नमस्कार मंडळी,
रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो.
कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात. आजुबाजुला असणारे ईतर प्रवासी, त्यांची वेशभुषा, आचारविचार, बोलण्याची पद्धत, दिसणं, त्यांचे संवाद, खिडकीबाहेरुन दिसणारी चांगली वाईट दृष्य एक ना हजार गोष्टी. एखाद्या रडणार्या बाळाकडे पाहुन कीव यावी, तर एखाद्या भांडकुदळ बाईकडे पाहुन एकदमच हसु यावं, एखादा संवाद ऐकुन भुतकाळात जावं तर कधी एखादा निसर्गरम्य देखावा पाहुन प्रसन्न व्हावं. बस किंवा ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबली की चहाचे दोन घोट घ्यावेत, त्या नव्या ठिकाणच्या दुधा-पाण्याची चव घ्यावी, एखाद्या अनोळख्या व्यक्तीशी हसुन २ शब्द बोलावेत, कधी जमलच तर चार टाळके जमवुन मस्त गप्पा माराव्यात. कंडक्टर किंवा ड्रायवर ला उगाच "अजुन किती लांब आहे/ किती वेळ लागेल" असे विचारावे. गाडीतल्या आतल्या बाजुला खरडलेली "संजय लव्ज शिल्पा" अशी वाक्य वाचावीत, कोरलेले बदाम, त्यातुन जाणारा बाण पाहुन हसावं. विविध रोग बरे करणार्या क्लिनिकच्या, पोट साफ करणारे चुर्ण, अस्सल सोने कुठे मिळते अशा जाहीराती पहाव्यात.
प्रवासात गमतीजमती सुद्धा खुप घडतात. अशीच माझ्याबरोबर घडलेली एक गंमत. मी कॉलेजात असताना परिक्षा संपवुन घराकडे जायला रात्रीची १२ वाजताची बस पकडली. ५ तासांचा प्रवास, परिक्षेमुळे झालेलं जागरण, पटकन तिकिट घेऊन एका खाजगी बसमधे बसलो (खाजगी बस स्वस्त असतात ना
). बसल्या बसल्या झोप लागली. मधे चहापाण्यासाठी बस थांबली. मी झोपेतच उतरलो आणी सरळ वॉशरुमकडे गेलो. परत येऊन चहा घेतला, चहा अर्धा झाला असेल, मला एकदम जाणवलं की मला बसचा नंबर, रंग काहीच लक्षात नाहीये म्हणुन. चहाचा कप तसाच फेकला, ईकडे तिकडे नजर फिरवली, २०-२५ बसेस उभ्या होत्या. माझ्या खिशात बसचं तिकिट होतं, ते बाहेर काढलं आणी प्रत्येक बसच्या जवळ जाउन ड्रायवर, क्लीनर ला तिकिट दाखवुन विचारु लागलो की हे तिकिट कोणत्या बसच आहे म्हणुन. एजंट ने दिलेलं तिकिट, कोण ओळखणार?. प्रत्येक बस मधे जाऊन शोधाशोध करु लागलो, माझी बॅग बसमधेच ठेवलेली होती आणी त्यात बर्याच महत्वाच्या गोष्टी होत्या. कोणती बस जाणारी, कोणती येणारी काही कळत नव्हतं. मला घाम फुटला. शेवटी बसेस जिथुन बाहेर निघतात तिथे जाऊन थांबलो, बाहेर जाणार्या प्रत्येक बसला थांबवुन चेक करु लागलो. एका बसमधला क्लीनर मला पाहुन ओरड्ला "ओ भाइ किधर हो, कबसे होर्न बजा रहे है. चलो जल्दी अंदर" मी बसमधे बॅग पाहुन खात्री केली. त्याने मला कसे ओळखले देव जाणे, पण मग मी मात्र कानाला खडा लावला. बसमधुन उतरताना बसचा नंबर आणी रंग काहीही झालं तरी उतरण्याआधी लक्षात ठेवीन.
अशीच एक छोटी गंमत. एकदा एक जाड्या विंडो सीट साठी खुप भांडला, "एजंटने मला विंडो सीट सांगुन तिकिट दिले आहे" असे म्हणुन. मला ड्रायवरने विनंती केली आणी मी माझी विंडो सीट त्याला देऊ केली. बस सुरु झाली. थोड्याच वेळात त्या विंडोसीटवर एसीचे लीक झालेले पाणी पावसासारखे गळु लागली आणी जाड्याचा अवतार पाहुन मी त्याच्यासमोरच मोठ्याने हसु लागलो. बाकीच्यांना कळताच तेही हसु लागले आणी जाड्याचे हसु झाले.
असा हा प्रवास, मी एक गोष्ट प्रवासात नक्की पाळतो. प्रवासात चीडचीड न करता प्रत्येक गोष्टीची मजा कशी घेता येईल हे पहावे.
तुमच्याही काही गमती जमती असतील तर ईथे सांगा. 
मस्त लिहिलं आहे! सगळ्यांचे
मस्त लिहिलं आहे!
सगळ्यांचे गंमतीशीर प्रवास वाचायला मिळणार भौतेक! येवद्या...
मस्त रे ममो....
मस्त रे ममो....
मस्तच लिहिलं आहे
मस्तच लिहिलं आहे
मस्तं मी सुधा प्रवासात अनेक
मस्तं मी सुधा प्रवासात अनेक गोष्टी करत असतो.
-पुण्याचे पेशवे
मस्त
मस्त लिहलयं
मलासुध्दा प्रवासात अशा मजेशीर गोष्टी बघायला मिळतात.
एकदा लातूर-तुळजापूर बसने
एकदा लातूर-तुळजापूर बसने प्रवास करत होते. एका पारधी पुनर्वसन प्रकल्पावर जायचे होते. एक काका शेजारी येऊन बसले. शहरी दिसत होते. माझ्या दोन ग्रामीण बायकांसोबत गप्पा चालू होत्या. त्यांनीही भाग घेतला. मग माझी ओळख करून घेतली. मराठी साहित्यात एम.ए. करतेय म्हटल्यावर ते त्या विषयावर गप्पा मारू लागले. अस्मादिकांनी नवीन ग्रामीण साहित्यावर आपले दिवे पाजळले ! गप्पांच्या नादात त्यांचे नाव पण विचारले नाही. मी ज्या ठिकाणी उतरले तिथेच तेही उतरले. दोन ओळखीचे कार्यकर्ते स्वागताला आलेले दिसले. ते थेट काकांकडे ! मला बघुन म्हणाले बरं झालं मायातै, तू यांच्यासोबत आलीस.. ! मी 'हॅ हॅ हॅ केलं. ते मोटारसायकलवर पुढे निघून गेले. नंतर कळाले. ते प्रसिद्ध लेखक आनंद यादव होते
मी ज्या कार्यक्रमासाठी जात होते त्याचे ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते !!! मग काय , येताना ते ज्या बसमध्ये नाहीत अशी बस घेतली !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
मस्तं किस्सा
मस्तं किस्सा.
-पुण्याचे पेशवे
यादवांबरोबर तू चर्चा केली
एका प्रवासात बसला खूप गर्दी
एका प्रवासात बसला खूप गर्दी होती. सोबतचे सामान आवरत कशीबशी उभी होते. बस आपल्या लयीत जात होती. एका स्टॉपवर एक आजी आणि तिचा १२-१३ वर्षाचा नातू बसमध्ये चढले. माझ्या मागे येऊन आजी उभी राहिली. मी बघितले की महिलांसाठी राखीव जागेवर दोन तरूण पोरं बसली आहेत. त्यांना म्हटलं द्या की म्हातारीला जागा.. तर म्हणे लांबून आलोय ! मी म्ह्टले जागा राखीव आहे. तर म्हणे ही जागा 'वृद्ध आणि अपंग अस्लेल्या स्त्रीयांसाठी आहे ! "
असा संताप आला. कंडक्टरला बोलवले. जागा रिकामी करून द्या म्हणून सांगितले. तो ऐकायला तयार होईना. मग माझा आवाजही चढला. तक्रारीची वगैरे धमकी दिल्यावर कंडक्टरने त्या पोरांना उठायला सांगितले. एकानेच ऐकले. दुसरा मक्खपणे तसाच बसून राहिला. काम तर झाले म्हणुन आजीबाइला सांगितले बसा तिथे. तर एवढ्या वेळापासून हिच्यासाठी मला भांडत असलेली बघणार्या या माऊलीने त्या जागेवर मोठ्या प्रेमाने आपल्या १२ वर्षाच्या घोडम्या नातवाला बसवले
मला मात्र एकही हात रिकामा नसल्याने कपाळावर मारून घेता आला नाही !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
नेकी कर, दर्यामें डाल! और
नेकी कर, दर्यामें डाल! और क्या...
मस्त
मस्तच अनुभव.
आयला प्रवास !!! असे म्हणत मी
आयला प्रवास !!!
असे म्हणत मी मेलेला जिवंत होऊ शकतो.
*
कुठून सुरु करु व कुठे थांबू असे होते.. !
एक अशीच आठवण... आठवली.
घर सोडून खुप दिवस झाले नव्हते...
एक पिशवी हातामध्ये, त्यात दोन कपडे.
आंबा घाटात बससाठी उभा होतो, गोव्याला जायचे म्हणून.
खिश्यात दमडी नाही दाताने चावून बघावी तर..
चार एक तास तसाच उभा...
बाजूला भजी विकणारी काकू होती..आपला गाडा बंद करत होत्या.
तीने बोलवले व विचारलं !
काय रं बाळा ?
का थांबला आहेस एवढ्या गाड्या गेल्या.
मी म्हणलो पैसा नाही आहे...
त्या माऊलीने लगेच काही न विचारता..
दहा एक भजी पॅक केली..
व हातामध्ये २० रु. ची एक नोट दिली.
व तरातरा निघून पण गेल्या.....
साधे माझ्या आभाराचे किंवा प्रतिक्रिया काय होते हे देखील पाह्यला थांबल्या नाहीत..
कुठे माथा ठेवू मी ?
जेव्हा त्या माऊलीला माझा नमस्कार मिळेल ?
त्यानंतर अनेकदा गेलो आंबा घाटात... त्या माऊलीला भेटायला...
पण ती कधीच भेटली नाही मला...
त्या वीस रुपयामुळे व त्या पॅक केलेल्या भजी मुळे काय घडले हे कधीतरी नंतर लिहीन मी..
खरचं Undu बटन हवे लाईफमध्ये...यार... !
* असे अनेक अनुभव मला ह्या जिवनाच्या प्रवासाने दिले.
मग हा प्रवास बस, ट्रेन, विमान अथवा समुद्री जहाजाचा असो.. व त्या सोबत मला मदत करणारी अनेक लोक...
ह्या सगळ्या आठवणी ह्या लेखामुळे जागृत झाल्या..... व आता आठवण येत आहेतच तर.. त्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून म्हणतो की तुमचे ऋण मी ह्या जन्मात नक्कीच फेडू शकलो नाही पण कधी तरी काळ, वेळ व अवस्था ह्यांचा योग जुळलाच तर नक्कीच परतफेड करेन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."