कदर जाने ना........ मदन मोहन.

आज १४ जुलै संगीतकार मदनमोहन याचा स्मृतीदिन
देशोदेशीच्या एकाहून एक महापराक्रमी योद्ध्यांनी खचाखच भरलेल्या त्या "अभूतपूर्व' स्वयंवराचा तो अशक्यप्राय "पण' पूर्ण करण्यासाठी जवळपास सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून झाल्यावर... एक तेजस्वी वीर त्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावून... पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहत.. गरगर फिरणाऱ्या त्या माशाच्या डोळ्यांचा वेध घ्यायला सज्ज आहे... फक्त काहीच क्षण...!
पण तेवढ्यात कानामध्ये तापलेल्या शिशाचा रस ओतावा.. तसे शब्द आदळतात.. "सुतपुत्राला मी वरणार नाही.'...
अत्यंत अपमानित होऊन.. उद्ध्वस्त मनाने.. खजील होऊन तो महापराक्रमी योद्धा मान खाली घालून परततो... सौंदर्य, बुद्धिमत्ता, क्षात्रतेज, पराक्रम, अद्भुत कवच-कुंडले... सर्व काही असूनही. नियतीने केलेल्या या क्रूर फसवणुकीमुळे "राजमान्यते'पासून आयुष्यभर वंचित राहिलेल्या... "कौंतेय' असूनही "राधेय' म्हणवला गेलेल्या कर्णाच्या भळभळत्या वेदनेचे दुःख आणि...
"हम प्यार में जलनेवालोंकी चैन कहॉं, मेरी बीना तुम बिन रोये, कौन आया मेरे मनके द्वारे, मेरी याद में तुमना आँसू बहाना, भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ, तुझे क्या सुनाऊँ ऐ दिलरुबा, फीर वही शाम, रस्मे उलफत, ऐ दिल मुझे बता दे, झुमकी गीरा रे, जरुरत है जरुरत है इक श्रीमती की, मेरी आवाज सुनो, कर चले हम फीदा जानों तन साथियों, छाई बरखा बहार, जिया ले गयोजी मोरा सावरिया, आज सोचा तो आँसू भर आये, दिल ढूँढता है फिर वोही....
यांसारखी अत्यंत सुंदर, वैविध्यपूर्ण, दर्जेदार आणि वेगळेपणाने नटलेली अवीट गोडीची गाणी सातत्याने २५ वर्षे देऊनही "व्यावसायिक यश' आणि "लोकमान्यता' न मिळालेल्या "मदनमोहन'चं दुःख मला एकच वाटतं..
अंगी गुणवत्ता असूनही नियतीनं त्यांच्या पदरात ते हयात असेपर्यंत त्यांचं माप टाकलं नाही.
"फिल्मिस्तान'चे सर्वेसर्वा असलेल्या "रायबहादूर चुनीलाल' या प्रथितयश व्यक्तिमत्त्वाचा हा मुलगा. पूर्ण नाव मदनमोहन कोहली! इराकमध्ये जन्मलेला आणि बालपणापासूनच गाण्याकडे आणि संगीताकडे ओढ असलेला....
आपल्या वडिलांच्या इच्छेखातर त्यानं महाविद्यालयीन शिक्षणानंतर लष्करी शिक्षण घेतलं व सैन्यात दाखल झाला खरा; पण अंतरीची ओढ संगीताकडे असल्यानं तिथं त्याचं मन रमलं नाही आणि त्याचमुळे १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर वयाच्या २१ व्या वर्षी "राजीनामा' देऊन आपल्या मनासारखं काम करण्यासाठी स्वारी लखनौ आकाशवाणी केंद्रावर "कार्यक्रम सहायक' म्हणून दाखल झाली. लखनौच्या मंतरलेल्या वास्तव्यात सर्जनशील संगीतकाराची बीजं त्याच्यात रोवली गेली... अली अकबर खान, अब्दुल वाहिद खान, पंडित रामनारायण, विलायत खान, गझलसम्राज्ञी बेगम अख्तर, रोशनआरा बेगम, फय्याज खॉं... अशा शास्त्रीय संगीतातील मातब्बर व्यक्तींचा सहवास त्याला लाभला. बंदिशी, ठुमरी, टप्पा, गजल, शेरोशायरी... खूप काही त्यानं ऐकलं, उर्दूवर प्रभुत्व मिळवलं आणि याचमुळे शास्त्रीय संगीताचं कोणतंही रीतसर संगीत शिक्षण न घेताही "बहुश्रुतता' या अंगभूत गुणाच्या जोरावर मदनमोहननं संगीतकार म्हणून आपली अद्भुत कारकीर्द घडवली.
पहिली संधी ः
लखनौमध्ये मदनला तलत मेहमूदच्या रूपानं आणखी एक मित्र मिळाला. आकाशवाणीमध्ये छान काम चालू असताना त्याची दिल्लीला बदली झाली.. मात्र तिथं संगीताऐवजी "टेबलवर्क' करायला लागल्यानं "मनस्वी' मदननं नोकरी सोडून चित्रपटात नशीब अजमावायचं ठरवलं आणि १९४७ मध्ये स्वप्ननगरी मुंबापुरीत तो दाखल झाला. मास्टरजी गुलाम हैदरनी "बॉम्बे टॉकीज'च्या "शहीद'मध्ये त्याला गाण्याची संधी दिली... "पिंजरे में बुलबुल बोले'... साथीला होती एक सावळी... कृश अंगकाठीची... पण अद्भुत आवाज असलेली मराठी मुलगी... लता मंगेशकर! या आवाजानं तो भारून गेला आणि आपल्याला संधी मिळाल्यावर लताकडून गाणी गाऊन घ्यायचं त्यानं मनोमन ठरवलं. चित्रपटसंगीतामध्ये अद्वितीय ठरलेल्या "लता-मदनमोहन' या अनोख्या कॉम्बिनेशनची ती "नांदी' होती.
पहिलं यश ः
नियतीच्या विचित्र दैवगतीनं आयुष्यभर मदनमोहनची साथ केली. "शहीद'मध्ये लताबरोबर गायला, तर सिनेमात ते गाणंच टाकलं गेलं नाही. चित्रपटामध्ये "नायक' म्हणून काम करायला गेला.... अपयश आलं. संगीतकार व्हायचा निर्णय घेतला. १९५० ला "आँखे' मिळाला; पण लताकडे गेला तर कोणीतरी कान भरले आणि लता नाही म्हणाली आणि "मोरी अटरिया पे कागा बोले' मीना कपूर ने गायले. "आँखे'ला व्यावसायिक यश मिळालं आणि रुपेरी पडद्यानं "संगीतकार मदनमोहन' हे नाव झळकावलं.
वो भूली दासतॉं लो फिर याद आ गयी...
"मदनमोहनच्या संगीतातून लताला वजा करा.. पाहा खाली काय उरतं ते...' असं नेहमी म्हटलं जातं.. कोणी काहीही म्हणोत; पण १९५१ च्या "अदा' पासून १९७६ च्या "मौसम'पर्यंत या दोघांनी जी काही एकत्र गाणी केलीयेत, ते सांगायला शब्दसामर्थ्य अपुरे आहे हो. राजा मेहदी अलीखॉं, राजेंद्रकृष्ण, कैफी आजमी, साहिर, मजरूह यांसारख्या गीतकारांच्या एकाहून एक सरस रचना मदनमोहनने लताच्या "खास' आवाजात स्वरबद्ध केल्या. आपल्या "मदनभय्या'साठी स्वरलता नेहमीच जीव ओतून गायली. त्याच्यातल्या संगीतकाराला काय व्यक्त करायचे आहे, हे लता अचूक जाणू शकत असे.. न हॅंसो हमपे जमाने के है- (गेट वे ऑफ इंडिया), नैनो में प्यार डोले (शेरू), जाना था हमसे दूर, यूँ हसरतों के दाग, उनको ये शिकायत- (सर्व "अदालत'), बैरन नींद न आये- (चाचा जिंदाबाद), जारे बदरा बैरी- (बहाना), चला है कहॉं, बदली से निकला (संजोग), आपकी नजरोने, है इसीमें प्यार की आबरु- (अनपढ), मैतो तुमसंग- (मनमौजी) लग जा गले, नैना बरसे- (वो कौन थी?) तू जहॉं जहॉं चलेगा, नैनो में बदरा छाये- (मेरा साया), रुके रुके से कदम- (मौसम), जरासी आहट (हकीकत), मिलो न तुम तो हम घबराएँ (हीर रांझा).. किती गाणी सांगायची? "कव्वाली' करावी तर "रोशन' ने आणि "गजल' करावी तर "मदनमोहन'नेच अशी म्हणच लता-मदनमोहन "कॉम्बिनेशन' ने निर्माण केली. तलतबरोबर सुरवातीला "बेरहम आसमॉं मेरी मंजिल' सारखी सुंदर गाणी देणाऱ्या मदनमोहनने नंतर रफीबरोबर खूप अप्रतिम गाणी केली.
दो घडी वो जो पास आ बैठे- (लताबरोबर- गेट वे ऑफ इंडिया), रंग और नूर की- (गजल), मै ये सोचकर उसके- (हकीकत), कभी ना कभी कही ना कही- (शराबी), एक हॅंसी शाम को- (दुल्हन एक रात की), आपके पहलू में (मेरा साया), तुम्हारे जुल्फके (नौनिहाल), तेरी आँखो के सिवा- (चिराग), ये दुनिया ये मेहफील- (हीर रांझा) आणि हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात "ऑर्क्रेस्ट्रेशन'ची कमाल असलेली जी काही निवडक गाणी आहेत, त्यांतले एक "खल्लास' गाणे.. "तुम जो मिल गये हो.. तो ये लगता है'... (हॅंसते जख्म).
वेगळेपण -
सलील चौधरी, शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, एस. डी. बर्मन या समकालीन संगीतकारांप्रमाणेच मदनमोहनची स्वतंत्र संगीतशैली होती. त्याचा दर्जा उच्च होता. सचिनदांना तो गुरुस्थानी मानायचा. एस.डी., ओ.पी., एस. जे. यांच्यासारखी सामान्यांच्या ओठावर सहज खेळणारी गाणी मात्र मदनमोहनची नाहीत. त्याचे गाणे म्हणायला किमान शिक्षण गरजेचे असते. मला वाटते, यामुळेच सामान्य जन व "तो' यामध्ये कायमच एक अंतर राहिले.
पण तरीही "लढवय्या' मदनने व्यावसायिक यशाकरिता कोणतीही तडजोड केली नाही. तो सातत्याने मनापासून काम करत राहिला... आपल्या अटींवर! साथीला नियती होतीच... "भाई भाई' गाजला... रौप्य महोत्सवी होणार; पण २२ व्या आठवड्यात वितरकांच्या वादात काढला गेला... पुढे "वह कौन थी?' पर्यंत त्याला वाट पाहावी लागली. मोठे बॅनर्स कधी मिळाले नाहीत. राज आणि देवचे चित्रपट मिळाले; पण ते चालले नाहीत. दिलीपकुमार नाही... "गाणी उत्तम परंतु सिनेमा फ्लॉप त्यामुळे गाणी डब्यात आणि "अपयशी संगीतकार' हा माथी शिक्का! "फिल्मफेअर'सारखे पॉप्युलर ऍवॉर्ड एकदाही नाही. सातत्याने दर्जेदार काम करूनही उपेक्षा झाल्याचा सल हळव्या मदनच्या मनात घर करून राहिला आणि उत्तम शरीरसंपदा असलेल्या मदनने आपले दुःख विसरायला मदिरा जवळ केली. ७० च्या दशकात संगीताचा "ट्रेड' बदलला. त्याने स्वतःला या बदलाशी जुळवूनही घेतले; पण मग रेकॉर्डिंगसाठी, स्टुडिओसाठी, वादकांसाठी... त्या वेळच्या प्रस्थापित संगीतकारांची "मेहरबानी' घेण्याचे दिवस आले. मानी मदनमोहनला हे फारच दुखावणारे ठरले. तो आणखीनच एकटा पडत गेला. मदिरेचा अंमल वाढत गेला. "दस्तक'साठी "राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला; पण तोपर्यंत "उमेद' गेली होती. त्याचे गुरू सचिनदा आणि तो स्वतः हेच काय ते जुने संगीतकार त्या वेळी उत्तम संगीत देत होते; पण तरीही तो मनाने खचला होता.
आपल्याला डावलले गेले... आपल्या गुणवत्तेची या मोहमयी मायावी दुनियेत "कदर' झाली नाही, हीच भावना अखेर वरचढ ठरली. नियतीने गिळलेले "रथचक्र' उद्धारताना रणांगणात अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या नियतीशी "कर्ण' लढला... मृत्युंजय झाला. पण मदनमोहनला मात्र ठसठसणाऱ्या वेदनेने पराभूत केले... अवघ्या ५१ व्या वर्षी, १४ जुलै १९७५ ला नियतीने त्याला आपल्या कवेत घेतले...
- चंद्रशेखर महामुनी
.jpg)
सुरेख लेख! मदनमोहन ह्यांची
सुरेख लेख!
मदनमोहन ह्यांची शोकांतिका खरच चटका लावून जाते... संगीतातील दुनियेतही राजकारणे झाली आणि त्याचा बळी हा कलावंत ठरला असे काही वाचले होते, ते खरेच का? असल्यास, दुर्दैवाची गोष्ट आहे..
ओ हो
मालक तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. आधी तलत नि मग मदनमोहन, चित्रपटसंगीतातील दोन मोरपिसे, वहीत अलगद जपून ठेवलेली. आज हळूच डोकावून पाहिले नि परत वही मिटून ठेवली. न जाणो हरवून जातील.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
काय ह्रुदयस्पर्शी लिहिलेत राव
डोळयान्च्या कडा पाणावल्या.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
तगाफुल
हमने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जायेन्गे हम ... तुमको खबर होने तक.
(तगाफुल = दुर्लक्ष, उपेक्षा)
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
खरंच हृदयस्पर्शी!
मला मदनमोहनच्या संगीताची तेवढी ओळख नाही. आपण नमूद केलेली काही गाणी ऐकली आहेत काही ऐकली नाहीत! पण लेखन आवडले! खरंच हृदयस्पर्शी लिहिलंयत! आता जरूर ऐकीन ही सगळी गाणी!
आभार..!
मित्र- मैत्रिणीनो..!
तुमच्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार..!
अप्रतिम्,मस्त लेख.
अप्रतिम्,मस्त लेख.
पुष्करिणी
आज सुद्धा युं हसरतों के
आज सुद्धा युं हसरतों के दाग्,दो दिल टुटे दो दिल हारे,कर चले हम फिदा ही गाणी ऐकली की डॉळे पाणावतात.
आणि लोकप्रियतेचा मुद्दा घेतला तर आपले व्संत पवार तरी याहुन काय वेगळे होते हो??
उत्तम परिचय. संगीताशी फारसा
उत्तम परिचय. संगीताशी फारसा संपर्क नसल्याने उपयुक्त माहिती वाटली. गुणसंपन्न संगीतकार अस उपेक्षित का राहिला?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
काहीच माहित नव्हते
काहीच माहित नव्हते ह्यांच्याबद्दल तुमच्या लेखामुळे खुप माहिती मिळाली.
काही गाणी माहित होती तर काही नवीन होती माझ्यासाठी.. असेच लिहीत रहा व अश्या प्रकारच्या हिर्यांची ओळखत करुन देत रहा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
"मेरा साया" या गाण्याबद्दल
"मेरा साया" या गाण्याबद्दल बोलायचे राहिलेच की
की ते गाणे हा एक स्वतन्त्र विषय आहे?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
विजुभाउंशी सहमत. मदन मोहनचे
विजुभाउंशी सहमत.
मदन मोहनचे प्रत्येक गाणे म्हणजे वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
आभार..!
खरे आहे..
मदन मोहन चे प्रत्येक गाणे हा लेखाचा विषय आहे..!
तू जहा जहा चलेगा.[.मेरा साया..] लता चे..एक अप्रतिम गाणे..!
अभिवादन!
हिन्दी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट (होय, सर्वोत्कृष्ट!!)व्यक्तीला माझं अभिवादन!!
ते उत्तम संगीतकारच नव्हते तर चांगले गायकही होते....
माझ्याकडे त्यांच्या स्वतःच्या आवाजातलं "माई री, मैं कासे कहूं प्रीत, अपने जियाकी" हे गाणं आहे....
जमल्यास जरूर ऐका..
पाठवा
पाठवा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
असेच म्हणतो. शेअरवा बघू.
(आता तुमची सुटका नाही, ते मिळेपर्यंत हा समंध तुमच्या बोकांडी बसलाय हे पक्के समजा)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
छान माहिती...
छान माहिती...
मदनबाण.....