आकलन होते त्यासाठी मनाची मदत घ्यावी लागते.
पदार्थाला विविध गुण असतात. रस, रुप, गंध, स्पर्श, शब्द, संख्या वगैरे २४ गुण मानले जातात. पाच प्रकारची कर्मे करता येतात. जसे उचलणे, फेकणे, आकुंचन, प्रसरण, गती (गमन).
पदार्थांमधील आकारांमधील भिन्नतेमुळे त्यांचा भेद कळतो, पण निराकार असलेल्या एकाच जातीच्या दोन पदार्थांमधील भेद समजणे हे विशेष आहे असे मानल्यामुळे हे तत्वज्ञान विशेष ज्ञान करुन देणारे असे वैशेषिक मानले जाते. एखाद्या गोष्टीमधील नित्य संबंध विशद करणे म्हणजेच समवाय होय. याप्रमाणेच अभाव हा सुद्धा पदार्थ असल्याचे वैशेषिक मानतात
कणाद ॠषींनी जगाची रचना विभाग करता येणार नाही अशा अणुपासुन झालेली आहे असे गृहीत धरुन त्यावर आपले तत्वज्ञान मांडले आहे. या अणुलाच काही ठिकाणी आत्मा असे सुद्धा संबोधले आहे. जड पदार्थांचे ज्ञान मिळवणे हे वैशेषिक दर्शनात आवश्यक आहे. वैशेषिकांच्या मतानुसार आत्मकर्म संपन्न होणे हाच मुक्तीचा मार्ग असुन दुःखमुक्ती होते.
ज्ञान होण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता असते. वैशेषिक प्रत्यक्ष आणि अनुमान हीच दोन प्रमाणे मान्य करतात. प्रत्यक्ष म्हणजे पंचेंद्रियांना जे ज्ञान होते तेच ज्ञान. अनुमान म्हणजे पंचेद्रियांना होणा-या ज्ञानातुन तर्काने जे सिद्ध होते ते अनुमान.
हे थोडक्यात वैशेषिक दर्शन आपण पाहिले. पुढचा भाग न्याय दर्शन.

.jpg)
नॅन्स, समजायला अतिशय अवघड जात
नॅन्स,
समजायला अतिशय अवघड जात आहे, तरी वाचत आहे, काही ठिकाणी कंफ्युजन होत आहे.
>>मन हे अणुरुप आहे.
>>या अणुलाच काही ठिकाणी आत्मा असे सुद्धा संबोधले आहे.
???? नक्की काय समजायचे.
>>जीव दुःखमुक्त होणे म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती असे वैशेषिक मानतात.
>>सारखेपणा आणि वेगळेपणा शोधुन जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाने दुःखमुक्ती होते असे वैशेषिक दर्शन मानते.
म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्याव्र माणसाचा मृत्यु होतो असं काही आहे का?
फक्त मृत्यू म्हणजे मोक्ष
फक्त मृत्यू म्हणजे मोक्ष नसावा..
पुष्करिणी
>>फक्त मृत्यू म्हणजे मोक्ष
>>फक्त मृत्यू म्हणजे मोक्ष नसावा..
मग मोक्ष काय असतो यावर लिहा एखादा तत्त्वज्ञानी लेख (तुम्ही कधी काही लिहिल्याचं स्मरत नाही ), आम्हा अशिक्षित लोकांना थोडा फायदा होईल.
लायकी नाही हो..आमचा
लायकी नाही हो..आमचा जीवात्म्याला अजून बरंच काही शिकायच आहे..
नानांनाच विनंती करायला हवी..
पुष्करिणी
>>मन हे अणुरुप आहे. >>या
>>मन हे अणुरुप आहे.
>>या अणुलाच काही ठिकाणी आत्मा असे सुद्धा संबोधले आहे.
याचाच अर्थ मन हेच आत्मा आहे...(गणिती नियमानुसार)
http://shilpasview.blogspot.com/
वाचतो आहे ना, मोक्ष म्हणजे,
वाचतो आहे ना,
मोक्ष म्हणजे, जन्म-मरण मृत्युच्या फेर्यातून सुटका, मोक्ष म्हणजे सर्वज्ञान आपण का निर्माण झालो, आपण काय केले, आपण काय करणार आहोत व आपली गती काय ह्याचे सर्वज्ञान म्हणजे मोक्ष.
मानवाचे सर्वात मोठे दुखः म्हणजे गती ( जन्म व मरण चक्र.. वेगवेगळ्या योनीतून फिरत राहणे त्यातून मुक्तता होणे म्हणजे मोक्ष)
मनाचा व आत्माचा घोळ अनेकवेळा घातला जातो.
मन म्हणजेच आत्मा व आत्मा म्हणजेच मन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चूक.
>>>मन म्हणजेच आत्मा व आत्मा म्हणजेच मन.<<<
नाही.......
आदि शंकराचार्यांचे आत्मषटक वाचायला घेतल्याबरोबर,
मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाहं....
म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे 'मी'(म्हणजे आत्मा) नाही असे सांगितले गेले आहे.
थोडे तत्वज्ञानः
आत्म्याचा बुद्धीमध्ये(शुद्धबुद्धी) पडलेला प्रकाश म्हणजे चिदाभास म्हणजे जीव.
उदा. दिवा:- ज्योत म्हणजे आत्मा, त्यावरील स्वच्छ काच म्हणजे बुद्धी आणि त्या काचेवर जमणारा कुठलाही रंग म्हणजे त्या त्या जीवाच्या वासना. म्हणून प्रकाश त्या त्या रंगाचा दिसला की आपण म्हणतो ही व्यक्ति अशी अशी आहे. मूळ प्रकाश स्वच्छ असतो.त्यावरचे आवरण वेगवेगळे असते.
यात बुद्धीचे कार्य जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे चालते तेव्हा त्या बुद्धीलाच मन, बुद्धी, चित्त अशी नावे आहेत.
एखादी गोष्ट करावी अथवा नाही हा निर्णय होत नाही तोवर त्या अवस्थेला मन असे म्हणतात. (निर्णय झालेला नाहीए) निर्णय घेतला गेला की त्यालाच बुद्धी म्हणतात. तो निर्णय साठविला गेला की चित्त आणि सातत्याने यामागे अहंकार असतोच. (व्यवहारामधे बोलतो असा नव्हे तर मी आणि माझे अशी सततची असलेली जाणीव म्हणजे अहंकार)
अध्यात्म हा फुल्ल टाईम प्रो़जेक्ट आहे. सुखी असणे/होणे म्हणजे काय? गब्बरचा मी नक्की कोण हे आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना त्यामधे उत्तर आहे. आपलीच तयारी नसते.........
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
प्रतिसाद खूप आवड्ला, उदाहरण
प्रतिसाद खूप आवड्ला, उदाहरण पटलं
पुष्करिणी
नाना पुस्तक रुपाने एकत्रीत
नाना पुस्तक रुपाने एकत्रीत ठेवा ही लेखमाला.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
+१ सहमत आहे
राजे ह्या सुंदर लेखमालेचे पुस्तक केले तर छान होईल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
वाचतो आहे
नाना फार छान लेखमाला आहे
वाचतो आहे... समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे...
अजून येऊ द्यात.
बाकी कणाद ऋषिंची मते नक्की विचार करण्याजोगी आहेत.
सर्व जग हे कणाकणाने (अणूंपासून) तयार झाले आहे हा सिद्धांत पाश्चात्य शास्त्रज्ञांनी सिद्ध करायच्या आधी हजारो वर्षांपूर्वी कणाद या एका भारतीय ऋषींनी मांडला होता ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
वाचतोय रे नान्या..
वाचतोय रे नान्या..
छान लेखमाला आहे. विषय छान
छान लेखमाला आहे. विषय छान निवडला आहे. आजच चारही लेख वाचलेत. छान लिहिले आहेत. पुढिल लेखाच्या प्रति़क्षेत.
पुढील लेखाची वाट पाहत आहे,
पुढील लेखाची वाट पाहत आहे, अजून समजण्यास मदत होईल असे वाटत आहे तत्वज्ञान.
करतो. करेन. व करेगें
नानबा छान लिहितो आहेस. अत्यंत
नानबा छान लिहितो आहेस. अत्यंत सोप्या भाषेत असल्याने कंटाळवाणे बिल्कुल वाटत नाही. बाकी 'अनुशीलन' वगैरे सारख्या शब्दांसाठी दुसरे सोपे शब्द वापरता येतील काय ?
रात्री ४ पेग मारले की मोक्ष पावणारा
परा
हॅहॅहॅ
मोक्ष- ४नंतर ३ नंतर २ नंतर १ व शेवटी ० पेग
यासाठी साधना लागते
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
आमी डायरेक दुसर्या लेव्हलला
आमी डायरेक दुसर्या लेव्हलला कसे पोचलो मग? याला पूर्वपुण्याई म्हणायची का?
डिस्क्लेमरः बोअर होईल असे
डिस्क्लेमरः बोअर होईल असे वाटणार्यानी वाचू नये. तसेच 'तथाकथित' विज्ञानवाद्यांशी याबाबत वाद-संवाद केला/घातला जाणार नाही
>>>>मोक्ष- ४नंतर ३ नंतर २ नंतर १ व शेवटी ० पेग
पकाकाकांनी हसत खेळत रहस्य उलगडले....खरेच साधना लागते. आणि साधना योग्य दिशेने जायला त्यामागची भूमिका ठाऊक असली की जे करतोय ते का करतोय हे कळते, त्यात रस वाटतो आणि कष्ट न वाटता हसत गोष्टी होतात.
मोक्ष ही सापेक्ष कल्पना आहे. मोक्ष म्हणजे मुक्ति,मोकळे होणे,सुटणे.म्हणजे कशात तरी अडकलेले आहोत, कसले तरी बंधन आहे. कशापासून तरी मोकळे व्हायचे आहे.
मोक्ष अथवा आनंद मिळण्यासाठी ४ पेग मारले असे परा म्हणाला. पण खरेच नेहमी तशा प्रकारेच आनंद मिळतो का???? मायाताईच्या दुसर्या धाग्यात सुख म्हणजे काय हे विचारल्यानंतर काय केले अथवा झाले की सुख मिळेल ते लिहिले आहे. आनंदी होण्याचे पर्यायाने दु:खापासून मुक्ति, मोक्ष मिळवण्याचे हे मार्ग आहेत अथवा ही सुखी होण्याची साधने आहेत.
एखादा मेवे त्यामुळे ३ पेग वर मोक्ष पावतो. कुणाला गडावरची भजी आणि चहा, कुणाला मोकळ्या वातावरणातला 'मोकळा' श्वास, कुणाला प्रेयसीची/प्रियकराची मिठी ही आनंदाची अत्युच्च अनुभूति असते.
पण खरी गोची ही आहे की आपल्याला वाटते की त्या 'गोष्टी'मधे सुख आहे. खरेच तसे असते तर २कपा नंतर मिळालेला चहा ही सुख देऊन गेला असता, अतिशय छान भज्यांचा वाद येतोय पण एखाद्याला अवघड जागचे दुखणे झालंय, होईल तो आनंदी? लिव्हर खराब झालंय,त्रास होतोय, दारु पिणं म्हणजे मरण असेल तेव्हा. चार तास मिठीत राहून कळाले साले सगळे सांधे दुखू लागले आहेत, एकदा 'तिक्डे' जाऊन यायचे आहे, दोन झुरके घ्यायचे आहेत.पूर्वी कधीतरी त्या गोष्टीच्या माध्यमातून आनंद मिळत होता. पण म्हणून ती गोष्ट म्हणजे आनंद/सुख अथवा मोक्ष नाही हे आता लक्षात आले असेल.
त्यामुळे पकाकाका म्हणतात तसे, मोक्ष ही गोष्ट कुठल्याही पेगशिवाय मिळणारी आहे. विषय रहित आनंद म्हणजेच मोक्ष होय. काहीही विषय,विचार समोर,मनात नसताना मिळणारा आनंद हा मोक्ष आहे. झोपेत आपण आनंदीच असतो म्हणून तर त्या स्मृतिवर आपल्याला आनंद होतो. काय मस्त झोप लागली होती असे आपण म्हणतो. पण हा नकारार्थी आनंद होय.
अशाच प्रकारचा आनंद जागेपणी मिळ्णे रादर सातत्याने त्याच आनंदी अवस्थेत राहाणे हे आपले ध्येय असले पाहिजे. अर्थातच अवघड असले तरी ते तसे साध्य आहे.
खायला काही नसताना तुकाराम महाराज, 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असे म्हणतात ते उगाच नव्हे. याच तुकारामांच्या पालख्या कोणत्याही धंदेवाईक नव्हे तर श्रद्धेने ३०० हून अधिक वर्षे वाहिल्या जातात, त्या सोहळ्याला कुठलाही भाडोत्री कार्यकर्ता नसतो.(सांगण्याचे कारण म्हणजे कोण तुकाराम असा प्रश्न येऊ शकतो.)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
उत्तम प्रतिसाद ! >>विषय रहित
उत्तम प्रतिसाद !
>>विषय रहित आनंद म्हणजेच मोक्ष होय.
जैन धर्माचे तत्वच सांगितले तुम्ही अगदी सोप्या भाषेत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित
अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जसजशी लेखमाला पुढे जाईल तसतशी प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. सर्वात शेवटी सर्व मतांचा एकत्रित आढावा घेतला जाईल तेव्हा सर्व प्रश्नांना माझ्या मतीने उत्तर देईन. तोपर्यंत मी उत्तरे देत नाही असा गैरसमज होउ नये.
बाकी चालु द्या
प्र का टा
प्र का टा आ
स्वसंपादित. (हुकुमावरुन)
स्वसंपादित. (हुकुमावरुन)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)