

(माझ्या सागरस्मृती ब्लॉगवर व मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
या कथेचा वा लेखाचा हेतू पुराव्यासह लेखन हा नाहिये. तर वेगवेगळ्या पुस्तकांत उपलब्ध असलेल्या अनेक दंतकथांमधून व पुराव्यांवरुन माझ्या मनाला जे सत्य पटले तो आधार धरुन चंद्रगुप्त चाणक्य या जोडगोळीचे कर्तृत्व प्रकाशात आणणे हे आहे.अधून मधून माझी मतेही दिली आहेत. पुराव्यांसकट लेखन हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे.. त्यामुळेच या कथेत सनावळ्या व इतर पात्रांचा उल्लेख जसे शकटदास, अंभीराज, पर्वतक मी हेतुतः टाळला आहे. कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता. या कथेचे वा लेखाचे लेखन करताना मी सम्राट अशोक कालीन काही शिलालेख (अशोक आणि मौर्यांचा र्हास - शरावती शिरगावकर), सम्राट चंद्रगुप्त याबद्दल उपलब्ध असलेले अधीकृत संदर्भ (पुस्तकांतून), सम्राट अशोकावरचे लेखन, राहूल सांकृत्यायन यांच्या जय यौधेय , सिंह सेनापति या पुस्तकांचा आणि कौटिलिय अर्थशास्त्र या ग्रंथांचा आधार घेतला होता...
- o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o -
भाग १:
चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी काकेशस' असे म्हणत. हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली. पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी एका हिंदू राजाने साधले. तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त"
तर आपण चंद्रगुप्ताच्या जन्मापासून सुरुवात करुया...
चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो. तेव्हाच तर त्या तयार होतात. यावर माझा विश्वास असल्याने, मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार. पण हा एक संभाव्य तर्क आहे यात काही शंका नाही. तर सम्राट चंद्रगुप्ताचा जन्म नंद कुळातच झाला असावा असा माझा तर्क आहे... अरे असे अवाक् का झालात? काय म्हणता? ज्या कुळात तो जन्मला त्याच कुळाचा नाश त्याने स्वतःच्या हातांनी कसा केला? तीच तर खरी गंमत (खरे तर शोकांतिका) आहे. आश्चर्याच्या गोष्टी विसरुन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात.
मगधनरेश धनानंद राजाला चैनी-विलासी जीवनाची आवड होती. धनानंदाच्या सेवेत 'मुरा' नावाची एक दासी होती. मुरा दिसायला सुंदर होती. विलासी धनानंदाच्या दृष्टीस मुरेचे लावण्य पडताच त्याने तिला स्वतःची खास दासी म्हणून नियुक्त केले. मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतःपुरातील दासी बनवले. दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती. निदान धनानंदासारखा विषयासक्त मगधसम्राट असल्यावर तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती.
काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले. धनानंदाने तिची योग्य ती काळजीदेखील घेतली होती. ती प्रसूत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ति होईल असे राज-ज्योतिषिंनी राजाला भविष्य सांगितले. ते ऐकून राजाला भय पडले. दासीपुत्र चक्रवर्ति होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवायचा निर्णय घेतला. कसा कोणास ठाऊक पण मुरेला धनानंदाचा बेत कळला. अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले. मगधाबाहेर गेल्यावर मुरेला एका गुराख्याने आसरा दिला.
एवढ्या अवधीत तक्षशीलेचे जगद्विख्यात आचार्य चाणक्य मगधाची राजधानी 'पाटलिपुत्र' मधे आले. धनानंदाचा राक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता. तो अतिशय एकनिष्ठ होता. फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता. त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रितीने हाकला जात होता. त्याच्यावर राज्यकारभार सोपवून धनानंद विलासात दंग झाला. आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करुन द्यायला आले होते. पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आर्य चाणक्यांची निंदा करुन दरबारातून बाहेर काढले. या अपमानाने क्रोधित होऊन आर्य चाणक्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की, "जोपर्यंत मगधाच्या गादीवर असलेल्या नंद कुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही.... " झालं... आर्य चाणक्यांची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची टर उडवायला सुरुवात केली. मग काय आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. आधीच भडकलेला आचार्यांचा क्रोधाग्नि आणखीनच भडकला. आचार्य तेथे क्षणभरही न थांबता निघाले. दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशीलेकडे प्रयाण केले.
भाग २:
कर्मधर्मसंयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा, चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली. चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ-दहा वर्षांचा असेल. चाणक्य तक्षशीलेकडे निघाला असताना एके ठिकाणी गुराख्याची काही मुले त्याला दिसली. एक मुलगा ऐटीत एका उंच दगडावर बसला होता. त्यच्या मधुर वाणीने ती गुराखी मुलेच काय पण आचार्यदेखील मोहित झाले. दोन मुलांच्या आपापसातील भांडणाचा न्याय-निवाडा तो गुराखी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता. चाणक्यांनी लगेच बालचंद्रगुप्ताच्या - होय तो मुलगा चंद्रगुप्तच होता - आईची भेट घेतली. एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धी असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागितले.. आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली. मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहुन अधिक सक्षम हातांनी घडविले जाणार होते म्हणून आणि मुरेलाही धनानंदाचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्यांच्या हवाली केले.
चाणक्याने मुरेचा निरोप घेतला. मुरेनेही धनानंदाने केलेला अत्याचार बालचंद्रगुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध (सूड म्हणू हवं तर) घ्यायची भावना भडकवली . सूडाच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय गाठण्याच्या हेगेला.आर्य चाणक्यांबरोबर तक्षशिलेला गेला.
तक्षशिलेला पोहोचताच आर्य चाणक्यांनी मुळीच वेळ वाया न घालवला नाही. चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यांनी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे आचार्यपद स्वीकारले. आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करुन राजनीती, शस्त्रविद्या, युद्धाचे डावपेच, यांमध्ये निष्णात केले. बाकीच्या विषयांमधेसुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवत होता. जसजसा चंद्रगुप्त आर्य चाणक्यांच्या हाताखाली शिकत होता तसतसा तो आपली बुद्धीमत्ता प्रकट करत होता. मनोमन चाणक्य सुखावले होते. कारण चंद्रगुप्त त्यांच्या अपेक्षेहून अधिक हुशार, चाणाक्ष आणि समंजस होता.
तक्षशिलेत चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे. पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावे. शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबेज झाला होता. आता त्याला ध्यास होता तो धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचारांचा सूड घ्यायचा. त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती. आणि त्यानुसार सर्व सिद्धताही केली होती. पण मगधस्वारीत एकच गोष्ट आड येत होती. ती म्हणजे सिकंदराची स्वारी.
अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्त्वाकांक्षी तरुण योद्धा होता. त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करुन घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसमवेत सिकंदराच्या गोटात पाठवले. सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती पत्करली होती. अनेक मांडलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते. त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवळे सोपे गेले. चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते. पण या गोष्टीला पुरावा नाही. तरी या दोघांची भेट ही अशक्यदेखील नव्हती. चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त, त्यांची युद्धपद्धति, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा बारकाईने अभ्यास करुन ते ज्ञान आत्मसात केले. या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला.
सिकंदराच्या सैन्याने पुढे जाणे आता नाकारले होते. सतत सात वर्षे मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यात भर म्हणून यौधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांना मिळाली होती. अगोदरच थकलेल्या सैन्याची ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली. सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करुन सिकंदराला ठार मारण्याचा कटदेखील काही लोकांनी केला होता. यौधेय हे अतिशय बलशाली, वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते. प्रसंगी स्त्रियादेखील युद्धभूमिवर शस्त्रे घेऊन युद्ध करीत. या यौधेय गणराज्याला घाबरुन सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला. परिणामी सिकंदराला आपली जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला.
भाग ३:
सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. सैन्य जमताच आचार्यांनी चंद्रगुप्ताच्या साहाय्याने सैन्याला आधुनिक युद्धकलेचे शिक्षण दिले. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु-शिष्यांनी पाटलिपुत्राकडे प्रयाण केले. शक्य तेवढ्या लवकर पाटलिपुत्र गाठायचा चाणक्याचा विचार होता. चंद्रगुप्तदेखील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आतुर झाला होता. चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला. पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहजपणे पोहोचले. त्यांना प्रतिकार झालाच नाही. होणार तरी कसा? चाणक्याने आपल्या भेदनीतीचा वापर करुन गुप्तहेरांच्या सहाय्याने मगधसेनापतीस केव्हाच आपल्याकडे वळवून घेतले होते. चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले. थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्तिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार? शेवटी चंद्रगुप्ताने पाटलिपुत्रात प्रवेश मिळविला. ही देखील आचार्यांच्या भेदनीतीचीच कृपा होती. अन्यथा चाणाक्ष अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळणे महाकठीण होते...
पाटलिपुत्रात प्रवेश करताच चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु-शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली. धनानंदाचा चतुर, मुत्सद्दी अमात्य राक्षस हा गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. पण विलासात दंग असलेला धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरुन ठेवले होते. धनानंद खाली मान घालून उभा होता. आचार्यांनी धनानंदाला आपल्या भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करुन दिली. घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती. मग आचार्यांच्या भेदक नजरेला नजर देणं तर दूरच. आचार्यांनी चंद्रगुप्तास खूण केली. आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता. आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. धनानंदाला स्वत:चा अंत समोर दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्यांकडे गयावया करु लागला. पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि....... एकाच घावात चंद्रगुप्तानं धनानंदाचं मस्तक धडावेगळं केलं ...
अशा रितीने चाणक्यानं आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताला हाताशी धरुन तडीस नेली. पण इथंच आपली कथा संपत नाही. चंद्रगुप्त मौर्य इसवी सनपूर्व ३२२ मधे मगधसम्राट झाला. युक्त्या-प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महा-अमात्य होण्यास भाग पाडले. चाणक्य आता निश्चिंत झाला होता. चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी 'कौटीलिय अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चाणक्य हा आयुष्यभर चंद्रगुप्तासोबत होता की मगध साम्राज्याची योग्य घडी बसवून अन्यत्र निघून गेला हे कळण्यास मार्ग नाही. पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले, ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशीलेकडे विद्यादानार्थ प्रयाण केले असावे असे वाटते.
भाग ४:
साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने - सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली. पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले. अशा तर्हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्या सरदारांपैकी एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.
चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. चंद्रगुप्ताच्या पराक्रमाने भारावून जाऊन आणि काळाची पावले ओळखून सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व त्याच्याशी सख्यत्व केले.
अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची आर्य चाणक्यांची कल्पना वास्तवात आणली. सेल्युकसशी सख्यत्व केल्यावर सेल्युकसने मॅगॅस्थिनिस हा आपला वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला. सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता. फावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती इंडिका या ग्रंथात लिहिली. त्याच्या वर्णनांमुळेच आपल्याला त्या काळाची योग्य माहीती मिळण्यास मदत होते. मूळ इंडिका ग्रंथ आता उपलब्ध नाहिये. पण त्यातील उतारे व दाखले यांची पाश्चात्य लेखकांनी नोंद करुन ठेवली आहे, त्यामुळे थोडीतरी मदत होते
चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रितीने विस्तार केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर आला. चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्यविस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळ्या लेखांचा विषय आहे. शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन धर्माचा स्वीकार केला.
अशी होती 'भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा .... (संपूर्ण)
(चंद्रगुप्त आणि चाणक्य या जोडगोळीचा भक्त) सागर
छान लिहिले आहेस सागर. आवडले.
अजुन वाचायला आवडेल
धन्यवाद निर्मयी आणि स्वप्निल,
अजून लिहिणार आहे. पण सध्या "यौधेय" गणराज्यावर लिहायचे डोक्यात आहे.
उत्तम रे इतिहास उभा केलास !
काही नवीन माहिती देखील अद्यावत झाली जी काल ओघात विसरली होती.
चांगले निरिक्षण राजे,
आधी मॅगेस्थनिस च्या मूळ ग्रंथाबद्दल आणि सेल्युकसच्या व चंद्रगुप्तामधील तहाबद्दल जास्त माहिती दिली नव्हती. व थोडे फार किरकोळ संदर्भ वाढवले आहेत.
सागर, माहीतीपर लेख आवडला.
सम्राट अशोकाबद्दल लिही रे... !
माझ्या मनात खुप दिवस होते पण जमले नाही शेवटी.. म्हणून नाद सोडून दिला.
अशोकाबद्दल पण लिहायचे डोक्यात आहे, बघतो लवकरात लवकर कसे जमते ते.
धनानंदाचा मुद्राराक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता
त्या अमात्याचे नाव "राक्षस" असे होते. मुद्राराक्षस नव्हे.... "मुद्राराक्षस" हे एका नाटकाचे नाव आहे. राक्षसाची मुद्रा( अंगठी/शिक्का) वापरून चाणक्याने धनानन्दाचा पाडाव कसा केला हे या नाटकात दाखवले आहे
आयूष्यात नक्की काय कमी पडले ते कळण्यासाठी काय काय मिळवले/मिळाले ते मोजून पहावे....
धन्यवाद विजुभाऊ निदर्शनास आणून दिल्याबद्दल
मुद्राराक्षस हे विशाखादत्त चे नाटक असून मुख्यकरुन अमात्य राक्षसाच्या स्वामीभक्तीवर आहे. चंद्रगुप्त आणि चाणक्याच्या गुप्त कारवायांना राक्षस कसा जागरुकपणे तोंड देतो आणि चंद्रगुप्ताला राक्षसाने सामील व्हावे म्हणून चाणक्याने वापरलेल्या कूटनीतीचा खेळ कसा शेवटपर्यंत रंगत जातो, याचे सुरेख वर्णन या नाटकात आहे.टंकलेखन चूक दुरुस्त केली आहे. २ ठिकाणी मी चुकुन मुद्राराक्षस असे टंकले होते.
वा खूपच छान...!!! सागर तुम्ही इतिहासाचे संशोधन करीत आहात काय ...??? (असाल) तर त्याबद्दल मला थोडी माहिती मिळू शकेल का..??
जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...
वाटसरुबुवा इतिहासाचे संशोधन हा खूप मोठा विषय आहे. मला प्राचीन भारताच्या इतिहासाची आवड असल्याने थोडाफार अभ्यास आहे. पण तुम्ही पुण्यात असाल व अशा प्रकारच्या संशोधनात रस असेन तर खरडा किंवा व्य.नि. करा , मला आवडेल बोलायला यावर.
हा लेख म्हणजे माझ्या अल्पमतीप्रमाणे केलेला प्रयत्न आहे. तुम्हाला चंद्रगुप्त चाणक्य यांत रस असेन तर पुढील पुस्तके अवश्य वाचा.
चंद्रगुप्त - हरि नारायण आपटे
अशोक आणि मौर्यांचा र्हास - शरावती शिरगावकर
भारतवर्षाचा इतिहास - बाळशास्त्री हरदास
चाणक्य - आनंद साधले
आर्य चाणक्य - पटवर्धन
कौटिलिय अर्थशास्त्र - ब.रा.हिवरगावकर प्रत
जय यौधेय - राहूल सांकृत्यायन
याव्यतिरिक्त इंग्रजीत खूप साहित्य उपलब्ध आहे.
सागर,
चांगले लेखन ! आवडले.
यौधेय ची वाट बघते..
जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !
सुरेख लेखन. येवु दे अजुन असेच.
विशाखदत्ताने दंतकथा आणि कौटिलीय अर्थशास्त्र यांचा मेळ घालुन मुद्राराक्षस नावाचे सात अंकी नाटक लिहिले. त्यात अमात्य राक्षसाचा उल्लेख आढळतो. अन्यत्र तो अभावाने आढळतो किंवा तितकासा तो सबळ मानता येणार नाही असे जाणकार म्हणतात. असे म्हटले जाते की चाणक्याने नंतर तक्षशिलेला प्रयाण केले. मग कारभाराला मदत कुणी केली? म्हणुन राक्षस नामक पात्र असावे असा विशाखदत्ताने विचार करुन नाट्क लिहिले. राक्षस खरेच होता की नाही सांगता येत नाही.
कौटील्याच्या कुटीलतेला प्रणाम. रोजच्या जीवनात व्यवहारी राहण्याची शिकवण त्यांच्याइतका कुणीच देत नाही.
खरं आहे नाना,
कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील निती-नियम सर्वसामान्य माणसाला आपले आयुष्य आनंदात जगता येण्याकरिता होते. प्रजेच्या सुखासाठी राजाने अहोरात्र काम कसे करावे याचे वेळापत्रकच चाणक्याने आखून दिले होते. यात परकीय आक्रमणावर नजर, गुप्तहेरखाते, राजसभा, लोकांना भेटण्याची वेळ, सगळे काही चाणक्याने चोख आखून दिले होते.
आजच्या काळात ब्रिटिशांच्या कायद्याची कॉपी आजची आपली घटना तकलादू आहे हे राज्यकर्त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. सध्याच्या घटनेपेक्षा कौटीलिय अर्थशास्त्र आजही प्रभावीपणे मार्गदर्शक ठरु शकेल
नफेखोरांना आणि अनैतिकतेने व्यापार करणार्यांना वठणीवर कसे आणायचे हेही चाणक्याने सांगितले आहे
राक्षस खरेच होता की नाही सांगता येत नाही.
नाना, याबद्दल बरेच वाद संशोधकांमधेही आहेत. पण मला व्यक्तिश: राक्षस ही व्यक्ती असावी असे वाटते, कारण चाणक्याने चंद्रगुप्ताच्या राज्याची घडी बसवून दिल्यानंतर चाणक्याचे कोणतेही उल्लेख वा संदर्भ मिळत नाहीत. मगधाच्या साम्राज्याचा गाडा चंद्रगुप्ताला हाकायचा होता त्यामुळे सर्व राज्यकारभाराची माहिती असलेला राक्षस अमात्य हा अतिशय योग्य पुरुष होता. त्याला मारणे चाणक्यासारख्या कूटनीतीतज्ञाला सहज शक्य होते, पण चंद्रगुप्ताला मगधाचे साम्राज्य सांभाळण्यासाठी एकनिष्ठ व्यक्तीची गरज होती. आणि राक्षसासारखी एकनिष्ठ व्यक्ती चंद्रगुप्ताबरोबर असणे आवश्यक होते. प्रतिज्ञापूर्तीनंतर चाणक्य हा आचार्यपद सोडून राजकारभारात रमेल हे संभव नव्हते. मूळ पिंड शिक्षकाचा असल्यामुळे चाणक्याने पुन्हा तक्षशीलेकडे प्रयाण केले असावे. पण जाण्यापूर्वी चंद्रगुप्ताला अमात्य राक्षसाच्या सुरक्षित हाती सोपविल्यानंतरच हे झाले असावे. अमात्य राक्षस असणे हे जास्त शक्य आहे. कारण धनानंदासारखा विलासी राजा असूनही मगधाचे सैन्य व कोषागार शक्तीशालीच होते. आणि एकनिष्ठ व लोकसेवेचे व्रत घेतलेल्या व्यक्ती असल्याशिवाय हे शक्य नसणारच. या गृहीतकाचाही आधार मी हा तर्क मांडताना घेतला होता.
आर्य चाणक्यांचा विजय असो