मेरी याद में तुम ना. - Talat Mehamud

दिल मतवाला लाख संभाला, फिर भी किसीपर आ ही गया...' खरंच! तरुण मनाला प्रेम केल्याशिवाय राहवतच नाही. आपल्या प्रियतमेच्या मुखड्याकडे पाहून नकळत शब्दांची फुलं उमलतात... "आ तेरी तसवीर बना लूँ, मैं अपनी तकदीर बना लूँ, दिल के कोरे कागज पर उल्फत की लकीर बना लूँ...'
नजरेला नजर भिडते... दोघांची ही अवस्था "मिलते ही आँखे दिल हुआ दीवाना किसी का...' अशी होते. पण चंद्राच्या कलांप्रमाणे फुलणाऱ्या या प्रीतीला विरहाचा शापही आहे. मग विरहाने व्याकूळ "बेरहम आसमॉं मेरी मंजिल बता है कहॉं...' असं विचारणाऱ्या घायाळ मनाला "ऐ जिंदगी के राही हिम्मत न हारना...' असं म्हणत एक मयूरपंखी मखमली स्वर हळूच आपल्या कुशीत घेतो... आपल्या दुःखांना स्वतःच्या आवाजातून प्रगट करतो... आणि आपलेपणानं हळूच त्यावर फुंकरदेखील घालतो...
तलत मेहमूद! भावनाप्रधानतेच्या क्षितिजावर उगवलेला, आपल्या शीतल स्वरांची अखंड बरसात करणारा चंद्र! तलतच्या या मखमली मधाळ आवाजाने विरहाचे, हळुवार प्रीतीचे, प्रेमभंगाचे भाव आपल्या आठवणींमध्ये कायमचे कोरून ठेवले आहेत. "अंधे जहॉं के अंधे रास्ते...' म्हणताना परिस्थितीच्या कात्रीत सापडल्याच्या भावना तो व्यक्त करतो. "जाये तो जाये कहॉं...' म्हणताना तो हताश असतो.
आपल्या प्रियतमेसाठी तो "जलते है जिस के लिये, तेरी आँखो के दिये, ढूँढ लाया हूँ वही, गीत मैं तेरे लिये...' अशी अनोखी भेट आणतो. "शामे गम की कसम, आज गमगी है हम, आ भी जा आ भी जा, आज मेरे सनम...' अशी व्याकूळ साद तिला घालतो. "आँसू समझ के क्यूँ मुझे, आँख से तू ने गिरा दिया...' असं काकुळतीने तिला विचारतो. "सबकुछ लुटा के होश में आये तो क्या किया...' म्हणताना भग्न हृदयाचं तो प्रतीक असतो. प्रेमभंगाचं दुःख दिल्याबद्दल जणूकाही आभार मानतच तो "शुक्रिया ऐ प्यार तेरा शुक्रिया दिल को कितना खुबसूरत गम दे दिया' असं म्हणतो आणि या दुःखात पूर्णपणे बुडून जाऊन हताशपणे पुटपुटतो, "अब जिंदगी का बोझ उठाया न जायेगा...'
अशाच एका कातर संध्याकाळी तिच्या आठवणी त्याला छळायला येतात. तो पुटपुटतो... "फिर वही शाम, वही गम, वही तनहाई है, दिल को समझाने, तेरी याद, चली आयी है...'
तलतच्या अशा भावनाप्रधान, तरल गाण्यांची उदाहरणं तरी किती द्यावीत? आठवणींच्या विखुरलेल्या मोत्यांसारखी ती पसरली आहेत. विरह हा तलतच्या गायकीचा आत्मा आहे नि आठवण त्याच्या गायकीचं मर्म! लखनौच्या "मॉरीस कॉलेज ऑफ म्युझिक'मधून संगीतातली "मास्टर्स डिग्री' मिळविणाऱ्या तलतला अभिनयाची खूप हौस होती. त्याला लोकप्रिय गायक-अभिनेता व्हायचं होतं आणि त्याच ओढीने तो स्वप्ननगरी मुंबईत आला.
संगीतकार हुस्नलाल भगतराम यांनी "राखी' या चित्रपटासाठी तलतला पार्श्वगायनाची पहिली संधी दिली. लोकप्रिय अभिनेता करण दिवाणवर चित्रित झालेल्या या गीताचे बोल होते... "तेरी गली से बहोत बेकरार हो के चले...'
तलत खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला तो 1950 च्या अनिल विश्वास यांनी स्वरबद्ध केलेल्या, दिलीपकुमारवर चित्रित झालेल्या "आरजू' चित्रपटातील "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल...' या गीतामुळे! अनिलदांनी तलतचा आवाज सर्वतोमुखी केला, आणि त्याच वर्षी संगीतकार नौशादनी "बाबूल' चित्रपटासाठी दिलीपकुमारकरिताच तलतकडून पार्श्वगायन करून घेतलं आणि "बाबूल'ची गाणीदेखील खूप गाजली. लोकप्रियतेच्या लाटेवर तलत स्वार झाला.
अनेक नामवंत आणि उदयोन्मुख संगीतकारांनी आपल्या अप्रतम रचना तलतला बहाल केल्या... "ओ तीर चलानेवाले - (नगमा), है ये वही आंसमॉं - (चारचॉंद) - नौशाद, तेरे खातिर सितमगर, जिंदगी देनेवाले सून - (दिले नादान), फिर मुझे दीदेतर याद आया, दिले नादॉं तुझे हुआ क्या है - (मिर्झा गालिब) - गुलाम मोहम्मद, फिजाओमें नूर छलकाओ - (लालारुख) - खय्याम, रात ने क्या ख्वाब दिखलाये - (एक गॉंव की कहानी), इतना न मुझसे तू प्यार बढा - (छाया), आहा रिमझिम के ये- (उसने कहा था) - सलील चौधरी, मितवा ये कैसी अनबुझ प्यास, किसको खबर थी - (देवदास), तेरे साथ चल रहै है जभी - (अंगारे) - एस. डी. बर्मन, कुछ अपनी कहो - (परछाई), बेचैन नजर बेताब जिगर - (यास्मीन) - सी. रामचंद्र, तसवीर बनाता हूँ - (बारादरी) - नाशाद, फिर तुम्हारी याद आयी, माजंदरा माजंदरा - (रुस्तुम सोहराब) - सज्जाद हुसेन, मुझे देखो हसरत की तसवीर - (बाझ), प्यार पर बस तो, सच बता तू - (सोने की चिडिया) - ओ. पी. नय्यर, हमसे आया न गया - (देख कबीरा रोया) - मदन मोहन, सुंदरता के सभी शिकारी - (जोगन) - बुलो सी. रानी, जब छाये कभी सावन की घटा - (रेशमी रुमाल) - संगीतकार बाबूल...
अनिलदांचे ऋण
संगीतकार अनिल विश्वास यांनी तलतला त्याची ओळख प्राप्त करून दिली. मुहब्बत तर्क की मैं ने - (दो राहा), राही मतवाले - (सुरय्याबरोबर), कभी है गम - (वारीस), चला दिया कारवॉं - (लैला मजनू)... अशी गाणी गाऊन घेताना पार्श्वगायनाचे धडे दिले. तलतच्या लोकप्रियतेवर जळणाऱ्या काही मत्सरी लोकांनी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये तलतचा आवाज कापरा आहे, तो थरथरतो, अशी हाकाटी पिटायला सुरवात केली, तेव्हा तलत अस्वस्थ झाला व त्याच्या गाण्यातील आत्मविश्वासच गेला. त्याला गाणं नीट म्हणता येईना, या वेळेस त्याला अनिलदांनी विश्वासात घेतलं व समजावलं, ""वेड्या, तुझ्या आवाजातील हा कंपच तुझं बलस्थान आहे; तुला मिळालेली देणगी आहे. त्यामुळेच तू एकमेव आहेस! इतरांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नकोस.'' अनिलदांच्या या समजावणीमुळे तलतला त्याचा आत्मविश्वास परत मिळाला व तो एक अप्रतम गाणं गाऊन गेला... "शुक्रिया ऐ प्यार तेरा शुक्रिया...
दिलीप - देव आणि राज
60 च्या दशकात चित्रपटसृष्टीमध्ये या त्रिमूर्तींचं राज्य होतं. या नायकांचा आवाज म्हणून गाण्याची जेव्हा तलतला संधी मिळाली, तेव्हा त्याचा व्यावसायिक फायदा त्याला खूप झाला; पण जेव्हा या त्रिमूर्तींनी त्याची साथ सोडली, तेव्हा त्याची पीछेहाट झाली. दिलीपचा आवाज म्हणून सुरवात करणाऱ्या तलतला दिलीपच्या लोकप्रियतेचा फायदा मिळाला. पडद्यावरच्या भग्नहृदयी प्रेमिकाच्या दिलीपच्या प्रतमेला तलतचा गहिरा आवाज फिट्ट बसला.
ऐ मेरे दिल कहीं और चल - (दाग), मेरा जीवनसाथी बिछड गया - (बाबूल), ये हवा ये रात ये चांदनी - (संगदील), याद रखना चॉंदतारों - (अनोखा प्यार), सीनेमें सुलगते है अरमॉं - (तराना), हिचकियों के साजपर - (दाग)... अशी अप्रतम गाणी दिलीपसाठी त्याने गायली. राज कपूरसाठी "बेवफा'मध्ये प्रसद्ध तबलावादक अल्लारख्खा कुरेशींनी तलतकडून "दिल मतवाला लाख संभाला...', "तुम को फुर्सत होती मेरी जॉं...', "तू आये या ना आये तेरी खुशी...', "एक बार झलक दिखला के हमें...', "आशियाना'मध्ये मदनमोहन यांनी "मैं पागल मेरा मनवा पागल...', "मेरा करार ले जा...' ही अप्रतम गाणी दिली. खेमचंद्र प्रकाशने राजसाठी "जान पहचान'मध्ये "अरमान भरे दिल की लगन...' दिलं, तर रोशनने "अनहोनी'मध्ये तलतच्या आवडीचं "मैं दिल हूँ इक अरमान भरा...' दिलं. राहता राहिला देव आनंद!
सचिनदांनी देवकरिता "सजा'मध्ये लताबरोबर तलतला "आ जा आ जा तेरा इंतजार है...' हे पहिलं गाणं दिलं. देव-मधुबालाच्या "अरमान'मध्ये "भरम तेरी वफाओं का...' तलतला दिलं आणि 1954 च्या "टॅक्सी ड्रायव्हर'मध्ये देवसाठी तलतने गायलेल्या "जाये तो जाये कहॉं...'साठी सचिनदांना पहिलं फिल्मफेअर ऍवॉर्डही मिळालं. शंकर-जयकिशननी देवसाठी "तुझे अपने पास बुलाती है...' (पतिता), "तुम तो दिल के तार छेड कर...' (रूप की रानी चोरों का राजा), जयदेवनी "देख ली तेरी खुदाई...' (किनारे किनारे) ही गाणी दिली.
पण दिलीप- रफी, देव- किशोर व रफी आणि राज- मुकेश हे समीकरण जुळलं आणि मग पर्यायाने त्यांची गाणी तलतला मिळेनाशी झाली. कालांतराने चित्रपटसंगीतामध्ये ऑर्केस्ट्राचं प्रभुत्व वाढलं. संगीतरचनांमधली हळुवारता लोप पावायला लागली. 60 च्या दशकात "जंगली'च्या "याहू'ने पार्श्वगायनामध्ये वेगळाच "ट्रेंड' आणला. महंमद रफीचं सार्वभौम साम्राज्य स्थापित झालं आणि मंद सुगंधासारखा दरवळणारा हा आवाज एखाद्या उदबत्तीसारखा विझून गेला. आजच्या पिढीला "तलत मेहमूद' नावाचा कुणी गायक होता, हे किती माहिती असेल ठाऊक नाही; पण काळाच्या ओघात आपण विस्मृतीत गेलो तरी त्याची पर्वा कुणी करू नये, असं तलतनेच आपल्या गीतामधून सांगितलंय. "इस को बना कर इस को मिटाना इस दुनियाकी रीत रे...' असं म्हणणाऱ्या मित्रवर्य मुकेशप्रमाणेच तलतही आपल्याला सांगतो...
याद में तुम ना, आँसू बहाना
न जी को जलाना, मुझे भूल जाना...
समझना के था एक, सपना सुहाना
वो गुजरा जमाना...
भूल जाना..
- चंद्रशेखर महामुनी
सकाळ - सप्तरंग (आठवणींच्या गावा)
.jpg)
सुरेख!!
हळूवार मोरपंखी तलम आवाजाचा तलत मेहमूद.. हळूवार गाणी कशी जवरदस्त ताकदिने पेलायचा..
महान कलाकाराची तितकीच सुरेख ओळख..
मस्त आहे तुमचा लेख! माझ्या
मस्त आहे तुमचा लेख! माझ्या सगळ्यात आवडत्या गायकाबद्दल वाचताना खूप बर वाटल.
मस्त
मस्त लेख. दोनदा वाचला. परत पुन्हा केव्हा तरी वाचेन.
मी तलतचं गाणं अगदी तलत म्हणून वगैरे ऐकलेलं नाहीये. तसं एकूणच फिल्मी गाण्याविषयी मी फारसा उत्साही नसतो. पण या लेखात काही गाणी एकदम परिचित निघाली. आणि, "अरेच्चा, हा तलत तर" अशी प्रतिक्रिया निर्माण झाली. आधी नुसता लेख उत्तम सुरवात असल्याने वाचायला सुरवात केला होता. पण मग तलतशी नातं जोडलं गेलं बहुदा. दुसऱ्यांदा लेख वाचला.
असं आणखी लिहा.
तलतची परत एकदा ओळख करुन
तलतची परत एकदा ओळख करुन दिल्यबद्दल धन्यवाद.
तलत
तलत्च्या पीछेहटीच मुख्य कारण म्हणजे तो स्वतःच गाणी नाकारायचा. शब्द आणि चालीच्या बाबतीत तो फार काटेकोर होता...पण त्या दशकात शेकडाँनी दर्जेदार गाणी दिली जात असताना त्याच्या ह्या अट्टाहासाच कारण मला कळत नाही, त्याचा त्याला व्यावसायिक तोटा झाला आणि आपण अनेक तलत गीतांना मुकलो.
दुसर कारण म्हणजे रफी....तो कुठलही गाण अप्रतिम गाऊन जायचा...दिलीपची इमएज बनण्यात तलत, मुकेश आणि रफी ह्यांचा वाटा होता...पण जास्त शोभायचा तलतचाच आवाज...पण जेंव्हा दिलीपला दु:खी प्रतिमा सोडावी लागली तेंव्हा रफी ईतर कोणाहीपेक्षा जास्त शोभला.संगीत्करंचाही त्याच्यावर विश्वास.
देव-किशोर समीकरण जुळल १९५७ नंतर, पण तरीही १९६१ च्या तेरे घर के सामने पर्यंत देवची इमेज मुख्यत्वे रफीनेच खुलवली.
तलत गझलच्या क्षेत्रात मात्र शेवट्पर्यंत अव्वल राहिला. त्याचा शेवटचा आल्बम, "गझल के साज ऊठाओ" ह १९८६ साली प्रसिद्द झाला.
मजकुरातील तपशीलाबद्दल चु.भु.दे.घे.काही सुधारणा असल्यास सुचवणे
माझे लिखाण
आभार..!
आपणा सर्वाचे मनापासुन आभार..!
सन्ग्-दिल
दिल मे समा गये सजन फूल खिले सजन सजन ...
हे द्वन्द्व गीत सर्वोत्तम होते.
अरे वा, महामुनीसाहेब तुम्ही
अरे वा, महामुनीसाहेब तुम्ही पण येथे आलात का ?
छान छान... आता जरा देवानंद वर एक लेख वाचायला मिळालाच पाहिजे, ही आग्रहाची मागणी समजा.
लेख अतिशय उत्तम सकाळमध्ये वाचला होता.
सुरेख लेख!
सुरेख लेख!
आभार..!
पुन्हा एकदा आभार..!
सुरेख लेख.
ये हवा, ये रात, ये चांदनी
तेरी इक अदा पे निसार है
संगदिल - सज्जाद हुसेन
ह्या गाण्यात प्रत्येक ओळीमध्ये स्वरांतल्या हरकतींनी अप्रतिम लय पकडली आहे. त्याबरोबरीने सज्जाद हुसेननी स्वतः वाजवलेले मेंडोलीनदेखील अतिशय दाद देण्यासारखे.
खरे आहे..
खरे आहे दत्ताजि..!
खुप मस्त वाजवाले आहे.