काथ्या आणि कूट
विनोदाला कोणत्याही शब्दाचं वावडं नसतं. काथ्या म्हणजे काय असा कूट प्रश्न आजच्या पिढीला पडणं साहजिकच आहे. कारण काथ्या कशापासून बनवतात, कशासाठी वापरतात? हे काही शालेय पुस्तकात लिहिलेले नाही. सध्या नायलॉन दोऱ्या वापरात असल्याने काथ्या हा प्रकार इतिहास कालीन चीज झाली आहे.
नारळाच्या रखरखीत धाग्यांना वळून काथ्या करतात. काथ्या आहे म्हणून माथ्यावर छप्पर आहे. बांधकामाच्या पहाडाला सुतळी चालत नाही, भिजवलेला काथ्याच लागतो. त्व्हाच गवंडी विटा रचू शकतात. रचण्याची युक्ती रचनाकारालाच उमजलेली असते. म्हणून काथ्या वळतांनाची रचना महत्त्वाची. त्याला व्यवस्थित पीळ नसेल तर शीळ घालीत बांधणे जमणारच नाही. असो.
या काथ्या पासून कासराही बनवतात. कासरा काय किंवा सासरा काय, दोन्हीही लगाम लावणारे म्हणून परिचित. कासरा ओढला की वासराचे बेफाम हुंदडणे थांबते आणि सासरा गरजला की सून वा जावई जागेवरच थबकतो! काथ्याचा आणखी एक 'उपेग' सासऱ्याच्या 'बा'ला माहिती होता...
काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोंडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेंड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा! कुठे कापूस अन् कुठे काथ्या? परंतु खरखरीत मार्गानेच ती मुलायम वाट गवसायची.
आता राहिला कूटाचा प्रश्न. उखळात घालून कुटणे हा वाक्प्रचार आता नाहीसा करावा लागेल. कारण आता ना उरली उखळं ना दिसतात मुसळं. जिकडे तिकडे मिक्सरचा सुळसुळाट...बटन दाबताच कूट तयार.
परंतु ह्याच कूटाचा प्रश्न गृहिणीपुढे उभा ठाकला की कालवणाचं फुळ्ळुक पाणी व्हायला वेळ लागत नाही! कूट टाकल्याशिवाय जशी भाजी मार्गी लागत नाही तसेच कूट प्रश्न सोडवल्याशिवाय स्वयंवर जिंकता येत नाही. कुटाचा प्रश्न केला काय किंवा प्रश्नाचा कूट केला काय, घरीही अन् दारीही महिलावर्गाची राजीखुशी महत्त्वाची असते.
म्हणून कितीही काथ्या कुटला तरी त्याने कुटाचा प्रश्न थोडाच सुटेल? हा आणखी एक कूटप्रश्न होईल! परंतु अशांचा काथ्याकूट सूज्ञांनी न केलेलाच बरा...
काय कळलं?
.jpg)