पंढरीचा राया : अभंग

0
0

बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!
.
पंढरीचा राया : अभंग-१

पंढरीच्या राया । प्रभु दीननाथा ॥
टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥

बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥

कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥

त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा कारे पायी । बोलावतो ॥५॥

देव गरीबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥

आम्हां कारे असा । गरीबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥

गंगाधर मुटे
..............................
शुभहस्ते पुजा : अभंग-२

प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥

त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥

लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥

पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥

म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥

गंगाधर मुटे
...............................
(आषाढी एकादशीच्या निमित्ताने
पांडुरंगाला थोडेसे साकडे)
-------------------------------
.
बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!

मुद्रा..

1

मुटे भौ राम्राम,
दोन्ही रचना झकास जमल्या आहेत. पहिल्या रचने मधे-

"अभय"करे देवा देई आशिर्वाद |
जेणे भक्तजन सुखी होती ||

ही मुद्रा कशी वाटते? (हा आता त्या साठी आपल्या विठोबाला कमरेवरचा हात मात्र काढावा लागेल.)

नेहमीप्रमाणेच

2

नेहमीप्रमाणेच सद्यपरिस्थीतीवरील कविता.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. (काहीतरी नविन पायंडा पाडायचा म्हणून पाडायचा.)



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आषाढी एकादशीच्या

3

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.

छान काव्य निर्मिती केली आहे तुम्ही मुटे साहेब.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शुभेच्छा.

4

राजे. हास्य तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.

5

श्रिकांत भौ,पाषाणभेदजी
तुम्हालाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. हास्य

तुम्ही सुचविलेली मुद्रा पण छान वाटते. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

सुंदर आणि मनोहर काव्यरचना

6

सुंदर आणि मनोहर काव्यरचना